गुरुवार, २८ जुलै, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (६ / ९)


संदेशांच्या पलीकडे जाऊन, जीवसृष्टीचा शोध घेण्याचे जे दोन मार्ग आहेत त्यातील एक मार्ग आहे Space Missions (अवकाश मोहिमा). यातील मुख्य अडसर आहे अवकाशातील प्रचंड अंतरांचा. त्यामूळे उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारे अजून काही दशके तरी, आपली मजल ही आपल्या सूर्यमालेपुरतीच मर्यादित राहणार आहे. 

Habitable zone ची संकल्पना ही मुख्यत्वेकरून पाण्याची, सुयोग्य तापमानाची आहे आणि एकंदरच मानवाला सुयोग्य ठरेल, सुयोग्य बनवता येईल अशा प्रकारच्या पर्यावरणाची आहे. त्यामुळेच Habitable Zone चा मागोवा हा वास्तविक हा पृथ्वीसदृश परकीय जीवसृष्टी शोधण्याचा आहे. पण आपल्या सूर्यमालेत Habitable zone मध्ये असणार्‍या ग्रहांची मर्यादित संख्या लक्षात घेता,  त्यापलीकडे जाऊन 'मानवसदृश नसलेली, पाण्याची आवश्यकता नसलेली, श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसलेली जीवसृष्टी किंवा सूक्ष्म जीवसृष्टी  का नसेल' हा प्रश्न वैज्ञानिकांना पडला,  आणि त्याविषयी सूर्यमालेतील अनेक ग्रहांचे, उपग्रहांचे वातावरण लक्षात घेऊन विविध शक्यता मांडल्या गेल्या;  पण या प्रश्नाचे उत्तर हे सर्वप्रथम पृथ्वीवरच मिळाले.

भूमध्य समूद्राच्या तळाशी, समुद्रसपाटीपासून सुमारे 3 किमी इतक्या खोल पाण्यात सापडलेल्या Loricifera या बहुपेशीय जीवाच्या प्रजाती ऑक्सिजनशिवाय त्यांचा संपूर्ण जीवनक्रम पूर्ण करतात. त्यापूर्वी ऑक्सिजनची आवश्यकता नसणारे किंबहुना ऑक्सिजन असल्यास मृत पावणारे अनेक एकपेशीय जीवाणू सापडले होते.

Methylacidiphilum fumariolicum SolV bacterium हे मिथेन वापरणारे जीवाणू इटलीतील एका निद्रिस्त ज्वालामुखीत सापडले आहेत. त्यांचे अन्न आहे Lanthanide या नावाने ओळखले जाणारे आवर्त सारणीतील धातू .   पाण्याखाली असणार्‍या सक्रिय ज्वालामुखीच्या आसपास राहून, ज्वालामुखीतून बाहेर येणार्‍या लोह, मिथेन, गंधक यावर जगणारे जीवाणू ही सापडले आहेत.

याव्यतिरिक्त 'दगड खाणारे जीवाणू' या गटात मोडणारे Thiobacillus thioparus हे जीवाणू हे संगमरवरावर राहतात.  हवेतील सल्फर डायऑक्साइडचे ते सल्फ्युरिक अॅसिड मध्ये रूपांतर करतात आणि त्याचा वापर करून संगमरवराचे प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये रूपांतर करतात. या दरम्यान जो कार्बन डायऑक्साइड तयार होतो तो स्वत:च्या पोषणासाठी वापरतात. याच गटात मोडणारे Nitrosomonas नामक जीवाणू  हवेतील अमोनिया वापरुन नायट्रस अॅसिड व नायट्रिक अॅसिड तयार करतात आणि दगडांचा नाश करतात. 

Deinococcus radiodurans या प्रजातीचे जीवाणू हे तब्बल 30 लाख रॅड इतक्या तीव्र गॅमा किरणोत्सर्गातही तग धरतात, इतकेच नव्हे तर त्यांची वाढही होते.  (मानवाला साधारण 500 ते 1000 रॅडचा डोसही जीवघेणा ठरतो )

जर पृथ्वीवर, इतक्या वेगवेगळ्या तर्‍हेने राहणारी सजीव सृष्टी सापडत असेल, तर 'ऑक्सिजन नसल्यामुळे जीवसृष्टी नाही' असे लेबल लावलेल्या सूर्यमालेतील अनेक ग्रहांवर, उपग्रहांवर जीवसृष्टी निश्चितच असू शकते आणि त्यादृष्टीने आता शोधही चालू आहे.

सूर्यमालेतील जीवसृष्टीचा शोध या मोहिमांचे सर्वप्रथम आणि स्वाभाविक लक्ष्य हे, चंद्र होते. पृष्ठभागावर असलेला पाण्याचा अभाव आणि अत्यंत विरळ वातावरण असल्याने, चंद्रावर कुठल्याही स्वरूपाची 'दृश्य' जीवसृष्टी नाही हे लवकर लक्षात आले. तरीही चंद्रावरील मानव-मोहिमांमध्ये तिथे अनपेक्षित असे बरेच काही दिसल्याच्या आणि NASA ने 'त्या गोष्टी' दडविल्याच्या,  चंद्रावर ailen-base असल्याच्या,  Google Moon या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिथे काही बांधकामे दिसत असल्याच्या,  NASA ने स्वत:च जारी केलेल्या काही छायाचित्रांना zoom करून बघितल्यावर त्यात 'विशेष' काही दिसत असल्याच्या वावड्या अनेक काळ उठत होत्या आणि अजूनही उठतात.  या संबंधीची छायाचित्रे, विडियो आणि इतर माहिती इतक्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर उपलब्ध आहे, की खरे काय आणि खोटे काय याचा मनात संभ्रम उपजावा.


चांद्रमोहिमांचा इतिहास हा अनेक अपयशांच्या पायावर उभा आहे. ऑगस्ट १९५८ पासून सुरू केलेल्या प्रयत्नांना खर्‍या अर्थाने पहिले यश मिळाले ते  रशियाचे Luna 9 हे  ३ फेब्रुवारी १९६६ रोजी चंद्रावर सुखरूप उतरलेले तेंव्हा.  मात्र सूक्ष्म, सुप्त जीवसृष्टीचा शोध घेऊ शकेल, अशी कोणतीही यंत्रणा त्या यानात नव्हती.  २४ डिसेंबर १९६६ रोजी Luna 13 या यानाने सर्वप्रथम मातीचे नमुने तपासून त्याचे अहवाल पृथ्वीकडे पाठवले.  डिसेंबर १९६८ मधील, अपोलो 8 ही चंद्राभोवती घिरट्या घालण्यात यशस्वी  झालेली मानवाची पहिली झेप,  २० जुलै १९६९ हे मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल आणि डिसेंबर १९७२ ची मानवाने पाऊल ठेवण्याची शेवटची चांद्रमोहिम. त्यानंतर १९७८ पर्यंत काही मानवरहित चांद्रमोहिमा झाल्या आणि  त्यानंतर थेट १९९० पासून अनेकवेळा जपान, आणि एकदा ESA आणि चीन यांच्याही मोहिमा झाल्या. पण या सर्व टप्प्यांवर चंद्रावर कोणतीही जीवसृष्टी नाही या दाव्यावर वैज्ञानिक जगत ठाम होते.  मात्र भारताच्या चांद्रयान 1 ने impact probe च्या माध्यमातून चंद्रावरील विवरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याची पुष्टी केली आणि  सूक्ष्म स्वरूपात, सुप्त स्वरूपात तिथे काही वेगळ्या स्वरूपाची जीवसृष्टी असेल की काय हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला गेला.   भारताचे चांद्रयान 2 व इतर देशांच्या योजलेल्या काही मोहिमांमधून कदाचित याबाबतीत निश्चित स्वरूपाची माहिती मिळू शकेल.

बुध हा सूर्याने 'भाजून' काढलेला व जवळजवळ वातावरणरहित असलेला ग्रह आणि green house परिणामाने ग्रस्त झालेला आणि सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस साहत असलेला शुक्र, हे जीवसृष्टीच्या शोधात असलेल्या वैज्ञानिकांच्या यादीत कधीच नव्हते. 

बुध सूर्याला खूप जवळ असल्याने त्याचे परिभ्रमण केवळ ८८  (पृथ्वी-)दिवसात पूर्ण होते. सूर्यावरच्या निरीक्षकाच्या संदर्भचौकटीत विचार केला तर बुधाच्या एका 'दिवसात' त्याची 'दोन वर्षे' होतात !  त्याचा आसही जवळजवळ सरळ आहे.  चंद्राची ज्याप्रमाणे आपल्याला कायम एकच बाजू दिसते (Tidal Locking) Messenger मोहिमेतून, बुधाच्या उत्तरध्रुवाजवळील  कायमस्वरूपी सावलीत असलेल्या काही विवरात , पाण्याचा बर्फ व काही सेंद्रिय (organic) घटक असल्याची माहिती कळली आहे. बुधाला स्वत:चे  चुंबकीय क्षेत्र आहे त्यामुळे solar wind पासून बुधाचे काही प्रमाणात तरी संरक्षण होत असावे असे म्हणायला वाव आहे.  सेंद्रिय घटक आणि पाणी एकत्र असणे हा जीवसृष्टी असू शकण्याचा एक निकष आहे.   BepiColombo या नावाने ESA (Europian Space Agency) आणि JAXA (Japan Aerospace Exploration Agency) यांनी, ऑक्टोबर २०१८ मध्ये योजलेल्या संयुक्त मोहीमेदरम्यान, बुधाबाबत आणखी काही प्रश्नांचा उलगडा होईल. सध्याच्या कार्यक्रमानुसार ही मोहीम मे २०२७ पर्यंत चालेल.

शुक्र हा खरंतर सूर्यमालेतला सर्वात गूढ ग्रह. सल्फ्युरिक आम्लाच्या ढगांच्याआड स्वत:ला दडवून घेणारा हा ग्रह कुठल्याही सामान्य प्रकारच्या जीवसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरावा. डिसेंबर १९७० मध्ये शुक्रावर सर्वप्रथम उतरलेले Venera 7 हे यान तिथल्या पृष्ठभागावर केवळ २० मिनिटे तग धरू शकले,  तर ऑक्टोबर १९८१ मध्ये सोडलेल्या  Venera 13 चा लँडरने जवळजवळ 127 मिनिटे तग धरली !  या दोन तासात काढलेल्या विविध छायाचित्रांचा आधार घेऊन, एका लेखात तिथे जीवसृष्टी असल्याचे दावे करण्यात आले होते,  जे नंतर Image Processing मधील त्रुटी म्हणून नाकारण्यात आले.  त्यानंतर Vega-2 या रशियाच्याच यानाने तेथे Lander उतरविला. त्याने नष्ट होण्यापूर्वी ५६ मिनिटे  माहितीचे प्रक्षेपण केले. त्यानंतर इतर काही मोहिमा झाल्या, पण शुक्रावर एकही यान उतरलेले नाही.  पृथ्वीच्या ९२ पट हवेचा दाब,  ४७०° सेल्सियस तापमान आणि वातावरणाच्या ९७%  कार्बन डायऑक्साइड असलेल्या या जगात, कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी असलीच, तर ती आपल्या पेक्षा किती भिन्न असेल याची आपण कल्पना करू शकतो.  आपले सर्व जीवन जसे पाण्याशी निगडीत आहे, तसे तिथल्या पृष्ठभागावरील आजचे जीवन हे कार्बन डायऑक्साइडशी निगडीत असेल, आणि जर तिथल्या ढगात जीवन असेल तर ते गंधकावर आधारित असेल.  पण तिथल्या चुंबकीय क्षेत्राच्या अभावामुळे, अनेक वैज्ञानिक असे मानतात की की habitable zone मध्ये असणार्‍या शुक्रावर आज जीवन असण्याची शक्यता नाही. कदाचित एकेकाळी तिथे जीवन असावे हे शक्य आहे,  पण Green House परिणामात अडकत गेलेल्या शुक्रावर, कालांतराने परिस्थिती वेगाने बिघडत गेली आणि आज तो या स्थितीला पोहोचला आहे.  पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणाच्या, कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाबाबत व्यक्त केली जाणारी चिंता किती योग्य आहे हे शुक्राच्या उदाहरणावरून पटायला हरकत नसावी.

सल्फ्युरिक आम्लाच्या ढगांच्या बुरख्याआड लपणार्‍या शुक्राने आजपर्यंत आपल्या मोहिमांना फारसे यश लाभू दिलेले नाही. JAXA चा सध्या शुक्राभोवती फिरणारा Akatsuki नावाचा orbiter सुरुवातीच्या अपयशानंतर कक्षेत स्थिर झाला आहे, मात्र त्याच्याकडून बहुतेक मर्यादित माहिती मिळू शकणार आहे.  बुधाच्या मोहिमेसाठी योजलेले BepiColombo नावाचे यान शुक्राजवळून  flyby करणार आहे, त्यावेळी आणि २०२० नंतर योजलेल्या ISRO च्या आणि २०२५ च्या सुमारास योजलेल्या Venera-D या रशियाच्या मोहिमेदरम्यान कदाचित शुक्राची काही आणखी रहस्ये उलगडतील.

जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने एकेकाळी 'सर्वाधिक लायक' मानला गेलेला मंगळ, गेली काही वर्षे अन्वेषणाच्या, संशोधनाच्या दृष्टीने प्रमुख लक्ष्य आहे.
अनेक जण आहेत. आणि त्याला कारणीभूत ठरलेल्या गोष्टी आहेत, NASA नेच उत्तम कॅमेरांच्या साह्याने टिपलेली काही छायाचित्रे.  Pathfinder, Spirit, Opportunity आणि नंतर Curiosity या rovers नी टिपलेली आणि मानवाला परिचित असलेल्या आकारांशी साधर्म्य असलेली
, इतक्या विविध 'वस्तुंची' छायाचित्रे आहेत की हे दृष्टीभ्रम आहेत हा NASA देत असलेला विश्वास डळमळीत व्हावा. दुरून घेतलेल्या या छायाचित्रांपैकी एकात  humanoid, एकात सरड्यासदृश
प्राणी,  एकात  sphinx सारखे दिसणारे एक Structure ही आहे. हे सर्व दगडांना आलेल्या आकारामुळे, प्रकाशामुळे होणारे दृष्टीभ्रम आहेत असे NASA चे म्हणणे आहे, तर NASA नेहेमीप्रमाणेच अनेक गोष्टी दडवते आहे असे  मंगळावरील सजीव सृष्टीच्या अस्तित्वावर ठाम विश्वास असणार्‍यांचे म्हणणे आहे.  २०१८ मधील ESA आणि नंतर २०२० मध्ये NASA यांचे अधिक प्रगत rover मंगळावर उतरतील आणि बहुदा  २०३७ मध्ये मानवाचे पहिले पाऊल मंगळावर पडेल. या सार्‍यांचे निष्कर्ष येईपर्यंत तरी या चर्चा थांबतील असे वाटत नाही (अर्थात नंतर थांबतील असेही नाही :-) ) .


टेलिस्कोपमधून मंगळावर आढळलेले 'कालवे' व त्यातून  मंगळावर असलेल्या जीवसृष्टीचे बांधलेले आडाखे Mariner मोहिमांनंतर चुकीचे आहेत असे निदर्शनास आले. त्यानंतर १९७६ मध्ये Viking 1 ने टिपलेल्या 'Face on Mars' या नावाने प्रसिद्ध असलेल्या छायाचित्रामुळे NASA काहीतरी दडवत आहे या समजुतीला पुन्हा बळ मिळाले. कॅमेराच्या वाढत्या क्षमतेनुसार या छायाचित्रात 'दिसलेला' चेहेरा हरवत गेला. पण तरीही त्याने समाधान न झालेले आजही अनेक जण आहेत.

मात्र मंगळावर एके काळी वाहते पाणी, कदाचित जलाशयही होते या प्रतिपादनावर विश्वास ठेवणार्‍या वैज्ञानिकांची संख्या मोठी आहे. किंबहुना मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या  iron oxide चे मोठ्या प्रमाणावरचे अस्तित्व, थोडक्यात एकप्रकारे लोखंडाचा गंज, ऑक्सिजन आणि पाण्याशिवाय शक्य नाही.   मंगळाला 'भौम; अर्थात भूमीचा पुत्र मानणार्‍या आपल्या संस्कृतीला, पृष्ठभागावरील लोहाच्या अस्तित्वाचे फारसे नवल वाटण्याचे कारण नाही, पण एकेकाळी मंगळावर असलेली तेथील पुरातन आणि प्रगत जीवसृष्टीने  निर्मिलेली iron structures कालांतराने गंजून नष्ट झाली आणि हे iron oxide त्याचेच निदर्शक आहे असे मानणाराही एक वर्ग आहे.

आत्तापर्यंत झालेल्या परीक्षणात, सूक्ष्म जीवसृष्टीचे निदर्शक किंवा जागृत ज्वालामुखीचे निदर्शक ठरू शकेल इतपत मिथेन किंवा अमोनियाचे प्रमाण तिथल्या विरळ वातावरणात आढळलेले नाही. जो मिथेन वा अमोनिया आढळला तो अतिशय कमी वेळ टिकत होता. मात्र त्याचा उगम कुठून होतो आहे याचा थांगपत्ता  लागलेला नाही.  तरीही चुंबकीय क्षेत्राचा अभाव असल्यामुळे, सूर्याचे तडाखे सोसणार्‍या मंगळावरील पृष्ठभागावर, सूक्ष्म जीवसृष्टीला पुष्टी द्यावी असे कोणतेही चिन्ह सध्या आढळलेले नाही असे म्हणता येईल.  पृष्ठभागाखाली वा खूप खोलवर एखादी जीवसृष्टी असल्यास तशी परीक्षणे झालेली नाहीत. उल्काघात वा तत्सम आघातातून तयार झालेली काच / स्फटीक जैविक अस्तित्वाचे पुरावे जतन करून ठेवू शकते. अशी काच मंगळावर आढळली आहे आणि तिथल्या विवरांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर तिचे अस्तित्व असू शकेल. मंगळाच्या ध्रुवांवर बर्फाचे अस्तित्व आहे हे पूर्वीपासूनच माहीत होते, पण काही ठिकाणी पृष्ठभागाखालीही बर्फ आढळला आहे.

कदाचित अशा अनेक शक्यता आढळल्यामुळेच जानेवारी २०१४ मध्ये NASA ने Curiosity आणि Opportunity आता पुरातन जैविक अस्तित्वाच्या सिद्धतेबाबत परीक्षणे करतील असे ठरविले असावे. मंगळावर मानवी मोहीम काढण्याबाबत अनेकांना प्रचंड उत्सुकता आहे मात्र  मंगळाबाबतचे पुढचे लक्ष्य हे बहुदा Sample Return मोहिमेचे असणार आहे. यासाठी वेगवेगळे देश विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत त्यात कोणताही देश यशस्वी झाला तरीही जीवसृष्टीच्या शोधमोहिमेच्या दृष्टिकोनातून ते आणखी एक पुढचे पाऊल असेल.

मंगळाचे दोन उपग्रह  Phobos व Deimos हे बहुदा लघुग्रहांच्या पट्ट्यातून, मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले दोन छोटे लघुग्रह असावेत असा जुना कयास आहे.  पण दोन्ही उपग्रहांची साधारण विषुववृत्ताजवळ असलेली वर्तुळाकार कक्षा पाहता ते कदाचित 'कृत्रिम' उपग्रह असावेत, आतून कदाचित पोकळ असावेत असाही तर्क मांडणारे काहीजण होते. यापैकी एकाही उपग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता नगण्य आहे.

लघुग्रहांच्या पट्ट्यात जीवसृष्टी शोधताना प्रामुख्याने  Ceres आणि  Vesta या अनुक्रमे बटुग्रह आणि लघुग्रह असे वर्गीकरण झालेल्या दोघांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक होते.   सध्या Ceres भोवती घिरट्या घालणार्‍या 'Dawn' या यानाने Ceres बद्दल अतिशय उपयुक्त माहिती पुरवली आहे. तिथे असलेल्या बर्फाच्या साठ्याखाली, द्रवस्वरूपातील जलाशय असण्याची शक्यता आहे. Ceres वरील सुप्रसिद्ध असलेला, विशाल शुभ्र ठिपका (प्रदेश) हा धुण्याचा सोडा ( Sodium Carbonate) आहे असे निदान आहे. पण हा ठिपका एकमेव नाही.इतरही असे अनेक क्षारांचे, अमोनिया मिश्रित मातीचे प्रदेश तिथे आढळले आहेत, जे भूस्तरीय सक्रियतेचे निदर्शक आहेत.  पर्यायाने तिथे पृष्ठभागाखाली सूक्ष्म जीवसृष्टीची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.   सूर्यमालेतील (ज्ञात असा) सर्वात उंच 'पर्वत' (हा पर्वत म्हणजे एका विवराच्या तळापासून वर आलेला सुळका आहे) असलेल्या Vesta वर जीवसृष्टी असू शकेल अशी चिन्हे अजूनतरी सापडलेली नाहीत.  पण तब्बल १९ किमी खोल असलेल्या Rheasilvia विवराच्या आत काय परिस्थिती आहे ते प्रत्यक्ष परीक्षणे झाल्याशिवाय सांगता येणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा