गुरु कशाला हवा ? या शीर्षकाची, मानवी जीवनातील गुरुच्या आवश्यकतेसंदर्भातील, एक पोस्ट वाचली आणि मागे एकदा या संदर्भात दुसरा एक लेख वाचला होता त्याची आठवण झाली.
'गुरुची आवश्यकता मानवी आयुष्यात जशी आहे, तशीच ती सूर्यमालेलाही आहे. आणि हा नियम वैश्विक आहे, केवळ आपल्या सूर्यमालेसाठी नव्हे. ' असे कित्येक वैज्ञानिकांचे मत आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की पृथ्वीवर जीवन रुजले आणि बहरले ते केवळ गुरु ग्रह योग्य जागी आहे म्हणूनच.
पण खरंच असे आहे का ?
सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नेपच्यूनच्या पलीकडे, साधारण 30 AU ते 50 AU (1 AU = सूर्य ते पृथ्वीमधील अंतर) या अंतरात Kuiper belt ही प्लूटोसदृश असंख्य बटुग्रहांनी व्यापलेली प्रचंड मोठी चकती आहे. लघुग्रहांच्या पट्ट्याच्या कित्येक पटीने रुंद आणि जाडी असलेली ही चकती अनेक वर्षांपर्यंत धूमकेतूंचे उगमस्थान मानली जात असे. पण आता तसे मानले जात नाही. या Kuiper belt च्या नंतर Heliosphere हा region येतो जो सध्याच्या अंदाजानुसार 122 AU अंतरापर्यंत पसरलेला आहे. याला लागून आहे Voyager 1 च्या साह्याने शोधून काढलेला magnetic highway हा region.इथे सूर्याचे केवळ अंशत: प्रभुत्व आहे. याच्यानंतर Interstellar Space नावाची पोकळी आहे जिथे सूर्याचे वा इतर कुठल्याही दुसर्या तार्याचे कोणतेही परिणाम होत नाहीत. सध्याच्या अंदाजानुसार या पोकळीची व्याप्ती ही 1000 AU पर्यंत आहे.
Voyager 1 हे सप्टेंबर 1977 मध्ये सोडलेले यान सध्या सूर्यापासून साधारण 135 AU इतक्या अंतरावर या पोकळीतून प्रवास करते आहे. या सर्व पसार्याला वेढून Oort cloud नावाचा धूलिकण, गोठलेले वायू, आणि पाणी इत्यादि गोष्टींनी बनलेला आणि अतिप्रचंड व्याप्ती असलेला मेघ आहे असा सध्याचा कयास आहे. सध्याच्या गणितानुसार हा मेघ 200,000 AU पर्यंत पसरलेला असू शकेल.
वर उल्लेखलेल्या Kuiper belt पासून सुरू होणारा पण वेगळ्या प्रतलात असलेला Scattered disc नावाचा region हा अल्प मुदतीच्या धूमकेतूंचे उगमस्थान असावे तर दीर्घ वा अतिदीर्घ मुदतीचे धूमकेतू हे Oort Cloud मधून उपजत असावेत अशी सध्याची मान्यता आहे.
हे धूमकेतू जेंव्हा सूर्याच्या दिशेने मार्गक्रमणा करतात, तेंव्हा गुरूचे प्रचंड गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीसाठी एखाद्या चिलखताप्रमाणे काम करते असे वैज्ञानिकांच्या एका गटाचे म्हणणे आहे. गुरुच्या पलीकडून येणार्या व सूर्याच्या दिशेने जाणार्या प्रत्येक आकाशस्थ वस्तूसाठी गुरु हे सुरक्षाकवच आहे असा एकंदर तो दृष्टिकोन आहे. धूमकेतुंचा मार्ग बदलून तो त्यांना सूर्यमालेच्या बाहेर भिरकावून देतो, लघुग्रहांना त्यांच्या पट्टयातून इतस्तत: भटकू देत नाही असेही ते मानतात.
वैज्ञानिकांचा दुसर्या एका गटाचा दृष्टिकोन काहीसा वेगळा आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे गुरु हा कधी तारक ठरतो तर कधी मारक असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांच्यातील काहींच्या मते Kuiper Belt मधून येणार्या धूमकेतूंना तो सूर्यमालेशी बांधून ठेवतो व त्यामुळे काही प्रमाणात त्या धूमकेतूंपासून पृथ्वीला असणारा धोका एकाप्रकारे तो वाढविण्याचे काम करतो. त्याचवेळेस Oort Cloud मधून येणार्या धूमकेतूंबाबत तो परकेपणाची भावना बाळगल्याप्रमाणे, त्यातील काही धूमकेतूंना तो मार्गभ्रष्ट करून सूर्याच्या दिशेने जाण्यापासून परावृत्त करतो. लघुग्रहांच्या बाबतीतही त्यांची टक्कर घडवून आणण्यास कधीकधी तो कारणीभूत ठरतो आणि या टक्करीमुळे त्यातील काही लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं भिरकावले जातात. अॅरिझोना राज्यातील प्रचंड विवर ही गुरुची 'अवकृपा' आहे असे या गटातील वैज्ञानिक मानतात.
कुठल्याही ग्रहावर जीवन बहरण्यास एका 'गुरु'ची आवश्यकता असते हा विचार काही काळ इतका प्रबळ होता, की दुसरी जीवसृष्टी असलेला ग्रह शोधताना असेच तारे व त्यांच्या ग्रहमालांवर अधिक ध्यान द्यावे, जिथे तार्यापासून योग्य अंतरावर गुरुसारखा प्रचंड ग्रह असेल असा आग्रह काही वैज्ञानिक धरत असत.
या सर्व गोष्टींचा ऊहापोह करण्याचे कारण की नासाचे जुनो हे अंतराळयान 4 जुलै रोजी गुरुच्या कक्षेत प्रवेश करेल. आणि हे मिशन सध्याच्या योजनेप्रमाणे 2 वर्षांचे आहे. यापूर्वी गुरु ग्रहासाठी अशा प्रकारचे मिशन आखण्यात आले नव्हते. व्हॉयेजर 1 व 2 ही flyby अर्थात दुरून प्रवास करणारी मिशन होती.
'गुरू'ला अंतर्बाह्य समजून घेण्याची, आपल्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा