NEO (Near Earth Objects) या अवकाशस्थ असलेल्या अशा वस्तू (लघुग्रह, धूमकेतू, मोठा उल्कापिंड आदि) आहेत की ज्यांची (सूर्याभोवती फिरण्याची किंवा इतर प्रकारची) कक्षा त्यांना भविष्यकाळात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या पट्ट्यात आणण्यास कारणीभूत ठरेल.
गोलाकार वा लंबगोलाकार NEO साठी किमान 1 कि.मी. व्यास व अनियमित आकाराच्या NEO साठी किमान 1 कि.मी. लांबी किंवा रुंदी असणार्या, सर्व संभाव्य अवकाशस्थ वस्तूंची नोंद सतत ठेवत, त्यांच्या कक्षांचा मागोवा घेत, संभाव्य धोक्यासह या NEO ची सूची, नियमित स्वरूपात अद्ययावत ठेवण्याचा नासाचा प्रयत्न राहिला आहे. तरीही आजच्या घडीला असे मानले जाते की, की 1 कि.मी. च्या मर्यादेपेक्षा लहान असणार्या NEO देखील पृथ्वीवर प्रचंड वेगाने आदळल्यास, मोठे उत्पात घडवू शकतात आणि या छोट्या NEO ची सूची ही बर्यापैकी अपूर्ण आहे.
नोंद ठेवलेल्या NEO पैकी सध्याच्या गणितानुसार तब्बल 154 NEO अशा आहेत ज्याची वर्गवारी PHO (Potentially hazardous objects) या गटात मोडते. अशा वस्तूंच्या धोक्याची प्रतवारी करण्यासाठी ज्या दोन प्रमुख पद्धती आहेत, त्यातील सर्वसामान्य लोकांसाठी वापरली जाणारी पद्धत आहे Torino Scale. यात धोक्याची तीव्रता मोजण्यासाठी 0 ते 10 चे मापक वापरले जाते (0 मूल्यांकन म्हणजे नगण्य धोका असणारी आणि 10 मूल्यांकन म्हणजे जागतिक उत्पात व संपूर्ण विनाश घडवू शकेल अशी NEO). वस्तूची गतिज ऊर्जा आणि टक्कर होण्याची शक्यता या घटकांवरून ही धोक्याची तीव्रता ठरते.
हे मापक वापरायला सुरुवात झाल्यापासून, आजपर्यंत विक्रमी मूल्यांकन गाठलेली NEO आहे 99942 Apophis (किंवा 2004 MN4) नावाचा लघुग्रह. 19 जून 2004 रोजी तीन खगोल शास्त्रज्ञांनी 'शोधून' काढलेला हा अंदाजे 330 मीटर व्यास असलेला लघुग्रह, 21 डिसेंबर 2004 रोजी पृथ्वीपासून 1 कोटी 44 लाख कि.मी. अंतरावरून गेला. आपल्यासाठी हे अंतर प्रचंड असले, तरी अवकाशासाठी नाही. एक कि.मी. पेक्षा लहान व्यास असल्यामुळे हा लघुग्रह सुरुवातीस नासाच्या सूचीत नव्हता. पण त्याहून महत्त्वाची गोष्ट होती की शोध लागल्यापासून संभाव्य उपाययोजनेसाठी मिळालेला अवघ्या सहा महिन्यांचा कालावधी.
पृथ्वीजवळून गेल्यावर Apophis संबंधी अधिक अभ्यास करण्यात आला आणि या प्राथमिक अभ्यासातून उघडकीस आलेली गोष्ट ही होती की 13 एप्रिल 2029 रोजी त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता ही 2.7% आहे. 2.7% ही बर्यापैकी मोठी शक्यता असल्याने Apophis चा अधिक सखोल अभ्यास करण्यात आला. त्यातून आणखी एक घातक शक्यता लक्षात आली ती ही की 2029 साली Apophis हा पृथ्वीजवळच्या gravitational keyhole मधून प्रवास करेल.
gravitational keyhole हा एखाद्या ग्रहाच्या जवळचा आणि अत्यंत अरुंद (सरासरी 700/800 मीटर) असलेला असा भाग असतो की ज्याच्या मधून एखादी NEO गेली तर त्या ग्रहाच्या गुरुत्वाकर्षणामुळे तिच्या कक्षेत मोठा बदल होऊन त्या NEO च्या काही काळानंतरच्या पुनर्भेटीत, त्या NEO ची त्या ग्रहाशी टक्कर होण्याची शक्यता प्रचंड वाढते. gravitational keyhole ची व्याप्ती ही NEO चा आकार, त्याची कक्षा, आणि पृथ्वीपासून तो किती अंतरावरून जाणार आहे यावरुन ठरते.
Apophis बाबतची gravitational keyhole मधून प्रवास होण्याची शक्यता लक्षात आल्यावर, स्वाभाविकच 13 एप्रिल 2036 रोजी त्याची पृथ्वीशी टक्कर होण्याची शक्यता प्रचंड वाढली आणि Apophis ला Torino Scale वर विक्रमी 4 हे मूल्यांकन देण्यात आले. यानंतर Apophis संबंधी निरीक्षणांच्या संख्येत आणि अभ्यासात प्रचंड वाढ झाली आणि कालांतराने, निरंतर अभ्यासातून, Apophis हा gravitational keyhole मधून 2029 साली प्रवास करण्याची शक्यता नगण्य असल्याचे लक्षात आले. स्वाभाविकच 2036 सालच्या धोक्याची शक्यताही कमी झाली आणि त्याचे मूल्यांकन पुन्हा शून्यावर आणण्यात आले.
सध्याच्या अभ्यासानुसार 13 एप्रिल 2029 साली Apophis हा पृथ्वीपासून अंदाजे 31,300 कि.मी. अंतरावरून जाईल. हे अंतर सर्वसाधारण भूस्थिर उपग्रहांपेक्षाही कमी आहे आणि इतक्या जवळून एखादा लघुग्रह जाण्याची घटना ही सरासरी 800 वर्षात एकदा घडते.
यावरून या घटनेचे महत्त्व लक्षात येईल. परंतु gravitational keyhole मधून प्रवास होण्याची शक्यता नगण्य असल्यामुळे 2036 साली तो बर्यापैकी दुरून, म्हणजे 2 कोटी 30 लाख कि.मी. अंतरावरून जाईल. सध्याच्या निरीक्षणानुसार इ.स.2105 पर्यंत तरी या लघुग्रहापासून पृथ्वीला धोका नाही. मात्र अशा NEO च्या कक्षा अत्यंत अस्थिर असतात, तसेच इतक्या छोट्या आकाराच्या NEO साठी कक्षा निश्चित करणार्या (आणि सतत बदलत राहणार्या) घटकांची अचूक माहिती मिळवणे अवघड असते, हे लक्षात घेता भविष्यकाळातील हा धोका पूर्णपणे टळला आहे असे ठामपणे म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळेच Apophis ची निरीक्षणे आणि अभ्यास पुढेही चालूच राहील.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा