गुरुवार, ७ जुलै, २०१६

Impact Event - (भाग  १ / ६)


   
Mass Extinction किंवा  Extinction Event म्हणजे पृथ्वीवरील जैविक विविधतेत अत्यंत वेगाने आणि सर्वंकष स्वरूपाची झालेली हानी आणि एक प्रकारे काही नवीन प्रजातींचा उदय.  या विषयावर सखोल अभ्यास सुरू होऊन अजून पुरते एक शतकही लोटलेले नाही. पण या वा तत्सम गोष्टीचे उल्लेख हे जगातील बहुतेक सर्व संस्कृतींच्या प्राचीन इतिहासात आढळतात.

आपल्याकडील प्रत्येक मन्वंतर बदलताना होणार्‍या प्रलयाची नियमितता, मनू आणि मस्त्यावताराची कथा, सुमेरियन संस्कृतीत उल्लेख असणारा व 'Enki' ने सूचना दिलेला आणि 'देवांनी' जाणिवपूर्वक घडविलेला प्रलय,  Book of Genesis मध्ये उल्लेख असणारी नोहाची कथा, ग्रीक पुराणात वर्णिलेल्या महापुराच्या कथा आणि इतर संस्कृतीतील तत्सम प्राचीन कथा यात काही गोष्टी समान आहेत. त्या म्हणजे या प्रलय वा महापुराची  (देवांकडून वा अन्य कुणाकडून)  मिळालेली सूचना आणि मानवी जीवन किंवा प्रजाती पुढे चालू राहील यासंबधी घेतलेली काळजी.

Mass Extinction हे अनेक कारणांमुळे घडू शकते. थोडक्यात सांगायचे तर जीवनासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणात, अतिवेगाने झालेले बदल हेच या संहाराचा मूळ पाया आहे. हे बदल ज्या कारणामुळे घडू शकतात त्यात

१) घातक स्तरापर्यंत अचानक वाढलेले, वातावरणातील धूळीचे प्रमाण किंवा विषारी वा सजीवास घातक असणार्‍या वायूंचे प्रमाण,
२) श्वसनासाठी अत्यावश्यक असणार्‍या ऑक्सिजनच्या पातळीत झालेली विलक्षण घट,
३) ज्वालामुखींचे अतिप्रचंड उद्रेक,
४) तापमानात झालेले असह्य बदल (global warming किंवा global cooling),
५) समुद्रपातळीत झालेली टोकाची वाढ किंवा घट किंवा समुद्रात वेगाने झालेली  उलथापालथ,
६) अवकाशातून वेगाने झालेला प्रारणांचा मारा
७) पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात झालेले वेगवान बदल किंवा चुंबकीय ध्रुवांची अदलाबदल
८) भूगर्भात,भूस्तरात झालेले अतिप्रचंड बदल,
९) काबूत न येऊ शकणार्‍या रोगाचा विस्तृत उद्रेक

आदि निसर्गनिर्मित कारणे जशी आहेत, तशी जागतिक अणुयुद्धासारखी मानवनिर्मित कारणेही असू शकतात. 

वर उल्लेखलेल्या निसर्गनिर्मित सर्व कारणांचे, आरंभस्थान ठरू शकेल, पण जे सध्यातरी मूळातून टाळणे, मानवाच्या पूर्णपणे आवाक्याबाहेर आहे,  ते कारण, ती घटना आहे Impact Event. अवकाशस्थ असलेली एखादी वस्तू (लघुग्रह, धूमकेतू, मोठा उल्कापिंड आदि) पृथ्वीवर आदळणे. 
अतिप्राचीन इतिहासाचा किंवा भूविज्ञानाचाअभ्यास करताना, विशेषत: डायनोसॉर युगाचा अस्त कसा झाला असेल याचा मागोवा घेताना, बहुदा पहिल्यांदा Impact Event चा विचार झाला असावा असे मानायला जागा आहे.  जी घटना यापूर्वी अनेकदा घडली आहे, ती भविष्यातही घडू शकते हे सूत्र Impact Event च्या बाबतीत अत्यंत भयावह ठरते.  बहुदा ८० च्या दशकात या बाबतीत पहिल्यांदाच गंभीरपणे विचार झाला आणि नंतर लगेचच त्यासंदर्भात अभ्यासास सुरुवात झाली.  मानवी अस्तित्वाचा,  संस्कृतीचा, प्रगतीचा संपूर्ण विनाश करू शकेल अशा घटनेसाठी, वेगाने विकसित होणारे तंत्रज्ञान कामाला लावले गेले आणि NEO (Near Earth Objects) चा शास्त्रशुद्ध अभ्यास करणारी खगोलशास्त्राची  एक नवीन शाखा उदयास आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा