तिसरा अल्पसंभाव्य आणि पण काहीसा अभिनव असा विचलन पद्धतीचा उपाय आहे, gravity tractors. थोडक्यात गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा उपयोग करून, प्रत्यक्ष स्पर्श न करता, एखाद्या NEO ला tow केलेल्या कार प्रमाणे खेचून नेण्याचा उपाय. हे न्यूटनच्या सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार घडते व यासाठी मानवनिर्मित अंतराळयान हे ट्रॅक्टरचे काम करते. अर्थातच अंतराळयानाचे वस्तुमान हे कुठल्याही NEO पेक्षा प्रचंड कमी असल्याने हा खूप दीर्घकाळ चालणारा उपाय आहे. त्यामुळे यात प्रचंड इंधन तर लागेलच, शिवाय अशा NEO ला विचलित करण्यासाठी, तिच्यासंबंधी सूचनाही खूप लवकर मिळायला हवी, जेणेकरून अशा यानाची निर्मिती होऊन, ते वेळेवर त्या NEO जवळ पोहोचू शकेल. याव्यतिरिक्त या उपायात आणखी एक गोम आहे, ती म्हणजे त्या NEO चे पृथ्वीवरील संभाव्य आघातस्थान हे हळूहळू एका देशातून सरकत सरकत दुसर्या देशात जात, शेवटी पृथ्वीच्या बाहेर जाईल, आणि त्यामुळेच या उपायाला एक आंतरराष्ट्रीय राजकारणाची किनारही आहे !विशेषत: कर्ब प्रधान NEO साठी आणखी एक उपाय सुचविला गेला आहे, तो म्हणजे त्या NEO वर विवर तयार करून (आघात वा अन्य मार्गाने) अंतर्भागातील वायु, पाणी वा त्या आघाताद्वारे तयार होणार्या द्रव वा वायुचे उत्सर्जन होऊ देणे. या उपायात अंतर्द्रव्याचे उत्सर्जन किंवा निचरा वेगाने होऊन, NEO मूळ कक्षेपासून विचलित होते व धोका टाळू शकतो. मात्र हा उपाय काहीसा धोकादायकही आहे, अशासाठी की अंतर्द्रव्याचा निचरा होऊ लागल्यावर NEO ची गती नियंत्रित राखणे शक्य होईलच असे नाही. आणि त्यामुळे त्याच्या संभाव्य कक्षेविषयी कोणतेही अनुमान बांधणे शक्य होणार नाही. मात्र या प्रकारात NEO चे वस्तुमान कमी होत जात असल्यामुळे त्याच्या टक्करीतून होणारा धोकाही त्याच प्रमाणात कमी होत जातो.
प्रगत होत जाणार्या तंत्रज्ञांनासोबत विचलन हे तुलनेने अधिक सुलभ आहे हे लक्षात आल्यामुळे त्या संदर्भात आणखीही उपाय सुचविण्यात आले आहेत. त्यामध्ये NEO च्या जवळून एखाद्या यानाने प्रवास करणे व त्या यानातून NEO वर आयनांच्या प्रवाहाचा सुनियंत्रित मारा करणे किंवा अतिशय शक्तीशाली लेसर किरणांचा लक्ष्यभेदी मारा करणे हे उपायही सुचविले गेले आहेत.
तीव्र सौरऊर्जेचा दीर्घकाळ वापर करून, NEO च्या पृष्ठभागावरील पदार्थांचे 'बाष्पीभवन' करणे हा ही उपाय सुचविला गेला आहे, पण हा उपाय यशस्वी होण्यासाठी शक्तीशाली आरसे / भिंगे बसवलेल्या अंतराळस्थानकाची वा यानाची निर्मिती गरजेची आहे.
या व्यतिरिक्तही कागदावर 'आकर्षक' वाटणारे, दुसरे काही आश्चर्यकारक उपायही सुचविले गेले आहेत :-) त्यातील काही असे आहेत
१) सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तीत करणार्या प्लॅस्टिक आवरणांनी संपूर्ण NEO आच्छादित करणे, जेणेकरून गतिज उर्जेत बदल होऊन विचलन व्हावे.
२) संपूर्ण NEO वर titanium dioxide सारख्या शुभ्र किंवा काजळीसारख्या काळ्या द्रव्याची फवारणी करणे व त्यायोगे शोषल्या जाणार्या आणि परावर्तीत होणार्या किरणोत्सर्जानाच्या मानात बदल घडवून, त्याचे विचलन घडवून आणणे.
३) NEO च्या मार्गात वाफेचा अतिप्रचंड ढग निर्माण करून ठेवणे, जेणेकरून त्याचा वेग कमी होऊन, तो टक्कर होणार्या संभाव्य जागी (पृथ्वी निघून गेल्यावर) उशिरा पोहोचेल.
४) विशेषत: धातुप्रधान (निकेल-लोह) NEO साठी, त्याच्या मार्गात मोठा (तारांची भेंडोळी वापरुन) विद्युतचुंबक निर्माण करून ठेवणे. जेणेकरून NEO चा विनाश वा विचलन घडून येईल.
५) त्या NEO वर अनेक यंत्रमानव उतरवणे आणि त्यांचा उपयोग करून ती NEO कुरतडत संपविणे.
६) कार्बन-फायबर चे जाळे निर्माण करून ते NEO च्या वाटेत पसरवणे. (याचा उपयोग भविष्यात mining साठीही होऊ शकतो !)
संभाव्य धोका टाळण्यासाठी, मानवी कल्पनाशक्ती किती अचाट विचार करू शकते याची साक्ष वरील उपाय देतात.
या व अशा अनेक उपायांची वर्गवारी करण्यात येते आणि कुठल्या प्रकारची NEO आहे , टक्कर टाळण्यासाठी किती कालावधी उपलब्ध आहे, त्याला लागणारा खर्च, उपाय यशस्वी होण्याची शक्यता या व अशा अनेक घटकांचा वापर करून, computer simulation च्या माध्यमातून त्यांचा अभ्यास होतो. या संदर्भातील संशोधन अनेकदा प्रकाशित होत असते पण शेवटी अनेक गोष्टी या कागदावरच राहतात. कित्येक वेळेस एकापेक्षा जास्त उपाय वापरुन हे धोके कसे कमी करता येतील हा विचारही झाला आहे.
लघुग्रहाच्या Impact Event पेक्षाही कैक पटीने घातक ठरू शकेल अशी घटना असेल धूमकेतूशी टक्कर. या बाबतीत बर्याचदा अनुकूल असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची कक्षानिश्चिती. जी पुरेशी आधीच होत असल्याने धोक्याचा अचूक अंदाज बांधणे शक्य आहे. धूमकेतूच्या बाबतीत विनाशापेक्षा विचलन हा अधिक यशस्वी ठरू शकेल असा उपाय आहे.
पृथ्वीवर जीवन रुजविण्यास कारणीभूत एखादा धूमकेतूच ठरला असावा असे अनेक वैज्ञानिक मानतात.
मात्र डायनोसॉर नष्ट होण्यामागे देखील धूमकेतूची टक्करच ठरली असावी अशीही मान्यता आहे. धूमकेतूच्या आकारामुळे ही टक्कर एखाद्या लघुग्रहाच्या तुलनेत अतिविनाशकारी ठरू शकते. १९१० साली हॅले धूमकेतूच्या पिसार्याच्या शेवटच्या भागातून पृथ्वी गेली होती आणि त्याच सुमारास प्लेगने थैमान घातले. आता हा योगायोग होता की त्या पिसार्यामधून विषाणू पृथ्वीवर आले हा वादाचा विषय जरी असला, तरी प्रत्यक्ष टक्कर न होताही धूमकेतू विनाशकारी ठरू शकतो ही शक्यता राहतेच. पृथ्वीवर सध्या आहे तेवढी जैविक विविधता आपल्याला पुरेशी आहे, सध्या तरी नव्या प्रकारच्या जीवनाची इथे आवश्यकता नाही !



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा