सध्याच्या निरीक्षणांनुसार Apophis या शतकात तरी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता नाही. पण जर दुर्दैवाने तशी वेळ आलीच असती, तर वातावरणातील त्याच्या केवळ प्रवेशानेच 750 मेगाटन इतकी ऊर्जा निर्माण झाली असती. या ऊर्जेच्या घातकतेचा व त्यायोगे होऊ शकेल अशा संहाराचा अंदाज येण्यासाठी पुढील घटना व त्यातून झालेली ऊर्जानिर्मिती लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि Apophis हा बर्यापैकी छोटा लघुग्रह आहे.

१) हिरोशिमा अणुबॉम्बमुळे => 16 किलोटन
२) नागासकी अणुबॉम्ब => 21 किलोटन
३) Tunguska event => 3 ते 10 मेगाटन
४) सर्वात संहारक अण्वस्त्रपरीक्षा (रशिया, 30 ऑक्टोबर 1961, हायड्रोजन बॉम्ब) => 57 मेगाटन
पण अशा एखाद्या Impact Event चा परिणाम हा केवळ ऊर्जेच्या मापनावरून ठरत नसतो. अशा NEO ची रासायनिक रचना, पृथ्वीशी टक्कर होतानाचा कोन आणि टक्करीचे ठिकाण या तीन गोष्टी प्रामुख्याने विध्वंसाचे मान ठरवतात. रासायनिक रचनेनुसार NEO चे ढोबळमानाने चार प्रकार आहेत. carbonaceous (कर्ब प्रधान) , Metal (Mainly Iron-Nickel) (धातूप्रधान) आणि Stony (अश्मप्रधान) आणि rubble pile (गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असलेला विविध लघुग्रहांचा समूह).
अशा प्रकारची टक्कर टाळण्यासाठी जे विविध उपाय सुचविले गेले आहेत, त्यातल्या प्रत्येक उपायाचे गुण-दोष आहेत. शिवाय त्या प्रत्येक उपायांची यशस्वी होण्याची शक्यता, ही NEO पृथ्वीवर आदळण्याची सूचना कधी मिळते व पर्यायाने उपाययोजना करण्यासाठी किती कालावधी उपलब्ध आहे, NEO चा आकार, रासायनिक रचना या व अशा अनेक बाबींवर अवलंबून आहे.
या उपायांना दोन मुख्य गटात विभागले जाऊ शकते ते म्हणजे विनाश आणि विचलन.
विनाश हा सर्वात सहज लक्षात येणारा उपायांचा गट आहे. यातील समान भाग असा की टक्कर होऊ शकेल अशा NEO चा विनाश घडवून आणायचा आणि त्या NEO ची अशी शकले करायची की ती पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच वातावरणात घर्षण होऊन जळून जातील किंवा शकले झाल्यानंतर ती शकले पृथ्वीच्या दिशेने न येता विखरून जातील. वातावरणाशी घर्षण होऊन जळून जाण्यासाठी व त्यायोगे पृथ्वीवर न पोहोचण्यासाठी अशी शकले ही साधारणत: ३५ मीटऱपेक्षाही (व्यास वा लांबी वा रुंदी) छोटी असणे आवश्यक आहे.
टक्कर होण्यासाठी आवश्यक गोष्ट ही आहे की पृथ्वी आणि NEO, एका विवक्षित वेळी परस्परांच्या पुरेसे जवळ येणे. विचलनगटातील उपायांचे लक्ष्य हे या एकत्र येण्याला टाळण्याकडे असते. संभाव्य टक्करीत सहभागी असलेल्या NEO चा वेग कमी करता आला किंवा वाढविता आला किंवा तिची कक्षा बदलता आली तर अशी NEO अनुमानित टक्करीच्या वेळेस त्या जागेवरच नसेल आणि त्यामुळे ती टक्कर आपसूकच टळेल.
पुरेशा क्षमतेच्या अण्वस्त्राचा वापर करून विनाश व विचलन या दोन्ही प्रकारात उपाययोजना होऊ शकते. पण या उपायात ते अण्वस्त्र पृष्ठभागावर आदळून त्याचा स्फोट होणे पुरेसे आहे की त्याचा स्फोट हा, NEO च्या अंतर्भागात (रासायनिक रचना, आकार आदि घटकांमुळे) होणे गरजेचे आहे ही गोष्टही महत्त्वाची आहे. धातूप्रधान NEO मध्ये पृष्ठभागावरचा स्फोट फारसा उपयोगी ठरेलच असे नाही.
दुसरा संभाव्य उपाय आहे NEO वर केला जाणारा मोठा आघात. पुरेशा मोठ्या व प्रचंड गतिज ऊर्जा असलेल्या एखाद्या वस्तूचा (Impactor) आघात करून, कोणताही स्फोट न घडवता, NEO चे विचलन साध्य होऊ शकते. हा Impactor म्हणजे मानवनिर्मित मोठे अंतराळयानच असले पाहिजे असे नाही. काट्याने काटा काढणे या म्हणीचा वापर करून दुसर्या एखाद्या NEO शी टक्कर घडवून आणणे देखील तर्कदृष्ट्या शक्य आहे.
पण rubble pile या प्रकारात या उपायाचा फारसा उपयोग होऊ शकणार नाही असे मानले जाते कारण अशा आघातानंतर rubble pile NEO ची शकले न होता विविध लघुग्रह वेगळे होऊन, फारशी दिशा न बदलता, पृथ्वीच्या दिशेने तरीही झेपावू शकतात आणि अशा वेळेस त्यांच्या कक्षा आणि आघातस्थाने निश्चित करणे हे अतिशय अवघड काम असेल.
rubble pile NEO च्या साठी खास सुचविला गेलेला एक उपाय आहे तो म्हणजे त्या NEO च्या पृष्ठभागाच्या सभोवती पण पुष्ठभागापासून काही उंचीवर, अनेक अणुस्फोट घडवून आणणे व त्यायोगे त्याला विलग न होऊ देता, त्याचे विचलन घडवून आणणे.
वरील सर्व उपायांना इतर उपायांच्या तुलनेत कमी वेळ लागू शकतो. पण त्याबाबतीत निर्णयप्रक्रिया ही अतिशय वेगवान असणे आवश्यक असते. तसेच हे सर्व उपाय NEO पृथ्वीपासून पुरेशी दूर असतानाच अधिक परिणामकारक ठरू शकतात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा