संकीर्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
संकीर्ण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १२ मार्च, २०२३

तीन नियम

 .



=============
तीन नियम
=============

म्हणींना कुणीतरी 'अनुभवांच्या खाणी' असे म्हटले आहे; आणि ते शंभर टक्के सत्य आहे. म्हणी काय किंवा वाक्‌प्रचार काय, बर्‍याचदा ते अनुभवातूनच आलेले असतात, काळाच्या कसोटीवर टिकलेले असतात. कमी शब्दात व्यक्त होईल, सहज लक्षात राहील, थोडासा नादमय, असा आशय एखाद्या वाक्यात, एक-दोन ओळीत व्यक्त झाला की कालांतराने त्याला म्हणीचे किंवा वाक्‌प्रचाराचे रुपडे लाभते. हा आशय क्वचित तत्वज्ञानाकडे झुकणारा असतो, अर्थगर्भ असतो, सुभाषिताचे रूप धारण करतो; तर काही वेळा खिल्ली उडविण्यासाठी वापरता येईल, इतका थिल्लरही असतो आणि काही वेळा चक्क एखादा नियम असल्याप्रमाणे अनुभवासही येतो. त्यामुळेच बहुतेकवेळा, स्थळ, काळ आणि परिस्थिती ह्या तीनही प्रांतात त्या आशयाचा, पर्यायाने त्या म्हणीचा वा वाक्‌प्रचाराचा  वावर अतिशय सहजतेने होत राहतो. 

रोजच्या आयुष्यात, क्वचित विशिष्ट प्रसंगात, जसा म्हणींचा, वाक्प्रचारांचा अनुभव येऊन, त्यांच्यावर नव्याने मोहोर उमटत राहते, तसेच विज्ञानाच्या क्षेत्रात काही असिद्ध नियमांचा अनुभव अधूनमधून येत राहतो. लौकिक अर्थाने असे नियम सिद्ध न होता देखील, ह्या नियमांची सार्वकालिकता, नित्य नव्याने जाणवत राहते. 

------

आपल्याला ज्ञात असलेल्या विज्ञानात व ज्ञात विज्ञानावर, 'विशिष्ट नियमांचा संच' आणि त्यातही 'तीन नियमांचा संच', ह्या संकल्पनेचा एकंदरच मोठा प्रभाव आहे. 

न्यूटनचे गतीसंबंधित तीन नियम, 
केप्लरचे ग्रहगतीचे तीन नियम, 
ऊष्मागतिकीचे (Thermodynamics) तीन नियम, 
यंत्रमानवाच्या वागणुकीचे तीन नियम 
आदि. 

आर्थर सी क्लार्क ह्या जगप्रसिद्ध विज्ञान लेखकाचे असेच तीन नियम प्रसिद्ध आहेत. त्याच्या लिखाणात, साहित्यात, हे नियम विविध ठिकाणी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष रूपात आले आहेत, डोकावले आहेत. मूळ नियम अर्थातच इंग्लिशमध्ये आहेत, पण त्यांचा भावानुवाद करायचा झाल्यास तो काहीसा असा असेल : 

------
****

१) "जेव्हां एखादी प्रथितयश शास्त्रज्ञ असलेली, अनुभवसंपन्न व्यक्ती असे म्हणते की 'हे शक्य आहे', तेव्हां बहुतांश वेळा, त्या शास्त्रज्ञाचे ते प्रतिपादन, सत्य ठरण्याचीच शक्यता असते.  तसेच जेव्हां ती शास्त्रज्ञ व्यक्ती असे म्हणते की 'हे अशक्य आहे', तेव्हा ती व्यक्ती बहुतांश वेळा चुकीचीच असते.  "
(==> भविष्यकाळात त्या शास्त्रज्ञाचे प्रतिपादन चुकीचे ठरताना दिसते.)  

२) "शक्‍यतेच्‍या मर्यादा शोधण्‍याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्‍या शक्यतांच्या पलीकडे असलेल्या, अशक्यतेच्या प्रांतात थोडेसे भ्रमण करणे. "

३) "कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान, हे जादूपासून वेगळे करता येत नाही. "
(दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर असे म्हणता येईल की, पुरेसे प्रगत तंत्रज्ञान हे, त्या तंत्रज्ञानाच्या तुलनेने मागास असलेल्या कोणत्याही समूहासाठी, एखाद्या जादूसारखेच [किंवा चमत्कारासारखेच] असते.)

****
------

ह्या नियमांबाबत मर्यादित प्रमाणात ऊहापोह झाला आहे. ह्या नियमांचे मूळ धुंडाळण्याचा, त्यांचा प्रवास शोधण्याचा प्रयत्न झाला आहे,  तसेच नियमांमागची क्लार्कची भूमिका देखील ह्या ना त्या प्रकारे उलगडण्याचाही प्रयत्न झाला आहे. 

------

====

नियम क्रमांक १ 
१) जेव्हां एखादी प्रथितयश शास्त्रज्ञ असलेली, अनुभवसंपन्न व्यक्ती असे म्हणते की 'हे शक्य आहे', तेव्हां बहुतांश वेळा, त्या शास्त्रज्ञाचे ते प्रतिपादन, सत्य ठरण्याचीच शक्यता असते.  तसेच जेव्हां ती शास्त्रज्ञ व्यक्ती असे म्हणते की 'हे अशक्य आहे', तेव्हा ती व्यक्ती बहुतांश वेळा चुकीचीच असते.  (==> भविष्यकाळात त्या व्यक्तीचे प्रतिपादन चुकीचे ठरताना दिसते.)  

====

नियम क्रमांक एकचे दोन भाग आहेत आणि विज्ञानाच्या आजवरच्या इतिहासाला व्यवस्थित अभ्यासले तर हे ही लक्षात येईल की, हे दोन्ही भाग सातत्याने अनुभवास येत राहिले आहेत. 

नियम क्रमांक १ च्या  पूर्वार्धात, अध्याहृत असलेली पृच्छा आहे, 'अमुक अमुक गोष्ट शक्य आहे का ?'  ही पृच्छा अर्थातच विज्ञानाशी निगडीत आहे; पण त्याच बरोबर ती बऱ्याचअंशी अज्ञाताशी संबंधित आहे. 

'अज्ञात विज्ञान' वा 'अज्ञातांचे विज्ञान' हा विज्ञानाचा असा भाग आहे, जो केवळ भविष्यकाळाचा वेध घेणाऱ्या वैज्ञानिकांनाच नव्हे, तर विज्ञानाशी संबंधित कुठलेही प्रकटीकरण करणाऱ्या सर्व व्यक्तींना सदैव खुणावत असतो. 
भविष्यकाळात गम्य होईल, साध्य होईल अशा आज अज्ञात असलेल्या विज्ञानाशी संबंधित कल्पनाचित्रे  रंगविणे, हा विज्ञानाशी संबंधित कलाविष्कार करणाऱ्यांचा आवडता छंद आहे. असा विज्ञानप्रेमी कलाकार त्याच्या अभिव्यक्तीच्या माध्यमातून विज्ञान आणि कला ह्यांची सरमिसळ करत, कल्पनेच्या भराऱ्या मारत जेव्हां व्यक्त होतो; तेव्हां भलेही तो कलाविष्कार विज्ञानाच्या चौकटीबाहेर जात असला वा वैज्ञानिक तथ्यांशी क्वचित फारकत घेत असला, तरीही त्यास मोठ्या प्रमाणावर लोकाश्रय लाभत आला आहे. 

पण कलाविष्कार म्हणून अशा कल्पनांच्या भराऱ्या मारणे आणि एखाद्या वैज्ञानिकाने त्याला असलेल्या ज्ञानाच्या, अनुभवाच्या जोरावर, आज असाध्य असलेली एखादी गोष्ट साध्य आहे अशी शक्यता वर्तविणे ह्यात महदंतर आहे. 
वैज्ञानिकाचे उत्तर हे बहुतांश वेळी, ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या सशक्त पायावर, संशोधनांच्या संभाव्य दिशांवर आणि त्याने केलेल्या चिंतनावर विसंबून असते.  

त्यामुळेच, नियम क्रमांक १  च्या पूर्वाधात उल्लेख असलेले 'हे शक्य आहे' हे होकारार्थी उत्तर बहुतांशी वेळी प्रत्यक्षात उतरते. 

अगदी अर्वाचीन काळापुरती उदाहरणे शोधायची ठरविल्यास, लिओनार्दो दा विंची, जुल्स व्हर्न आदि द्रष्ट्यांसोबतच, काही शतकांपूर्वीच्या कोपर्निकस, ब्रुनो, गॅलिलिओ, न्युटन ह्या वैज्ञनिकांपासून ते अगदी निकटच्या भूतकाळातील आईनस्टाईन, हॉकिंग सारख्या प्रज्ञावंत वैज्ञानिकांपर्यंत, ह्या पूर्वाधातील उत्तराचा अनुभव कधीनाकधी आला आहे. 
अगदी विषयवार जरी विचार केला तरीही ह्याची प्रत्यक्षातील उदाहरणे विलक्षण आहेत.  काल विस्फारण (Time Dilation), गुरुत्वीय भिंग (Gravitational lense), गुरुत्वाकर्षण लहरी (Gravitational Waves), कृष्णविवरासंबंधीची अनुमाने, (सामान्य) सापेक्षता सिद्धांत (General Theory of Relativity) आदि गोष्टी कालांतराने प्रत्यक्ष अनुभवास आल्या आहेत.

त्यामुळे नियम क्रमांक १ च्या पूर्वार्धाबद्दल  फारसा वाद असण्याचे कारण नाही.

------

नियम क्रमांक १ च्या उत्तरार्धाबद्दल तसेच म्हणता येणार नाही.
ह्याची अनेक कारणे आहेत. 

कितीही तर्कशुद्ध विचार करत असले, त्यांची सार्वजनिक जीवनातील प्रतिमा कशीही असली, तरीही बरेचसे वैज्ञानिक, मनुष्यस्वभावातील अपरिहार्य लक्षणांवर, दोषांवर क्वचितच मात करू शकतात.  त्यामुळे वेळप्रसंगी, ते षड्‌रिपुंच्या आहारी जाणे ही अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. 

तत्कालिन ज्ञान व प्रस्थापित धारणा, पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन, एखाद्या विचारसरणीशी असलेली दृढ निष्ठा, स्वभावातील काही त्रुटी, परिस्थितीजन्य निष्कर्ष वा निर्णय, ह्या व अशा अनेक गोष्टी आहेत, जिथे तर्कशुद्ध विचारसरणी मागे पडते आणि इतर गोष्टी मानवी मनाचा ताबा घेतात, तर्कसंगत दृष्टिकोन, विश्लेषणाची नैसर्गिक प्रवृत्ती इथे सहजपणे मात खाते. ह्यातून आईनस्टाईन आणि हॉकिंग सारखे प्रज्ञावंत देखील सुटू शकलेले नाहीत. 'Spooky action at a distance' आणि 'Higgs Boson Doomsday' ही अनुक्रमे त्याचीच उदाहरणे आहेत. 

काही विशिष्ट परिस्थितीत, अशा वैज्ञानिकांचा आणि त्यांच्या समर्थकांचा एक कंपू देखील निर्माण होतो. अशा कंपूच्या तीव्र धारणांमुळे, वर्चस्ववादी भूमिकांमुळे, आधिकारिक स्थानांमुळे , कितीतरी वेगळे दृष्टिकोन (जे कदाचित योग्य असू शकतील, वैज्ञानिक प्रगतीत महत्त्वाचा सहभाग नोंदवू शकतील) मागे पडल्याची उदाहरणे देखील आहेत. 

ह्या व्यतिरिक्त, व्यावसायिक, राजकीय हितसंबंध आणि त्या अनुषंगाने असलेले प्रचारगट हे देखील अशा वैज्ञानिकांकडून 'हे अशक्य आहे' प्रकारची उत्तरे वदवून घेत असावेत, अशी शक्यता नाकारता येणार नाही. 
'Science advances one funeral at a time' असे सुप्रसिद्ध वैज्ञानिक मॅक्स प्लॅंकचे एक विधान आहे. थोडे कठोर असले तरीही ह्या विधानात तथ्य असावे,  अशा काही गोष्टी विज्ञानाच्या इतिहासात आढळतात. असे असूनही, हे विधान व्यक्तीस्तरावर न घेता, रुढ झालेल्या वैज्ञानिक धारणा, कल्पनांच्या संदर्भाने घेतले तर अधिक उचित ठरेल. 
प्रचलित आणि कालबाह्य होऊ पाहणार्‍या किंवा भविष्यातील वैज्ञानिक प्रगतीत अडसर ठरू शकणार्‍या जुन्या धारणा, कल्पना लोप पावल्या नाहीत, तर अनेकदा नव्या कल्पनांचा विकास खुंटतो.  

'हे अशक्य आहे' ह्या ऐवजी 'हे कसे शक्य होऊ शकेल' किंवा 'अमुक कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कोणत्या दिशेने अधिक संशोधन होण्याची आवश्यकता आहे'; अशा प्रकारच्या चर्चांसाठी आवश्यक पार्श्वभूमीच निर्माण होऊ शकली नाही (किंवा क्वचित, निर्माणच होऊ दिली नाही) , तर ती कल्पना प्रत्यक्षात येण्याची शक्यता अधिकच धूसर होत जाते.

------

ह्या नियमाच्या अनुषंगाने सुप्रसिद्ध विज्ञानकथा लेखक आयझॅक आसिमोव्ह ची एक टिप्पणी आहे आणि ती टिप्पणी क्लार्कच्या नियमातून झिरपणार्‍या मोकळेपणाच्या विरोधात जाऊन, काहीशी 'विज्ञानपोथीनिष्ठ' होत असली, तरीही ती आवर्जून विचारात घेण्यासारखीच आहे. पहिल्या नियमाच्या उत्तरार्धात 'बहुतांश वेळा' अशा अर्थाचा शब्दप्रयोग (original : very probably) वापरला गेला आहे, त्या संदर्भात ही टिप्पणी आहे. 

"When, however, the lay public rallies round an idea that is denounced by distinguished but elderly scientists and supports that idea with great fervour and emotion – the distinguished but elderly scientists are then, after all, probably right."

त्या टिप्पणीचा भावानुवाद काहीसा असा होईल :  

'तथापि, प्रथितयश आणि अनुभवसंपन्न शास्त्रज्ञांनी मूळातून नाकारलेल्या, त्याज्य मानलेल्या एखाद्या कल्पनेला, सामान्य जनता जर भावनाशील होऊन, उत्कटतेने कवटाळत असेल, पाठिंबा देत असेल, तर अशा वेळेस ते प्रथितयश आणि अनुभवसंपन्न शास्त्रज्ञ, बहुदा योग्य असतात.'    
ह्या टिप्पणीत देखील 'बहुदा' हा शब्द वापरला गेला आहे, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे !

------
****

====
नियम क्रमांक २ 
२) शक्‍यतेच्‍या मर्यादा शोधण्‍याचा एकमेव मार्ग म्हणजे, त्‍या शक्यतांच्या पलीकडे असलेल्या, अशक्यतेच्या प्रांतात थोडेसे भ्रमण करणे. 
====

हा नियम विज्ञानातील वाङमयीन वा दृकश्राव्य कलाकृती 
आणि 
ज्ञात वा अज्ञात विज्ञान, 
ह्यांच्या परस्परसंबंधावर भाष्य करतो. 

विज्ञानकथा, विज्ञानकादंबर्‍या, विज्ञानपट आणि विज्ञानमालिका ह्या दीर्घकालीन प्रवासाचा आरंभ बराच जुना आहे. अगदी दुसर्‍या शतकात त्याची मूळे आढळतात असा दावा केला गेला आहे. 

आता आपल्याकडे, अनेकांना विविध कारणांमुळे, पौराणिक कथातील तथ्य आणि आलंकारिक वा अन्य कारणामुळे समाविष्ट झालेले मिथ्य ह्यांची सरमिसळ पचत नाही.  अतिशयोक्ती, महिमावर्धन टाळल्यास, प्रक्षिप्त भाग बाजूला सारल्यास अशा कथांमध्ये काही निखळ (विज्ञाननिष्ठ) सत्य असू शकेल ही गोष्ट, त्यांना अपेक्षित असलेले पुरावे न सापडल्याने मान्यच होत नाही. आणि म्हणून असे लोक, अनेक पौराणिक कथांची वर्गवारी कविकल्पना वा काही वेळा चक्क विज्ञानकथा म्हणून करतात; आता हा प्रकार जर विचारात घेतला, तर विज्ञानकथांचा उगम थेट पौराणिक काळातच नेता येईल !!

कथा, कादंबरी, नाटक, चित्रपट, शृतिका वा मालिका वा अन्य कोणत्याही स्वरूपात विज्ञान कलाकृती असली, तरीही त्या कलाकृतीला, विज्ञानकल्पनांच्या प्रांगणात भरारी मारणे टाळता येत नाही. किंबहुना विज्ञान वाङमयाचा वा दृकश्राव्य माध्यमातील त्याच्या सादरीकरणाचा, तोच मूळ हेतू असतो. 

आज ज्ञात असलेल्या विज्ञानाच्या खिडकीतून बाहेर डोकाविल्याशिवाय किंवा त्या उंबर्‍याच्या पलीकडे पाऊल टाकल्याविना, त्या लेखनाला, सादरीकरणाला अपेक्षित यश मिळणे अवघडच असते. पण यशापलीकडेही, हे सादरीकरण बरेच काही देऊन जाते. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे, त्या सादरीकरणात डोकावलेल्या असीम इच्छा. आज ज्ञाताच्या उंबर्‍यापलीकडे असलेल्या विज्ञानाच्या अविष्कारांना प्रत्यक्षात उतरविण्याची मनीषा. ही मनीषा देखील विज्ञानाच्या आजपर्यंतच्या प्रगतीला काही अंशी उपयुक्त ठरली आहे. 

प्रत्यक्षात न उतरलेल्या, पण मनात झिरपलेल्या अशा अनेक वैज्ञानिक कल्पना, संकल्पना ज्ञात विज्ञानाच्या चौकटीच्या मर्यादा स्पष्ट करतातच, पण त्याच सोबत त्या चौकटीबाहेरची आणि पहिल्या नियमात उल्लेखलेली 'हे शक्य आहे' ची चौकट विस्तारायलाही कारणीभूत ठरू शकतात. 

एखाद्या विज्ञान कलाकृतीतले, अशक्यतेच्या प्रांतातील हे भ्रमण, जेव्हां ज्ञात विज्ञानाच्या ठोस पायावर उभे असते, तेव्हां त्या कलाकृती अधिक चांगल्या वठण्याची शक्यता वाढते. पण तरीही विज्ञानाचा ठोस पाया आहे म्हणून ती कलाकृती रुक्ष होईल, त्या कलाकृतीची रंजकता कमी होईल असे नव्हे. कलाकृतीची रंजकता ही, प्रामुख्याने कलाकृतीची निर्मिती होत असतानाच्या, हाताळणीवर अधिक अवलंबून असते, ह्याचा प्रत्यय वारंवार आला आहे. 
ज्ञात विज्ञानाच्या चौकटीला ओलांडणारे हे भ्रमण, 

भविष्यातील अपेक्षित वैज्ञानिक प्रगतीला स्पर्श करणारे असतेच (Back to the Future [trilogy], The Martian, Interstellar, I Robot आदि). 

पण काही वेळा ते भ्रमण वैज्ञानिक प्रगतीच्या अनपेक्षित आणि अनवट वाटा चोखाळणारे, आज असाध्य वाटणार्‍या वाटांवरचे देखील असू शकते (X-Files, Star Trek, Terminator [trilogy], Lucy आदि). 

कित्येकदा ते सैद्धांतिक भौतिक शास्त्राच्या कल्पनांना मांडणारे, रुजविणारे असते (Déjà Vu, Predestination, The Butterfly Effect आदि) 

आणि 

काही वेळा, विज्ञानाच्या प्रगतीचा प्रवास, अंतिमत: तत्त्वज्ञानाच्या प्रांगणातच जाऊन पोहोचणार आहे, हे सुचविणारे देखील असते (Matrix [trilogy], Gattaca, Source Code, The Island)

--
टीप : 2001 A Space Odyssey आणि Rendezvous with Rama चा उल्लेख आणि त्यांची वर्गवारी इथे मी जाणीवपूर्वक टाळली आहे.
--

अशक्यतेच्या प्रांतातील अशा भ्रमणाला मानवी कल्पनेच्या आणि तत्कालीन स्वीकारार्हतेच्या मर्यादा असतात. 

त्या ही पलीकडे गेलेल्या गोष्टींची मग चेष्टा होते, टवाळी होते. ही चेष्टा कधी पौराणिक कथांमधील वैज्ञानिक संदर्भांच्या वाट्याला येते, तर कधी प्रमाणाबाहेर ताणलेल्या Ancient Aliens सारख्या संकल्पनांच्या वाट्याला. अशा वेळेस मग उपलब्ध असलेली तथ्ये देखील मिथ्य वाटू लागतात. मग ज्या गोष्टी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत आणि ज्या गोष्टी आपल्या मनात रुजलेल्या तत्कालीन संदर्भांशी मेळ खात नाहीत, त्यांचे प्रमाणाबाहेर सुलभीकरण केले जाते किंवा त्यांची स्पष्टीकरणासाठी संपूर्ण अतार्किक मांडणी केली जाते. आणि नंतर ती मांडणीच योग्य आहे, अशी हाकाटी इतक्या उच्चरवात वा प्रसिद्धीतंत्र वापरून केली जाते, की त्या चेष्टा होणार्‍या संकल्पनांच्या समर्थनार्थ उठणारे आवाज हळूहळू क्षीण होत जातात. 

प्रस्थापितांच्या वर्चस्वाच्या ह्या स्वाभाविक दोषातून, विज्ञान देखील सुटलेले नाही.

------
****

====
नियम क्रमांक ३ 
३) कोणतेही पुरेसे प्रगत तंत्रज्ञान, हे जादूपासून वेगळे करता येत नाही. 
====

जादू, न उलगडणारे चमत्कार, स्पष्टीकरण न सापडलेल्या घटना, अद्‍‌भुताच्या प्रांतातच शक्य होऊ  शकतील अशा अनेक गोष्टी,  ह्या मानवी इतिहासाचा आणि वर्तमानाचाही अविभाज्य भाग आहेत. 

ह्या तथाकथित चमत्कारांमागे त्यावेळी (आणि क्वचित आजही) न उमगलेले, न उलगडलेले विज्ञानच असते, असे ठामपणे प्रतिपादन करण्यासारखी परिस्थिती निश्चितच आहे. पण चमत्कार, जादू हे तसेच राहावेत अशी एका मोठ्या वर्गाची इच्छा असते.  त्या मागे असतात स्वार्थाने परिप्लुत झालेले हितसंबंध व लपविलेली, मूक ठेवलेली आर्थिक, सामाजिक कारणे. 

अर्थात काही व्यक्तींनी केलेले 'चमत्कार' वास्तविक अर्थाने, निखळ सत्यही असू शकतात. क्वचित प्रसंगी असे चमत्कार, वैज्ञानिक निरीक्षणांखाली होऊनही, विज्ञानास त्यातील तथ्य, त्यामागचे अज्ञात विज्ञान पूर्णपणे उलगडणे शक्य होत नाही, ह्याची मोजकी उदाहरणे आहेत. चमत्कार करणार्‍या व्यक्तीस दैवजात वा त्याच्या उपासनेमुळे वा गुरुच्या अनुग्रहामुळे लाभलेल्या काही सिद्धींचा त्यामध्ये वाटा असतो. 

सिद्धी म्हणजे तर शेवटी काय ? तर आज अज्ञात असलेल्या विज्ञानाच्या माध्यमातून गवसलेली विलक्षण शक्ती. 

मानवी मनात विलक्षण शक्ती आहे आणि त्याचा अनुभव वारंवार आला आहे. संमोहन विद्या (Hypnotism), दूरसंवेदना (Telepathy), पराचलन (Telekinesis) आदिंचे प्रयोग वैज्ञानिक निरीक्षणाखाली झाले आहेत आणि ते हातचलाखी वा फसवणूक म्हणून नाकारता येत नाहीत.  दुसर्‍या शब्दात सांगायचे तर दिव्यत्वाच्या वर्तुळात सामावणार्‍या, मनाच्या शक्तींचे हे व अन्य प्रयोग, अंतिमत: काही सिद्धींच्या माध्यमातूनच प्रत्यक्षात उतरतात.  अशा वेळेस 'दिव्यत्वाची जेथे प्रचीती, तेथे कर माझे जुळती' हे म्हणणे किंवा तदनुषंगिक कृती करणे म्हणजे प्रतिगामित्व किंवा अंधश्रद्धा नव्हे हे तथाकथित पुरोगामी आणि 'अंधाश्रद्ध' (आंधळी अश्रद्धा असणारे) व्यक्तींनी लक्षात घेतले तर, अंधश्रद्धेच्या नावाखाली हिंदू श्रद्धांचे निर्मूलन करण्याचे प्रयत्न, काही प्रमाणात तरी कमी होऊ शकतील. स्वाभाविकच विनाकारण होणारे काही संघर्षही टळतील.  

------ 

आणि तरीही कर्मठ विज्ञाननिष्ठ होऊन ज्ञात विज्ञानाच्या चौकटीतच  विचार करायचा झाल्यास, पुढील प्रसंगाचा अवश्य विचार करावा. 

एरिक वॉन डॅनिकनच्या काही पुस्तकात एका कल्पित प्रसंगाचा उल्लेख, वेगवेगळी रुपे घेत आला आहे.
 
अत्यंत प्रगत झालेल्या पृथ्वीवरील एक अंतराळ मोहिम, एका पृथ्वीसदृश ग्रहावर जाऊन ठेपते.  ह्या ग्रहावर जेव्हां अंतराळवीर उतरतात तेव्हां त्यांना असे आढळते की तिथे एक अत्यंत अप्रगत मानवसदृश प्रजाती वास करून आहे. ते अंतराळवीर ह्या प्रजातीत वावरतात. त्या प्रजातीला, आवश्यक असल्यास त्यातील निवडक लोकांना विविध संस्कृतींचे, शास्त्रांचे, शस्त्रांचे, विज्ञानाचे आवश्यक तितकेच ज्ञान टप्प्याटप्प्याने देत राहतात. वेळप्रसंगी त्यांच्यातील स्त्रियांशी शरीरसंबध ठेवून संकरित आणि अधिक बलवान, बुद्धिमान संततीही जन्मास घालतात. ह्या व अशा अनेक गोष्टी साधत, त्या प्रजातीचा सांस्कृतिक, वैज्ञानिक उत्क्रांतीच्या वाटेवरचा प्रवास घडविला जातो. 

कालांतराने हे अंतराळवीर जेव्हां त्यांची मोहिम आवरती घेतात, तोवर त्या प्रजातीच्या मनात त्यांची 'देव' म्हणून प्रतिष्ठापना झालेली असते. त्यांनी दाखविलेल्या अनेक वैज्ञानिक अविष्कारांचे चमत्कार झालेले असतात. कालांतराने त्या अंतराळवीरांच्या निवासाचे, वावराचे कित्येक संदर्भ, त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा ठेवा, त्यांनी मागे सोडलेल्या गोष्टी त्या प्रजातीत कथारुपाने रुजतात. पुढल्या कित्येक पिढ्यांपर्यंत त्या गोष्टींमध्ये, तथ्यांमध्ये, अनेक बर्‍यावाईट, सत्यासत्य संदर्भांची, सरमिसळ होत राहते. 

Stargate नावाच्या एका विज्ञानपटात आणि स्टारट्रेक ह्या विज्ञानमालिकेच्या काही भागात, अशाच प्रकारच्या संकल्पनेचा अत्यंत प्रभावी वापर करण्यात आला आहे. 

मानवी इतिहासातील वसाहतीकरणाचे वेगवेगळे प्रसंग व त्या प्रसंगांच्या वेळी वसाहतीकरण करणार्‍या प्रगत जमातींचे वर्तन व स्थानिक जमातींचा त्या संबंधाने प्रतिसाद, त्यांच्या प्रतिक्रिया विचारात घेतल्या, तरीही डॅनिकनच्या काहीशा एककल्ली वाटणार्‍या विचारामागील पार्श्वभूमी लक्षात येऊ शकेल. 

------

ह्या तिसर्‍या नियमावरही काही नोंद घेण्यासारख्या टिप्पण्या झाल्या आहेत.
 
वरवर तिसर्‍या नियमाच्या विरोधात वाटणारी, पण प्रत्यक्षात त्या नियमाला एकाप्रकारे पुष्टी देणारी, एक टिप्पणी अशी आहे  : 

'कोणतेही तंत्रज्ञान, जे जादू वाटत नाही ते अद्याप पुरेसे प्रगत झालेले नाही.'  ('Any technology distinguishable from magic is insufficiently advanced.' -- Barry Gehm - Chemistry Professor and Science Contributor) 

--

आणखी एक उल्लेखनीय टिप्पणी आहे, Michael Shermer ह्या प्रसिद्ध 'संशयवादी' (Sceptic / Skeptic) व्यक्तीची. : 

कोणतीही पुरेशी अतिप्रगत असलेली पृथ्वीबाह्य प्रजाती वा अतिदूरच्या काळातील अतिप्रगत झालेली मानव प्रजाती आणि देव ह्यात भेद करता येणार नाही. 
('Any sufficiently advanced extraterrestrial intelligence or far-future human would be indistinguishable from God.')

एकापरीने ही टिप्पणी डॅनिकनच्या दाव्याला बळ देणारी आहे. 

------
------

ह्या तीन नियमांच्या अनुषंगाने, एका मुलाखतीत क्लार्कला विचारण्यात आले होते की 
'पुढील काळात तुमच्या लेखनात आणखी काही नियमांचा समावेश होऊ शकेल का ?'  त्यावेळी क्लार्कने दिलेले उत्तर, त्याच्या तीन नियमांच्या परिपूर्णतेच्या दृष्टीने अतिशय चपखल होते. 
“As three laws were good enough for Newton, I have modestly decided to stop there.”

प्रत्यक्षात मात्र, (उपलब्ध माहीतीनुसार,) नंतरच्या काळात आणखी एक नियम त्याच्या खात्यात जमा करण्यात आला, ज्याचा प्रत्यय आपण रोजच्या जीवनात, टी.व्ही. वरील चर्चांमध्ये, परिसंवादांमध्ये, वादांमध्ये, इतकेच काय तर, फेसबूकवर देखील नित्यनेमाने घेतो. 

“For every expert, there is an equal and opposite expert.”

:-) 

====

तळटीपा : 

१) पहिला नियम सध्याच्या कोणत्याही प्रसंगाला वा विशिष्ट शास्त्रज्ञाला, व्यक्तीला वा त्यांच्यासारखा विचार करणार्‍या फेसबूक वा अन्य समूहाला लागू होतो असे कुणाला वाटल्यास, तो योगायोगच समजावा, असा काही माझा आग्रह नाही.   :-) 

२) कृपया हा लेख केवळ आणि केवळ तीन नियमांच्या संदर्भानेच वाचावा.  त्या नियमकर्त्याच्या वैयक्तिक आयुष्याचे संदर्भ जोडून, ह्या लेखाचे तर्‍हेतर्‍हेचे अर्थ काढू नयेत, ही विनंती.

३) ह्या लेखावरील विषयाला धरून केलेल्या सर्व प्रकारच्या टिप्पण्यांचे स्वागत आहे. अर्थातच शिव्या वा शिवराळ भाषा अपेक्षित नाही.   :-)  

४) हा लेख माझ्या,  https://vidnyansrushti.blogspot.com/ ह्या ब्लॉगवर देखील आहे, ज्यांना स्वत:चे नाव लपवून टिप्पणी करावयाची असेल, प्रतिवाद करायचा असेल , ते तिथे टिप्पणी करू शकतात  :-)  

====

बुधवार, २३ डिसेंबर, २०२०

पृथ्वीबाह्य कुंडली आणि शक्यता - भाग ५

 

Stellarium हे सॉफ्टवेअर वापरुन चंद्रकेंद्रीत कुंडली मांडता येते, ह्याचाच अर्थ 'आपल्या' सूर्यमालेतील कोणत्याही ग्रहावरची कुंडली आपल्याला मांडता यायला हवी. 


====


मानवी वसाहती होऊ शकतील अशी रचना / संरचना असलेला, चंद्रानंतरचा दुसरा ग्रहगोल कोणता; ह्याचे स्वाभाविक उत्तर मंगळ आहे. 

शुक्र हा अतितप्त आहे, 

बुध त्याच्या सूर्यनिकटतेमुळे शब्दश: भाजून निघत असतो,

आणि गुरु व शनि वायुरूप आहेत, 

लघुग्रह, बटूग्रह वा शनिपलीकडच्या ग्रहांचा (अर्थात हर्षल, नेपच्यून व प्लूटो) किंवा गुरु, शनि ह्यांच्या उपग्रहांचा मंगळाइतका अभ्यास झालेला नाही. 


----

पण त्या आधी आणखी एक शक्यता विचारात घ्यायला हवी जी निकटच्या काळात संभवते. 

अवकाशस्थानकात एखाद्या व्यक्तीचा जन्म होणे. 

सध्याचे आंतरराष्ट्रीय अवकाशस्थानक (ISS) समुद्रसपाटीपासून ३३० कि.मी. उंचीवरून भ्रमण करते. 

इतक्या उंचीवर पृथ्वीवरील अक्षांश, रेखांश लागू होऊ शकतात का ? 


ह्याच प्रश्नाचा विस्तार केला आणि असे म्हटले की समजा एखादे अंतराळयान मंगळाकडे मार्गक्रमणा करत आहे आणि त्या अंतराळयानातून एक गरोदर स्त्री प्रवास करत आहे, आता जर पृथ्वी सोडल्यापासून साधारण सात महिन्यांनंतर, पण  मंगळाच्या कक्षेपासून बर्‍यापैकी दूर असताना वाटेतच त्या स्त्रीची प्रसूती झाली, तर तिच्या अपत्याची कुंडली तयार करण्यासाठी (पर्यायाने गणितासाठी) कोणती संदर्भचौकट वापरावी ? 


एक अन्य उदाहरण म्हणून New Horizons ह्या मानवरहित अंतराळयानाचे देता येईल. ह्या यानास गुरुची कक्षा ओलांडल्यापासून, शनीची कक्षा ओलांडेपर्यंत १६ महिने लागले होते.

भविष्यात ह्या काळात समागमापासून,प्रसूतीपर्यंत सर्व घटना घडू शकतात. 


ह्याच प्रश्नाचा आणखी विस्तार केल्यास, दोन तार्‍यांमधील (पर्यायाने दोन भिन्न सूर्यमालांमधील) अंतराळात झालेल्या जन्मांबाबत विचार होऊ शकतो. 

----


----

मानवी वसाहतींसाठी चंद्रानंतर सर्वात योग्य आहे मंगळ असा उल्लेख वर केला आहे, आणि त्यामागे कारणेही तशीच आहेत. 


ज्योतिषगणिताच्या व संभाव्य फलिताच्या दृष्टीने विचार केल्यास

मंगळ पृथ्वीपेक्षा आकाराने लहान आहे (पृथ्वीच्या निम्म्यापेक्षा थोडा अधिक) 

मंगळाला परिवलनासाठी (२४ तास ३७ मिनिटे) जवळजवळ पृथ्वीइतकाच वेळ (२३ तास ५६ मिनिटे) लागतो, त्याच्या आसाचा कल (२५॰ ११') पृथ्वीच्या आसाच्या कलाच्या (२३॰ २६') जवळपास आहे. 

त्याचे वर्ष (परिभ्रमण काल) मात्र पृथ्वीपेक्षा बरेच मोठे आहे. (पृथ्वी ३६५ दिवस, मंगळ (पृथ्वीचे) ६८७ दिवस. 

मंगळाला दोन उपग्रह (चंद्र) आहेत. मात्र हे दोन्ही आकाराने बरेच लहान असल्याने त्यांच्यामुळे खग्रास सूर्यग्रहण संभवत नाही. 

मात्र दोन्ही उपग्रहांना मंगळामुळे खग्रास ग्रहण संभवतेच, पण मंगळाच्या एका उपग्रहाला, दुसर्‍या उपग्रहामुळे देखील ग्रहण (पिधान युती - Occultation) लागते. 




ह्या सर्व गोष्टी मंगळावरील ग्रहसाधन, भावसाधन करताना विचार घ्याव्या लागतीलच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे कालनिर्णय व फलित ह्या दृष्टीने त्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतील. 


विशोंत्तरी महादशेसाठी चंद्रच का ? अशा अर्थाची एक पोस्ट नुकतीच प्रकाशित झाली होती, त्यावेळी चंद्र मनाचा कारक, पाण्याचा कारक (मानवी शरीरात असलेले पाण्याचे मोठे प्रमाण) अशा अर्थाची उत्तरे आली होती. पृथ्वीच्या संदर्भचौकटीत ही उत्तरे बरोबर असतीलही, पण मंगळाच्या संदर्भचौकटीत, आपण पृथ्वीचा चंद्र कालनिर्णयासाठी वापरू शकू असे वाटत नाही. मग दशापद्धतीचा कालनिर्णया तिथे वापरता येईल का ? आणि त्यासाठी कोणते बीज वापरायचे ? 


त्यामुळे विशोंत्तरी महादशेसाठी (पर्यायाने कालनिर्णयासाठी) पृथ्वीवर चंद्रच का वापरला जातो; ह्याचे काही अन्य उत्तर आहे का ह्याचा व्यवस्थित शोध घ्यावाच लागेल.  अन्यथा मंगळावर महादशा ठरविताना, बीज म्हणून कोणता एक ठराविक उपग्रह वापरावयाचा की अन्य काही तर्कशास्त्र वापरायचे, ह्याचा निर्णय घेता येईल असे वाटत नाही. 


पृथ्वीकेंद्रीत पत्रिकेत आपण राहू, केतू ह्या पातबिंदूंचा समावेश केला आहे. (पृथ्वीची परिभ्रमण कक्षा जिथे चंद्राच्या पृथ्वीभ्रमण कक्षेस छेदते ते बिंदू)

मंगळकेंद्रीत पत्रिकेत दोन उपग्रहांमुळे, चार पातबिंदू होतील, ह्यांचा विचार कसा करणार ? 


आणि तीन वा त्याहून अधिक उपग्रह असलेल्या ग्रहावर पत्रिका मांडताना किती पातबिंदू विचारात घ्यावे लागतील ? 


पृथ्वीवरील नक्षत्रचक्र व पर्यायाने राशीचक्र हे चंद्राच्या मार्गाशी संबंधित आहे. मंगळाला दोन उपग्रह आहेत, मग इथे राशीचक्र, नक्षत्रचक्र कोणत्या उपग्रहावर आधारित ठरवावे ?  सर्वाधिक निकट असलेल्या, आकाराने, वस्तुमानाने सर्वात मोठ्या असलेल्या ? 

हा जो काही निकष ठरविला जाईल तो इतर सर्व ग्रहांच्या बाबतीत आपण कायम ठेवू शकू का ? 


----


आकाशगंगेत एकमेकांभोवती अथवा अंतराळातील एखाद्या बिंदूभोवती (संयुक्त गुरुत्वमध्य - Barycenter) घिरट्या घालणारे तारकासमूह आहेत. 

उदा. 

द्वैती (Binary) [Sirius अर्थात व्याधतारा], 

त्रैती (Trinary) [Alpha Centauri म्हणजेच आपल्याला सर्वात जवळ असणारा 'मित्र' तारा], 

चतुष्टक (Quadruple) [Rigel अर्थात राजन्य, Capella अर्थात ब्रह्महृदय]

तारकापंचक (Quintuple) [मृग नक्षत्रातील Mintaka]

तारकाषष्टक (Sextuple) [पुनर्वसू नक्षत्रातील अश्विनीकुमारांपैकी एक Castor] 

तारकासप्तक (Septuple) [शर्मिष्ठा तारकापुंजातील AR Cassiopeiae]


ह्यापैकी काही तार्‍यांना स्वत:च्या ग्रहमाला आहेत, काहींना सामयिक ग्रहमाला आहेत. 

इथे ग्रहगणित आणि फलित किती गुंतागुंतीचे होईल, ह्याची सध्यातरी आपण केवळ कल्पनाच करू शकतो. 


दूरच्या ग्रहमाला, तारामाला ह्यांच्यासाठी नक्षत्रचक्र, राशीचक्र हे तर नव्याने रचावे लागेलच, पण अनेक 'सूर्य' असणार्‍या एकापेक्षा अधिक तार्‍यांभोवती घिरट्या घालणार्‍या ग्रहासाठी, अशा ग्रहमालांमध्ये मूळात क्रांतीवृत्त कसे ठरवावे, हाच जटिल प्रश्न असेल. 


----


आत्तापर्यंतच्या ऊहापोहातून काही गोष्टी स्पष्ट होतात प्रत्येक गोलावरचे ग्रहसाधन व भावसाधनच नव्हे, तर कालनिर्णयाची साधने व फलितकथन प्रक्रिया देखील वेगळी असणार आहे. पण ह्याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी ती शून्यातून उभारायला लागेल असे नव्हे. 

ग्रहसाधन, भावसाधन, कालनिर्णय आणि फलितनिश्चिती ह्यांच्यासाठी काहीएक मार्गदर्शक तत्वे अथवा नियम अथवा सूत्रे असणे आवश्यक आहे. 


पृथ्वीवरच्या फलितकथनासाठी, आपण मानवी बुद्धीच्या, मनाच्या, शरीराच्या विविध गुणधर्मांचे, विविध क्षमतांचे, मर्यादांचे Mapping (ह्यासाठी योग्य मराठी शब्द सापडला नाही, मानचित्रण हा योग्य शब्द नव्हे) केले आहे. 

आणि हे Mapping भाव, राशी, नक्षत्रे, ग्रह, योग आदी सर्वांवर झाले आहे. 


हे Mapping करताना जे काही तर्कशास्त्र वापरले गेले आहे ते आपल्याला पूर्णपणे ज्ञात नाही. 

Mapping साठीचे हे तर्कशास्त्र ग्रहांच्या, स्थिर तार्‍यांच्या, तारकापुंजांच्या, 

जन्माशी, स्थानाशी, वेगाशी, कक्षांशी, कक्षाप्रतलांशी, रासायनिक संरचनेशी, वातावरणाशी, चुंबकीय क्षेत्राशी, गुरुत्वाकर्षण वा अन्य ज्ञात-अज्ञात बलांशी, प्रारणांशी अथवा त्या खगोलीय वस्तूच्या अन्य एखाद्या गुणधर्माशी निगडीत असू शकते.  



कदाचित ते तर्कशास्त्र ह्यातील एक वा अनेक घटकांच्या एकत्रित परिणामांशी, मेळ खाणारे देखील असू शकते. 

हे तर्कशास्त्र समजल्याविना, कोणतीही पृथ्वीबाह्य कुंडली (अगदी आपल्या सूर्यमालेतील अन्य ग्रहावरची कुंडली सुद्धा)  मांडल्यावर, तर्कशुद्ध / वास्तवाशी मेळ असणारे फलितकथन निव्वळ अशक्य आहे. 

अन्यथा केवळ निरीक्षण व अभ्यासातून फलितकथन शक्य व्हावे किंवा होईल, असे वाटत असल्यास, त्यासाठी प्रत्येक पैलूचा, खूप खोलवर व कदाचित आणखी कित्येक शतकांचा अभ्यास व्हावा लागेल. 


----


उदा. 

ग्रहांच्या वयाबाबत बुध कुमार, शनि वृद्ध ही धारणा त्या ग्रहांच्या जन्मकथेशी निगडीत आहे, 

म्हणजे आपल्या ग्रहमालेतील शनि ह्या ग्रहाचा 'जन्म' सर्वप्रथम झाला आणि बुध हा सर्वात उशिरा जन्मलेला ग्रह आहे  

असे मानल्यास, 

शनिच्या आणि बुधाच्या पौराणिक जन्मकथांनुसार वास्तवात काय घडले असावे, ह्याचा किमान तर्क करता यायला हवा.

भले मग सध्याच्या खगोलशास्त्रीय ज्ञानानुसार तो सध्या सिद्ध होऊ शको वा न शको. 


किंवा 


चंद्राची चंचलता आणि शनीची स्थिरबुद्धी त्यांच्या भ्रमणमार्गाशी, गतीशी साधर्म्य राखून आहे असे मानल्यास,

शुक्र, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्यांच्या भ्रमणमार्गाचा, गतीचा देखील तसाच संबंध जोडता आला पाहिजे.

म्हणजे हर्षल त्याच्या भ्रमणमार्गावर लोळतलोळत (त्याचा आस जवळजवळ ८३॰ कललेला आहे) सूर्यप्रदक्षिणा करतो, ह्याचा दृश्य परिणाम म्हणजे हर्षलचा अति-तर्‍हेवाईकपणा का ? 


अथवा



जवळजवळ सर्व ग्रह, (पृथ्वीनिष्ठ) क्रांतीवृत्ताशी साडेतीन अंशापेक्षा कमी कोनातून परिभ्रमण करतात, थोडक्यात ते सूर्याभोवती साधारण एकाच प्रतलात भ्रमण करतात, अपवाद केवळ बुध (७॰) व विशेष करून प्लुटोचा (१७॰). ह्या गोष्टींचा त्या ग्रहांच्या गुणधर्माशी काही संबंध जोडता येतो का ?


किंवा 



पृथ्वीसकट इतर सर्व ग्रह घड्याळाच्या विरुद्ध दिशेने परिवलन करतात,मात्र शुक्र, हर्षल व प्लुटो हे तीनच ग्रह घड्याळाच्या दिशेने परिवलन करतात. परिवलनाची ही दिशा आणि ह्या तीन ग्रहांमध्ये विशिष्ट स्थितीत, सुप्त वा प्रकट अवस्थेत असणारा उच्छृंखलपणा, ह्यांचा संबंध आहे असे आपण म्हणू शकतो का ? 


----


प्लुटोचा समावेश बटुग्रहांमध्ये होऊन काही वर्षे लोटली, पण आजही मेदिनीय कुंडलीतच नव्हे, तर व्यक्तिगत कुंडलीतही, आपण प्लुटोचा विचार करतो, कारण प्लुटोच्या फळांची प्रचिती आली आहे, येते आहे. 

पण त्याचवेळी प्लुटोपेक्षा वस्तुमान, आकारमान, गुरुत्वाकर्षण अधिक असलेला Eris आपण विचारात घेत नाही, ह्या मागे काय कारण असावे ? त्याचा उपसूर्यबिंदूदेखील प्रचंड दूर आहे हे ? 


मग त्याच न्यायाने Ceres (ह्या लघुग्रहाचा विचार त्याच स्तरावर का केला जात नसावा ? तो तर पृथ्वीला बराच जवळ आहे. मग त्याच्या बाबतीत त्याचे तुलनेने कमी असलेले वस्तुमान, आकारमान निर्णायक ठरते का ? 


ह्याचा एक अर्थ असा होता का, की फलितासाठी कोणत्या ग्रहगोलांचा विचार करावा, प्राधान्य द्यावे ह्याचे, त्या ग्रहाच्या भौतिक गुणधर्मांशी, खगोलनिष्ठ गुणधर्माशी काहीतरी नाते आहे ? 

आणि असे नाते जर असेल तर अद्याप त्या नात्याचा शोध घेतला गेला नाही आहे. 

किंवा तसा शोध घेतला गेला असल्यास ते नाते सूत्रबद्ध रितीने मांडता आले नाही आहे.


हाच प्रकार धूमकेतूंच्या संदर्भातही सत्य आहे. धूमकेतू दिसल्याच्या आणि तो अशुभसंकेत असल्याचा, वा तदनंतर तत्सम काही घटना घडल्याच्या कथांमध्ये तथ्य असेल, 

तर धूमकेतूचा आकार, त्याची दीप्ती, त्याचा भ्रमणमार्ग हे फलितदृष्ट्या महत्त्वाचे घटक आहेत का हे ठरविण्याचा प्रयत्न झाला आहे का ? 


----


कोणत्याही पृथ्वीबाह्य कुंडलीत, फलितनिश्चितीसाठी, कालनिर्णयासाठी  कोणते ग्रहगोल वा त्यांचा समुच्चय विचारात घ्यावा, कुणाला प्राधान्य द्यावे आदि गोष्टी ठरविताना, भौतिक, खगोलशास्त्रीय तथ्यांशी सांगड घालणार्‍या, अशा प्रकारच्या मार्गदर्शक तत्वांची, नियमांची, सूत्राची आवश्यकता पडणार आहे.  

 

वर म्हटल्याप्रमाणे, आपण ग्रहगोलांवरती, राशींवरती, नक्षत्रांवरती, विविध गुणधर्माचे mapping केले, मात्र त्याचा खगोलशास्त्रीय तथ्यांशी, गुणधर्माशी संबंध जोडण्याचा फारसा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. 

आणि असा प्रयत्न केल्याविना, कोणत्याही पृथ्वीबाह्य कुंडलीच्या फलितनिश्चितीत, फलितकथनात तर्कशुद्ध अचूकपणा आणता येईल असे मलातरी वाटत नाही.  


==========

थोडेसे अवांतर

==========

अवकाशस्थानकात अंतराळयात्री वजनरहित अवस्था (अचूकपणे विचार केल्यास हे सूक्ष्म गुरुत्वाकर्षण असते, शून्य गुरुत्वाकर्षण नव्हे) अनुभवतात, तिथे एखादा जन्म शक्य आहे का ? हा प्रश्न अनेक उपप्रश्नांना जन्म देतो. 

अवकाशस्थानकापर्यंतचा प्रवास एखाद्या गरोदर स्त्रीस जमू शकेल ?

किंवा अवकाशस्थानकात मानवी गर्भाची वाढ व्यवस्थित होऊ शकेल ?  

किंवा अवकाशस्थानकात राहणार्‍या एखाद्या स्त्रीला (समागम होऊन) तिथेच दिवस जाणे शक्य आहे ? 

किंवा बाह्यफलन वा अन्य तंत्राने एखाद्या स्त्रीला तिथे एखाद्या बालकास जन्म देणे जमेल ?

 

ह्या सर्व प्रश्नांची आज ठामपणे उत्तरे देणे शक्य नाही, कारण जीवाचा धोका लक्षात घेता, मानवाच्या संदर्भात असे प्रयोग करण्यासाठी कुठल्याही सरकारला जनमत 'तयार' करावे लागेल.  

पण खासगी क्षेत्रात असे प्रयोग होऊ शकतात. 


आजपर्यंत काही कीटकांच्या, जलचरांच्या संदर्भात असे यशस्वी प्रयोग झाले आहेत आणि त्यांची संतती जगली, वाढली आहे. 

सस्तन प्राण्यांच्या (उदा. उंदीर) बाबतीत, कानाच्या मागे असणार्‍या आणि शरीराचा समतोल राखणार्‍या यंत्रणेबाबत काही त्रुटी निर्माण होत असल्या, किंवा इतरही काही अडथळे असले, तरीही पृथ्वीवर परतल्यावर काही काळाने ह्या त्रुटी काही प्रमाणात कमी होतात असे आढळले आहे. भविष्यकाळात ह्या त्रुटी, अडथळे पूर्णत: दूर करण्यातही यश मिळेल. 


============


=======

समाप्त 

=======

===============


रविवार, २० डिसेंबर, २०२०

पृथ्वीबाह्य कुंडली आणि शक्यता - भाग ४

 


चंद्रावरची एखादी कुंडली आजच प्रत्यक्षात मांडता येईल का ? 


अपोलो - ११ हे अंतराळयानाने १६ जुलै १९६९ रोजी, ०९:३२ EDT (अर्थात १३:३२ UTC) वाजता चंद्रावर जाण्यासाठी केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा, अमेरिका इथून उड्डाण केले. (फ्लोरिडातील वेळेनुसारची कुंडली सोबत जोडली आहे).  





२० जुलै १९६९ रोजी २०:१७:४० UTC (अर्थात फ्लोरिडा वेळेनुसार १६:१७:४० EDT) (२१ जुलै १९६९, ०१:४०:१७, मुंबई)  वाजता अपोलो - ११ चंद्रावर उतरले (फ्लोरिडातील वेळेनुसारची कुंडली सोबत जोडली आहे).  






२० जुलै १९६९ रोजी ०२:५६:१५ UTC (अर्थात फ्लोरिडा वेळेनुसार २२:५६:१५ EDT) वाजता नील आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर प्रथम पाऊल ठेवले. 


अपोलो - ११  चंद्रावर उतरणे आणि नंतर मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवणे ह्या दोन्ही घटना, पृथ्वी व चंद्र ह्या दोन्ही गोलांच्या दृष्टीने महत्त्वाच्या घटना आहेत. 

अर्थात ह्या घटनांची चंद्रकेंद्रीत पद्धतीने कुंडली मांडता आली तर ती फलिताच्या दृष्टीने बोलकी हवी. 


अपोलो - ११  जिथे व जेंव्हा उतरले होते त्यावेळेस चंद्रावर उतरले त्यावेळेस  Stellarium ह्या सॉफ्टवेअरमधील चित्र पाहा. (हे दृश्य कसे काढले ते ह्याच लेखांकाच्या तळाशी अवांतरमध्ये दिले आहे) 




पूर्वक्षितिजावर पुष्य नक्षत्र उदित झाले आहे. अर्थात तिथे कर्क लग्न आहे.

ह्या चित्रात M44 हा तारकागुच्छ पूर्वक्षितिजावर आहे आणि त्याचे Ecliptic Longitude १२७॰ १२' ६.३" असे दाखविले आहे. 


तेच लग्न आहे असे समजून अपोलो - ११  च्या चंद्रावतरणाची त्या स्थानाची चंद्रकेंद्रीत कुंडली आपण मांडू शकतो.

त्यामुळे पृथ्वीनिष्ठ अयनांश विचारात घेतल्यास १२७॰ १२' ६.३०" - २३॰ २४' ५९.०४"  = १०३॰ ४८' ०७.२६"  

अर्थात कर्क लग्न १३॰ ४८' ७.२६" 


चंद्रावरील भावसाधनाचे तक्ते उपलब्ध नसल्याने Equal House घेऊन ही कुंडली मांडायला हवी. 

आता चंद्रावतरणाच्या फ्लोरिडातील कुंडलीत चंद्र कन्या १४॰ २७' ४६" असल्याने, 

ढोबळमानाने चंद्रकेंद्रीत कुंडलीत, पृथ्वी मीन १४॰ २७' ४६" असायला हवी


====


म्हणजेच पहिल्या मानवी चंद्रावतरणाच्या, चंद्रकेंद्रीत कुंडलीत, पृथ्वी भाग्यस्थानी (भाग्यबिंदूजवळ) येते. 

आणि पृथ्वीचा नक्षत्रस्वामी शनि असून, तो तिच्याशी द्विर्द्वादशयोगात आहे व दशमात (दशमबिंदूजवळ) आहे.  

षष्ठेश, भाग्येश गुरु हा हर्षल ह्या नवमतवादी ग्रहाच्या अंशात्मक युतीत धनस्थानी आहे. 

(गुरुचा नक्षत्र स्वामी रवि हा धनेश असून तो तृतीयेश, व्ययेश बुधाच्या युतीत, व्ययात कर्केत आहे; तो प्रवासावर झालेल्या अफाट खर्चाचा निदर्शक मानून, त्याकडे  तूर्तास दुर्लक्ष करावे का ? :-) ) 


दूरचे प्रवास, संशोधन, भाग्योदय आदि गोष्टींशी, भाग्यस्थान निगडीत असल्याने, ह्या चंद्रकेंद्रीत कुंडलीतील पृथ्वीची स्थिती, फलिताशी संबंधित तर्काला धरून आहे. 

थोडक्यात ह्या चंद्रकेंद्रीत कुंडलीची साक्ष काढत, मानवी चंद्रावतरणामुळे चंद्राचे भाग्यच उजळले असेही आपण म्हणू शकतो  :-) 


Stellarium मध्ये पृथ्वी पश्चिम आकाशात थोडी उंचावर दिसते. Search Window हा Menu वापरुन व त्यात 'Earth' लिहून व शोधून तुम्ही खात्री करून घेऊ शकता.

तिथे पृथ्वीचे Ecliptic Longitude, ८॰ १०' २५" दाखविले आहे. 

म्हणजेच ८॰ १०' २५" - २३॰ २४' ५९.०४"  = ३४४॰  ४५' २५.९६"  

म्हणजेच पृथ्वी मीन १४॰ ४५' २५.९६" 

हे अंश वरील चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या नवमस्थानातील पृथ्वीच्या भोगाशी (मीन १४॰ २७' ४६") बरेचसे जुळतात. जो १७/१८ कलांचा जो फरक पडत आहे, तो चंद्राचे कक्षाप्रतल व पृथ्वीचे कक्षाप्रतल, पराशय, दोन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधील गणितातील फरक आदि सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे असे म्हणता येईल. 

(पृथ्वीभ्रमण करत असताना, चंद्र हा अप्रत्यक्षपणे सूर्यभ्रमण देखील करत असतो आणि त्यावेळेस सूर्यमालेच्या प्रतलाचे शीर्षदृष्य (Top View) बघितले असता चंद्रकक्षा कशी दिसेल, ते सोबतच्या एका चित्रात (NOT TO SCALE) दाखविले आहे.) 



अर्थात चंद्राच्या पृथ्वीभ्रमणामुळे तयार होणारी ती नक्षी, इतकी मोठी अजिबात नसेल.


तसेच सूर्यावर क्लिक केल्यास, 

सूर्याचे Ecliptic Longitude, ११८॰ ११' ५७" दाखविले आहे हे दिसेल. 

म्हणजेच ११८॰ ११' ५७" - २३॰ २४' ५९.०४"  = ९४॰  ४६' ५७.९६"  

अर्थात सूर्य कर्क ४॰ ४६' ५७.९६"  

हे अंश वरील चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या रवि भोगाशी (कर्क ४॰ २९' ५८.७९) बरेचसे जुळतात. जो साधारण १७ कलांचा जो फरक पडत आहे, तो चंद्राचे कक्षाप्रतल व पृथ्वीचे कक्षाप्रतल, पराशय, दोन वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमधील गणितातील फरक आदि सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे असे म्हणता येईल. 


ह्याच पद्धतीने इतर ग्रहांचे भोग देखील काढता येतील. 


====


ह्याच पद्धतीने अपोलो १७ ची चंद्रावतरणाची  [११ डिसेंबर १९७२ १९:५४:५७ UTC  (अर्थात फ्लोरिडा वेळेनुसार  १४:५४:५७ EDT)]   

चंद्रकेंद्रीत कुंडली मांडल्यास, त्यातील लग्न वृश्चिक २१॰ ४९' ३" येते. 

तसेच ह्या पत्रिकेत पृथ्वी सिंह ३॰ १४' १०.४८" येते, म्हणजे इथेही पृथ्वी भाग्यस्थानात येते. 


====


थोडक्यात Stellarium हे सॉफ्टवेअर वापरून, थोडे अधिक कष्ट घेऊन, चंद्रकेंद्रीत कुंडली मांडणे शक्य आहे आणि ती निदान ग्रहसाधनदृष्ट्या बर्‍यापैकी योग्य आहे, असे म्हणायला हरकत नसावी.  

अशा आणखी चंद्रकेंद्रीत कुंडलींचा अभ्यास केल्यानंतर फलिताच्या संदर्भातही पुष्टी देणे व कालांतराने पृथ्वीचे 'फळ', राशी, नक्षत्र स्वामित्व निश्चित करणे शक्य व्हावे. 


====


पृथ्वीबाह्य कुंडलीसंदर्भातील इतर काही गोष्टींवर एक दृष्टिक्षेप पुढल्या भागात. 


====


==========

थोडेसे अवांतर

==========

अपोलो - ११  जिथे व जेंव्हा उतरले होते त्यावेळेस चंद्रावर उतरले त्यावेळेस  Stellarium ह्या सॉफ्टवेअरमधील चित्र कसे तयार केले ? 


Stellarium Software सुरू करून, सर्वप्रथम त्यातील वेळ पुढे सरकणे थांबविण्यासाठी तळाच्या पर्यायांमधून त्यातील 'Play' चे बटन क्लिक केले. त्यामुळे तिथे पॉझ  ( || ) चे बटन दिसू लागते. 

माझ्याकडील Stellarium मध्ये मुंबई हे Default Location आहे, त्यामुळे सर्वप्रथम चंद्रावतरणाची मुंबईनुसार दिनांक व वेळ (२१ जुलै १९६९ ०१:४७:४०), Date/Time Window ह्या पर्यायातून  मी Stellarium मध्ये नोंदविली. 

त्यानंतर मी लोकेशनच्या पर्यायांमध्ये जाऊन, 'Planet' ह्या dropdown मधून, पृथ्वीऐवजी चंद्र हा ग्रह घेतला. 

तत्क्षणी वेळ बदलून ०१:४७:४० ऐवजी ०१:४८:१९ अशी झाली.  (क्रांतीवृत्त व चंद्राच्या सूर्याभोवतीच्या अप्रत्यक्ष भ्रमणामुळे निर्माण होणारे वृत्त ह्यातील अंतरामुळे, पराशयामुळे हा फरक पडत असावा असा माझा अंदाज आहे) 


त्यानंतर स्थानांची यादी बदलली व चंद्रावरची स्थाने उपलब्ध झाली, त्यातून मी Apollo 11 चे स्थान निवडले. 

त्या स्थानाचे ह्या सॉफ्टवेअरमधील चांद्र-अक्षांश व चांद्र-रेखांश व विकिपीडियाच्या Apollo 11 च्या पानावरील चंद्रावरील अवतरणाचे चांद्र-अक्षांश व चांद्र-रेखांश थोडेसे वेगळे असल्याने, Stellarium मध्ये ते स्थान अंशत: बदलून, मी Apollo 11 Exact Landing ह्या नावाने नवीन स्थान तयार केले. 


सर्वात शेवटी 'Sky and Viewing Option' मधील 'Landscape' ह्या पर्यायात जाऊन, पृथ्वीवरचा Landscape बदलून चंद्रावरचा Landscape घेतला (अर्थात हा केवळ कॉस्मेटिक बदल आहे, त्यामुळे तुम्ही 'Zero Location' हा Landscape देखील वापरू शकता) 


=======

क्रमश: 

=======


सोमवार, १४ डिसेंबर, २०२०

पृथ्वीबाह्य कुंडली आणि शक्यता - भाग ३

 


चंद्राचा अधिकतम ५९% भाग पृथ्वीवरून दिसू शकेल ह्याचाच दुसरा अर्थ असा की चंद्राचा किमान ४१% भाग असा आहे जिथून पृथ्वी कधीच दिसत नाही. 


म्हणजेच चंद्राच्या त्या ४१% भागाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, तिथल्या चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या अनुदित भागातच पृथ्वी असू शकते. 

अर्थात त्या ४१% भागातील चंद्रकेंद्रीत कुंडलींमध्ये, पृथ्वी केवळ लग्न ते षष्ठ ह्या सहा भावांमध्ये असू शकते. 

(पण हे देखील पूर्णांशाने सत्य नाही, शिवाय ही गोष्ट फलितदृष्ट्या देखील विलक्षण ठरू शकेल. कसे ते नंतर पाहूच.)


वरील ४१% च्या संदर्भातील विधानाचा व्यत्यास मात्र पूर्ण सत्य नाही. म्हणजे पृथ्वीवर दिसणार्‍या ५९॰ भागात पृथ्वी सतत दिसत राहील, अर्थात सतत उदित भागातच राहील असे नव्हे. 

त्या ५९% भागातील काही स्थानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पृथ्वीचे भ्रमण दिसेल. 


स्वाभाविकच पृथ्वीवर चंद्र (ढोबळमानाने) पूर्वेकडे उगवतो व आकाशातून प्रवास करत (ढोबळमानाने) पश्चिमेला मावळतो. पण चंद्राच्या आकाशात पृथ्वीचे भ्रमण अशा पद्धतीने घडू शकत नाही. 


----


चंद्रावरील काही स्थानांवर पृथ्वी कधीच उगवणार नाही वा कधीच मावळणार नाही. ती एका ठराविक विभागातून मागे पुढे भ्रमण करत राहील. (सोबत जोडलेले चित्र पाहा. )



अर्थातच चंद्रावरील अशा स्थानी, चंद्रकेंद्रीत कुंडलीत पृथ्वी ठराविक भावांमधूनच भ्रमण करेल व नंतर त्या भावांमध्ये पुन्हा मागे फिरेल. 


Stellarium (http://stellarium.org/) नावाचे एक open source software आहे. ह्या सॉफ्टवेअरमध्ये असे भ्रमण पाहता येते. 


अर्थात ह्या भ्रमणादरम्यान भावातील राशी मात्र बदलत राहतील. 

थोडक्यात चंद्रावरील काही स्थानांवर जन्मलेल्या व्यक्तींच्या कुंडलीत पृथ्वी केवळ त्या ठराविक भावातच असू शकेल. 


----


पृथ्वीच्या (सूर्याभोवतीच्या) परिभ्रमण प्रतलाशी, चंद्राच्या (पृथ्वीभोवतीच्या) परिभ्रमाणाचे प्रतल साधारण ५॰ चा कोन करते.   (अचूक सांगायचे झाले तर ५॰ ९'). 

ह्यामुळे चंद्रावरच्या ध्रुवप्रदेशातील काही स्थानांवर, काही काळासाठी पृथ्वी मावळल्याचे व नंतर काही दिवसांनी पुन्हा उगवल्याचे दिसेल. (सोबत जोडलेले चित्र पाहा. )


----


त्या ५९% पैकी बहुसंख्य चंद्रस्थानांवर पृथ्वी आकाशाच्या एका विशिष्ट भागात खिळल्यासारखी दिसेल. 


म्हणजे पृथ्वीचे परिवलन होत असल्याने, पृथ्वीवरचे विविध खंड समोर येताना व जाताना दिसतील, 

पृथ्वीच्या कला देखील दिसतील,

पृथ्वी ज्या ठिकाणी खिळलेली आहे, तिथल्या राशी, नक्षत्रे सरकताना देखील दिसतील, पण पृथ्वी सदैव एकाच भावात असलेली दिसेल.  


कल्पना करा, चंद्रावरील एका विवक्षित स्थानावरील प्रत्येक चंद्रकेंद्रीत पत्रिकेत पृथ्वी अष्टमस्थानात असेल तर ?!


----


चंद्रावर होणारी / दिसणारी सूर्यग्रहणे हा देखील चंद्रकेंद्रीत कुंडलींच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग. 


ज्या वेळी पृथ्वीवर चंद्रग्रहण असेल त्यावेळी, चंद्रावरील काही स्थानी पृथ्वीमुळे सूर्याला ग्रहण लागलेले दिसेल. 

(पृथ्वीवरील पौर्णिमा चंद्रावरील 'पृथ्वी-अमावास्या' आणि उलट - हे देखील केवळ त्याच भागातून त्याच भागात जिथून पृथ्वी दिसते) 


ह्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट चंद्रावरील पृथ्वीदर्शनाशी आणि चंद्रावरून दिसणार्‍या आणि पृथ्वीमुळे लागणार्‍या सूर्यग्रहणाशी निगडीत आहे. 


पृथ्वीकक्षा व चंद्रकक्षा ह्यांच्या प्रतलात असलेल्या फरकामुळे पृथ्वीवर दर अमावास्या, पोर्णिमेला ग्रहणे होत नाहीत. ह्याच कारणाने ग्रहणांचे एक चक्र असते ज्याला 'Saros cycle' अशी संज्ञा आहे. हे चक्र साधारण १८ वर्षांचे (सूर्यसापेक्ष २२३ चांद्रमास) असते (राहूची महादशा १८ वर्षे असते ह्यामागे हे कारण असावे का !?) ह्या काळात चंद्राची परिभ्रमण कक्षा ठराविक प्रकारे बदलत राहते (सोबतचे चित्र पहा)



चंद्रावरती दिसणार्‍या आणि पृथ्वीमुळे लागणार्‍या सूर्यग्रहणाला, आपण, पृथ्वीवरच्या सूर्यग्रहणासंबंधीच्या फलितांच्या चष्म्यातून पाहू शकतो का ?  अर्थातच नाही. 


----


'चंद्रकेंद्रीत कुंडलीत, पृथ्वीचे फळ / फल काय' हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 


ह्या फलनिश्चितीचा आरंभ पृथ्वीचे गुणधर्म ठरविण्यापासून होईल. 


मूळात पृथ्वीला शुभग्रह मानावे की पापग्रह ?

पृथ्वीतत्वाची मानावी की जलतत्वाची ?

ती चंद्राची जागा घेत असल्याने चंद्राचे गुणधर्म, राशी, नक्षत्र स्वामित्व, उच्चनीचत्व तिला प्रदान करावे का ?

आदि प्रश्नांपासून होईल. 


पृथ्वीला वायूमंडल आहे आणि त्यात नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्रमुख आहेत, मात्र तरीही पृथ्वी वायुरूपी नाही. ती 'Rocky Planets' ('खडकाळ ग्रह') ह्या वर्गात मोडते, त्यामुळे पृथ्वीला वायुतत्वाची मानण्याचे कारण दिसत नाही. 

मात्र पृथ्वीचा ७१% पृष्ठभाग जलमय आहे, 

भूस्तरात (Crust) असलेल्या मूलद्रव्यात सर्वाधिक प्रमाण ऑक्सिजनचे आणि मग सिलिकॉनचे आहे.

प्रावरणात (Mantle) असलेल्या मूलद्रव्यात सर्वाधिक प्रमाण ऑक्सिजनचे ,मग मॅग्नीशियमचे आणि तदनंतर सिलिकॉनचे आहे.

अंतर्भागात (Core) मध्ये सर्वाधिक प्रमाण अर्थातच लोहाचे आणि मग निकेलचे आहे आणि त्यातही वितळलेल्या लोहाचे प्रमाण प्रचंड आहे. 

जर सर्व घटकांचा एकत्रितपणे विचार केला, तर प्रामुख्याने आणि उतरत्या क्रमाने लोह, ऑक्सिजन, सिलिकॉन आणि मॅग्नीशियम ह्या घटकांपासून पृथ्वी बनली आहे. 


पण तरीही पृथ्वीवर द्रवस्वरूपात असलेले पदार्थ फार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे पृथ्वी जलतत्वप्रधान मानावी का ? 

चंद्रावर फार मोठ्या प्रमाणात पाणी नसूनही आपण चंद्राला जलतत्व प्रधान का मानतो ? हा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होतो. 


दुसरी गोष्ट आहे की मानव पृथ्वीकडे कशा दृष्टीने पाहतो ? 

मानवासाठी ती 'धरतीमाता' आहे. ती आपले पोट भरते. हे गुण कर्क राशीशी बर्‍यापैकी जुळतात. मानवासाठी ती समृद्धी आहे. 

त्याचवेळी अनेकदा ती कोपताना देखील दिसते. भयंकर नैसर्गिक संकटे निर्माण करते. हानी करते. हे गुण भावनाप्रधान कर्केशी जमत नाहीत. 

मात्र नैसर्गिक चतुर्थ भावाशी जमतात. 


रोहिणी नक्षत्राचे अनेक गुण फलितदृष्ट्या पृथ्वीला जोडले जाऊ शकतात असे मला वाटते. त्या तुलनेत श्रवण आणि हस्त नक्षत्रांचे गुण उतरत्या क्रमाने पृथ्वीशी जुळतील असे प्रथमदर्शनी दिसते. तरीही कालांतराने अनुभवातून जे निष्कर्ष निघतील ते अधिक योग्य ठरतील. 


थोडक्यात गुणनिश्चितीचा आरंभ करताना राशीचक्र, नक्षत्रचक्र जसेच्या तसे ठेवून,

कर्क राशीची स्वामीनी पृथ्वी 

तसेच रोहिणी, हस्त आणि श्रावण नक्षत्रांची स्वामीनी पृथ्वी 

असा विचार करून कालांतराने अनुभवानुसार त्यात बदल करत जाणे इष्ट ठरेल. 

(तसेही दुसरा पर्याय काय आहे म्हणा ? :-))


----


भाकीतांसाठी कालनिर्णयाचा सर्वात प्रचलित मार्ग आहे दशा. 

त्यातही विंशोत्तरी दशा सर्वाधिक वापरल्या जातात. त्यांच्या निश्चितीसाठी आपण चंद्राचा भोग बीज म्हणून वापरतो. 

पण चंद्रकेंद्रीत पत्रिकेत चंद्राला बीज म्हणून वापरता येणार नाही, मग पर्याय म्हणून आपण पृथ्वीचा भोग बीज म्हणून वापरावे का ? 


त्यात 

विशोंत्तरी महादशेतील दशांची वर्षे कशी ठरविली हे आपल्याला माहीत नसल्याने, ती वर्षे संपूर्ण सूर्यमालेस लागू आहेत 

की 

ती वर्षे केवळ पृथ्वीनिष्ठ आहेत

की

प्रत्येक ग्रहावरील / उपग्रहावरील दशांची वर्षे वेगवेगळ्या प्रकाराने निश्चित होतात 

ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील. 

 

तरीही चंद्रकेंद्रीत कुंडलीत पृथ्वीप्रमाणेच विशोंत्तरी दशेचा वापर करावयाचा झाल्यास, चंद्राची वर्षे पृथ्वीला प्रदान करून आपल्याला अभ्यासाचा आरंभ करावा लागेल आणि मग अनुभवानुसार बदल करावे लागतील. 


अन्यथा कालनिर्णयासाठी विशोंत्तरी दशेपलीकडचे इतर दशांचे पर्याय अवलंबावे लागतील. 



----


पृथ्वीच्या अशाप्रकारच्या मर्यादित भ्रमणामुळे, चंद्रकेंद्रीत कुंडलीतील गोचर पृथ्वीला सुद्धा मर्यादा असणार आहेत.  

चंद्रावरील प्रत्येक स्थानावर, चंद्रकेंद्रीत कुंडलीत ज्या भावात पृथ्वी असू शकते, त्याच भावातून पृथ्वीचे गोचर भ्रमण होणार आहे. 


म्हणजे चंद्रावरील जन्मलेल्या आणि राहणार्‍या व्यक्तींना, आपल्या चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या एखाद्या वेगळ्या भावातून पृथ्वीभ्रमण व्हावे असे वाटत असेल, 

तर त्यांना चंद्रपर्यटन करण्यावाचून पर्याय नसेल !  :-) 


----


ह्या व्यतिरिक्त 

चंद्रावरील भूप्रदेशांची विभागणी, 

Timezones, 

स्थानिक वेळ, 

चांद्रविवरातील वा लाव्हानलिकांमधील संभाव्य वस्ती व त्यामुळे गणितात पडणारा फरक, 

चंद्रावर पृथ्वीवरील घड्याळाचा वापर करावा की चंद्रावर स्वतंत्र कालनिर्णय व्यवस्था निर्माण करावी 

आदि गोष्टींचा निर्णय आणखीनच गुंतागुंतीचा भाग असेल. 


----


पृथ्वीवरील ज्योतिषगणित आणि तत्संबंधाने फलज्योतिष निर्माण होण्यामागे आणि हळूहळू विकसित होत जाण्यामागे किती परिश्रम आहेत, हे ह्या निमित्ताने काहीजणांना कळेल आणि काहीजणांच्या नव्याने लक्षात येईल. 


----


चांद्रवसाहती हा फार दूरचा विचार नाही हे पुढील लेख वाचल्यास स्पष्ट होईल.


https://astronomy.com/news/2019/05/moon-village-humanitys-first-step-toward-a-lunar-colony


----


पुढील भागात ह्याच विषयासंबंधाने आणखी काही. 


=======

क्रमश: 

=======


रविवार, १३ डिसेंबर, २०२०

पृथ्वीबाह्य कुंडली आणि शक्यता - भाग २

 

पृथ्वीवर मांडलेल्या कोणत्याही कुंडलीत पृथ्वी कुठे असते ? 

ढोबळमानाने विचार करायचा झाल्यास, ती कुंडली पृथ्वीकेंद्रीत असल्याने, आपण जी चौकटीची कुंडली मांडतो, त्याच्या मध्यबिंदूवर पृथ्वी असते. 


अर्थात भविष्यात जेंव्हा चंद्रावर जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीची कुंडली मांडण्याची वेळ येईल, तेंव्हा त्या चौकटीच्या कुंडलीच्या मध्यभागी चंद्र असायला हवा.

म्हणजेच चंद्रावर जन्मलेल्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्वात ठळक गोष्ट कोणती असा प्रश्न विचारल्यास त्याचे उत्तर, 

'त्या चंद्रकेंद्रीत कुंडलीत चंद्र नसेल, पण पृथ्वी असेल !' हेच असायला हवे. 


स्वाभाविकच चंद्रावरच्या ग्रहसाधनात चंद्राच्या जागी पृथ्वीचा समावेश होईल. 


बाकी ग्रहसाधन मात्र बरेचसे तसेच राहील, अर्थात विविध ग्रहांच्या भोगामध्ये, स्वाभाविकपणे थोडा फरक असेल. आणि ह्याचे कारण अर्थातच चंद्र व पृथ्वीतील अंतराने निर्मिलेला पराशय.  

ह्या पराशयामुळे सूर्य, बुध, शुक्र व मंगळासाठी काही कलांचा व इतर ग्रहांसाठी काही विकलांचा फरक असेल.  

हेच तर्कशास्त्र मर्यादित प्रमाणात शर / क्रांती ह्यांनादेखील लागू व्हावे. 


----


सर्वात कळीचा प्रश्न अर्थातच हा असेल की, चंद्रकेंद्रीत कुंडलीत पृथ्वीचे अंश कसे मोजले जातील ? 


ह्या प्रश्नाचे उत्तर तसे म्हटले तर सोपे आहे, म्हटले तर थोडे कठीण. का ते बघूया.  


पृथ्वीकेंद्रीत कुंडलीत चंद्राचे स्थान कसे ठरविले जाते ? 

अर्थात पृथ्वीवरून चंद्र ज्या राशीत, नक्षत्रात दिसत आहे, तेथील अंश, कला, विकलांची निश्चिती करून. 


थोडक्यात पृथ्वीमध्यावरून चंद्रमध्यापर्यंत एक काल्पनिक अक्ष रेखाटून हा अक्ष खगोलात वाढविला असता तो क्रांतीवृत्ताच्या ज्या बिंदूशी निगडीत होईल त्या बिंदूच्या भोगावरून. 


अर्थात चंद्राकडून पृथ्वीचे स्थान पाहताना ह्याच अक्षावरून उलट दिशेस बघावे लागेल असे आपण म्हणू शकतो. 

म्हणजेच तर्कदृष्टीने विचार केल्यास, एकाच वेळी पृथ्वी व चंद्रावरच्या पत्रिका मांडल्यास, पृथ्वीकेंद्रीत पत्रिकेतील चंद्राच्या भोगात १८०॰ मिळवल्यास (व ही बेरीज ३६०॰ पेक्षा अधिक झाल्यास त्यातून ३६०॰ वजा केल्यावर) जे उत्तर येईल ते चंद्रकेंद्रीत कुंडलीतील पृथ्वीचे स्थान असेल. 


थोडक्यात पृथ्वीकेंद्रीत पत्रिकेत, चंद्र वृषभ १५॰ ०८' ४७" असल्यास;

त्याचवेळेच्या चंद्रकेंद्रीत पत्रिकेत, पृथ्वी वृश्चिक १५॰ ०८' ४७" असायला हवी. 

पण हे इतके अचूकपणे सारखे नसेल. 


चंद्र व पृथ्वी ह्यांच्यादरम्यानच्या अंतरानुसार, चंद्रबिंबाचा पृथ्वीवरून दिसणारा व्यास, न्यूनतम २९' २०" ते अधिकतम ३४' ०६" इतका असतो. 

तर पृथ्वी व चंद्र ह्यांच्यादरम्यानच्या अंतरानुसार, पृथ्वीबिंबाचा चंद्रावरून दिसणारा व्यास १॰ ४८' ०८" ते अधिकतम २॰ ०१' २८" इतका असतो. 


पृथ्वीवरील दोन भिन्न स्थानांवरून, चंद्राचे निरीक्षण केले असता पराशयामुळे, चंद्राच्या क्रांतीवृत्तावरील भासमान स्थानात पडणारा फरक, ०॰ ५४' ते ०१॰ ०१' २४" ह्या सीमेत असतो. 

म्हणजेच जर चंद्रबिंबाची कड लक्षात घेतली, तर पृथ्वीवरील भिन्न स्थानांवरून दिसणार्‍या, चंद्राच्या स्थानातील (पर्यायाने भोगातील) साधारण दीड अंशापर्यंत फरक आपण दुर्लक्षित करत असतो. 

(पृथ्वीवरील चार स्थानांवरून एकाच वेळी चंद्राचे प्रत्यक्ष निरीक्षण केले असता दिसणारा फरक सोबत जोडलेल्या चित्रात पाहा.)



 

क्रांतीवृत्तावरील चंद्राच्या भासमान स्थानात चंद्राच्या पराशयामुळे पडणारा हा फरक, ग्रहसाधन सोयीचे जावे व सुलभ असावे ह्यासाठी आपण दुर्लक्षित करतो.

आणि 

जणू काही चंद्राचे निरीक्षण पृथ्वीच्या मध्यबिंदूवरून करत आहोत, असे गृहीत धरूनच चंद्राचे अंशात्मक गणित केले जाते.   (सोबतचे चित्र पाहा.)




फलितदृष्ट्यादेखील चंद्राचा मध्यबिंदू कुठल्या राशीत आहे, त्यावरून आपण फलितकथन करत असतो. म्हणजे चंद्र कर्क २९॰ ४५' असेल तर हे सहज शक्य आहे की,

पृथ्वीवरच्या एखाद्या स्थानावर 'दिसणारा' चंद्र हा प्रत्यक्षात सिंहेच्या पहिल्या अंशात आहे. 


पण चंद्रावरील एफिमेरीज तयार करताना, पृथ्वीबिंबाचा व्यास लक्षात घेता, चंद्रावरील भिन्न स्थानांशी संबंधित पराशयामुळे पडणारा फरक हा जवळजवळ ३॰ पर्यंत जाऊ शकेल.  

हा संभाव्य ३॰ चा फरक दुर्लक्षित करून, चंद्राच्या मध्यभागावरून, निरीक्षण होत आहे असे मानून चंद्रावरील पृथ्वीच्या मध्यभागाचे गणित केले तर चालेल का ? किंबहुना फलितदृष्ट्या ते अचूक असेल का ? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधावे लागेल. 


----


पण तरीही वरील मुद्द्यापेक्षाही अधिक महत्त्वाचा मुद्दा ठरेल चंद्राचे परिवलन व परिभ्रमण. 


चंद्राचा परिभ्रमण काळ, म्हणजेच पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी चंद्राला लागणारा वेळ हा साधारण २७ दिवस ७ तास ४३ मिनिटे आहे. म्हणजेच साधारण पृथ्वीवरील २७.३२१५२८ दिवस. 

दरम्यानच्या काळात पृथ्वी तिच्या परिभ्रमण मार्गावर पुढे गेली असल्याने, पृथ्वीवरील निरीक्षकाला चंद्राचे एक पूर्ण भ्रमण २९ दिवस १२ तास ४४ मिनिटात झालेले दिसते ही वेगळी गोष्ट. 


चंद्राला परिवलनासाठी (स्वत:च्या आसाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी) साधारण तितकाच वेळ म्हणजे पृथ्वीवरचे २७.३ दिवस लागतात. (हे देखील अर्थातच निरीक्षक सापेक्ष आहे). 

हे दोन्ही काळ जवळजवळ समान असल्याने आपल्याला सदैव चंद्राची एकच बाजू दिसते. ह्याला Tidally Locked अशी संज्ञा आहे. (शब्दश: भाषांतर केल्यास ह्याचा मराठी प्रतिशब्द 'वेलाबंधित' हा असू शकेल :-) )

(वेगवेगळ्या काळात आपल्याला दिसलेल्या चंद्राच्या पृष्ठभागाचे एकत्रीकरण केल्यास ध्रुवप्रदेश व अन्य काही भागात आपल्याला चंद्राच्या एकंदर पृष्ठभागापैकी ५९% भागच दिसतो) 


वरील दोन काळांच्या समान असण्यामुळे कुंडलीच्या गणिताच्या दृष्टीकोनातून अनेक विचित्र गोष्टी चंद्रावर घडतील. 


पृथ्वीचा परिवलन काळ, २४ तास म्हणजे पृथ्वीचा एक संपूर्ण दिवस (किंवा अहोरात्र). त्यामुळे आपल्याकडे सामान्यत: १२ तासाचा दिवस, १२ तासांची रात्र अशी ढोबळमानाने विभागणी आहे. 

ढोबळमानाने चंद्रावरती हीच विभागणी पृथ्वीवरच्या १३.६५ दिवसांचा एक चांद्रदिवस व पृथ्वीवरच्या १३.६५ दिवसांची एक चांद्ररात्र अशी होईल. 

(पृथ्वीवरील ध्रुवप्रदेशामुळे सहा महिने दिवस व सहा महिने रात्र ह्या चमत्कारिक गोष्टीशी आपण परिचित आहोतच, 

त्याच धर्तीवर चंद्रावर साधारण १४ दिवस सलग सूर्यदर्शन होत राहील आणि नंतरचे १४ दिवस सूर्य क्षितिजाच्या खाली असेल) 


हाच तर्क पुढे नेल्यास राशीचक्राला पृथ्वीवर एक आवर्तन पूर्ण करण्यासाठी जिथे केवळ २४ तास लागतात, त्याच राशीचक्राचे चंद्रावरील एक आवर्तन साधारण २७.३ दिवसात पूर्ण होईल. 

म्हणजेच सरासरीने विचार केल्या पृथ्वीकेंद्रित कुंडलीत एक लग्न साधारण २ तास टिकते, तिथे चंद्रकेंद्रीत कुंडलीतील एक लग्न २.२७५ (पृथ्वी-)दिवस टिकेल !

म्हणजेच सलग २ दिवसापेक्षाही अधिक काळात, चंद्रावर जन्मलेल्या व्यक्तींच्या कुंडलीत तेच लग्न असेल. 

किंवा अधिक खोलात जाऊन विचार केल्यास ढोबळमानाने सलग ६ तासांपेक्षाही अधिक काळ, चंद्रावरती एकच नवमांश लग्नी असेल. 


चंद्रकेंद्रीत कुंडलीसंबंधाने काही शक्यतांचा / तथ्यांचा अधिक ऊहापोह पुढील भागात.


----


=======

क्रमश: 

=======


पृथ्वीबाह्य कुंडली आणि शक्यता - भाग १

 

लेखाचे नाव वाचून काहीजणांना 'आता हे काय नवीन ?' असे वाटण्याची शक्यता आहे. पण पृथ्वीबाह्य कुंडली मांडण्याची आवश्यकता आणि त्यासाठी 'विविध ठिकाणी' आवश्यक असलेल्या गणिताचा पाया रचणे ही आता अतिदूरच्या भविष्यातील कल्पना राहिलेली नाही. 


वरील लेखात 'शक्यता' असा उल्लेख आहे, कारण ग्रहसाधन ह्या विषयात मी तज्ज्ञ नाही. ह्या लेखमालेतील बरेचसे लिखाण मी वेळोवेळी केलेल्या वाचनातून व काही प्रमाणात मानसचित्रणातून (Visualisation) आले आहे. 

ह्या लेखांमध्ये गणितदृष्ट्या, तपशीलदृष्ट्या वा तर्कदृष्ट्या कोणतीही चूक आढळल्यास अवश्य निदर्शनास आणावी. 


---- 


स्पुटनिक - १ ह्या मानवनिर्मित उपग्रहाची निर्मिती व प्रक्षेपण करून (४ ऑक्टोबर १९५७)  रशियाने अर्वाचीन काळातील अंतराळयुगाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला, त्याला आता ६० पेक्षा अधिक वर्षे होऊन गेली. त्यानंतरच्या काळात अवकाशसंशोधनात  बर्‍याच वेगाने प्रगती झाली. निकटच्या भविष्यात एखाद्या उपग्रहावर / ग्रहावर मानवी वस्ती प्रत्यक्षात येईल, हे आता दिवास्वप्न राहिलेले नाही. अवकाशस्थानकांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करून पृथ्वीवर परत येणार्‍या अनेक अंतराळवीरांनी, परग्रहावरील दीर्घकाळ वास्तव्य, कदाचित तिथे कायमस्वरूपी वस्ती होणे अशक्य नाही, ह्याची दृष्टी आपल्याला दिली आहे. 


अंतराळयुगाची वेगाने होणारी ही प्रगती, ज्योतिष गणितासाठी आणि पर्यायाने फलज्योतिषासाठी नवनवीन आव्हाने निर्माण करणार आहे. 


ही आव्हाने साधारण कशी असतील त्याचा एक आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण तत्पूर्वी पृथ्वीवरील भावसाधनाच्या बहुमान्य पद्धतीतील त्रुटींवर एक दृष्टिक्षेप. 


टीप : कदाचित सध्या अस्तित्वात आणि वापरात असलेले एखादे सॉफ्टवेअर पृथ्वीबाह्य कुंडलीची शक्यता विचारात घेतही असेल, पण मला त्याबद्दल माहिती नाही. ही पोस्ट वाचणार्‍या कुणालाही, त्यासंबंधाने माहिती असल्यास टिप्पणीच्या माध्यमातून अवश्य नोंदवावी. 


----


कोणत्याही दिनांकाची व वेळेची पृथ्वीवरची कुंडली मांडण्याचे आपले गणित बर्‍यापैकी विकसित झाले आहे, पण ते सर्व स्थानांसाठी अचूक नाही किंबहुना नसावे असा एक समज रूढ आहे आणि त्याला तशीच काही कारणे आहेत. 


पृथ्वीनिष्ठ ग्रहसाधन हा आपल्यासाठी फारसा कठीण विषय राहिलेला नाही, आणि त्यात दिवसेंदिवस अधिकाधिक अचूकता येत आहे. आज आपण प्रामुख्याने ठराविक ग्रहांचाच विचार करत असलो आणि कुंडलीचे गणित करून देणारी बहुसंख्य सॉफ्टवेअर्स ही त्या ग्रहसाधनापुरती मर्यादित असली तरीही संशोधनासाठी आवश्यकता भासल्यास काही उपग्रह, मोठे लघुग्रह, प्लुटोसारखे अनेक बटूग्रह इतकेच काय धूमकेतूचे गणितही थोडे अधिक कष्ट घेतल्यास करता येईल आणि त्यांना कुंडलीत मांडता येईल अशी साधने उपलब्ध आहेत. 


पण आजही भावसाधन हा भाग काहीसा अडचणीचाच आहे. भावसाधनाच्या अनेक पद्धती आणि बहुमान्य पद्धतींमध्ये असलेल्या किंवा किमान आपल्याला जाणविणार्‍या त्रुटी, हा पृथ्वीवरील काही स्थानांवर मांडाव्या लागणार्‍या कुंडलीच्या भावसाधनासाठी साठी आजही काहीसा अनिश्चित असलेला भाग आहे. 


उदा बहुमान्य असलेल्या पद्धतींपैकी एक  Placidus System मध्ये ध्रुवप्रदेशातील कुंडली मांडताना (अक्षांश ६६॰ ३४' उत्तर ते उत्तरध्रुव [९०॰] अथवा अक्षांश ६६॰ ३४' दक्षिण ते दक्षिण ध्रुव) भावसाधनाच्या दृष्टिकोनातून अनेक विचित्र कुंडली(/ल्या) संभवतात. काही ठराविक दिवशी, काही राशींचे काही अंश, लग्नबिंदूवर संभवतच नाहीत ही गोष्ट विलक्षण असली तरी सत्य आहे. 

अर्थात काही सॉफ्टवेअर्स त्यातूनही मार्ग काढत असतील, ही शक्यता मान्य करूनही काही न पटणार्‍या गोष्टी शेष राहतातच. 


----



उदाहरणार्थ तुम्ही जर Placidus System वापरत असाल तर तुमच्याकडच्या सॉफ्टवेअरमध्ये, एका व्यक्तीची ही कुंडली मांडून बघा (कुंडली सोबत जोडली आहे).सोबतच्या चित्रातील ह्या कुंडलीचे भावसाधन पाहा.  

४ फेब्रुवारी १९६५  Vadsø, Norway. 

अनुमानित वेळ  १०:१३


लग्न मकर ७॰ ४६'

धन मीन ७॰ २६'

सहज वृषभ ७॰ ७'

गृह कर्क ६॰ ४८'

सुत कर्क ७॰ ७'

रिपु कर्क ७॰ २७'

अर्थात सप्तम कर्क ७॰ ४६'

 

म्हणजेच चतुर्थ भावापासून सप्तम भावापर्यंत चार भावांचा स्वामी चंद्र आहे, स्वाभाविकच कर्म, लाभ, व्यय आणि लग्नस्थानाचा स्वामी शनि आहे. 

चतुर्थभाव, पंचमभाव व षष्ठभाव ह्यांचा विस्तार प्रत्येकी एक अंशापेक्षाही कमी आहे !

आरंभबिंदूचा विचार करता कुंभ, मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि धनु राशी भावात पूर्णपणे सामावल्यामुळे गडप झाल्यासारख्या आहेत. 


----


मी जगन्नाथ होरा हे सॉफ्टवेअर वापरतो. आणि त्यात केवळ चार मिनिटे ही कुंडली पुढे सरकवली की चक्क कर्क लग्न येते !

इतकेच नाही तर लग्नबिंदू आणि चतुर्थबिंदू ह्यांची युती होते !!


तसेच तासातासाने कुंडली पुढे सरकवून बघितल्यास अनेक गमतीजमती दिसतील. किंबहुना एक मिनिटाचा टप्पा मानून कुंडली पूर्ण दिवस जरी पुढे सरकवत नेली, तरीही  काही राशी लग्नस्थानी कधीच येत नाही आहेत हे दृष्टीस पडेल. 

शिवाय काही वेळा लग्नबिंदू पुढे न जाता, मागे सरकत आहे हे देखील लक्षात येईल !!!


ध्रुवप्रदेशातील सूर्यभ्रमण विचित्र असते हे आपल्या सर्वांना माहीतच असते, पण बहुमान्य असणार्‍या Placidus System ह्या भावपद्धतीचे ध्रुवप्रदेशातील भावसाधन इतके चमत्कारिक असेल, ह्या गोष्टीची अनेकांना कल्पना नसते. 


ध्रुवप्रदेशात ही पद्धत न वापरता Polich / Page Topocentric पद्धत वापरावी असा मध्यममार्ग स्वीकारल्यास, अन्य काही अडचणी दिसतील.


इथे अन्य भावसाधन पद्धती देखील फारसा दिलासा देत नाहीत.  शेवटचा पर्याय म्हणून Equal Houses चा पर्याय स्वीकारावा लागेल. 


ह्या सर्वातून गणिताचे तात्कालिक समाधान होत असेल, स्वत:च्या मनाची समजूतही घालता येईल; 

पण 'असे का ? किंवा आपली भावसाधन पद्धती परिपूर्ण का नाही आणि तरीही आपण ती तशीच का वापरतो ' 

ह्या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांना तर्कशुद्धतेची कठोर कसोटी कदापीही लावता येणार नाही. 


----


भविष्यात चंद्रावर जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीची कुंडली मांडण्याचा प्रसंग येईल तेंव्हा अशाच चमत्कारिक गोष्टींना आपल्याला तोंड द्यायचे आहे. त्या कोणत्या ते पुढच्या भागात. 


=======

क्रमश: 

=======


शुक्रवार, ९ ऑक्टोबर, २०२०

फलज्योतिषातील प्रचलित पृथ्वीकेंद्रित पद्धती प्रमाणे किती पत्रिका संभवतात ?

 #फलज्योतिष_गुंतागुंत


=====================================================

फलज्योतिषातील प्रचलित पृथ्वीकेंद्रित पद्धती प्रमाणे किती पत्रिका संभवतात ? 

=====================================================


:-)  **  वैधानिक सूचना : ज्यांना आकड्यांचा कंटाळा आहे त्यांनी ही पोस्ट टाळावी  **  :-) 


====


आठवलेले सर्व संभाव्य घटक विचारात घेत मी एक प्रयत्न केला आहे. 


**  ह्या प्रयत्नात, गणितात काही त्रुटी, चूक आढळल्यास अथवा मी वापरलेल्या तर्कामध्ये वा पद्धतीमध्ये काही चूक आढळल्यास अवश्य निदर्शनास आणावी.   **


(इथे  एकम, दशम, शत, सहस्र, दशसहस्र, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, मध्य, अंत्य, जलधि, परार्ध  ही अंकगणना विचारात घेतली आहे.)

(योग्य अंकगणना कोणती ह्याबद्दल मतमतांतरे आहेत ह्याची कल्पना आहे.) 


फलज्योतिषातील प्रचलित पृथ्वीकेंद्रित पद्धती प्रमाणे किती पत्रिका संभवतात ? 


ह्याचे अचूक उत्तर अनंत असे नाही, मात्र ते अगणित असेच आहे. 

आणि ते उत्तर अगणित का आहे ह्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे काळाच्या कोणत्या एककामुळे पत्रिकेत फलितदृष्ट्या सूक्ष्म का होईना फरक पडतो हे आज आपल्याला ज्ञात नाही (खरंतर ठामपणे ज्ञात नाही).


त्यामुळे गणितदृष्ट्या किती विभिन्न पत्रिका संभवतात आणि फलितदृष्ट्या किती विभिन्न पत्रिका संभवतात ह्याचे आकडे वेगवेगळे असतील आणि येतील असे माझे अनुमान आहे. 

कसे ते पुढील लेखात स्पष्ट होईल. 


--


टप्प्याटप्प्याने अंदाज बांधत गेल्यास आपल्याला काही आडाखे बांधून, त्या 'अनंताच्या' बर्‍याच अलीकडची काही एक कल्पना येऊ शकते. 


--


अत्यंत ढोबळ मानाने आरंभ केल्यास : 


A)


१२ ग्रह आणि १२ राशी असा विचार केला तर गणित फार सोपे दिसते.

पण प्रत्यक्षात असे नाही. 


राहू आणि केतू कायमच १८०॰ दूर असतात त्यामुळे ह्यापैकी एक वगळता येईल. 

त्यामुळे आता ११ ग्रह आणि १२ राशी असा विचार होतो. 

त्या व्यतिरिक्त कुंडलीसाठी 'लग्न' महत्त्वाचे असल्यामुळे पुन्हा १२ चलबिंदू (केतू व्यतिरिक्त ग्रह + लग्न) आणि १२ राशी असा विचार करायला हवा. 


पण बुध हा सूर्यापासून अधिकतम २८॰ दूर जाऊ शकतो. त्यामुळे सूर्याची रास नक्की झाल्यावर बुधाच्या संभाव्य राशी केवळ तीनच होऊ शकतात. 

तसेच शुक्र सूर्यापासून अधिकतम ४८॰ दूर जाऊ शकतो. त्यामुळे सूर्याची रास नक्की झाल्यावर शुक्राच्या संभाव्य राशी केवळ पाचच होऊ शकतात. 


तूर्तास बुध व शुक्र ह्यांना बाजूला ठेवून गणित करायचे झाल्यास : 

१२ राशी आणि १० चलबिंदू (बुध, शुक्र, केतू व्यतिरिक्त सर्व ग्रह + लग्न) असा विचार करून प्रथम गणित करायला हवे. 


१० चलबिंदू १२ राशींमध्ये किती प्रकारे ठेवले जाऊ शकतात ? 

ह्याचे उत्तर अर्थातच  १२^१०  (अर्थात १२ चा दहावा घात)  =  ६१,९१,७३,६४,२२४   अर्थात एकसष्ट अब्ज, एक्क्याण्णव कोटी, त्र्याहत्तर लक्ष, चौसष्ट सहस्र, दोनशे चौवीस. 


सूर्यसापेक्ष  बुधाच्या संभाव्य राशी अधिकतम तीनच असल्यामुळे, आता ह्यात बुधाचा समावेश केल्यास,  वरील संख्येला तीनने गुणायला हवे. 

६१,९१,७३,६४,२२४ x ३  

=  १,८,५,७५,२०,९२,६७२   

अर्थात एक निखर्व, आठ खर्व, पाच अब्ज, पंचाहत्तर कोटी, वीस लक्ष, ब्याण्णव सहस्र, सहाशे बहात्तर. 


आता ह्यात शुक्राचा समावेश केल्यास, सूर्यसापेक्ष  शुक्राच्या संभाव्य राशी अधिकतम पाच असल्यामुळे वरील संख्येला पाचने गुणायला हवे. 

१,८,५,७५,२०,९२,६७२ x ५ 

= ९,२,८,७६,०४,६३,३६० 

अर्थात नऊ निखर्व, दोन खर्व, आठ अब्ज, शहात्तर कोटी, चार लक्ष, त्रेसष्ट सहस्र, तीनशे साठ. 



हा आकडा नि:संशय प्रचंड मोठा आहे, पण प्रत्यक्षात शक्य असणार्‍या सर्व पत्रिकांच्या तुलनेत तो काहीच नाही. 

कारण इथे आपण केवळ राशीस्थिती विचारात घेतली आहे अंशात्मक स्थिती नाही. 


====


B)


राशीचक्राचे एकूण अंश ३६०. तर्कदृष्ट्या विचार केल्यास सूक्ष्मस्तरावर जाण्याचा पण तर्कदुष्ट न होण्याचा उत्तम मार्ग म्हणजे विकला स्तरावर विचार करणे.  

विकला स्तरावर विचार करायचा झाल्यास ३६० x ६० x ६० = १२,९६,००० असे बिंदू होतात, जिथे लग्न आणि ग्रह असू शकतात. 

म्हणजेच मघाशी आपण ह्या १२ राशी घेतल्या त्या ऐवजी खरंतर राशीचक्रातील विकलास्तरावरची १२,९६,००० स्थाने (बिंदू) घेतली पाहिजेत. 

तत्वत: एकाच बिंदूवर आपण विचार केलेले सर्व चलबिंदू (केतूव्यतिरिक्त सर्व ग्रह व लग्न) असू शकतात. 


१० चलबिंदू (केतू, बुध, शुक्र वगळून आणि लग्नाचा समावेश करून)  १२ राशींमध्ये किती प्रकारे ठेवले जाऊ शकतात असा विचार करण्याऐवजी 

१० चलबिंदू (केतू, बुध, शुक्र वगळून आणि लग्नाचा समावेश करून)  १२,९६,००० स्थानी किती प्रकारे ठेवले जाऊ शकतात असा विचार केला पाहिजे. 


म्हणजेच मघाशी जो १२ चा दहावा घात घेतला त्याऐवजी १२,९६,००० चा दहावा घात घेतला पाहिजे. 

१२,९६,००० ^ १०  

= १,३,३,६,७,४,९४,५३,८८,४३७,३,४,०,६,७,८,३,८,८४,५९,७६,५७६ x (१०^३०)  


अर्थात १,३,३,६,७,४,९४,५३,८८,४३७ परार्ध, ३ जलधि, ४ अंत्य, ० मध्य, ६ शंकू, ७ महापद्म, ८ निखर्व, ३ खर्व, ८ अब्ज, ८४ कोटी, ५९ लक्ष, ७६ सहस्र, पाचशे शहात्तर  x १० तीसावा घात. 


---- 


बुध हा सूर्याच्या कोणत्याही बाजूस अधिकतम २८॰ (इथे अचूकपणे कला, विकला स्तरावर न जाता, २८॰ असे approximation घेतले आहे) दूर जात असल्यामुळे, आता ह्यात बुधाचा समावेश केल्यास, दोन्ही बाजू लक्षात घेता  २८ x २ x ६० x ६० = २,०१,६०० इतकी विकलास्तरावरची बुधाची संभाव्य स्थाने होतात. 

म्हणजेच वरील संख्येला २,०१,६०० ने गुणायला हवे. 

१,३,३,६,७,४,९४,५३,८८,४३७,३,४,०,६,७,८,३,८,८४,५९,७६,५७६ x (१०^३०)   x  २,०१,६००


हा गुणाकार पुढीलप्रमाणे येतो

२,६,९,४,८,८,६,८,९,९०,३०,८९,६७८,८,०,७,६,३,१,१,३,४८,८७,७७,२१६ x (१०^३२)    


अर्थात २,६,९,४,८,८,६,८,९,९०,३०,८९,६७८ परार्ध, ८ जलधि, ० अंत्य, ७ मध्य, ६ शंकू, ३ महापद्म, १ निखर्व, १ खर्व, ३ अब्ज, ४८ कोटी, ८७ लक्ष, ७७ सहस्र, दोनशे सोळा  x १० बत्तीसावा घात. 


----


शुक्र सूर्याच्या कोणत्याही बाजूस अधिकतम ४८॰ (इथे अचूकपणे कला, विकला स्तरावर न जाता ४८॰ असे approximation घेतले आहे) दूर जात असल्यामुळे, आता ह्यात शुक्राचा समावेश केल्यास, दोन्ही बाजू लक्षात घेता  ४८ x २ x ६० x ६० = ३,४५,६०० इतकी विकलास्तरावरची शुक्राची संभाव्य स्थाने होतात. 

म्हणजेच वरील संख्येला ३,४५,६०० ने गुणायला हवे. 

२,६,९,४,८,८,६,८,९,९०,३०,८९,६७८,८,०,७,६,३,१,१,३,४८,८७,७७,२१६ x (१०^३२)   x  ३,४५,६००


हा गुणाकार पुढीलप्रमाणे येतो

९,३१३,५,२,९,१,२,३,०,५,०७,७९,२९,९५९,१,७,३,२,०,२,१,७,२१,४०,५८,४९६ x (१०^३४)


अर्थात ९,३१३,५,२,९,१,२,३,०,५,०७,७९,२९,९५९ परार्ध, १ जलधि, ७ अंत्य, ३ मध्य, २ शंकू, ० महापद्म, २ निखर्व, १ खर्व, ७ अब्ज, २१ कोटी, ४० लक्ष, ५८ सहस्र, चारशे शहाण्णव  x १० चौतीसावा घात. 


थोडक्यात विकलास्तरावर गेल्यास गणितदृष्ट्या संभावणार्‍या पत्रिकांची संख्या अतिप्रचंड अशी ७२ आकडी आहे !!!

--


=========


वरील उदाहरणात आणखी काही घटक विचारात घेणे आवश्यक आहे. 


(C)


(१) वक्री वा स्तंभी ग्रह


ह्याचे गणित होऊ शकते. 


बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्या ग्रहांचे वक्री व स्तंभी होणे लक्षात घेतल्यास  

(स्पष्ट राहू नुसार राहू मार्गी / स्तंभी होतो ते इथे विचारात घेतलेले नाही) 


एकंदर आठ ग्रह वक्री असण्याची शक्यता विचारात घ्यायला हवी. कारण फलितदृष्ट्या त्या वेगळ्या पत्रिका होतात. 

तसेच वरील आठ ग्रह पूर्णपणे स्तंभी असण्याची शक्यता विचारात घ्यायला हवी. कारण स्तंभी ग्रहामुळे त्या ग्रहाचे त्याच्या एखाद्या कारकत्वाच्या बाबतीत अत्यंत विशिष्ट, नमुनेदार फळ संभवते. 

म्हणजेच वरील आठ ग्रहांना प्रत्येक संभाव्य स्थानावर (विकलास्तरावरच्या बिंदूवर)  मार्गी, वक्री आणि पूर्णस्तंभी अशा तीन अवस्था संभवतात. 


----

**** म्हणजेच थोडा खोल विचार केल्यास सहज लक्षात येईल की वरती जे दहा चलबिंदू घेतले त्या ऐवजी ह्या आठ ग्रहांचे आणखी १६ चलबिंदू अधिक घ्यावे लागतील.  ****

मात्र बुध व शुक्र ह्यांच्याबाबत आपण वेगळा विचार करत आहोत त्यामुळे, त्यांना वगळल्यावर  १६ चलबिंदू अधिक न घेता १२ घ्यावे लागतील. 


थोडक्यात मंगळ, गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो ह्यांच्या साठी आपण ६ चलबिंदू (मार्गी) घेतले होते, त्याऐवजी त्यांच्यासाठी १८ (मार्गी, स्तंभी, वक्री) चलबिंदू घ्यावे लागतील. 

म्हणजेच घेतले त्याऐवजी मूळात धरलेल्या १० चलबिंदूत आणखी १२ चलबिंदू (बुध-शुक्राव्यतिरिक्त स्तंभी आणि वक्री ग्रह) जोडावे लागतील. 


म्हणजेच पायरी (B) मध्ये १२,९६,००० चा दहावा घात धरून सुरुवात करण्याऐवजी १२,९६,००० चा बावीसावा घात धरून सुरुवात करावी लागेल. 


१२,९६,०००^२२  

=  ३,०,०,१,३,०,४,३,२,२८,७७,७४,१८१,०,६,३,८,६,६,४,९,१७,७४,९७,६३५,६,९,०,९,०,०,०,४,३६,९०,५८,५८३,१,३,४,०,६ ९,८,२,७२,११,१०,०१६  x  (१०^६६)


म्हणजेच ३,०,०,१,३,०,४,३,२,२८,७७,७४,१८१,०,६,३,८,६,६,४,९,१७,७४,९७,६३५,६,९,०,९,०,०,०,४,३६,९०,५८,५८३ परार्ध, १ जलधि, ३ अंत्य, ४ मध्य, ० शंकू, ६ महापद्म, ९ निखर्व, ८ खर्व, २ अब्ज, ७२ कोटी, ११ लक्ष, १० सहस्र आणि सोळा  x १० चा सहासष्टावा घात. 


तसेच रविसापेक्ष स्थिती लक्षात घेऊन अनुक्रमे बुध व शुक्राच्या संभाव्य २,०१,६०० व ३,४५,६०० स्थानांच्या (केवळ मार्गी) जागी ते गुणक अनुक्रमे तिप्पट घ्यावे लागतील. 


म्हणजेच बुध व शुक्रासाठी ते गुणक अनुक्रमे ६,०४,८०० व  १०,३५,८०० असतील.


अर्थात बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो  ह्या ग्रहांच्या मार्गी, वक्री व स्तंभी ह्या तीनही गती लक्षात घेतल्यास 

३,०,०,१,३,०,४,३,२,२८,७७,७४,१८१,०,६,३,८,६,६,४,९,१७,७४,९७,६३५,६,९,०,९,०,०,०,४,३६,९०,५८,५८३,१,३,४,०,६ ९,८,२,७२,११,१०,०१६  x  (१०^६६)  

x

६,०४,८००

x

१०,३५,८००


=


१८,८०,१७,२६१,५,४,६,६,७,१,५,४,५२,३१,९५,२३२,१,२,८,६,७,७,८,८,०४,७४,२१,४००,३,६,२,६,०,४,७,८,८४,७२,१३,१००,९,९,४,४,८,७,५,७,६३,६५,६२,९४४ x (१० ^ ७०) 


म्हणजेच १८,८०,१७,२६१,५,४,६,६,७,१,५,४,५२,३१,९५,२३२,१,२,८,६,७,७,८,८,०४,७४,२१,४००,३,६,२,६,०,४,७,८,८४,७२,१३,१०० परार्ध, ९ जलधि, ९ अंत्य, ४ मध्य, ४ शंकू, ८ महापद्म, ७ निखर्व, ५ खर्व, ७ अब्ज, ६३ कोटी, ६५ लक्ष, ६२ सहस्र आणि नवशे चव्वेचाळीस  x १० चा सत्तरावा घात. 


अर्थात विकलास्तरावर (केतू वगळता) अकरा ग्रह व लग्न हे चलबिंदू तसेच त्यातील आठ ग्रहांच्या मार्गी, वक्री, स्तंभी ह्या तीनही गती लक्षात घेतल्यास संभाव्य असलेल्या पत्रिकांची एकूण संख्या ही तब्बल १४७ आकडी संख्या आहे   !!!!


----


========


(D) 


कृष्णमूर्ती पद्धतीने विचार करायचा झाल्यास आणि (केतूव्यतिरिक्त) सर्व ग्रह व लग्न ह्यांच्या संभाव्य स्थानांसाठी  उपनक्षत्रस्वामीचे क्षेत्र ही मर्यादा धरल्यास पायरी (B)  आणि पायरी (C) इथे दोन्ही ठिकाणी १२,९६,००० च्या जागी २४९ स्थाने घेऊन सुरुवात करावी लागेल. 

मात्र इथे बुध व शुक्रासाठी कोणते गुणक वापरायचे हे ठरविणे अवघड आहे.  कारण त्या सूर्यसापेक्ष (बुधाचे) २८ व (शुक्राचे) ४८ अंशात किती उपनक्षत्रस्वामींची क्षेत्रे असतील ह्याचे उत्तर प्रत्येक वेळी वेगवेगळे असेल. 


तरीही सोयीसाठी सूर्य मेष ०॰ ०' ०" धरून गणित केल्यास बुधासाठी पुढे २० व मागे १९ अशी उपनक्षत्र स्वामीची ३९ क्षेत्रे येतात. 

तसेच शुक्रासाठी पुढे ३० व मागे ३५ अशी उपनक्षत्र स्वामीची ६५ क्षेत्रे येतात. 


म्हणजेच पायरी (B) मध्ये

एकूण संभाव्य पत्रिका  

(२४९ ^ १०) x ३९ x ६५   


= ९१,६२,०६७,१,६,०,६,३,३,१,८,४४,०३,१०,००१  x ३९ x ६५   


= २३,२२,५८,४०,२५२,२,०,५,१,२,२,४,६,१८,५८,५२,५३५ 


अर्थात २३,२२,५८,४०,२५२ परार्ध, २ जलधि, ० अंत्य, ५ मध्य, १ शंकू, २ महापद्म, २ निखर्व, ४ खर्व, ६ अब्ज, १८ कोटी, ५८ लक्ष, ५२ सहस्र आणि पाचशे पस्तीस.


----


तसेच  पायरी (C) मध्ये

एकूण संभाव्य पत्रिका 

(२४९ ^ २२) x (३९ x ३) x (६५  x ३) 


= ५२,०,४,५,७,९,३,७,२,१४,३७,४३,२९५,४,५,३,९,९,३,०,०,२०,७३,८०,५२६,१,४,२,०,४,३,३,१,४२,०६,८२,००१   x  ११७  x  १९५


= १,१,८,७,४,२,४७,८३,७५,४५९,५०,३२,८५,७८२,८,५,०,३,४,२,३,१,३८,६७,०३,९३०,७,१,८,२,१,३,६,२,८५,९८,५२,८१५ 


अर्थात १,१,८,७,४,२,४७,८३,७५,४५९,५०,३२,८५,७८२,८,५,०,३,४,२,३,१,३८,६७,०३,९३० परार्ध, ७ जलधि, १ अंत्य, ८ मध्य, २ शंकू, १ महापद्म, ३ निखर्व, ६ खर्व, २ अब्ज, ८५ कोटी, ९८ लक्ष, ५२ सहस्र आणि आठशे पंधरा.  


थोडक्यात कृष्णमूर्ती पद्धतीतील उपनक्षत्रस्वामीची क्षेत्रे ही मर्यादा धरूनही संभाव्य पत्रिकांची संख्या आहे वर असलेले ५८ आकडी उत्तर !!


----


=============


(E)


(२) पत्रिकेचे स्थान व त्यामुळे भावबिंदूच्या आरंभ स्थानात व भावाच्या विस्तारात पडणारे अंतर व त्यामुळे भावेश व इतर बाबींमध्ये पडणारा फरक


ह्याचे गणित जवळजवळ अशक्य आहे. 


कारण ज्याप्रमाणे आपण लग्नबिंदूचा समावेश केला त्याच धर्तीवर इथे आणखी ५ भावबिंदूंचा समावेश करावा लागेल. 

मात्र ह्यातील प्रत्येक भावबिंदूला अक्षांश-रेखांशा नुसार, जन्मस्थानाशी निगडीत असलेल्या प्रमाणवेळेनुसार, ठराविक अंशांमधीलच विकलास्तरावरचे बिंदू घ्यावे लागतील. 


थोडक्यात जन्मस्थानानुसार वेगवेगळे असणारे, असे अतिशय काळजीपूर्वक करावे लागणारे, जटिल आणि तरीही अवाढव्य स्तरावर जाणारे हे गणित असेल. 


त्यामुळे वरील आकडा प्रत्यक्षात किती वाढेल हे सांगता येणार नाही. 


==============


(F) 


३) ग्रहांचा शर व त्यामुळे पडणारा फरक.  


काही ज्योतिषी फळ वर्तविताना ग्रहाची क्रांती देखील विचारात घेतात. (समक्रांती योग हा त्याचाच परिपाक आहे) त्या नुसार विचार केल्यास,

संभाव्य पत्रिकांच्या गणितदृष्ट्या काढलेल्या संख्येत फरक पडणार नाही. पण फलितदृष्ट्या फरक पडत असल्यास हा घटक महत्त्वाचा ठरतो. 


ह्याचे गणित काही प्रमाणात शक्य आहे. पण ते देखील अत्यंत जटिल आहे. कारण शर बदलेल तसा (किमान कला स्तरावर शराचा विचार)  किमान चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु व शनि ह्या सहा ग्रहांचा, स्वत:चा असा आणखी एक दोन किंवा तीन आकडी गुणक येईल. 

(इथे हर्षल, नेपच्यून आणि  प्लूटो देखील विचारात घ्यायला हवे का ?) 


तसेच कोणत्या परिस्थितीत किती अंश क्रांती गाठली जाऊ शकते, ह्या बाबतचे गणित पुरेसे स्पष्ट नाही. 


==============


(G) 


४) ग्रहांची गती


ग्रहांच्या गतीसंबंधाने मार्गी, वक्री, स्तंभी असा स्थूल विचार आपण केलाच आहे. पण इथेही केवळ ह्या तीन स्थिती विचारात गतीच्या विविध टप्प्यांचा विचार करता येईल. 

आणि हे टप्पे मंदगती ग्रहांसाठी (गुरु, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लूटो), मध्यमगती ग्रहांसाठी (मंगळ, रवि आणि शुक्र) आणि तीव्रगती ग्रहांसाठी (बुध, चंद्र) वेगवेगळे येतील. 


ह्यामुळे देखील संभाव्य पत्रिकांच्या गणितदृष्ट्या होणार्‍या संख्येत फरक पडणार नाही. पण फलितदृष्ट्या विचार करायचा झाल्यास संभाव्य पत्रिकांची संख्या महाप्रचंड असेल. 


आणि ह्याचे गणित अशक्य कोटीतलेच आहे. कारण सर्व ग्रहांना आणखी एक, एक वा दोन आकडी गुणक वाढतो. 


==============


(H)


५) ह्या व्यतिरिक्त देखील फलितदृष्ट्या काही घटक आहेत, जे पत्रिकेचा दर्जा ठरवितात.  ते विचारात घेतल्यास ही आकड्यांची गुंतागुंत प्रचंड प्रमाणात वाढेल. 


त्यात माता-पिता, जन्मस्थान (कारण देशाची, राज्याची, शहराची पार्श्वभूमी देखील बरेच काही ठरविते) आदि घटक प्रमुख आहेत. 


====


फलज्योतिषाच्या जटिलतेचा अंदाज येण्यासाठी वरील गणित व त्यातून उपजणारे आकडे उपयुक्त आहेतच, 

पण त्याचसोबत दोन व्यक्तींचे आयुष्य आणि भविष्य सारखे का नसते ह्याचा एक ढोबळ अंदाज देण्यासाठी देखील ते उपयुक्त ठरू शकतील.


====


====