लेखाचे नाव वाचून काहीजणांना 'आता हे काय नवीन ?' असे वाटण्याची शक्यता आहे. पण पृथ्वीबाह्य कुंडली मांडण्याची आवश्यकता आणि त्यासाठी 'विविध ठिकाणी' आवश्यक असलेल्या गणिताचा पाया रचणे ही आता अतिदूरच्या भविष्यातील कल्पना राहिलेली नाही.
वरील लेखात 'शक्यता' असा उल्लेख आहे, कारण ग्रहसाधन ह्या विषयात मी तज्ज्ञ नाही. ह्या लेखमालेतील बरेचसे लिखाण मी वेळोवेळी केलेल्या वाचनातून व काही प्रमाणात मानसचित्रणातून (Visualisation) आले आहे.
ह्या लेखांमध्ये गणितदृष्ट्या, तपशीलदृष्ट्या वा तर्कदृष्ट्या कोणतीही चूक आढळल्यास अवश्य निदर्शनास आणावी.
----
स्पुटनिक - १ ह्या मानवनिर्मित उपग्रहाची निर्मिती व प्रक्षेपण करून (४ ऑक्टोबर १९५७) रशियाने अर्वाचीन काळातील अंतराळयुगाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठला, त्याला आता ६० पेक्षा अधिक वर्षे होऊन गेली. त्यानंतरच्या काळात अवकाशसंशोधनात बर्याच वेगाने प्रगती झाली. निकटच्या भविष्यात एखाद्या उपग्रहावर / ग्रहावर मानवी वस्ती प्रत्यक्षात येईल, हे आता दिवास्वप्न राहिलेले नाही. अवकाशस्थानकांमध्ये दीर्घकाळ वास्तव्य करून पृथ्वीवर परत येणार्या अनेक अंतराळवीरांनी, परग्रहावरील दीर्घकाळ वास्तव्य, कदाचित तिथे कायमस्वरूपी वस्ती होणे अशक्य नाही, ह्याची दृष्टी आपल्याला दिली आहे.
अंतराळयुगाची वेगाने होणारी ही प्रगती, ज्योतिष गणितासाठी आणि पर्यायाने फलज्योतिषासाठी नवनवीन आव्हाने निर्माण करणार आहे.
ही आव्हाने साधारण कशी असतील त्याचा एक आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. पण तत्पूर्वी पृथ्वीवरील भावसाधनाच्या बहुमान्य पद्धतीतील त्रुटींवर एक दृष्टिक्षेप.
टीप : कदाचित सध्या अस्तित्वात आणि वापरात असलेले एखादे सॉफ्टवेअर पृथ्वीबाह्य कुंडलीची शक्यता विचारात घेतही असेल, पण मला त्याबद्दल माहिती नाही. ही पोस्ट वाचणार्या कुणालाही, त्यासंबंधाने माहिती असल्यास टिप्पणीच्या माध्यमातून अवश्य नोंदवावी.
----
कोणत्याही दिनांकाची व वेळेची पृथ्वीवरची कुंडली मांडण्याचे आपले गणित बर्यापैकी विकसित झाले आहे, पण ते सर्व स्थानांसाठी अचूक नाही किंबहुना नसावे असा एक समज रूढ आहे आणि त्याला तशीच काही कारणे आहेत.
पृथ्वीनिष्ठ ग्रहसाधन हा आपल्यासाठी फारसा कठीण विषय राहिलेला नाही, आणि त्यात दिवसेंदिवस अधिकाधिक अचूकता येत आहे. आज आपण प्रामुख्याने ठराविक ग्रहांचाच विचार करत असलो आणि कुंडलीचे गणित करून देणारी बहुसंख्य सॉफ्टवेअर्स ही त्या ग्रहसाधनापुरती मर्यादित असली तरीही संशोधनासाठी आवश्यकता भासल्यास काही उपग्रह, मोठे लघुग्रह, प्लुटोसारखे अनेक बटूग्रह इतकेच काय धूमकेतूचे गणितही थोडे अधिक कष्ट घेतल्यास करता येईल आणि त्यांना कुंडलीत मांडता येईल अशी साधने उपलब्ध आहेत.
पण आजही भावसाधन हा भाग काहीसा अडचणीचाच आहे. भावसाधनाच्या अनेक पद्धती आणि बहुमान्य पद्धतींमध्ये असलेल्या किंवा किमान आपल्याला जाणविणार्या त्रुटी, हा पृथ्वीवरील काही स्थानांवर मांडाव्या लागणार्या कुंडलीच्या भावसाधनासाठी साठी आजही काहीसा अनिश्चित असलेला भाग आहे.
उदा बहुमान्य असलेल्या पद्धतींपैकी एक Placidus System मध्ये ध्रुवप्रदेशातील कुंडली मांडताना (अक्षांश ६६॰ ३४' उत्तर ते उत्तरध्रुव [९०॰] अथवा अक्षांश ६६॰ ३४' दक्षिण ते दक्षिण ध्रुव) भावसाधनाच्या दृष्टिकोनातून अनेक विचित्र कुंडली(/ल्या) संभवतात. काही ठराविक दिवशी, काही राशींचे काही अंश, लग्नबिंदूवर संभवतच नाहीत ही गोष्ट विलक्षण असली तरी सत्य आहे.
अर्थात काही सॉफ्टवेअर्स त्यातूनही मार्ग काढत असतील, ही शक्यता मान्य करूनही काही न पटणार्या गोष्टी शेष राहतातच.
----
उदाहरणार्थ तुम्ही जर Placidus System वापरत असाल तर तुमच्याकडच्या सॉफ्टवेअरमध्ये, एका व्यक्तीची ही कुंडली मांडून बघा (कुंडली सोबत जोडली आहे).सोबतच्या चित्रातील ह्या कुंडलीचे भावसाधन पाहा.
४ फेब्रुवारी १९६५ Vadsø, Norway.
अनुमानित वेळ १०:१३
धन मीन ७॰ २६'
सहज वृषभ ७॰ ७'
गृह कर्क ६॰ ४८'
सुत कर्क ७॰ ७'
रिपु कर्क ७॰ २७'
अर्थात सप्तम कर्क ७॰ ४६'
म्हणजेच चतुर्थ भावापासून सप्तम भावापर्यंत चार भावांचा स्वामी चंद्र आहे, स्वाभाविकच कर्म, लाभ, व्यय आणि लग्नस्थानाचा स्वामी शनि आहे.
चतुर्थभाव, पंचमभाव व षष्ठभाव ह्यांचा विस्तार प्रत्येकी एक अंशापेक्षाही कमी आहे !
आरंभबिंदूचा विचार करता कुंभ, मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि धनु राशी भावात पूर्णपणे सामावल्यामुळे गडप झाल्यासारख्या आहेत.
----
मी जगन्नाथ होरा हे सॉफ्टवेअर वापरतो. आणि त्यात केवळ चार मिनिटे ही कुंडली पुढे सरकवली की चक्क कर्क लग्न येते !
इतकेच नाही तर लग्नबिंदू आणि चतुर्थबिंदू ह्यांची युती होते !!
तसेच तासातासाने कुंडली पुढे सरकवून बघितल्यास अनेक गमतीजमती दिसतील. किंबहुना एक मिनिटाचा टप्पा मानून कुंडली पूर्ण दिवस जरी पुढे सरकवत नेली, तरीही काही राशी लग्नस्थानी कधीच येत नाही आहेत हे दृष्टीस पडेल.
शिवाय काही वेळा लग्नबिंदू पुढे न जाता, मागे सरकत आहे हे देखील लक्षात येईल !!!
ध्रुवप्रदेशातील सूर्यभ्रमण विचित्र असते हे आपल्या सर्वांना माहीतच असते, पण बहुमान्य असणार्या Placidus System ह्या भावपद्धतीचे ध्रुवप्रदेशातील भावसाधन इतके चमत्कारिक असेल, ह्या गोष्टीची अनेकांना कल्पना नसते.
ध्रुवप्रदेशात ही पद्धत न वापरता Polich / Page Topocentric पद्धत वापरावी असा मध्यममार्ग स्वीकारल्यास, अन्य काही अडचणी दिसतील.
इथे अन्य भावसाधन पद्धती देखील फारसा दिलासा देत नाहीत. शेवटचा पर्याय म्हणून Equal Houses चा पर्याय स्वीकारावा लागेल.
ह्या सर्वातून गणिताचे तात्कालिक समाधान होत असेल, स्वत:च्या मनाची समजूतही घालता येईल;
पण 'असे का ? किंवा आपली भावसाधन पद्धती परिपूर्ण का नाही आणि तरीही आपण ती तशीच का वापरतो '
ह्या प्रश्नांच्या संभाव्य उत्तरांना तर्कशुद्धतेची कठोर कसोटी कदापीही लावता येणार नाही.
----
भविष्यात चंद्रावर जन्मलेल्या एखाद्या व्यक्तीची कुंडली मांडण्याचा प्रसंग येईल तेंव्हा अशाच चमत्कारिक गोष्टींना आपल्याला तोंड द्यायचे आहे. त्या कोणत्या ते पुढच्या भागात.
=======
क्रमश:
=======
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा