चंद्राचा अधिकतम ५९% भाग पृथ्वीवरून दिसू शकेल ह्याचाच दुसरा अर्थ असा की चंद्राचा किमान ४१% भाग असा आहे जिथून पृथ्वी कधीच दिसत नाही.
म्हणजेच चंद्राच्या त्या ४१% भागाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, तिथल्या चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या अनुदित भागातच पृथ्वी असू शकते.
अर्थात त्या ४१% भागातील चंद्रकेंद्रीत कुंडलींमध्ये, पृथ्वी केवळ लग्न ते षष्ठ ह्या सहा भावांमध्ये असू शकते.
(पण हे देखील पूर्णांशाने सत्य नाही, शिवाय ही गोष्ट फलितदृष्ट्या देखील विलक्षण ठरू शकेल. कसे ते नंतर पाहूच.)
वरील ४१% च्या संदर्भातील विधानाचा व्यत्यास मात्र पूर्ण सत्य नाही. म्हणजे पृथ्वीवर दिसणार्या ५९॰ भागात पृथ्वी सतत दिसत राहील, अर्थात सतत उदित भागातच राहील असे नव्हे.
त्या ५९% भागातील काही स्थानांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे पृथ्वीचे भ्रमण दिसेल.
स्वाभाविकच पृथ्वीवर चंद्र (ढोबळमानाने) पूर्वेकडे उगवतो व आकाशातून प्रवास करत (ढोबळमानाने) पश्चिमेला मावळतो. पण चंद्राच्या आकाशात पृथ्वीचे भ्रमण अशा पद्धतीने घडू शकत नाही.
----
चंद्रावरील काही स्थानांवर पृथ्वी कधीच उगवणार नाही वा कधीच मावळणार नाही. ती एका ठराविक विभागातून मागे पुढे भ्रमण करत राहील. (सोबत जोडलेले चित्र पाहा. )
अर्थातच चंद्रावरील अशा स्थानी, चंद्रकेंद्रीत कुंडलीत पृथ्वी ठराविक भावांमधूनच भ्रमण करेल व नंतर त्या भावांमध्ये पुन्हा मागे फिरेल.
Stellarium (http://stellarium.org/) नावाचे एक open source software आहे. ह्या सॉफ्टवेअरमध्ये असे भ्रमण पाहता येते.
अर्थात ह्या भ्रमणादरम्यान भावातील राशी मात्र बदलत राहतील.
थोडक्यात चंद्रावरील काही स्थानांवर जन्मलेल्या व्यक्तींच्या कुंडलीत पृथ्वी केवळ त्या ठराविक भावातच असू शकेल.
----
पृथ्वीच्या (सूर्याभोवतीच्या) परिभ्रमण प्रतलाशी, चंद्राच्या (पृथ्वीभोवतीच्या) परिभ्रमाणाचे प्रतल साधारण ५॰ चा कोन करते. (अचूक सांगायचे झाले तर ५॰ ९').
ह्यामुळे चंद्रावरच्या ध्रुवप्रदेशातील काही स्थानांवर, काही काळासाठी पृथ्वी मावळल्याचे व नंतर काही दिवसांनी पुन्हा उगवल्याचे दिसेल. (सोबत जोडलेले चित्र पाहा. )
----
त्या ५९% पैकी बहुसंख्य चंद्रस्थानांवर पृथ्वी आकाशाच्या एका विशिष्ट भागात खिळल्यासारखी दिसेल.
म्हणजे पृथ्वीचे परिवलन होत असल्याने, पृथ्वीवरचे विविध खंड समोर येताना व जाताना दिसतील,
पृथ्वीच्या कला देखील दिसतील,
पृथ्वी ज्या ठिकाणी खिळलेली आहे, तिथल्या राशी, नक्षत्रे सरकताना देखील दिसतील, पण पृथ्वी सदैव एकाच भावात असलेली दिसेल.
कल्पना करा, चंद्रावरील एका विवक्षित स्थानावरील प्रत्येक चंद्रकेंद्रीत पत्रिकेत पृथ्वी अष्टमस्थानात असेल तर ?!
----
चंद्रावर होणारी / दिसणारी सूर्यग्रहणे हा देखील चंद्रकेंद्रीत कुंडलींच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग.
ज्या वेळी पृथ्वीवर चंद्रग्रहण असेल त्यावेळी, चंद्रावरील काही स्थानी पृथ्वीमुळे सूर्याला ग्रहण लागलेले दिसेल.
(पृथ्वीवरील पौर्णिमा चंद्रावरील 'पृथ्वी-अमावास्या' आणि उलट - हे देखील केवळ त्याच भागातून त्याच भागात जिथून पृथ्वी दिसते)
ह्या व्यतिरिक्त आणखी एक गोष्ट चंद्रावरील पृथ्वीदर्शनाशी आणि चंद्रावरून दिसणार्या आणि पृथ्वीमुळे लागणार्या सूर्यग्रहणाशी निगडीत आहे.
पृथ्वीकक्षा व चंद्रकक्षा ह्यांच्या प्रतलात असलेल्या फरकामुळे पृथ्वीवर दर अमावास्या, पोर्णिमेला ग्रहणे होत नाहीत. ह्याच कारणाने ग्रहणांचे एक चक्र असते ज्याला 'Saros cycle' अशी संज्ञा आहे. हे चक्र साधारण १८ वर्षांचे (सूर्यसापेक्ष २२३ चांद्रमास) असते (राहूची महादशा १८ वर्षे असते ह्यामागे हे कारण असावे का !?) ह्या काळात चंद्राची परिभ्रमण कक्षा ठराविक प्रकारे बदलत राहते (सोबतचे चित्र पहा)
चंद्रावरती दिसणार्या आणि पृथ्वीमुळे लागणार्या सूर्यग्रहणाला, आपण, पृथ्वीवरच्या सूर्यग्रहणासंबंधीच्या फलितांच्या चष्म्यातून पाहू शकतो का ? अर्थातच नाही.
----
'चंद्रकेंद्रीत कुंडलीत, पृथ्वीचे फळ / फल काय' हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
ह्या फलनिश्चितीचा आरंभ पृथ्वीचे गुणधर्म ठरविण्यापासून होईल.
मूळात पृथ्वीला शुभग्रह मानावे की पापग्रह ?
पृथ्वीतत्वाची मानावी की जलतत्वाची ?
ती चंद्राची जागा घेत असल्याने चंद्राचे गुणधर्म, राशी, नक्षत्र स्वामित्व, उच्चनीचत्व तिला प्रदान करावे का ?
आदि प्रश्नांपासून होईल.
पृथ्वीला वायूमंडल आहे आणि त्यात नायट्रोजन आणि ऑक्सिजन प्रमुख आहेत, मात्र तरीही पृथ्वी वायुरूपी नाही. ती 'Rocky Planets' ('खडकाळ ग्रह') ह्या वर्गात मोडते, त्यामुळे पृथ्वीला वायुतत्वाची मानण्याचे कारण दिसत नाही.
मात्र पृथ्वीचा ७१% पृष्ठभाग जलमय आहे,
भूस्तरात (Crust) असलेल्या मूलद्रव्यात सर्वाधिक प्रमाण ऑक्सिजनचे आणि मग सिलिकॉनचे आहे.
प्रावरणात (Mantle) असलेल्या मूलद्रव्यात सर्वाधिक प्रमाण ऑक्सिजनचे ,मग मॅग्नीशियमचे आणि तदनंतर सिलिकॉनचे आहे.
अंतर्भागात (Core) मध्ये सर्वाधिक प्रमाण अर्थातच लोहाचे आणि मग निकेलचे आहे आणि त्यातही वितळलेल्या लोहाचे प्रमाण प्रचंड आहे.
जर सर्व घटकांचा एकत्रितपणे विचार केला, तर प्रामुख्याने आणि उतरत्या क्रमाने लोह, ऑक्सिजन, सिलिकॉन आणि मॅग्नीशियम ह्या घटकांपासून पृथ्वी बनली आहे.
पण तरीही पृथ्वीवर द्रवस्वरूपात असलेले पदार्थ फार मोठ्या प्रमाणात आहेत, त्यामुळे पृथ्वी जलतत्वप्रधान मानावी का ?
चंद्रावर फार मोठ्या प्रमाणात पाणी नसूनही आपण चंद्राला जलतत्व प्रधान का मानतो ? हा प्रश्न ह्या निमित्ताने उपस्थित होतो.
दुसरी गोष्ट आहे की मानव पृथ्वीकडे कशा दृष्टीने पाहतो ?
मानवासाठी ती 'धरतीमाता' आहे. ती आपले पोट भरते. हे गुण कर्क राशीशी बर्यापैकी जुळतात. मानवासाठी ती समृद्धी आहे.
त्याचवेळी अनेकदा ती कोपताना देखील दिसते. भयंकर नैसर्गिक संकटे निर्माण करते. हानी करते. हे गुण भावनाप्रधान कर्केशी जमत नाहीत.
मात्र नैसर्गिक चतुर्थ भावाशी जमतात.
रोहिणी नक्षत्राचे अनेक गुण फलितदृष्ट्या पृथ्वीला जोडले जाऊ शकतात असे मला वाटते. त्या तुलनेत श्रवण आणि हस्त नक्षत्रांचे गुण उतरत्या क्रमाने पृथ्वीशी जुळतील असे प्रथमदर्शनी दिसते. तरीही कालांतराने अनुभवातून जे निष्कर्ष निघतील ते अधिक योग्य ठरतील.
थोडक्यात गुणनिश्चितीचा आरंभ करताना राशीचक्र, नक्षत्रचक्र जसेच्या तसे ठेवून,
कर्क राशीची स्वामीनी पृथ्वी
तसेच रोहिणी, हस्त आणि श्रावण नक्षत्रांची स्वामीनी पृथ्वी
असा विचार करून कालांतराने अनुभवानुसार त्यात बदल करत जाणे इष्ट ठरेल.
(तसेही दुसरा पर्याय काय आहे म्हणा ? :-))
----
भाकीतांसाठी कालनिर्णयाचा सर्वात प्रचलित मार्ग आहे दशा.
त्यातही विंशोत्तरी दशा सर्वाधिक वापरल्या जातात. त्यांच्या निश्चितीसाठी आपण चंद्राचा भोग बीज म्हणून वापरतो.
पण चंद्रकेंद्रीत पत्रिकेत चंद्राला बीज म्हणून वापरता येणार नाही, मग पर्याय म्हणून आपण पृथ्वीचा भोग बीज म्हणून वापरावे का ?
त्यात
विशोंत्तरी महादशेतील दशांची वर्षे कशी ठरविली हे आपल्याला माहीत नसल्याने, ती वर्षे संपूर्ण सूर्यमालेस लागू आहेत
की
ती वर्षे केवळ पृथ्वीनिष्ठ आहेत
की
प्रत्येक ग्रहावरील / उपग्रहावरील दशांची वर्षे वेगवेगळ्या प्रकाराने निश्चित होतात
ह्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधावी लागतील.
तरीही चंद्रकेंद्रीत कुंडलीत पृथ्वीप्रमाणेच विशोंत्तरी दशेचा वापर करावयाचा झाल्यास, चंद्राची वर्षे पृथ्वीला प्रदान करून आपल्याला अभ्यासाचा आरंभ करावा लागेल आणि मग अनुभवानुसार बदल करावे लागतील.
अन्यथा कालनिर्णयासाठी विशोंत्तरी दशेपलीकडचे इतर दशांचे पर्याय अवलंबावे लागतील.
----
पृथ्वीच्या अशाप्रकारच्या मर्यादित भ्रमणामुळे, चंद्रकेंद्रीत कुंडलीतील गोचर पृथ्वीला सुद्धा मर्यादा असणार आहेत.
चंद्रावरील प्रत्येक स्थानावर, चंद्रकेंद्रीत कुंडलीत ज्या भावात पृथ्वी असू शकते, त्याच भावातून पृथ्वीचे गोचर भ्रमण होणार आहे.
म्हणजे चंद्रावरील जन्मलेल्या आणि राहणार्या व्यक्तींना, आपल्या चंद्रकेंद्रीत कुंडलीच्या एखाद्या वेगळ्या भावातून पृथ्वीभ्रमण व्हावे असे वाटत असेल,
तर त्यांना चंद्रपर्यटन करण्यावाचून पर्याय नसेल ! :-)
----
ह्या व्यतिरिक्त
चंद्रावरील भूप्रदेशांची विभागणी,
Timezones,
स्थानिक वेळ,
चांद्रविवरातील वा लाव्हानलिकांमधील संभाव्य वस्ती व त्यामुळे गणितात पडणारा फरक,
चंद्रावर पृथ्वीवरील घड्याळाचा वापर करावा की चंद्रावर स्वतंत्र कालनिर्णय व्यवस्था निर्माण करावी
आदि गोष्टींचा निर्णय आणखीनच गुंतागुंतीचा भाग असेल.
----
पृथ्वीवरील ज्योतिषगणित आणि तत्संबंधाने फलज्योतिष निर्माण होण्यामागे आणि हळूहळू विकसित होत जाण्यामागे किती परिश्रम आहेत, हे ह्या निमित्ताने काहीजणांना कळेल आणि काहीजणांच्या नव्याने लक्षात येईल.
----
चांद्रवसाहती हा फार दूरचा विचार नाही हे पुढील लेख वाचल्यास स्पष्ट होईल.
https://astronomy.com/news/2019/05/moon-village-humanitys-first-step-toward-a-lunar-colony
----
पुढील भागात ह्याच विषयासंबंधाने आणखी काही.
=======
क्रमश:
=======


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा