=====================
युद्धार्थं : भाग १०
=====================
.... पृथग्वास (self-isolation) संपविण्याचा निर्णय झाल्याचे कळले; तेव्हां त्या विद्रोही तरुणांच्या समूहात उत्साहाचे भरते आले.
त्यांच्यातील कित्येकांना आपल्याला काहीतरी शिक्षा होईल असे वाटत होते; त्या जागी हा निर्णय म्हणजे थेट दुसरे टोक होते. हा निर्णय प्रत्यक्षात कसा आणला जाईल हे त्यांना नंतर कळणार होते. ह्या उत्साहाच्या भरात काहीतरी विपरीत घडू नये म्हणून त्यांच्यातील काही विचारी, वैज्ञानिक वृत्तीचे तरुण पुढे आले.
त्यांच्यातील एकाने बोलण्यास आरंभ केला तसे तिथला कोलाहल कमी झाला.
"आपण जिंकलो आहोत, पण विसरू नका, समुद्राच्या वरचे जग आपल्यासाठी पूर्णपणे अनोळखी आहे. तिथे आपले शरीर टिकेल का, हेही आपल्याला ठाऊक नाही. आपल्या विजयाच्या आनंदात आपल्याकडून चुका होऊ शकतात. तेव्हां आता आपण कुठलीही अशी कृती करता कामा नये, की ज्याच्यामुळे नेतृत्वमंडळ त्यांच्या निर्णयात काही परिवर्तन करेल."
तो बोलायचा थांबला आणि पुन्हा एकच कलकल सुरू झाली.
तेव्हां दुसर्या एकाने त्यांना समजावले
"हा निर्णय जरी आपल्या विचारसरणीचा विजय असला, तरी आपण संभाव्य संकटे समजून घ्यायला हवीत. सहस्रावधी वर्षांनंतर आपण संपूर्ण वेगळ्या वातावरणात वावरणार आहोत. आपल्याला त्या दृष्टीने बरीच सिद्धता करावी लागेल. तेव्हां नेतृत्वमंडळाच्या निर्णयाची संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय आपण कोणतीही कृती करता कामा नये."
त्याच्या समजावण्यावरही तिथे मिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
----
त्याचवेळी नेतृत्वमंडळाची सभा पुन्हा एकदा एका सभाकक्षात भरली होती. तिथे अत्यंत तणावाचे वातावरण होते.
नेतृत्वमंडळातील एक ज्येष्ठ म्हणाला"मी जरा सविस्तर बोलणार आहे. ते नीट ऐकावे."
“आता त्यांना थांबवणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांच्या उत्साहाचा योग्य उपयोग करून घ्यायला हवा, पण त्याचवेळी आपल्यावर कोणतेही संकट येणार नाही, ह्यासाठी पुरेशी दक्षता घ्यायला हवी. आपण त्यांना आठ नवी वाहने तयार करण्यास सांगूया. प्रत्येक वाहनात त्यांचा एक नेता असेल. ही वाहने आपण चार गटात विभागू. हे चार गट चार वेगवेगळ्या दिशांना दूरपर्यंत जातील. प्रत्येक गटातील एक वाहन समुद्राच्या तळाशी राहील, दुसरे निरीक्षणासाठी आणि आवश्यकता वाटेल तेव्हां संपर्क साधण्यासाठी वर जाईल. ती दोन वाहने सतत एकमेकांच्या संपर्कात राहतील. प्रत्येक वाहनातून केवळ चारच निवातकवच प्रवास करतील, पण तरीही प्रत्येक वाहन अशा रीतीने निर्माण करावे की दीर्घकाळासाठी किमान बारा निवातकवचांच्या सर्व गरजा, ते वाहन भागवू शकेल. वाहनांच्या अशा प्रकारच्या स्वयंपूर्णतेमुळे, भविष्यकाळात आणखी मोठी अभियाने आखावी लागली, तरीही आपल्याला तीच वाहने पुन्हा वापरता येतील. ” (१७)
इतक्यात आणखी एकाने थोडे वेगळे मत मांडले.
"माझ्या मते, एका वा दोन अभियानात सर्व काही साध्य करण्याचा प्रयत्न आपण करू नये. कदाचित त्यामुळेही आपण एखादे संकट ओढवून घेऊ. त्यापेक्षा आपण हळूहळू पावले टाकूया. आधी निरीक्षण, मग शरीराची चाचणी (१८)(१९) नंतर मानवाचे व अन्य प्रजातींचे निरीक्षण आणि मग आवश्यकता वाटली तरच संपर्क. समुद्राच्या वरती किती आणि कसे परिवर्तन झाले आहे, हे आपल्याला माहीत नाही. तसेच थेट मानवांशी वा अन्य प्रजातींशी संपर्क साधण्यासाठी, आपल्याकडे त्यांच्या संदर्भात कोणतेही नवीन ज्ञान नाही. म्हणूनच आपण ही अभियाने टप्प्याटप्प्याने पार पाडायला हवीत. "
काहींचे प्रश्नार्थक मुद्रा पाहून त्याने अधिक स्पष्टीकरण देण्यास आरंभ केला.
"आरंभीस आपण केवळ समुद्राच्या पृष्ठभागावर जावे. तिथे निरीक्षण करावे, पण वाहनातून बाहेर पडू नये (२०)(२१). तिथल्या परिस्थितीत आपली वाहने दीर्घकाळ चालवावीत. ती तिथे योग्य प्रकारे चालतात की नाही, ह्या विषयी जाणून घ्यावे. त्यामुळे पुढच्या अभियानापूर्वी आपल्याला त्या वाहनांमध्ये आवश्यक ते परिवर्तन करता येईल. मग पुढच्या टप्प्यात प्रत्येक वाहनातील दोघांनी समुद्राच्या पृष्ठभागावर वावरून, त्याचे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घ्यावे. त्यानुसार पुढील अभियानासाठी आपल्याला आवश्यक त्या उपाय योजना आखता येतील. "
त्याच्याशी सहमत असलेल्या अन्य एक ज्येष्ठ व्यक्तीने आणखी एक सूचना केली
"समुद्राच्या वर गेलेले वाहन विशिष्ट कालावधीमध्ये परत आले नाही अथवा जर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर समुद्रतळाच्या वाहनाने सरळ माघारी परतावे. काय करायचे ते आपण नंतर ठरवू शकतो. मानवाशी वा अन्य प्रजातींशी आवश्यकता वाटली तरच संपर्क साधायचा असे आपण ठरविले आहे; पण माझ्या मते तरीही आपल्याला स्वसंरक्षणाची व्यवस्था करून तिथे जायला हवे. मणिमतीचा विनाश आपल्यापैकी कुणीही कधीही विसरू शकणार नाही आहोत. आजची आपली अवस्था, एका मानवाने केलेल्या त्या विध्वंसामुळेच आहे. आपण पुन्हा निष्काळजी राहिलो, तर इतिहासाची पुनरावृत्ती होईल.
त्याचे स्पष्ट बोलणे ऐकून तिथला तणाव वाढला.
नेतृत्वमंडळाने त्यांच्यातील चार निवातकवचांना बोलावून घेतले आणि त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यांचेही विचार जाणून घेतले.
नेतृत्वमंडळाने त्यांच्या अतिप्राचीन इतिहासातील काही नोंदी त्यांना उपलब्ध करून दिल्या. आत्तापर्यंत ह्या नोंदीं सर्वांना उपलब्ध केल्या जात नसत. त्यांना स्पष्ट सूचना देण्यात आली की, त्यांच्या सोबत त्या अभियानात प्रवास करणार्या इतरांना कुठले ज्ञान, कधी द्यायचे हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असेल. पण तरीही जिथे आवश्यकता नसेल, तिथे ह्या संबंधी वाच्यता नाही केली, तर ते अधिक योग्य ठरेल असेही त्यांना सांगण्यात आले.
त्या नोंदी वाचताना त्यांना समुद्राच्या बाहेरचे जगाचे एक चित्रच, त्या चौघांच्या मनात उमटले. त्यांना त्यांचा पूर्ण इतिहास समजलाच; पण मानवाविषयी, भूमीवरील राहणार्या इतर प्राण्यांविषयी, वनस्पतींविषयी, आकाशाविषयी, पृथ्वीविषयी आणि अर्थातच सूर्यचंद्रांविषयी बरीच माहिती मिळाली. त्यांच्या यात्रेचा आरंभ होण्यापूर्वी आणि नंतर समुद्राच्या वर गेल्यावर काय काय करणे अपेक्षित आहे; ह्या संबंधीचे त्यांचे विचार किती उथळ होते ते त्यांना उमगले. त्याचसोबत मणिमतीचा विनाश कसा झाला हे वाचताना, मानव आपल्याकडे शत्रुदृष्टीने बघू शकतो आणि आपल्याशी अतिशय हिंसकपणे वागू शकतो हे ही त्यांच्या लक्षात आले.
त्यांच्या लक्षात आले की ह्या अभियानाचा आरंभ करण्यापूर्वी बराच कालावधी जाणार आहे. त्यांना अधिक संशोधन करून, त्यांच्या वाहनांमध्ये कितीतरी सुधारणा कराव्या लागणार होत्या. शिवाय स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती सर्व सिद्धता करावी लागणार होती. थोडक्यात पहिले अभियान त्यांना वाटले होते, तितक्या लवकर पार पडू शकणारच नव्हते. त्यांच्या समूहातील अनेक निवातकवच नवीन अभियानाच्या उत्साहाने भारून गेले होते. त्यांना समजावणे आणि पूर्ण सिद्धता होईपर्यंत त्यांना थांबवून ठेवण्याचे एक नवीन आव्हानही आता त्यांना झेलायचे होते.
त्या सभाकक्षात शिरताना त्यांचे चेहरे आनंदी होते, उत्साही होते; आता बाहेर पडताना मात्र तिथला तणाव त्यांच्याही चेहर्यावर उमटला होता. त्यांच्या डोळ्यांत आता पहिला उत्साह नव्हता, त्याची जागा एका अनामिक अस्वस्थतेने घेतली होती.
---------------------------------------
सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट
=======================
अवांतर :
(१७) वाहनांची स्वयंपूर्णता नेतृत्वमंडळाने सुचविल्याप्रमाणे प्रत्येक वाहन दीर्घकाळासाठी बारा निवातकवचांना पुरेल अशी रचना करणे आवश्यक होते. यासाठी तीन महत्त्वाचे घटक होते:
ऊर्जा:
समुद्रतळावर वापरलेले ऊर्जागोलक पृष्ठभागावरही कार्यक्षम राहतील का, याची खात्री करणे आवश्यक होते.
अन्ननिर्मिती:
खोल समुद्रातील सूक्ष्मजीवांवर आधारित अन्नपुरवठा पृष्ठभागावर टिकेल का, हा प्रश्न होता. त्यामुळे वाहनात जैविक पुनर्चक्रण प्रणाली (bioregenerative life support) बसवावी लागणार होती.
मानसिक स्थैर्य:
दीर्घकाळ अनोळखी ठिकाणी वावरणाऱ्या निवातकवचांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागेल ह्याचे अनुमान बांधणे थोडे अवघड होते. त्यामुळे टेलिपथीद्वारे (मनोसंप्रेषणाद्वारे) सतत संवाद ठेवणे आवश्यक होते.
(१८) समुद्रतळावरून पृष्ठभागाकडे जाण्याचे जैविक परिणाम समुद्राच्या तळाशी राहणाऱ्या कोणत्याही जीवाला पृष्ठभागावर येताना सर्वात मोठा धोका म्हणजे दाबातील अचानक बदल. खोल समुद्रात दाब हजारो पट अधिक असतो. निवातकवचांनी आपल्या शरीराची उत्क्रांती त्या दाबाशी जुळवून घेतली होती. पृष्ठभागावर आल्यावर हा दाब अचानक कमी होतो. त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ, रक्ताभिसरण, श्वसन यंत्रणा यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पाणबुड्यांत वावरणार्या कर्मचार्यांमध्येही विसंपीडनामुळे उद्भवणारी लक्षणे व विकार (Decompression sickness) हा मोठा धोका मानला जातो. निवातकवचांना हा धोका टाळण्यासाठी त्यांच्या वाहनात दाब नियंत्रित ठेवणारी यंत्रणा आवश्यक होती.
(१९) प्रकाश आणि किरणोत्सर्ग समुद्राच्या खोल भागात सूर्यप्रकाश पोहोचत नाही. तिथे राहणाऱ्या जीवांना अचानक प्रखर प्रकाशाचा सामना करावा लागला, तर त्यांच्या डोळ्यांवर आणि त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो. शिवाय पृष्ठभागावर आल्यावर त्यांना अतीनील किरणोत्सर्ग (UV radiation) सहन करावा लागणार होता. निवातकवचांच्या शरीरात जैवदीप्ती (bioluminescence) वापरण्याची क्षमता होती, पण सूर्यप्रकाशाशी सामना करण्यासाठी त्यांना नवीन जैविक संरक्षण यंत्रणा विकसित करावी लागणार होती.
(२०) खोल समुद्रात तापमान साधारण २–४°C इतके स्थिर असते. पृष्ठभागावर आल्यावर अचानक उष्णता (२०–३०°C) मिळाल्यास त्यांच्या शरीरातील जैविक प्रक्रिया विस्कळीत होऊ शकतात. त्यामुळे पृष्ठभागावर दीर्घकाळ वावरताना वाहनातील तापमान नियंत्रित ठेवणारी यंत्रणाही आवश्यक होती. तसेच जर वाहनातून बाहेर जाण्याची वेळ आली तर पृष्ठभागावरील वाढत्या / बदलत्या उष्णतेचे शरीरावर परिणाम होणे अटळ होते.
(२१) खोल समुद्रात प्राणवायूचे प्रमाण अत्यल्प असते. पृष्ठभागावर आल्यावर प्राणवायूच्या आधिक्यामुळे त्यांच्या शरीरात एका प्रकारचे असंतुलन (Oxidative Stress) निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या पेशींवर ताण येऊन थकवा, ऊतकांचे नुकसान किंवा अकाली वृद्धत्व ह्या सारखे दुष्परिणाम होऊ शकतात. ह्या मुळे त्यांना जैविक किंवा तांत्रिक संरक्षण यंत्रणा विकसित करावी लागणार होती.
========================
=====
क्रमश:
=====


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा