=====================
युद्धार्थं : भाग ९
=====================
नव्या उत्क्रांतीला सामोरे गेलेल्या निवातकवचांच्या इतिहासात एक विशेष महत्वाची घटना आता घडणार होती.
आजवर त्यांनी कधीही तीव्र अंतर्गत संघर्ष अनुभवला नव्हता. युद्धानंतरच्या पाच सहस्रकात, कुठल्याच गोष्टींवर मतभेद होत नव्हते, असे नव्हे; पण युद्धानंतर ठरविलेल्या मूळ उद्दिष्टांपासून ढळण्याचे प्रसंग कधीच आले नव्हते. आणि त्यांच्या परंपरागत धारणांना आव्हान देण्याचे धैर्यही कुणी दाखविले नव्हते.
पण ह्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. त्याला कारणीभूत ठरला होते, समुद्रतळावर शेती करणार्या विद्रोही गटातील काही तरुणांनी पुढे टाकलेले एक पाऊल. निव्वळ कुतुहलापोटी समुद्रात विविध ठिकाणी भ्रमण करून आलेल्या त्या गटाकडे सांगण्यासारखे बरेच काही होते. त्यांच्यातील काहींनी टेलीपथीद्वारे (दूरमनोसंप्रेषणाद्वारे) ह्या गोष्टी शक्य तितक्या प्रजेपर्यंत पोहोचवल्या. त्याचे परिणाम प्रपाती झाले; परिणामांची जणू एक साखळी असावी तसे ते परिणाम पसरत गेले. कळलेल्या गोष्टी तपासून बघण्यासाठी, निवातकवचांच्या अनेक समूहांनी तेच धाडस केले.
कालांतराने, ह्याचे पर्यवसान नेतृत्वमंडळाच्या विरोधातील क्षोभात होणार, ह्याची कुणकुण लागल्यामुळे नेतृत्वमंडळाला निरुपायाने हस्तक्षेप करणे भाग पडले. उत्तेजित झालेल्या अनेक विद्रोही आणि इतर निवातकवचांच्या समूहांना त्यांनी प्रत्यक्ष भेटण्यास प्राधान्य दिले. त्यांची मते जाणून घेण्यास आरंभ केला. बहुतेक समूहांचे आक्षेप पृथग्वासाविषयी (self-isolation) होते.
नेतृत्वमंडळाला ज्या विविध प्रतिक्रियांना वा कमीअधिक ताठर असणार्या ज्या भूमिकांना सामोरे जावे लागले; त्याचा सारांश साधारण असा होता :
'आपण आता स्वयंपूर्ण झालो आहोत. समुद्रतळावर झालेल्या भूकंपापासूनही, आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकलो आहोत. आवश्यकता भासली तेव्हां, विशालकाय आणि घातक जलचरांचा विनाश सुद्धा आपण केल्याची उदाहरणे आहेत. आता आपली संख्यासुद्धा अनेक पटींनी वाढली आहे. मणिमतीच्या वेळी आपले तंत्रज्ञान आत्तापेक्षा अधिक प्रगत होते हे खरे. पण आताही आपण मनापासून ठरविले, योग्य नियोजन केले तर मणिमती-काळापेक्षाही अधिक प्रगत आपण होऊ शकतो आणि ते ही अवघ्या काही दशकांमध्ये. पण आपण स्वत:ला जखडून घेतले आहे. त्यामुळे त्या युद्धानंतर, आपण जी बंधने स्वत:वर लादून घेतली आहेत, ती आता हळूहळू दूर सारायला हवी'
जो समूह प्रत्यक्ष भ्रमण करून आला होता, त्यांचा अनुभव अधिक बोलका होता. प्रत्येकाने काय काय बघितले आणि त्याला काय उमगले, ह्याची वर्णने जरी वेगळी असली; तरीही त्यातून निर्माण होणारे चित्र पुरेसे स्पष्ट होते.
समुद्रतळावर दृष्टीस पडलेल्या काही मोठ्या नौका, क्वचित कुठे आढळलेले विघटित झालेल्या शवांचे वेगाने विघटित होत चाललेले अवशेष, अनेक विचित्र आणि अनोळखी वस्तू, धातू, शस्त्रे आणि इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख काही जणांनी केला. त्यांना दिसलेल्या नौका प्राचीन होत्या की अर्वाचीन, हे ठरवणे त्यांना कठीण जात होते. काहीं नौकांवर शैवाल व प्रवाळांचे थर होते, तर काहींवर धातूची चमक अजूनही टिकून होती. (१४)
विघटित होत आलेली हाडे आणि इतर अवशेष सर्वत्र पसरलेले होते, पण एका ठिकाणी अंशत: जतन झालेला एक सांगाडा त्यांना दिसला. त्या सांगाड्यावरून त्यांनी अनुमान बांधले की हा निवातकवचांच्यापेक्षा बर्यापैकी मोठा असलेल्या एखाद्या प्राण्याचा असावा. तो त्यांच्या इतिहासात नोंदलेल्या मानवाचा असावा, असे त्यांच्यातील एकाच्या मनात आले आणि तिथे असलेल्या सर्वांना प्रथमच भीती जाणवली. त्या सांगाड्याच्या सभोवती, त्यांना काही पदार्थाचे तुकडे आढळले होते. ते कसले आहेत ते त्यांना समजले नाही. हातात घेतल्यावर त्या पदार्थाचे आपोआप आणखी तुकडे होत होते. (१५)
त्यांनी तिथल्या अनेक वस्तू उचलून त्यांच्या नगरीत आणल्या आणि अनेकांना दाखविल्या.
त्या विद्रोही वृत्तीच्या समूहातील एक उपसमूह, त्यांच्यातील संशोधकांचा होता. नेतृत्व मंडळातील काही निवातकवचांकडून, त्या समूहाला नवीन संशोधनासाठी सदैव प्रोत्साहन आणि सहाय्य मिळत असे. भविष्यात निर्वाणीचा क्षण आला तर आपल्याकडे नवीन नगरीपासून वेगाने दूर जाण्याची व्यवस्था असावी, हा त्यांचा आग्रह होता; ज्याच्याशी नेतृत्व मंडळातील संशोधक वृत्तीचे काही सदस्य सहमत होते. त्याचा लाभ उठवत, त्यांनी एका नवीन विवरात एक विशेष वाहन गुप्तपणे विकसित केले होते.
ते वाहन त्यांनी एका मिश्रधातूपासून (१६) निर्माण केले होते. बाहेरचा जलावरणाचा भार कितीही असला तरीही वाहनाच्या आत निवातकवच सहन करू शकतील; असाच भार राहील अशी त्याची रचना होती. बाहेरचा प्रकाश कितीही अंधूक झाला किंवा एखाद्या जैवदीप्ती असलेल्या जलचराने तीव्र प्रकाशझोत जरी सोडला तरीही, आत सदैव ठराविक तीव्रतेचाच प्रकाश राहील, ह्यासाठी त्यांनी आवश्यक ती योजना केली होती. त्यासाठी त्यांनी त्या वाहनात जैवतंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला होता. वाहनाच्या आतल्या भिंतीवर त्यांनी भुयारात वापरलेले तंत्रज्ञान अधिक सुधारित स्वरुपात वापरले होते. तिथे जैवदीप्ती असणार्या सूक्ष्म जलचरांचे एक आवरण होते. त्या वाहनाच्या आतमध्ये बारा निवातकवच सहज बसू शकतील, इतके ते मोठे होते. वाहनाच्या अंतर्भागात, वाहनाच्या नियंत्रणासाठी आणि सुरक्षेसाठी विविध यंत्रणा होत्या.
तसेच वाहनाच्या बाह्यभागावर वाहनाच्या सुरक्षेसाठी विशेष सुविधा योजल्या होत्या. वाहनाच्या बाहेर असणारे छोटे अडथळे दूर करण्यासाठी, वाहनाचा तळ वगळता, उर्वरित नऊ दिशांना नऊ लांबलचक यांत्रिक हात बसविले होते. एखाद्या जलचराचा आभास निर्माण व्हावा यास्तव त्या यांत्रिक हातांना शुंडांचा आकार देण्यात आला होता. अर्थातच ते हातही वाहनाच्या आतून नियंत्रित करता येत असत. शिवाय वाहनाच्या बाह्यभागात, आणि वाहनाच्या शुंडांवर, बाहेर असणारा भार, प्रकाश, कंपने आदिंचे मापन करण्यासाठीची वेगवेगळी यंत्रे होती. ती यंत्रे अंतर्भागातील यंत्रणांशी जोडलेली होती. त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीविषयी, वाहनाच्या आत पूर्ण माहिती उपलब्ध होत होती.
वाहनाला प्रवास व इतर सर्व गोष्टींसाठी आवश्यक ती ऊर्जा पुरविण्यासाठी, त्यांनी त्यांच्या भुयारांतील ऊर्जागोलकांच्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या आणि दीर्घकाळ ऊर्जा पुरवू शकेल, अशा ऊर्जागोलकांचे दोन समुच्चय वाहनाच्या तळात बसविले होते. त्यातील एक समुच्चय काही कारणाने काम करेनासा झाला, तर दुसरा समुच्चय आपोआप ऊर्जा पुरवू लागेल अशी व्यवस्था केली होती. ऊर्जा पुरविणार्या त्या यंत्रणेवर अत्यंत कठीण धातूचे आवरण होते, जेणेकरून त्याची कुठल्याही जलचराकडून काहीही क्षती होऊ नये.
समुद्रातील कोणत्याही जलचरास, एक विशाल जलचर वाटावा; असेच त्या वाहनाचे स्वरुप होते. त्याच सोबत त्या वाहनात कुठल्याही मोठ्या जलचरांना घाबरविण्यासाठी, दूर ठेवण्यासाठी विशिष्ट ध्वनीलहरी सोडण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांच्या मते ते वाहन कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी योग्य होते आणि अत्यंत सुरक्षित होते.
त्यांच्या नगरीत आणल्या गेलेल्या त्या चित्रविचित्र वस्तु पाहून त्यांना राहवेना. त्या वाहनाचा उपयोग करून ते पूर्वीही दोनदा समुद्रतळापासून बरेच वरपर्यंत जाऊन आले होते. पण तो अनुभव मर्यादित काळासाठी होता. पण तरीही त्या अनुभवांचा उपयोग, त्यांना त्यांच्या वाहनात अधिक सुधारणा करण्यासाठी झाला होता. आता त्यांना दीर्घ काळासाठी ते वाहन वापरावयाचे होते; जेणेकरून ते त्या समुद्रात अधिक उंचीवर जाऊन येऊ शकतील.
नेतृत्वमंडळातील त्यांच्या पाठिराख्यांशी बोलून ते पुन्हा एकदा त्या वाहनातून प्रवासासाठी निघाले. ह्या वेळेचा प्रवास दीर्घ कालावधीसाठी असणार होता आणि त्यांना समुद्रात जितके उंच जाणे शक्य होईल तितके जायचे होते. अत्यंत सावकाश गतीने वर जाणारे ते वाहन समुद्राच्या पृष्ठभागावर जाऊन पोहोचले आणि तिथे तरंगू लागले.
इतिहासात नोंदविलेल्या, पण त्यांना केवळ अद्भूत कथा वाटणार्या अनेक गोष्टी त्यांनी प्रथमच पाहिल्या. ह्या पूर्वी त्यांना ज्या गोष्टी केवळ कल्पना वाटत, त्या त्यांना त्यांच्या वाहनातून आता बघता आल्या.
त्यांना एक अवाढव्य निळसर घुमट दिसला, त्या घुमटाखाली पोहणारे व माशांपेक्षा बरेच वेगळे असणारे काही प्राणी त्यांना दिसले. त्या घुमटावर काही ठिकाणी पांढर्या रंगाचे डागही त्यांना दिसले. तो घुमट आणि ते डाग कुठल्याशा प्रकाशाने उजळल्या सारखे दिसत होते.
समुद्रतळासारखा असमतल वाटणारा, पण पाणी नसलेला एक तळही त्यांना दिसला. त्या तळावर प्रत्यक्ष जाणे शक्य नव्हते, अन्यथा त्यांच्यातील कित्येकांना तिथे जाऊन काय काय आहे ते बघावे असे तीव्रतेने वाटले होते. पूर्वीच्या प्रवासात त्यांनी समुद्रतळावर काही अवाढव्य आकाराचे उंचवटे बघितले होते. त्यांना पर्वत म्हणतात असे त्यांचा इतिहास सांगत होता. असेच पर्वत त्यांनी त्या पाणी नसलेल्या तळावरही बघितले. तिथेही काही छोट्या आणि मोठ्या जलचरांच्या आकाराचे विचित्र प्राणी होते. त्यांच्या इतिहासात नोंद असलेला मानव मात्र त्यांना त्या तळावर कुठेही दिसला नाही.
मग त्यांना, प्रखर प्रकाश असलेला एक मोठा ऊर्जागोलक त्यांना दिसला. त्या उर्जागोलकाचा प्रकाश इतका अधिक होता की त्यांच्या वाहनातूनही त्या गोलकाकडे बघणे, त्यांना अशक्य झाले होते. कदाचित त्या प्रखर प्रकाशामुळेच, त्यांच्या वाहनातील यंत्रणेने, वाहनाच्या बाह्य आवरणाचे तापमान वेगाने वाढत असल्याचा आणि त्यामुळे वाहनाची हानी होत असल्याचा संकेत दिला. त्यांना त्यांचा प्रवास तात्काळ आटोपता घ्यावा लागला.
त्यांच्या ह्या दुसर्या प्रवासाचे अनुभव त्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच वेगळे होते. समुद्र संपून जिथे पाणीच नसते, अशा ठिकाणी असलेल्या जीवनाचा एक दृष्टीपात (Glimpse / झलक), त्यांच्या मनात विचारांचा भूकंप घडवून गेला होता.
हे सर्व अनुभवल्यानंतर त्यांनी केलेली मागणी अधिक थेट होती. संशोधनाचा वेग वाढविण्यासोबतच, आपण अधिक सक्षम होण्यासाठी काय काय करायला हवे, ह्यासंबंधीची त्यांची मते निर्विवाद विचारात घेण्यासारखी होती.
----
नेतृत्वमंडळातही ह्यावरून तीन गट पडले.
ज्येष्ठांच्या एका स्थितीप्रिय गटाचे म्हणणे होते की ज्या कारणाने आपण आजच्या स्थितीला आलो, त्यामध्ये पृथग्वासाचा (self-isolation) मोठा सहभाग आहे. मणिमतीच्या स्तरावर आपण प्रत्यक्ष पोहोचत नाही तोवर आपली विचारसरणी आपण बदलू नये आणि इतर प्रजातींची प्रगती जाणून घेण्याचे उद्दिष्ट ठेवून संशोधन करू नये. त्यापेक्षा आपण पुन्हा मणिमतीसारखी एखादी नगरी उभारू शकू का ह्या संदर्भात संशोधन करावे. त्यात शारीरिकदृष्ट्या आता आपण पूर्वीइतके बलवान राहिलेलो नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वावर पुन्हा संकट निर्माण होईल, असे काहीही आपण करता कामा नये. त्यांच्यातून दोन-तीन सूर असेही उमटले की पृथग्वासाचा नियम मोडल्यामुळे खरंतर त्या विद्रोहींना शिक्षा व्हायला हवी. त्याकडे इतरांनी दुर्लक्ष केले.
ज्येष्ठांच्या दुसर्या एका गटाचे मत थोडे वेगळे होते. ह्या गटात अनेक संशोधक वृत्तीचे निवातकवच होते. ह्या गटाला त्यांची प्रगती मणिमतीच्या स्तरावर पोहोचेपर्यंत थांबण्याचा पर्याय मान्य होता; पण त्यांचा आग्रह होता की संशोधनाचा वेग आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात वाढवावा आणि मणिमतीसारखी नगरी उभारणे आणि इतर प्रजातींशी संपर्क साधणे ही दोन्ही उद्दिष्टे ठेवून संशोधन करावे. एकदा आपण मणिमतीस्तरावर पोहोचलो की मग मात्र शीघ्रगतीने समुद्राच्या वर असलेल्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळवण्यास आरंभ करावा. गेल्या पाच सहस्रकात आपण बदललो आहोत; तर तिथेही परिवर्तन झाले असेल. तिथल्या जीवनाविषयी आपल्याला जितकी अधिक माहिती मिळेल, तितकी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल. त्यासाठी आपल्याला अधिक सिद्धता करून निरीक्षण मोहिमा आखाव्यात, पण इतर प्रजातींच्या जीवनात कुठल्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करू नये.
नेतृत्वमंडळात एक गट विचारी तरुणांचा होता. त्यांना त्या विद्रोही तरुणांची मानसिकता बहुदा अधिक उमगली होती. मणिमतीच्या स्तरावर येईपर्यंत आपण आणखी थांबायचे ठरविले, तरीही विद्रोहाच्या लाटा उठत राहणारच. आणि त्यातील एखादा समूहाने, काहीतरी वेडगळ साहस केले तर अंतिमत: त्याचे बरेवाईट परिणाम आपल्या सर्वांना भोगायला लागतील; असे त्यांना वाटत होते. पृथग्वासामुळे (self-isolation) प्रमाणाबाहेर मोठे झालेले एक न्यून असे होते की देवांच्या, मानवाच्या वा इतर प्रजातींच्या सध्याच्या स्थितीसंदर्भात वा त्यांच्या प्रगती विषयी, आज त्यांच्याकडे कोणतीही माहिती नव्हती.
त्यांच्या प्राचीन इतिहासात नोंदविल्याप्रमाणे, त्यांचे अस्तित्व उघड झाले, तर येऊ शकणारे संभाव्य संकट त्यांना समजत नव्हते असे नव्हे; पण अशा एखाद्या संभाव्य संकटाविषयी, आपण काहीही माहिती न मिळविणे सुद्धा तितकेच चुकीचे ठरेल असे त्यांचे मत होते. त्यामुळे अधिक न थांबता, सध्या ज्या काही साधन सुविधा आपल्याकडे आहेत त्या वापराव्यात आणि तात्काळ माहिती प्राप्त करण्यास आरंभ करावा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी अन्य प्रजातींशी आवर्जून संपर्क साधू नये हे त्यांना मान्य होते, पण माहिती मिळविण्यासाठी त्या प्रजातींशी संपर्क साधणे आवश्यक असेल, तर तो अवश्य साधावा आणि जी जी शक्य आहे ती सर्व माहिती मिळवावी असे त्यांना वाटत होते.
त्यांच्या मते ह्यामुळे विद्रोही तरुणांच्या समूहाला सुद्धा आटोक्यात ठेवता येईल आणि त्याचवेळी त्यांच्या कुतुहलाला एक वाट करून देता येईल. शिवाय संभाव्य संकटे ओळखू शकलो तर आपण कोणती सिद्धता ठेवायला हवी किंवा कुठल्या प्रकारचे संशोधन आपण केले पाहिजे; ह्याचे नियोजन आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे करता येईल अशी त्यांची धारणा होती.
बराच ऊहापोह झाल्यावर, गेल्या पाच सहस्रकात ज्यावर कधीही विचारही झाला नव्हता, असा एक विलक्षण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. ....
--------------------------------------
सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट
=======================
अवांतर :
(१४) समुद्रात बुडालेल्या आणि समुद्रतळापर्यंत पोहोचलेल्या नौकाचे अवशेष तुलनेने दीर्घकाळ टिकतात; कारण प्राणवायूच्या अत्यल्प प्रमाणामुळे त्यांच्यावर गंज चढणे वा त्यांचे विघटन होणे, ऑक्सिकरण (Oxidation / रसभस्मीकरण) होणे मंदावते. तसेच जिथे तापमान अत्यंत कमी असेल तिथे सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता कमी होते, त्यामुळे लाकूड/धातूचे अवशेष तुलनेने जास्त काळ टिकतात. टायटॅनिकचे अवशेष साधारण ३८०० मीटर खोलवर १०० वर्षांहून अधिक काळ टिकले आहेत.
(१५) सर्वसाधारणत: समुद्रतळाशी पोहोचलेले कोणतेही मानवी शरीर, शरीरांतर्गत असलेल्या काही जीवाणूंच्या प्रक्रियांमुळे, तिथल्या जलचरांकडून होणार्या आक्रमणांमुळे, सागरतळावरील प्रवाहांमुळे, तिथे होत असलेल्या अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे वेगाने (काही दिवस ते काही आठवडे) विघटित होते. कुठल्याही प्राण्याचे सांगाडेसुद्धा काही महिन्यात विस्कळीत होतात. त्या मानाने वेगळी झालेली हाडे, त्यातील कॅल्शियम फॉस्फेटमुळे तुलनेने अधिक टिकाऊ असतात. ती काही दशके तरी टिकू शकतात; पण समुद्रातील आम्लता (pH), सततचे घर्षण व रासायनिक विघटनामुळे, ती हळूहळू विरघळत असल्याप्रमाणे क्षतिग्रस्त होत जातात.
(१६) समुद्रतळाशी किंवा समुद्रात खोलवर जाणार्या, मानवनिर्मित वस्तूंसाठी सर्वसाधारणत: ज्यांची भार सहन करण्याची क्षमता अधिक आहे असेच पदार्थ वापरले जातात. धातूंच्या बाबतीत, हा शोध सर्वसाधारणत: टायटॅनियम सारख्या कठीण पण वजनाने हलक्या असलेल्या धातूचा वापर करून निर्माण केलेल्या, अतिकठीण मिश्रधातूंवर येऊन थांबतो. मानवनिर्मित पाणबुड्यांमध्येही प्रामुख्याने टायटॅनियमचे मिश्रधातूच वापरले जातात; कारण ते गंजरोधक व हलके असतात आणि उच्च दाब सहन करू शकतात.
समुद्रतळाशी टायटॅनियम संयुगांच्या स्वरुपात आढळतो; मात्र मानवासाठी समुद्रतळावरील खनिजांपासून त्याचे उत्पादन करणे हे सध्या तरी महाकठीण आणि खर्चिक आहे. इथे निवातकवचांच्या वाहनाचा मिश्रधातू टायटॅनियमपासून निर्माण केला गेला होता असे ठोसपणे सुचविलेले नाही. तो मिश्रधातू म्हणजे, निवातकवचांनी विकसित केलेल्या धातू व जैव तंत्रज्ञानाचा एकत्रित अविष्कार सुद्धा असू शकतो.
========================
=====
क्रमश:
=====


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा