मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (७ / ९)


गुरु या वायूरूपी महाकाय ग्रहाचा पृथ्वीवरील जीवन संरक्षित ठेवण्यात, त्याला वाढू देण्यात मोलाचा वाटा आहे.  पण प्रत्यक्ष गुरुवर जीवसृष्टी असू शकेल का याचे उत्तर सध्यातरी 'बहुदा नाही' असेच आहे. सध्या NASA चे Juno हे अंतराळयान 'गुरुकुलात' आहे आणि गुरुची व गुरुच्या अनेक उपग्रहांच्या रहस्यांची ते उकल करेल अशी आशा आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गुरूला स्वत:चा पृष्ठभाग नाही. मुख्यत्वेकरून हायड्रोजन आणि हिलियम यांनी बनलेल्या हा ग्रहाबद्दल काही वैज्ञानिक असे मानतात की पुरेसे वस्तुमान 'जमवू' न शकल्यामुळे तो तारा होऊ शकला नाही. १९९५ मध्ये गुरुचा अभ्यास करण्यासाठी सोडलेल्या Galileo यानाचे आयुष्य जेंव्हा संपले, तेंव्हा  पृथ्वीवरून यानात गेलेल्या जीवाणूंमुळे, गुरुच्या उपग्रहावर जीवन रुजू नये यासाठी, Galileo यान गुरुच्या उपग्रहांऐवजी, गुरुवरती 'आदळावे' असे ठरले. तेंव्हा त्या यानात असलेल्या प्लूटोनियमच्या उर्जास्त्रोतामुळे, गुरुवर अणुस्फोटाची साखळी प्रक्रिया सुरू होऊन तो तारा बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल अशी भीती वैज्ञानिकांच्या एका गटाला वाटत होती.  अर्थात तसे काही घडण्याची शक्यता नव्हती आणि तसे काही झालेही नाही. पण हे सर्व सांगण्यामागचा हेतु हा की तब्बल ६७ उपग्रहांसह, अत्यंत विरळ अशा कड्यासह, सूर्यमालेत स्वत:चे अस्तित्व पदोपदी जाणवू देणारा, लेकुरवाळा गुरु हे विविधतेने नटलेल्या, एका स्वतंत्र(उप) ग्रहमालेचे विश्व आहे. याखेरीज अनेक लघुग्रह सूर्याभोवती फिरत असले तरी त्यांच्यावरील गुरुच्या प्रभावामुळे ते गुरुच्या 'गोटात' आहेत असे म्हणायला हरकत नाही.  या कारणामुळे गुरुकुलात जीवसृष्टीचे अस्तित्व नक्की सापडेल असा ठाम विश्वास असणारे अनेक वैज्ञानिक आहेत आणि तत्संबंधी विविध प्रकल्प कार्यरत आहेत, योजलेले आहेत.

गुरूला 'पृष्ठभाग' नाही असा सध्याचा अंदाज आहे. मात्र सूर्यापासून (Solar Wind) संरक्षण करणारे गुरूचे चुंबकीय क्षेत्र अत्यंत बलवान आणि विशाल आहे. इतके की ते त्याच्या उपग्रहांनाही सुरक्षाकवच पुरवते. हायड्रोजन हा मुख्य घटक असणार्‍या गुरुच्या वातावरणात अत्यल्प प्रमाणात का होईना मिथेन, अमोनिया, वाफेच्या स्वरूपातील पाणी यांचे अस्तित्व आहे. जीवन असण्यासाठी हे घटक पुरेसे असले, तरी गुरुच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे, तिथल्या वातावरणाच्या प्रचंड दाबामुळे तिथे जीवसृष्टी असलीच तर ती आपल्या अपेक्षांच्या, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या आसपास जाणारी नसेल हे स्वाभाविक आहे. शिवाय गुरुवर, किमान गेली साडेतीनशे वर्षे, टिकून असलेले 'Great Red Spot' या नावाने प्रसिद्ध असलेले, महाप्रचंड वादळ हे वातावरणाच्या वरच्या थरातील उष्णता वाढविण्याचे काम करते असे लक्षात आले आहे. केवळ उडणारे, तरंगणारे जीव आणि त्यांचा जीवनक्रम यांची कल्पना करणे अगदी सोपे नाही.  आणि अजूनपर्यंत अशा जीवसृष्टीच्या कोणत्याही खुणा तेथे सापडलेल्या नाहीत.   दुसर्‍या बाजूने विचार केला तर वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला. जिथे गुरुची Core (आत्यंतिक अंतर्भाग) असेल असे मानले तर तिथे असणारे वातावरणाचा, गुरुत्वाकर्षणाचा  दाब यामुळे तापमान इतके जास्त असेल की तिथे कदाचित हायड्रोजन हा द्रवरूपात असण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी जीवसृष्टीची कल्पना करणे अशक्य आहे.

अनेक वैज्ञानिकांना, गुरुच्या काही उपग्रहांवर मात्र जीवसृष्टीचे अस्तित्व असण्याची बरीच शक्यता वाटते.

Io हा गुरुकुलातील (खरंतर सूर्यकुलातील) सर्वात जागृत उपग्रह.  Galileo ने जानेवारी १६१० मध्ये शोधलेल्या गुरुच्या चार उपग्रहांपैकी, गुरूला सर्वात जवळ असणार्‍या या उपग्रहावर, मोठ्या संख्येमध्ये असलेले जागृत ज्वालामुखी, Io च्या वातावरणात सतत गंधक व गंधकाची संयुगे फेकत असतात. गुरुच्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणाच्या मुळे, तसेच इतर मुख्य उपग्रहांच्या विविध दिशातील गुरुत्वीय आकर्षणामुळे,  त्याच्या पृष्ठभागाचे जवळजवळ १०० मी इतके आकुंचन, प्रसरण (Tidal Heating) चालू असते.. पृष्ठभागाचे तापमान -१३०° सेल्सियस  आणि ज्वालामुखींचे तापमान साधारण ३०००° सेल्सियस अशा दुहेरी तापमानाच्या क्षेत्रात विभागाला गेलेल्या Io च्या वातावरणात जवळजवळ ९०% सल्फर डायऑक्साइड आहे.  याव्यतिरिक्त पृष्ठभागावर गोठलेल्या स्वरूपातील सल्फर डायऑक्साइडचा थर आहे.  Io चा अंतर्भाग हा द्रवरूपातील लोहाने बनलेला आहे.  त्यामुळे   Io हा गुरुच्या अतितीव्र चुंबकीय क्षेत्रात एखाद्या जनित्रा (Generator) प्रमाणे काम करतो. स्वत:भोवती अंदाजे, ४ लाख Volt इतका विद्युत दाब निर्माण करण्याची क्षमता असलेल्या Io कडून गुरुच्या दिशेने ३० लाख amperes इतक्या क्षमतेचा विद्युत प्रवाह निरंतर वाहत असतो असे सध्याचे निरीक्षण आहे.  

ज्वालामुखीमधून सतत उत्सर्जित होणार्‍या गंधक व इतर पदार्थांच्या मुळे बनलेल्या एका ढगाने Io वेढलेला आहे.  इतक्या प्रतिकूल वातावरणात तिथे सध्या जीवसृष्टी असण्याची शक्यता वाटत नाही. यदाकदाचित, तिथे कोणत्याही स्वरूपाची जीवसृष्टी निर्माण झाली असेल तर ति Io च्या निर्मितींनंतरच्या सुरुवातीच्या एखाद्या अवस्थेत झाली असावी, जेंव्हा तिथे बहुदा पाण्याचे अस्तित्व होते. कालांतराने या जीवसृष्टीने पर्यावरणातील बदलाशी जुळवून घेत पृष्ठभागाखाली राहणे पसंत केले असेल, तरीही या घडीला तिचे अस्तित्व टिकून राहिले असेल असे वाटत नाही.

आपल्या चंद्रापेक्षा आकाराने थोडा छोटा असलेल्या, Europa या गुरुच्या उपग्रहावर जीवसुष्टी असू शकेल, याबाबत वैज्ञानिक बरेच आशावादी आहेत. सध्या उपलब्ध माहितीनुसार लोह व निकेल यांनी बनलेला Europa चा अंतर्भाग,  मुख्यत्वेकरून 'silicates' (वाळू, सीमेंट इत्यादी)  च्या दगडांनी लपेटला गेला आहे, आणि त्याच्या पृष्ठभाग हा पाण्याच्या बर्फाने आच्छादित आहे. विवरे विशेष नाहीत, किंवा असलीच तर ती बर्फाच्या थराने झाकली गेली आहेत.  गुरुच्या तीव्र गुरुत्वाकर्षणाचे व इतर मोठ्या उपग्रहांचे परस्परविरोधी  आकुंचन, प्रसरणाचे परिणाम,  Io च्या तुलनेत खूप कमी प्रमाणात,  Europa वर पण होतात.  यामुळे जे उष्णता निर्माण होते तिच्यामुळे, Europa पृष्ठभागाखाली साधारण १०० किमी खोलवर मोठे जलाशय असू शकतात याबद्दल वैज्ञानिकांमध्ये बर्‍यापैकी मतैक्य आहे. या जलाशयांमध्ये जीवसृष्टीला पोषक वातावरण असेल ही शक्यता बरीच मोठीआहे. शिवाय Europa च्या विरळ वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाणही लक्षणीय आहे. अर्थात खूप खोलवर असलेल्या संभाव्य जलाशयातील, जीवसृष्टीला वातावरणातील ऑक्सिजनचा कितपत उपयोग होऊ शकेल याबद्दल साशंकता आहे. NASA आणि ESA यांचा संयुक्त सहभाग असलेला Europa Clipper हा  प्रकल्प पूर्णत्वास गेला, तर Europa वरच्या जीवसृष्टीबाबत काही ठोस माहिती आपल्या हातात येईल.

Ganymede हा सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह. उपग्रह असूनही बुधापेक्षाही मोठा.   इथेही  Silicates व  पाण्याचा बर्फ या जीवसृष्टीच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या गोष्टी.  द्रवरूपातील लोहाचा अंतर्भागामुळे, Ganymede ला स्वत:चे चुंबकीय क्षेत्र आहे जे गुरुपासून होणार्‍या किरणोत्सर्गापासून त्याचे संरक्षण करते. अत्यंत विरळ वातावरणाचा, प्रमुख घटक ऑक्सिजन आहे ही आणखी एक जमेची बाजू. इथेही पृष्ठभागाखाली जलाशय असावेत ही गोष्ट जवळजवळ नक्की आहे.  गुरुशी  tidally locked असल्याने गुरुला Ganymede ची सतत एकच बाजू दिसते आणि पृष्ठभागावर बर्फासोबत कार्बन डायऑक्साइड आणि गंधकाच्या काही संयुगांचेही अस्तित्व जाणवले आहे,  ही आपल्याला परिचित जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या दृष्टीकोनातून डावी बाजू.   ESA चे JUICE हे अंतराळयान २०२२ मध्ये, गुरुच्या तीन प्रमुख उपग्रहांना भेट देऊन शेवटी २०३२ मध्ये Ganymede भोवती घिरट्या घालेल, तेंव्हा जीवसृष्टीच्या संदर्भात अधिक ठोस आणि निर्णायक माहिती कळू शकेल.

Callisto हा गुरुच्या मुख्य चार उपग्रहांपैकी सर्वात दूर असलेला आणि गुरुच्या किरणोत्सर्गाची सर्वात कमी मात्रा झेलणारा उपग्रह. हा देखील गुरुशी  tidally locked आहे. विरळ असलेल्या वातावरणातील प्रमुख घटक कार्बन डायऑक्साइड असून काही प्रमाणात ऑक्सिजनही उपलब्ध आहे. इथेही पाण्याचा बर्फ आणि त्या पृष्ठभागाखाली जलाशय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Callisto वर कोणतीही भूस्तरीय सक्रियता आढळलेली नाही. मात्र पृष्ठभागावर अमोनियाचे आढळलेले अस्तित्व , इथे काहीशी वेगळ्या स्वरूपाची जीवसृष्टी असू शकेल अशी शक्यता सांगते. इथे जीवसृष्टी असो वा नसो, पण किरणोत्सर्गाचे कमी असलेला प्रमाण, गुरुपासूनचे त्याचे अंतर आणि पाण्याचे संभाव्य अस्तित्व या गोष्टी लक्षात घेऊन काही वैज्ञानिकांच्या मते Callisto  भविष्यातील अंतराळतळ करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

गुरुपासून नेपच्यून पर्यंत चारही ग्रह, 'वायूरूपी महाकाय' या गटात मोडणारे ग्रह आहेत. चौघांच्याही भोवती कडी आहेत. तरीही शनीमहाराजांचे प्रकरण इतरांपेक्षा वेगळे आहे. त्यांची बरीचशी कडी अधिक दृश्य स्वरूपाची तर आहेतच, पण ती ज्या कणांपासून बनलेली आहेत त्यात पाण्याच्या बर्फाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही कडी इतकी विशाल आहेत की त्यांना स्वत:चे अत्यंत विरळ असे वातावरण आहे आणि त्या वातावरणात अतिनील (Ultraviolet) किरणांमुळे मुक्त झालेल्या ऑक्सिजनचे प्रमाण खूप अधिक आहे.  या कड्यांमध्ये अक्षरश: शेकड्यांनी अत्यंत छोट्या आकाराचे उपग्रह, ज्यांना उपग्रह न मानता 'moonlets' असे संबोधले जाते, ते ही शनीभोवती घिरट्या घालत असतात. moonlets व्यतिरिक्त,  सध्याच्या माहितीनुसार शनीला ६२ उपग्रह आहेत. 

या उपग्रहांपैकी सर्वात प्रसिद्ध आहे  Titan. शनीभोवती फिरणार्‍या सर्व गोष्टींचे एकत्रित वस्तुमान लक्षात घेतले तर साधारण ९०% वस्तुमान एकट्या Titan चे आहे.  हा उपग्रहही बुधापेक्षा मोठा आहे. त्याच्या संरचनेत पाण्याचा बर्फ आणि दगड यांचे आधिक्य
आहे. पण त्यापलीकडे मानवी जीवनास अनुकूल असे तिथे काहीही नाही. त्याच्या वातावरणात जवळजवळ ९८% नायट्रोजन आहे. आणि साधारण दीड टक्का मिथेन. पण विशेष गोष्ट ही आहे की पृथ्वीवर जसे जलचक्र आहे, तसे Titan वर मिथेनचक्र आहे, मिथेनचे (आणि इथेन व इतर हायड्रोकार्बनचे) समुद्र,नद्या, तळी आहेत, मिथेनपासून बनलेले ढग, मिथेनचा पाऊस आहे.  Titan सदैव नारिंगी रंगाच्या धुक्याने वेढलेला असतो. त्याच्या कक्षेचा बराचसा भाग हा शनीमहाराजांच्या, चुंबकीय क्षेत्राच्या छत्रछायेत येतो. त्यामुळे सौरवार्‍यांमुळे (Solar Wind) बसणार्‍या सूर्याच्या फटकार्‍यांपासून त्याचे संरक्षण होते.  Huygens probe जेंव्हा Titan वर उतरला होता, तेंव्हा पर्वत, टेकड्या, दगडगोटयांनी भरलेला पृष्ठभाग याची अनेक छायाचित्रे मिळाली, जी पृथ्वीवरच्या तशाच भूभागांची आठवण करून देतात. इथे जीवसृष्टी सापडण्याची आणि  ती मिथेनचक्रावर आधारित असण्याची खूप शक्यता आहे. Huygens probe मध्ये अशा प्रकारची जीवसृष्टी शोधणारी पुरेशी उपकरणे नव्हती असे सांगितले जाते.  पण दूरस्थ निरीक्षणातून तिथे  amino acids चे अस्तित्व तिथे जाणवलेले आहे.  Titan च्या पृष्ठभागाखाली खूप खोलवर द्रवस्वरूपात अमोनियामिश्रित पाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलाशयांमध्ये सुद्धा जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. Titan मध्ये स्वारस्य असण्याचे दूरच्या भविष्यातील आणखी एक कारण आहे.  सध्याच्या अंदाजानुसार, पृथ्वीवर असणार्‍या ज्ञात खनिज तेलाच्या एकूण साठ्याच्या जवळजवळ ३०० पट इतके साठे, Titan वरच्या सध्या माहीत असलेल्या, हायड्रोकार्बनच्या समुद्र,नद्या आणि तळ्यांमध्ये आहेत !

Enceladus हा शुद्ध बर्फाने आच्छादलेला उपग्रह वैज्ञानिकांसाठी आकर्षण ठरला नसता तरच नवल. Enceladus च्या वातावरणात  Cassini ने ज्या अनेक 'डुबक्या' मारल्या त्यातील एक 'डुबकी' दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागापासून केवळ ५० किमी इतक्या अंतरावर होती.  त्याच्या दक्षिण ध्रुवावर  असलेल्या विवरांमधून वाफेचे फवारे अत्यंत वेगाने तिथल्या आकाशात फेकले जातात. या फवार्‍यांपैकी काही फवार्‍यांमध्ये (पृथ्वीवरील समुद्राप्रमाणेच) सोडीयम, पोटॅशियम, हायड्रोजन आणि सिलिकेट्स स्फटीकांचे अस्तित्व आढळले आहे.  सर्वसाधारणत: सिलिकेट्सचे स्फटिक उकळत्या पाण्यात तयार होतात.   फवार्‍यांममधली  वाफ बाहेर पडल्यावर बर्फात रूपांतरित होऊन खाली पडते किंवा अवकाशात निसटून जाते. याच दक्षिण ध्रुवाजवळ बर्फाच्या जाड थराखाली साधारण १० किमी खोलीचा समुद्र असल्याचे निरीक्षण Cassini यानाने नोंदविले आणि या उपग्रहावर जीवसृष्टी असण्याच्या वैज्ञानिकांच्या आशा प्रचंड पल्लवित झाल्या.  त्यातूनही समजा तिथे जीवसृष्टीचे अस्तित्व नसलेच तर,  दूरच्या भविष्यात, सूर्यमालेतील, सूर्यमालेबाहेरील प्रवास जेंव्हा एक नियमित आणि स्वाभाविक गोष्ट होईल तेंव्हा पाण्याचे हे मोठे साठे जर टिकून राहिले असले तर, पाणपोई सारखे उपयोगात येतील का ? 


Rhea या शनीच्या उपग्रहाबाबत विशेष गोष्ट ही की त्याच्या वातावरणात अत्यंत विरळ वातावरणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड ५:२ या प्रमाणात आहेत. यातील ऑक्सिजनचा उगम त्याच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या बर्फातून होते आहे असे लक्षात आले आहे, पण कार्बन डायऑक्साइडचा स्त्रोत काय आहे हे समजलेले नाही. कार्बन डायऑक्साइडच्या उगमामागे जर कोणतेही सेंद्रिय पदार्थ असतील तर  Rhea देखील जीवसृष्टीसाठी एक संभाव्य स्थान ठरते.

Tethys, Dione, Mimas आणि Iapetus या शनीच्या उपग्रहांवरही पाण्याच्या बर्फाचे मुबलक साठे आणि विरळ वातावरणात असलेले ऑक्सिजनचे लक्षणीय प्रमाण हे समान सूत्र आहे.

थोडक्यात शनिमहाराजांची लेकरे मानवासाठी, जीवसृष्टीसाठी उपयुक्त आहेत. पण प्रत्यक्ष शनीवरची स्थिती मात्र खूप वेगळी आहे. ९६% हायड्रोजन आणि ३% हेलियम असलेले वातावरण, वायुरूपी असल्याने पृष्ठभाग नाही, गुरुप्रमाणेच मोठी वादळे असलेल्या या ग्रहांवर वरपासून खालपर्यंत 'ढगांचे' चार थर आहेत. सगळ्यात वरती अमोनियाचा बर्फ, नंतर खालच्या थरात पाण्याचा बर्फ, त्यानंतरच्या खालच्या थरात अमोनियम हायड्रोसल्फाईड या आपल्यासाठी विषारी असणार्‍या संयुगाचे ढग आणि त्याच्या खालच्या थरात अमोनियामिश्रित पाण्याचे ढग. अशा परस्पराविरोधी असणार्‍या वातावरणात कुठलीही जीवसृष्टी जगू शकत असेल, वाढू शकत असेल तर तो एक चमत्कारच ठरेल.

शनीच्या कड्यांइतकीच एक चमत्कृतीपूर्ण गोष्ट आहे तो त्याच्या उत्तर ध्रुवावर कायमस्वरूपी असलेला षट्कोनी आकाराचा ढगांचा समुदाय. १३,८०० किमी इतकी भुजा असलेला हा षट्कोन स्वत:भोवती साधारण साडेदहा तासात एक गिरकी पूर्ण करतो. निसर्गातील वर्तुळाकार, लंबवर्तुळाकार अशा परिचित आकारांशी फटकून असलेल्या या षटकोनी वादळामागे कोणतेही गूढ नाही असे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांनी या संदर्भात केलेल्या प्रयोगानुसार, एका वेगाने फिरणार्‍या नळकांड्याच्या मध्यातून, जर वेगवान द्रवाचा फवारा उडवला तर त्याच्या वेगानुसार विविध आकाराचे बहुभुजाकृती तयार होतात. वेग जास्त असेल तरी कमी भुजा, कमी असेल तर जास्त भुजा.  हे जरी खरे मानले तरी शनीच्या उत्तरध्रुवावरच असा कोणता वेगवान प्रवाह खालून वर येत आहे, जो सातत्याने हा आकार टिकवून आहे, हा प्रश्न उरतोच.


Titan Saturn System Mission (TSSM) या नावाने NASA आणि ESA यांची संयुक्त मोहीम २०२० किंवा त्याच्या नंतरच्या एक दोन वर्षांमध्ये प्रस्तावित आहे. या मोहिमेत शनिकुलातील जीवसृष्टीबाबत काही ठोस सापडेल अशी आशा आहे.

सूर्याभोवती लोळत प्रदक्षिणा घालणारा यूरेनस आणि आणि सूर्यमालेतील शेवटचा ग्रह ठरलेला नेपच्यून यांच्या अभ्यासाभोवती केंद्रीत असलेली अवकाशयाने अजूनपर्यंत मानवाने धाडलेली नाहीत. काही FlyBy आणि दूरस्थ निरीक्षणे यातून  या दोन ग्रहांवरील जीवसृष्टीबाबत पुरेसे आश्वासक असे अजूनपर्यंत काही आढळून आलेले नाही.  पण तरीही नेपच्यूनचा उपग्रह असलेल्या, भूस्तरीयदृष्ट्या सक्रिय असणार्‍या Triton च्या बाबतीत, काही वैज्ञानिकांनी जीवसृष्टीची संभाव्यता वर्तवली आहे. गोठलेल्या नायट्रोजन बर्फाचा पृष्ठभाग असलेल्या Triton वर नायट्रोजन वायूचे फवारे उडताना आढळले आहेत. त्याच्या पृष्ठभागाखाली पाण्याच्या बर्फाचा जाड थर आहे. त्याच्या अत्यंत विरळ वातावरणात प्रामुख्याने नायट्रोजन असला तरी पृष्ठभागाजवळ काही प्रमाणात मिथेन आढळतो. हा मिथेन जीवसृष्टीचा निदर्शक असू शकतो.

एकेकाळी ग्रहमंडलात सामील असलेला प्लूटो,  आता बटुग्रह मानला जातो. एकेकाळी अतिशय कमी माहिती असलेल्या प्लुटोबद्दल,   New Horizons या अंतराळयानाने केलेल्या निरीक्षणातून, अभ्यासातून आता खूप माहिती मिळाली आहे.  इतक्या दूरवरून डेटा येत असल्याने, माहितीच्या प्रक्षेपणाचा वेग हा 1 ते 2 kb/s इतका अल्प आहे.  New Horizons चे पुढचे लक्ष्य हे  2014 MU69 चा flyby हे आहे जे १ जानेवारी २०१९ रोजी  गाठले जाईल. तोपर्यंत प्लूटोची आणखी बरीच माहिती कळेल व तिथल्या जीवसृष्टीबाबत काही तर्क करणे संभव होईल.  पण सध्याच्या माहितीनुसार, प्लुटो आणि  Triton  मध्ये काही प्रमाणात साम्य आहे. त्याचा पृष्ठभाग हा मुख्यत्वेकरून नायट्रोजनच्या बर्फामुळे बनला आहे. अत्यंत विरळ अशा त्याच्या वातावरणातही मुख्यत्वे नायट्रोजन व अल्प प्रमाणात मिथेन आणि कार्बन मोनॉक्साइड आहे. पृष्ठभागावरचे तापमान -२२९° सेल्सियस इतके आहे. पण प्लुटोची कक्षा ही अत्यंत लंबवर्तुळाकार असल्याने,  तो सूर्याला जेंव्हा जवळ असतो तेंव्हा २९.६६ AU इतक्या अंतरावर नेपच्युनच्या कक्षेच्याही आत असतो (सप्टेंबर १९८९) आणि तो जेंव्हा सूर्यापासून सर्वात दूर असतो तेंव्हा ४९.३२ AU (फेब्रुवारी २११४) इतका दूर (नेपच्युनच्या कक्षेच्या कितीतरी बाहेर) असतो.  अशा प्रकारच्या कक्षेमुळे आज घेतलेली निरीक्षणे आणि मोजलेले घटक सूर्यापासून खूप दूर गेल्यावर तसेच राहतीलच असे नाही.  त्यामुळे तिथल्या जीवसृष्टीबाबत वैज्ञानिक सध्यातरी, कोणतीही गोष्ट ठामपणे  सांगत नाहीत.

प्लूटोपलीकडील इतर बटुग्रह (Dwarf Planets) किंवा इतर  Minor Planets, Kuiper belt objects किंवा तत्सम अतिदूर objects बाबत,   वा  धूमकेतू, आकाशगंगेत सापडलेल्या दुसर्‍या ग्रहमालेतील ग्रह, यांचे दूरस्थ निरीक्षणावरून केलेले तर्क हे जीवसृष्टीचा कुठलाही ठोस पुरावा म्हणून पुरेसे सक्षम नाहीत.  

उदाहरणार्थ  Kepler अंतराळस्थ दूरदर्शकाने  शोधलेला,  Kepler-186f हा पृथ्वीसदृश, पृथ्वीपेक्षा साधारण १०% मोठा असलेला, खडकाळ पृष्ठभाग असलेला ग्रह आहे असा सध्याचा अंदाज आहे. तो त्याच्या Kepler-186 या तार्‍याभोवती पृथ्वीसारख्याच सुरक्षित कक्षेतून (त्याच्या तार्‍याच्या तुलनेत) फिरतो. पण हा तारा पृथ्वीपासून ५६० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.  थोडक्यात आपल्याकडे प्रकाशवेगाने जाणारे अंतराळयान असेल तरी तिथे पोहोचेपर्यंत ५६० वर्षे लागतील. New Horizons या प्लुटोला भेट देणार्‍या अंतराळयानाला प्लुटोपर्यंतचे, साधारण ४.८२ अब्ज किमी (अर्थात 0.000509474 प्रकाशवर्षे)  इतके अंतर कापायला साधारण साडेनऊ वर्षे  लागली. त्यामुळे आपल्या सध्याच्या क्षमतेनुसार, Kepler-186f पर्यंत पोहोचायला, आपल्याला अंदाजे  १ कोटी वर्षापेक्षाही अधिक काळ लागेल.  इतकेच कशाला आपल्याला सर्वात जवळ असणार्‍या Alpha Centauri च्या ग्रहमालेत, पृथ्वीसदृश, आपल्याला राहण्यासाठी योग्य असा एखादा ग्रह जरी सापडला, तरी तिथे पोहोचायला आजच्या क्षमतेनुसार, आपल्याला साधारण १ लाख वर्षे लागतील.   अशा स्थितीत आज घेतलेली निरीक्षणे आणि केलेले तर्क हे सर्वस्वी निरुपयोगी ठरू शकतात.

त्यामुळे जोपर्यंत आपण दूरस्थ तार्‍यांपर्यंत जाण्यासाठी, अतिवेगवान अंतराळयाने निर्माण करू शकत नाही किंवा तिथे जाण्यासाठी काही विलक्षण तंत्र शोधू शकत नाही, तोपर्यंत तिथे प्रत्यक्ष जाऊन जीवसृष्टीचा वेध घेणे वा या वेध घेण्यामागचा अंतिम मुख्य उद्देश (परस्परसंबंध, सहकार्य किंवा वसाहतीकरण, पृथ्वीला पर्याय इत्यादी) साध्य करणे हे प्रायत: अशक्य आहे.  

सूर्यमालेबाहेर दुसर्‍या ग्रहमालेत 'पोहोचणे' हे आपल्या अंतराळयानांसाठी सध्यातरी, जवळजवळ अप्राप्य असताना, आपल्याला जी जीवसृष्टी सापडेल त्यांचा आपल्याशी  संवाद होऊ शकेल की नाही, ते आपल्याशी कसे वागतील याचा सुतराम अंदाज नसताना,  इतक्या मोठ्यामोठ्या प्रकल्पातून, प्रचंड गुंतवणूक करून आपल्या व दुसर्‍या ग्रहमालांचा व तेथील  परकीय जीवसृष्टीचा शोध का सुरू आहे असा प्रश्न ज्यांना साहजिकपणे पडतो त्यांनी पुढील मुद्दे विचारात घ्यावेत.

१) 'तहान लागली की विहीर खणणे हे अयोग्य आहे' हे वाक्य निदान इथे तरी शंभर टक्के सत्य आहे. पृथ्वी सोडावी लागणे ही मानवासाठी दूरच्या भविष्यातील अटळ घटना असणार आहे. त्यामुळे आपल्या प्रजातीच्या अतिदीर्घकालीन अस्तित्वासाठी सर्व पर्यांयांचा शोध आणि त्यासंबंधीची सर्वतोपरी सिद्धता या दृष्टीने कार्यरत राहणे अत्यंत आवश्यक आहे.
२) कुठल्याही अंतराळमोहिमा, त्यासंबधीचे इतर प्रकल्प यातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, मानवाला इथे पृथ्वीवर उपयुक्त ठरेल, अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान विकसित झाल्याची, नवीन शोध लागल्याची उदाहरणे विपुल आहेत. तेंव्हा अंतराळमोहिमांचा अगदी सामान्य माणसालाही उपयोग होतो असे मानायला हरकत नसावी.    

https://www.nasa.gov/sites/default/files/files/Benefits-Stemming-from-Space-Exploration-2013-TAGGED.pdf

http://www.nasa.gov/50th/50th_magazine/benefits.html

३) आपल्यापेक्षाही प्रगत जीवसृष्टी ही आपल्या आकाशगंगेत असू शकते हे मान्य केल्यावर, आपण परकीय जीवसृष्टीचा शोध थांबवला म्हणून तो इतर प्रगत जीवसृष्टी थांबवतील असे नाही. याचाच दुसरा अर्थ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, तरी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, आणि त्यांचे इरादे कसे असतील याविषयी काहीही सांगता येत नाही.  अशा वेळेस आपण वैज्ञानिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या, माहितीच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी, सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी  'तयार' असणे आवश्यक आहे.
४) आज आपल्याकडे एखादे तंत्रज्ञान नाही, याचा अर्थ ते शक्य नाही, असाध्य आहे असे नव्हे. आजवर झालेली आपली वैज्ञानिक प्रगती हेच सांगते की बुद्धिमत्तेला दिलेली सातत्यपूर्ण प्रयोगांची , निरंतर सायासाची जोड हेच यशाचे सूत्र राहिले आहे.

थोडेसे अवांतर  : 
2014 MU69 याचा अर्थ ही 'object' २०१४ मध्ये शोधली गेली. 
M याचा अर्थ ही जूनच्या दुसर्‍या पंधरवड्यात शोधली गेली.  इथे  गणित असे आहे  =>  A,B जानेवारी,  C,D फेब्रुवारी  ....  L,M जून    [I वगळायचा] ) .
आणि जूनच्या दुसर्‍या पंधरवड्यात शोधलेली ती  1745 वी 'object' आहे.    
(25 x 69) + U => 1725 + 20  (A पासून U पर्यंत   I वगळून आकडे मोजणे)  => 1745

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा