परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाविषयी, UFO आणि तत्सम गोष्टींविषयीचे काही दावे पूर्वीच्या एका लेखांकात येऊन गेले आहेत. या व्यतिरिक्त, पृथ्वीवर परग्रहवासीयांच्या खुणा सापडण्याविषयीही अनेक दावे केले गेले आहेत. अर्वाचीन काळातील त्याची सुरुवात झाली होती, प्रामुख्याने तंत्रज्ञानातील प्रगतीने वेग पकडल्यावर. पण तरीही दुसर्या महायुद्धाच्या काळात परग्रहवासीयांच्या कथांची बीजे रोवली गेली असे म्हटले तर ते चुकीचे नव्हे. पण यामागे खरंच परग्रहवासी होते की आणखी काही कारण होते ?
दुसर्या महायुद्धाच्या काळात साम्राज्यवादाच्या, वर्चस्वाच्या भावनेतून शस्त्रस्पर्धेला जे उधाण आले होते, त्यातून नवीन, आव्हानात्मक तंत्रज्ञानाला साध्य करण्याच्या एका अनिवार ओढीने अनेक देश ग्रस्त झाले होते. त्या काळात हिटलरच्या मनात तांत्रिकदृष्ट्याही अव्वल ठरण्याच्या स्वप्नाने घर केले नसते तरचनवल. विविध सांकेतिक नावांखाली नानाविविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न, इतर अनेक देशांप्रमाणे जर्मनीतही तेंव्हा सुरू होते. या संदर्भात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. त्यात क्षेपणास्त्र, उडत्या तबकड्या, कालप्रवास, Teleportation, अंटार्टिकातील तळ आणि बर्याच प्रयोगांबद्दल, बरेच काही बोलले जाते. पण त्यात सर्वात उल्लेखनीय आहेत, ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना पराभूत करणारे प्रयोग.
दूरवरच्या अवकाशप्रवासांना अंतराव्यतिरिक्त अडसर ठरणार्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यातील एक प्रमुख आहे इंधन. पण या अडचणीवर मात करण्याचे प्रयत्न, अवकाशयुग सुरू होण्यापूर्वीच झाले होते ! दुसर्या महायुद्धाच्या काळात.
आजही कुठल्याही अवकाशमोहिमेला येणार्या खर्चात बर्यापैकी मोठा वाटा असतो इंधनाचा. यातील बरेचसे इंधन हे पृथ्वीची सोबत सोडतानाच खर्च होते आणि त्याचे कारण आहे गुरुत्वाकर्षण. स्वाभाविकच जर गुरुत्वाकर्षणावर मात करणारे तंत्रज्ञान शोधता आले तर अवकाशमोहिमाच नव्हे, तर पृथ्वीवरील हवाई वाहतुकीत (नागरी वा लष्करी) आमुलाग्र बदल घडू शकतील. तरीही थेट प्रतिगुरुत्वाकर्षणाचे (anti gravity) अवघड लक्ष्य का निवडले असावे ?
याचे सांगितले जाणारे कारण आहे, १९३७ साली जर्मनीमधल्या एका गावात बिघाड होऊन आदळलेले एक परग्रहवासीयाचे अंतराळयान व त्या यानात जिवंत अवस्थेत सापडलेला एक परग्रहवासी. आता या घटनेबाबत विश्वासार्ह मानता येईल असा कोणताही पुरावा नाही. पण जी काही थोडीफार माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ही बातमी वेगाने हिटलरपर्यंत पोहोचली आणि तात्काळ जर्मनीच्या सैन्यदलाने, त्या यानाचे विखुरलेले भाग ताब्यात घेऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. या दोन्ही ठिकाणी त्या अवशेषांवर काम करणार्या वैज्ञानिकांची, तज्ज्ञांची मुख्य जबाबदारी होती, ती त्या अवशेषामागच्या तंत्रज्ञानाचे 'Reverse Engineering' करण्याची. यापैकी एका गटात Walter Horten आणि Reimar Horten हे वैमानिक बंधु होते. अधिकृतरित्या या बंधुंचे aeronautics वा तत्सम संबंधित शास्त्राचे कोणतेही तंत्रशिक्षण झालेले नव्हते. पण याच बंधुंच्या नावे, त्याच दशकातल्या प्रगत अशा, Horten Ho 229, या स्टेल्थ तंत्रज्ञान असलेल्या, बॉम्बचा मारा करू शकणार्या विमानांची संरचना करण्याचे व त्यांची चाचणी घेण्याचे श्रेय जाते. अर्थात हे सिद्ध करणे अशक्य आहे की हे यश, त्या अंतराळयानाची 'Reverse Engineering' केल्याची परिणती होती.
गुरुत्वाकर्षणावर मात करण्याची योजना अधिकृतरीत्या पूर्णत्वास गेली नाही, मात्र प्रायोगिकदृष्ट्या तिने काही प्रमाणात निश्चित यश मिळविले होते. अशाच प्रकारे प्रगत रॉकेटसंबंधी संशोधन करणार्या चमूमध्ये होता अभियंता Werner von Braun ज्याने हिटलरसाठी, सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध) V-2 रॉकेट्सची निर्मिती केली. दुसर्या महायुद्धानंतर हे सर्व तंत्रज्ञान आणि त्यावर काम करणारे शास्त्रज्ञ, अभियंते देखील आयते अमेरिकेच्या हातात सापडले. दुसर्या महायुद्धानंतर, जर्मनीतील शास्त्रज्ञांची जी फळी अमेरिकेला 'सामील' झाली, त्यात Werner von Braun याचाही समावेश होता. अमेरिकेसाठी नंतर याने Saturn V रॉकेटची निर्मिती केली जे पुढे जाऊन Apollo प्रकल्पात व Skylab ला अवकाशात पाठविण्यासाठी वापरले गेले.
हिटलरने अंटार्टिका येथे, गुप्त संशोधनासाठी तळ वसविला होता यासंबंधीचेही, तिथल्या संशोधनासंबंधीचे जे अनेक अचाट दावे करण्यात आले होते, त्यातील
काही wikileaks ने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे नाकारले होते. तरीही असा कोणताही तळ बांधलाच गेला नाही असे मानण्याइतका, संशय पुरता विरलेला नाही, याचे कारण आहे Google Earth वर (-66° 55' 32.17", +99° 83' 82.94") अंटार्टिकासंबंधी नकाशे zoom करून बघितल्यावर सापडलेले काहीतरी अनोखे चित्र. जे सोबत दिले आहे. या प्रवेशद्वाराची अंदाजे उंची ३० मीटर इतकी आहे व रुंदी ९० मीटर. शब्दश: 'मरणाच्या थंडीत' इतक्या विशाल प्रवेशद्वाराची गरज का पडावी ?
Reverse Engineering हीच पद्धत वापरुन, Roswell च्या घटनेचाही (आणि कदाचित त्याआधी घडलेल्या काही घटनांचाही), अमेरिकेने अशाच प्रकारे करून उपयोग करून घेतला, हा समज गेली अनेक वर्षे टिकला आहे आणि त्याला कारणीभूत आहे, अमेरिकेने एकंदरच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने मारलेली भरारी आणि सध्या Area 51 या नावाने सुप्रसिद्ध असलेली व ज्याबाबतीत टोकाची गुप्तता, सुरक्षितता बाळगली जाते, अशी Nevada
मध्ये असलेली, संशोधन व चाचणी प्रयोगशाळा. अमेरिकन वायुदलाच्या अधिपत्याखाली असलेले हे क्षेत्र, जवळजवळ १५० चौ किमी इतक्या विस्तीर्ण भूभागावर पसरलेले आहे. Area 51 बाबत अमेरिकन सरकार फार काही बोलायला तयार नसते. अनेक वर्षे Area 51 चे अस्तित्वच नाकारल्यानंतर , एका न्यायालयीन याचिकेमुळे, जुलै/ऑगस्ट २०१३ मध्ये त्याचे अस्तित्व CIA तर्फे मान्य करण्यात आले. अधिकृतरित्या तिथे केवळ वायुदलाशी निगडीत अशा गोष्टी होतात, पण या विभागावरून वा विभागाच्या आसपास फिरकायला नागरीच नव्हे तर सामान्य स्तरावरच्या लष्करी विमानांनाही बंदी आहे. या टोकाच्या गुप्ततेमुळे जागृत झालेले कुतूहल इतके तीव्र आहे, की त्यातून अनेक कथा निपजतात. तिथे परग्रहवासी आहेत, ते नियमित येतात, तिथे परग्रहवासीयांशी संकर करण्याचे प्रयोग चालतात, तिथे Teleportation, Weather Weapon चे प्रयोग होतात, कालप्रवासाशी निगडीत संशोधन तिथे चालते असे अनेक खळबळजनक दावे चक्क छायाचित्रे, video वापरुन केले गेले आहेत. (त्या क्षेत्रात कुठल्याही स्वरूपाच्या photography ला मनाई आहे तरीही). अनेक देशांच्या मानवनिर्मित उपग्रहांनी घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर, काहींनी त्या छायाचित्रांचे विश्लेषण करण्यात प्रचंड वेळ, शक्ती आणि पाने (अगदी वेब ची असली तरी :-) ) खर्ची घातली आहेत आणि Area 51 चे सात मजले जमिनीखाली आहेत, तसेच जमिनीखाली रेल्वेचे जाळे आहे असेही दावे केले आहेत. या संदर्भात काही अत्यंत विश्लेषक स्वरूपाच्या आणि काही अंशी तथ्य असू शकेल अशा माहितीसोबतच, प्रचंड मनोरंजक साहित्यही इंटरनेटवर उपलब्ध आहे.
परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील वावराविषयी पुरावा म्हणून दाखविली जाणारी आणखी एक गोष्ट आहे Crop Circles. भरघोस पीक असलेल्या विस्तीर्ण
शेतांमध्ये, मोठ्या क्षेत्रातील पीके अत्यंत थोड्या वेळात (बहुदा रात्रीच्या वेळी) वाकवून, विविध संमितीय आणि क्वचित असंमितीय रचनेचे आकाशातून सुंदर दिसणारे आकार तयार होतात आणि ते तिथे कसे आले याबद्दल सुयोग्य स्पष्टीकरण सापडत नाही, तेंव्हा ही Crop Circles म्हणजे परग्रहवासीयांनी त्यांचे अस्तित्व जाणवून देण्यासाठी वा संवादाचे एक साधन म्हणून केलेला प्रयत्न आहे असे मानण्याकडे अनेक जणांचा कल बनतो. ही Crop Circles मानवी प्रयत्नाने बनविता येतात असे काही जणांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले आहे. पण प्रामुख्याने अमेरिका व युरोप खंडात, आणि मर्यादित प्रमाणात जगभर आढळणार्या सर्वच अशा प्रकारच्या Crop Circles ना मानवनिर्मित म्हणायला जीभ
धजावणार नाही, इतके कित्येकांचे आकार विशाल, सुंदर, अचूक आणि अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. या बाबतीत मतमतांतरे आहेत आणि या Crop Circles चा अभ्यास करणार्या एका गटाचे म्हणणे असे आहे की यातील साधारण ८०% ही निश्चितपणे मानवनिर्मित आहेत. उरलेली जी आहेत त्यांच्या मागे बहुदा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात क्वचित होणारे आकस्मिक बदल असावेत. दुसर्या गटातील अभ्यासकांनी असे मत नोंदविले आहे की त्यांचे विशाल आकार लक्षात घेता, सुबकता लक्षात घेता, अत्यंत कमी वेळात अशी Crop Circles कुठल्याही उपकरणाशिवाय बनविणे शक्य नाही. कारण काही ठिकाणी शेतांवर नजर ठेवलेली असूनही काही सेकंदात असे आकार निर्माण झाल्याची विपुल उदाहरणे आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की ही Crop Circles तयार करण्यामागे आपल्याला अज्ञात अशी एखादी शक्ती आहे आणि जिथे जिथे Crop Circles तयार झाली शेतातील तेवढ्या भागाची सुपीकता त्यांना वाढलेली आढळली. कित्येक वेळा Crop Circles तयार झालेल्या भागातील कॅमेरे, इतर उपकरणे नादुरुस्त झाल्याचीही त्यांना आढळली आहेत.
Bermuda Triangle हे परग्रहवासीयांच्या अस्तित्वाशी जोडले गेलेले आणखी एक मोठे आणि सुप्रसिद्ध प्रकरण. दुसर्या महायुद्धानंतरच्या काळात विमानांच्या व नौकांच्या गायब होण्याची अनेक प्रकरणे, जेंव्हा एका विशिष्ट त्रिकोणीय सागरी क्षेत्राशी जोडली जायला लागली, तेंव्हा Bermuda Triangle चा जन्म झाला. या विषयावर प्रचंड काथ्याकूट झाले आहे आणि इंटरनेटवरही या संबंधीच्या घटनांची यादी, दावे, प्रतिदावे, स्पष्टीकरणे अशी प्रचंड माहिती उपलब्ध आहे. पण विशेष म्हणजे, दुसर्याच काय पण पहिल्या महायुद्धापूर्वीही, नौका गायब होण्याच्या घटना या त्रिकोणाशी संबंधित आहेत असे निदर्शनास आले आहे. या क्षेत्राशी शेवटची घटना ही २० सप्टेंबर २०१५ रोजी घडली आहे आणि यावेळेस नौकेच्या कॅप्टनचा शेवटचा संदेश होता की 'नौकेचे मुख्य इंजिन बंद पडले आहे आणि नौका १५ अंशाने कलली आहे. त्यामुळे नौकेत शिरलेले पाणी आता आटोक्यात आणण्यात आले आहे.' त्यानंतर कोणताही संदेश आला नाही आणि शेवटी नौका गायब झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळेस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यामुळे जो खोलवर शोध घेण्यात आला त्यातून , SS El Faro ही ७९० फूटी मालवाहू नौका Joaquin नावाच्या चक्रीवादळात सापडून बुडाल्याचे व साधारण १५,००० फूट खोल अंतरावर ती एकसंध अवस्थेत समुद्रतळावर असल्याचे सांगण्यात आले. उपग्रहाच्या छायाचित्रांनीही याला दुजोरा दिला, मात्र अजूनही
काही तांत्रिक कारणांमुळे तिचा Voyage Data Recorder हस्तगत करण्यात यश आलेले नाही आणि नौकेतील एकाही व्यक्तीच्या मृतदेहाचा अद्याप तपास लागू शकलेला नाही. Bermuda Triangle प्रमाणेच विमाने, नौका गायब होण्याच्या घटनांशी संबंध असलेले आणि त्यामुळे गूढतेचे वलय लाभलेले आणखीही काही विभाग असे आहेत असे काही UFO वाद्यांचे म्हणणे आहे. हे विभाग आहेत Bass Strait Triangle, Bennington Triangle, Bridgewater Triangle, Broad Haven Triangle, Devil's Sea, Pag Triangle. याशिवाय Vile vortex हा अशा बारा जागांचा संच आहे (ज्यात Bermuda Triangle आणि Devil's Sea ही येतात) ज्या विभागात गूढ, पूर्णत: उकल न होऊ शकणार्या घटना अधूनमधून घडतात, ज्यांचा संबंध परग्रहवासीयांशी जोडला जातो.
या व्यतिरिक्त आपल्याला अचंबित करू शकतील अशा पुरातन पण प्रगत संस्कृतींच्या अस्तित्वाच्या अनेक खाणाखुणा आज सापडतात. प्राचीन काळी प्रगत तंत्रज्ञान होते हे न मानणार्या, न स्विकारणार्या वैज्ञानिकांची संख्या बर्यापैकी मोठी आहे. मग त्या गोष्टींना कसे साध्य केले असावे याची बर्याचदा थातुरमातुर, हास्यास्पद स्पष्टीकरणे दिली जातात. अशा अचंबित करू शकणार्या खुणांमध्ये पिरॅमिड्सचा प्रथम क्रमांक आहे. पिरॅमिड्स म्हटले की आपल्या डोळ्यासमोर इजिप्त आणि त्यातही विशेषत: Giza चा पिरॅमिड येतो. पण इजिप्तमधील सर्वात जुना पिरॅमिड हा Saqqara पिरॅमिड असून त्याचा काळ हा इ.स. पूर्व २६७० असा सांगितला जातो. Giza त्याच्या नंतरच्या शतकातला आहे. सर्वात अलिकडचा पिरॅमिड हा (आता) सुदान मध्ये असलेला Nuri पिरॅमिड (इ.स.पूर्व ६६४) हा आहे. सुरुवातीच्या पिरॅमिड्सची भव्यता आणि काटेकोर परिमाणे, बांधणी अलीकडच्या पिरॅमिडमध्ये नाही. पण केवळ पिरॅमिड हा आश्चर्याचा भाग नाही. त्याव्यतिरिक्त Tutankhamun, Akhenaten ते अगदी उलट्या दिशेने Tuthmosis I पर्यंत आणि अठराव्या राजघराण्यातील काही इतर व्यक्ती यांच्या डोक्याचा आकार व काही इतर शारीरिक वैशिष्ट्ये, सख्ख्या भावंडातील लग्नाच्या प्रथा या प्रथमदर्शनी, स्वाभाविक अर्थाने पूर्णत: मानवी वाटत नाहीत. अर्थात अधिकृतरीत्या, सापडलेल्या सर्व ममींचा जनुकीय अभ्यास करणार्या वैज्ञानिकांच्या , वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते त्यांच्या DNA मध्ये अमानवी असे काहीही सापडलेले नाही.
इजिप्त व्यतिरिक्त जगात इतर ठिकाणीही पिरॅमिड्स सापडले आहेत आणि ते ही तसेच विशाल आकाराचे आहेत. मेक्सिकोमध्ये असलेल्या अनेक पिरॅमिड्सपैकी एक असलेला , Great Pyramid of Cholula, हा ४४.५ लक्ष क्युबिक मीटर इतके आकारमान असलेला, आकारमानाने जगातील सर्वात मोठा असा पिरॅमिड आहे. चीनमध्येही पिरॅमिडसदृश, तितकीशी सुबक नसलेली बांधकामे आहेत. Mausoleum of the First Qin Emperor हा त्यातील सर्वात प्रसिद्ध. Nubian pyramids या नावाने ओळखला जाणारा पिरॅमिड्सचा समूह सुदानमध्ये आहे. Pyramids of Argolis या नावाने परिचित असलेले काहीसे ओबडधोबड आकाराचे पिरॅमिड्स ग्रीसमध्ये आहेत. इटलीमध्ये, इराकमध्ये, पेरु देशातही पिरॅमिड्स सापडले आहेत. इतकेच कशाला पण ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला काहीसे दूर, अटलांटिक समुद्रात असलेल्या Samoa बेटावरही पिरॅमिड सापडला आहे. हे सर्व पिरॅमिड्स थडगी म्हणून वापरण्याची प्रथा सर्वत्र पसरावी, ही त्या काळातील मर्यादित दळणवळणाची साधने लक्षात घेता, ही काहीशी विचित्र गोष्ट आहे.
पण पिरमिड्स व्यतिरिक्तही, अनेक गोष्टी कुणी, कधी व कशासाठी अशा प्रश्नचक्रात गुरफटलेल्या आहेत. आणि स्वाभाविकपणे परग्रहवासीयांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यातील काही आहेत :
१) Nazaca Lines : पेरु देशातील Nazaca पठारावर सर्वत्र पसरलेली, किमान २००० वर्षे जुनी असलेली विविध आणि विशाल आकाराची आकृतीचित्रे. या आकृत्या केवळ विमानातून (अर्थात आकाशातून) पाहिल्या तरच लक्षात येतात.
२) Band of Holes : Nazaca पठाराच्या एका भागात असलेला हा साधारण ५००० ते ६००० खड्ड्यांचा पट्टा. न वापरलेल्या थडग्यांचे खड्डे असे वर्गीकरण झालेला हा पट्टा देखील विमानातून पाहिल्यावर लक्षात आला.
३) Easter Island Statues (Moai) : द. अमेरिकेच्या पश्चिम किनार्यापासून दूर, पॅसिफिक महासागरात, काहीशा एका
की असलेल्या ईस्टर बेटे या बेटसमूहावर असलेले विचित्र आकाराचे, कित्येक टन वजनाचे, दूरवर नजर लावून बसलेले पुतळे. ४) Guatemala Stone Head : Guatemala देशातील जंगलात सापडलेले अत्यंत सुबक आणि विशाल आकाराचे मानवी दगडी डोके. सध्या हे उध्वस्त अवस्थेत आहे.
५) Dolmen of Menga : थडगी म्हणून वापरण्यात आलेले प्रचंड मोठे दगडी बांधकाम. वापरण्यात आलेले दगड १०० ते २०० टन वजनाचे. काळ अंदाजे इ.स.पूर्व २५००.
यातील बर्याचशा गोष्टींचे विशाल आकार, दूरवरून, क्वचित आकाशातूनच दिसू शकतील अशी त्यांची रचना, प्रमाणबद्धता, पूर्णत: न उलगडलेला हेतु यामुळे त्यांच्याभोवती एक गूढतेचे वलय आहे. त्यामुळेच कदाचित त्यांच्यासोबत परग्रहवासीयांचे नाव जोडले जाते.
काही गोष्टी निसर्गनिर्मित आहेत असे मानले जाते, पण त्यांचा आकार काही वेगळेच सांगतो. त्यातील प्रमुख आहेत :
१) Badlands Guardian, Alberta, Canada : पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या उंचसखलपणामुळे, चिकणमातीने बनलेल्या तिथल्या जमिनीच्या विशिष्ट ठिकाणी झालेल्या झीजेमुळे भूपृष्ठाला एका मानवी मस्तकाचा अत्यंत ठाशीव आकार आला आहे, जो केवळ आकाशातून लक्षात येतो.
२) Baigong Pipes : Baigong पर्वताच्या पायथ्याशी एका गुहेत पाईपाप्रमाणे असलेले नळकांड्याचे एक जाळे एका खार्या पाण्याच्या सरोवरापर्यंत गेलेले आहे. यातील कित्येक पाईप सारख्या आकाराचे आहेत तर एक पाईप चक्क १६ इंच इतका जाड. या पर्वताचा आकारही पिरॅमिडशी काहीसा जुळता.
३) Klerksdorp sphere : द. आफ्रिकेतील एका खाणीत सापडलेले असंख्य गोल किंवा चपट्या गोल आकाराचे हे मोठ्या सुपारी एवढे हे गोटे, त्यांच्या उगमाविषयी योग्य कारणमीमांसा होऊ न शकल्याने गूढतेचे वलय बाळगून आहेत.
याशिवाय ज्यांचे मूळ, पृथ्वी असावे असे 'वाटत नाही', अशा काही गोष्टीही लोकांच्या हाती सापडल्या आहेत. त्यातील काही विशेष उल्लेखनीय गोष्टी आहेत :
१) Betz Mystery Sphere : हा खराखुरा कोड्यात पाडणारा, स्वयंप्रेरणेने हालचाल करणारा गोलक. याचा उलगडा वैज्ञानिक परीक्षणानंतरही होऊ शकलेला नाही.
२) Quimbaya artifacts (Ancient Aeroplane models) : हजार वर्षापेक्षाही अधिक जुन्या विमानाच्या आकाराच्या प्रतिकृती. यातील बर्याचशा सोन्याने बनलेल्या आहेत.
३) Antikythera mechanism : वैज्ञानिकांनाही सर्वाधिक चकित करून गेलेली वस्तू. साधारण इ.स. पूर्व २२५ च्या आसपास निर्माण करण्यात आलेला आणि बहुदा खगोलीय गणितासाठी उपयोगात येत असावा असा analogue computer .
४) Dorchester Pot : एखाद्या सामान्य फुलदाणीसारखी वस्तु जी एक दगड फोडल्यावर, दगडाच्या आत सापडली. दगड तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागू शकतात हे लक्षात घेतल्यावर यासंबंधीचे कुतूहल लक्षात येते.
५) Ubaid Lizard Men : इराकमधील उत्खननात सापडलेली अंदाजे ७००० वर्षे जुनी मानवी शरीर आणि सरड्याचे तोंड असलेल्या, हातात दूध
पिते अपत्य असलेल्या स्त्रीच्या अनेक प्रतिकृती६) The Tomb of K'inich Janaab' Pakal : या 'थडग्यात'सापडलेल्या अनेक चित्रविचित्र गोष्टींमध्ये सर्वात उल्लेखनीय आहे, ते शवपेटीचे झाकण ज्यावर एखाद्या यानात बसून ते यान नियंत्रित करणार्या 'व्यक्तीची'आकृती आहे.
वर दिलेल्या यादीतील प्रत्येक गोष्टीवर एक स्वतंत्र पोस्ट होऊ शकेल इतकी माहिती उपलब्ध आहे. मी जाणीवपूर्वक रोमन लिपीत, त्यांची यादी दिली आहे, जेणेकरून ज्यांना अधिक जिज्ञासा आहे ते सवडीनुसार search engine मध्ये copy-paste करून शोधू शकतील.
विशाल आकाराची, प्रचंड वजनाची दगडी बांधकामे करण्याचा 'शौक' हा प्राचीन काळात जगभर सर्वत्र आढळतो, जणू इतक्या वजनाचे दगड उचलणे ही त्या काळातील लोकांसाठी अगदी सहज गोष्ट होती. अनेक ठिकाणी या दगडांचे बांधकामही इतके सुबक आणि परस्परांशी अत्यंत सहज जोडकाम केलेले आहे की दगड वितळवून जोडले आहेत कि काय अशी शंका यावी. पण तरीही तशा कोणत्याही खुणा दगडांवर नाहीत. हे तंत्रज्ञान आजही उपलब्ध नाही असे म्हणू शकू, अशी खरंतर परिस्थिती आहे. शिवाय अशी अनेक बांधकामे थडगी म्हणून वापरलेली दिसत असली, तरी त्यांचा मूळ उद्देश तोच होता असे सिद्ध करणे अशक्य आहे. अशीच शंका सापडलेल्या काही गोष्टींबाबत घेतली जाते. ज्या काळात तंत्रज्ञान, विज्ञान आजच्याएवढे प्रगत नव्हते, त्या काळातील अशा गोष्टी सापडू लागल्या, की ज्या आजच्या तंत्रज्ञानाशी साम्य दाखवतात तर, आपल्या मूळ गृहितकांवर प्रश्न उभे राहतात. एकंदरच या सर्व गोष्टींबाबत प्रश्न अधिक आहेत आणि समर्पक उत्तरे कमी आणि त्यामुळेच कदाचित त्यांच्याभोवती एक गूढतेचे धुके आहे, जे स्वाभाविकपणे त्यांना परकीय जीवसृष्टीशी जोडते.









कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा