सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (९ / ९)



Erich von daniken च्या 'ancient alien theory' ला विरोध करणारा एक मोठा वर्ग आहे.  या सिद्धांताला खरे ठरविण्याच्या प्रयत्नात, त्यावर स्वत:च्या विचारांचे कलम करण्याच्या प्रयत्नात, सिद्धांताच्या पाठीराख्यांनी  क्वचित कित्येक वेळा ओढून ताणून दिलेली स्पष्टीकरणे, प्रत्येक गूढ गोष्टीला या सिद्धांताशी जोडण्याचे प्रयत्न इत्यादि गोष्टींचा अतिरेक झाला आणि आणि या सिद्धांताची टवाळी उडविणारा वर्गही वाढला. तसेही बर्‍याचदा एखाद्या प्रस्थापित घटनेच्या वा समजुतीच्या वा सिद्धांताच्या पेक्षा काहीतरी दुसर्‍या टोकाची मांडणी वा अत्यंत विपरीत विचार मांडणार्‍या व्यक्ती विक्षिप्त मानल्या जातात आणि त्यांच्या मांडणीमधले काही योग्य मुद्दे देखील नाकारले जातात. तसेच अशा प्रकारची मांडणी करणार्‍या व्यक्ती देखील त्यांच्या स्वत:च्या विचारसरणीच्या प्रेमात पडून ती विचारसरणी प्रमाणाबाहेर ताणतात वा सर्वव्यापी करण्याचे प्रयत्न करतात. erich von daniken च्या बाबतीतही असेच काहीसे झाले असावे ही शक्यता आहे.

पण काही पूर्वग्रह असल्यास ते बाजूला ठेवून, daniken ची मांडणी वाचली तर,  daniken च्या सिद्धांतातील मूळ बीज अगदीच नाकारण्यासारखे नाही हे लक्षात येईल.  हे बीज विचारात घेतल्यावर जगातील विविध ठिकाणच्या देवांशी संबंधित काही गोष्टींची तर्कसंगत मांडणी करता येते हे खरे आहे. याच सिद्धांताच्या चौकटीत आपल्या पौराणिक गोष्टी बसविण्याचे काही प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत आणि त्यातून काही उत्तरे मिळतातही, काही रूपककथांचा उलगडा होऊ शकतो,  पण तरीही सर्वच ठिकाणी ते लागू पडत नाही हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्या वैदिक आणि विशेषत: पौराणिक ग्रंथामधून अनेक ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचे उल्लेख आढळतात. पण यातील फार कमी उल्लेख, हे तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाचे स्पष्टीकरण देणारे आहेत. इतर सर्व उल्लेख हे केवळ, तंत्रज्ञान कुणाकडून (तपस्या वा अन्य मार्गाने)  मिळवल्याचे किंवा त्याचा वापर झाल्याचे आहेत.  मौखिक परंपरा जपणार्‍या वेदकाळी, लेखनकला व लेखनाची सामुग्री या संदर्भात विपुलता असावी असे दिसत नाही. नियमित जीवनक्रमात, विलक्षण असेही काही दिसत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान, विज्ञान यांचा उपयोग, वापर ही आजच्यासारखी सामान्य गोष्ट होती, असे म्हणण्यासारखे पुरावे नाहीत. पण विविध ऋचांमधून तंत्रज्ञानाशी संबंधित काही उल्लेख आहेत आणि त्यातील बहुसंख्य हे देवतांशी संबंधित आहेत किंवा मर्यादित व्यक्तींना हे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे आहेत. काही अपवाद वगळता, देवतांचे उल्लेखही बहुदा आवाहनासाठी किंवा स्तुतीपर असेच येतात. या देवतांपैकी अनेक देवता या निसर्गदेवता आहेत, पण सर्वच नाहीत.

मुख्य म्हणजे  या देवतांना विश्वनिर्माते मानलेले नाही, तसे सूचित करणारे काही उल्लेख ऋग्वेदात आहेत. 

== source : satsangdhara.net ==
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२९ (नासदीय सूक्त)
कः अद्धा वेद कः इह प्र वोचत् कुतः आजाता कुतः इयं वि-सृष्टिः
अर्वाक् देवाः अस्य वि-सर्जनेन अथ कः वेद यतः आबभूव ॥ ६ ॥
हे सर्व जरी खरे, तरी ह्या सर्व गोष्टी वस्तुत: अनुभवाने कोणाला कळतात ? आणि ते आम्हांला इथे येऊन कोण सांगणार ? ही नाना प्रकारची विविध सृष्टि कोठून आली किंवा कशापासून कशा प्रकारे निर्माण झाली असेल ? देवांना हे ठाऊक आहे असें म्हणावे तर देव तर सृष्टीच्या नंतरचे, त्यांना काय माहीत ? मग आतां हे कसे झाले ते कोण सांगेल ? ६.
--
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २०
अयं देवाय जन्मने स्तोमः विप्रेभिः आसया । अकारि रत्नऽधातमः ॥ १ ॥
जन्मास येण्याच्या यातायातीतून ज्या देवांची सुटका झाली नाही त्यांचे प्रित्यर्थ विद्वान उपासकांनी ही स्तुती स्वमुखाने गायली होती. ह्या स्तुतीच्या योगाने उत्कृष्ट वैभवांची प्राप्ती होण्याजोगी आहे. ॥ १ ॥
== ==

या देवता विश्वनिर्मात्या नाहीत, पण तरीही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले आहे.  ज्या देवता निसर्गदेवता नाहीत, त्यांचीही श्रेष्ठता मान्य करण्यात आली आहे,त्यांना पूजनीय मानले आहे आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची अनेक स्तोत्रे रचली आहेत. एकत्रितपणे या सर्व गोष्टींकडे पाहता त्यातून निघणारा अर्थ असा तर नाही ना की  या देवता अशा एका प्रजातीचा घटक आहेत, जी मानवापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ, सामर्थ्यशाली आहे ?  सामर्थ्यवान, श्रेष्ठ ते पूजनीय, वंदनीय, आदरणीय असावेत हे स्वाभाविक आहे.

--
देवांची संख्या ३३ कोटी इतकी मानली गेली आहे. ही संख्या एखाद्या 'लोका'ची वस्ती या दृष्टीकोनातून योग्य मानायला हरकत नाही.  या ३३ कोटी संख्येच्या संदर्भात अलीकडे एक स्पष्टीकरण असे देण्यात येते की  :
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)  => (यात नामभेद आहेत)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभाष हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)  => (यात नामभेद आहेत)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)  => (यात नामभेद आहेत)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार (नासत्य आणि द्स्त्र )   (नामभेद  => किंवा दुसर्‍या एका संदर्भानुसार इंद्र आणि प्रजापती)
असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात आणि यालाच ३३ कोटी असे म्हटले आहे. 
पण हे जर हे जर खरे मानले तर  देव दानव युद्ध,  त्यात काही वेळा होणारा देवांचा पराभव आणि वीरगती, अमृतमंथन, देवांचे संजीवनी विद्या मिळवण्यासाठीचे प्रयत्न या कथा निरर्थक होतात.  वेदात नमूद केलेल्या काही देवता व कालांतराने (संस्कृतीसंगम वा अन्य कारणाने) रूढ झालेले इतर देवी, देवता यांना या ३३ कोटीच्या सिद्धांतात बसविणे अवघड ठरते.   साहजिकच हे ३३ कोटीचे स्पष्टीकरण काहीसे लटके पडते. 
--

आपल्या ग्रंथांमधून वापरलेली 'लोक' ही संज्ञा ग्रहांसाठी पर्यायवाची आहे असे म्हणता येणार नाही, कारण 'लोक' या संज्ञेचा उपयोग विविध तर्‍हांनी झाला आहे. सप्तलोक (भूलोक, भुवर्लोक .... ) किंवा सप्तपाताळे (पाताळलोक) यांची वर्णने वस्तुत:  'ग्रह' या संज्ञेत मोडणारी नाहीत.  भूलोक म्हणजे पृथ्वी, भुवर्लोक म्हणजे पृथ्वी व सूर्य यांमधील जग, स्वर्लोक म्हणजे सूर्य व ध्रुव यांमधील इंद्रादि देवतांचे जग वगैरे व्याख्या, या खूप ढोबळ आणि संदिग्ध आहेत.  पण त्याचवेळी ब्रह्मलोकाचा काही ठिकाणी येणारा उल्लेख हा काहीसा वेगळा आहे. तिथे काळाचे मान वेगळे असल्याचा आहे. राजा ककुदमी व त्याची कन्या रेवती (बलरामाची पत्नी) यांच्या कथेत (भागवतपुराण ९.३.२९ ते ९.३.३३)  Time dilation ची संकल्पना स्पष्टपणे आली आहे. जिथे काळ हा पृथ्वीच्या तुलनेत अतिशय संथ गतीने सरकतो अशा ठिकाणी (कृष्णविवराच्याजवळ तर नव्हे ??) ब्रह्मलोक असल्याचे ही कथा सांगते.  ब्रह्मलोकासंबंधी 'अपावृतं' असे विशेषण वापरले आहे ज्याचा वाच्यार्थ  'उघडा', 'अनाच्छादित' असा होतो, ज्याचा इथे उलगडा होत नाही (Event Horizon च्या बाहेर ? ).  ब्रह्मदेवाच्या आयुष्याची जी गणना आहे तिथेही अशाच प्रकारच्या Time dilation चा उल्लेख आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य त्याच्या कालगणनेनुसार १०० वर्षे  व आपल्या कालगणनेनुसार ३,१,१,०,४०,००,००,००,००० वर्षे.  ज्याला आरंभ आहे त्याला अंतही आहे हा नियम एका अर्थाने ब्रह्मदेवाच्या बाबतीतही लागू आहे. असे का ?  या गोष्टी लक्षात घेतल्या तर असे म्हणता येईल का, की हा अप्रत्यक्षपणे दुसर्‍या अत्यंत प्रगत जीवसृष्टीचा, वेगळ्या स्तरावरच्या, कदाचित वेगळ्या मितीतला जीवसृष्टीचा उल्लेख आहे ?  

'धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगेयुगे' च का,  या प्रश्नाचे निश्चित उत्तर हे Time dilation मध्ये तर नाही ना ?

इंद्रादी देव (demigods ?) मानवाच्या तुलनेत प्रचंड शक्तिमान आहेत, पण सर्वशक्तिमान नाहीत. ते दानवांकडून पराभूत झाल्याचे उल्लेख आहेत. त्यांनी मानवाचे, ऋषींचे सहाय्य घेतल्याच्या घटना आहेत. त्यांना रागलोभादी भावना आहेत. समुद्रमंथनाची व पर्यायाने अमृतामुळे, अमरत्व लाभण्याची गोष्ट असो किंवा कचाने शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या मिळवण्याची कथा असो, त्यांना अप्राप्य असे काही होते आणि ते मिळवण्यासाठी त्यांना काही वेगळे मार्ग अवलंबावे लागले आहेत.  पृथ्वीवरच्या काही घडामोडीत त्यांना विशेष स्वारस्य होते असे एकंदर दिसते.  विशेषत: पृथ्वीवर एक ठराविक व्यवस्था असावी याची अनेकदा त्यांनी काळजी घेतल्याचे जाणवते.

इंद्र हे एक पद असल्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. कित्येक वेळा राक्षसांनी,  मानवांनी या पदाची अभिलाषा ठेवल्याचे, काहीवेळा ते बळकाविल्याचे उल्लेख आहेत.  हातात असलेल्या सत्तेचा अधिकाधिक उपयोग करून घेणे, स्वत:च्या पदाला धोका होऊ नये म्हणून वापरलेले विविध मार्ग, अतिलालसेपायी, उपभोगाच्या आहारी जाऊन काही अनुचित वर्तन करणे, त्यापायी शाप झेलावा लागणे इत्यादि इंद्राच्या गोष्टी या आपल्या मनात असलेल्या देवाच्या प्रतिमेशी जुळणार्‍या आहेत का ? की इंद्रपदावर आरुढ झालेल्या एखाद्या सत्ताधीशाशी त्या अधिक साधर्म्य दाखवितात ?
देव, दानव, असुर, दैत्य आदींची वंशावळ उलटक्रमाने पाहत गेलो तर ती शेवटी ब्रह्मदेवाशी जाऊन पोहोचते.  असुर, दानव, दैत्य यांचे या वंशावळीतील स्थान व पृथ्वीवरील वसतिस्थान यांचा काही प्रमाणात का होईना अंदाज बांधता येतो. हीच गोष्ट राक्षसांच्या बाबतीत ठामपणे सांगण्यासारखी परिस्थिती नाही, पण त्यांचेही वसतिस्थान पृथ्वीतलावरच असावे असे म्हणता येईल. पौराणिक ग्रंथातून आढळणार्‍या यक्ष, गंधर्व आदि जमातींबाबतही असे काही अंदाज बांधले जातात. महासागरात खोलवर वस्ती करणारे निवातकवच (Nivatakavacha) (निर्वातकवच नव्हे) हे  ancient alien सिद्धांताच्या पाठीराख्यांना बळ देणारे, न उलगडलेले कोडे आहे.  काही जणांनी देवांचे वसतिस्थान शोधताना,  देवांचा संबंध तिबेटशी जोडलेला आढळतो. पण स्वर्गाचे तत्कालीन वर्णन हे किमान आजच्या तिबेटशी जुळणारे नाही. (देवांचे स्थान चिन्यांच्या ताब्यात आहे आणि तरीही देव शांत आहेत, हे देवांच्या स्वभावाला अनुसरूनही नाही. :-)  )
 
ऋग्वेदात स्वर्गलोकाचे वा इतर 'लोकांचे' वर्णन असलेल्या ऋचा फार थोड्या आहेत.  पण पुढील वर्णन स्वर्गलोकाचे असावे असे वाटते
== source : satsangdhara.net ==
यत्र ज्योतिः अजस्रं यस्मिन् लोके स्वः हितं
तस्मिन् मां धेहि पवमान अमृते लोके अक्षिते इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ७ ॥
ज्या ठिकाणी प्रकाश अखंड आहे, ज्या ठिकाणी दिव्यतेज सांठविलेले आहे, त्या ठिकाणी, हे पावनप्रवाहा, त्या अक्षय अमरलोकीं, मला स्थापन कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ७

यत्र राजा वैवस्वतः यत्र अव रोधनं दिवः
यत्र अमूः यह्वतीः आपः तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ८ ॥
ज्या ठिकाणी विवस्वानाचा पुत्र यमराज वास्तव्य करतो, ज्या ठिकाणी द्युलोकाचें - दृष्टीच्या टप्प्यांत नसलेले - गुप्तस्थान आहे, ज्या ठिकाणी भर वेगानें धांवणार्‍या आपोदेवी राहतात, त्या ठिकाणी मला ठेवून अमर कर, आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ८

यत्र अनु कामं चरणं त्रि नाके त्रि दिवे दिवः
लोकाः यत्र ज्योतिष्मन्तः तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ९ ॥
द्युलोकाच्या ज्या तिसर्‍या उच्चलोकांत, ज्या तिसर्‍या दिव्यलोकांत, वाटेल तिकडे संचार करता येतो; ज्या ठिकाणी सर्व स्थळे तेजोमय आहेत, तेथे मला ठेऊन अमर कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ९

यत्र कामाः नि कामाः च यत्र ब्रध्नस्य विष्टपं
स्वधा च यत्र तृप्तिः च तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ १० ॥
ज्या ठिकाणी काम्यकर्म करणारे, आणि तसेच निष्कामकर्म आचरणारे लोक राहतात, जे सृष्टीच्या मूलस्तंभाचे स्थान आहे, ज्या ठिकाणी स्वधा (म्हणजे स्वयंसिद्ध अमृत) आहे, ज्या ठिकाणी तृप्ति आहे, अशा ठिकाणी मला ठेऊन अमर कर, आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. १०

यत्र आनन्दाः च मोदाः च मुदः प्र मुदः आसते
कामस्य यत्र आप्ताः कामाः तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ११ ॥
ज्या ठिकाणी आनंद आहेत, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष वासनेच्याही वासना सफल होतात त्या ठिकाणी मला ठेऊन अमर कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ११
-- --

या संदर्भात अशीही भूमिका वाचनात आली  की, स्वर्गलोक हे त्रिमित जगातील प्रत्यक्ष स्थान नसून, अध्यात्मिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या अस्तित्वात असलेली स्थिती किंवा जागा आहे. आणि यासाठी करण्यात येणारे बरेचसे दावे हे 'सदेह स्वर्गात जाता येत नाही किंवा येणार नाही' या नियमावर आणि  मरणोपरांत, पापपुण्याधारित स्वर्गलोकाची (किंवा नरकाची) प्राप्ती या संकल्पनांवर आधारित आहेत. पण सदेह स्वर्गरोहणाची काही उदाहरणे आहेत. पुरुरवा हा इंद्राच्या दरबाराला वारंवार भेट देत असल्याचा उल्लेख आहे. महाभारताच्या शेवटी युधिष्ठिर सदेह स्वर्गात गेल्याची कथा आहे.  महाभारत युद्धापूर्वी अर्जुनाने इंद्राची राजधानी अमरावती इथे काही काळ घालविल्याचा उल्लेख आहे.  सत्यव्रत (त्रिशंकु) च्या कथेत सशरीर स्वर्गात पाठविण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे, जो प्रयत्न इंद्राने हाणून पाडला. पण याच कथेत विश्वामित्राने प्रतिस्वर्गाची निर्मिती करून तेथे त्रिशंकुची व्यवस्था लावल्याचाही उल्लेख आहे.  अमरावती, इंद्राचा दरबार, अप्सरा, नंदनवन, कल्पवृक्ष इत्यादि गोष्टींचे जे उल्लेख पुराणात आहेत ते खरे मानले, तर ते प्रत्यक्ष स्थानाचे नसावेत असे कसे म्हणावे ? कदाचित ते स्थान वेगळ्या मितीत असू शकेल.

पुराणांची रचना तुलनेने अलीकडच्या काळातील (जास्तीत जास्त २५०० वर्षे) आहे असे जे ठोस विधान सरसकट केले जाते, त्याचा मला उमगणारा अर्थ हा, त्यांचे पुनर्लेखन त्या काळात झाले असा आहे. अर्थात या पुनर्लेखनाच्या वेळी काही गोष्टी त्यात नव्याने टाकल्या गेल्या असतील, काही कथांना, संदर्भांना नवीन पुटे चढविली गेली असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. एकंदरच पुराणे ही, रूपककथा, दंतकथा, मूळ कथांमध्ये कल्पनाविलासामुळे पडलेली भर, क्वचित प्रक्षिप्त गोष्टी यांचे जंजाळ आहेत हे काही प्रमाणात मान्य करूनही, सर्व पुराणे तुलनेने अलीकडच्या काळात लिहिली गेली हाच दृष्टीकोन पुढे रेटायचा म्हटले, तर  महाभारतातील पुराणांचे, पुराणातील कथांचे जे विपुल उल्लेख आहेत ते ही सर्व प्रक्षिप्त आहेत असे म्हणावे लागेल ! महाभारत हा इतिहास मानला तर, महाभारतातील कथांचे उल्लेख मात्र fiction असे कसे मानता येईल ?

भविष्यकाळाचे अनेकदा यथार्थ ज्ञान असणे, आकाशवाणी होणे, प्रगट होणे, अंतर्धान पावणे, आकाशगमन, अस्त्रे व त्यांचे उपयोग, ती योग्य व्यक्तींच्या हाती पडावीत, त्यांचा वापर विनाकारण होऊ नये, यासाठी देवता (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे)  घेत असलेली काळजी इत्यादि गोष्टी विज्ञानाशी, अतिप्रगत तंत्रज्ञानाशी निगडीत नाहीत असे म्हणणे, म्हणजे एक प्रकारची डोळेझाक आहे.  रामायण, महाभारतातील युद्धे ही त्या काळातील प्रगतीशी सुसंगत असताना, जिथे जिथे अस्त्रांचा वापर झाला आहे, तिथे तिथे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे देवतांचा संबंध आला आहे. अस्त्रांचे ज्ञान, तंत्रज्ञान हे तत्कालीन मानवासाठी केवळ वापरापुरते मर्यादित आहे, संशोधनाशी, मूळातून विकसित होण्याशी नाही. त्या अस्त्रांची तुलना आजच्या काळातील अस्त्रांशी करणे हे त्यामुळेच तितकेसे योग्य नव्हे. सरळसोट अर्थ घेतला तर त्यावेळची अस्त्रे ही मंत्रांशी निगडीत आहेत किंवा मंत्रांच्या सहाय्याने ती activate करता येत असत ,  ती 'fire' झाल्यानंतरही परत घेता येत असत ,  विचलित (redirect) करून त्यांचे लक्ष्य ऐनवेळी बदलता येत असे  (ब्रह्मशिरास्त्र उत्तरेच्या गर्भावर !).  या व अशा अनेक गोष्टींचा आजच्या युद्धविषयक तंत्रज्ञानाशी पूर्णत: मेळ जमत नाही. त्यावेळेचे तंत्रज्ञान हे आजच्या तंत्रज्ञानाशी जुळणारे असलेच पाहिजे हा आग्रह कशाला हवा ?  तंत्रज्ञानाचा उगम, विकास, वापर व लोप ही वारंवार घडणारी प्रक्रिया आहे ही गोष्ट पुरातन स्थापत्याच्या (पिरॅमिड व इतरही अनेक) ज्या खुणा आज उरल्या आहेत त्यातून स्पष्ट होते.

वर्षानुवर्षांच्या परकीय आक्रमणांमुळे,  परकीय जीवसृष्टीबाबत ठाम निष्कर्ष काढता येतील अशा आपल्या देशातील (विशेषत: उत्तर भारतातील) अनेक खुणा नष्ट झाल्या आहेत, नष्ट केल्या गेल्या आहेत, पळविल्या गेल्या आहेत.  ज्या काही खुणा वाचल्या आहेत त्यासंदर्भात अत्यंत खोलवर संशोधन करण्यासंदर्भात, एक अनास्था वरपासून खालपर्यंत पूर्णत: झिरपली आहे असे वाटते. अशावेळेस उपलब्ध ग्रंथसंपत्ती, स्थापत्याच्या खुणा हे कदाचित एक चांगले साधन ठरू शकते. त्या दृष्टीने वेचक, वेधक प्रयत्न करण्याऐवजी, अशा प्रयत्नांना  प्रोत्साहन, बळ देण्याऐवजी,  या खुणा, ग्रंथातील उल्लेख नाकारण्याचे, त्याचा विपरीत अर्थ लावण्याच्या मताचे बर्‍यापैकी प्राबल्य अनेकदा दिसून आले आहे.  या ग्रंथांना सरसकट 'fiction' ठरविण्याचे, उद्योग करणारी मंडळी नक्की त्यातून काय साधतात हे त्यांनाच माहीत.

आक्रमणांच्या झळांनी भाजून निघालेल्या भारतात, पुरातन काळातील प्रगत तंत्रज्ञानाच्या व पर्यायाने परग्रहवासीयांच्या काही खुणा मंदिरे, लेणी, गुहा इत्यादि
ठिकाणी, विशेषत: जिथे दगडी बांधकाम आहे, तिथे काही प्रमाणात टिकून राहिल्या आहेत. वेरूळ लेणी, विशेषत: कैलासनाथ मंदिर हे राष्ट्रकूट काळातील राज्यकर्त्यांनी बनविले यावर विश्वास ठेवणे खरेच अवघड वाटते. या लेण्यांचा आकार लक्षात घेता ३० लाख घनमीटर (साधारण ८० लक्ष टन) इतका दगड त्या पर्वतातून कोरून काढावा लागला असेल असा अंदाज वर्तविण्यात येतो. हा कोरून काढलेला दगड आजूबाजूला कुठेच दिसत नाही हेच मुळी विस्मयकारक आहे. आज उपलब्ध तंत्रज्ञानाने सुद्धा इतका दगड खोदायला आणि मग शिल्पे कोरायला लागणारा काळही, लेण्यांच्या बांधकामाचा जो काळ (१८ वर्षे) पूर्वी सांगितला जात असे  त्याच्याशी पूर्ण विसंगत आहे. (८० लाख टन / १८ वर्षे => प्रतिवर्षी साधारण साडेचार लाख टन  ==>  प्रतिदिवशी १२०० टन !) .  त्यातून हा दगड विलक्षण कठीण आहे.  निर्मितीसाठीच नव्हे तर उध्वस्त करून पाहणार्‍यासाठीही.   कदाचित याच कारणास्तव धर्मांध, इस्लामी क्रूरकर्मा औरंगजेबाला ही लेणी उध्वस्त करण्याचा प्रयत्न तीन वर्षांनंतर सोडून द्यावा लागला असावा !

एक पूर्ण पहाड खोदून, कोरून  बनविलेल्या कैलासनाथ मंदिरात तर अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.  असा दावा केला गेला आहे की जगातील हे असे एकमेव मंदिर आहे जिथे एक पूर्ण पहाड खोदत, कोरत वरून खाली येत मंदिराची निर्मिती झाली आहे. आजच्या अनुमानाप्रमाणे, गणिताप्रमाणे , या मंदिराच्या निर्मितीला लागलेला वेळ हा शंभर वर्षांपेक्षाही अधिक असायला हवा, तसेच अनुमानाप्रमाणे या कामासाठी आवश्यक असलेल्या शिल्पकारांची, मजुरांची
संख्या ही कित्येक हजारात जाते, पण उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार हे मंदिर केवळ १८ वर्षात बांधून पुरे झाले. ही गोष्ट जर खरी मानली, तर त्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान आपल्या परिचयाचे नाही असेच म्हणायला हवे. आजच्यासारखी स्फोटके व यंत्रे त्या काळात असल्याची माहिती आपल्याकडे नाही.  या मंदिराची निर्मिती करताना साधारण ४ लाख टन इतका दगड खोडून काढावा लागला असेल असा अंदाज आहे. हा राडारोडा कुठे टाकला असावा ? त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की पहाड वरून खोदत जायचे तर त्याचे नियोजन कसे केले असावे ? वेरूळ लेणी ज्या जागी आहेत, ते लक्षात घेता, अशा ठिकाणी दीर्घकाळ, हजारो लोकांच्या राहण्याची, जेवणाची सोय करणे ही सामान्य गोष्ट आहे का ?

पुरातन काळातील प्रगत तंत्रज्ञानाच्या व कदाचित परग्रहवासीयांच्या भारतातील वावराच्या , त्यांनी दिलेल्या किंवा  लोकांनी पाहिलेल्या तंत्रज्ञानाच्या काही मोजक्या संभाव्य खुणा

शक्य ती छायाचित्रे सोबत upload केली आहेत.

१) छत्तीसगढच्या चारामा तालुक्यात सापडलेली काही भित्तिचित्रे ही स्पष्टपणे परग्रहवासीयांशी निगडीत आहेत असे म्हणता येईल.
२) प्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील एक शिल्प हे आश्चर्यकारक रित्या jetpack शी साधर्म्य दाखविते.
३) वेरूळ लेण्यांतून खाली जाणारी अनेक भुयारे आहेत, आणि यातील कित्येक ही, लहान मुलेही जाऊ शकणार नाहीत इतकी छोटी आहेत. कित्येक ठिकाणी जमीनीवरही अत्यंत खोल असलेली छिद्रे आहेत. ही भुयारे मानवासाठी बनविलेली नसावीत आणि जमीनीवरची छिद्रे ही जमिनीखाली असलेल्या 'hideout' साठी वातायने आहेत  असे काही  ancient alien सिद्धांताच्या समर्थकांचे म्हणणे आहे.  ही भुयारे कुठे जातात, या संदर्भात यंत्रमानव, drone वापरुन पुरेसे संशोधन झालेले नाही.
४) कैलासनाथ मंदिर आकाशातून पाहिले असता, आकाशातून दिसणार्‍या फुलीसदृश आकारामुळे  स्पष्टपणे ओळखू येते. हा आकार जाणीवपूर्वक बनविला आहे असे ancient alien सिद्धांताच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
५) महाबलीपुरम येथील 'Krishna's Butter Ball' या नावाने सध्या ओळखला जाणारा २५० टन वजनाचा दगड. हा दगड एका उतारावर साधारण २ चौ.फू. इतक्या छोट्याशा जागेत टेकून उभा आहे आणि असे सांगितले जाते की १९०८ मध्ये मद्रासच्या तत्कालीन गव्हर्नरने,  या दगडाला,   सात हत्ती
वापरुन, त्याच्या जागेवरून, उतारावरून खाली आणण्याचे प्रयत्न केले होते व ते प्रयत्न संपूर्णपणे विफल झाले.  कदाचित आजच्या तंत्रज्ञानालाही इतक्या वजनाचा एक दगड अशा उतारावर दीर्घकाळ स्थिर ठेवणे खूप अवघड जाईल. तर मग हे शेकडो वर्षांपूर्वी कसे साध्य केले असेल ?  आजचे प्रगत तंत्रज्ञान वापरुन निदान हा दगड तळास जोडलेला आहे का किंवा तो ज्या उंचवट्यावर (टेकाडावर) उभा आहे तिथे खाली काही आहे का हे शोधणे अवघड ठरू नये. या टेकाडाविषयी असे सुद्धा सांगितले जाते की त्याची उंची दरवर्षी कमी होत आहे.
६) महाबलीपुरम येथील 'गणेशरथ' या नावाने सध्या ओळखले जाणारे मंदिर हे साधारण ६० वर्षांपूर्वी 'विमान' या नावाने ओळखले जात होते (एकंदरच दक्षिणेतील अनेक मंदिरांना 'विमान' अशी संज्ञा आहे) . असे सांगितले जाते की तिथे असलेली गणेशाची मूर्ती ही साधारण ५० वर्षांपूर्वी तिथे स्थापन करण्यात आली. त्यापूर्वी तिथे शिवलिंगासमान काही शिल्प होते असे म्हणतात. या रथाच्या अगदी शिखरावर एक मस्तक कोरलेले आहे, ज्या
च्या डोक्यावरचा मुकुट
हा काहीसा वेगळा असून त्याच्या दोन्ही बाजूला 'शिंगे' आहेत. या मुकूटाला खाली हेल्मेटसारखा पट्टा आहे. या मस्तकाच्या थोडे खाली, अजून एक तसेच
छोटे मस्तक असून त्याच्या खाली एखाद्या रॉकेटप्रमाणे एक आकृती आहे. हे कशाचे निदर्शक आहे ?   याच रथाच्या खालच्या भागात चार वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे कोरलेले आहेत जे विविध मानववंशाचे असावेत असे म्हणता येईल. अशा प्रकारचे 'रथशिल्प' उभारण्याचे काय प्रयोजन असावे ?

रहस्यांचा उलगडा न होऊ शकल्याने किंवा त्यासंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण मिळू न शकल्याने, त्याला तात्काळ ancient alien सिद्धांताशी जोडणे योग्य नव्हे हे खरे, पण जेंव्हा अशा अनेक गोष्टी एकाच सिद्धांताशी मिळत्याजुळत्या दिसू लागतात, तेंव्हा अतार्किक स्पष्टीकरणे देण्यापेक्षा कदाचित त्या दृष्टीकोनातून विचार केला, प्रयत्न केले तर काही रहस्ये उलगडू शकतीलही.  आजही  कदाचित घनदाट जंगलात, रानावनात,  दुर्गम पर्वतरांगांमध्ये, आवश्यक तिथे उत्खनन केल्यास,  स्थानिकांचे सहकार्य मिळवत नियोजनबद्ध शोध घेतला तर काही विलक्षण गोष्टी अजूनही सापडू शकतील.

----
थोडेसे अवांतर :
ककुद्मीच्या कथेचे मूळ श्लोक
===============
श्रीमद् भागवत पुराण
नवमः स्कंधः
तृतीयोऽध्यायः
==== source http://satsangdhara.net/bhp/bhp09-03.htm ====
....
तस्य पुत्रशतं जज्ञे ककुद्मि ज्येष्ठमुत्तमम् ।
ककुद्मी रेवतीं कन्यां स्वां आदाय विभुं गतः ॥ २९ ॥
पुत्र्या वरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकं अपावृतम् ।
आवर्तमाने गान्धर्वे स्थितोऽलब्धक्षणः क्षणम् ॥ ३० ॥
त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते. त्यांपैकी सर्वांत थोरला ककुद्मी होता. ककुद्मी आपली कन्या घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला. (२९-३०)

तदन्त आद्यमानम्य स्वाभिप्रायं न्यवेदयत् ।
तत् श्रुत्वा भगवान् ब्रह्मा प्रहस्य तमुवाच ह ॥ ३१ ॥
त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव त्याला हसून म्हणाले, (३१)

अहो राजन् निरुद्धास्ते कालेन हृदि ये कृताः ।
तत्पुत्रपौत्र नप्तॄणां गोत्राणि च न श्रृण्महे ॥ ३२ ॥
राजा ! तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास, ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता त्यांचे मुलगे, नातू, पणतू इतकेच काय गोत्रांची नावेसुद्धा शिल्लक राहिली नाहीत. (३२)

कालोऽभियातस्त्रिणव चतुर्युगविकल्पितः ।
तद्‍गच्छ देवदेवांशो बलदेवो महाबलः ॥ ३३ ॥
मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तू परत जा. यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत. (३३)
----

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा