आपण त्रिमित जगात राहतो असे आपण म्हणतो तेंव्हा मापन करता येईल अशा लांबी, रुंदी आणि उंची (किंवा खोली) अशा तीन दिशांचा, अर्थात एका प्रकारे तीन अक्षांचा विचार करतो. एखाद्या वस्तु अमुक एका ठिकाणी आहे असे आपण सांगतो, तेंव्हा अर्थातच ही तीन मापने आपल्या मेंदूने विचारात घेतलेली असतात. यात खरेतर एक चौथे परिमाणही असते ते असते काळाचे. अमुक एक वस्तु एखाद्या ठिकाणी आहे हे सांगताना, ते परिमाण बदलणार नाही, असे गृहीत धरूनच आपण ते सांगितलेले असते. आणि त्याचे कारण बर्याचदा, ती वस्तु स्वयंचलित नाही, हे असते. पण एखाद्या चलित गोष्टीविषयी उदा. एखादे वाहन किंवा एखादा प्राणी किंवा मनुष्य यांच्या बाबत बोलताना काळाचे हे चौथे परिमाण आपण विचारात घेऊन बोलतो.
उदा. एखाद्या मनुष्याविषयी बोलताना 'अरे आत्ताच बघितला होता अमुक अमुक बिल्डिंगमध्ये दुसर्या मजल्यावर , लगेच गेलास तिथे, तर भेट होईल तुझी.' असे वाक्य जेंव्हा आपण बोलतो तेंव्हा काळ हे चौथे परिमाणदेखील कार्यरत असल्याचे भान आपल्याला असते. याच कारणास्तव 'काळ ही आपल्या त्रिमित जगातील चौथी मिती आहे' हे विधान स्वीकारताना आपल्याला फारसे खटकत नाही.
पण काळ ही खरंच चौथी मिती आहे का ? की काळ म्हणजे आणखी काही आहे ?
कल्पना करा एका प्रतलात (उदा. कागदावर) राहणारा एक द्विमितीय जीव आहे. तो त्या प्रतलात सर्वत्र प्रवास करू शकतो. पण उंची किंवा खोली ही तिसरी मिती त्याला उपलब्धच नाही. अर्थात त्याला उंचीचे भानच नाही. पण तरीही त्याच्या द्विमित जगात प्रवास करताना काळाचा अंमल त्या जीवावर आहे. त्याला काळाचे भान आहे की नाही हे अर्थातच सांगता येणार नाही, पण एक निरीक्षक म्हणून, जेंव्हा आपण अशा जीवाकडे पाहू, तेंव्हा अमुक एका वेळी तो अमुक ठिकाणी होता असे आपण म्हणू शकतो. याचाच दुसरा अर्थ असा होतो की द्विमित जगातसुद्धा काळ ही मिती लागू आहे. हाच न्याय एकमितीय जगात (अर्थात एका सरळ रेषेत) राहणार्या जीवालाही लागू होईल. म्हणजेच स्थळातील मिती कमी झाली किंवा वाढली, तरी काळ या मितीत बदल होत नाही. ती एकमितीय, द्विमितीय जगातही अस्तित्वात असणे हे स्वाभाविक आहे.
आपलेही कदाचित असेच तर होत नाही आहे ना ? जसे द्विमितीय जीवाला उंचीचे भान नाही तसेच आपल्या स्थलबद्ध त्रिमित जगातच कदाचित चौथ्या मितीचा (आणि कदाचित आणखीही) अक्ष आहे, पण आपल्याला त्याची जाणीवच नाही आहे. असे असणे अगदीच शक्य नाही असे नाही. पण एक गोष्ट आणखी म्हणता येईल की असे चतुर्मितीय जग असलेच, तरीही काळ व त्याचे परिणाम त्या चतुर्मितीय जगातही असतीलच.
कुठल्याही मितीला मान हे असलेच पाहिजे, थोडक्यात तिचे मापन करता आले पाहिजे. काळाचे निर्विवाद मापन करता येते. आपण ज्या त्रिमित जगात राहतो तिथे प्रत्येक मितींमध्ये आपण दोन्ही दिशांना प्रवास करू शकतो. काळ ही मिती आहे असे मानले तर या मितीमध्ये दोन्ही दिशांना प्रवासाची गुरुकिल्ली, अजूनतरी आपल्याला गवसलेली नाही. काळ या मितीत आपला प्रवास हा एकाच दिशेला होतो आणि त्यावरही आपले थेट नियंत्रण नाही. या संदर्भात निरंतर झालेल्या संशोधनातून, या एकदिशीय प्रवासाचा वेग कसा नियंत्रित करता येईल, या दृष्टीने जो काही अभ्यास झाला आहे, जे काही संशोधन झाले आहे, त्या आधारे इतकेच म्हणता येईल की या मितीचे दार आपल्यासाठी काहीसे किलकिले झाले आहे. पण प्रत्यक्ष नियंत्रण सध्यातरी आपल्या आवाक्याबाहेर आहे.
स्थळाशी संबंधित असलेल्या आणि आपल्याला ज्ञात असलेल्या, तिन्ही मितींचे मान गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली बदलत नाही. पण काळाचे तसे नाही. गुरुत्वाकर्षणाच्या व्यस्त प्रमाणात (सापेक्ष) काळाच्या वेगाचे मान वाढते. जितके अधिक गुरुत्वाकर्षण तितका (सापेक्ष) काळाचा वेग कमी आणि गुरुत्वाकर्षण जसे कमी होत जाईल तसतसा (सापेक्ष) काळ हा अधिकाधिक वेगाने धावेल. अर्थात काळाच्या वेगातील हा बदल दुसर्या एखाद्या ठिकाणी (उ.दा. पृथ्वीवर) असणार्या काळाच्या संदर्भातच मोजता येईल. त्या कमी वा अधिक गुरुत्वाकर्षणात प्रत्यक्ष वावरणार्यांना काळाच्या वेगातील बदलाची जाणीव होणार नाही. याचाच दुसरा अर्थ असा की काळाचा वेग हा सापेक्ष आहे. मग एका अर्थाने कालप्रवासही सापेक्ष आहे असे म्हणता येईल का ?


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा