गुरुवार, २९ सप्टेंबर, २०१६

कालप्रवास - लेखांक ६ / ७



काळ आणि पर्यायाने कालप्रवासाशी संबंधित काही विचारधारा, संदर्भ हे तुलनेने वैज्ञानिकदृष्ट्या कमी प्रयोगशील असून, बर्‍यापैकी तत्वज्ञानाच्या पातळीवर जातात.

यातील एक महत्त्वाचा संदर्भ आहे तो समांतर विश्वांचा. कालप्रवासाच्या माध्यमातून भूतकाळात बदल केल्यामुळे जो विरोधाभास निर्माण होऊ शकतो त्याचा
प्रतिवाद म्हणून मांडला गेलेला .

प्रत्येक घटनेच्या संदर्भात, आयुष्याच्या प्रत्येक अशा टप्प्यावर,  जिथे जिथे विकल्प व निवड उपलब्ध असते तिथे तिथे ही समांतर विश्वे तयार होतात, असे समांतर विश्वांबाबतची आधुनिक विचारसरणी मानते. समांतर विश्वे म्हणजे नक्की काय आहे ?

उदाहरणादाखल समजा एका व्यक्तीची,  कंपनी १ आणि कंपनी २  या दोन कंपन्यांकडून एकाच वेळेस नोकरीसाठी निवड झाली आणि त्याने कंपनी १ ची निवड केली , तर अशा वेळेस तो ज्या विश्वात आत्ता आहे त्याव्यतिरिक्त आणखी (किमान) दोन विश्वे निर्माण होतात. या दोन विश्वातील एका विश्वात त्याने कंपनी २ ची निवड केलेली असते आणि दुसर्‍या विश्वात त्याने दोन्ही कंपन्यांच्या offers नाकारलेल्या असतात.  या तिन्ही विश्वात त्या नोकरीसंबंधी निर्णयाच्या आधीच्या त्याच्या आयुष्यातील सर्व घटना समान असतात. ही विचारधारा असे मानते की प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील, प्रत्येक घटनेच्या संदर्भात अशा पद्धतीने नवीन विश्वे तयार होतात आणि ही सर्व विश्वे एकाच वेळी अस्तित्वात असतात.  या प्रत्येक विश्वात ती व्यक्ती अर्थातच वेगवेगळ्या स्थितीत असू शकते. अशी व्यक्ती ज्या विश्वात राहते, ते विश्व तिच्यासाठी अस्तित्वात असते. त्यामुळे स्वत:च्या विश्वाव्यतिरिक्त इतर विश्वे ही आपल्यासाठी अदृश्य आहेत.

या विचारसरणीमुळे अक्षरश: अनंत विश्वे निर्माण होतील. त्यामुळे हे अशक्य आहे असा विचार चटकन मनात येतो . ही संकल्पना स्वीकारायला, पचनी पडायला अवघड आहे हे मान्य करूनही मुद्दाम नमूद करण्यासारखी गोष्ट ही आहे की अनेक नामवंत वैज्ञानिक या विचारधारेला योग्य मानतात आणि तसेच अनेक जण या विचारसरणीचे कट्टर विरोधकही आहेत.  या विचारधारेचे सर्वात मोठे वैगुण्य हे आहे की ही विचारधारा पुराव्यानिशी सिद्ध करणे हे सध्यातरी आपल्यासाठी जवळजवळ अशक्य आहे.

या विचारधारेशी काहीशी जुळणारी, अशी एक मांडणी आपल्या पुराणांतून आढळते. हे विश्व म्हणजे माया आहे असे तत्वज्ञान मांडणार्‍या योगवासिष्ठात समांतर
विश्वांची संकल्पना, अत्यंत वेगळ्या प्रकारे आणि विविध स्तरांवर मांडली आहे. तिथे प्रत्येक विश्वाला एक ब्रह्मा आहे, विष्णू आहे आणि शिवही (रुद्र)  आहे, अशा अर्थाचा उल्लेख आहे. भागवतपुराणातही अनेक ठिकाणी अनंत ब्रह्मांडांचा उल्लेख आहे.  ब्रह्मवैवर्त पुराणातही अशाच प्रकारचा उल्लेख असल्याचे वाचले होते.





समांतर विश्वे आणि कालप्रवासाची यांची संगती समजून घेण्यासाठी पुढील उदाहरण उपयुक्त ठरेल.   

समजा २०१६ मध्ये क्ष या व्यक्तीला भूतकाळात कालप्रवास करणे शक्य आहे. या व्यक्तीने भूतकाळात जाऊन त्याच्या आयुष्यातील २००२ सालातील एक घटना बदलायचे ठरवले व त्याप्रमाणे, भूतकाळात जाऊन त्याने २००२ सालची ती घटना बदलण्यात समजा त्याला यश आले. नंतर तो  २०१६ या वर्षात परतला आणि २०१६ चा वर्तमानकाळ त्याला अपेक्षेप्रमाणे बदललेला दिसला.  पण इथे समांतर विश्वांच्या विचारधारेनुसार, ज्या क्षणी क्ष भूतकाळातील घटना बदलतो, त्या क्षणी त्याची, त्याच्या मूळ विश्वात परतण्याची शक्यता लोप पावते.  तो जी घटना बदलतो, ती निर्णायक घटना असल्याने, त्या घटनेच्या वेळी, जी समांतर विश्वे निर्माण झाली असतील, त्यातील एका सुसंगत विश्वात क्ष परततो.  पण त्याच्या मूळ विश्वात, क्ष हा २०१६ साली भूतकाळात गेला आणि परत आला नाही अशी किंवा क्ष हा गायब झाला अशी नोंद राहते.

--

काळाचे स्वरूप स्पष्ट करण्यासाठी , नदीचे उदाहरण दिले जाते त्या संदर्भात एक प्रतिवाद अनेकदा केला गेला आहे. त्यानुसार जर काळ हा नदीसारखा वाहता मानला, तर कालप्रवास कधीच शक्य होता कामा नये , कारण नदीचे पात्र हा काळाचा अक्ष मानला, तर वाहते पाणी म्हणजे काळ होतो. मग एका विवक्षित बिंदूपासून (वर्तमानकाळापासून) मागे असलेले पाणीच (काळ) जर वाहतवाहत त्या बिंदूपाशी (वर्तमानकाळात) आले आहे असे म्हटले,  तर ते पाणी अचानक मागे किंवा पुढे  कसे जाऊ शकेल असा प्रश्न या संदर्भात केला जातो. इथे हे लक्षात घेतले पाहिजे की नदीचे उदाहरण हे केवळ प्रवाहाची दिशा, वेग आणि स्वयंचलन दर्शविण्यापुरते आहे. काळाचे स्वरूप तसेच असेल असे नाही. शिवाय नदीच्या प्रवाहात आपण योग्य क्षमतेची नौका वापरुन उलट्या दिशेने प्रवास करू शकतो किंवा प्रवाहाच्याच दिशेने, प्रवाहापेक्षा वेगात जाऊ शकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे.

दुसर्‍या एका विचारधारेनुसार काळाला गतीच नाही. अशी गती आपल्याला जाणविते हाच भ्रम आहे. या मतानुसार भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ हे सर्व, एकाचवेळी कायमस्वरूपी अस्तित्वात असतात.  अत्यंत असंभवनीय वाटणारा हा निष्कर्ष काळाला अक्ष मानल्यामुळे आपसूकच सिद्ध होतो असे या विचारधारेच्या समर्थकांचे म्हणणे आहे.. आपण जेंव्हा त्रिमित जगातील कोणत्याही अक्षाचा (X, Y, Z) विचार करतो तेंव्हा त्या अक्षावरील सर्व बिंदू हे एकाच वेळी अस्तित्वात असतात. मग चतुर्मित जगातील, काळ या अक्षावरील सर्व बिंदू एकाच वेळी अस्तित्वात आहेत, असे का मानू नये ? हा प्रश्न विचार करायला लावणारा आहे. आता जर काळाच्या अक्षावरील सर्व बिंदू एकाच वेळी अस्तित्वात आहेत, असे मानले तर भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ हे देखील एकाच वेळी अस्तित्वात आहेत असाच निष्कर्ष निघतो. आपल्याला या सर्व काळांचा अनुभव एकाच वेळी घेता येत नाही,  एका ठराविक क्रमानेच घेता येतो, याचे कारण कदाचित आपल्याकडे तसा अनुभव घेण्याची क्षमता नाही हे असू शकेल असे या विचारधारेच्या समर्थकांचे म्हणणे आहे. स्वाभाविकच एकाच वेळी अस्तित्वात असणार्‍या या तीनही काळांमध्ये प्रवास, हा केवळ त्या अक्षावर प्रवास करण्याची तांत्रिक क्षमता प्राप्त करण्याचा प्रश्न होतो, तात्विकदृष्ट्या ते शक्य आहे की  नाही याचा नव्हे.

--

कालप्रवासाच्या संदर्भात मर्यादित प्रमाणात गणिती दुजोरा मिळालेला, पण तरीही बर्‍याच अंशी केवळ कागदावर असलेला (अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळे) , आणखी एक मार्ग सुचविण्यात आला आहे. तो आहे 'Wormhole' (Einstein-Rosen bridge) चा. या आधीच्या लेखांकात SpaceTime च्या वक्रतेमुळे कालप्रवास कसा शक्य होऊ शकेल त्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्याच संदर्भात असा विचार करा की दोन अतिप्रचंड वस्तुमान असलेल्या आकाशस्थ वस्तू जर एकमेकांपासून इतक्या जवळ असतील, की त्यांच्यामुळे वक्र झालेला SpaceTime हा परस्परात मिसळून
जाईल, तर अशा वेळेस सोबतच्या चित्रात दाखविल्याप्रमाणे त्या वक्र SpaceTime मुळे एक बोगदा तयार होतो. (चित्रात जरी ऊर्ध्व आणि अधर दिशांना वक्रता दिसत असली तरी प्रत्यक्षात ती सर्व दिशांना असते) .  या बोगद्यातून केलेला प्रवास हा अवकाशप्रवासाचा काळ मोठ्या प्रमाणावर  घटवेल आणि कालप्रवासासही कारणीभूत ठरेल असा गणिती अंदाज आहे. या संदर्भात, आज करण्यात येणारे बरेचसे दावे हे असे तंत्रज्ञान प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टिकोनातून,  सध्यातरी अतिरंजितेच्याही सीमेपलीकडले आहेत. Cosmic Highway या संबोधनाने ओळखण्यात येणारी Wormhole ही सध्याच्या गणितानुसार कुठलाही प्रवास करण्याच्या दृष्टीने, इतकी अस्थिर आहेत की अशा प्रवासास आरंभ करताच ती नष्ट पावतील. 

--

कालप्रवासाच्या तात्विक किंवा गणिती शक्यता स्वीकारल्यानंतरही,  कालयंत्र प्रत्यक्षात येण्याच्या दृष्टीने फारशी प्रगती झाली आहे असे म्हणता येणार नाही.  अनेक चित्रपटांमधून कालयंत्राचे 'सुलभीकरण' करण्यात आलेली इतकी विविध प्रारूपे दाखवली आहेत की असे वाटून जाते, की इतके सोपे असेल तर कदाचित हा शोध लागलाही असेल !

Back To The Future मधील कार, Terminator आणि Seven Days मधील गोलक, The Time Machine मधील यांत्रिक गुंतागुंतीचा केवळ आभास निर्माण करणारी खुर्ची ,  Deja Vu मधील Snow White Window ला जोडणारी पोकळी,  MIB 3 मधील हातात धरता
येणारा  Time jump device एक ना अनेक उदाहरणे.  ज्यामुळे कालप्रवास हमखास शक्य होईल
असे आपल्याला माहीत असलेले जे दोन मार्ग आहेत ,अतिप्रचंड वेग किंवा अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण (Space Time Warp), यापैकी कुठल्याही  मार्गाचा या कालयंत्रांमध्ये वापर केल्याचा उल्लेख नाही. त्यादृष्टिकोनातून Interstellar मात्र खूपच उजवा होता. 






कालयंत्राचा शोध लावल्याचे दावे अधून मधून होत असतात आणि कालांतराने विरून जातात. (किंवा कदाचित विक्षिप्तपणाचे लेबल लावून,  पद्धतशीर cover-up केले जातात :-)  )  यातील अनेक दावे,  बर्‍याचदा वरील दोन मार्गांपेक्षा भिन्न अशा, अतितीव्र चुंबकीय बलाच्या साह्याने साध्य केलेल्या कालप्रवासाशी निगडीत असतात.   Vadim Chernobrov या रशियन आणि  Ali Razeghi या इराणी वैज्ञानिकांचे दावे हे तुलनेने अलिकडच्या काळातले आहेत.  पण या दाव्यांच्या पलीकडे जाऊन प्रमाण म्हणून अजूनपर्यंत एकही गोष्ट सिद्ध झालेली नसतानाही, अमेरिकन पेटंट ऑफिसमध्ये अशा शोधांचे काही दावे पडून आहेत ही आश्चर्याची गोष्ट आहे ! 

भविष्यात कालयंत्राचा शोध लागला (किंवा लागला असल्याचे उघड झाले), तरीही त्यातून प्रवास करणार्‍या मानवाच्या शरीरावर, त्याच्या DNA वर त्या कालप्रवासाचे होणारे परिणाम ही कदाचित चिंतेची बाब असू शकेल. तापमान, चुंबकीय क्षेत्र, गुरुत्वाकर्षण, वेग या आणि अशा अनेक गोष्टींबाबत मानवी शरीर, विलक्षण संवेदनशील असून, बिकट परिस्थितींमध्ये त्याची तग धरण्याची सरासरी क्षमता ही अत्यंत मर्यादित आहे. कालयंत्राचा वापर करताना या क्षमता प्रचंड ताणल्या जातील ही शक्यता नाकारता येत नाही.

कालयंत्राचा  शोध यदाकदाचित लागलाच, तर आणखी एक लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे, तो प्रत्यक्षात स्थलकालप्रवास असेल. याचे अगदी स्वाभाविक कारण हे आहे की पृथ्वीच्या परिवलन व परिभ्रमण गतीमुळे,तसेच सूर्य (त्याच्या सूर्यमालेसह) आकाशगंगेच्या केंद्राभोवती परिभ्रमण करत असल्याने,  वर्तमानकाळातील पृथ्वीचे स्थान व ज्या काळात जायचे आहे त्या काळातील पृथ्वीचे (सूर्यमालेतील आणि आकाशगंगेतील) स्थान एकसारखे नसेल. त्यामुळे केवळ काळाच्या अक्षावर प्रवास होऊन पृथ्वीवरच्या कुठल्याही काळी, त्याच स्थळी पोहोचणे हे सर्वस्वी अशक्य आहे.  स्वाभाविकच कालयंत्राला अनेक चित्रपटात दाखवतात, तशी केवळ काळाची तबकडी असेल , तर स्थळाचे खगोलगणित त्याचा प्रत्यक्ष प्रवासाच्या गणितात अंतर्भूत असावे लागेल.  अन्यथा कालप्रवास केल्यावर असा प्रवासी कुठेतरी अवकाशाच्या पोकळीत अवतरायचा !


--
थोडेसे अवांतर :
काळाचा अक्ष अस्तित्वात आहे असे मानल्यावर आणखी एका विसंगतीचे उत्तर देणे आवश्यक होते. कुठल्याही अक्षाला एकतर आरंभबिंदू असतो किंवा अक्ष दोन्ही बाजूंना अनंत आहे असे मानल्यास ऋण अक्ष अस्तित्वात असतो. काळाबाबत सध्या आपली जी काही समजूत आहे, त्यात काळाला ऋण अक्ष तर संभवतच नाही. त्यामुळे जर काळाला आरंभबिंदू आहे ही गोष्ट स्वीकारली तर काळ नक्की कधी सुरू झाला हा दुसरा प्रश्न उभा टाकतो, आणि याचे उत्तर देणे सोपे नाही. जर हे विश्व Big Bang मधून निर्माण झाले आहे हे आपण स्वीकारत असू, तर Big Bang पूर्वी काळ नव्हता असे मानावे लागेल. Big Bang पूर्वी काळ नव्हता याचा दुसरा अर्थ असा होतो की Big Bang ही काळाच्या आरंभबिंदू वर घडलेली घटना आहे असे म्हणायला हवे. किंवा सापेक्षता सिद्धांतनिष्ठ स्पष्टीकरण द्यायचे तर अनंत घनता आणि वस्तुमान यामुळे अनंत गुरुत्वाकर्षण असलेल्या शून्यावस्थेत काळ थांबलेला होता.  पण मग असा प्रश्न निर्माण होतो की Big Bang घडण्यास कारणीभूत झालेल्या घटनेचा काळ कोणता ? किंवा अधिक मागे गेले तर   Big Bang पूर्वी जे काही शून्यवत अस्तित्वात होते ते काळाविना कसे अस्तित्वात आले ?

सैद्धांतिक स्तरावर या प्रश्नांपासून सोडवणूक करून घेण्याचा एक मार्ग हा आहे की काळ हा आपल्या विश्वाचा घटक न मानता, आपल्याला अनोळखी अशा एखाद्या विश्वबाह्य कारणाचा आपल्या विश्वात होणारा/ जाणवणारा परिणाम आहे असे मानायला हवे. हे कारण काहीही असू शकेल, उदाहरणार्थ आपल्या विश्वाचे एखाद्या बाह्यविश्वात ठराविक वेगाने होणारे भ्रमण किंवा गुरुत्वाकर्षण क्षेत्रात एखादी वस्तू जशी ठराविक वेगाने खाली पडत असते, त्याप्रमाणे आपल्या विश्वाचे एखाद्या बाह्यक्षेत्रात होणारे पतन.
--


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा