कालप्रवासात येणार्या अडचणी या केवळ कालयंत्रातुन प्रवास करताना येणार्या शारीरिक अडचणींपुरत्या मर्यादित नाहीत. भूतकाळात किंवा भविष्यकाळात गेल्यावर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणे, हे प्रत्येक वेळी शक्य होईलच असे नाही. कालयात्रीला, संपूर्णपणे अनोळखी असणार्या जीवाणू, विषाणू, प्राणी यांचा सामना करावा लागू शकतो. भूतकाळातील एखादे रहस्य उलगडल्यामुळे किंवा काही विपरीत भविष्यकाळ समोर आल्यामुळे, काहीजणांना बसलेल्या मानसिक धक्क्याचे परिणामही, अतितीव्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कालयंत्रातील बिघाड, वापरातील चुका, मुद्दामहून घडवलेले घातपात या देखील अशक्य कोटीतील गोष्टी नाहीत.
कालप्रवासात अनेक अडचणी आहेत हे जरी खरे असले तरीही भविष्यात जर कालप्रवास शक्य झाला, कालयंत्राचा शोध लागला तर काय घडेल याचा विविध विज्ञानकथातून मागोवा घेण्यात आला आहे. या शोधानंतर, कालयंत्राचा भूतकाळासाठी वापर होतो की भविष्यकाळासाठी आणि भूतकाळात बदल करता येतात का किंवा भविष्यकाळ जाणल्यावर वर्तमानकाळातील निर्णय त्यानुसार बदलता येतात का या पर्यायांमध्ये विविध शक्यतांची बीजे आहेत.
--
जर असे मानले की कालप्रवास दोन्ही दिशांना शक्य आहे, पण कोणत्याही कालप्रवासात केवळ निरीक्षकाची भूमिकाच बजावता येते, पण वर्तमानकाळातील निर्णय बदलून भविष्यकाळही बदलता येतो तर ....
--
हा शोध कोणत्याही राजस प्रवृत्तीच्या देशाच्या, सरकारी पातळीवर लागला असेल तर ठराविक वर्तुळाबाहेर तो कुणालाही कळू नये यासाठी अत्यंत विलक्षण योजना आखली जाईल आणि त्या योजनेची कार्यवाही ही प्रचंड गुप्ततेत होईल. या संदर्भात इतकी टोकाची सुरक्षितता बाळगली जाईल की काही जणांचे समाजातील अस्तित्वच संपुष्टात येईल आणि त्यांना एक प्रकारच्या सरकारी नजरकैदेत उर्वरित आयुष्य घालवावे लागेल. पण जसा जसा कालयंत्राचा वापर वाढेल तसे त्याचे परिणाम, काही प्रमाणात का होईना सर्वांना जाणवायला लागतील. ज्या देशात हा शोध लागला असेल, तिथल्या सरकारच्या निर्णयप्रक्रियेत काहीशी गुंतागुंत जाणवायला लागेल, त्यांना बरेचसे निर्णय घेण्यासाठी कदाचित अधिक वेळ लागेल पण तरीही हे निर्णय ठामपणे घेतले जातेल आणि तशीच त्यांची अंमलबजावणी देखील होईल. कदाचित त्या निर्णयांमधील, काही निर्णय हे तर्काला, जनमानसाला न पटणारे असतील, पण तरीही कालांतराने त्यातील बरेचसे निर्णय योग्यच होते असे सिद्ध होईल. अशा देशातील सरकार हे तुलनेने अधिक स्थिर होईल, कालांतराने ते अधिक अधिकाराने, क्वचित काहीशा दडपशाहीने वागू लागेल . निवडणूकांमध्ये सरकारी पक्षच पुन्हा पुन्हा निवडून येईल. हळूहळू विरोधी पक्षांचा प्रभाव हा नगण्य होऊ लागेल. एकवेळ अशी येईल की देशात सर्वत्र एकाच पक्षाचा, एकछत्री अंमल निर्माण होईल.
इतिहासातील कित्येक घटनांची रहस्ये उलगडतील पण तरीही काळवेळ पाहून, त्यातील काही ठराविक रहस्येच जनतेसमोर उघड केली जातील. मात्र तरीही कालयंत्राच्या शोधाचे रहस्य दीर्घकाळ दडवून ठेवणे अशा सरकारला शक्य होणार नाही. स्वपक्षातील असंतुष्ट , विरोधी पक्ष किंवा इतर देशांच्या गुप्तहेर यंत्रणांना याचा कधीतरी सुगावा लागेलच. सरकार ही गोष्ट नाकारण्याचा, तिची सुरक्षितता वाढविण्याचा प्रयत्न करेल. कालयंत्राच्या माध्यमातूनच या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न होईल, पण जर कुठलाच पर्याय उपलब्ध नाही , अशी स्थिती आली तर कालांतराने विविध दबावांखाली, सरकारला, एकतर ही यंत्रणाच नष्ट करावी लागेल किंवा हे रहस्य जनतेसमोर उघड करावेच लागेल. आणि मग अशा देशात अभूतपूर्व गोंधळ माजेल. आणीबाणीसम परिस्थिती निर्माण होईल. ज्या वैज्ञानिकांनी याचा शोध लावला असेल त्यांच्या जीवाला मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होईल. ही यंत्रणा मिळवण्याचे, चोरण्याचे, त्याच्या प्रतिकृती बनविण्याचे प्रयत्न होतील. अंदाधुंदीमुळे यातील काही प्रयत्न कदाचित यशस्वीही होतील.
--
अमाप संपत्ती असलेल्या एखाद्या उद्योजकांच्या, व्यापारी प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या हातात ही यंत्रणा लागली तर तो तिचा उपयोग स्वत:चे आर्थिक साम्राज्य विस्तारण्यासाठी करेलच, पण कदाचित तिचा उपयोग करून अप्रत्यक्षपणे सत्ताही हस्तगत करण्याचा प्रयत्न होईल किंवा कदाचित सरकार त्या उद्योजकाच्या हातातील बाहुले होईल. शेअर बाजार आणि तत्सम आर्थिक यंत्रणांचा स्वत:च्या फायद्यासाठी प्रचंड उपयोग केला जाईल. सामान्य माणसाचे जिणे प्रचंड अवघड होईल. अत्यंत हुशारीने, चलाखीने जनतेची आर्थिक पिळवणूक केली जाईल. दडपता येणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणावर, एखादे बंड होऊन सरकार आणि त्या उद्योजकाच्या साम्राज्याला उलथवून टाकेपर्यंत, आर्थिक एकाधिकारशाहीचे वेगवेगळे परिणाम जनता अनुभवेल. या बंडात अशी यंत्रणा नष्ट होऊ शकली नाही, तर कदाचित तिचे अन्य विपरीत परिणामही भोगावे लागतील.
--
अतिरेकी विचारसारणी असलेल्या, एखादा हुकूमशहा किंवा इतर तामसी प्रवृत्तीं असलेल्या व्यक्तींच्या हातात अशी यंत्रणा आली तर त्याचे परिणाम अतिशय भयानक असतील. अण्वस्त्रे अयोग्य हातात पडली तर काय होईल या कल्पनेने आज आपण घाबरतो. कालयंत्राचा शोध अयोग्य हातात पडण्याचे परिणाम हे देखील तितकेच घातक असतील. आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात एकाधिकारशाही आणि एकसूरीपणाचा अतिरेक होईल. सर्वप्रकारच्या साधनसामुग्रीवर कठोर नियंत्रणे येतील. कालांतराने शोषण, जुलूम, गुलामी ही रोजच्या आयुष्यातील नित्याची गोष्ट होऊन बसेल. नव्या प्रकारची वर्गव्यवस्था, राज्यव्यवस्था अस्तित्वात येऊन, कित्येकांचे आयुष्य नरकप्रद होईल, तर कित्येकांचे अत्यंत विलासी. जन्माला येणार्या काही मुलांकडे विशेष लक्ष दिले जाईल. त्यातील काही मुलांचे आयुष्य अतिशय सुकर होईल तर काहींचे आयुष्य जाणीवपूर्वक अवघड केले जाईल. कदाचित त्यातील काही मुलांना जीवे मारण्याचेही प्रयत्न होतील. काही व्यक्तींना खोटेनाटे आरोप रचून कायद्याच्या कचाट्यात अडकविण्याचे, तुरुंगात सडविण्याचे प्रयत्न होतील तर काही व्यक्तींवर प्राणघातक हल्ले होतील किंवा त्यांना अपघातांना सामोरे जावे लागेल. मानवी संस्कृतीची ही घसरगुंडी, साम्राज्यवाद व कालांतराने जगभर एकछत्री अंमल या अपरिहार्य परिणामांशी थांबणार नाही. उन्मादाच्या भरात केलेल्या एखादी चूकीचे परिणाम हे अपरिवर्तनीय असतील आणि जग सर्वनाशाच्या दिशेने वाटचाल करेल.
--
या उलट काही सुबुद्ध, विवेकी समूहाच्या हातात ही यंत्रणा असेल तर बरेच काही चांगले घडू शकेल. अनेक विधायक गोष्टींसाठी या यंत्रणेचा वापर होऊन मानवी जीवन सुकर होईल. संशोधनाची, विज्ञानाची कित्येक नवी दालने,क्षेत्रे उपलब्ध होतील. अपराध, दुर्घटना मूळातून टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणेचा वापर होईल. असा समूह स्वत:वरच कित्येक बंधने घालून घेईल, जेणेकरून अशा यंत्रणेच्या गैरवापराची शक्यताच राहू नये. कदाचित अशा यंत्रणेचा आवाका उघड न करता, या यंत्रणेची एखादी छोटी, नियंत्रित आवृत्ती सामान्य जनतेसाठीही उपलब्ध करून दिली जाईल, पण तीच्या वापराच्या संदर्भात प्रचंड बंधने असतील. या यंत्रणेचा कोणत्याही आर्थिक, सामाजिक, सत्तेशी संबंधित, स्वार्थी कारणांसाठी वापर होऊ दिला जाणार नाही. एकंदरच मानवजातीचे आरोग्य वेगाने सुधारत जाईल, अपमृत्यूंचे प्रमाण विलक्षण घटेल. मानवाचे सरासरी आयुर्मान वाढेल. लोकसंख्येच्या वाढीवर नियंत्रण येईल. गुन्ह्यांचे प्रमाण विलक्षण घटेल. विमा कंपन्या हळूहळू कालबाह्य होतील किंवा अत्यंत वेगळ्या स्वरुपात नव्याने उभ्या राहतील. कालपर्यटन घडवून आणणार्या प्रवासी कंपन्या स्थापन होतील. कालपर्यटनासाठी विविध योजना जाहीर होतील. हळूहळू कालपर्यटन सामान्य माणसाच्या आवाक्यात येईल. कालांतराने त्यातील अप्रूप हळूहळू लोप पावून इतर अनेक करमणूकीप्रमाणे ती ही एक करमणूक होईल. मात्र कौटुंबिक स्तरावर प्रचंड उलथापालथी होऊन काही वेगळ्या स्वरूपाची कुटुंबव्यवस्था अस्तित्वात येईल. राजकीय, सामाजिक जीवनातही कित्येक नव्या व्यवस्थांचा उगम आणि प्रगती होईल.
--
पण जर असे मानले की अशा कालयंत्रात कालप्रवास दोन्ही दिशांना शक्य आहे, आणि भूतकाळातही बदल घडविता येतात तर ....
असा शोध जर सुबुद्ध लोकांच्या हातात नसेल, अनियंत्रितपणे वापरला जाईल, तर जगभर शब्दश: अराजक माजेल. कल्पना करा ज्यांच्या ताब्यात हे कालयंत्र आहे आणि ज्यांना हे कालयंत्र वापरणे शक्य आहे, ते भूतकाळात जाऊन त्यांना हव्या त्या घटना हव्या तशा बदलत राहतील. त्या घटनाचे वर्तमानावर विविध तर्हांनी, उलटसुलट परिणाम होत राहतील. हवा असलेला परिणाम मिळाला नाही, की पुन्हा पुन्हा कालयंत्राचा वापर होत राहील. कालयात्रींच्या शरीरावर, मनावर त्याचे अत्यंत अनिष्ट परिणाम होतील. परस्परांवर कुरघोडी करण्यासाठी कालयंत्र केवळ एक साधन बनून राहील. काही अतिशय संवेदनशील लोकांना वारंवार Déjà vu चा अनुभव येत राहील, पण त्यामागचे कारण उलगडत नसल्यामुळे, त्यांची गणती मनोरुग्णात होईल. सरतेशेवटी या सर्व गोष्टींचा अतिरेक होऊन, एके दिवशी, भूतकाळात घडवून आणलेला किंवा नकळत घडलेला, एखादा सूक्ष्म बदल , Butterfly effect प्रमाणे विक्राळ रूप धारण करेल आणि अंतिमत: मानवजातीच्या अंतालाच कारणीभूत होईल.
--
कालयंत्राच्या शोधासाठी मानवजात अजून लायक नाही. सृष्टीची रहस्ये उलगडण्यात आनंद मानणार्या, रमणार्या मानवासाठी तो केवळ कुतूहल आणि ज्ञानार्जनाचा भाग नाही, तर त्यामागे निसर्गावर विजय मिळवण्याची, कधीही न शमणारी अभिलाषा आहे. उपलब्ध झालेल्या ज्ञानाचा, विज्ञानाचा केवळ उत्कर्षासाठी वापर करणे हे आजतागायत त्याला साध्य झालेले नाही. स्वत:च बनविलेल्या नीतिनियमाच्या चौकटीला झुगारून देत, स्वार्थीपणाच्या, स्वहिताच्या, अस्तित्वाच्या मुखवट्याआड, जाणिवांच्या खोलवर आत असलेला हिंस्त्रपणा दडवत, उत्क्रांतीच्या शिडीच्या तळाच्या पायर्यांना स्पर्श करणारे त्याचे वर्तन हे आजही वारंवार आढळते. उत्क्रांतीच्या, प्रगतीच्या मार्गावर, स्वत:चे एकमनी अस्तित्व त्यागून, बहुमनी होणे हे एकाही मानवसमूहाला अजूनतरी साध्य झालेले नाही. सृष्टीच्या स्वरूपाचे, नियमांचे संपूर्ण, सम्यक ज्ञान त्याला आज मिळणे, ही कदाचित त्याच्या स्वत:च्या अस्तित्वासाठीच घातक गोष्ट ठरेल. सृष्टीनियम उलथवून टाकणारे, स्वत:चेच अस्तित्व नष्ट करणारे असे काही त्याच्या हातून घडू नये, म्हणून तर कदाचित काळ त्याच्यासाठी अगम्य गोष्ट नाही ना ?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा