२२ फेब्रुवारी २०१७ रोजी, आपल्या सूर्यमालेबाहेरील एका महत्त्वपूर्ण शोधाबाबत माहिती देण्यात येईल, असे नासाने त्यांच्या nasa.tv च्या कार्यक्रम पत्रिकेत नमूद केले आणि माझी उत्सुकता शिगेला पोहोचली. त्याचा स्क्रीनशॉट काढून मी समूहावर पोस्ट देखील केला होता. हेतू हाच की काहीतरी विशेष असल्यास, ज्यांना या बाबत स्वारस्य आहे त्यांना, ती माहिती थेट ऐकता यावी. माझ्या मनात सर्वप्रथम आलेला विचार हा होता की डार्क मॅटर संबंधी काही शोध वा निश्चित स्वरूपाची माहिती असावी. किंवा एखादा 'भटका ग्रह' (कुठल्याही तार्याशी बद्ध नसणारा ग्रह) सापडला असावा. प्रत्यक्षात काहीसा भ्रमनिरास झाला.
Transiting Planets and Planetesimals Small Telescope–South (TRAPPIST) ही University of Liège, बेल्जियम आणि स्वित्झलँड येथील जीनिव्हा वेधशाळा यांचा संयुक्त प्रकल्पांर्तगत साकारलेला आणि चिलीच्या पर्वतरांगांमधल्या एका उंच पठारावर स्थित असलेला दूरदर्शक आहे. २०१० मध्ये अस्तित्वात आल्यानंतर या दूरदर्शकाने शोधलेली TRAPIST-1 ही पहिली ग्रहमाला.
ही माहिती होती, TRAPPIST-1 या तार्याभोवती सापडलेल्या 'पृथ्वीसदृश' सात ग्रहांच्या शोधाची. नंतर तीन-चार दिवस, मनात हाच विचार घोळत होता की नासाला इतके महत्त्वाचे वाटावे असे या बातमीत काय होते ? म्हणजे पृथ्वीसदृश ग्रह सापडणे हे विशेष नाही, असे नव्हे. पण अगदी जाणीवपूर्वक, त्या विषयी, विशेषत्वाने सांगावे, इतके त्याचे अप्रूप आता राहिले नाही.
आपल्या सूर्यमालेसारख्या अनेक सूर्यमाला (आणि पर्यायाने ग्रहमाला) असाव्यात या तर्काला पहिले यश मिळाले ते १९९२ मध्ये, जेंव्हा आपल्यापासून, तब्बल २३०० प्रकाशवर्षे दूर असणार्या, एका Lich नामक Pulsar भोवती फिरणार्या, दोन छोट्या ग्रहांच्या शोधावर, शिक्कामोर्तब झाले. या शोधामुळे सूर्यमालेबाहेरही ग्रहमाला आहेत या दाव्याला जरी पुष्टी मिळाली असली, तरी वैज्ञानिकांचे समाधान होईल असा हा शोध नव्हता. कारण प्रचंड किरणोत्सर्ग उत्सर्जित करणार्या आणि (तार्याच्या) आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजणार्या, Pulsar भोवती, फिरणार्या ग्रहावर, जीवसृष्टी असण्याची शक्यता जवळजवळ शून्यच. (सोबतचे तार्याचा जीवनक्रम दाखविणारे चित्र पहा). वैज्ञानिकांना स्वारस्य होते, ऐन भरात असलेल्या, तरुण तार्याभोवती (Main Sequence Star) फिरणार्या ग्रहमालेच्या शोधात. कारण अशा ग्रहमालेत, असा ग्रह असण्याची शक्यता अधिक की जिथे जीवसृष्टीचे अस्तित्व असू शकेल. शेवटी हा सारा खटाटोप आपल्यासारखे कुणी आहे का किंवा जेंव्हा नितांत आवश्यकता भासेल तेंव्हा, आपण पृथ्वी सोडून कुठे जाऊ शकू यासाठीच अधिक आहे. :-)
अशा प्रकारचा, Main Sequence Star भोवती फिरणारा ग्रह हा तीन वर्षांनंतर सापडला. आपल्यापासून साधारण ५१ प्रकाशवर्षे दूर असणार्या, 51 Pegasi या तार्याभोवती, केवळ चार दिवसात प्रदक्षिणा पूर्ण करणारा आणि जो त्याच्या गुणधर्मानुसार, 'Hot Jupiter' या नावाने संबोधल्या जाणार्या गटात मोडतो, असा ग्रह सापडला. परंतु अजूनही, 'जीवसृष्टीचा शोध' या मूळ उद्देशाशी बळ देईल असा हा शोध नव्हता आणि त्यामुळे अशा प्रकारच्या बाह्यग्रहांचा (Exoplanet) चा शोध सुरूच राहिला आणि पुढेही राहील. काही अपवाद वगळता, प्रतिवर्षी सापडणार्या बाह्यग्रहांची संख्या वाढतीच राहिली. हा शोधयज्ञ सुरूअसताना, वैज्ञानिकांना अपेक्षित असलेल्या पद्धतीने त्याच्या तार्याच्या , habitable zone मध्ये असणारा पहिला पृथ्वीसदृश बाह्यग्रह सापडायला मात्र, २०११ चा डिसेंबर महिना उजाडावा लागला. पृथ्वीच्या साधारण दुप्पट मोठा असणारा आणि Kepler-22b या नावाने ओळखला जाणारा हा बाह्यग्रह, सूर्यापेक्षा थोड्या लहान आकाराच्या, सूर्यापेक्षा थोडी कमी ऊर्जा प्रक्षेपित करणार्या आणि आपल्यापासून ६०० प्रकाशवर्षे दूर असणार्या, Kepler-22 या तार्याच्या भोवती २९० दिवसात फिरतो. अधिक अभ्यासात असे लक्षात आले की या बाह्यग्रहाचा पृष्ठभाग हा पृथ्वीप्रमाणे घट्ट व खडकाळ नसावा. तसेच या ग्रहाचा आस अंदाजे ९०॰ कललेला आहे आणि त्याची कक्षाही अत्यंत लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे तिथे पृथ्वीसदृश जीवसृष्टी असण्याची शक्यता लोप पावली.
त्यानंतर मार्च २०१४ मध्ये Kepler-186f या पृथ्वीपेक्षा केवळ ११% ने मोठा असणार्या बाह्यग्रहाचा शोध जाहीर करण्यात आला. हा बाह्यग्रह सूर्यापेक्षा साधारण अर्धे वस्तुमान असणार्या आणि आपल्यापासून साधारण ५०० प्रकाशवर्षे दूर असणार्या रक्तवर्णी बटू (red dwarf) तार्याभोवती १२९ दिवसात एक फेरी पूर्ण करतो. हा बाह्यग्रह त्याच्या तार्याच्या habitable zone मध्ये आहे. जीवसृष्टीच्या संभाव्यतेच्या दृष्टिकोनातून, या तार्याचा अभ्यास अजूनही सुरू आहे. फेब्रुवारी २०१७ पर्यंत शोधलेल्या बाह्यग्रहांची एकंदर संख्या ही ३५८३ पर्यंत जाऊन पोहोचली आहे. त्यातही जर सरासरी पाहिली, तर शोध घेतलेल्या आणि बाह्यग्रह सापडलेल्या, प्रत्येक पाच तार्यांमागे, एका तार्याला साधारण पृथ्वीच्या आकाराचा आणि habitable zone मध्ये असणारा ग्रह लाभला आहे.
आपल्यापासून ३९.५ प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या TRAPIST-1 हा तारा १९९९ मध्ये सापडला होता आणि २०१५ सालीच या तार्याभोवती फिरणारे तीन ग्रह सापडले होते. असे असताना आणि पृथ्वीसदृश ग्रहांची अशी 'विपुलता' असताना, विशेषत्वाने जाहीर करण्यासारखे TRAPIST-1 च्या ग्रहमालेत काय असू शकते हा प्रश्न मनाला भंडावत होता. या दृष्टिकोनातून अधिक वाचन केले असता, काही अनोखी माहिती मिळाली.
----
प्रगत आणि बुद्धिमान जीवसृष्टीचे अस्तित्व शोधण्यासाठी, SETI ज्या अनेक पद्धती अवलंबते, त्यातील प्रमुख आहे रेडियो लहरींच्या अस्तित्वाचा शोध घेणे. TRAPIST-1 या तार्याच्या परिसराचा SETI ने यापूर्वीच शोध घेतला आहे आणि त्या निरीक्षणांमधून रेडियोलहरींचे कोणतेही संकेत मिळाले नाहीत. त्यामुळे तिथे प्रगत आणि बुद्धिमान जीवसृष्टी असण्याची शक्यता अत्यंत अल्प आहे. त्यातून TRAPIST-1 हा सूर्याच्या तुलनेत केवळ ११% त्रिज्या असलेला तारा आहे. इतक्या छोट्या तार्याचे विशेष का वाटावे ?
हे सर्व ग्रह tidally locked (ग्रहाची एकाच बाजू सतत तार्याच्या दिशेने असणे) असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. दोन बाजूंच्या तापमानातील प्रचंड फरकामुळे व वातावरण असल्यास एका बाजूकडून दुसर्या बाजूकडे सतत वाहणार्या जोरदार वार्यांमुळे, अशा प्रकारच्या ग्रहांवर जीवसृष्टी असण्याची शक्यता खूप कमी असते. tidally locked ग्रहांवर जीवसृष्टी असलीच तर ती दोन बाजूंच्या संगमावर असू शकते. त्यातून हे ग्रह TRAPPIST-1 भोवती अत्यंत जवळच्या कक्षेत फिरतात. म्हणजे किती जवळ तर, बुध सूर्याभोवती ज्या कक्षेत फिरतो आहेत त्यापेक्षाही जवळच्या कक्षांमध्ये हे सातही ग्रह आहेत. या कक्षा 'decaying orbit' या स्वरूपाच्या आहेत की नाही हे देखील दीर्घकालीन निरीक्षणांनंतर लक्षात येईल. तेंव्हा जीवसृष्टी या दृष्टीने वैज्ञानिकांना या ग्रहांचे महत्त्व वाटण्याचे सध्यातरी काही ठोस कारण दिसत नाही.
हा तारा आणि त्याची ग्रहमाला यांच्यापर्यंत प्रकाशवेगाने (३ लाख किमी प्रति सेकंद) जायला साधारण ४० वर्षे लागतील आणि अवकाशप्रवासाचा आपण आज साध्य केलेला अधिकतम वेग (Helios प्रोबसाठी) केवळ ७० किमी प्रति सेकंद इतका आहे. थोडक्यात काहीतरी क्रांतिकारक शोध लागल्याशिवाय कोणताही दूरचा अवकाश प्रवास आपल्या आवाक्याबाहेरचा आहे. उद्या समजा प्रकाशवेग जरी आपण साध्य केला तरी चाळीस वर्षांचा अवकाश प्रवास हेच प्रचंड मोठे आव्हान असेल. अर्थात आपण तिथे जाऊन काही विशेष साध्य करू ही देखील अत्यंत दूरच्या भविष्यकाळातील गोष्ट आहे. त्यामुळे त्या दृष्टीनेही या तार्याचा व त्याच्या ग्रहमालेचा आपल्याला फारसा उपयोग नाही.
TRAPIST-1 हा Ultra-Cool Dwarf (अतिशीत बटू) या गटात मोडणारा तारा आहे. निरीक्षणाद्वारे मोजलेले अंदाजे तापमान साधारण २३००॰ C. सूर्याच्या तुलनेत साधारण निम्मे. या गटातील तार्यांचा सर्वात महत्त्वाचा गुणधर्म हा आहे की अशा तार्यांमध्ये हायड्रोजनचे फ्यूजन अतिशय संथ गतीने होत असल्याने, ते दीर्घायुषी असतात. सध्याच्या अंदाजानुसार असे तारे १०० अब्ज वर्षे 'जगू' शकतात. त्यामुळे काही विशेष 'दुर्घटना' घडली नाही, तर अशा तार्यांच्या भोवती फिरणार्या ग्रहांनासुद्धा प्रचंड दीर्घायुष्य लाभू शकते. स्वाभाविकच विश्वाचे अनुमानित वय लक्षात घेता, असे म्हणता येईल की हा तारा अजून बराच तरुण आहे. या तार्याच्या
ग्रहमालेत एकंदर सात पृथ्वीसदृश ग्रह सापडले आहेत आणि त्यातील तीन ग्रह हे TRAPIST-1 च्या habitable zone मध्ये आहेत ही 'आपल्याला अपेक्षित असलेल्या' जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने त्यातल्यात्यात जमेची बाजू . (अशा छोट्या तार्यांसाठी त्यांचा habitable zone तार्यांच्या खूप निकट असतो.) आजतागायत (आपली सूर्यमाला वगळून) अशा प्रकारची ग्रहमाला सापडलेली नव्हती. यातील पाच ग्रहांचा व्यास हा पृथ्वीच्या व्यासाशी मिळताजुळता आहे आणि उरलेल्या दोन ग्रहांचा व्यास हा मंगळापेक्षा अधिक आणि पृथ्वीपेक्षा कमी. जीवसृष्टीची आशा जागती ठेवणारी आणखी एक बाब म्हणजे, प्राथमिक आणि अत्यंत ढोबळ अंदाजानुसार यातील किमान तीन ग्रहांवर द्रवस्वरूपात पाणी असणे शक्य आहे. आणि तसे सापडल्यास , पृथ्वी सोडण्याची वेळ आल्यास, दूरच्या भविष्यातील आणि दीर्घकालीन मानवी तळ म्हणून या ग्रहांचा विचार होऊ शकेल. नासाने या बातमीचा प्रमाणाबाहेर गाजावाजा केला असे बर्याच जणांचे मत झाले आहे. पण नासाने असे करण्याचे कारण काय ? नव्या अध्यक्षाच्या पदग्रहणानंतर, आपल्या बजेटला कात्री लागेल या भीतीने नासा असे काही करेल असे वाटत नाही. एकेकाळच्या सोविएत युनियन प्रमाणे, कोणीही अतिशय बलवान प्रतिस्पर्धी अमेरिकेसाठी उरलेला नाही, त्यामुळे Space Race Trap टाकून दुसर्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेला खिळखिळे करण्याची गरजही अमेरिकेला उरलेली नाही.
अशा स्थितीत एकमेव उरणारी शक्यता आणि येणारी शंका हीच उरते, की वैज्ञानिकांना काही विशेष गोष्ट सापडली आहे किंवा त्याबाबतीत काहीतरी सुगावा लागला आहे, आणि आत्तापर्यंत अनेक वेळा घडले आहे त्याप्रमाणे, ती माहिती काही कारणाने खुली करण्यात आलेली नाही. या ग्रहांचा अधिक उपयुक्त ठरेल, असा सविस्तर अभ्यास, ऑक्टोबर २०१८ नंतर, James Webb Space Telescope कार्यरत झाल्यानंतरच शक्य आहे. त्यावेळेस बहुदा या news conference मागचे खरे कारण उलगडेल.
----


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा