सोमवार, १३ मार्च, २०१७

आपण यांना पाहिलत का ?


नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या निकालांमुळे, कोशात गेलेल्या काही व्यक्तींबद्दल ही पोस्ट नाही.  :-)

'आपण यांना पाहिलत का ?' या शीर्षकाचा फार पूर्वी दूरदर्शनवर एक कार्यक्रम असे. आता तसा कार्यक्रम सुरू आहे की नाही ते माहित नाही.  हरवलेल्या व्यक्तींची माहिती प्रसारित करून, त्यांना शोधण्याच्या प्रयत्नांचा तो एक भाग होता. मला आठवत आहे त्याप्रमाणे,  त्या कार्यक्रमाअंतर्गत,  त्या कार्यक्रमामुळे सापडलेल्या व्यक्तींची माहिती देखील काही काळ दाखविली जात असे.

चंद्रयान - १ 'सापडल्याची' बातमी  आज वाचली आणि का कुणास ठाऊक, त्या कार्यक्रमाची आठवण झाली. वास्तविक अर्थाने, या दोन गोष्टींचा तसा थेट काहीही संबंध नाही. एखादी जवळची व्यक्ती हरवणे, ही भावनिकदृष्ट्या विलक्षण तणाव देणारी आणि वैयक्तिक स्तरावर आयुष्य ढवळून काढणारी गोष्ट आहे. या दृष्टिकोनातून, एखाद्या हरवलेल्या यानाची आणि व्यक्ती हरवण्याच्या घटनेशी तुलनाच होऊ शकत नाही.  पण तरीही मला या कार्यक्रमाची आठवण झाली, याचे मुख्य कारण हेच आहे की केवळ दीड मीटर घनाकृती आकार असलेले आणि ज्याच्याशी सर्व संपर्क तुटून, जवळजवळ सात वर्षे उलटून गेली आहेत, असे 'चिमुकले'  यान, अवाढव्य चांद्रपरिसरातून शोधून काढणे आणि हरवलेली व्यक्ती लोकसंख्येच्या महासागरातून शोधून काढणे, यामागे असलेले अथक प्रयत्न सारखेच आहेत.

तसे वास्तविक २ जुलै २०१६ लाच, JPL ने त्यांच्या California आणि  West Virginia इथल्या भूस्थित रडार प्रणालीचा संयुक्तपणे उपयोग करून हे निश्चित केले होते की, २८ ऑगस्ट २००९ रोजी संपर्क तुटलेले, चंद्रयान-१,  'हरवलेले' नसून, साधारण १६० ते २०० किमी अंतरावरून, चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. पण ही बातमी त्यावेळेस, ठळकपणे समोर आली नव्हती. आणि त्याचे महत्त्वाचे कारण बहुदा हेच असावे की अशा यानाची कक्षा अचूकपणे निश्चित केल्याशिवाय, त्याच्यावर 'लक्ष' ठेवणे शक्य नसते.

त्यातून गुरुत्वाकर्षणाच्या बाबतीत चंद्र एक विलक्षण उपग्रह आहे. अनेक अवकाशीय वस्तूंप्रमाणे, चंद्राचे गुरुत्वाकर्षण देखील त्याच्या पृष्ठभागावर सर्वत्र, समान नाही. ज्याला Mass concentration किंवा लघुरूपात  Mascon असे म्हटले जाते, असे  Gravitational anomaly (गुरुत्वीय विसंगती) निर्माण करणारे विभाग चंद्रावर अनेक ठिकाणी आहेत.  Mass concentration अर्थात वस्तुमानाची घनता जास्त असणे, यामुळे निर्माण होणारे गुरुत्वाकर्षण, वस्तुत: इतर ठिकाणांपेक्षा जास्त असायला हवे, जसे पृथ्वीवर हवाई बेटांजवळ एका ठिकाणी आढळून आले आहे. पण चंद्रावर केवळ धन गुरुत्वीय विसंगती असलेले Mascon नाहीत. काही ठिकाणी गुरुत्वीय विसंगती, ऋण स्वरूपाची देखील आहे. अर्थात चंद्रावर  Mascon या गटात मोडणारी, काही विवरे अशी आहेत की जिथले गुरुत्वाकर्षण, चंद्राच्या सर्वसाधारण गुरुत्वाकर्षणापेक्षा कमी आहे. (खरंतर याला Mascon न म्हणता दुसरा शब्द वापरायला हवा.)

संख्येने लक्षणीय आणि विविध ठिकाणी असलेल्या, चंद्रावरील अशा 'धन' आणि 'ऋण' Mascon मुळे, चंद्राभोवती फिरणार्‍या कुठल्याही वस्तूची कक्षा स्थिर राखणे, राहणे ही अत्यंत अवघड गोष्ट आहे. योग्य आखणी नसेल तर चंद्राभोवती फिरणारी कोणतीही 'वस्तू' कालांतराने Decaying orbit मध्ये प्रवेश करते आणि अंतिमत: चंद्रावर आदळून नष्ट होते. बहुदा म्हणूनच अनेक निरीक्षणानंतर जेंव्हा चंद्रयानाची कक्षा निश्चित केली गेली, त्यानंतरच चंद्रयान सापडल्याची बातमी अधोरेखित केली असावी. 

प्रत्यक्ष संपर्क प्रस्थापित करणे शक्य नसल्यामुळे चंद्रयान इस्रोकडे कोणतीही माहिती पाठवू शकणार नाही आणि त्यामुळे इस्रोला या शोधाचा तसा काही उपयोग होऊ शकणार नाही  हे जरी खरे असले, तरीही  (दुसर्‍या देशाच्या) इतक्या चिमुकल्या वस्तूला इतक्या दूरवरुन शोधणे शक्य झाले ही घटना, भविष्यकाळात वाढत जाणार्‍या अवकाश मोहिमांच्या दृष्टिकोनातून, अत्यंत उत्कृष्ट गोष्ट आहे.  एक उपयुक्त तंत्रज्ञान विकसित होत आहे याची ग्वाही देत आहे.

--
चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावल्यामुळे चंद्रयानापासून मिळणार्‍या, भविष्यात मिळू शकणार्‍या माहितीची उपयुक्तता निश्चितच वाढली होती, ही गोष्ट आणि आत्ता आलेली ही बातमी यांचा एकत्र विचार करताना,  कुणाच्याही मनात तिरपागडा प्रश्न येत असेल तर तो महत्प्रयासाने मागे सारणे आवश्यक.  :-)  चंद्रयान हॅक केले गेले असावे, असे मला बिलकूल वाटत नाही.  :-)   तशी वेळ यायला अजून अवकाश आहे अशी मला आशा आहे.
--

मूळात हे लक्षात घ्यायला  हवे की अंतराळात 'हरवलेले' चंद्रयान, पहिले यान नाही आणि हरवल्यानंतर सापडलेले किंवा शोधून काढलेले देखील पहिले यान नव्हे. प्रक्षेपणाच्यावेळी, उद्दीष्ट साध्य झाल्यानंतर वा कार्यकाल 'खर्‍याखुर्‍या' अर्थाने संपल्यामुळे, पृथ्वीशी संपर्क तुटून,अंतराळात 'हरविलेल्या' मानवनिर्मित 'वस्तुंची' (उपग्रह, प्रोब, ऑर्बिटर, लँडर, यान इत्यादि) संख्या मोठी आहे. पण तसे नसताना काही अपघातामुळे, यानातील यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे, संपर्क तुटलेले पहिले यान, बहुदा रशियाचे Venera 1 असावे. शुक्राच्या जवळून जाताना या यानाचा संपर्क तुटला आणि अधिकृत माहितीप्रमाणे शुक्राशी संबंधित कोणतीही उपयुक्त माहिती मिळू शकली नाही.  त्यानंतर अवकाश मोहिमांची अडखळती पाऊले टाकताना आणि नंतरही अशा घटना, क्वचित घडतच राहिल्या. त्यातील काही काही तर अनपेक्षित देखील होत्या.  यातील सर्वात अलिकडची घटना आहे ESA च्या ExoMars मोहिमेतील Schiaparelli लँडरची. मंगळाभोवती भ्रमण करणार्‍या नासाच्या Reconnaissance Orbiter ने हे यान नंतर शोधून काढले आणि मंगळावर अलगद न उतरता आल्यामुळे, ते यान आपटून नष्ट झाले हा निष्कर्षदेखील नोंदवला.

एखाद्या यानाशी संपर्क तुटल्यानंतर तो पुन्हा प्रस्थापित करण्याची देखील काही उदाहरणे आहेत. चंद्राभोवती भ्रमण करताना, चंद्राच्या आड गेल्यावर Apollo 12 मोहिमेच्या बाबतीतही हे घडले होते आणि आपले मंगलयान, मंगळाच्या मागे गेल्यावर त्याच्या बाबतीतही. पण या सर्व घटना अपेक्षित स्वरूपाच्या होत्या. अनपेक्षित स्वरूपाच्या घटनांमध्ये,  मंगळावरच्या स्पिरीट रोव्हर, International Space Station (ISS) यांचा समावेश आहे.  पण या प्रकारचे सर्वात उल्लेखनीय उदाहरण बहुदा, STEREO-B (Solar Terrestrial Relations Observatory) या यानाचे असावे.  २००६ मध्ये STEREO-A (Ahead) आणि STEREO-B (Behind) ही यानांची दुक्कल, सूर्याचा अभ्यास करण्यासाठी सोडण्यात आली. ऑक्टोबर २०१४ मध्ये STEREO-B शी संपर्क पूर्णपणे तुटला आणि या यानाचा ठावठिकाणा शोधणे अवघड होऊन बसले. जवळजवळ २२ महिन्यांच्या खंडानंतर, २१ ऑगस्ट २०१६ रोजी,  नासाच्या Deep Space Network ने   अथक प्रयत्न करून हा संपर्क प्रस्थापित करून दिला. साधारण अडीच तासांसाठी !  त्यानंतर यानातील बॅटरी वाचविण्यासाठी, हा संपर्क थांबविण्यात आला.  पण या अडीच तासात मिळालेल्या माहितीचा उपयोग करून , बिघाडाविषयी काही निष्कर्ष काढले गेले.  यानातील सॉफ्टवेअर अपडेट करून या यानातील दोष सुधारणे शक्य आहे असे लक्षात आले आहे आणि तसा प्रयत्न बहुदा मे २०१७ मध्ये केला जाईल.

Lost in Space नावाची एक अमेरिकन विज्ञानमालिका साठच्या दशकात गाजली होती. कालांतराने त्यावर चित्रपटही येऊन गेला. अनेक विज्ञानकथा, कादंबर्‍यांनी देखील अंतराळातील 'Lost & Found' हा विषय विविध प्रकारांनी हाताळला आहे.  आज अवकाशसंशोधनाला मिळत असलेले वाढते महत्त्व पाहता या कथा, कादंबर्‍यातील, काही गोष्टी भविष्यात खर्‍या ठरतील असे वाटू लागले आहे. आपल्या देशाच्या अवकाशप्रगतीचा आढावा घेतला तरी ही गोष्ट सहज पटेल. दुसर्‍या देशांच्या, कृत्रिम उपग्रहांना अवकाशात धाडणे हा आज इस्रोसाठी उत्पन्नाचा मार्ग झाला आहे. आपण आर्यभट हा आपला पहिला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत सोडला तेंव्हा भविष्यात उपग्रह सोडण्याचा व्यवसाय करू किंवा अशी काही गरज निर्माण होईल याचा विचारही केला नसेल. पण आज असे घडते आहे. ऑक्टोबर १९५७ मध्ये रशियाने Sputnik-१ हा पहिला उपग्रह अवकाशात धाडल्यानंतरच्या, केवळ ६० वर्षात ही परिस्थिती आली आहे.  या आणि येत्या शतकात, अंतराळसंशोधन आणि अंतराळप्रवास या क्षेत्रात, क्रमाक्रमाने अनेक देश उतरतील हे नक्की. अशा वेळेस अपयशी ठरणार्‍या अवकाश मोहिमा,  हरवलेले कृत्रिम उपग्रह, प्रोब, अंतराळयाने यांची संख्याही वाढणार आहे आणि त्यात संशोधनासाठी अवाढव्य अंतराळयाने न  वापरता अत्यंत छोट्या आकाराचे CubeSat वा तत्सम याने वापरण्याकडे वाढता कल आहे हे लक्षात घेता,  अशी याने अचूकपणे शोधून देणे हा भविष्यातील, एक नवीन व्यवसाय आणि उत्पन्नाचा मार्ग ठरेल यात मलातरी शंका वाटत नाही.  कुणी सांगावे,  कदाचित काही शतकानंतर 'आपण यांना पाहिलत का ?' सारखा एखादा कार्यक्रमदेखील, केवळ पृथ्वीपुरता मर्यादित राहणार नाही आणि तो यानांसाठी नसेल तर अंतराळ प्रवाशांसाठी असेल.  SpaceX ने त्यांची व्यावसायिक उद्दिष्टे स्पष्ट करून, यासाठी मुहूर्तमेढ रोवली आहे.

====

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा