कालप्रवास हा मानवासाठी सदैव आकर्षणाचा विषय राहिलेला आहे आणि त्याची कारणेही तशीच आहेत.
वैयक्तिक दृष्टीकोनातून, आपण जेंव्हा आपल्या भूतकाळाकडे पाहतो, तेंव्हा अमुक एका वेळी, मी अमुक एक गोष्ट केली असती तर कदाचित आज चित्र वेगळे असते हा अनेकांच्या मनात कळतनकळत येणारा विचार आहे. (याच विषयावर मी पूर्वी 'कालतिठा' या शीर्षकाची पोस्ट टाकली होती) अवैयक्तिक दृष्टिकोनातूनसुद्धा, इतिहासाची यथार्थ जाणीव करून घेण्यासाठी, क्वचित त्यात बदल करून, वर्तमानकाळ बदलून टाकण्याची इच्छा प्रत्यक्षात आणण्यासाठी, भूतकाळात प्रवास करता यायला हवा असे अनेकांना वाटू शकते. याउलट वैयक्तिक भविष्याची, एकंदरच जगाच्या भविष्यकाळाची जाणीव करून घेण्यासाठी किंवा तंत्रज्ञानदृष्ट्या अधिक प्रगत जगात कायमस्वरूपी राहण्याच्या इच्छेतून, भविष्यकाळात प्रवास करता यावा असेही अनेकांना वाटू शकते.
कालप्रवासाविषयी जे काही संशोधन आजपावेतो करण्यात आले आहे, त्यामागे कदाचित प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवण्याची, मानवाची दुर्दम्य इच्छाशक्ती असेल किंवा काही अधिक प्रगल्भ हेतूही असू शकेल. या संदर्भातील जे प्रयोग, भूतकाळातील कालप्रवासासाठी आहेत, ते सूक्ष्म (Quantum) स्तरावर आहेत, स्थूल स्तरावर नाहीत . आणि यातील ज्या प्रयोगांना यश मिळाले आहे असा दावा करण्यात येतो त्या दाव्यांना सर्वमान्यता मिळालेली नाही.
भविष्यकाळातील कालप्रवास साध्य करण्याचे, तुलनेने सहज असे एक माध्यम आहे Time Dilation. Time Dilation चे मूळ बीज आहे, दोन भिन्न ठिकाणी असमान वेगाने धावणारा काळ. थोडक्यात सांगायचे तर, दोन भिन्न ठिकाणी असलेली आणि त्या त्या स्थानाच्या अनुषंगाने अचूकपणे चालणारी घड्याळे, परस्परांशी तुलना करता मात्र असमान वेगाने धावताना आढळणे.
याची संभवत: दोन कारणे आहेत.
पहिले कारण आहे ती दोन स्थिर जागांच्या गुरुत्वाकर्षणातील फरक. आपल्या पंचागात ब्रह्मदेवाची कालगणना दिलेली असते. ही कालगणना या प्रकारच्या Time Dilation चे उत्तम उदाहरण आहे. ब्रह्मलोकातील आणि पृथ्वीवरील काळाच्या वेगातील फरक हा या कालगणनेत उत्तमरित्या दिसतो. या संदर्भात राजा ककुदमी आणि रेवतीच्या कथेचाही (भागवतपुराण ९.३.२९ ते ९.३.३३) उल्लेख लक्षात घेण्यासारखा आहे. या कथेत ब्रह्मदेवाला भेटण्याच्या निमित्ताने, ब्रह्मलोकात अल्पकाळ घालवून आलेल्या ककुदमी राजाला, ब्रह्मदेव काळाच्या वेगातील फरक समजावून सांगतो आणि आता पृथ्वीवर १०८ महायुगे होऊन गेल्याचे परिणाम झेलावे लागतील, याची कल्पनाही देतो. अर्थात इथे ककुदमी आणि रेवतीला Time Dilation च्या अज्ञानामुळे कालप्रवास घडला आहे. ब्रह्मदेवाची कालगणना सांगताना काही ठिकाणी दिव्यवर्षांचा उल्लेख येतो. हे दिव्यवर्ष म्हणजे देवांचे वर्ष. त्याचे गणित सांगताना मानवाचे (३६० दिवसांचे) एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस असे स्पष्ट केलेले असते. काही ठिकाणी विष्णुची, शिवाची कालगणना दिलेली आहे. हे सर्व संदर्भ Time Dilation चेच द्योतक आहेत.
दुसरे कारण आहे, ते दोन वस्तूंच्या वेगात असणार्या प्रचंड मोठ्या फरकाचे. एखादा अंतराळवीर (प्रकाशाशी स्पर्धा करणार्या) अतिवेगवान यानातून आपल्या आकाशगंगेतून भ्रमण करून आला, तर पृथ्वीवरच्या काळाच्या तुलनेत त्याचा काळ विलक्षण संथपणे पुढे सरकेल, त्यामुळे त्याचे वयही पृथ्वीवरच्या त्याच्या समवयस्क व्यक्तीपेक्षा कमी वेगाने वाढले असेल. या वयात पडलेला फरक, हा अर्थातच तो अंतराळवीर किती काळ व किती वेगाने अवकाशभ्रमण करून आला आहे त्यावर अवलंबून राहील. वयात पडणारा हा फरक व दरम्यानच्या काळात पृथ्वीवर 'वेगाने' पुढे सरकलेला काळ हा त्या अंतराळवीरासाठी, एक प्रकारे भविष्यकाळात केलेला प्रवासच असेल.
या दोन्ही प्रकारचे Time Dilation ही अनुभवास आलेली गोष्ट आहे. ISS (International Space Station) आणि GPS उपग्रह यांच्यावरील atomic clocks ची पृथ्वीवरील atomic clock शी सांगड घालून Time Dilation चे अस्तित्व सिद्ध झाले आहे. ISS च्या
वेगामुळे पृथ्वीच्या तुलनेत तिथे काळ पृथ्वीपेक्षा कमी वेगाने पुढे सरकतो, पण त्याच वेळेस तिथल्या शून्य गुरुत्वाकर्षणामुळे तो पृथ्वीच्या तुलनेत अल्प वेगाने पुढेही सरकतो. या परस्परविरोधी घटकांमुळे आणि मुख्यत्वे प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेत ISS अतिशय कमी वेगाने भ्रमण करत असल्याने पृथ्वी व ISS वरील काळातील हा फरक अतिसूक्ष्म आहे. आपल्या रोजच्या वापरातील गोष्ट झालेल्या स्मार्टफोनमधील GPS हे अत्यंत अचूकपणे काम करते, कारण GPS उपग्रहांवर Time Dilation चा जो परिणाम होतो, तो लक्षात घेऊन नियमित स्वरूपात, पृथ्वीवरील घड्याळाशी जुळवून घेणारी व्यवस्था तिथे केलेली असते. यंत्रांच्या बाबतीत अशी व्यवस्था करणे आपल्याला शक्य झाले आहे. भविष्यात मानवी शरीराबाबतही आपल्याला अशी व्यवस्था करणे शक्य होईल ?
प्रकाशाच्या आसपास जाणारा वेग गाठणे हे आपल्या अवकाशयानांना नजीकच्या भविष्यकाळात शक्य होईल असे वाटत नाही. पण तरीही जेंव्हा सूर्यमालेच्या बाहेर, जवळच्या तार्यांच्या ग्रहमालांमध्ये मानव पोहोचू शकेल अशी अंतराळयाने निर्माण केली जातील, तेव्हा त्या प्रचंड मोठ्या अंतरांना, मानवी आयुष्यमर्यादेत पार करता यावे व तिथून परतही येता यावे, यासाठी यानांचा वेग, हा प्रकाशवेगाच्या काही टक्के इतका निश्चितच असेल. कदाचित याच शतकात, जेंव्हा proxima centauri च्या भोवती फिरणार्या ग्रहावर जाऊन मानव पृथ्वीवर परत येईल तेंव्हा त्याने अनुभवलेल्या व पृथ्वीवर सरकलेल्या काळातील फरक हा जाणविण्याजोगा असू शकेल. अर्थात हा फरक, तो तिथे जाताना व तिथून परत येताना किती वेगाने प्रवास करतो आहे, proxima centauri च्या त्या ग्रहावर त्याने किती काळ घालविला आहे आणि त्या ग्रहाचे गुरुत्वाकर्षण किती आहे यावर अवलंबून असेल. तोपर्यंत भविष्यकाळात जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग सापडला नाही तर अर्वाचीन मानवासाठी, बहुदा हा पहिलाच मोठा कालप्रवास असेल.
दूरच्या भविष्यात कुणी व्यक्ती, एखाद्या कृष्णविवराजवळ चक्कर मारून पृथ्वीवर परत आली, तर ही शक्यता बरीच आहे की, तोवर पृथ्वीवर कित्येक शतकेच काय तर कित्येक सहस्रके उलटली असतील आणि ककुदमीच्या अनुभवाप्रमाणेच, आपल्याला ओळखणारे इथे आता कुणीही नाही हा अनुभव त्या व्यक्तीला झेलावा लागेल.
गुरुत्वाकर्षण जितके अधिक, तितका काळ अधिक संथ. जिथे काळ अधिक संथ तिथे राहणार्या जीवाचे वय पृथ्वीच्या तुलनेत कमी वेगाने वाढेल. म्हणजे अतिप्रचंड गुरुत्वाकर्षण असणार्या आकाशस्थ वस्तूच्या परिसरात राहणार्या जीवाचे वय पृथ्वीवरील काळाच्या तुलनेत सावकाश वाढेल. या विचाराला अनुसरून आपण सूर्यमालेपूरता विचार केला तर प्रामुख्याने लक्षात येणारी उदाहरणे दोन, एक गुरूचे आणि दुसरे अर्थातच सूर्याचे.
उपलब्ध माहितीनुसार गुरूला पृष्ठभाग नाही. तो 'Gas Giant' या प्रकारात मोडतो. तरीही गुरुग्रहावर राहता येईल असे मानल्यास, Time Dilation चे परिणाम जाणविण्याइतके दृश्य होणार नाहीत. कारण त्याची गुरुत्वाकर्षण शक्ती (पृथ्वीच्या केवळ २.५ पट ) अशा परिणामांसाठी पुरेशी नाही. इतकेच काय पण आपण असे मानले की सूर्यावर राहता आले तर सूर्याचे 28g (पृथ्वीच्या २८ पट) असलेले गुरुत्वाकर्षण देखील पृथ्वीच्या तुलनेत काळात प्रचंड फरक घडवू शकणार नाही. (पृथ्वीवरील एका वर्षाच्या कालावधीसाठी सूर्यावर राहून, पृथ्वीवर परत आलेला मानव हा पृथ्वीवरील समवयस्क मानवाच्या तुलनेत केवळ काही सेकंद अधिक तरुण असेल !). (अर्थात गुरुग्रहावर जाण्यासाठी प्रकाशवेगाने जाणारे यान वापरले तर गोष्ट वेगळी)
Time Dilation चे गुरुत्वीय परिणाम श्वेतबटू तारे, न्यूट्रॉन तारे आणि अर्थातच कृष्णविवर यांच्या अगदी जवळच्या परिसरात अधिक चांगले दृग्गोचर होतील. यांचे गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या कित्येक अब्जावधी, निखर्वावधी पटीने अधिक असते. हे गणित करण्याची सूत्रे खूप क्लिष्ट आहेत, त्यातूनही परिवलन करणारी वस्तू व परिवलन न करणारी वस्तू यांच्या गणितात फरक पडतो. (काही कृष्णविवरे स्वत:भोवती फिरत नाहीत असे आज मानले जाते)

या सूत्राचे एक approximation पोस्ट सोबतच्या चित्रात दिले आहे. ते अंदाज येण्यासाठी पुरेसे ठरावे. त्यातील G म्हणजे गुरुत्वाकर्षण असून, M हे वस्तुमान आहे. r हे त्या गुरुत्वाकर्षणाच्या उगमापासूनचे अंतर आहे.
अगदी पृथ्वीवरचेच उदाहरण द्यायचे म्हटले आणि गुरुत्वाकर्षणामुळे काळात पडणारा फरक हा मुद्दा जर विचारात घेतला, तर आपण असेही म्हणू शकतो की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून पृथ्वीच्या केंद्राकडे आपण जसजसे प्रवास करू तसे गुरुत्वाकर्षण अल्प प्रमाणात का होईना वाढत गेले पाहिजे. याचाच दुसरा अर्थ असा होतो की पृथ्वीच्या भूस्तराखाली राहणारी एखादी प्रजाती जर असलीच, तर त्यांचा काळ हा आपल्या तुलनेत, अत्यल्प प्रमाणात का होईना, पण कमी वेगाने सरकत असेल. पण याबाबत दुसरा एक दृष्टिकोनही वाचण्यात आला. काही जणांच्या मते आपण जसजसे पृथ्वीच्या केंद्रभागाकडे सरकू तसतसे गुरुत्वाकर्षण वाढत जाईल पण एका मर्यादित अंतरापर्यंतच,नंतर ते पुन्हा कमी होत जाईल आणि पृथ्वीच्या केंद्रात ते शून्य असेल.
मग Proxima Centauri च्या भोवती फिरणार्या ग्रहावर जाऊन मानव पृथ्वीवर परत येईल, तेंव्हा जाणविण्याजोगा फरक का पडेल ? त्याचे महत्त्वाचे कारण पृथ्वी आणि Proxima Centauri यातील अंतर हे आहे. इथे काळात पडणार्या फरकास कारणीभूत ठरणारा घटक हा गुरुत्वाकर्षणापेक्षाही अंतराळयानाचा वेग हा असणार आहे (जो प्रकाशाच्या काही टक्के इतका ठेवावा लागेल). समजा असे मानले की एक तृतीयांश प्रकाशवेगाने एका यानातून मानव Proxima Centauri जवळच्या ग्रहावर जाऊन तिथे दोन वर्षे काढून परत आला तरी या प्रवासास त्याला साधारण पृथ्वीवरची किमान २८ वर्षे लागतील. या काळातील त्याच्या प्रवासामुळे पडणारा फरक काढण्यासाठी पोस्टच्या सोबत दिलेल्या वेगाशी संबंधित सूत्राचा उपयोग करावा लागेल तर गुरुत्वाकर्षणामुळे पडणारा फरक काढण्यासाठी (तिथे वस्तीचा दोन वर्षांचा कालावधी) दुसर्या एका सूत्राचा उपयोग करावा लागेल. या दोन्हींची बेरीज, तो पृथ्वीवरून निघाला त्यावेळेच्या पृथ्वीवरील त्याच्या समवयस्कापेक्षा तो किती काळाने तरुण असेल ते सांगेल
Time Dilation च्या माध्यमातून कालप्रवास प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्याला Nuclear Propulsion engine किंवा Antimatter Propulsion engine असलेली रॉकेट्स प्रत्यक्ष वापरात येण्याची वाट पहावी लागेल. पण कल्पनाशक्तीचे पंख लावलेल्या विज्ञानकथा, कादंबर्या, टीव्हीवरच्या मालिका, विज्ञानपटांसाठी असा कालप्रवास केव्हाच साध्य झाला आहे. अनेक वर्षांपूर्वी दूरदर्शनवर Star ट्रेक नावाची मालिका दाखविली जात असे. या मालिकेतल्या काही भागात अशा प्रकारच्या कालप्रवास मी सर्वप्रथम पाहिला होता. नुकत्याच येऊन गेलेल्या Interstellar या चित्रपटातही हा विषय हाताळण्यात आला आहे, मात्र तो केवळ अशा कालप्रवासाचे परिणाम दाखविण्यापुरता. चित्रपटाची संकल्पना ही काळासंबंधी,मितींसंबंधी अधिक गुंतागुंतीच्या गोष्टींना हाताळते.
=================
थोडेसे अवांतर
=================
श्रीमद् भागवत पुराण
नवमः स्कंधः
तृतीयोऽध्यायः
====
Source :
http://satsangdhara.net/bhp/bhp09-03.htm
http://satsangdhara.net/bhp/anv09-03.htm
तस्य पुत्रशतं जज्ञे ककुद्मि ज्येष्ठमुत्तमम् ।
ककुद्मी रेवतीं कन्यां स्वां आदाय विभुं गतः ॥ २९ ॥
पुत्र्या वरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकं अपावृतम् ।
आवर्तमाने गान्धर्वे स्थितोऽलब्धक्षणः क्षणम् ॥ ३० ॥
त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते. त्यांपैकी सर्वांत थोरला ककुद्मी होता. ककुद्मी आपली कन्या घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला. (२९-३०)
तदन्त आद्यमानम्य स्वाभिप्रायं न्यवेदयत् ।
तत् श्रुत्वा भगवान् ब्रह्मा प्रहस्य तमुवाच ह ॥ ३१ ॥
त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव त्याला हसून म्हणाले, (३१)
अहो राजन् निरुद्धास्ते कालेन हृदि ये कृताः ।
तत्पुत्रपौत्र नप्तॄणां गोत्राणि च न श्रृण्महे ॥ ३२ ॥
राजा ! तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास, ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता त्यांचे मुलगे, नातू, पणतू इतकेच काय गोत्रांची नावेसुद्धा शिल्लक राहिली नाहीत. (३२)
कालोऽभियातस्त्रिणव चतुर्युगविकल्पितः ।
तद्गच्छ देवदेवांशो बलदेवो महाबलः ॥ ३३ ॥
मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तू परत जा. यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत. (३३)
====

समुद्र सपाटीवर राहणा-या आणि उंच पर्वत शिखरावर राहणा-या मानवाच्या वय वाढण्याचा वेग वेगळा असेल का?
उत्तर द्याहटवाहोय. पण अतिनगण्य फरक.
उत्तर द्याहटवाम्हणजे येत काही दिवसात मानवाला भूतकाळात जाऊन चुकीच्या गोष्ट बदलत येतील
उत्तर द्याहटवातुमची टिप्पणी आत्ता पाहिली.
हटवाप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
असे ठामपणे म्हणणे आज अशक्य आहे. अपरिवर्तनीय भूतकाळ आणि विविध Timelines ह्या दोन भिन्न संकल्पना आहेत.
Sir प्रकाशाच्या गतीने प्रवास करण्याचे यान आपण शोधू पण पाठवलेला माणुस जिवंत परत आला पाहिजे यासाठी जास्ती कस लागेल. 👌🙏💐
उत्तर द्याहटवातुमची टिप्पणी आत्ता पाहिली.
हटवाप्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
प्रकाशाच्या वेगाने जाणारे यान निर्माण करणे आजच्या तंत्रज्ञानाला निव्वळ अशक्य आहे. कारण त्यामागची कारणे अशा यानास आवश्यक असणारी ऊर्जा आणि प्रकाशवेगाने जाणार्या अंतराळयानाचे संभाव्य (वाढलेले) वस्तुमान ही आहेत.