गुरुवार, ८ सप्टेंबर, २०१६

कालप्रवास - लेखांक ३ / ७


Time Dilation च्या माध्यमातून आपण केवळ भविष्यकाळात प्रवास करू शकतो. भूतकाळात नाही. पण यदाकदाचित कालप्रवास करून भूतकाळात जाणे शक्य झालेच, तर मूळातच या संकल्पनेला साकार होण्यासाठी काही अडथळ्यांचा विचार करावा लागेल.  Causality (कार्यकारणभाव) च्या नियमांचा भंग करण्याचा दोष भविष्यकाळातील प्रवासास लागत नाही, हा नियमभंग केवळ भूतकाळात कालप्रवास केल्याने निर्माण होतो.  या नियमांचा भंग कशा प्रकारे होतो हे सांगण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे , तो भूतकाळातील  कालप्रवासातून निर्माण होणार्‍या संभाव्य विरोधाभासांचा (Paradoxes).
यातील काही प्रमुख विरोधाभास पुढीलप्रमाणे आहेत :

असे समजा की कालयंत्राचा शोध लागला असून भूतकाळात जाणे शक्य झाले आहे. 

१) Grandfather Paradox : असेही समजा की एक व्यक्ती या कालयंत्राचा उपयोग करून भूतकाळात गेली व अनावधनाने या व्यक्तीकडून, तिच्या
आजोबांची, त्या आजोबांना संतती होण्यापूर्वीच हत्या झाली. अशा परिस्थितीत काय घडेल ?  आजोबांना संतती होण्यापूर्वीच त्यांची हत्या झाल्यामुळे त्यांची पिढी पुढे वाढू शकलेली नाही. म्हणजेच त्या व्यक्तीच्या वडीलांचा जन्म होऊ शकलेला नाही. स्वाभाविकच भविष्यात त्या व्यक्तीचाही जन्मच होऊ शकत नाही. असे जर असेल, तर  मग ही व्यक्ती भूतकाळात गेल्याची घटनाही घडू शकत नाही. पण आजोबांची हत्या तर ही व्यक्ती भूतकाळात गेल्यामुळे झाली आहे.  इथे ही हत्या महत्त्वाची नसून कालप्रवास करणार्‍या व्यक्तीने स्वत:च्या अस्तित्वाचे कारणच संपविणे, हे या विरोधाभासाचे बीज आहे.

२) Hitler paradox : हा विरोधाभास Grandfather Paradox चीच एक वेगळी आवृत्ती आहे.  दुसर्‍या महायुद्धाच्या भडक्याचे मूळ कारण हिटलर आहे असे ठामपणे मानून, एक मनुष्य हिटलर लहान असतानाच्या भूतकाळात जातो आणि तो हिटलरला लहान असतानाच मारून टाकतो. इथे विरोधाभास अशासाठी आहे की जर हिटलर लहान असतानाच मेला असेल, तर तो प्रसिद्ध होऊन जर्मनीत व जगात घडलेल्या घटनांना कारणीभूत ठरण्याची शक्यताच नाहीशी होते. त्यामुळे अर्थातच त्या व्यक्तीचे भूतकाळात जाण्याचे कारणच नाहीसे होते.  Grandfather Paradox मध्ये भूतकाळात प्रवास करण्याचा उद्देश हा भूतकाळात बदल केल्याने बदलत नाही. भूतकाळातील त्या बदलामुळे नवीन Timeline (काळानुरूप घटनांचा वेगळा प्रवाह) तयार होत असेलही, मात्र Hitler Paradox प्रमाणे तो उद्देशाच्याच विरोधात जात नाही.

३) Predestination Paradox : जेंव्हा भूतकाळातील एखादी घटना टाळण्यासाठी कालप्रवास करून भूतकाळात गेलेली एखादी व्यक्ती, भूतकाळातील तीच घटना घडण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कारणीभूत ठरते तेंव्हा हा विरोधाभास घडला आहे असे म्हणता येईल.

असे समजा एका बॉम्बस्फोटाच्या दुर्घटनेत प्रचंड मालमत्ता व मनुष्यहानी झाली आहे. एका पोलिस अधिकार्‍याला ही दुर्घटना घडण्यापूर्वीच,आरोपीला
पकडण्यासाठी भूतकाळात धाडण्यात येते. हा पोलिस अधिकारी भूतकाळात त्या संभाव्य गुन्हेगाराचा ठावठिकाणा शोधून काढतो व त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो. तो संभाव्य गुन्हेगार त्या अधिकार्‍याला हुलकावणी देऊन, बॉम्ब घेऊन पळ काढतो. अधिकारी त्याचा पाठलाग करतो. त्या गुन्हेगाराला या पाठलागामुळे, त्याच्या ईप्सित ठिकाणी पोहोचणे अशक्य होते.   या पाठलागाच्या दरम्यान तो संभाव्य गुन्हेगार, गुन्ह्याच्या ठिकाणी येतो आणि त्याच ठिकाणी घाबरल्यामुळे किंवा अन्य काही कारणामुळे, त्या गुन्हेगाराकडून बॉम्बस्फोट घडून येतो.

इथे एका प्रकारे तो पाठलाग व पर्यायाने त्या पोलिस अधिकार्‍याचे भूतकाळात जाणे, हेच त्या विवक्षित ठिकाणी, ती दुर्घटना घडण्यास कारणीभूत झाले आहे. न तो अधिकारी भूतकाळात जाता, न पाठलाग होता , न कदाचित त्या विवक्षित ठिकाणी ती दुर्घटना घडली असती. या विरोधाभासाला Causal loop असेही म्हटले जाते.

४) Bootstrap Paradox : हा विरोधाभास बराचसा  Predestination Paradox सारखाच आहे , पण यात असलेला मुख्य फरक हा आहे की इथे वर्तमानातील एखादी वस्तू (किंवा माहिती) ही भूतकाळातील एखादी अशी घटना घडण्यास कारणीभूत होते, ज्यायोगे त्या वस्तूचे (किंवा माहितीचे)  त्या चौकटीतले अस्तित्व निर्माण होते.  इथे थोडक्यात ती वस्तू (किंवा माहिती) हीच सर्व घटनांची केंद्रबिंदू आहे, पण तरीही वास्तविक अर्थाने त्या वस्तूला (किंवा माहितीला ) ठराविक असा उगम नाही. तिचा स्त्रोत काय ते ठरविणे अवघड आहे.  या विरोधाभासाला  Ontological Paradox असेही म्हटले जाते.

Bootstrap Paradox हा एक प्रकारचा Causal loop म्हणजेच चक्राकार कार्यकारणभाव आहे. थोडक्यात एखादे कार्य ज्या कारणामुळे घडले आहे ते कारण निर्माण होण्यामागे ते कार्यच असते.

--

कल्पना करा की कालयंत्राचा शोध जरी लागला असला तरी त्यातून केवळ वस्तूच भूतकाळात पाठविता येतात, माणसांना स्वत: प्रवास करणे शक्य झालेले नाही, पण या कालयंत्राचा वापर करणे तुम्हाला शक्य आहे. एके दिवशी तुमच्या घरातील जुन्या कागदपत्रांवरून तुमच्या असे लक्षात येते की मुंबईत तुमच्या मालकीची खूप मोठी जमीन होती, जी तुमच्या पणजोबांनी आर्थिक अडचणींमुळे विकली. आज ही जमीन आपल्या घराण्यात असती तर या कल्पनेने तुमचे मन हरखते.  तुमच्या पिढीजात घरातील, एका तिजोरीत परंपरागत चालत आलेले काही दागिने आहेत. त्यात एक मोठे सोन्याचे कडे आहे.  तुमच्या मनात येते की आज वापरण्याच्या दृष्टीने निरुपयोगी असलेले हे कडे त्यावेळी विकले असते तर जमीन वाचली असती.  तुम्ही कालयंत्राचा उपयोग करून घेण्याचे ठरविता आणि एका कागदावर   'जमीन विकू नये, हे सोन्याचे कडे विकावे'   असा संदेश लिहून त्यात ते सोन्याचे कडे गुंडाळून तो कागद व ते कडे कालयंत्राच्या सहाय्याने अशा रितीने भूतकाळात पाठविता की जमीन विकण्यापूर्वी किमान दोन दिवस आधी ते कडे व तो संदेश तुमच्या पणजोबांना त्या जुन्या घरातच सापडेल.  

(भूतकाळात) पणजोबांना कडे सापडतेही. पण तो संदेश वाचल्यावर, त्यांना असे वाटते की कुणीतरी भला मनुष्य, आपल्याला मदत करण्याच्या हेतूने ते कडे तिथे जाणूनबुजून ठेवून गेला आहे.  परक्याचे धन वापरुन आपली जमीन वाचवावी, ही कल्पना काही पणजोबांच्या पचनी पडत नाही. ते तो कागद फाडून टाकतात आणि ते सोन्याचे कडे तिजोरीत नीट ठेवून देतात. जेणेकरून ज्याचे कडे आहे त्या व्यक्तीला शोधून काढावे व ते सोन्याचे कडे त्याला परत करावे. अर्थातच पणजोबांना त्या सोन्याच्या कड्याचा मालक सापडत नाही आणि ते कडे तिजोरीतच पडून राहते,परंपरागत दागिना बनून !

इथे त्या सोन्याच्या कड्याचा उगम अनिश्चित आहे. पणजोबांकडे सोन्याचे कडे आले आणि तिजोरीत ठेवले गेले, कारण ते वर्तमानकाळातून भूतकाळात पाठविले गेले.  पण ते कडे भूतकाळात पाठविले गेले कारण ते त्या पिढीजात घरातील तिजोरीत इतर दागिन्यांसोबत होते.

--

हा लेख मी जेंव्हा प्रथम प्रकाशित केला तेंव्हा,  'भूतकाळातील गोष्टी घडून गेल्या आहेत त्या पुन्हा कशा घडणार आणि पुन्हा घडणारच असेल तर त्या बदलता कशा येतील' असा एक प्रश्नार्थक रोख काही टिप्पणींमध्ये होता.  मात्र आपण एक लक्षात घेतले पाहिजे की मूळात भूतकाळातील कालप्रवास हीच अजूनही (अधिकृतरित्या) प्रत्यक्षात न आलेली संकल्पना आहे. त्या दृष्टीने जे 'यशस्वी' प्रयोगांचे दावे करण्यात आले आहेत ते मी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे सूक्ष्म स्तरावर (Quantum) आहेत. उदा एक photon (प्रकाशाचे कणरूप) ठराविक उपकरणांमधून पाठविल्यावर, पाठविलेल्या वेळेपेक्षा अमुक एक नॅनोसेकंद आधी उपकरणाच्या दुसर्‍या बाजूने बाहेर पडला. म्हणजेच तो भूतकाळात गेला वगैरे. यासंदर्भातील काही गोष्टी  पुढील एका लेखांकात अधिक स्पष्ट होतील.

Seven Days (१९९८-९९) या TV मालिकेत भूतकाळ बदलणे या संकल्पनेचा अनेकदा वापर केलेला मी पाहिला आहे. मालिकेची संकल्पनाच मूळात घडलेल्या चुका, दुर्घटना टाळणे ही होती.  मला आता नीटसे आठवत नाही, पण कुठल्या तरी अनोळखी मूलद्रव्याचा वापर करून  जास्तीतजास्त एक आठवडा भूतकाळात मागे जाता येत असे.  एक गुप्त सरकारी संस्था त्या कालयंत्राच्या माध्यमातून, एका अधिकार्‍यास भूतकाळात पाठवत असे आणि मग तो ती दुर्घटना टाळण्यासाठी जीवाचे रान करत असे. अनेक विज्ञानपटांमध्ये या विरोधाभासांचा उपयोग केला गेला आहे. भूतकाळात बदल घडवून वर्तमानकाळ सुधारणे हा प्रमुख उद्देश असलेले 'Back To The Future' 'Deja Vu', 'Terminator', 'Minority Report' हे मला चटकन
आठवणारे  काही उल्लेखनीय चित्रपट. 

नुकताच  'Predestination' याच नावाचा चित्रपट पाहिला. अत्यंत अनपेक्षित कथा असलेल्या या चित्रपटात  Predestination Paradox प्रमाणाबाहेर ताणला आहे, तरीही हा चित्रपट किमान एकदा पाहण्यासारखा नक्कीच आहे. MIB 3, Source Code आणि Primer या चित्रपटांमध्ये सुद्धा कालप्रवासाचा उपयोग केला गेला आहे. निव्वळ मनोरंजन हा उद्देश असणारे आणि त्यासाठी  कालप्रवासाची पार्श्वभूमी वापरणारे चित्रपटही विपुल प्रमाणात आहेत.



Time Loop नावाचा एक काळाचा गुंता क्वचित या विरोधाभासाचा भाग असू शकतो. यामध्ये घटनांची एक मालिका पुन्हा पुन्हा घडत राहते आणि त्या घटनेत अडकलेल्या व्यक्ती त्याच त्या भूमिका आणि थोडाफार बदल असलेल्या घटना पुन्हा पुन्हा जगत राहतात. घटनामालिकेच्या शेवटी हा गुंता एखाद्या वर्तुळात फिरल्याप्रमाणे पुन्हा पहिल्या घटनेशी जाऊन ठेपतो.  मात्र हा Causal Loop चा प्रकार नसून एक प्रकारचा काळाच्या रस्त्यावरचा चकवा आहे. जिथून बाहेर पडण्यासाठी वा ज्यातून सुटण्यासाठी एखादी विशिष्ट घटना घडावी लागते. Groundhog Day या चित्रपटात याचा वापर केला होता.

--
देवकीच्या आठव्या पुत्राकडून तुला मृत्यू आहे, ही गोष्ट जाणीवपूर्वक कंसापर्यंत पोहोचविणे हा Predestination Paradox चा जाणीवपूर्वक केलेला वापर होता की काय, अशी शंका माझ्या मनात घर करून आहे.
--

कालप्रवासाच्या संदर्भात या विरोधाभासांचे उत्तर शोधण्याचे, त्यांच्या बाजूने व विरोधात तर्कशुद्ध मांडणी करण्याचे प्रयत्नही झाले आहेत. त्या संदर्भात काही गोष्टी पुढल्या लेखांकात.

३ टिप्पण्या:

  1. भूतकाळातील पणजोबांना नातवाने चिठ्ठी आणि कडे पाठवले मग आता त्या वेळे पुरते पणजोबांकडे दोन कडे झाले असनार ना सर.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमची टिप्पणी आत्ता पाहिली.
      प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
      Timeline ही संकल्पना नीट वाचलीत तर 'असे कसे' हे उलगडेल.

      हटवा