गुरुवार, २८ जुलै, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (६ / ९)


संदेशांच्या पलीकडे जाऊन, जीवसृष्टीचा शोध घेण्याचे जे दोन मार्ग आहेत त्यातील एक मार्ग आहे Space Missions (अवकाश मोहिमा). यातील मुख्य अडसर आहे अवकाशातील प्रचंड अंतरांचा. त्यामूळे उपलब्ध तंत्रज्ञानाच्या आधारे अजून काही दशके तरी, आपली मजल ही आपल्या सूर्यमालेपुरतीच मर्यादित राहणार आहे. 

Habitable zone ची संकल्पना ही मुख्यत्वेकरून पाण्याची, सुयोग्य तापमानाची आहे आणि एकंदरच मानवाला सुयोग्य ठरेल, सुयोग्य बनवता येईल अशा प्रकारच्या पर्यावरणाची आहे. त्यामुळेच Habitable Zone चा मागोवा हा वास्तविक हा पृथ्वीसदृश परकीय जीवसृष्टी शोधण्याचा आहे. पण आपल्या सूर्यमालेत Habitable zone मध्ये असणार्‍या ग्रहांची मर्यादित संख्या लक्षात घेता,  त्यापलीकडे जाऊन 'मानवसदृश नसलेली, पाण्याची आवश्यकता नसलेली, श्वसनासाठी ऑक्सिजनची गरज नसलेली जीवसृष्टी किंवा सूक्ष्म जीवसृष्टी  का नसेल' हा प्रश्न वैज्ञानिकांना पडला,  आणि त्याविषयी सूर्यमालेतील अनेक ग्रहांचे, उपग्रहांचे वातावरण लक्षात घेऊन विविध शक्यता मांडल्या गेल्या;  पण या प्रश्नाचे उत्तर हे सर्वप्रथम पृथ्वीवरच मिळाले.

भूमध्य समूद्राच्या तळाशी, समुद्रसपाटीपासून सुमारे 3 किमी इतक्या खोल पाण्यात सापडलेल्या Loricifera या बहुपेशीय जीवाच्या प्रजाती ऑक्सिजनशिवाय त्यांचा संपूर्ण जीवनक्रम पूर्ण करतात. त्यापूर्वी ऑक्सिजनची आवश्यकता नसणारे किंबहुना ऑक्सिजन असल्यास मृत पावणारे अनेक एकपेशीय जीवाणू सापडले होते.

Methylacidiphilum fumariolicum SolV bacterium हे मिथेन वापरणारे जीवाणू इटलीतील एका निद्रिस्त ज्वालामुखीत सापडले आहेत. त्यांचे अन्न आहे Lanthanide या नावाने ओळखले जाणारे आवर्त सारणीतील धातू .   पाण्याखाली असणार्‍या सक्रिय ज्वालामुखीच्या आसपास राहून, ज्वालामुखीतून बाहेर येणार्‍या लोह, मिथेन, गंधक यावर जगणारे जीवाणू ही सापडले आहेत.

याव्यतिरिक्त 'दगड खाणारे जीवाणू' या गटात मोडणारे Thiobacillus thioparus हे जीवाणू हे संगमरवरावर राहतात.  हवेतील सल्फर डायऑक्साइडचे ते सल्फ्युरिक अॅसिड मध्ये रूपांतर करतात आणि त्याचा वापर करून संगमरवराचे प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये रूपांतर करतात. या दरम्यान जो कार्बन डायऑक्साइड तयार होतो तो स्वत:च्या पोषणासाठी वापरतात. याच गटात मोडणारे Nitrosomonas नामक जीवाणू  हवेतील अमोनिया वापरुन नायट्रस अॅसिड व नायट्रिक अॅसिड तयार करतात आणि दगडांचा नाश करतात. 

Deinococcus radiodurans या प्रजातीचे जीवाणू हे तब्बल 30 लाख रॅड इतक्या तीव्र गॅमा किरणोत्सर्गातही तग धरतात, इतकेच नव्हे तर त्यांची वाढही होते.  (मानवाला साधारण 500 ते 1000 रॅडचा डोसही जीवघेणा ठरतो )

जर पृथ्वीवर, इतक्या वेगवेगळ्या तर्‍हेने राहणारी सजीव सृष्टी सापडत असेल, तर 'ऑक्सिजन नसल्यामुळे जीवसृष्टी नाही' असे लेबल लावलेल्या सूर्यमालेतील अनेक ग्रहांवर, उपग्रहांवर जीवसृष्टी निश्चितच असू शकते आणि त्यादृष्टीने आता शोधही चालू आहे.

सूर्यमालेतील जीवसृष्टीचा शोध या मोहिमांचे सर्वप्रथम आणि स्वाभाविक लक्ष्य हे, चंद्र होते. पृष्ठभागावर असलेला पाण्याचा अभाव आणि अत्यंत विरळ वातावरण असल्याने, चंद्रावर कुठल्याही स्वरूपाची 'दृश्य' जीवसृष्टी नाही हे लवकर लक्षात आले. तरीही चंद्रावरील मानव-मोहिमांमध्ये तिथे अनपेक्षित असे बरेच काही दिसल्याच्या आणि NASA ने 'त्या गोष्टी' दडविल्याच्या,  चंद्रावर ailen-base असल्याच्या,  Google Moon या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तिथे काही बांधकामे दिसत असल्याच्या,  NASA ने स्वत:च जारी केलेल्या काही छायाचित्रांना zoom करून बघितल्यावर त्यात 'विशेष' काही दिसत असल्याच्या वावड्या अनेक काळ उठत होत्या आणि अजूनही उठतात.  या संबंधीची छायाचित्रे, विडियो आणि इतर माहिती इतक्या मोठ्या प्रमाणावर इंटरनेटवर उपलब्ध आहे, की खरे काय आणि खोटे काय याचा मनात संभ्रम उपजावा.


चांद्रमोहिमांचा इतिहास हा अनेक अपयशांच्या पायावर उभा आहे. ऑगस्ट १९५८ पासून सुरू केलेल्या प्रयत्नांना खर्‍या अर्थाने पहिले यश मिळाले ते  रशियाचे Luna 9 हे  ३ फेब्रुवारी १९६६ रोजी चंद्रावर सुखरूप उतरलेले तेंव्हा.  मात्र सूक्ष्म, सुप्त जीवसृष्टीचा शोध घेऊ शकेल, अशी कोणतीही यंत्रणा त्या यानात नव्हती.  २४ डिसेंबर १९६६ रोजी Luna 13 या यानाने सर्वप्रथम मातीचे नमुने तपासून त्याचे अहवाल पृथ्वीकडे पाठवले.  डिसेंबर १९६८ मधील, अपोलो 8 ही चंद्राभोवती घिरट्या घालण्यात यशस्वी  झालेली मानवाची पहिली झेप,  २० जुलै १९६९ हे मानवाचे चंद्रावर पहिले पाऊल आणि डिसेंबर १९७२ ची मानवाने पाऊल ठेवण्याची शेवटची चांद्रमोहिम. त्यानंतर १९७८ पर्यंत काही मानवरहित चांद्रमोहिमा झाल्या आणि  त्यानंतर थेट १९९० पासून अनेकवेळा जपान, आणि एकदा ESA आणि चीन यांच्याही मोहिमा झाल्या. पण या सर्व टप्प्यांवर चंद्रावर कोणतीही जीवसृष्टी नाही या दाव्यावर वैज्ञानिक जगत ठाम होते.  मात्र भारताच्या चांद्रयान 1 ने impact probe च्या माध्यमातून चंद्रावरील विवरात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याची पुष्टी केली आणि  सूक्ष्म स्वरूपात, सुप्त स्वरूपात तिथे काही वेगळ्या स्वरूपाची जीवसृष्टी असेल की काय हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चिला गेला.   भारताचे चांद्रयान 2 व इतर देशांच्या योजलेल्या काही मोहिमांमधून कदाचित याबाबतीत निश्चित स्वरूपाची माहिती मिळू शकेल.

बुध हा सूर्याने 'भाजून' काढलेला व जवळजवळ वातावरणरहित असलेला ग्रह आणि green house परिणामाने ग्रस्त झालेला आणि सल्फ्युरिक आम्लाचा पाऊस साहत असलेला शुक्र, हे जीवसृष्टीच्या शोधात असलेल्या वैज्ञानिकांच्या यादीत कधीच नव्हते. 

बुध सूर्याला खूप जवळ असल्याने त्याचे परिभ्रमण केवळ ८८  (पृथ्वी-)दिवसात पूर्ण होते. सूर्यावरच्या निरीक्षकाच्या संदर्भचौकटीत विचार केला तर बुधाच्या एका 'दिवसात' त्याची 'दोन वर्षे' होतात !  त्याचा आसही जवळजवळ सरळ आहे.  चंद्राची ज्याप्रमाणे आपल्याला कायम एकच बाजू दिसते (Tidal Locking) Messenger मोहिमेतून, बुधाच्या उत्तरध्रुवाजवळील  कायमस्वरूपी सावलीत असलेल्या काही विवरात , पाण्याचा बर्फ व काही सेंद्रिय (organic) घटक असल्याची माहिती कळली आहे. बुधाला स्वत:चे  चुंबकीय क्षेत्र आहे त्यामुळे solar wind पासून बुधाचे काही प्रमाणात तरी संरक्षण होत असावे असे म्हणायला वाव आहे.  सेंद्रिय घटक आणि पाणी एकत्र असणे हा जीवसृष्टी असू शकण्याचा एक निकष आहे.   BepiColombo या नावाने ESA (Europian Space Agency) आणि JAXA (Japan Aerospace Exploration Agency) यांनी, ऑक्टोबर २०१८ मध्ये योजलेल्या संयुक्त मोहीमेदरम्यान, बुधाबाबत आणखी काही प्रश्नांचा उलगडा होईल. सध्याच्या कार्यक्रमानुसार ही मोहीम मे २०२७ पर्यंत चालेल.

शुक्र हा खरंतर सूर्यमालेतला सर्वात गूढ ग्रह. सल्फ्युरिक आम्लाच्या ढगांच्याआड स्वत:ला दडवून घेणारा हा ग्रह कुठल्याही सामान्य प्रकारच्या जीवसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरावा. डिसेंबर १९७० मध्ये शुक्रावर सर्वप्रथम उतरलेले Venera 7 हे यान तिथल्या पृष्ठभागावर केवळ २० मिनिटे तग धरू शकले,  तर ऑक्टोबर १९८१ मध्ये सोडलेल्या  Venera 13 चा लँडरने जवळजवळ 127 मिनिटे तग धरली !  या दोन तासात काढलेल्या विविध छायाचित्रांचा आधार घेऊन, एका लेखात तिथे जीवसृष्टी असल्याचे दावे करण्यात आले होते,  जे नंतर Image Processing मधील त्रुटी म्हणून नाकारण्यात आले.  त्यानंतर Vega-2 या रशियाच्याच यानाने तेथे Lander उतरविला. त्याने नष्ट होण्यापूर्वी ५६ मिनिटे  माहितीचे प्रक्षेपण केले. त्यानंतर इतर काही मोहिमा झाल्या, पण शुक्रावर एकही यान उतरलेले नाही.  पृथ्वीच्या ९२ पट हवेचा दाब,  ४७०° सेल्सियस तापमान आणि वातावरणाच्या ९७%  कार्बन डायऑक्साइड असलेल्या या जगात, कुठल्याही प्रकारची जीवसृष्टी असलीच, तर ती आपल्या पेक्षा किती भिन्न असेल याची आपण कल्पना करू शकतो.  आपले सर्व जीवन जसे पाण्याशी निगडीत आहे, तसे तिथल्या पृष्ठभागावरील आजचे जीवन हे कार्बन डायऑक्साइडशी निगडीत असेल, आणि जर तिथल्या ढगात जीवन असेल तर ते गंधकावर आधारित असेल.  पण तिथल्या चुंबकीय क्षेत्राच्या अभावामुळे, अनेक वैज्ञानिक असे मानतात की की habitable zone मध्ये असणार्‍या शुक्रावर आज जीवन असण्याची शक्यता नाही. कदाचित एकेकाळी तिथे जीवन असावे हे शक्य आहे,  पण Green House परिणामात अडकत गेलेल्या शुक्रावर, कालांतराने परिस्थिती वेगाने बिघडत गेली आणि आज तो या स्थितीला पोहोचला आहे.  पृथ्वीवरील वाढत्या प्रदूषणाच्या, कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाबाबत व्यक्त केली जाणारी चिंता किती योग्य आहे हे शुक्राच्या उदाहरणावरून पटायला हरकत नसावी.

सल्फ्युरिक आम्लाच्या ढगांच्या बुरख्याआड लपणार्‍या शुक्राने आजपर्यंत आपल्या मोहिमांना फारसे यश लाभू दिलेले नाही. JAXA चा सध्या शुक्राभोवती फिरणारा Akatsuki नावाचा orbiter सुरुवातीच्या अपयशानंतर कक्षेत स्थिर झाला आहे, मात्र त्याच्याकडून बहुतेक मर्यादित माहिती मिळू शकणार आहे.  बुधाच्या मोहिमेसाठी योजलेले BepiColombo नावाचे यान शुक्राजवळून  flyby करणार आहे, त्यावेळी आणि २०२० नंतर योजलेल्या ISRO च्या आणि २०२५ च्या सुमारास योजलेल्या Venera-D या रशियाच्या मोहिमेदरम्यान कदाचित शुक्राची काही आणखी रहस्ये उलगडतील.

जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या दृष्टीने एकेकाळी 'सर्वाधिक लायक' मानला गेलेला मंगळ, गेली काही वर्षे अन्वेषणाच्या, संशोधनाच्या दृष्टीने प्रमुख लक्ष्य आहे.
अनेक जण आहेत. आणि त्याला कारणीभूत ठरलेल्या गोष्टी आहेत, NASA नेच उत्तम कॅमेरांच्या साह्याने टिपलेली काही छायाचित्रे.  Pathfinder, Spirit, Opportunity आणि नंतर Curiosity या rovers नी टिपलेली आणि मानवाला परिचित असलेल्या आकारांशी साधर्म्य असलेली
, इतक्या विविध 'वस्तुंची' छायाचित्रे आहेत की हे दृष्टीभ्रम आहेत हा NASA देत असलेला विश्वास डळमळीत व्हावा. दुरून घेतलेल्या या छायाचित्रांपैकी एकात  humanoid, एकात सरड्यासदृश
प्राणी,  एकात  sphinx सारखे दिसणारे एक Structure ही आहे. हे सर्व दगडांना आलेल्या आकारामुळे, प्रकाशामुळे होणारे दृष्टीभ्रम आहेत असे NASA चे म्हणणे आहे, तर NASA नेहेमीप्रमाणेच अनेक गोष्टी दडवते आहे असे  मंगळावरील सजीव सृष्टीच्या अस्तित्वावर ठाम विश्वास असणार्‍यांचे म्हणणे आहे.  २०१८ मधील ESA आणि नंतर २०२० मध्ये NASA यांचे अधिक प्रगत rover मंगळावर उतरतील आणि बहुदा  २०३७ मध्ये मानवाचे पहिले पाऊल मंगळावर पडेल. या सार्‍यांचे निष्कर्ष येईपर्यंत तरी या चर्चा थांबतील असे वाटत नाही (अर्थात नंतर थांबतील असेही नाही :-) ) .


टेलिस्कोपमधून मंगळावर आढळलेले 'कालवे' व त्यातून  मंगळावर असलेल्या जीवसृष्टीचे बांधलेले आडाखे Mariner मोहिमांनंतर चुकीचे आहेत असे निदर्शनास आले. त्यानंतर १९७६ मध्ये Viking 1 ने टिपलेल्या 'Face on Mars' या नावाने प्रसिद्ध असलेल्या छायाचित्रामुळे NASA काहीतरी दडवत आहे या समजुतीला पुन्हा बळ मिळाले. कॅमेराच्या वाढत्या क्षमतेनुसार या छायाचित्रात 'दिसलेला' चेहेरा हरवत गेला. पण तरीही त्याने समाधान न झालेले आजही अनेक जण आहेत.

मात्र मंगळावर एके काळी वाहते पाणी, कदाचित जलाशयही होते या प्रतिपादनावर विश्वास ठेवणार्‍या वैज्ञानिकांची संख्या मोठी आहे. किंबहुना मंगळाच्या पृष्ठभागावर असलेल्या  iron oxide चे मोठ्या प्रमाणावरचे अस्तित्व, थोडक्यात एकप्रकारे लोखंडाचा गंज, ऑक्सिजन आणि पाण्याशिवाय शक्य नाही.   मंगळाला 'भौम; अर्थात भूमीचा पुत्र मानणार्‍या आपल्या संस्कृतीला, पृष्ठभागावरील लोहाच्या अस्तित्वाचे फारसे नवल वाटण्याचे कारण नाही, पण एकेकाळी मंगळावर असलेली तेथील पुरातन आणि प्रगत जीवसृष्टीने  निर्मिलेली iron structures कालांतराने गंजून नष्ट झाली आणि हे iron oxide त्याचेच निदर्शक आहे असे मानणाराही एक वर्ग आहे.

आत्तापर्यंत झालेल्या परीक्षणात, सूक्ष्म जीवसृष्टीचे निदर्शक किंवा जागृत ज्वालामुखीचे निदर्शक ठरू शकेल इतपत मिथेन किंवा अमोनियाचे प्रमाण तिथल्या विरळ वातावरणात आढळलेले नाही. जो मिथेन वा अमोनिया आढळला तो अतिशय कमी वेळ टिकत होता. मात्र त्याचा उगम कुठून होतो आहे याचा थांगपत्ता  लागलेला नाही.  तरीही चुंबकीय क्षेत्राचा अभाव असल्यामुळे, सूर्याचे तडाखे सोसणार्‍या मंगळावरील पृष्ठभागावर, सूक्ष्म जीवसृष्टीला पुष्टी द्यावी असे कोणतेही चिन्ह सध्या आढळलेले नाही असे म्हणता येईल.  पृष्ठभागाखाली वा खूप खोलवर एखादी जीवसृष्टी असल्यास तशी परीक्षणे झालेली नाहीत. उल्काघात वा तत्सम आघातातून तयार झालेली काच / स्फटीक जैविक अस्तित्वाचे पुरावे जतन करून ठेवू शकते. अशी काच मंगळावर आढळली आहे आणि तिथल्या विवरांमध्ये अधिक मोठ्या प्रमाणावर तिचे अस्तित्व असू शकेल. मंगळाच्या ध्रुवांवर बर्फाचे अस्तित्व आहे हे पूर्वीपासूनच माहीत होते, पण काही ठिकाणी पृष्ठभागाखालीही बर्फ आढळला आहे.

कदाचित अशा अनेक शक्यता आढळल्यामुळेच जानेवारी २०१४ मध्ये NASA ने Curiosity आणि Opportunity आता पुरातन जैविक अस्तित्वाच्या सिद्धतेबाबत परीक्षणे करतील असे ठरविले असावे. मंगळावर मानवी मोहीम काढण्याबाबत अनेकांना प्रचंड उत्सुकता आहे मात्र  मंगळाबाबतचे पुढचे लक्ष्य हे बहुदा Sample Return मोहिमेचे असणार आहे. यासाठी वेगवेगळे देश विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत त्यात कोणताही देश यशस्वी झाला तरीही जीवसृष्टीच्या शोधमोहिमेच्या दृष्टिकोनातून ते आणखी एक पुढचे पाऊल असेल.

मंगळाचे दोन उपग्रह  Phobos व Deimos हे बहुदा लघुग्रहांच्या पट्ट्यातून, मंगळाच्या गुरुत्वाकर्षणात अडकलेले दोन छोटे लघुग्रह असावेत असा जुना कयास आहे.  पण दोन्ही उपग्रहांची साधारण विषुववृत्ताजवळ असलेली वर्तुळाकार कक्षा पाहता ते कदाचित 'कृत्रिम' उपग्रह असावेत, आतून कदाचित पोकळ असावेत असाही तर्क मांडणारे काहीजण होते. यापैकी एकाही उपग्रहावर जीवसृष्टी असण्याची शक्यता नगण्य आहे.

लघुग्रहांच्या पट्ट्यात जीवसृष्टी शोधताना प्रामुख्याने  Ceres आणि  Vesta या अनुक्रमे बटुग्रह आणि लघुग्रह असे वर्गीकरण झालेल्या दोघांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक होते.   सध्या Ceres भोवती घिरट्या घालणार्‍या 'Dawn' या यानाने Ceres बद्दल अतिशय उपयुक्त माहिती पुरवली आहे. तिथे असलेल्या बर्फाच्या साठ्याखाली, द्रवस्वरूपातील जलाशय असण्याची शक्यता आहे. Ceres वरील सुप्रसिद्ध असलेला, विशाल शुभ्र ठिपका (प्रदेश) हा धुण्याचा सोडा ( Sodium Carbonate) आहे असे निदान आहे. पण हा ठिपका एकमेव नाही.इतरही असे अनेक क्षारांचे, अमोनिया मिश्रित मातीचे प्रदेश तिथे आढळले आहेत, जे भूस्तरीय सक्रियतेचे निदर्शक आहेत.  पर्यायाने तिथे पृष्ठभागाखाली सूक्ष्म जीवसृष्टीची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही.   सूर्यमालेतील (ज्ञात असा) सर्वात उंच 'पर्वत' (हा पर्वत म्हणजे एका विवराच्या तळापासून वर आलेला सुळका आहे) असलेल्या Vesta वर जीवसृष्टी असू शकेल अशी चिन्हे अजूनतरी सापडलेली नाहीत.  पण तब्बल १९ किमी खोल असलेल्या Rheasilvia विवराच्या आत काय परिस्थिती आहे ते प्रत्यक्ष परीक्षणे झाल्याशिवाय सांगता येणार नाही.

सोमवार, २५ जुलै, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (५ / ९)


आकाशगंगेतील ग्रहांची (संभाव्य) प्रचंड संख्या आणि (अधिकृतरीत्या !) अजूनपर्यंत न सापडलेली परग्रहावरील जीवसृष्टी याचा काही ताळमेळ बसत नाही हे लक्षात घेऊन Enrico Fermi या सुप्रसिद्ध वैज्ञानिकाने Fermi paradox ची मांडणी केली. यात मांडलेले मुद्दे आधीच्या लेखांकात येऊन गेले आहेत आणि ते असे आहेत :

१) आपल्या आकाशगंगेत सूर्याप्रमाणे असलेले अब्जावधी तारे आहेत, आणि ते पृथ्वीपेक्षा अब्जावधी वर्षे आधी निर्माण झाले आहेत.
२) यातील कित्येकांना ग्रहमाला असेल आणि कित्येक ग्रहमालांमध्ये पृथ्वीसारखा ग्रह असेल. यातील अनेक ग्रहांवर पृथ्वीच्या अब्जावधी वर्षे आधी प्रगत, अतिप्रगत जीवसृष्टी निर्माण झाली असेल.
३) दूरदूरचे अवकाशप्रवास, त्यातील कित्येकांच्या अगदी सहज आवाक्यात असतील.
४) या जीवसृष्टींना प्रकाशाचा वेग गाठता आलेला नाही, असे मानले तरीही, आत्तापर्यंत त्यातील अनेकांनी, आपल्या आकाशगंगेच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत प्रवास केला असेल, तशी क्षमता प्राप्त केली असेल.

ही चार गृहीतके मांडल्यावर स्वाभाविकच त्यातून निघणारा निष्कर्ष हा आहे की ज्ञात मानवी इतिहासाच्या गेल्या हजारो वर्षात अनेक प्रगत परग्रहवासीयांनी पृथ्वीला भेट दिली असली पाहिजे. आता विरोधाभासाचा प्रश्न उरतो की मग अजूनपर्यंत अशा भेटीचा 'विज्ञानाला पटेल असा' एकही पुरावा का सापडत नाही !?

या विरोधाभासाची अनुमानित उत्तर देणारे अनेक प्रयत्न झाले. त्यातील काही असे आहेत :

१) Drake च्या समीकरणातील न्यूनतम घटकमूल्यांच्या उत्तराप्रमाणे पृथ्वीसारखी दुसरी जीवसृष्टीच सध्यातरी अस्तित्वात नाही.
२) कदाचित दुसर्‍या ग्रहांवर जीवसृष्टी असेलही, पण ती पुरेशी बुद्धिमान नाही.
३) कदाचित दुसर्‍या ग्रहांवर बुद्धिमान जीवसृष्टी असेलही, पण ती वैज्ञानिकदृष्ट्या पुरेशी प्रगत नाही.
४) अशी जीवसृष्टी निर्माण झाली असेलही, पण तिने स्वत:चा विनाश करून घेतला आहे किंवा आवाक्याबाहेरील नैसर्गिक कारणांमुळे तिचा विनाश झाला आहे.
५) वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत प्रगत जीवसृष्टी निर्माण होऊनही, आपल्या दोघातील प्रचंड अंतरामुळे, आपल्यापर्यंत पोहोचणे हे त्यांच्या अजूनही आवाक्याबाहेर आहे.
६) वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत प्रगत जीवसृष्टी निर्माण होऊनही, आपल्यापर्यंत पोहोचणे हे खर्चाच्या दृष्टीने त्यांच्या आवाक्याबाहेरचे आहे.
७) अशा प्रकारचे संदेश पकडण्यासाठी आपल्याकडून आत्तापर्यंत दिला गेलेला वेळ अत्यंत अपुरा आहे किंवा आपण योग्य प्रकारे या संदेशांचा मागोवा घेत नाही आहोत.
८) परग्रहवासीयांकडून आपल्यापर्यंत संदेश पोहोचविण्याचे प्रयत्न हे अत्यंत अपुरे आहेत, किंवा त्यांनी ते कोणत्याही कारणाने थांबविले आहेत किंवा त्यांना आपल्याशी संपर्क साधण्यात किंचितही रस नाही.
९) परग्रहवासी, आपल्यापेक्षा इतके वेगळे आहेत किंवा इतक्या वेगळ्या स्तरावर, मितीत वावरत आहेत की आपण एकमेकांशी संपर्क करणे हे जवळजवळ अशक्य आहे.
१०) ते आपल्याला संदेश पाठवीत होते, पाठवत आहेत पण आपण त्याचे योग्य प्रकारे उत्तर देऊ शकलेलो नाही.

यातला शेवटचे जे अनुमानित उत्तर आहे, त्याच्या कक्षेत मोडेल अशी घटना १५ ऑगस्ट १९७७ रोजी रात्री १० वाजून १६ मिनिटांनी (EST) घडली. Big Ear या नावाने ओळखल्या जाणार्‍या Ohio State University मधील रेडियो टेलिस्कोपवर, एक संदेश पकडला आणि नोंदला गेला. काही दिवसांनी रेकॉर्ड केलेला डेटा चे निरीक्षण करताना Jerry R. Ehman या वैज्ञानिकाला त्या संदेशातील काही भाग अर्थपूर्ण वाटला आणि त्याने त्या Printout मधील संदेशाच्या भोवती वर्तुळ केले आणि बाजूच्या समासात 'Wow' असा शब्द लिहिला. हाच संदेश पुढे 'Wow Signal' या नावाने सुप्रसिद्ध झाला. हा संदेश साधारण ७२ सेकंदापर्यंत येत होता, पण अथक प्रयत्नांनंतरही, अत्यंत शक्तीशाली टेलिस्कोप व उपकरणे वापरूनही अशा प्रकारचा संदेश पुन्हा पकडण्यात आपल्याला यश आलेले नाही.

या Wow संदेशाचे एवढे महत्त्व का वाटले असावे ? यातील '6EQUJ5' हा वर्तुळ केलेला भाग हा त्या संदेशाची background noise च्या तुलनेत असलेली, 0 ते 35 या मापकावरती (0 ते 9 व A ते Z)असलेली तीव्रता दाखवितो. यात 0 म्हणजे अशा संदेशाची तीव्रता ही, संदेश नसतानाही जो कायमस्वरूपी 'noise' असतो त्याच्याएवढी, E म्हणजे noise पेक्षा 14 एकक इतकी अधिक तीव्रता किंवा U म्हणजे noise पेक्षा 30 एकक इतकी अधिक तीव्रता. '6EQUJ5' यातील प्रत्येक अक्षर हे दर बारा सेकंदांनी मोजलेली संदेशाची तीव्रता आहे.

यातील 6EQUJ5 या मूल्यांना संदेशतीव्रता आणि वेळ हे अक्ष पकडून आलेख काढला असता 'Normal Distribution' असलेली curve मिळते हे या संदेशाचे प्रथम वैशिष्ट्य आहे.

या व्यतिरिक्त या संदेशाचे दुसरे वैशिष्ट्य होते या संदेशाची वारंवारिता (Frequency).
तीसच्या दशकात असे लक्षात आले की अवकाशातून रेडियो लहरीद्वारे, नियमित स्वरूपात मिळणार्‍या 'noise' च्या परिमाणात दररोज बदल होत आहे. आणि असेही लक्षात आले की या बदलाचे कारण सूर्य नसून, आपल्या आकाशगंगेचे केंद्र हे आहे. नियमित स्वरूपाची निरीक्षणे आणि अभ्यास यातून १९४४ साली हा निष्कर्ष निघाला की कुठल्याही प्रकारच्या बाह्य ऊर्जाभाराने प्रभावित नसलेल्या हायड्रोजनच्या अणुमधील प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन यामध्ये ऊर्जेचे जे आदानप्रदान होते त्यामुळे हा noise निर्माण होतो. आणि या noise ची frequency ही 1420.4058 MHz इतकी असते, जिचे शास्त्रीय परिभाषेतील नाव 'Hydrogen Line' असे ठेवले गेले.

वरील 'Wow' संदेशाची, दोन वेगवेगळ्या उपकरणांनी मोजलेली frequency ही या Hydrogen Line च्या खूप जवळ होती आणि तरीही noise पासून वेगळेपणाने उठून दिसेल असा तिचा आलेख होता. पण हा संदेश म्हणजे केवळ एक लहर होती आणि त्यात कुठलाही दुसरा संदेश 'encode' केलेला, दडलेला नव्हता.

थोडक्यात ही curve हे सांगत होती की हा संदेश कुठेतरी जाणिवपूर्वक निर्मिलेला curve आहे. नियमित स्वरूपात मिळणारा noise नाही. पण त्यात
कुठलीही दुसरी माहिती नव्हती हे ही तितकेच खरे. त्या संदेशाचे अचूक मूळ ओळखून काढण्याची क्षमता Big Year या टेलिस्कोपकडे नव्हती. तरीही जो अंदाज बांधला गेला त्याप्रमाणे हा संदेश धनू तारकापुंजातून, पूर्वाषाढा नक्षत्रातून आला होता आणि त्या तारकापुंजाच्या ज्या भागातून हा संदेश आला होता तिथे सर्वात जवळ असणारा तारा होता Tau Sagittarii, आपल्या पासून १२२ प्रकाशवर्षे अंतरावर असणारा. या तार्‍याला एक जोडीदारही आहे असा कयास आहे, पण हा जोडीदार अजून सापडलेला नाही.

Big Ear हा टेलिस्कोप ज्या प्रकल्पाचा भाग आहे तो प्रकल्प आहे SETI (Search for extraterrestrial intelligence). परग्रहावरील बुद्धिमान जीवसृष्टीचा विज्ञाननिष्ठ शोध असे उद्दीष्ट असलेला हा प्रकल्प अधिकृतरीत्या कार्यान्वित झाला १९७१ साली. त्यानंतर या प्रकल्पाची व्याप्ती वाढत वाढत आज हा प्रकल्प खर्‍या अर्थाने जगड्व्याळ झाला आहे. केवळ लघुलहरीवर विसंबून न राहता, जवळजवळ प्रत्येक संभाव्य मार्गाने संपूर्ण जगभरातून हा प्रकल्प एखाद्या वुद्धीमान संदेशाच्या शोधात आहे आणि तरीही (अधिकृतरीत्या) अजूनपर्यंत या प्रकल्पास यश लाभलेले नाही.
परंतु अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बहुतेक सर्व प्रयोगात आपली भूमिका ही श्रोत्याची होती, वक्त्याची नाही. थोडक्यात आपण संदेशग्रहण करत आहोत, पण संदेश प्रसारित करत नाही आहोत.

याचा अर्थ असे कोणतेही प्रयत्न आपण केलेच नाहीत असा नव्हे. पण ते अत्यंत तुटपुंजे होते. संदेशांच्या संख्येच्या व मुदतीच्या दृष्टीकोनातूनही आणि एकच संदेश पुन्हा पुन्हा व अवकाशात सर्वत्र पाठविण्याच्या दृष्टीनेही.

अशा प्रकारचा सर्वात जुना पाठविलेला संदेश होता, १९ नोव्हेंबर १९६२ रोजी Morse Code चा वापर करून पाठविलेला रेडियो संदेश. हा संदेश शुक्राच्या दिशेने, रशियातून पाठविण्यात आला. त्यात MIR, LENIN, SSSR या अर्थाचे रशियन भाषेतील शब्द होते ! हा संदेश शुक्राच्या पृष्ठभागावरून परावर्तीत होऊन साधारण साडेचार मिनिटांमध्ये परत मिळाला.

Arecibo message या नावाने ओळखला जाणारा संदेश हा १६ नोव्हेंबर १९७४ रोजी, आपल्यापासून २५००० प्रकाशवर्षे अंतरावर असलेल्या, globular star cluster Messier 13 च्या तत्कालीन दिशेने पाठविला गेला. हा binary संदेश होता आणि तो 2,380 MHz या frequency वर फक्त एकदाच तीन मिनिटासाठी पाठविला गेला. या संदेशात ७३ rows आणि २३ columns होते आणि हा संदेश, सोबत जोडलेल्या मानवी आकृती व इतर घटकांनी बनलेल्या चित्रासारखा दिसेल अशा रीतीने तयार केला होता. हे चित्र रंगीत असले तरी प्रत्यक्ष संदेशात रंगासंबंधी कोणतीही माहिती नव्हती. अर्थात २५००० प्रकाशवर्षे हे अंतर लक्षात घेतले तर ही गोष्ट सहज लक्षात येईल की हा संदेश पाठविण्यामागचा उद्देश हा केवळ असे संदेश पाठविण्याच्या मानवी क्षमतांची चाचपणी किंवा प्रदर्शन हा होता. तो संदेश कुणाला मिळावा हा नव्हे !

याव्यतिरिक्त रशियाने Cosmic Call 1999 (एकंदर चार तार्‍यांच्या दिशेने प्रक्षेपण) आणि Cosmic Call 2003 (एकंदर पाच तार्‍यांच्या दिशेने प्रक्षेपण) हे प्रकल्प अनुक्रमे १९९९ व २००३ साली राबविले होते. या नऊ तार्‍यांपैकी, सर्वात जवळच्या तार्‍याला पाठविलेला संदेश तिथे एप्रिल २०३६ मध्ये पोहोचेल तर सर्वात दूरच्या तार्‍याला पाठविलेला नोव्हेंबर २०६९ मध्ये.

युक्रेन, रशियामधून, ऑगस्ट-सप्टेंबर २००१ मध्ये सहा तार्‍यांच्या दिशेने पाठविलेला Teen Age Message (TAM) हा 'संगीतमय' संदेश होता. या सहा तार्‍यांपैकी सर्वात जवळच्या तार्‍याला जुलै २०४७ मध्ये संदेश मिळेल तर सर्वात दूरच्या तार्‍याला फेब्रुवारी २०७० मध्ये.

२००८ साली युक्रेन, रशियातून पाठविलेला A Message From Earth हा संदेश हा अधिक विचारपूर्वक पाठविलेला संदेश होता कारण तो अतिशय सुप्रसिद्ध अशा Gliese 581 या (२०.३७ प्रकाशवर्षे दूर), तार्‍याभोवती फिरणार्‍या Gliese 581 c या ग्रहाच्या दिशेने पाठविला होता. Gliese 581 c हा habitable zone मध्ये आहे अशी शक्यता काही काळापुरती व्यक्त करण्यात आली होती. हा संदेश तिथे अर्थातच २०२९ मध्ये पोहोचेल.
Across the Universe हा 'संगीतमय' संदेश ४ फेब्रुवारी २००८ रोजी नासा तर्फे स्पेन मधून 'ध्रुव' तार्‍याच्या दिशेने पाठविण्यात आला . हा संदेश तिथे ४३१ वर्षांनी पोहोचेल आणि यदाकदाचित त्या ध्रुवतार्‍याला ग्रहमाला असलीच तर त्यांच्याकडुन उत्तर हे किमान ८६२ वर्षांनी येईल. ध्रुवतारा हा महाराक्षसी तारा या गटात मोडत असल्याने त्याच्या ग्रहमालेत जीवसृष्टी असण्याची सध्याची शक्यता ही नगण्य आहे.

HELLO FROM EARTH (HFE) हा आणखी एक संदेश २८ ऑगस्ट २००९ रोजी नासाकडून Gliese 581 च्या दिशेनेच पाठविला होता. वरती म्हटल्याप्रमाणे या तार्‍याला स्वत:ची ग्रहमाला आहे.

WOW Reply : २०१२ मध्ये Hipparcos 34511 (१५० प्रकाशवर्षे), Hipparcos 33277 (५७ प्रकाशवर्षे) and Hipparcos 43587 (४१ प्रकाशवर्षे) या तीन तार्‍यांच्या दिशेने 'Wow' संदेशाला उत्तर म्हणून संदेश पाठविण्यात आले.

Lone Signal हा अधिकृतरीत्या पृथ्वीवरून (SETI कडून ) पाठविला गेलेला शेवटचा संदेश (किंबहुना संदेश मालिका) . हे संदेश Gliese 526 या १७.६ प्रकाशवर्षे दूर असणार्‍या तार्‍याच्या दिशेने पाठविण्यात आले. प्रकल्पाच्या योजनेनुसार ही विविध तार्‍यांच्या दिशेने पाठविण्याची अविरत पाठविण्यात येणार्‍या संदेशांची मालिका असणार होती, पण निधीअभावी हा प्रकल्प काही काळातच बंद पडला (की बंद पाडला गेला ?) .
कंसात लिहीलेल्या बंद पाडला गेला या वाक्यामागे तसेच सबळ कारण आहे. असे संदेश मोठ्या स्तरावर पाठवायचा Lone Signal हा प्रकल्प दीर्घकाळासाठी असरकारी मदतीने कार्यान्वित राहणार होता. याच दरम्यान राजकारणी, वैज्ञानिक आणि इतरही अनेक क्षेत्रातील व्यक्तींनी असे संदेश पाठविण्यातले धोके मांडायला सुरुवात केली. ज्याचा सारांश, परग्रहावरील जीवसृष्टीला आपले अस्तित्व कळवणे हे आपल्यासाठी सुरक्षित ठरेलच असे नाही हा होता. या सुरात कालांतराने Stephen Hawking यांनीही आपला सूर मिळवत आक्षेप घेतला होता.

तदनंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये झालेल्या चर्वितचर्वणानंतर 'जोपर्यंत वैज्ञानिक, राजकारणी आणि मानवीय स्तरावर या संदर्भात एकमत होत नाही, तो पर्यंत असे संदेश पाठविले जाऊ नयेत यावर एकमत झाले. अजूनपर्यंत तरी हा ठराव निदान कागदावर तरी टिकून आहे. पण तो फार काळ टिकून राहील असे वाटत नाही.

सरकारकडून निधी मिळवण्यात येणार्‍या अडचणी लक्षात आल्यानंतर खाजगी क्षेत्राकडून यासाठी मोठे प्रोत्साहन मिळाले. Yuri Milner या तंत्रज्ञानात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देणार्‍या रशियन उद्योगपतीकडून Breakthrough Initiatives या दीर्घकालीन प्रकल्पाची रूपरेखा आखली गेली आहे. या प्रकल्पात, चार उपप्रकल्प आहेत.

१)  Breakthrough Listen :
एका अर्थाने हा प्रकल्प म्हणजे बुद्धिमान जीवसृष्टीकडून येणारे संदेश शोधण्याच्या,  SETI च्या प्रकल्पाचे खाजगी रूप आहे. या प्रकल्पासाठी १० कोटी डॉलरची तरतूद करण्यात आली आहे. तसेच या प्रकल्पासाठी उत्तम क्षमतेचे  रेडियो टेलिस्कोप दरवर्षी हजारो तासांसाठी उपलब्ध होऊ शकतील याची देखील काळजी घेण्यात आली आहे. जानेवारी २०१६ मध्ये या प्रकल्पाची अधिकृत सुरुवात झाली आणि किमान १० वर्षे हा प्रकल्प सुरू राहील असा अंदाज आहे.

२) Breakthrough Message : परग्रहवासीयांसाठी संदेश प्रक्षेपित करण्यासाठीचा हा प्रकल्प  प्रत्यक्षात येण्यासाठी, वर म्हटल्याप्रमाणे, सर्वांचे एकमत आवश्यक आहे. पण अशा प्रकारच्या डिजिटल संदेशाची रचना करण्यासाठी मध्यंतरी, एकंदर १० लक्ष डॉलरची बक्षिसे असणारी एक स्पर्धा मात्र घोषित करण्यात आली आहे. हा संदेश, पृथ्वी आणि मानवी संस्कृती यांचे उत्तमप्रकारे प्रतिनिधित्व करणारा असावा अशी अपेक्षा आहे.

३) Breakthrough Starshot : प्रकाशाच्या वेगाच्या १५ ते २० टक्के (साधारण पंचेचाळीस ते साठ हजार किमी प्रति सेकंद !) इतक्या प्रचंड वेगाने,  एका अवकाशयानाने, सूर्याला सर्वात जवळ असणार्‍या  Alpha Centauri या तार्‍याच्या परिसरात, २० ते ३० वर्षात पोहोचणे आणि साडेचार वर्षाच्या आत तिथून पाठविलेला संदेश पृथ्वीवर मिळणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे.  या प्रकल्पासाठी देखील १० कोटी डॉलरची आरंभीची तरतूद आहे आणि प्रकल्पाचा खर्च ५ अब्ज डॉलरच्याही वर जाईल असा अंदाज आहे.  एप्रिल २०१६ मध्ये या प्रकल्पाच्या कामास सुरुवातही झाली आहे.  इतक्या मोठ्या प्रवासासाठी वापरले जाणारे यान मात्र विशाल नसून तो १ सें.मी आकाराच्या साधारण १००० यानांचा समूह असणार आहे !

४) Breakthrough Watch : पृथ्वीपासून २० प्रकाशवर्षे अंतराच्या आत असणार्‍या तार्‍यांच्या ग्रहमाला शोधून, त्या ग्रहांवर जीवसृष्टी आहे अथवा
नाही याचा पृथ्वीवरून वेध घेणे हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी आवश्यक असणारे संशोधन करणे वा आवश्यक त्या सर्व यंत्रणा उभारणे या गोष्टी या प्रकल्पाचा भाग आहेत.

आपल्याकडील संदेश पाठविण्याच्या बाबतीतील घटना लक्षात घेतल्या की दुसर्‍या सृष्टीकडून आपल्याला संदेश का मिळत नाही आहेत हे लक्षात येते. नाही का ? :-)

रविवार, २४ जुलै, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (४ / ९)


परकीय जीवसृष्टी निर्विवाद अस्तित्वात आहे. प्राथमिक स्तरावरची अशी जीवसृष्टी कदाचित आणखी काही दशकातच, आपल्या सूर्यमालेतच सापडू शकेल.
पण पृथ्वीवरून शोधली जाऊ शकेल, अशी वैज्ञानिक दृष्ट्या प्रगत जीवसृष्टीही नक्की अस्तित्वात असेल, पण आजतागायत तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, हा वैज्ञानिकांना, अनेक आकाश निरीक्षकांना मान्य असलेला प्रबळ दृष्टीकोन आहे. हा प्रबळ दृष्टीकोन असण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातील एक कारण आहे, Drake Equation. या समीकरणाबाबत मतभेद असले तरी, समीकरणामागे असलेला शक्यतेचा सिद्धांत अत्यंत तर्कशुद्ध आणि अत्यंत संभाव्य असा आहे. हा सिद्धांत मांडला Dr. Frank Drake यांनी १९६१ साली.

यात असलेले गृहीतक असे आहे की आपल्या आकाशगंगेत अशा अनेक प्रगत जीवसृष्टी आहेत ज्या इतर जीवसृष्टींशी (थोडक्यात आपल्याशी !) संपर्क साधण्यासाठी अवकाशात संदेश प्रसारित करत आहेत.

यामागचा विचार असा आहे :

सर्वप्रथम आपल्या आकाशगंगेतील तार्‍यांच्या निर्माणाचा प्रतिवर्षे दर लक्षात घ्यायला हवा. (इथे तार्‍यांची प्रत्यक्ष संख्या लक्षात न घेता तार्‍यांच्या निर्माणाचा प्रतिवर्षाचा दर का लक्षात घेतात याचे कारण L या शेवटच्या घटकाच्या एककात आहे. L चे एकक वर्षे हे आहे आणि बाकी सर्व घटक हे एककरहित आहेत . त्यामुळे शेवटच्या घटकाचे एकक काढून टाकण्यासाठी प्रतिवर्षाचा दर घ्यावा लागतो)

मग आपल्या आकाशगंगेतील असे तारे लक्षात घ्यायला हवे ज्यांना स्वत:ची ग्रहमाला आहे.

नंतर या ग्रहमालेपैकी असे किती ग्रह असतील जिथे जीवन निर्माण होऊ शकेल याचा विचार केला पाहिजे.

सर्व काही ठीक असूनही कधीकधी आवश्यक परिणाम घडताना दिसत नाही. त्यामुळेच ही शक्यताही विचारात घ्यायला हवी की यातील जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी अनुकूल असलेल्या ग्रहांवर, प्रत्यक्षात जीवसृष्टी निर्माण झाली असण्याची शक्यता किती आहे.

दूरस्थ संपर्क साधायचा तर बुद्धिमान जीवसृष्टी हवी आणि ती वैज्ञानिकदृष्ट्या पुरेशी प्रगती हवी की जी अवकाशात संदेश पाठवू शकेल, त्यामुळे या दोन्ही शक्यताही स्वतंत्रपणे विचारात घ्यायला हव्या.

त्याचबरोबर जितक्या काळासाठी अशी प्रगत जीवसृष्टी असे संदेश प्रसारित करेल तो काळही लक्षात घ्यायला हवा

हे सारे घटक लक्षात घेता मांडलेले Drake चे समीकरण आहे :

N = R * Fp * Ne * Fl * Fi * Fc * L

इथे N हे आपल्याला हवे असलेले उत्तर आहे, आणि ती अशा वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत आणि ज्यांच्याशी दूरस्थ संपर्क होऊ शकेल अशा जीवसृष्टींची संख्या आहे.
R हा, आपल्या आकाशगंगेतील तार्‍यांच्या निर्माणाचा प्रतिवर्षाचा सरासरी दर आहे.
Fp ही, ज्या तार्‍यांना ग्रहमाला आहे अशा तार्‍यांची टक्केवारी आहे.
Ne हा, ज्यांच्यावर जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल अशी शक्यता असलेल्या (प्रत्येक ग्रहमालेतील) ग्रहांचा सरासरी दर आहे.
Fl ही, अनुकूल ग्रहांवर, प्रत्यक्ष जीवसृष्टी निर्माण होऊ शकेल याची टक्केवारी आहे
Fi ही, बुद्धिमान जीवसृष्टी निर्माण होण्याची टक्केवारी आहे
fc ही, संदेशप्रसारणासाठी पुरेशी प्रगत असलेल्या बुद्धिमान जीवसृष्टीची शक्यता आहे.
L हा, तो कालावधी आहे, जितक्या काळासाठी, वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत जीवसृष्टी संदेश प्रसारित करेल. घटकाभर असे मानले की प्रगत झाल्यापासून जीवसृष्टीने संदेश पाठवायला सुरुवात केली व तिचा अंत होईपर्यंत ती जीवसृष्टी संदेश पाठवत राहिली तर हा काळ थोडक्यात त्या जीवसृष्टीच्या प्रगत अस्तित्वाचा काळ ठरतो.

हे सगळे घटक असूनही आज Drake चे समीकरण हे यथार्थ व पूर्ण मानले जात नाही, कारण त्यातील शेवटच्या चार घटकांचे अचूक मूल्य ठरवणे हे फारसे सोपे नाही. याशिवाय इतरही काही घटक आहेत जे या संख्येला प्रभावित करू शकतात.

१) असे संदेश पकडण्याची आपली क्षमता,
२) हा संदेश समजा कित्येक हजारो प्रकाशवर्षे दूरवरून आला असेल, तर आपण संदेश ओळखून, त्या संदेशाला उत्तर जरी पाठविले, तरीही ते उत्तर त्या परग्रहावर मिळेपर्यंत, त्या ग्रहावरची जीवसृष्टी नष्ट झालेली असू शकते किंवा त्यांनी असा संदेश पकडण्याचे प्रयत्न थांबविलेले असू शकतात अथवा तंत्रज्ञान प्रगत झाल्यामुळे, जुन्या तंत्रज्ञानातील संदेश स्वीकारण्याचे त्यांनी थांबविलेले असू शकते.
३) या समीकरणात केवळ ग्रहांवर जीवसृष्टी विकसित होईल असे गृहीत धरले आहे, प्रत्यक्षात उपग्रहांवरही जीवसृष्टी विकसित होऊ शकते.
४) परग्रहवासींनी संदेश पाठविण्यासाठी वापरलेले माध्यम आणि त्यासाठी वापरलेली वारंवारिता (frequency), शिवाय संदेश पाठविण्यासाठी वापरलेले तंत्र, यांच्याशी आपल्या तंत्रज्ञानाचा व आपल्या संदेशग्रहण पद्धतीचा, क्षमतांचा मेळ बसला पाहिजे.

==

N = R * Fp * Ne * Fl * Fi * Fc * L

वरील समीकरणातील घटकांच्या जागी आज उपलब्ध असलेल्या माहितीनुसार न्यूनतम आकडे वापरले गेले तर असे समीकरण मिळते.

N = 7 * 1 * 0.00001 * 0.000000001 * 0.2 * L ( इथे Fp * Ne * Fl = 0.00001 घेतले आहे , तसेच प्रत्येक तार्‍याभोवती किमान एक ग्रह आहे असे गृहीत धरले आहे)
अर्थात N = 14 x (10^-15) * L
याचाच अर्थ असा की किमान एक अन्य जीवसृष्टी आहे असे मानण्यासाठी L म्हणजे संदेश पाठविण्याचा कालावधी हा १० चा १५ वा घात इतकी वर्षे असायला हवा.

म्हणजे (एक, दश, शत, सहस्र, अयुत(दशसहस्र), लक्ष, प्रयुत(दशलक्ष), कोटी, अर्बुद (दशकोटी), अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकू, जलधी, अन्त्य, मध्य, परार्ध ही अंकप्रणाली गृहीत धरली तर) १ अन्त्य वर्षे इतका काळ परग्रहावरून संदेश पाठविणे आवश्यक आहे.
अर्थातच हे शक्य नाही. त्यामुळे याचाच अर्थ असा निघतो की आपली आकाशगंगेत कुठेही, पृथ्वी व्यतिरिक्त, आपल्याएवढी प्रगत जीवसृष्टी अस्तित्वात नाही !

पण किमान १ लाख २० हजार प्रकाशवर्षे विस्तार असलेल्या, आपल्या आकाशगंगेतील संभाव्य ग्रहांची किमान संख्या, ही १०० अब्ज इतकी मोठी आहे, असा सध्याचा अंदाज आहे. असे असताना केवळ पृथ्वीवरच प्रगत जीवसृष्टी आहे हे म्हणणे काहीसे हास्यास्पद वाटते.

==

N = R * Fp * Ne * Fl * Fi * Fc * L

या घटकांच्या जागी विविध पुस्तकातून / प्रबंधातून मांडलेल्या शक्यतानुसार अधिकतम आकडे वापरले गेले तर असे समीकरण मिळते.

N = 7 * 1 * 0.2 * 0.13 * 1 * 0.2 * L ( इथे प्रत्येक तार्‍याभोवती किमान एक ग्रह आहे असे गृहीत धरले आहे आणि प्रत्येक जीवसृष्टी ही बुद्धिमान होण्याच्या अवस्थेला कधीनाकधी पोहोचते असे गृहीत धरले आहे)

अर्थात N = 364 x (10^-4) * L

याचाच अर्थ असा की किमान एक अन्य जीवसृष्टी आहे असे मानण्यासाठी L म्हणजे संदेश पाठविण्याचा कालावधी हा २८ वर्षे इतका येतो.
आपण जाणीवपूर्वक पाठविलेला, अशा प्रकारचा पहिला अवकाश संदेश हा ४१ पेक्षाही अधिक वर्षांपूर्वी, १६ नोव्हेंबर १९७४ ला पाठविला होता आणि त्यापेक्षाही अधिक काळ आपण परकीय जीवसृष्टीकडून काही संदेश मिळत आहेत का याचा मागोवा घेत आहोत. तरीही अजूनपर्यंत या विषयात अधिकृतरीत्या काहीही सांगण्यात आलेले नाही. यातून निघणारे निष्कर्ष साधारण असे आहेत :

१) गेल्या चाळीस वर्षात आपल्याला कुणीही असा संदेश पाठविलेला नाही.
२) किंवा असा संदेश पाठविला असेल तर आपण तो ग्रहण करू शकलेलो नाही किंवा ग्रहण केला असेल तर ओळखू शकलेलो नाही.
३) आपला संदेश अजूनपर्यंत कुणालाही मिळालेला नाही किंवा मिळाला असेल तर त्याचे उत्तर आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही किंवा पोहोचले असल्यास आपल्याला ते समजलेले नाही.

याचाच दुसरा अर्थ असा होतो की Drake च्या समीकरणात किंवा समीकरणातील घटकांच्या वरती गृहीत धरलेल्या मूल्यांमध्येच काहीतरी त्रुटी आहेत.
नीट विचार केला तर लक्षात येते की समीकरणातील मूळ त्रुटी ही आहे, की सद्य परिस्थितीत अस्तित्वात असणार्‍या ग्रहांची संख्या हे समीकरण विचारातच घेत नाही, आणि त्याचे कारण म्हणजे एककांना समतुल्य करण्यासाठी, उपयोगात आणलेला तार्‍यांच्या निर्मितीचा प्रतिवर्ष दर. या समीकरणातील इतर सर्व घटक हे तार्‍यांच्या संख्येला लागू होतात, प्रतिवर्षाच्या दराला नव्हे. त्यामुळेच या समीकरणाकडून 'योग्य' उत्तर हवे असेल, तर संदेश पाठविण्याचा कालावधी हा, आवश्यक वैज्ञानिक प्रगती झालेली पहिली बुद्धिमान संस्कृती एखाद्या परग्रहावर विकसित झाली असेल, तेंव्हापासून घ्यायला हवा. अर्थात या विचारसरणीमागे काही गृहीतके आहेत.

१) अशी एखादी संस्कृती विकसित झाली की स्वत:चा विनाश होऊ नये यासाठी ती आवश्यक काळजी घेईल
२) यदाकदाचित त्यांनी संदेश पाठविल्यानंतर काही कारणाने त्या संस्कृतीचा लोप झाला तरी तो संदेश आपल्याला मिळेल.
३) असा संदेश आपल्या दिशेनेच पाठविला गेला असला पाहिजे.
४) तो आपल्यापर्यंत पोहोचू शकेल इतपत पुरेसा शक्तीशाली असला पाहिजे.

खगोलशास्त्रज्ञ Sara Seager यांनी जीवसृष्टी असलेल्या ग्रहांची संभाव्य संख्या मोजण्यासाठी सुचविलेले समीकरण आजच्या काळाशी, उपलब्ध होत असलेल्या माहितीशी आणि सध्या ज्या प्रकारे निरीक्षणे होतात, त्याच्याशी अधिक सुसंगत आहे. हे समीकरण Drake च्या समीकरणाचा पर्याय नाही कारण या समीकरणात त्या जीवसृष्टीने आपल्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणे हे आवश्यक नाही किंवा वैज्ञानिकदृष्ट्या प्रगत असणेही आवश्यक नाही. तरीही हे समीकरणही परिपूर्ण नाही कारण इथे शेवटच्या दोन घटकांचे मूल्य ठरविणे तितकेसे सहजसाध्य नाही.

N = Ns * Fq * Fhz * Fo * Fl * Fs

इथे
Ns ही निरीक्षण झालेल्या तार्‍यांची व ज्यांच्या ग्रहमालेचा शोध घेतला गेला आहे त्याची संख्या आहे.
Fq ही तुलनेने ज्या तार्‍यांचा उद्रेक कमी होतो त्यांची टक्केवारी आहे. (उद्रेक कमी असतील तर भोवताली फिरणारा ग्रह शोधणे सोपे जाते)
Fhz ही त्या तार्‍यांची टक्केवारी आहे ज्यांच्याभोवती घनस्वरूपातील ग्रह habitable zone मध्ये फिरत आहेत. (घनस्वरूपातील ग्रह अशासाठी की जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी ग्रहाला पृष्ठभाग आवश्यक आहे आणि गुरुसारखे वायुरूप ग्रह त्यासाठी उपयुक्त नाहीत अशी सध्याची धारणा आहे.)
Fo ही ज्यांचे पृथ्वीवरून निरीक्षण होऊ शकेल अशा ग्रहांची टक्केवारी आहे.
Fl ही ज्यावर खरोखरीच जीवन असे शकेल अशा ग्रहांची टक्केवारी. (यासाठी Sara Seager यांनी आशावादी राहत 1 ही किंमत सुचविली आहे)
Fs ही त्या ग्रहांची टक्केवारी आहे जिथल्या वातावरणात उत्सर्जनातून सोडल्या जाणार्‍या वायूंचा मागमूस दाखवेल (कार्बन डायऑक्साइड, अमोनिया इत्यादी, थोडक्यात कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर आणि हायड्रोजन यांच्यापासून बनलेली वायुरूपी संयुगे )



वर उल्लेखलेला habitable zone (किंवा Goldilocks zone) हा कुठल्याही तार्‍यासभोवतीचा तो प्रदेश आहे, ज्यातून परिभ्रमण करणार्‍या
ग्रहांच्या पृष्ठभागावर वातावरणाचा योग्य दाब असताना द्रवरूपात पाणी असू शकेल. आपल्या सूर्यासाठी पृथ्वी व मंगळ हे ग्रह आणि सेरेस हा बटूग्रह यांच्या कक्षा habitable zone मध्ये येतात.

गुरुवार, २१ जुलै, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (३ / ९)


. Allen Hynek या प्रामुख्याने UFO शी संबंधित संशोधन करणार्‍या वैज्ञानिकाने UFO संबंधित घटनांच्या वर्गीकरणासाठी १९७२ मध्ये एक पद्धत मांडली. या पद्धतीत UFO संबंधित घटनांना मुख्यत्वे चार गटात विभागले होते. याच पद्धतीला पुढे Hynek's scale असे नाव मिळाले.

१) Nocturnal Lights : रात्री आकाशात दिसणारे व अगम्य असणारे प्रकाशस्त्रोत
२) Daylight Discs : दिवसा आकाशात दिसणार्‍या UFO
३) Radar-Visual : रडार ने नोंदविलेल्या परंतु ज्यांची उकल होऊ शकलेली नाही अशा UFO

वरील तिन्ही गटात ती UFO ही ५०० फूटांपेक्षा जास्त अंतरावर दिसली आहे असे गृहीत धरले आहे.

४) Close Encounters : ५०० फूटांपेक्षाही कमी अंतरावर दिसलेली UFO.

या Close Encounters चे कालांतराने अनेक उपगट तयार करण्यात आले.

४.१) Close Encounters of the first kind : ५०० फूटापेक्षा कमी अंतरावरून UFO चे दर्शन होणे, ज्यायोगे UFO च्या बाह्यरचनेबाबत विस्तृत माहिती मिळू शकेल.

४.२) Close Encounters of the second kind : ५०० फूटापेक्षा कमी अंतरावरून UFO चे दर्शन होणे आणि UFO च्या सान्ंनिध्यामुळे, संपर्कात आलेल्या व्यक्तीवर वा इतर सजीवांवर कुठल्याही स्वरूपाचा (तात्पुरता वा कायमस्वरूपी ) शारीरिक वा मानसिक परिणाम होणे किंवा संपर्कात आलेल्या यंत्रांवर, परिसरावर कुठल्याही स्वरूपाचा (तात्पुरता वा कायमस्वरूपी) प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम घडून येणे,

४.३) Close Encounters of the third kind : ५०० फूटापेक्षा कमी अंतरावरून UFO चे दर्शन होणे आणि UFO च्या आतील सजीवाशी वा यंत्रजीवाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे संपर्क / संभाषण होणे.
या गटाचे आणखी उपगटात विभाजन करण्यात आले. (मी यंत्रमानव हा शब्द जाणीवपूर्वक टाळला आहे)
A) एखाद्या सजीवाचे वा यंत्रजीवाचे UFO च्या आत दर्शन होणे.
B) एखाद्या सजीवाचे वा यंत्रजीवाचे UFO च्या आत व बाहेर दोन्ही ठिकाणी दर्शन होणे.
C) एखाद्या सजीवाचे वा यंत्रजीवाचे UFO जवळ दर्शन होणे, पण त्याच्याकडून UFO च्या आतबाहेर करण्याचा प्रयत्न न होणे
D) एखाद्या सजीवाचे वा यंत्रजीवाचे दर्शन होणे, पण त्याचवेळी, त्याच्याजवळ वा त्या परिसरात कोणत्याही UFO चे दर्शन न होणे परंतु त्या विभागात त्याच वेळी UFO दिसल्याचा अहवाल असणे.
E) एखाद्या सजीवाचे वा यंत्रजीवाचे दर्शन होणे, पण त्याचवेळी, त्याच्याजवळ वा त्या परिसरात कोणत्याही UFO चे दर्शन न होणे वा तशी कोणतीही माहिती / अहवाल नसणे.
F) एखाद्या UFO चे, सजीवाचे, यंत्रजीवाचे दर्शन न होणे, पण त्यासंदर्भात काही विशेष मार्गाने अत्यंत सूचक वा प्रत्यक्ष स्वरूपात संपर्क होणे.
या सर्व नियमांना उल्लंघून जाणार्‍या काही घटनांचे दावे केले गेले, काही घटना घडल्या, नोंदविल्या गेल्या आणि सर्वच घटनांना 'भंपक' म्हणून नाकारावे अशी परिस्थिती नव्हती, तेंव्हा Hynek's scale मध्ये इतरांकडून आणखी काही स्तर निर्माण करण्यात आले.

४.४) Close Encounters of the fourth kind : या UFO च्या अशा घटना आहेत, जिथे मानवाचे वा पृथ्वीवरील अन्य सजीवाचे, UFO वा UFO तील सजीवाकडून वा यंत्रजीवाकडून अपहरण केले जाते.

४.५) Close Encounters of the fifth kind : या UFO च्या अशा घटना आहेत, की जिथे मानवाचा, UFO वा UFO तील सजीवाशी वा यंत्रजीवाशी थेट संपर्क होऊन दोघांच्यात कुठल्याही मार्गाने संभाषण होईल.

४.६) Close Encounters of the sixth kind : या UFO च्या अशा घटना आहेत, की जिथे मानवाचा वा पृथ्वीवरील जीवाचा, UFO वा UFO तील सजीवामुळे वा यंत्रजीवामुळे मृत्यू होईल.

४.७) Close Encounters of the seventh kind : या UFO च्या अशा घटना आहेत, की जिथे मानवाचा , UFO तील सजीवाशी शरीरसंबंध येऊन वा अशारीरिक मार्गाने संबंध येऊन, नव्या संकरित सजीवाची प्रत्यक्ष निर्मिती होईल किंवा निर्मिती होण्यासाठी आवश्यक त्या सर्व घटना घडतील.

या शेवटच्या चार स्तरांमुळे, कशा पद्धतीच्या घटनांचे दावे केले गेले असतील व त्या घटना नोंदविल्या गेल्या असतील (किंवा घडल्या असतील) याची सहज कल्पना करू शकतो. या स्तरांमधील alien abduction आणि तत्सम घटनांची तपशीलवार यादी देखील wikipedia वर उपलब्ध आहे. या घटनांची सत्यासत्यता कशी तपासण्यात आली, त्या कितपत खर्‍या मानाव्या (hoax or not) या विवरणासह wikipedia सह अनेक संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. मी त्यातील मोजक्या घटनांचा इथे केवळ उल्लेख करत आहे (या सर्व घटना खर्‍या आहेत असे माझे अजिबात म्हणणे नाही :-) )

1956: Elizabeth Klarer (South Africa)
1957: Antonio Vilas Boas (Brazil)
1961: Betty and Barney Hill (USA)
1973: Pascagoula Abduction (USA)
1975: Travis Walton (USA)
1976: Allagash Abductions (USA)
1978: Valentich disappearance (Australia)
1979: Robert Taylor incident (Scotland)
1983: Whitley Strieber (USA)
1994: Meng Zhaoguo incident (China)
1997: Kirsan Ilyumzhinov (Russia)




यातील Betty and Barney Hill यांचा आणि Kirsan Ilyumzhinov यांचा विशेष उल्लेख करायला हवा, Betty and Barney Hill यांची, त्यावेळी संमोहनाचा उपयोग करून सत्यासत्यता तपासली गेली होती. तर Kirsan Ilyumzhinov हे FIDE चे अध्यक्ष आहेत.
यातील प्रत्येक घटनेवर एक स्वतंत्र लेख व्हावा, इतके या घटनांचे तपशील इंटरनेटवर उपलब्ध आहेत. विशेषत: wikipedia वर (व त्यात दिलेल्या संदर्भ यादीत) पुरेशी माहिती उपलब्ध आहे.

UFO वा Close Encounters च्या घटना का घडतात किंवा लोकांना तसे घडले आहे असे सांगावेसे का वाटते याची अनेक कारणे नमूद केली गेली आहेत. प्रसिद्धीचा हव्यास व त्यातून उपलब्ध होणारी आर्थिक समृद्धी हे अनेकदा आढळून येणारे कारण असले, तरी अशा सर्व घटनांमध्ये तेच कारण असेल असे नाही. प्रत्येक व्यक्तीची त्याला दिसलेल्या दृश्याला समजून घेण्याची व त्याचा अर्थ लावण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि ती त्याच्या ज्ञानाशी, अनुभवाशी निगडीत असते. UFO च्या काही घटना, निर्विवाद अशा व्यक्तींच्या बाबतीत घडलेल्या आहेत ज्यांना UFO किंवा परग्रहवासी यांच्याबद्दल काहीही कल्पना नव्हती आणि त्यामुळे या घटना नोंदविण्यामागे आर्थिक कारणे नसावीत ही शक्यता खूप आहे.

तांत्रिकदृष्ट्या पुरेसे ज्ञान नसलेल्या व्यक्ती जेंव्हा त्यांच्या भाषेत, अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या आलेल्या अनुभवाचे वर्णन करतात, तेंव्हा त्यात काही तपशील हे लिहिणार्‍याकडून कळत नकळत भरले जातात. ही बाब ध्यानात घेऊनही त्या व्यक्तींच्या अनुभवकथनाच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घ्यावी अशी परिस्थिती अशा वेळी नसते. तरीही काही वेळा हे अनुभव सांगितले जातात तेंव्हा काही गोष्टी ज्या मनाने टिपलेल्या असतात त्या सांगायच्या राहून जाऊ शकतात, काही गोष्टींचे त्या व्यक्तीकडून झालेले पृथक्करण हे चुकीचे असू शकते, हे लक्षात घेऊन काही घटनांमध्ये त्या व्यक्तीच्या मानसशास्त्रीय तपासण्या झाल्या आहेत, काही वेळा संमोहन तज्ज्ञांची मदत घेतली गेली आहे. अनेक निकष लावल्यावरही काही घटनांचे पुरेसे तार्किक स्पष्टीकरण मिळू शकलेले नाही.

पण UFO च्या अस्तित्वावर दृढ विश्वास , आंधळा विश्वास असणारे जसे लोक, गट आहेत, तसेच प्रत्येक घटनाला खोटे ठरविण्याचा उद्देश मनात ठरवून, त्या घटनांची छाननी करणारे, त्याबाबत भाष्य करणारे लोक, गटही आहेत. मग अशा घटनांची अत्यंत अतार्किक स्पष्टीकरणे देण्यात येतात आणि त्या घटनांमध्ये जे काही सत्य असते ते दडपले जाते.

alien abduction च्या काही घटनांमध्ये अनाकलनीय शारीरिक पुरावे होते. पण जिथे (विज्ञानाला पटतील असे) प्रत्यक्ष पुरावे नाहीत, तिथेही त्या घटना निव्वळ पुरावे नाहीत म्हणून खोट्या ठरविण्याचे काही कारण नाही.

सत्यता सिद्ध करणार्‍या पुराव्यांचा अभाव हा सत्यतेच्या अभावाचा पुरावा ठरू नये. अशावेळेस त्यावर असत्यतेचा शिक्का मारण्यापेक्षा त्याची सत्यता सिद्ध झालेली नाही हे म्हणणे अधिक योग्य ठरावे.

शेवटी या घटनांना किती खरे मानावे आणि किती खोटे हे ज्याच्या त्याच्या पूर्वग्रहांवर, विश्लेषणावर आणि स्वभावावर अवलंबून आहे.

बुधवार, २० जुलै, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (२ / ९)


परकीय (प्रगत) जीवसृष्टीच्या बाबतीत किंवा परग्रहवासीयांच्या बाबतीत लेखकांनी, चित्रपट / मालिका निर्मात्यांनी त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्यावीशी वाटावी असे दृष्टीकोन मांडले आहेत.  कळत-नकळत हे दृष्टिकोन लोकांच्या मनात झिरपतात.  त्यांना उपलब्ध झालेल्या, उमजलेल्या  सत्य गोष्टी आणि  कल्पनाविलास यांची एक सरमिसळ होऊन,  यातून इतके दृष्टीकोनांच्या नानाविविध combinations, कित्येकांच्या मनात दृढ होतात की कालांतराने अनेक गोष्टी सत्य वाटायला लागतात.  कशा प्रकारचे आहेत हे दृष्टीकोन ?

१) अशी कोणतीही जीवसृष्टी अद्याप सापडलेली नाही, पण अशी जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे.
२) अशा जीवसृष्टीचा शोध लागला असून, सरकार वा सरकारी संस्था या सर्व गोष्टी जाणीवपूर्वक लपवत आहेत.
३) मानवाचा परग्रहवासीयांशी नियमित संपर्क असून, 'परस्परा साह्य करू' या धर्तीवर  २० व्या शतकात झालेली अफाट वैज्ञानिक प्रगती हे त्याचेच द्योतक आहे.
४) परग्रहवासी हे मानवाशी थेट संपर्क साधत नाही, पण ते मानवजातीवर लक्ष ठेवून असतात.
५) परग्रहवासीयांशी काही सरकारांनी करार केला असून, त्यांच्याकडुन तंत्रज्ञान मिळविण्यासाठी, alien abduction च्या घटनांकडे अशी सरकारे दुर्लक्ष करतात, कारण विविध प्रयोगांसाठी परग्रहवासीयांना गिनीपिग म्हणून मानवांची गरज आहे .
६) परग्रहवासीयांनी बर्‍याच काळापासून महासागरांमध्ये किंवा पृथ्वीच्या पोटात त्यांचे स्वतंत्र तळ निर्माण केले आहेत. 
७) परग्रहवासीयांचे चंद्रावर तळ आहेत आणि म्हणूनच अपोलो १७ नंतर एकदाही अमेरिकेने वा इतर कुठल्याही देशाने चंद्रावर मानव पाठविला नाही.
८) मानवाची निर्मिती ही परग्रहवासीयांच्या जनुकीय प्रयोगाचे फलित आहे.
९) पृथ्वी हे परग्रहवासीयांचे शेत आहे, आणि मानव हे पीक !
१०) पृथ्वी हे परग्रहवासीयांचे 'प्राणिसंग्रहालय' आहे !
११) कित्येक परग्रहवासी हे मानवी रूप घेऊन आपल्यात वावरत आहेत, कित्येक अतिशय महत्त्वाच्या पदांवरही आहेत.
१२) मानव हाच कित्येक लाखो वर्षांपूर्वी इतर ग्रहावरून येऊन पृथ्वीवर स्थायिक झाला आहे.
१३) पृथ्वी व इतर ग्रह हे सजीव असून आपण व इतर परग्रहवासी हे केवळ परजीवी आहोत.
१४) परग्रहवासी हे दुसरे तिसरे कोणी नसून कालप्रवास करून भूतकाळात (म्हणजे आपल्या वर्तमानकाळात) आलेले भविष्यकाळातील उत्क्रांत झालेले मानवच आहेत !

या आणि अशा अनेक दृष्टीकोनांच्या चष्म्यातून काही लोक, लेखक (विशेषत: पाश्चात्य देशात) खगोलीय घटना, खगोलशास्त्रीय संशोधन, प्रगती यांच्याकडे पाहतात. त्यामुळे परकीय जीवसृष्टीशी संबंधित कुठल्याही लेखात, कार्यक्रमात त्यातील तथ्ये कोणती आणि कल्पनाविलास कोणते हे शोधताना अवघड होऊन बसते. या सर्व दृष्टीकोनांचा उगम होतो तो लोकांपासून जाणीवपूर्वक / अजाणता पूर्ण माहिती दडविण्याच्या कृतीतून,  आणि त्यांचे सनसनाटीकरण करणार्‍या गल्लाभरू प्रवृत्तीतून. 

पण तरीही या संदर्भात नोंदविलेल्या अनेक घटना या केवळ कल्पनाविलास नसाव्यात अशी अनेक चिन्हे आहेत. UFO च्या बाबतीत 'hoax' चे प्रमाण प्रचंड असले, तरी काही छायाचित्रे, चलतचित्रे (video) ही hoax या गटात मोडणारी नाहीत, कारण तशा घटना पाहणार्‍या लोकांची असलेली संख्या.
याव्यतिरिक्त  ऐतिहासिक काळातही नोंदविलेल्या घटनांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्याचे काही कारण दिसत नाही. उ.दा. Titus Livius (Livy) या इतिहासकाराने 'Ab Urbe Condita Libri (Books from the Foundation of the City)' या ग्रंथात रोमचा इतिहास लिहिताना इ.स. पूर्व  ७५३ पासूनच्या घटना नोंदविलेल्या आहेत. यात 'Book 21, Chapter 62' मध्ये  अंदाजे इ.स. पूर्व  २१४  सालचे जे वर्णन आहे त्यात  'navium speciem de caelo adfulsisse' ('an appearance of ships shining forth from the sky') असा उल्लेख आहे.  त्यानंतरही इ.स. पूर्व ७४, इ.स. ७०, इ.स. १५०, इ.स. १९६  मध्ये नोंदविलेल्या घटना आहेत.  ज्या घटना बहुसंख्य लोकांनी एकाच वेळी पाहिल्या आहेत त्यात सर्वात जुन्या नोंदविलेल्या  घटना या अनुक्रमे १४ एप्रिल १५६१, Nuremberg, जर्मनी व तदनंतर   ७ ऑगस्ट १५६६  Basel, Switzerland ची आहे.

Basel, Switzerland येथे सूर्योदयाच्या वेळी,आकाशात अचानक अवतरलेल्या, वेगाने प्रवास करणार्‍या काळ्या गोलकांचे वर्णन आहे. त्यात असे म्हटले आहे की ते गोलक एकमेकांवर अशा पद्धतीने आपटत होते की जणू एकमेकांशी लढाई करत आहेत. अनेक तासांपर्यंत हे 'युद्ध' चालले. त्यादरम्यान त्यांच्यातील काही गोलक लालभडक होत नष्ट होत होते.  ही घटना असंख्य नागरिकांनी पाहिली होती.





अर्वाचीन काळातील नोंदविलेली व भारतात घडलेली पहिली घटना आहे, १५ सप्टेंबर १९५४ रोजी तत्कालीन बिहार राज्यातील, मनभूम या जिल्ह्यातील.  या जिल्ह्यातील Kadori, Borsa and Mangalda या तीन गावातील सुमारे ८०० लोकांनी आकाशात एक करड्या रंगाची UFO स्थिर होताना आणि नंतर वेगाने, धूर सोडत गायब झालेली पाहिली.  मनभूम जिल्ह्याचे आता विभाजन झाले असून त्यातील मोठा भाग हा पुरुलिया या प. बंगालमधील जिल्ह्यात आहे.

अशा घटनांची जंत्री, इथे देणे शक्य नाही.  wikipedia च्या पुढील पानावर UFO शी संबंधित बहुसंख्य घटनांचा तपशील आहे.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_reported_UFO_sightings

पण हे नानाविविध दृष्टीकोन रुजण्याची / दृढ होण्याची प्रक्रिया ही केवळ UFO दिसण्याच्या घटनांमुळे झालेली नाही. 

मंगळवार, १९ जुलै, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (१ / ९)


पृथ्वीव्यतिरिक्त इतरत्र जीवसृष्टी आहे का ? अर्वाचीन युगात मानवाने विविध मार्गाने पाठपुरावा केलेला, चर्चिलेला एक प्रश्न. अर्वाचीन अशासाठी म्हटले की काही प्राचीन संस्कृतीना हा प्रश्न पडला नव्हता, कारण तशी जीवसृष्टी आहे, हे त्यांना कदाचित 'माहीत' होते. (याबाबत नंतरच्या एका भागात उल्लेख येतीलच. )

तुलनेने अलीकडच्या काळात, लोकांमध्ये या गोष्टीबाबत कुतूहल वाढविणारी, समज-गैरसमज रूढ करणारी,  पहिली तपशीलवार नोंदलेली मोठी घटना होती 'Roswell UFO incident'.

या घटनेला कारणीभूत ठरलेली मूळ गोष्ट घडली होती १४ जून १९४७ रोजी.   Roswell, New Mexico, USA  येथील  William Brazel नावाच्या एका रहिवाशास त्याच्या कुरणाच्या जवळ आढळलेले काही अवशेष.

Brazel च्या नंतर नोंदवलेल्या जवाबानुसार १३ जून १९४७ च्या रात्री त्याने एका स्फोटाचा आवाज ऐकला.  दुसर्‍या दिवशी,म्हणजे १४ जून रोजी त्याच्या कुरणावर सोडलेल्या गुरांची स्थिती तपासण्यासाठी तो व त्याचा मुलगा तिथे गेले तेंव्हा त्यांना काही अगम्य अवशेष पडलेले दिसले. त्यावेळेस कामाच्या घाईत असल्याने, तसेच त्याची गुरे व्यवस्थित असल्याने, त्याने त्या गोष्टीकडे फारसे लक्ष न देता त्याच्या स्वत:च्या कामाकडे लक्ष देणे पसंत केले.  ४ जुलैला सुटीच्या दिवशी तो त्याच्या कुटुंबासह तिथे पुन्हा गेला आणि त्याने ते सारे अवशेष गोळा केले. या काळात उडत्या तबकड्यांविषयी (Flying Saucers) बातम्या चर्चेत असत, त्यामुळे हे अवशेष एखाद्या उडत्या तबकडीचे असावेत अशी शक्यता त्याच्या मनात आली.  नंतरच्या सोमवारी, म्हणजे ७ जुलै ला त्याने, शहरात जाऊन तिथल्या शेरीफची भेट घेतली आणि ही बातमी षट्कर्णी झाली.  त्यानंतर हा विषय सैन्यदलाच्या ताब्यात गेला. लष्कराकडून ते हवामानविषयक बलून होते असा पवित्रा घेण्यात आला.  पण दुसर्‍या दिवशी म्हणजे ८ जुलैला, ही बातमी काही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आणि लष्कराला पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडणे गरजेचे झाले. या पत्रकार परिषदेत त्यांनी सापडलेले काही अवशेषही समोर ठेवले आणि त्यामुळे कदाचित उडत्या तबकडीची चर्चा थांबली.  त्यानंतर साधारण ३० वर्षे ही गोष्ट विस्मृतीत गेली होती.

पण सत्य परिस्थिती ही होती की हे एक प्रकारचे cover-up होते आणि  त्यात काही त्रुटी राहून गेल्या होत्या. त्यातील एक होती, FBI ला पाठविला गेलेला एक Telex, ज्यात (hexagonal disc) षटकोनी चकतीचा उल्लेख होता.  दरम्यानच्या काळात आकाशात दिसणार्‍या आणि नोंदविल्या जाणार्‍या उडत्या वस्तूंच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती आणि त्या वस्तूंच्या विविध आकारांमुळे ,  'Flying Saucers' हे नाव मागे पडून त्याला  Unidentified Flying Object (UFO) असे नामाभिधान मिळाले होते. दरम्यानच्या काळात Alien abduction च्या काही घटनाही नोंदल्या गेल्या होत्या.  अमेरिका आणि रशिया यांच्यातील सत्तास्पर्धेची लागण अवकाश मोहिमांनाही झाली होती आणि विशेषत: चंद्रावरची  स्वारी यशस्वी झाली होती.  या व अशा अनेक घटनांमुळे, एकंदरच खगोलशास्त्र या विषयातले लोकांचे स्वारस्य वाढले होते.

१९७८ च्या सुमारास, UFO च्या अस्तित्वावर प्रगाढ विश्वास असणार्‍या एका गटाने ही बातमी पुन्हा उजेडात आणली आणि संबंधित सर्व लोकांच्या पुन्हा मुलाखती घेतल्या. आपल्याकडे जसा RTI कायदा आहे, तसा अमेरिकेत Freedom of Information Act आहे. त्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक कागदपत्रे मिळवली,  काही कागदपत्रे आतल्या काही लोकांकडून (बहुदा काही मोबदल्यात) leak केली गेली. आणि त्यातून या गटाने  Roswell येथे परग्रहावरचे एक यान कोसळले होते,  त्यात काही परग्रहवासींचे मृतदेहही होते आणि हे प्रकरण अमेरिकन सरकारने दडपून टाकले आहे अशी बाजू विविध प्रकाराने मांडली. नंतर नंतर या बाबतीत अनेक विविध 'शोध' लावले गेले, नवीन साक्षी नोंदविल्या गेल्या,  सनसनाटी दावे करणारी पुस्तके लिहिली गेली, टीव्ही मालिका / कार्यक्रम निर्माण केले गेले की कदाचित त्या लोकप्रियतेच्या लाटेला अनुसरून, १९९७ ला CNN ने यासंदर्भात एक सर्वेक्षण  केले होते. या सर्वेक्षणातून असा निष्कर्ष निघाला, की बहुसंख्य लोक असे मानतात की Roswell ही परग्रहवासींनी पृथ्वीला भेट देण्याची घटना होती आणि अमेरिकन सरकारने cover-up च्या माध्यमातून यातील तथ्य पूर्णपणे दाबून टाकले.

कालांतराने सैन्यदलाने या संदर्भात खुलासा केला की त्या बलूनचा उद्देश, रशियाच्या (संभाव्य) अणुस्फोटांच्या ध्वनीलहरी, मायक्रोफोनच्या माध्यमातून टिपणे हा होता, पण तो पर्यंत बरेच काही घडून गेले होते. जगभर घडणार्‍या UFO शी   अथवा   Alien शी संबंधित, तशाच प्रकारच्या असंख्य खर्‍याखोट्या घटनांमुळे, तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याच्या प्रवृत्तीतून प्रसिद्ध झालेल्या सनसनाटी पुस्तकांमुळे, टीव्ही वरील कार्यक्रमांमुळे,   सरकार आणि सरकारी संस्था अशा प्रकारच्या घटनांमध्ये काहीतरी लपवत आहेत असा ठाम समज झालेले लोक दिवसेंदिवस वाढत होते. आणि हे अजूनही थांबलेले नाही आणि थांबेल असे वाटतही नाही.  

बुधवार, १३ जुलै, २०१६

Impact Event - (भाग ६ / ६)


डायनोसॉर नष्ट होणे (Chicxulub crater - मेक्सिको , निर्माणाच्या वेळी १८० किमी व्यास, २० किमी खोल) ही आपल्याला 'ज्ञात' असलेली आणि जिचे परिणाम 'दृग्गोच्चर' आहेत, असे आपण म्हणू शकतो, अशी सर्वात मोठी Impact Event ची घटना आहे यात शंका नाही. पण डायनोसॉर नष्ट होणे ही बहुदा Impact Event ची एक मालिका असावी असा अंदाज आहे . साधारण ६.६ कोटी वर्षांपूर्वी घडलेली. पण त्यापूर्वीही बर्‍याच आधी आणि त्यानंतरही अनेकदा अशा घटना घडल्या आहेत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. Suavjärvi crater (रशिया) हे उपलब्ध माहितीनुसार पृथ्वीवरचे सर्वात जुने आघात विवर (Impact Crater) आहे. अंदाजे २.४ अब्ज वर्षे जुने. या विवराचा व्यास जेंव्हा निर्माण झाले तेंव्हा तुलनेने लहान होता. फक्त 16 किमी ! तर पृथ्वीवरचे सर्वात मोठे आघात विवर Vredefort crater(द. आफ्रिका) हे जेंव्हा निर्माण झाले तेंव्हा तब्बल ३०० किमी चे होते असे मानले जाते.


भारतात एकंदर चार आघात विवरे आहेत. त्यातील दोन सर्वमान्य आहेत, Lonar crater, महाराष्ट्र आणि Dhala crater, मध्यप्रदेश . इतर दोन आघात विवरांना अजूनतरी मान्यता मिळालेली नाही. त्यातील एक आहे रामगढ के शोले अर्थात Ramgarh crater, राजस्थान आणि दुसरे Shiva crater अर्थात 'Mumbai High'.




पौराणिक ग्रंथांचा, महाभारताचा विचार केला तरी असे काही उल्लेख आढळतात.

कार्तिकेयाच्या जन्माची पुढील लिंकमधील कथा, ही एका Impact Event ची कथा असण्याची शक्यता वाटते.
http://www.apamnapat.com/art…/030Shiva-BirthOfKartikeya.html


द्वारकेच्या बुडण्यामागे सुनामी (की त्सुनामी ?) असावी अशी शक्यता वर्तविण्यात येते. ही सुनामी भूकंपामुळे निर्माण झाली की एखाद्या Impact Event मुळे की एखाद्या NEO च्या पृथ्वीच्या जवळून जाण्यामुळे याविषयी पुरेशी माहिती उपलब्ध नाही. पण द्वारका बुडणार आहे याविषयी श्रीकृष्णास आधीच कळले होते / माहीत होते असे भागवतातील काही श्लोक सूचित करतात असे वाटते. महाभारतात मौसलपर्वात आकाशात आणि जमिनीवर घडणार्‍या विपरीत गोष्टींचे उल्लेख आहेत, तसेच भागवतातही आकाशात घडणार्‍या गोष्टींचा, उत्पातांचा उल्लेख आहे.
हे सर्व उल्लेख लवकरच घडणार्‍या Impact Event मुळे असावेत का ? शक्यता नाकारता येत नाही.

एखाद्या NEO च्या पृथ्वीच्या जवळून जाण्यामुळे सुनामी येऊ शकते का ? असे निश्चित म्हणता येणार नाही, पण Apophis २१ डिसेंबर २००४ रोजी पृथ्वीजवळून गेला आणि सुमात्रात झालेला मोठा भूकंप व पाठोपाठची महाभयंकर सुनामी या घटना २६ डिसेंबर रोजी घडल्या.

सर्वात अलीकडची Impact Event ही १५ सप्टेंबर २००७ रोजी Carancas या पेरु देशातील छोट्याशा गावाजवळ घडली. यातून निर्माण झालेले विवर हे अगदीच छोटे म्हणजे १३ मी रुंद आणि ४.५ मी खोल होते. साधारण १ किमी परिघातील अनेक घरांच्या काचा फुटल्या. पण विशेष नोंद घेण्याची गोष्ट म्हणजे या घटनेनंतर या विवराला भेट देणार्‍या ६०० लोकांपैकी, अनेकजण तात्काळ व काही जण कालांतराने वेगवेगळी लक्षणे दाखविणार्‍या कारणांनी आजारी पडले. त्यात काही पोलिस अधिकार्‍यांचाही समावेश होता. कालांतराने पेरु सरकारकडून या सर्व आजारांचे कारण, आर्सेनिकची विषबाधा असे सांगितले गेले.

Tunguska event ही सगळ्यात पहिली स्थळ, काळ, वेळेसह नोंदलेली घटना. बहुसंख्य वैज्ञानिक आज ही घटना लघुग्रह किंवा छोट्या धूमकेतूच्या टक्करीमुळे झाली होती असे मानतात. ही घटना सुदैवाने, सायबेरियातील एका जंगलात घडली.जवळजवळ २००० चौ किमी इतक्या मोठ्या क्षेत्रफळातील अंदाजे ८ कोटी झाडे जमीनदोस्त झाली.

आधीच्या लेखांकात विविध सर्वेक्षणे व संभाव्य उपाय यांचा एक आढावा घेतला होता. याबाबत कदाचित मनाची शक्ती (अंतर्ज्ञान वा तत्सम अध्यात्मिक मार्ग) वापरुन याचा मागोवा घेता येईलही. पण त्यादृष्टीने विस्तृत प्रयत्न झाल्याचे वाचनात नाही. पण यापेक्षा स्वाभाविक असलेले, या संदर्भात भाकीत करू शकेल असे एक साधन आहे मेदिनीय ज्योतिष (पृथ्वीवरील घटनांचे फलज्योतिष). पण याचाही अशा प्रकारच्या Impact Event साठी विशेष उपयोग झाल्याचे माझ्या वाचनात नाही. याला कदाचित 'आपण घबराट पसरविण्यास कारणीभूत होऊ नये' हा दृष्टीकोन असण्याची शक्यता असू शकेल.

सर्वसाधारणत: एखाद्या राष्ट्राची कुंडली ही त्या राष्ट्राच्या निर्मिती वा तत्सम घटनेला आधारभूत धरून बनवली जाते, अशी कुंडली बनवताना सर्वसाधारणत: त्या राष्ट्राची त्यावेळेची राजधानी हे स्थळ मानले जाते आणि त्या कुंडलीचा उपयोग त्या राष्ट्राचे भविष्य वर्तविण्यासाठी केला जातो. पण नैसर्गिक आपत्ती वा तत्सम घटनांबाबत भविष्य वर्तविण्यासाठी, विवक्षित ठिकाणांची अमावास्या संक्रमण पत्रिका मांडणे व तिचा उपयोग करून पुढील अमावास्येपर्यंतच्या काळाचे भविष्य वर्तविणे ही पद्धत मला अधिक भावते. निसर्ग राष्ट्रांच्या मानवनिर्मित सीमांना जुमानत नाही !

पुढे काही Impact Event किंवा (टळलेल्या Impact Event) ची एक यादी आणि मला जाणवलेल्या काही गोष्टी नमूद केल्या आहेत. अधिक अभ्यासासाठी याचा उपयोग व्हावा. बुध, राहू व हर्षल यांचे परस्पर संबंध, तसेच गुरु व मंगळ यांचे परस्परसंबंध अधिक दिसतात. अर्थात उपलब्ध data हा संख्यात्मकदृष्ट्या अत्यंत अपुरा आहे आणि निष्कर्ष काढण्याची घाई योग्य नव्हे. इतर Impact Event चा data उपलब्ध असल्यास त्यांचा अभ्यास आवश्यक आहे.

पण राहुचा अनेक ठिकाणी आलेला संबंध पाहता, विशोंत्तरी महादशेतील मंगळ, राहू, गुरु या क्रमाचा आणि मंगळ आणि गुरु यांच्यामधील लघुग्रहांच्या पट्ट्याचा काही संबंध आहे की काय असा विचार मनास स्पर्शून गेला.

अभ्यासकांनी, जाणकारांनी स्वत:ची मते अवश्य नोंदवावीत.

======= १ =======
Tunguska event ही सगळ्यात पहिली स्थळ, काळ, वेळेसह नोंदलेली घटना.
दिनांक : ३० जून १९०८
स्थळ : Tunguska Event Location, Russia 101E57 60N55,
वेळ : ७:१५ (Local Time) (TimeZone 09:00 East of GMT)
[ बुध (वक्री) युती शुक्र (वक्री) युती नेपच्यून ] प्रतियोग हर्षल (वक्री) हा सहज लक्षात येणारा तुलनेने दुर्मिळ योग.
कर्केत वर्गोत्तम मंगळ - मिथुनेत वर्गोत्तम चंद्र युती. , गुरु कर्केत पण मकर नवमांशी.
Tunguska event पूर्वीच्या अमावास्येला खग्रास सूर्यग्रहण होते, पण रशियात दिसणार नव्हते.
वरील स्थानावर अमावस्या संक्रमण पत्रिकेत (29 जून 1908, 01:32:01), अमावस्या ही चतुर्थ भावात पडली होती.
(बुध युती नेपच्यून) प्रतियोग हर्षल (वक्री), कर्केत वर्गोत्तम मंगळ, गुरु कर्केत पण मकर नवमांशी. राहूही मकर नवमांशी
=======

======= २ =======
Sikhote-Alin meteorite 1947. एक धातूप्रधान उल्का दक्षिण-पूर्व रशियात कोसळली. जमिनीवर आपटून शकले झाल्यानंतर त्या शकलांचे एकत्रित अंदाजे वजन हे तब्बल ७० टन होते.
या उल्कापाताचा प्रकाश आणि आवाज हा जवळजवळ 300 किमी पर्यंत जाणवला. यातून निर्माण झालेली धूम्ररेषा ही सुमारे 32 किमी लांबीची होती.
दिनांक : १२ फेब्रुवारी १९४७
स्थळ : Sikhote-Alin meteorite Location (134E39, 46N09)
वेळ : १०:३० (TimeZone 10:00 East of GMT)
बुध - शुक्र लाभयोग, बुध - राहू केंद्रयोग
नवमांशात शुक्र, गुरु, मंगळ कर्केत, नवमांशात बुध व हर्षल समोरासमोर
वरील स्थानावर Sikhote-Alin meteorite पूर्वीच्या अमावस्या संक्रमण पत्रिकेत (22 जानेवरी 1947 18:35) अमावास्या बुधयुक्त, मंगळ अमावास्येच्या 4 अंश मागे. मंगळ - गुरु लाभयोग (३°+)
=======

======= ३ =======
1972 Great Daylight Fireball ही, आकाशातून भरदिवसा एक उल्कापिंड (की लघुग्रह ?) वातावरणाशी घर्षण होऊन जळताना, प्रचंड आवाज करत, प्रवास करताना दिसल्याची घटना आहे. हा उल्कापिंड Utah च्या आकाशातून कॅनडाच्या दिशेने पृथ्वीपासून साधारण 57 किमी अंतरावरून गेला. त्यावेळी याच्या कक्षेत पृथ्वीने बदल घडवून आणला. ऑगस्ट 1997 मध्ये हाच लघुग्रह पुन्हा, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 73 किमी ते 57 किमी असा घसरत आणि पुन्हा वरच्या दिशेने चढत एखाद्या हायपरबोला प्रमाणे गेल्याचे एका उपग्रहाने टिपले होते. ऑगस्ट 1997 ची अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.
दिनांक : १० ऑगस्ट १९७२
स्थळ : Salt Lake City, Utah
वेळ : १४:३० (MST)
गुरु धनूत, मंगळ - गुरु (वक्री) नवपंचम, बुध (वक्री) - हर्षल लाभयोग, रवी - शनि लाभयोग,
शुक्र - नेपच्यून (वक्री) षडाष्टक
नवमांशात शुक्र, राहू समोर हर्षल
वरील स्थानावर 1972 Great Daylight Fireball पूर्वीच्या अमावस्या संक्रमण पत्रिकेत (८ ऑगस्ट १९७२, २३:२६:२६) ची अमावास्या, वक्री बुधयुक्त, अमावास्या शनीच्या लाभ योगात. बुध लाभयोग हर्षल, गुरु (वक्री) नवपंचम मंगळ
नवमांशात अमावास्या, बुध, राहू एकत्र, हर्षल त्यांच्या समोर.
२६ जुलै १९७२ ला खंडग्रास चंद्रग्रहण होते.
=======

======= ४ =======
Carancas Meteor चा वर उल्लेख आला आहे. यातून निर्माण झालेले विवर हे अगदीच छोटे म्हणजे १३ मी रुंद आणि ४.५ मी खोल होते.
दिनांक : १५ सप्टेंबर २००७
स्थळ : Carancas Meteor Location (69W03, 16S40)
वेळ : ११:४०:१४ (TimeZone 05:00 West of GMT)
बुध षडाष्टक हर्षल (वक्री), गुरुची मंगळावर सातवी दृष्टी आहे, पण प्रतियोग नाही.
नवमांशात बुध व राहू समोरासमोर
वरील स्थानावर Carancas Meteor पूर्वीच्या अमावस्या संक्रमण पत्रिकेत (११ सप्टेंबर २००७, ०७:४४:५५) , अमावास्या हर्षलच्या प्रतियोगात. बुध-राहू षडाष्टक (३°+)
गुरुची मंगळावर सातवी दृष्टी आहे, पण प्रतियोग नाही.
=======

======= ५ =======
Chelyabinsk meteor या अशनीचा फेब्रुवारी 2013 मध्ये Southern Ural region च्या आकाशात स्फोट झाला (जमिनीवर प्रत्यक्ष आघात झाला नाही) . सुमारे 100 किमी इतक्या दूर अंतरावरूनही दिसलेल्या या अशनीमुळे सुमारे 1500 लोक जखमी झाले आणि त्याच्या shockwaves मुळे साधारण 3 कोटी अमेरिकन डॉलर इतके नुकसान झाले,
दिनांक : १५ फेब्रुवारी २०१३
स्थळ : Chelyabinsk meteor Location (61E25, 55N09)
वेळ : ०९:२० (YEKT)
मंगळ - गुरु लाभयोग (३°+), मंगळ-बुध युती (४°), रवि - चंद्र लाभयोग, मंगळ लाभयोग , मंगळ नवपंचम प्लूटो.
नवमांशात चंद्र, बुध, गुरु एकत्र, रवि व हर्षल समोर.
वरील स्थानावर Chelyabinsk meteor पूर्वीच्या अमावस्या संक्रमण पत्रिकेत (१० फेब्रुवारी २०१३ १२:२०:४३) गुरुच्या केंद्रयोगात मंगळ-बुध युती होती, नेपच्यून जवळ. अमावास्या राहुच्या केंद्रयोगात.
=======

रविवार, १० जुलै, २०१६

Impact Event - (भाग ५ / ६)

या लढाईत यशस्वी होण्यासाठी पृथ्वीच्या सभोवती सतत आणि खूप दूरपर्यंत सतत निरीक्षक असणे गरजेचे आहे. जे सध्या काहीसे अवघड आहे. सर्व NEO वर सदासर्वकाळ लक्ष ठेवता यावे म्हणून Chipsats चा वापर करण्याच्या प्रकल्पावर काम चालू होते, पण त्यात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. या प्रकल्पात  सोबतच्या चित्रात दाखविलेले अनेक PCB हे एखाद्या उपग्रहाचे काम करतील. आणि असे असंख्य PCB एका cubesat च्या माध्यमातून अवकाशात भिरकावले जातील.  त्यातले कित्येक हरवतील. कित्येक नाश पावतील, पण उरलेले त्यांचे काम करत राहतील अशी संकल्पना आहे.  या chipsat च्या अल्प किंमतीमुळे हजारो chipsat एकाच वेळेत अवकाशात सोडणे शक्य व्हावे. याखेरीज केवळ NEO वर लक्ष ठेवण्यासाठी रशियाने नुकताच एक Large Area Telescope उभारला आहे. याची क्षमता इतकी अधिक आहे की पृथ्वीपासुन १ AU इतक्या अंतरावर असलेल्या,५० मीटर इतक्या छोट्या NEO ची माहिती मिळवण्यासाठी याला केवळ ३० सेकंद लागतात. 




या लढाईत यशस्वी होण्यासाठी पृथ्वीच्या सभोवती सतत आणि खूप दूरपर्यंत सतत निरीक्षक असणे गरजेचे आहे. जे सध्या काहीसे अवघड आहे. सर्व NEO वर सदासर्वकाळ लक्ष ठेवता यावे म्हणून Chipsats चा वापर करण्याच्या प्रकल्पावर काम चालू होते, पण त्यात तांत्रिक अडचणी आल्या आहेत. या प्रकल्पात  सोबतच्या चित्रात दाखविलेले अनेक PCB हे एखाद्या उपग्रहाचे काम करतील. आणि असे असंख्य PCB एका cubesat च्या माध्यमातून अवकाशात भिरकावले जातील.  त्यातले कित्येक हरवतील. कित्येक नाश पावतील, पण उरलेले त्यांचे काम करत राहतील अशी संकल्पना आहे.  या chipsat च्या अल्प किंमतीमुळे हजारो chipsat एकाच वेळेत अवकाशात सोडणे शक्य व्हावे. याखेरीज केवळ NEO वर लक्ष ठेवण्यासाठी रशियाने नुकताच एक Large Area Telescope उभारला आहे. याची क्षमता इतकी अधिक आहे की पृथ्वीपासुन १ AU इतक्या अंतरावर असलेल्या,५० मीटर इतक्या छोट्या NEO ची माहिती मिळवण्यासाठी याला केवळ ३० सेकंद लागतात. 

अमेरिकेचा space guard नावाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प देखील अंशत: कार्यान्वित झाला आहे.  पण तरीही हे सर्व सर्वेक्षणाचे उपाय आहेत,  जेणेकरून उपाययोजना करण्यास अधिक वेळ मिळावा.

आधीच्या दोन्ही लेखांकात नमूद केलेले सर्व उपाय हे प्रामुख्याने Impact Event घडणार आहे,  हे कळल्यानंतर करावयाचे उपाय आहेत. पण पूर्वसिद्धता ठेवणे या दृष्टीने काही उपाययोजना / प्रकल्प  चालू आहेत का ?  या संदर्भात अधिकृतरित्या अनेक सर्वेक्षणे करण्यात आली आहेत पण प्रत्यक्ष प्रकल्प उभारला गेला असल्यास किंवा उभारणे सुरू असल्यास अथवा तशी योजना असल्यास त्या बाबत, अत्यंत कमी माहिती उपलब्ध आहे. NEO वर आघात करून  त्याची दिशा बदलण्याच्या शक्यतेचे एक परीक्षण करावे या हेतूने NASA आणि ESA यांचा एक संयुक्त प्रकल्प बहुदा 2022 साली योजला आहे. तो जर यशस्वी झाला तर या संदर्भात काही ठोस घडेल अशी आशा आहे.

पण तरीही Carl Sagan ने या संदर्भात व्यक्त केलेली भीती ही अत्यंत बोलकी आहे. त्याच्या मतानुसार विचलन या प्रकारातील कोणत्याही उपायाबाबत प्रत्यक्ष आवश्यकता पडल्यावरच निर्मिती व्हावी. याची पूर्वसिद्धता ठेवल्यास व कालांतराने ही उपाययोजना राक्षसी राजकीय महत्त्वाकांक्षा असलेल्या वा अतिलोभी व्यापारीवृत्तीच्या किंवा कुणा अतिकट्टरवादी व्यक्तीच्या हातात पडल्यास, या विचलनाचा उपयोग टक्कर घडवून आणण्यासाठीही वा भीती दाखवून ब्लॅकमेल करण्यासाठीही होऊ शकेल !

या विषयाला वाहिलेली अनेक वैज्ञानिक पुस्तके उपलब्ध आहेत, त्याविषयी कथा, कादंबर्‍या या माध्यमातूनही विपुल साहित्य उपलब्ध आहे. PC, Video व Game Console या माध्यमातून या विषयावर अनेक Games ही आले होते आणि त्यातील काहींनी चांगला व्यवसायही केला. टीव्ही मालिका आणि चित्रपटांनीही हा विषय अनेकदा हाताळला आहे.

पण विशेष उल्लेख करण्यासारखे दोन चित्रपट आहेत, १९९८ साली आलेले Deep Impact व Armageddon हे दोन विज्ञानपट.
 या चित्रपटातून धूमकेतुशी टक्कर हा विषय मनोरंजनाच्या माध्यमातून उत्कृष्ट सादर केला आहे. दोन्ही चित्रपटात, चित्रपटी यशस्वी होण्यासाठी, सर्वांना रुचेल, आवडेल असा मसाला भरलेला होता, तरीही Deep Impact हा वैज्ञानिक तथ्यांच्या दृष्टीकोनातून अधिक चांगला चित्रपट आहे.


१९९८ याच वर्षी Moonfall (Jack McDevitt) आणि Nemesis (Bill Napier) या अनुक्रमे धूमकेतू आणि लघुग्रह यांच्या अनुक्रमे चंद्र व पृथ्वीशी टक्करीविषयी दोन कादंबर्‍या प्रकाशित झाल्या होत्या.

एकाच वर्षी, मूलत: एकाच विषयाला विविध प्रकाराने सादर करणार्‍या दोन कादंबर्‍या आणि दोन चित्रपट येणे हा निव्वळ योगायोग आहे का ? की त्यामागे आपल्याला माहीत नसलेले (किंवा लपवलेले) आणखी काही कारण आहे ?

अळूच्या पानावर पडलेल्या, पाण्याच्या थेंबाप्रमाणे असलेले, आपले जग अजूनही सुंदर आहे, आणि काळाच्या विशाल पटावर तितकेच क्षणभंगुर.

Voyager 1 ने 6 अब्ज किमी वरुन काढलेले Pale Blue Dot हे छायाचित्र जितके प्रसिद्ध आहे, तितकेच त्या छायाचित्रावरचे Carl Sagan चे
भाष्य देखील. आज इतक्या वर्षांच्या निरंतर शोधानंतरही जेंव्हा दुसरी प्रगत जीवसृष्टी सापडत नाही, मानव सहज वस्ती करू शकेल असा दुसरा ग्रह सापडत नाही, तेंव्हा ते भाष्य अधिकच चटका लावते. अथक प्रयत्नानंतर, स्वत:च्या बुद्धिवैभवाच्या जोरावर मानवाने आजचे प्रगतीचे शिखर गाठले आहे, ते अशा रितीने उद्ध्वस्त होण्यासाठी नक्कीच नव्हे.

Deep Impact मध्ये धूमकेतुला रोखणे किती अवघड आहे, हे लक्षात आल्यावरही प्रेसिडेंटच्या भूमिकेत असलेला Morgan Freeman जेंव्हा 'But I can also promise you this. Life will go on, we will prevail.' असे म्हणतो, त्या वाक्यात दिसणार्‍या, त्या विजिगीषू, दुर्दम्य आशावादातच मानवी जीवनाच्या, अपराजित अस्तित्वाची बीजे आहेत, असतील.

शनिवार, ९ जुलै, २०१६

Impact Event - (भाग ४ / ६)


तिसरा अल्पसंभाव्य आणि पण काहीसा अभिनव असा विचलन पद्धतीचा उपाय आहे,  gravity tractors. थोडक्यात गुरुत्वाकर्षणाच्या नियमांचा उपयोग करून, प्रत्यक्ष स्पर्श न करता, एखाद्या  NEO ला tow केलेल्या कार प्रमाणे खेचून नेण्याचा उपाय.  हे न्यूटनच्या सार्वत्रिक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतानुसार घडते व यासाठी मानवनिर्मित अंतराळयान हे ट्रॅक्टरचे काम करते. अर्थातच अंतराळयानाचे वस्तुमान हे कुठल्याही NEO पेक्षा प्रचंड कमी असल्याने हा खूप दीर्घकाळ चालणारा उपाय आहे. त्यामुळे यात प्रचंड इंधन तर लागेलच, शिवाय अशा NEO ला विचलित करण्यासाठी,  तिच्यासंबंधी सूचनाही खूप लवकर मिळायला हवी, जेणेकरून अशा यानाची निर्मिती होऊन, ते वेळेवर त्या NEO जवळ पोहोचू शकेल.  याव्यतिरिक्त या उपायात आणखी एक गोम आहे, ती म्हणजे त्या NEO चे पृथ्वीवरील संभाव्य आघातस्थान हे हळूहळू एका देशातून सरकत सरकत दुसर्‍या देशात जात, शेवटी पृथ्वीच्या बाहेर जाईल, आणि त्यामुळेच या उपायाला एक आंतरराष्ट्रीय राजकारणाची किनारही आहे !

विशेषत: कर्ब प्रधान  NEO साठी आणखी एक उपाय सुचविला गेला आहे, तो म्हणजे त्या NEO वर विवर तयार करून (आघात वा अन्य मार्गाने) अंतर्भागातील वायु, पाणी वा त्या आघाताद्वारे तयार होणार्‍या द्रव वा वायुचे उत्सर्जन होऊ देणे. या उपायात अंतर्द्रव्याचे उत्सर्जन किंवा निचरा वेगाने होऊन, NEO मूळ कक्षेपासून विचलित होते व धोका टाळू शकतो. मात्र हा उपाय काहीसा धोकादायकही आहे, अशासाठी की अंतर्द्रव्याचा निचरा होऊ लागल्यावर NEO ची गती नियंत्रित राखणे शक्य होईलच असे नाही. आणि त्यामुळे त्याच्या संभाव्य कक्षेविषयी कोणतेही अनुमान बांधणे शक्य होणार नाही.  मात्र या प्रकारात  NEO चे वस्तुमान कमी होत जात असल्यामुळे त्याच्या टक्करीतून होणारा धोकाही त्याच प्रमाणात कमी होत जातो.


प्रगत होत जाणार्‍या तंत्रज्ञांनासोबत विचलन हे तुलनेने अधिक सुलभ आहे हे लक्षात आल्यामुळे त्या संदर्भात आणखीही उपाय सुचविण्यात आले आहेत.

त्यामध्ये NEO च्या जवळून एखाद्या यानाने प्रवास करणे व त्या यानातून NEO वर आयनांच्या प्रवाहाचा सुनियंत्रित मारा करणे किंवा अतिशय शक्तीशाली लेसर किरणांचा लक्ष्यभेदी मारा करणे हे उपायही सुचविले गेले आहेत.



तीव्र सौरऊर्जेचा दीर्घकाळ वापर करून, NEO च्या पृष्ठभागावरील पदार्थांचे 'बाष्पीभवन' करणे हा ही उपाय सुचविला गेला आहे, पण हा उपाय यशस्वी होण्यासाठी शक्तीशाली आरसे / भिंगे बसवलेल्या अंतराळस्थानकाची वा यानाची निर्मिती गरजेची आहे.

या व्यतिरिक्तही कागदावर 'आकर्षक' वाटणारे, दुसरे काही आश्चर्यकारक उपायही सुचविले गेले आहेत :-)  त्यातील काही असे आहेत

१) सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणात परावर्तीत करणार्‍या प्लॅस्टिक आवरणांनी संपूर्ण NEO आच्छादित करणे, जेणेकरून गतिज उर्जेत बदल होऊन विचलन व्हावे.
२) संपूर्ण NEO वर titanium dioxide सारख्या शुभ्र किंवा काजळीसारख्या काळ्या द्रव्याची फवारणी करणे व त्यायोगे शोषल्या जाणार्‍या आणि परावर्तीत होणार्‍या किरणोत्सर्जानाच्या मानात बदल घडवून, त्याचे विचलन घडवून आणणे.
३) NEO च्या मार्गात वाफेचा अतिप्रचंड ढग निर्माण करून ठेवणे, जेणेकरून त्याचा वेग कमी होऊन, तो टक्कर होणार्‍या संभाव्य जागी (पृथ्वी निघून गेल्यावर) उशिरा पोहोचेल.
४) विशेषत: धातुप्रधान (निकेल-लोह) NEO साठी, त्याच्या मार्गात मोठा (तारांची भेंडोळी वापरुन) विद्युतचुंबक निर्माण करून ठेवणे. जेणेकरून NEO चा विनाश वा विचलन घडून येईल.
५) त्या NEO वर अनेक यंत्रमानव उतरवणे आणि त्यांचा उपयोग करून ती NEO कुरतडत संपविणे.
६) कार्बन-फायबर चे जाळे निर्माण करून ते NEO च्या वाटेत पसरवणे. (याचा उपयोग भविष्यात mining साठीही होऊ शकतो !)

संभाव्य धोका टाळण्यासाठी, मानवी कल्पनाशक्ती किती अचाट विचार करू शकते याची साक्ष वरील उपाय देतात.

या व अशा अनेक उपायांची वर्गवारी करण्यात येते आणि कुठल्या प्रकारची NEO आहे , टक्कर टाळण्यासाठी किती कालावधी उपलब्ध आहे, त्याला लागणारा खर्च, उपाय यशस्वी होण्याची शक्यता या व अशा अनेक घटकांचा वापर करून, computer simulation च्या माध्यमातून त्यांचा अभ्यास होतो. या संदर्भातील संशोधन अनेकदा प्रकाशित होत असते पण शेवटी अनेक गोष्टी या कागदावरच राहतात. कित्येक वेळेस एकापेक्षा जास्त उपाय वापरुन हे धोके कसे कमी करता येतील हा विचारही झाला आहे.

लघुग्रहाच्या Impact Event पेक्षाही कैक पटीने घातक ठरू शकेल अशी घटना असेल धूमकेतूशी टक्कर. या बाबतीत बर्‍याचदा अनुकूल असलेली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे त्याची कक्षानिश्चिती. जी पुरेशी आधीच होत असल्याने धोक्याचा अचूक अंदाज बांधणे शक्य आहे. धूमकेतूच्या बाबतीत विनाशापेक्षा विचलन हा अधिक यशस्वी ठरू शकेल असा उपाय आहे.


पृथ्वीवर जीवन रुजविण्यास कारणीभूत एखादा धूमकेतूच ठरला असावा असे अनेक वैज्ञानिक मानतात.
मात्र डायनोसॉर नष्ट होण्यामागे देखील धूमकेतूची टक्करच ठरली असावी अशीही मान्यता आहे. धूमकेतूच्या आकारामुळे ही टक्कर एखाद्या लघुग्रहाच्या तुलनेत अतिविनाशकारी ठरू शकते. १९१० साली हॅले धूमकेतूच्या पिसार्‍याच्या शेवटच्या भागातून पृथ्वी गेली होती आणि त्याच सुमारास प्लेगने थैमान घातले. आता हा योगायोग होता की त्या पिसार्‍यामधून विषाणू पृथ्वीवर आले हा वादाचा विषय जरी असला, तरी प्रत्यक्ष टक्कर न होताही धूमकेतू विनाशकारी ठरू शकतो ही शक्यता राहतेच. पृथ्वीवर सध्या आहे तेवढी जैविक विविधता आपल्याला पुरेशी आहे, सध्या तरी नव्या प्रकारच्या जीवनाची इथे आवश्यकता नाही !

शुक्रवार, ८ जुलै, २०१६

Impact Event - (भाग ३ / ६)


सध्याच्या निरीक्षणांनुसार Apophis या शतकात तरी पृथ्वीवर धडकण्याची शक्यता नाही. पण जर दुर्दैवाने तशी वेळ आलीच असती, तर वातावरणातील त्याच्या केवळ प्रवेशानेच 750 मेगाटन इतकी ऊर्जा निर्माण झाली असती. या ऊर्जेच्या घातकतेचा व त्यायोगे होऊ शकेल अशा संहाराचा अंदाज येण्यासाठी पुढील घटना व त्यातून झालेली ऊर्जानिर्मिती लक्षात घेणे आवश्यक आहे. आणि Apophis हा बर्‍यापैकी छोटा लघुग्रह आहे.



१) हिरोशिमा अणुबॉम्बमुळे => 16 किलोटन
२) नागासकी अणुबॉम्ब => 21 किलोटन
३) Tunguska event => 3 ते 10 मेगाटन
४) सर्वात संहारक अण्वस्त्रपरीक्षा (रशिया, 30 ऑक्टोबर 1961, हायड्रोजन बॉम्ब) => 57 मेगाटन



पण अशा एखाद्या Impact Event चा परिणाम हा केवळ ऊर्जेच्या मापनावरून ठरत नसतो. अशा NEO ची रासायनिक रचना, पृथ्वीशी टक्कर होतानाचा कोन आणि टक्करीचे ठिकाण या तीन गोष्टी प्रामुख्याने विध्वंसाचे मान ठरवतात. रासायनिक रचनेनुसार NEO चे ढोबळमानाने चार प्रकार आहेत. carbonaceous (कर्ब प्रधान) , Metal (Mainly Iron-Nickel) (धातूप्रधान) आणि Stony (अश्मप्रधान) आणि rubble pile (गुरुत्वाकर्षणामुळे एकत्र असलेला विविध लघुग्रहांचा समूह).

अशा प्रकारची टक्कर टाळण्यासाठी जे विविध उपाय सुचविले गेले आहेत, त्यातल्या प्रत्येक उपायाचे गुण-दोष आहेत. शिवाय त्या प्रत्येक उपायांची यशस्वी होण्याची शक्यता, ही NEO पृथ्वीवर आदळण्याची सूचना कधी मिळते व पर्यायाने उपाययोजना करण्यासाठी किती कालावधी उपलब्ध आहे, NEO चा आकार, रासायनिक रचना या व अशा अनेक बाबींवर अवलंबून आहे.

या उपायांना दोन मुख्य गटात विभागले जाऊ शकते ते म्हणजे विनाश आणि विचलन.

विनाश हा सर्वात सहज लक्षात येणारा उपायांचा गट आहे. यातील समान भाग असा की टक्कर होऊ शकेल अशा NEO चा विनाश घडवून आणायचा आणि त्या NEO ची अशी शकले करायची की ती पृथ्वीवर पोहोचण्यापूर्वीच वातावरणात घर्षण होऊन जळून जातील किंवा शकले झाल्यानंतर ती शकले पृथ्वीच्या दिशेने न येता विखरून जातील. वातावरणाशी घर्षण होऊन जळून जाण्यासाठी व त्यायोगे पृथ्वीवर न पोहोचण्यासाठी अशी शकले ही साधारणत: ३५ मीटऱपेक्षाही (व्यास वा लांबी वा रुंदी) छोटी असणे आवश्यक आहे.

टक्कर होण्यासाठी आवश्यक गोष्ट ही आहे की पृथ्वी आणि NEO, एका विवक्षित वेळी परस्परांच्या पुरेसे जवळ येणे. विचलनगटातील उपायांचे लक्ष्य हे या एकत्र येण्याला टाळण्याकडे असते. संभाव्य टक्करीत सहभागी असलेल्या NEO चा वेग कमी करता आला किंवा वाढविता आला किंवा तिची कक्षा बदलता आली तर अशी NEO अनुमानित टक्करीच्या वेळेस त्या जागेवरच नसेल आणि त्यामुळे ती टक्कर आपसूकच टळेल.

पुरेशा क्षमतेच्या अण्वस्त्राचा वापर करून विनाश व विचलन या दोन्ही प्रकारात उपाययोजना होऊ शकते. पण या उपायात ते अण्वस्त्र पृष्ठभागावर आदळून त्याचा स्फोट होणे पुरेसे आहे की त्याचा स्फोट हा, NEO च्या अंतर्भागात (रासायनिक रचना, आकार आदि घटकांमुळे) होणे गरजेचे आहे ही गोष्टही महत्त्वाची आहे. धातूप्रधान NEO मध्ये पृष्ठभागावरचा स्फोट फारसा उपयोगी ठरेलच असे नाही.

दुसरा संभाव्य उपाय आहे NEO वर केला जाणारा मोठा आघात. पुरेशा मोठ्या व प्रचंड गतिज ऊर्जा असलेल्या एखाद्या वस्तूचा (Impactor) आघात करून, कोणताही स्फोट न घडवता, NEO चे विचलन साध्य होऊ शकते. हा Impactor म्हणजे मानवनिर्मित मोठे अंतराळयानच असले पाहिजे असे नाही. काट्याने काटा काढणे या म्हणीचा वापर करून दुसर्‍या एखाद्या NEO शी टक्कर घडवून आणणे देखील तर्कदृष्ट्या शक्य आहे.

पण rubble pile या प्रकारात या उपायाचा फारसा उपयोग होऊ शकणार नाही असे मानले जाते कारण अशा आघातानंतर rubble pile NEO ची शकले न होता विविध लघुग्रह वेगळे होऊन, फारशी दिशा न बदलता, पृथ्वीच्या दिशेने तरीही झेपावू शकतात आणि अशा वेळेस त्यांच्या कक्षा आणि आघातस्थाने निश्चित करणे हे अतिशय अवघड काम असेल.

rubble pile NEO च्या साठी खास सुचविला गेलेला एक उपाय आहे तो म्हणजे त्या NEO च्या पृष्ठभागाच्या सभोवती पण पुष्ठभागापासून काही उंचीवर, अनेक अणुस्फोट घडवून आणणे व त्यायोगे त्याला विलग न होऊ देता, त्याचे विचलन घडवून आणणे.

वरील सर्व उपायांना इतर उपायांच्या तुलनेत कमी वेळ लागू शकतो. पण त्याबाबतीत निर्णयप्रक्रिया ही अतिशय वेगवान असणे आवश्यक असते. तसेच हे सर्व उपाय NEO पृथ्वीपासून पुरेशी दूर असतानाच अधिक परिणामकारक ठरू शकतात.