(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)
---- मागील भागावरून पुढे ----
====
'तुझे अवधान केवळ आणि केवळ प्रशिक्षणावर राहिले पाहिजे, हे त्याचे सांगणे मला समजले, पण मोहाचे प्रसंग टाळ असे का म्हणाला असेल तो ? ' स्वस्तिकचे विचारचक्र अतिशय वेगाने धावत होते. 'मानवी इतिहास शिकताना, प्राचीन काळातील मानवाच्या गुणदोषांसंबंधी माहिती मी मिळवली आहे. ते दोष माझ्यात नाहीत, म्हणजे अजूनपर्यंत त्यांचा प्रत्यय आलेला नाही. नेमून दिलेल्या कामात दुर्लक्ष होऊ नये, यासाठी यांत्रिकपणे काम कसे करावे हे देखील, युरोपावरील या आधीच्या प्रशिक्षणादरम्यान मी शिकलो आहे, तरीही असे घडू शकते, असे तो का म्हणाला असेल ? याचा संबंध पृथ्वीच्या त्या चंद्राशी तर नाही ना ? काही वेळापूर्वी आपल्याला एकाग्रता ठेवणे थोडे अवघड गेले होते. युरोपावर असे कधीच झाले नव्हते. मग इथेच का होते आहे ?'
"मी सोमजा. तुम्ही ?" स्वस्तिकच्या बाजूने जाणार्या आणि स्वस्तिकच्या वयाच्या एका तरुणीने प्रश्न विचारला आणि स्वस्तिकची तंद्री तुटली. त्याने मान वर करून बघितले.
'हिचा डिफॉल्ट बॉडीसूट आपल्यापेक्षा वेगळा आहे' स्वस्तिकच्या मनात आले. 'कुठली असेल ही ?'
"मी स्वस्तिक, युरोपावासी" त्याने स्वत:ची ओळख करून दिली. "तुम्ही.... "
"तुमचा अंदाज बरोबर आहे. माझा जन्म युरोपावरचा नाही. चंद्रावरचा आहे, तिथे दहा पृथ्वीवर्षे होते मी, नंतर मला युरोपावर पाठविण्यात आले. त्यामुळे जन्मापासूनच बॉडीसूट न घालता, राहायची सवय आहे मला." स्वस्तिकचे वाक्य अर्ध्यावरच तोडत सोमजा म्हणाली. "युरोपावर केवळ तिथल्या प्रशिक्षणादरम्यान बॉडीसूट वापरला, पण तो न वापरता मला अधिक आरामदायी वाटते. माझी त्वचा, तुमच्यापेक्षा बरीच वेगळी आहे, त्यामुळे मला बॉडीसूट वापरावा लागत नाही" ती स्मित करत म्हणाली.
"युरोपावरील प्रशिक्षण ? " प्रशिक्षणवर्गाच्या स्मृतिकोषातील सर्व चेहरे स्वस्तिकने झरझर स्कॅन केले. "पण मी सर्वांना ओळखतो. तुम्हाला याआधी कधी भेटल्याचे आठवत नाही मला."
"कारण तुमचा आणि माझा उद्देश वेगळा आहे. मी EHP ला प्रवेश घेतलेला नाही. माझे काम प्रशिक्षणात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मानव वसाहतींवर जाऊन मला राहावे लागते. पृथ्वीवरच्या मानव अभयारण्यातील प्रशिक्षणसुद्धा त्याचाच भाग आहे."
"तरीच." असे म्हणत स्वस्तिक त्याच्या कॅप्सुलच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्या कॅप्सुलला लटकावलेल्या अवकाशवेशात त्याने स्वत:ला गुरफटवून घेतले. सोमजाचा निरोप घ्यावा म्हणून त्याने समोर बघितले तर ती तिथे नव्हती. त्याने कॅप्सुल उघडून त्यात प्रवेश केला आणि कॅप्सुलचे झाकण आपोआप बंद झाले आणि मॉनिटर सुरू झाला. त्यावर दिसणारा तो करड्या रंगाचा पृथ्वीचा गोल पाहून पृथ्वीवरच्या प्रशिक्षणाचे विचार त्याच्या मनात पुन्हा घोळू लागले. पृथ्वीच्या वातावरणात यानाने प्रवेश केल्याचे मॉनिटरवर दिसले आणि स्वस्तिकने डोळे मिटून घेतले. त्याच्या मनात त्याने शिकलेला पृथ्वीचा इतिहास झरझर सरकून गेला.
--
'साधारण बत्तीसशे पृथ्वीवर्षांपूर्वी, हॉकिंग दुर्बिणीने शोधलेला एक छोटा धूमकेतू, परत जाताना युरेनसच्या बर्याच जवळून गेला आणि त्याची कक्षा बदलली. त्याच्या पुढच्या भेटीत तो पृथ्वीवर आदळणार हे नंतरच्या गणितातून निश्चित झाले. ही धडक विनाशकारी असणार होती, त्यामुळे पृथ्वीवरचे सर्व मोठे देश एकत्र आले आणि त्यांनी संयुक्तपणे काही निर्णय घेतले. मानववंश आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचविण्यासाठी, मानवाच्या हातात १७० वर्षे होती. या दीर्घ कालावधीचा उपयोग करून मंगळ, गुरूचा उपग्रह युरोपा, एन्सीलेडस आणि यथावकाश प्लूटोवर वसाहती निर्माण करण्याचा निर्णय झाला. प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या होत्या, आणि त्यामुळे त्यांची उत्तरेही वेगळी होती. पण चंद्रावर मानवी तळ उभारल्याचा अनुभव गाठीशी होता आणि या संयुक्त वसाहतीकरणाच्या प्रकल्पासाठी सर्व देशांच्या सरकारांनी कंबर कसली. खाजगी स्तरावर देखील प्रचंड पैसा ओतण्यात आला. वैज्ञानिकांना, तंत्रज्ञांना कधी नव्हे तो संपूर्णपणे मुक्तहस्त मिळाला. या सर्वांचा पुरेपूर उपयोग करत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी प्रचंड मोठी झेप घेतली.
हे प्रकल्प संयुक्त स्तरावर राबविले जात असल्याने ज्ञानाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर झाली. अतिप्रचंड आकाराची अवकाशयाने बांधण्यात आली आणि ठरविलेल्या कालावधीच्या तब्बल दहा वर्षे, आधीच मोठ्या प्रमाणावर, विविध मानवी समुदायांचे आणि वनस्पतीसृष्टीसकट मर्यादित आणि उपयुक्त प्राणीसृष्टीचे संक्रमण या नव्या वसाहतींमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात आले. यात काही खाजगी प्रकल्पदेखील होते, पण त्यांना आक्षेप घेण्यासारखी, आडकाठी करण्यासारखी परिस्थितीच नव्हती. अर्थात पृथ्वीवरच्या सर्व मानवांना दुसर्या ग्रहांवर हलविणे शक्यच नव्हते. म्हणून पृथ्वीच्या अंतर्भागात देखील बाकीच्या मानवांसाठी तात्पुरत्या वसाहती निर्माण करण्यात आल्या. पृथ्वीवरचे शक्य तेवढे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान जतन करण्यासाठी प्रत्येक मानव वसाहतीमध्ये विविध प्रकारचे उपाय योजले गेले. पण इतर मानवी वसाहतींमधील साधनसुविधा चंद्राच्या तुलनेने बर्याच मर्यादित होत्या. त्यामुळे सूर्यमालेतील, सर्व मानव वसाहतींना नियंत्रित करण्यासाठी चंद्र राजधानीचे ठिकाण बनले.
धूमकेतूची धडक अपेक्षेप्रमाणेच अत्यंत विनाशकारी ठरली. ज्वालामुखींचे अतिप्रचंड उद्रेक, भूकंपाचे थैमान यांनी पृथ्वी पार करपून गेली. पाठोपाठ येणार्या सुनामींमुळे काही काळासाठी संपूर्ण भूभाग जलमय झाला. पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढून, पृथ्वीचा दिवस तेवीस तासांवर आला. पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह, अंतराळस्थानके आणि दुर्बिणी एकामागोमाग पृथ्वीवर कोसळल्या आणि नष्ट झाल्या. जीवसृष्टीची अपरिमित हानी झाली. काही महिन्यांनी पाणी ओसरले पण अजूनही पृथ्वीवरचे वातावरणातील विषारी वायूंचे प्रमाण वाढले होते. वातावरणात प्रचंड धुळ होती. पृथ्वीवर पोहोचणारा सूर्यप्रकाश काहीसा अंधुक झाला होता. पाणी आणि जमीन याची रचना, विभागणी बदलली होती. कालांतराने पृथ्वीवरील किरणोत्सर्गाचे प्रमाण देखील हळूहळू वाढत गेले. पृथ्वीशी इतर वसाहतींचा संपर्क राहावा यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, त्या कुठल्याही प्रकारे उपयोगी ठरू शकल्या नाहीत
त्यानंतर काही दशकांच्या अंतराने, चंद्रावरून पृथ्वीवर मानवविरहित याने पाठविण्यास सुरुवात झाली, पण प्रत्येकवेळी, पृथ्वी मानवाला राहण्यायोग्य राहिली नसल्याची माहितीच, त्यांच्याकडुन मिळत राहिली. पृथ्वीच्या अंतर्भागात वसविण्यात आलेल्या शहरांविषयी तर कोणतीही माहिती मिळत नव्हती. कालांतराने निरीक्षकांची एक टीम चंद्रावरून पृथ्वीवर पाठविण्यात आली. पण ती टीम परत आली नाही. त्यामुळे पृथ्वीवर पुन्हा जाण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली. मर्यादित साधनसामुग्रीमुळे, मग पृथ्वीवर परत जाण्याचे प्रयत्न खंडीत करण्यात आले. त्याऐवजी इतर ग्रहांवरील मानवी वसाहती अधिक सक्षम करण्याचा, नवीन वसाहती उभारण्याचा पर्याय निवडण्यात आला. पृथ्वीशी पुन्हा संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न, अधूनमधून होत राहिले पण एकाही प्रयत्नाला यश लाभले नाही.
तब्बल अठ्ठावीसशे पृथ्वी मानवासाठी अप्राप्य राहिली. दरम्यान विविध ग्रहांवर वसवण्यात आलेल्या मानवी वसाहती बहरल्या, अधिक सक्षम झाल्या. त्यानंतर पृथ्वीसाठी एक मानवी अभियान पुन्हा राबविण्यात आले, त्या टीम मधले केवळ दोघेच परत आले. त्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. पृथ्वीच्या अंतर्भागात वसविलेल्या वसाहती अजूनही अस्तित्वात होत्या, पण त्यांचे रूप पूर्णपणे बदलले होते. तिथे राहणार्या मानवांमध्ये शारीरिक, मानसिक स्तरावर मोठा बदल घडून आला होता. आता त्यांना मानव म्हणावे अशी त्यांची स्थितीच नव्हती. आणि एका अर्थाने आता पृथ्वीवर त्यांचेच राज्य होते. पृथ्वीवर पुन्हा येऊ पाहणारा मानव त्यांच्यासाठी शत्रू होता. लौकिक अर्थाने पृथ्वी वसाहतीयोग्य राहिली नव्हती.
तिथे निर्माण झालेल्या या नवीन प्रजातीपासून, सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून, किरणोत्सर्गापासून सुरक्षित राहील, अशा प्रकारे पृथ्वीवर पुन्हा वस्ती करायची, तर एका सुरक्षितअशा पायाभूत संरचनेची निर्मिती करणे आवश्यक होते. या संरचनेचा आराखडा ज्यांनी तयार केला त्यांनी मानवी इतिहासातील काही उल्लेखांचा आधार घेत, या प्रकल्पाला 'मानव अभयारण्य' असे म्हटले होते आणि मग तेच नाव पुढे रूढ झाले.
वेगवेगळ्या मानवी वसाहतींमध्ये, मात्र संपर्क टिकून होता, तरीही त्यांच्या शारीरिक रचनेत, मानसिक स्थितीत, विचारसरणीत काही भेद निर्माण होऊ लागले होते. या भेदांचे पर्यवसान भिन्न प्रजातींमध्ये होऊ नये, म्हणून एक समन्वय समिती बनविण्यात आली होती. ही समन्वय समिती कोणत्याही मानवास एकाच ग्रहावर दीर्घकाळ राहू देत नसे. कालांतराने या समितीच्या हाती विविध अधिकार एकवटत गेले. हळूहळू ती समन्वय समिती, अधिकाधिक शक्तिशाली होत गेली आणि सर्व मानवी वसाहतींवर नियंत्रण ठेवणारे एक न्यायमंडळ अस्तित्वात आले. '
--
मॉनिटरवर तीव्र बीपबीप आवाज आला आणि स्वस्तिक इतिहासातून वर्तमानात आला. त्याने डोळे उघडले तेंव्हा, स्पेसपॅडवर लॅंडींग दहा मिनिटांपूर्वी यशस्वी झाल्याची सूचना मॉनिटरवर झळकत होती. त्याचा हात लागताच, कॅप्सुलचे दार आपोआप उघडले आणि स्वस्तिक बाहेर आला. सोमजा त्याच्या कॅप्सुलजवळ उभी होती.
तिने त्याच्याकडे बघून किंचित स्मित केले. "तुमच्यासाठी थांबले होते. ट्रेनिंगसाठी जाणारे आपण दोघेच आहोत. बाकीचे लॅंडींग झाल्यावर लगेच पुढे गेले."
स्वस्तिकने मनगटावरच्या प्रवासीमित्राकडे नजर टाकली. त्यावर पृथ्वीवर नेणार्या लिफ्टची दिशा दाखवली होती. सोमजानेदेखील तसेच केले. काहीही न बोलता, दोघेही दाखविलेल्या मार्गाने चालू लागले.
लिफ्टमध्ये बरेच लोक होते, पण दोन जागा रिकाम्या होत्या. ते त्या रिकाम्या आसनावर बसताच, जणू त्यांच्यासाठी थांबल्याप्रमाणे, लिफ्टचे दार बंद झाले आणि अत्यंत वेगाने लिफ्ट खाली जाऊ लागली. स्वस्तिकला एक विलक्षण दडपण जाणवले. त्याने सोमजाकडे पाहिले, ती शांतपणे बाहेर बघत उभी होती. त्यानेही लिफ्टच्या काचेतून बाहेर पाहिले, सर्व दिशांना खालीवर करणार्या असंख्य लिफ्ट दिसत होत्या. ते दृश्य पाहून त्याला पुन्हा तीच भीती जाणवली, गर्दीची.
अचानक त्यांच्या लिफ्टने दिशा बदलली आणि एखाद्या हायपरबोलाप्रमाणे ती लिफ्ट वेगाने घसरत जाऊ लागली. आजूबाजूचा परिसर अतिशय रुक्ष होता, भाजून निघाल्यासारखा. त्याने पृथ्वी प्रतिरूप कोशात पाहिलेल्या, अनुभवलेल्या परिसरापेक्षाही अधिक भीषण. जागोजागी मोठमोठी विवरे होती. जीवसृष्टीची एकही खूण कुठेही दिसत नव्हती. इतक्यात त्याला समोरच्या बाजूस दूरवर एका पारदर्शक घुमट दिसला.
'हेच पृथ्वीवरचे मानव अभयारण्य' त्याच्या मनाने साक्ष दिली.
जसजसा तो घुमट जवळ येऊ लागला, तसतशी त्याची रचना किती गुंतागुंतीची आहे आणि त्याचा आकार किती अवाढव्य आहे याचा अंदाज स्वस्तिकला येऊ लागला. यासंदर्भात युरोपावर, त्याला विस्तृत माहिती मिळाली नव्हती. अनेक हायपरबोलाच्या आकाराचे मार्ग त्या घुमटात सर्व बाजूंनी प्रवेश करत होते. त्या घुमटाच्या मध्यातून एक तळाशी रुंद असणारा, चकाकता मनोरा, निमुळता होत, आकाशात उंचच उंच गेला होता. आकाशाकडे गेलेले टोक नीटसे दिसतही नव्हते.
थोड्याच वेळात त्यांची लिफ्ट त्या घुमटाच्या आत शिरली आणि हलकासा गचका देत थांबली.
"पृथ्वीवर आपले स्वागत आहे. यात्रेकरूंनी अवकाशवेश काढून आसनावरच्या कपाटात ठेवावेत.' अशी उद्घोषणा झाल्यावर, नकोसे झाल्याप्रमाणे, त्या लिफ्टमधील सर्वांनी, आपापले अवकाशवेश काढून, त्या सूचनेचे पालन केले.
--
आजूबाजूला पसरलेल्या कमी अधिक उंचीच्या इमारती, त्यांना प्रत्येक मजल्यावर जोडणारे रस्ते, सर्वत्र वावरणारे यंत्रमानव, आपापल्या कामात गुंतलेले. एका इमारतीतून दुसरीकडे जाताना दिसणारी छोटी वाहने. लिफ्टमधून बाहेर येताना स्वस्तिकला दिसलेले दृश्य त्याच्यासाठी अनपेक्षित होते.
'हे काही यंत्रविरहित वातावरण नव्हे. यंत्रांचा आणि यंत्रमानवांचा इतका वापर तर युरोपावर पण होत नाही.' लिफ्टमधून बाहेर आल्यावर स्वस्तिकच्या मनातला पहिला विचार होता. लिफ्टमधले बाकीचे लोक वेगवेगळ्या दिशांना पांगले. इतक्यात सोमजा त्याच्या बाजूला येऊन थांबली आणि तिला पाहताच आधीपासूनच, समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने हात उंचावून तिला इशारा केला.
"चला, आपल्याला यांच्यासोबतच जायचे आहे." जवळ येऊन थांबलेल्या एका प्रौढ माणसाकडे पाहून सोमजा स्वस्तिकला म्हणाली. स्वस्तिकने त्या माणसाला न्याहाळले, पृथ्वीवर पोहोचल्यावर कुणाला भेटायचे आहे याच्या सूचना, त्याला युरोपावरुन निघण्यापूर्वीच मिळाल्या होत्या आणि या माणसाचा चेहेरा त्याच्याकडच्या चित्राशी मिळता जुळता होता. त्याच्या मनगटावरील प्रवासीमित्र देखील, हा तोच माणूस असल्याची साक्ष देत होता.
तो माणूस जवळ येऊन उभा राहिला आणि स्वस्तिककडे पाहून त्याने औपचारिक स्मित केले. 'मी महेश्वर. तुमचा इथला मार्गदर्शक.' तो अतिशय मृदु आवाजात म्हणाला. तो कदाचित सोमजाच्या ओळखीचा असावा, तिचे त्याच्याबरोबरचे वागणे अधिक सहज होते.
"उद्यापासून तुमचे प्रशिक्षण सुरू होईल. तुमची आजची राहण्याची व्यवस्था इथेच केली आहे" असे म्हणत त्याने थोड्या दूरवर दिसणार्या एका बैठ्या घराकडे बोट दाखवले आणि त्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. स्वस्तिक आणि सोमजा त्याच्या मागोमाग चालू लागले.
त्या घरात प्रवेश केल्यावर, स्वस्तिक थबकला. बाहेरच्या यांत्रिक वातावरणाशी अत्यंत विसंगत अशी आतली रचना होती. चहुबाजूंना पसरलेले, एका व्यक्तीला निजता येईल इतपत छोटे छोटे कक्ष आणि मध्ये एक मोठा हॉल. त्यातील काही कक्षांची दारे बंद होती, काहींची उघडी. मधोमध असलेल्या त्या हॉलमध्ये, साधारण एकाच वयोगटातील स्त्री पुरुष छोटे छोटे गट बनवून जमिनीवरच बसलेले होते. कदाचित त्यांची एकमेकांशी आधीच ओळख झाली असावी. त्या सर्वांचे लक्ष वेधले जाईल इतक्या मोठ्या आवाजात, महेश्वरने, स्वस्तिक आणि सोमजाची ओळख करून दिली. सगळे उठून त्यांच्याभोवती जमा झाले.
'इतक्या सर्व अनोळखी लोकांबरोबर पुढचा अख्खा महिना काढायचा आहे' स्वस्तिकच्या मनात आले. 'आपले प्रशिक्षण, खरंतर खडतर परीक्षेचा काळ आत्ताच सुरू झाला आहे.' असे त्याला वाटले.
======
क्रमश:
======
======
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा