रविवार, २१ जानेवारी, २०१८

फितूर -- भाग ३ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)

---- मागील भागावरून पुढे ----

====
दुसर्‍या दिवशी विसु ठीक अकरा वाजता देशमुखांच्या केबिनमध्ये पोहोचला. 
"विशालचा निरोप आला आहे. तो रहदारीमध्ये अडकला आहे." देशमुख थोडे अस्वस्थ झाले आहेत असे विसुला वाटले.
"हरकत नाही, तोपर्यंत मला तुझी सीसीटीव्ही प्रणाली (सिस्टिम) दाखवतोस ?" -- विसु
"चल दाखवितो तुला."  असे म्हणत देशमुखांनी ऑफिसमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे दाखवायला सुरुवात केली.

पूर्ण ऑफिस फिरून ते पुन्हा देशमुखांच्या केबिनशी आले. विशाल केबिन मध्ये त्यांची वाट पाहत बसला होता.
"म्हणजे एकंदर बावीस कॅमेरे आहेत तर. " केबिनमध्ये शिरताना विसुने विचारले.
"बावीस नाही, एकतीस. " नऊ कॅमेरे लपविलेले आहेत. मी आणि सर सोडून कुणालाही माहीत नाहीत ते. नकाशा आहे सरांकडे"  विशाल हलक्या स्वरात बोलला.
"मला एक सांग, तुझ्या केबिनमध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही ?" विसुने देशमुखांना विचारले.
"नाही. सगळ्या कॉन्फिडेन्शियल मीटिंग्स इथेच होतात, त्यामुळे इथे एकही कॅमेरा बसवलेला नाही." विशालने परस्पर उत्तर दिले.
"छान. वाटलं होतं त्यापेक्षा चांगलं आहे हे." विसुच्या चेहेर्‍यावर हलके स्मित आले  "आणि इथले रेकॉर्डिंग कुठे होतं ?"
"इथे मागच्या बाजूसच आमचे ऑफिस आहे, तिथे डेडीकटेड सर्व्हर आहे आमचा त्यासाठी. तो वापरुन आम्ही सेवा पुरवतो.  इथून फायबर ऑप्टिक केबल टाकली आहे तिथपर्यंत." विशालने माहिती पुरवली.
"अरे वा. छान छान. आणि मग सरांना रेकॉर्डिंग बघायचे असेल तर ?"  विसुने प्रश्न विचारला
"त्यांच्या लॅपटॉपवर स्पेशल सॉफ्टवेअर इंस्टॉल केलं आहे त्यासाठी.  मोबाईलवर अॅप सुद्धा आहे शिवाय. " आपण काय बोलतो आहोत हे समोरच्याला समजते आहे, हे लक्षात आल्यामुळे विशालच्या आवाजात थोडा अधिक उत्साह आला होता.
"एक काम करशील ? सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवसांचे पूर्ण रेकॉर्डिंग देशील करून या एक्स्टर्नल हार्डडिस्कवर. आठ टेराबाईटची आहे. पुरेल ना ?" विसुने त्याच्या बॅगेतून एक पुडके काढत विशालला विचारले.
"ओ होऽ, भारी. आठ टेराबाईट !  नक्की पुरेल. पण कदाचित वेळ लागेल दोन-तीन तास." असे म्हणत विशालने देशमुखांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"मला विचारण्याची आवश्यकता नाही. त्यांना जी हवी ती मदत द्यायची" देशमुखांनी विशालला बजावले.

विशालच्या ताब्यात त्यांचा लॅपटॉप देऊन देशमुख आणि विसु केबिनच्या एका बाजूला खिडकीपाशी आले. विसुने काहीशा अविश्वासाने, विशालकडे इशारा करत देशमुखांकडे पाहून भुवया उडविल्या.
"अरे नाही. माझ्या कॉलेजमधल्या एका मित्राचा मुलगा आहे. त्या कंपनीत मीच चिकटविला त्याला, त्यांना सीसीटीव्हीचे कंत्राट दिले तेंव्हा." विसूच्या संशयाला उत्तर देत देशमुख हलकेच पुटपुटले.
"तुझा लॅपटॉप त्याच्या हातात देतोस, तेंव्हा तू असतोस आजूबाजूला की ...."  -- विसु
"बर्‍याचदा मी असतोच. पण मी नसलो तरी नंदिनी असते. तशी काळजी घेतो मी."
"हंऽऽ. "

"सर, डाऊनलोड करायला लावले आहे. वेगळा फोल्डर बनवला आहे.  मी तीन तासांनी येऊ का ? म्हणजे मला दुसरे एक काम आहे, तेवढ्या वेळात ते होऊन जाईल."  -- विशाल
"ठीक आहे. तू जा. आणि परत येण्याची काही गरज पडेल असे वाटत नाही. त्यातूनही काही वाटले तर मी तुझ्या मोबाईलवर कॉल करेन." देशमुखांनी परवानगी दिली आणि विशाल तिथून निघून गेला.

"तुझ्या ऑफिसमध्ये वायफाय असेलच. त्याचा अॅक्सेस कुणाकुणाला आहे ? " विसुने विचारले.
"आयटी डिपार्टमेंटमधला विराज, मी, नंदिनी आणि धारप, त्यातही त्याचा पासवर्ड फक्त माझ्याकडे आणि विराजकडे असतो. विराज आयटीमध्ये सगळ्यात वरिष्ठ आहे आणि बर्‍याच वर्षापासून DEPL सोबत आहे. सर्वांच्या लॅपटॉप आणि मोबाईलवर वायफाय सेटअप करण्याचे काम तोच करतो."  -- देशमुख
"मी त्यांच्याशी बोलून येतो. " -  विसु

--

तब्बल दोन तासानंतर विसु परत आला, तेंव्हा देशमुख लॅपटॉपशी बसून कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी विसुला बसण्याची खूण केली आणि बोलणे आटोपते घेतले.
"हेमांगीशी बोलत होतो. तुला माहीतच आहे ती अमेरिकेत असते. "  विसुने विचारले नसतानाही देशमुखांनी स्पष्टीकरण दिले.
"स्काइप का ?"
"नाही दुसरेच सॉफ्टवेअर आहे 'टॉक एनीव्हेअर - एनीटाईम' नावाचे. पूर्णपणे मोफत.   -- देशमुख
"तो लॅपटॉप जरा शटडाऊन करशील ?"
"का रे ?"
"कर तर"
देशमुखांनी निमूटपणे लॅपटॉप शटडाऊन केला.  "हं बोल आता"



"मी याविषयी देखील बोललो तुझ्या आयटी टीमशी आत्ता. मोफत मिळणारी बरीचशी सॉफ्टवेअर जाहिरातींवर चालतात, काही सॉफ्टवेअर तुमची वैयक्तिक माहिती चोरतात, काही तुमच्या हार्डड्राईव्हची जागा, क्वचित सीपीयूचा वेळ देखील वापरतात, त्यांच्या इतर कामासाठी. तुला कदाचित माहीत नसेल, पण यांच्या इंस्टॉलेशनच्या वेळी ज्या 'अटी आणि शर्ती' दाखवतात त्यांच्यावर तुमच्याकडून शिक्कामोर्तब करून घेतात ना, तिथे बर्‍याच खाचाखोचा, लबाड्या असतात. त्या तर आपण कधीच वाचत नाही. 'अॅक्सेप्ट' वर क्लिक करून मोकळे होतो. काही सॉफ्टवेअर सुरूवातीला एकदम सोज्वळ असतात, आणि नंतरच्या अपडेट्समध्ये त्यांचे खरे रंग दाखवतात. शक्यतो वापरूच नयेत अशी फुकट सॉफ्टवेअर.
"बापरे !"
"आता याच सॉफ्टवेअरचे बघ. तू याचा वापर करून ऑडिओ-व्हिडिओ कॉल केलास, म्हणजेच तू या सॉफ्टवेअरला तुझ्या वेबकॅमचा, मायक्रोफोनचा, इंटरनेटचा वापर करण्याचा अधिकार दिला आहेस.  कदाचित तुझा लॅपटॉप चालू होतानाच त्याच्या 'सिस्टीम ट्रे' मध्ये, म्हणजे तळात उजवीकडे, त्या सॉफ्टवेअरचा एक भाग, ज्याला सर्वसाधारणत:  मेमरी रेसिडेंट असे म्हणतात, तो लोड होत असेल. आता स्टार्टअपलाच लोड झालेला, या सॉफ्टवेअरचा हा भाग, तुझ्या नकळत तुझ्या वेबकॅमचा,मायक्रोफोनचा, इंटरनेटचा वापर करत असेल तर ? "   -- विसु
देशमुख हतबुद्ध होऊन ऐकत होते.

"विचार कर, कदाचित तुझ्या नकळत तू जे बोलतो आहेस, तू ज्या प्रतिक्रिया देतो आहेस त्याचा ऑडिओ-व्हिडिओ डेटा, तुझ्या हार्डड्राइवमधील एखादी फाईल तुझ्या नकळत कुठे पाठवली जात असेल तर ?"

"म्हणजे तू असे सुचवितो आहेस का की हा लॅपटॉपच फितूर आहे ?" देशमुखांचा चेहेरा पार पडला होता.
"शक्यता नाकारता येत नाही"  विसु शांतपणे म्हणाला. "मी विराजशी याविषयी विस्तृतपणे बोललो. त्याला तसे बर्‍यापैकी ज्ञान आहे याविषयी. पण तो म्हणाला की तुझ्या लॅपटॉपवर त्यांनी कुठलेही सॉफ्टवेअर इंस्टॉल केलेले नाही. ते फारसा हात नाही लावत तुझ्या लॅपटॉपला. "
"हो. हा लॅपटॉप मी एका मोठ्या दुकानातून विकत घेतला होता. त्यांचा एक सपोर्ट इंजिनीअर आला होता घरी, त्याने सुचविले होते हे सॉफ्टवेअर. मी हो म्हटले, म्हणून त्यानेच इंस्टॉल करून दिले."   -- देशमुख
"मी विराजशी बोललो आहे. कित्येक अॅंटीव्हायरस सॉफ्टवेअर, याबाबतीत मोलाची मदत देतात, ऑपरेटिंग सिस्टिममध्ये देखील बर्‍याच सोयी असतात. पण आपण त्यांच्या सुविधा वापरतच नाही. पर्सनल फायरवॉल आणि इतर काही सॉफ्टवेअरसुद्धा उपयुक्त असतात. आधीच इंस्टॉल असलेल्या सॉफ्टवेअरमधील  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या त्रुटी सुद्धा तपासू शकतात. इतरही बर्‍याच गोष्टी आहेत. आपण या विषयी बोलत बसलो, तुला प्रत्यक्ष दाखवत बसलो तर एक दिवस सुद्धा पुरायचा नाही."

"मग आता काय करू म्हणतोस ?" खोल आवाजात देशमुख म्हणाले.
"तुला दोन तीन गोष्टी सुचवतो.  शक्य असल्यास तुझ्या घरगुती गोष्टींसाठी वेगळा लॅपटॉप वापर. ते शक्य नसेल तर किमान दोन वेगळे यूजर अकाऊंट, लॉगिन तरी वापर आणि यातले एकही यूजर अकाऊंट, लॅपटॉपचे अॅडमिन नसेल तर बरे. अॅडमिन साठी वेगळे यूजर अकाऊंट ठेव. अगदी आवश्यक असेल तेंव्हाच त्याचा वापर करायचा.  दुसरे म्हणजे सोमवारी विराजच्या ताब्यात तुझा लॅपटॉप दे. त्याला पूर्णपणे तपासू दे तो. तो सगळी सॉफ्टवेअर, अॅप्स, त्याना दिलेल्या, परस्पर घेतलेल्या परवानग्या वगैरे सर्व तपासेल, आवश्यक तिथे बदल करेल.  त्याच्यावर विश्वास ठेवता येईल, पण त्यातून तुला वाटत असल्यास, अन्य एखाद्या तज्ज्ञाकडून तपासून घेतलास तरी चालेल. मात्र ते काम करत असतील, तेंव्हा तू बाजूला हजार रहा. त्यांच्यावर पूर्णपणे विसंबू नकोस."
"होय रे बाबा. तू म्हणशील तसं" -- देशमुख
"तो सीसीटीव्हीचा डेटा डाऊनलोड झाला असेल तर ती हार्डडिस्क दे. घरी जाऊन निवांतपणे बघेन. आणि त्या विशालचा मोबाईल क्रमांक देऊन ठेव. एखादवेळेस गरज लागली तर."
"SMS करतो तो नंबर.मला माहीत आहे, तुझे आभार मानलेले तुला आवडणार नाहीत. तरी पण खूप खूप धन्यवाद. ही तुझी हार्डडिस्क" देशमुख भारावल्या सुरात म्हणाले.
"आता पुढच्या आठवड्यात तुझ्या सगळ्या स्टाफच्या आणि इतर काही जणांच्या 'कुंडल्या' तपासणार आहे. इतरही काही गोष्टी तपासायच्या आहेत. पुढच्या शनिवारी तुझ्याशी बोलतो."  देशमुखांच्या हातातून हार्डडिस्क घेऊन स्वत:च्या बॅगेत भरता भरता विसु म्हणाला. "येऊ आता ?"
"होय गुरुजी" - देशमुखांच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला होता. "बाकी तू कुठे शिकलास हे सर्व ?"
"शिकायला लागतं बाबा. तंत्रज्ञानात पारंगत असणं, अद्ययावत होत राहणं आवश्यक आहे माझ्या व्यवसायात"  विसु खुर्चीतून उठता उठता हसून म्हणाला.

======
क्रमश:
======

======

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा