शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

फितूर -- भाग १ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)
====

"सर, सुकाळेंचा फोन आहे, तुमचा मोबाईल रिचेबल नाही आहे, म्हणतायत" नंदिनीचा, त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला आणि देशमुखांच्या कपाळावरची एक आठी वाढली. त्यांनी मोबाईल चेक केला, मोबाईल तर चालू होता.

"त्यांना सांगा, मी त्यांना कॉल करतो."  असे म्हणत त्यांनी रिसिव्हर ठेवून दिला आणि दुसर्‍या हाताने सुकाळेंचा नंबर टॅप केला. नंबर एंगेज्ड होता. 
सुकाळे त्यांच्यासाठी अतिशय कामाचा माणूस . आपल्या पदाचा, पोझिशनचा पुरेपूर फायदा उठवत त्याने बक्कळ माया जमा केली होती. त्यात देशमुखांकडून दर महिन्याला जाणार्‍या पाकीटाचा देखील भाग होता.

त्यांना अचानक कुठल्यातरी चित्रपटातला संवाद आठवला  'हां साहब, हम गलत काम करते है, पर हमारे भी कुछ उसूल होते है'.  'कुठल्या चित्रपटातला बरं होता तो ?' त्यांना आठवेना. 'छे ! या बिझनेसने पार वाट लावली आपली' त्यांच्या मनात आले. त्यांना त्यांच्या कंपनीची, DEPL ची सुरुवातीची वर्षे आठवली. 'दर वीकएंडला सगळ्या चिंता, कामं बाजूला सारून, सगळं काही विसरून किमान एक पिक्चर पाहणे, कधीतरी नाटक पाहणं, आऊटिंगला जाणे आणि ताजेतवाने होऊन, सोमवारी पुन्हा स्वत:ला कामात बुडवून घेणे. काय दिवस होते ते. पण छाया गेली आणि आपण कामाचा व्याप वाढवला, महत्वाकांक्षा पोसली आणि कंपनीने कात टाकली. एका छोट्या रोपट्याचा बघता बघता वृक्ष झाला. पण आज हे पाहायला छाया नाही.' त्यांचे मन भरून आले. 'जशी कंपनी मोठी झाली तशी स्पर्धादेखील वाढली आणि तिच्याबरोबर टिकून राहायचे असेल तर, अटळ म्हणून काही नको त्या गोष्टीदेखील आपण स्वीकारल्या. सुकाळे त्यातलाच एक'

मोबाईल वाजला आणि देशमुखांचे विचारचक्र थांबले. सुकाळेचाच फोन होता.

"साहेब, बातमी चांगली नाही, कॉंट्रॅक्ट दुसर्‍याला जातंय."
"काय सुकाळे ? हे कॉंट्रॅक्ट माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते तुम्हाला माहीत नाही का ?"
"होय साहेब, मी व्यवस्थित सेटिंग लावली होती यावेळी, कुठे माशी शिंकली काय माहीत ?" सुकाळेच्या आवाजात संभ्रम होता.
"या महिन्यात दुसर्‍यांदा घडतंय सुकाळे. जरा मनावर घ्या, मग तुमच्या वर्ल्डटूरची जबाबदारी माझी." 
"काय साहेब, गेली दहा वर्षे तुमच्याशी इमान ठेवलाय. आणि तुम्ही...." सुकाळेचा आवाज किंचित चढला.
"तुमच्यावर संशय नाही घेत आहे मी" देशमुखांनी त्याला चुचकारले  "पण कॉंट्रॅक्ट कुणाला मिळणार आहे ?"
"यावेळी पण न्यू एराला.  थोड्या वेळात डिटेल्स हातात येतील माझ्या, विज्यासोबत रात्री तुमच्या घरी पाठवितो."
"ठीक आहे."  असं म्हणत देशमुखांनी फोन कट केला.

'हा काय प्रकार आहे छडा लावलाच पाहिजे.' त्यांच्या मनात आले.

न्यू एरा एकेकाळची त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी,पण काळासोबत ती बदलली नाही आणि मागे पडली. त्यात सुकाळेसारखा हुकूमाचा पत्ता, देशमुखांच्या हातात लागला आणि मग न्यू एराचे नाव आणि कर्तृत्व विस्मृतीत गेले. भलेमोठे कर्ज मागे ठेवून वर्षापूर्वी डाह्याभाई गेला आणि मग त्याच्या अमेरिकेतून परत आलेल्या मुलाच्या हातात न्यू एराची सूत्रे गेली. दोन महिन्यांपूर्वी कुणी त्यांना सांगितले असते, की येत्या काळात न्यू एरा तुम्हाला टक्कर देणार तर देशमुख खदखदून हसले असते. पण आता हसण्यासारखी वेळ राहिली नव्हती. त्यांच्या हातातून गेलेले, खरंतर न्यू एराने हिसकावून घेतलेले हे दुसरे कॉंट्रॅक्ट.

'काल आलेल्या या पोराने नक्की कुठे सेटिंग लावले आहे शोधून काढायलाच हवे.' त्यांच्या मनात पुन्हा विचार आला.
'हे असेच चालू राहिले तर, आपणही न्यू एराच्या वाटेने जाऊ' नुसत्या कल्पनेने देखील त्यांचे मन थरथरले.

----

सुकाळे शब्दाला जागला. देशमुख बंगल्यावर परतले आणि फ्रेश होत नाही आहेत तोच विज्या आल्याचे सखारामने त्यांना सांगितले.

"काय विज्या कसा आहेस ?" त्यांनी सगळी उत्सुकता लपवत त्याला विचारले.
"तुमची कृपा आहे साहेब. सुकाळेसाहेबांनी हे पाकीट दिलंय" विज्याचे दात फाकले आणि शब्द घरंगळले
देशमुखांनी ते पाकीट हातात घेतले आणि ड्रॉवरमधून काढून लगोलग दुसरी दोन पाकीटे विज्याच्या हातात कोंबली.
'हे तुझ्यासाठी आणि हे दुसरे सुकाळेसाहेबांना द्यायचे. काय ?" देशमुखांनी विज्याला बजावले.
विज्याचा चेहेरा उजळला. 'हो साहेब. थॅंक्यू साहेब.  येऊ का ?' विज्याच्या तोंडातुन लाचारी टपकली.
देशमुखांनी होकारार्थी मान हलवली.

सायकलवर टांग टाकून विज्या पसार झाला आणि अस्वस्थ मनाने त्यांनी पाकीट उघडले. आतल्या कागदांवर त्यांची सराईत नजर झटझट फिरली आणि त्यांच्या मनाच्या घालमेलीने टोक गाठले. तिरमिरीतच त्यांनी सुकाळेला फोन लावला.

"सुकाळे हे नक्की काय चाललाय ?"
"होय साहेब. मलाही तोच प्रश्न पडलाय. असं वाटतंय की जणू तुमच्या टेण्डरचे आकडे त्यांना आधीपासूनच माहीत होते."
"काय बोलताय ? तुमच्या व्यतिरिक्त कोण आहे तुमच्याकडे, जो हे करू शकेल ?"  त्यांनी सुकाळेला आणि स्वत:ला एकाच वेळी प्रश्न केला.
"नाही साहेब. तसं माझ्या शिवाय इथे कुणी असल्या भानगडीत पडणारे नाहीत. तुम्ही देखील ओळखता ना सगळ्यांना. तरीही मी चौकशी करतो. "  -- सुकाळे
"बरं, पाकीट मिळाले ना ? यावेळेस वाढवलेत."
"हो हो. विज्या काल तडक इकडेच आला. खुश होता त्याचे वेगळे दिलेत म्हणून. "
"हे घडले हे शेवटचे. येत्या महिन्यात हा प्रकार पुन्हा घडता कामा नये. आणखी काळजी घ्या"
"हो साहेब." सुकाळेने फोन कट केला. पण तो ही अस्वस्थ झाला होता. 'आपल्या इथे, आपल्यापेक्षा चतुर दुसरा कुणी असेल, तर आपलाही पत्ता कट होऊ शकतो.' त्याच्या मनात येऊ पाहात असलेला विचार त्याने निग्रहाने मागे सारला. 

--

दोन दिवसांनी दुपारी सुकाळेचा कॉल पाहिल्यावर देशमुखांनी घाईघाईने नंदिनीला बाहेर जायला सांगितले आणि फोन उचलला.
"साहेब, टेण्डर लीक झालंय असं नक्की नाही म्हणता येणार, आणि झालंच असेल तर आमच्याकडून नाही." सुकाळे काहीसा उत्तेजीत झाल्याचे देशमुखांना जाणवले.
"कशावरून ?"
"साहेब यावेळेस तुमचे टेण्डर दुपारी आले होते आणि  न्यू एराचे  त्याच दिवशी सकाळी. तुमच्या आधी."
"म्हणजे तुम्ही असं सुचवताय का की आमच्याच कंपनीतला कुणीतरी ...."
"शक्यता आहे साहेब." देशमुखांना अर्ध्यावर तोडत सुकाळे म्हणाला.

देशमुखांनी फोन कट केला आणि त्यांना 'त्रिशूल' आठवला. आपला 'आर के गुप्ता' झाला आहे असे एक क्षणभर त्यांना वाटले.   'छे. काहीतरीच. मी असले प्रकार कधी केलेले नाहीत.' 

तरी त्रिशूलचा विचार त्यांच्या डोक्यातून जाईना. त्यांना आठवले, दोन महिन्यांपूर्वी नंदिनीने नवीन फ्लॅट बूक करण्यासाठी कंपनीकडून कर्ज मिळेल का असे  विचारले होते . त्यांनी इंटरकॉमवरची बटणे काहीशी जोरात दाबली.
पलीकडून नंदिनीचा मंजूळ आवाज आला "यस सर ?"
"आत या"
"सर, ते मगाचचे लेटर पूर्ण केलंय मी ." त्यांच्यासमोर एका पत्राचा ड्राफ्ट सरकवत नंदिनी म्हणाली. 
त्यांनी पत्रावर नजर फिरवली. 'हिचं काम एकदम नेटकं.' देशमुखांच्या मनात आले. 'पत्राची भाषा देखील अगदी माझीच, जणू माझ्या मनात काय आहे हे हिला कळतं'  स्वत:च्याच विचाराने ते चपापले. 'छे काहीच्याबाही विचार करतो आहोत आपण'
"तुमच्या फ्लॅटचे काय झाले" स्वत:वर संयम ठेवत, त्यांनी अगदी सहज वाटावे अशा आवाजात विचारले.
"मी दोन बँकांमध्ये अर्ज केले होते, पण दोघांनीही एकच कारण देत अर्ज नाकारले. दोन महिन्यांनी या असं म्हणत आहेत.  या नोकरीत एक वर्ष पूर्ण झाल्यावर."
"हं. तुम्ही अकाऊंट्समध्ये धारपांना भेटा. मी बोलतो त्यांच्याशी. तुमचे काम होईल."
"थॅंक यू सर. थॅंक्स अ लॉट." नंदिनीचा चेहेरा आनंदाने फुलला.
"आणि हे लेटर फायनल करा आणि सहीसाठी पाठवा"

नंदिनी बाहेर गेली आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या स्टाफपैकी, प्रत्येकाच्या काय काय अडचणी आहेत ते आठवायला सुरुवात केली.  संध्याकाळपर्यंत, सरांचा मूड आज भलताच छान आहे, सरांना लॉटरी लागली की काय, इथपासून ते, आपले सर इतर मालकांसारखे नाहीत. ते भलतेच सहृदयी, जॉली इत्यादि इत्यादि आहेत, याच्या चर्चा अधूनमधून रंगल्या.

======
क्रमश:
======

======

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा