शनिवार, २० जानेवारी, २०१८

फितूर -- भाग २ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)

---- मागील भागावरून पुढे ----
====

दुसर्‍या दिवशी ऑफिसात आल्याआल्या देशमुखांनी विसुला फोन लावला. विसु म्हणजे विश्वनाथ सुधाकर सरपोतदार, त्यांचा शाळेपासूनचा मित्र. पुढे कॉलेजला गेल्यावर वाटा वेगळ्या झाल्या.  पण कुठल्याही अपेक्षेविना, ज्या काही मोजक्या, जुन्या मित्रांशी मैत्री टिकून होती, त्यांच्यापैकी तो एक होता. अतिशय बुद्धिमान. नंतर त्याने स्वत:ची डिटेक्टिव एजन्सी काढली तरीही त्यांना परस्परांची व्यावसायिक गरज कधीच भासली नव्हती. वर्षातून किमान दोनदा भेटणे आणि अधूनमधून केवळ आणि केवळ गप्पा मारण्यासाठी येणारा फोन, इतक्यावरच त्यांच्या मैत्रीचे झाड टिकले होते आणि बहरलेही होते.

"विसु, तू मला कधी भेटू शकतोस ?"
"काय रे काही विशेष ?" विसु त्याच्या नेहेमीच्याच जाड्याभरड्या आवाजात म्हणाला.
"हं. म्हटलं तर आहे. DEPLशी संबंधित आहे.  आज रात्री घरी येतोस ? नऊ-दहापर्यंत आलास तरी चालेल. "  देशमुखांनी अप्रत्यक्षपणे माझ्या ऑफिसमध्ये बोलण्यासारखा विषय नाही असे सुचविले.
"हंऽऽ.असं कर ना, तूच माझ्या ऑफिसला ये ना संध्याकाळी. त्यानिमित्ताने तुझे पाय माझ्या ऑफिसला लागतील. सविस्तर बोलू, मग 'घरगुती'ला जेवू , त्यांनी बफे डिनर देखील चालू केलंय. मी एकदा जाऊन आलोय. झकास आहे. " 
"Ok. Done" तिकडे विसुने फोन कट केला आणि देशमुखांनी मोबाईलमध्ये रिमाईंडर लावून टाकला.

----

संध्याकाळी ठीक सहा वाजता रिमाईंडरने त्याचे काम चोख बजावले. नंदिनीला सांगून ते निघाले आणि सोळाव्या मिनिटाला ते 'गुप्त' च्या दारात होते. दारात कुणीच नव्हते. त्यांनी बेल वाजविल्यावर  "आपका शुभनाम ?" अशी पृच्छा झाली. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. एक सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्या दिशेने वळत होता. पण त्यांनी नाव सांगायच्या आतच दार उघडले, विसु स्वत: दारात होता.

"स्टाफला बर्‍याचदा सहापर्यंत सोडतो मी, मग ही सिस्टिम, ऑफिसचा ताबा घेते." देशमुखांनी काही विचारायच्या आतच विसुने स्पष्टीकरण दिले.
"छान आहे. कुठून घेतलीस ?"
"मी स्वत:च तयार केली आहे. पेटंटसाठी अर्ज केला आहे.  आणि हे एकच यंत्र नाही, दुसरीदेखील आहेत. नवीन येणार्‍याला पूर्ण स्कॅन केल्याशिवाय आत येता येणार नाही याची सोय केली आहे मी." विसुच्या आवाजात सहजता आणि चेहेर्‍यावर अभिमान होता.
"पूर्ण स्कॅन म्हणजे ?"
"कळेल तुला हळूहळू" विसु पुटपुटला.

विसुच्या केबिनमध्ये स्थिरावताना, कुठून सुरुवात करावी आणि काय काय सांगावे याचे विचार ते मनात घोळवत होते.
"अगदी सविस्तर सांग. सुरुवातीपासून. आणि अगदी क्षुल्लक गोष्ट असेल तरीही काहीही लपवू नकोस" जणू त्यांचा चेहेरा वाचल्यासारखे, विसुने शांतपणे सांगितले.

नंतरचा अर्धा तास देशमुख एकटेच बोलत होते आणि कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता विसु शांतपणे सर्व ऐकत होता.

देशमुखांचे बोलणे संपले आणि विसुने पाण्याचा ग्लास पुढे केला. देशमुखांनी रिकामा ग्लास खाली ठेवला आणि विसुने पहिला प्रश्न विचारला.
"तुझा कुणाकुणावर संशय आहे ?"
"ते ठरविता येत नाही आहे. म्हटलं तर अनेकांना संधी होती आणि आहे, पण त्यातील एकावरही संशय घ्यावा अशी त्यांची वागणूक नाही."  देशमुखांच्या मनातील संभ्रम त्यांच्या देहबोलीत डोकावत होता.

"मी उद्या तुझ्या कंपनीत येतो. चालेल ? मला प्रत्येकाला भेटायचे आहे, तुझे पूर्ण ऑफिस पाहायचे आहे" -- विसु
"परवा येतोस ? म्हणजे मी तशी तयारी करून ठेवतो. सगळे मोकळे राहतील असे बघेन."
"नाही नाही, तसं नाही.  मी डिटेक्टिव्ह आहे हे त्यांना सांगायचे नाही. माझी ओळख तुझा मित्र म्हणूनच करून दे. असं सांग की मलादेखील  स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यामुळे मला या व्यवसायासंबंधी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत."
"तू म्हणशील तसं, अकरापर्यंत येशील ना ?"
"सकाळी दहा वाजता. आजचं डिनर माझ्यातर्फे, उद्या तुझा पाहुणचार. विसु हसून म्हणाला "चल निघू, नंतर 'घरगुती'चा लग्नाचा हॉल होतो"  आणि दोघे बाहेर पडले.
निघताना विसुने दार ओढून घेतले आणि स्पीकरच्या समोर उभा राहून 'सावधान' असे तीनदा म्हणाला.
"ही लॉकिंग सिस्टीम खास बनवून घेतली आहे. छोटा माईक दडवलाय तिथे. मागे एकदा चोरीचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर."  देशमुखांचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून विसुने स्पष्टीकरण दिले. "आता ऑफिस उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी फक्त माझा आवाज ओळखते ती"  "

'झकास घरगुती चव आणि आजच्या पिढीला आवडणारी बफे सिस्टीम याचा असा मेळ क्वचितच कुठे असेल.' बाहेर पडताना देशमुखांच्या मनात जेवण  रेंगाळत होते.

"उद्या दहा वाजता." असे म्हणत विसुने त्यांचा निरोप घेतला.
घरी निघण्यापूर्वी देशमुखांनी, नंदिनीला SMS करून, 'माझा एक मित्र उद्या सकाळी येणार आहे, त्यामुळे सकाळी नऊला ऑफिसमध्ये हजर रहा.' असे कळविले.

----

दुसर्‍या दिवशी ते ठीक नऊला ऑफिसला पोहोचले, नंदिनी, त्यांच्याकडचा जुना शिपाई नवरे आणि अकाऊंट्स मधले दोन क्लार्क साडेआठलाच ऑफिसला पोहोचल्याचे, त्यांना वॉचमनने सांगितले. त्यांना नंदिनीचे कौतुक वाटले.

ठरल्याप्रमाणे, विसु ठीक दहा वाजता ऑफिसला पोहोचला. त्यानंतर पाचसहा तासात तो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये फिरला असावा, त्याने प्रत्येकाशी यशस्वी संवाद साधला असावा याची पावती देशमुखांना दुपारी चहाच्यावेळी मिळाली. त्याच्याभोवती कोंडाळे जमले होते. धारपांसारखा मितभाषी मनुष्यदेखील, विसुशी हसतखेळत बोलत होता.

संध्याकाळी  देशमुखांच्या केबिनमध्ये विसु शिरला तेंव्हा बहुतेक स्टाफ निघाला होता. नंदिनीची आवराआवर सुरू होती. त्याला पाहून नंदिनीच्या चेहर्‍यावर सहजपणे स्मित उमटले आणि विसु त्याचे काम चोख करणार याची खात्री देशमुखांना पटली.
"तुम्ही निघालात तरी चालेल आता. नवरेंना सांगा थांबायला" देशमुख नंदिनीला म्हणाले आणि तिने पुन्हा एकदा हसून त्यांचा निरोप घेतला.
"बोल आता. "
"इथे चालेल ना ? " -- विसु
"आता मी बोलाविल्याशिवाय, कुणीही नाही येणार इथे" -- देशमुख
"तुझा स्टाफ झकास आहे. नशीबवान आहेस लेका." -- विसु
देशमुखांच्या चेहेर्‍यावर स्मित पसरले. दोन दिवसापूर्वीच्या अडचणी जाणून घेण्याच्या सेशनचे परिणाम अजून टिकून होते.
"काय वाटतंय तुला, यांच्यापैकी कुणी फितूर असेल का ? विशेषत: नंदिनी ?" देशमुखांनी मूळ विषयाला थेट हात घातला.
"शंभर टक्के नाही सांगू शकणार मी. पण माझ्या आजवरच्या अनुभवावरुन सांगतो, यांच्यापैकी कुणीही असण्याशी शक्यता फार कमी आहे."  -- विसु
"तू हे जे म्हणतो आहेस, ते केवळ आजच्या बोलण्यावरून असेल तर...." -- देशमुख

"नाही नाही, तसं नाही. माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मी अनेक कोर्स केले आहेत, विविध गोष्टींची माहिती मिळवली आहे, अभ्यास केला आहे. त्यातील एक कोर्स मनोव्यापारांशी निगडीत होता. माणसांची चटकन पारख करता येणे, माझ्या व्यवसायात खूप महत्त्वाचे. मानसिक जडणघडणीत मूळ स्वभाव, संस्कार, आवडीनिवडी, असुरक्षितता आणि त्यातून निपजणार्‍या विकृती, जबाबदारी समजण्याची, पाळण्याची वृत्ती अशा अनेक बाबी यांचा अभ्यास होतो. माझ्या सध्याच्या निदानाप्रमाणे, तुझ्या ऑफिस स्टाफपैकी, कुणीही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी  फितूर होतील, दगाबाजी करतील असे वाटत नाही. मूलत: त्यातील कुणीही या प्रवृत्तीचा नाही. म्हणून तर मी तुला तू नशीबवान आहेस असे म्हटले. आणि नंदिनीतर रत्न आहे. अतिशय बुद्धिमान आहे ती, पण तरीही अहंकारी नाही. सगळ्या स्टाफचे तिच्याविषयी चांगले मत आहे.  तिच्याशी मी सर्वात जास्त वेळ बोललो. ती अगदी टोकाच्या अडचणीत असेल, तरीही असे काही करेल असे वाटत नाही. "

"मग आता टेण्डरची ही घटना केवळ योगायोग मानायचा का ?" ---  देशमुख
"नाही नाही तसं नाही.  स्टाफमधला कुणी दोषी नसेलच असे मी म्हटलेले नाही. पण आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कुणीही हे करणार नाही, इतकंच म्हटले आहे. त्याच्यापैकी कुणाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते, ही शक्यता आहे. त्यांच्याकडून ही गोष्ट नकळतपणे देखील कुणी करून घेऊ शकतो. तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे आता. तू माझ्या ऑफिसमध्ये त्याची चुणूक पाहिली आहेस. तू माझ्या ऑफिसमध्ये पहिला अर्धा तास जे काही बोललास, ते सारे मी रेकॉर्ड केले आहे, तसे नेहेमीच करतो. कारण केसचा विचार करताना त्याचा मला उपयोग होतो. माझ्या ऑफिसमध्ये तू खुर्चीवर बसल्यापासून, तो रेकॉर्डर ऑटोमॅटिकली सुरू झाला;  ते तू उठेपर्यंत तो सुरू होता"   -- विसु

"बापरे,  पण हे कायद्याने चालतं ? म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे पण इतरांच्या बाबतीत ?" -- देशमुख
"एकतर मी माझ्या ऑफिसमध्ये ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची रीतसर परवानगी घेतली आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मी माझ्या व्यावसायिक नीतीमूल्यांशी प्रामाणिक आहे, त्या रेकॉर्डिंगचा माझ्याकडून दुरुपयोग होणे नाही. आणि ही बाब मी तुला सांगितली, पण ही काही प्रत्येकाला सांगण्याची गोष्ट नव्हे."  -- विसु

"मग आता काय करायचं ?"  तंत्रज्ञानाचा वापर म्हटल्यावर देशमुखांच्या डोक्यात मोहोळ उठलं होतं.  त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आयटी डिपार्टमेंटमधले चारही चेहरे तरळून गेले.
"तुझ्या आयटी डिपार्टमेंटमधल्या प्रत्येकाशी मी  बोललो आहे. तसे बिलंदर वाटत नाहीत ते."  देशमुखांचे मन वाचल्यासारखा विसु बोलला.  "पण तरीही पुन्हा एकदा काही गोष्टी बघायला हव्या. आपण असे करूया, उद्या मी पुन्हा येतो इथे, मला काही गोष्टी तपासून बघायच्या आहेत. इथल्या सीसीटीव्हीची व्यवस्था तू बाहेरच्या एजन्सीला दिली आहेस असं कळलं. त्यांचा इथे येणारा सपोर्ट इंजिनीयर विशाल धुरंधर, त्यालाही भेटायला हवे. 

"पण उद्या शनिवार आहे ना, त्याचा ऑफ असतो. पण ठीक आहे, मी बोलावून घेतो त्याला उद्या सकाळी. अकरापर्यंत येईल तो इथे."  --- देशमुख
"ठीक आहे, मग मी देखील अकरा वाजेपर्यंत पोहोचतो." असं म्हणून विसु निघाला.

======
क्रमश:
======

======

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा