शनिवार, २० जानेवारी, २०१८

फितूर -- भाग २ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)

---- मागील भागावरून पुढे ----
====

दुसर्‍या दिवशी ऑफिसात आल्याआल्या देशमुखांनी विसुला फोन लावला. विसु म्हणजे विश्वनाथ सुधाकर सरपोतदार, त्यांचा शाळेपासूनचा मित्र. पुढे कॉलेजला गेल्यावर वाटा वेगळ्या झाल्या.  पण कुठल्याही अपेक्षेविना, ज्या काही मोजक्या, जुन्या मित्रांशी मैत्री टिकून होती, त्यांच्यापैकी तो एक होता. अतिशय बुद्धिमान. नंतर त्याने स्वत:ची डिटेक्टिव एजन्सी काढली तरीही त्यांना परस्परांची व्यावसायिक गरज कधीच भासली नव्हती. वर्षातून किमान दोनदा भेटणे आणि अधूनमधून केवळ आणि केवळ गप्पा मारण्यासाठी येणारा फोन, इतक्यावरच त्यांच्या मैत्रीचे झाड टिकले होते आणि बहरलेही होते.

"विसु, तू मला कधी भेटू शकतोस ?"
"काय रे काही विशेष ?" विसु त्याच्या नेहेमीच्याच जाड्याभरड्या आवाजात म्हणाला.
"हं. म्हटलं तर आहे. DEPLशी संबंधित आहे.  आज रात्री घरी येतोस ? नऊ-दहापर्यंत आलास तरी चालेल. "  देशमुखांनी अप्रत्यक्षपणे माझ्या ऑफिसमध्ये बोलण्यासारखा विषय नाही असे सुचविले.
"हंऽऽ.असं कर ना, तूच माझ्या ऑफिसला ये ना संध्याकाळी. त्यानिमित्ताने तुझे पाय माझ्या ऑफिसला लागतील. सविस्तर बोलू, मग 'घरगुती'ला जेवू , त्यांनी बफे डिनर देखील चालू केलंय. मी एकदा जाऊन आलोय. झकास आहे. " 
"Ok. Done" तिकडे विसुने फोन कट केला आणि देशमुखांनी मोबाईलमध्ये रिमाईंडर लावून टाकला.

----

संध्याकाळी ठीक सहा वाजता रिमाईंडरने त्याचे काम चोख बजावले. नंदिनीला सांगून ते निघाले आणि सोळाव्या मिनिटाला ते 'गुप्त' च्या दारात होते. दारात कुणीच नव्हते. त्यांनी बेल वाजविल्यावर  "आपका शुभनाम ?" अशी पृच्छा झाली. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. एक सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्या दिशेने वळत होता. पण त्यांनी नाव सांगायच्या आतच दार उघडले, विसु स्वत: दारात होता.

"स्टाफला बर्‍याचदा सहापर्यंत सोडतो मी, मग ही सिस्टिम, ऑफिसचा ताबा घेते." देशमुखांनी काही विचारायच्या आतच विसुने स्पष्टीकरण दिले.
"छान आहे. कुठून घेतलीस ?"
"मी स्वत:च तयार केली आहे. पेटंटसाठी अर्ज केला आहे.  आणि हे एकच यंत्र नाही, दुसरीदेखील आहेत. नवीन येणार्‍याला पूर्ण स्कॅन केल्याशिवाय आत येता येणार नाही याची सोय केली आहे मी." विसुच्या आवाजात सहजता आणि चेहेर्‍यावर अभिमान होता.
"पूर्ण स्कॅन म्हणजे ?"
"कळेल तुला हळूहळू" विसु पुटपुटला.

विसुच्या केबिनमध्ये स्थिरावताना, कुठून सुरुवात करावी आणि काय काय सांगावे याचे विचार ते मनात घोळवत होते.
"अगदी सविस्तर सांग. सुरुवातीपासून. आणि अगदी क्षुल्लक गोष्ट असेल तरीही काहीही लपवू नकोस" जणू त्यांचा चेहेरा वाचल्यासारखे, विसुने शांतपणे सांगितले.

नंतरचा अर्धा तास देशमुख एकटेच बोलत होते आणि कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता विसु शांतपणे सर्व ऐकत होता.

देशमुखांचे बोलणे संपले आणि विसुने पाण्याचा ग्लास पुढे केला. देशमुखांनी रिकामा ग्लास खाली ठेवला आणि विसुने पहिला प्रश्न विचारला.
"तुझा कुणाकुणावर संशय आहे ?"
"ते ठरविता येत नाही आहे. म्हटलं तर अनेकांना संधी होती आणि आहे, पण त्यातील एकावरही संशय घ्यावा अशी त्यांची वागणूक नाही."  देशमुखांच्या मनातील संभ्रम त्यांच्या देहबोलीत डोकावत होता.

"मी उद्या तुझ्या कंपनीत येतो. चालेल ? मला प्रत्येकाला भेटायचे आहे, तुझे पूर्ण ऑफिस पाहायचे आहे" -- विसु
"परवा येतोस ? म्हणजे मी तशी तयारी करून ठेवतो. सगळे मोकळे राहतील असे बघेन."
"नाही नाही, तसं नाही.  मी डिटेक्टिव्ह आहे हे त्यांना सांगायचे नाही. माझी ओळख तुझा मित्र म्हणूनच करून दे. असं सांग की मलादेखील  स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यामुळे मला या व्यवसायासंबंधी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत."
"तू म्हणशील तसं, अकरापर्यंत येशील ना ?"
"सकाळी दहा वाजता. आजचं डिनर माझ्यातर्फे, उद्या तुझा पाहुणचार. विसु हसून म्हणाला "चल निघू, नंतर 'घरगुती'चा लग्नाचा हॉल होतो"  आणि दोघे बाहेर पडले.
निघताना विसुने दार ओढून घेतले आणि स्पीकरच्या समोर उभा राहून 'सावधान' असे तीनदा म्हणाला.
"ही लॉकिंग सिस्टीम खास बनवून घेतली आहे. छोटा माईक दडवलाय तिथे. मागे एकदा चोरीचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर."  देशमुखांचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून विसुने स्पष्टीकरण दिले. "आता ऑफिस उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी फक्त माझा आवाज ओळखते ती"  "

'झकास घरगुती चव आणि आजच्या पिढीला आवडणारी बफे सिस्टीम याचा असा मेळ क्वचितच कुठे असेल.' बाहेर पडताना देशमुखांच्या मनात जेवण  रेंगाळत होते.

"उद्या दहा वाजता." असे म्हणत विसुने त्यांचा निरोप घेतला.
घरी निघण्यापूर्वी देशमुखांनी, नंदिनीला SMS करून, 'माझा एक मित्र उद्या सकाळी येणार आहे, त्यामुळे सकाळी नऊला ऑफिसमध्ये हजर रहा.' असे कळविले.

----

दुसर्‍या दिवशी ते ठीक नऊला ऑफिसला पोहोचले, नंदिनी, त्यांच्याकडचा जुना शिपाई नवरे आणि अकाऊंट्स मधले दोन क्लार्क साडेआठलाच ऑफिसला पोहोचल्याचे, त्यांना वॉचमनने सांगितले. त्यांना नंदिनीचे कौतुक वाटले.

ठरल्याप्रमाणे, विसु ठीक दहा वाजता ऑफिसला पोहोचला. त्यानंतर पाचसहा तासात तो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये फिरला असावा, त्याने प्रत्येकाशी यशस्वी संवाद साधला असावा याची पावती देशमुखांना दुपारी चहाच्यावेळी मिळाली. त्याच्याभोवती कोंडाळे जमले होते. धारपांसारखा मितभाषी मनुष्यदेखील, विसुशी हसतखेळत बोलत होता.

संध्याकाळी  देशमुखांच्या केबिनमध्ये विसु शिरला तेंव्हा बहुतेक स्टाफ निघाला होता. नंदिनीची आवराआवर सुरू होती. त्याला पाहून नंदिनीच्या चेहर्‍यावर सहजपणे स्मित उमटले आणि विसु त्याचे काम चोख करणार याची खात्री देशमुखांना पटली.
"तुम्ही निघालात तरी चालेल आता. नवरेंना सांगा थांबायला" देशमुख नंदिनीला म्हणाले आणि तिने पुन्हा एकदा हसून त्यांचा निरोप घेतला.
"बोल आता. "
"इथे चालेल ना ? " -- विसु
"आता मी बोलाविल्याशिवाय, कुणीही नाही येणार इथे" -- देशमुख
"तुझा स्टाफ झकास आहे. नशीबवान आहेस लेका." -- विसु
देशमुखांच्या चेहेर्‍यावर स्मित पसरले. दोन दिवसापूर्वीच्या अडचणी जाणून घेण्याच्या सेशनचे परिणाम अजून टिकून होते.
"काय वाटतंय तुला, यांच्यापैकी कुणी फितूर असेल का ? विशेषत: नंदिनी ?" देशमुखांनी मूळ विषयाला थेट हात घातला.
"शंभर टक्के नाही सांगू शकणार मी. पण माझ्या आजवरच्या अनुभवावरुन सांगतो, यांच्यापैकी कुणीही असण्याशी शक्यता फार कमी आहे."  -- विसु
"तू हे जे म्हणतो आहेस, ते केवळ आजच्या बोलण्यावरून असेल तर...." -- देशमुख

"नाही नाही, तसं नाही. माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मी अनेक कोर्स केले आहेत, विविध गोष्टींची माहिती मिळवली आहे, अभ्यास केला आहे. त्यातील एक कोर्स मनोव्यापारांशी निगडीत होता. माणसांची चटकन पारख करता येणे, माझ्या व्यवसायात खूप महत्त्वाचे. मानसिक जडणघडणीत मूळ स्वभाव, संस्कार, आवडीनिवडी, असुरक्षितता आणि त्यातून निपजणार्‍या विकृती, जबाबदारी समजण्याची, पाळण्याची वृत्ती अशा अनेक बाबी यांचा अभ्यास होतो. माझ्या सध्याच्या निदानाप्रमाणे, तुझ्या ऑफिस स्टाफपैकी, कुणीही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी  फितूर होतील, दगाबाजी करतील असे वाटत नाही. मूलत: त्यातील कुणीही या प्रवृत्तीचा नाही. म्हणून तर मी तुला तू नशीबवान आहेस असे म्हटले. आणि नंदिनीतर रत्न आहे. अतिशय बुद्धिमान आहे ती, पण तरीही अहंकारी नाही. सगळ्या स्टाफचे तिच्याविषयी चांगले मत आहे.  तिच्याशी मी सर्वात जास्त वेळ बोललो. ती अगदी टोकाच्या अडचणीत असेल, तरीही असे काही करेल असे वाटत नाही. "

"मग आता टेण्डरची ही घटना केवळ योगायोग मानायचा का ?" ---  देशमुख
"नाही नाही तसं नाही.  स्टाफमधला कुणी दोषी नसेलच असे मी म्हटलेले नाही. पण आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कुणीही हे करणार नाही, इतकंच म्हटले आहे. त्याच्यापैकी कुणाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते, ही शक्यता आहे. त्यांच्याकडून ही गोष्ट नकळतपणे देखील कुणी करून घेऊ शकतो. तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे आता. तू माझ्या ऑफिसमध्ये त्याची चुणूक पाहिली आहेस. तू माझ्या ऑफिसमध्ये पहिला अर्धा तास जे काही बोललास, ते सारे मी रेकॉर्ड केले आहे, तसे नेहेमीच करतो. कारण केसचा विचार करताना त्याचा मला उपयोग होतो. माझ्या ऑफिसमध्ये तू खुर्चीवर बसल्यापासून, तो रेकॉर्डर ऑटोमॅटिकली सुरू झाला;  ते तू उठेपर्यंत तो सुरू होता"   -- विसु

"बापरे,  पण हे कायद्याने चालतं ? म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे पण इतरांच्या बाबतीत ?" -- देशमुख
"एकतर मी माझ्या ऑफिसमध्ये ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची रीतसर परवानगी घेतली आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मी माझ्या व्यावसायिक नीतीमूल्यांशी प्रामाणिक आहे, त्या रेकॉर्डिंगचा माझ्याकडून दुरुपयोग होणे नाही. आणि ही बाब मी तुला सांगितली, पण ही काही प्रत्येकाला सांगण्याची गोष्ट नव्हे."  -- विसु

"मग आता काय करायचं ?"  तंत्रज्ञानाचा वापर म्हटल्यावर देशमुखांच्या डोक्यात मोहोळ उठलं होतं.  त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आयटी डिपार्टमेंटमधले चारही चेहरे तरळून गेले.
"तुझ्या आयटी डिपार्टमेंटमधल्या प्रत्येकाशी मी  बोललो आहे. तसे बिलंदर वाटत नाहीत ते."  देशमुखांचे मन वाचल्यासारखा विसु बोलला.  "पण तरीही पुन्हा एकदा काही गोष्टी बघायला हव्या. आपण असे करूया, उद्या मी पुन्हा येतो इथे, मला काही गोष्टी तपासून बघायच्या आहेत. इथल्या सीसीटीव्हीची व्यवस्था तू बाहेरच्या एजन्सीला दिली आहेस असं कळलं. त्यांचा इथे येणारा सपोर्ट इंजिनीयर विशाल धुरंधर, त्यालाही भेटायला हवे. 

"पण उद्या शनिवार आहे ना, त्याचा ऑफ असतो. पण ठीक आहे, मी बोलावून घेतो त्याला उद्या सकाळी. अकरापर्यंत येईल तो इथे."  --- देशमुख
"ठीक आहे, मग मी देखील अकरा वाजेपर्यंत पोहोचतो." असं म्हणून विसु निघाला.

======
क्रमश:
======

======

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

फितूर -- भाग १ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)
====

"सर, सुकाळेंचा फोन आहे, तुमचा मोबाईल रिचेबल नाही आहे, म्हणतायत" नंदिनीचा, त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला आणि देशमुखांच्या कपाळावरची एक आठी वाढली. त्यांनी मोबाईल चेक केला, मोबाईल तर चालू होता.

"त्यांना सांगा, मी त्यांना कॉल करतो."  असे म्हणत त्यांनी रिसिव्हर ठेवून दिला आणि दुसर्‍या हाताने सुकाळेंचा नंबर टॅप केला. नंबर एंगेज्ड होता. 
सुकाळे त्यांच्यासाठी अतिशय कामाचा माणूस . आपल्या पदाचा, पोझिशनचा पुरेपूर फायदा उठवत त्याने बक्कळ माया जमा केली होती. त्यात देशमुखांकडून दर महिन्याला जाणार्‍या पाकीटाचा देखील भाग होता.

त्यांना अचानक कुठल्यातरी चित्रपटातला संवाद आठवला  'हां साहब, हम गलत काम करते है, पर हमारे भी कुछ उसूल होते है'.  'कुठल्या चित्रपटातला बरं होता तो ?' त्यांना आठवेना. 'छे ! या बिझनेसने पार वाट लावली आपली' त्यांच्या मनात आले. त्यांना त्यांच्या कंपनीची, DEPL ची सुरुवातीची वर्षे आठवली. 'दर वीकएंडला सगळ्या चिंता, कामं बाजूला सारून, सगळं काही विसरून किमान एक पिक्चर पाहणे, कधीतरी नाटक पाहणं, आऊटिंगला जाणे आणि ताजेतवाने होऊन, सोमवारी पुन्हा स्वत:ला कामात बुडवून घेणे. काय दिवस होते ते. पण छाया गेली आणि आपण कामाचा व्याप वाढवला, महत्वाकांक्षा पोसली आणि कंपनीने कात टाकली. एका छोट्या रोपट्याचा बघता बघता वृक्ष झाला. पण आज हे पाहायला छाया नाही.' त्यांचे मन भरून आले. 'जशी कंपनी मोठी झाली तशी स्पर्धादेखील वाढली आणि तिच्याबरोबर टिकून राहायचे असेल तर, अटळ म्हणून काही नको त्या गोष्टीदेखील आपण स्वीकारल्या. सुकाळे त्यातलाच एक'

मोबाईल वाजला आणि देशमुखांचे विचारचक्र थांबले. सुकाळेचाच फोन होता.

"साहेब, बातमी चांगली नाही, कॉंट्रॅक्ट दुसर्‍याला जातंय."
"काय सुकाळे ? हे कॉंट्रॅक्ट माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते तुम्हाला माहीत नाही का ?"
"होय साहेब, मी व्यवस्थित सेटिंग लावली होती यावेळी, कुठे माशी शिंकली काय माहीत ?" सुकाळेच्या आवाजात संभ्रम होता.
"या महिन्यात दुसर्‍यांदा घडतंय सुकाळे. जरा मनावर घ्या, मग तुमच्या वर्ल्डटूरची जबाबदारी माझी." 
"काय साहेब, गेली दहा वर्षे तुमच्याशी इमान ठेवलाय. आणि तुम्ही...." सुकाळेचा आवाज किंचित चढला.
"तुमच्यावर संशय नाही घेत आहे मी" देशमुखांनी त्याला चुचकारले  "पण कॉंट्रॅक्ट कुणाला मिळणार आहे ?"
"यावेळी पण न्यू एराला.  थोड्या वेळात डिटेल्स हातात येतील माझ्या, विज्यासोबत रात्री तुमच्या घरी पाठवितो."
"ठीक आहे."  असं म्हणत देशमुखांनी फोन कट केला.

'हा काय प्रकार आहे छडा लावलाच पाहिजे.' त्यांच्या मनात आले.

न्यू एरा एकेकाळची त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी,पण काळासोबत ती बदलली नाही आणि मागे पडली. त्यात सुकाळेसारखा हुकूमाचा पत्ता, देशमुखांच्या हातात लागला आणि मग न्यू एराचे नाव आणि कर्तृत्व विस्मृतीत गेले. भलेमोठे कर्ज मागे ठेवून वर्षापूर्वी डाह्याभाई गेला आणि मग त्याच्या अमेरिकेतून परत आलेल्या मुलाच्या हातात न्यू एराची सूत्रे गेली. दोन महिन्यांपूर्वी कुणी त्यांना सांगितले असते, की येत्या काळात न्यू एरा तुम्हाला टक्कर देणार तर देशमुख खदखदून हसले असते. पण आता हसण्यासारखी वेळ राहिली नव्हती. त्यांच्या हातातून गेलेले, खरंतर न्यू एराने हिसकावून घेतलेले हे दुसरे कॉंट्रॅक्ट.

'काल आलेल्या या पोराने नक्की कुठे सेटिंग लावले आहे शोधून काढायलाच हवे.' त्यांच्या मनात पुन्हा विचार आला.
'हे असेच चालू राहिले तर, आपणही न्यू एराच्या वाटेने जाऊ' नुसत्या कल्पनेने देखील त्यांचे मन थरथरले.

----

सुकाळे शब्दाला जागला. देशमुख बंगल्यावर परतले आणि फ्रेश होत नाही आहेत तोच विज्या आल्याचे सखारामने त्यांना सांगितले.

"काय विज्या कसा आहेस ?" त्यांनी सगळी उत्सुकता लपवत त्याला विचारले.
"तुमची कृपा आहे साहेब. सुकाळेसाहेबांनी हे पाकीट दिलंय" विज्याचे दात फाकले आणि शब्द घरंगळले
देशमुखांनी ते पाकीट हातात घेतले आणि ड्रॉवरमधून काढून लगोलग दुसरी दोन पाकीटे विज्याच्या हातात कोंबली.
'हे तुझ्यासाठी आणि हे दुसरे सुकाळेसाहेबांना द्यायचे. काय ?" देशमुखांनी विज्याला बजावले.
विज्याचा चेहेरा उजळला. 'हो साहेब. थॅंक्यू साहेब.  येऊ का ?' विज्याच्या तोंडातुन लाचारी टपकली.
देशमुखांनी होकारार्थी मान हलवली.

सायकलवर टांग टाकून विज्या पसार झाला आणि अस्वस्थ मनाने त्यांनी पाकीट उघडले. आतल्या कागदांवर त्यांची सराईत नजर झटझट फिरली आणि त्यांच्या मनाच्या घालमेलीने टोक गाठले. तिरमिरीतच त्यांनी सुकाळेला फोन लावला.

"सुकाळे हे नक्की काय चाललाय ?"
"होय साहेब. मलाही तोच प्रश्न पडलाय. असं वाटतंय की जणू तुमच्या टेण्डरचे आकडे त्यांना आधीपासूनच माहीत होते."
"काय बोलताय ? तुमच्या व्यतिरिक्त कोण आहे तुमच्याकडे, जो हे करू शकेल ?"  त्यांनी सुकाळेला आणि स्वत:ला एकाच वेळी प्रश्न केला.
"नाही साहेब. तसं माझ्या शिवाय इथे कुणी असल्या भानगडीत पडणारे नाहीत. तुम्ही देखील ओळखता ना सगळ्यांना. तरीही मी चौकशी करतो. "  -- सुकाळे
"बरं, पाकीट मिळाले ना ? यावेळेस वाढवलेत."
"हो हो. विज्या काल तडक इकडेच आला. खुश होता त्याचे वेगळे दिलेत म्हणून. "
"हे घडले हे शेवटचे. येत्या महिन्यात हा प्रकार पुन्हा घडता कामा नये. आणखी काळजी घ्या"
"हो साहेब." सुकाळेने फोन कट केला. पण तो ही अस्वस्थ झाला होता. 'आपल्या इथे, आपल्यापेक्षा चतुर दुसरा कुणी असेल, तर आपलाही पत्ता कट होऊ शकतो.' त्याच्या मनात येऊ पाहात असलेला विचार त्याने निग्रहाने मागे सारला. 

--

दोन दिवसांनी दुपारी सुकाळेचा कॉल पाहिल्यावर देशमुखांनी घाईघाईने नंदिनीला बाहेर जायला सांगितले आणि फोन उचलला.
"साहेब, टेण्डर लीक झालंय असं नक्की नाही म्हणता येणार, आणि झालंच असेल तर आमच्याकडून नाही." सुकाळे काहीसा उत्तेजीत झाल्याचे देशमुखांना जाणवले.
"कशावरून ?"
"साहेब यावेळेस तुमचे टेण्डर दुपारी आले होते आणि  न्यू एराचे  त्याच दिवशी सकाळी. तुमच्या आधी."
"म्हणजे तुम्ही असं सुचवताय का की आमच्याच कंपनीतला कुणीतरी ...."
"शक्यता आहे साहेब." देशमुखांना अर्ध्यावर तोडत सुकाळे म्हणाला.

देशमुखांनी फोन कट केला आणि त्यांना 'त्रिशूल' आठवला. आपला 'आर के गुप्ता' झाला आहे असे एक क्षणभर त्यांना वाटले.   'छे. काहीतरीच. मी असले प्रकार कधी केलेले नाहीत.' 

तरी त्रिशूलचा विचार त्यांच्या डोक्यातून जाईना. त्यांना आठवले, दोन महिन्यांपूर्वी नंदिनीने नवीन फ्लॅट बूक करण्यासाठी कंपनीकडून कर्ज मिळेल का असे  विचारले होते . त्यांनी इंटरकॉमवरची बटणे काहीशी जोरात दाबली.
पलीकडून नंदिनीचा मंजूळ आवाज आला "यस सर ?"
"आत या"
"सर, ते मगाचचे लेटर पूर्ण केलंय मी ." त्यांच्यासमोर एका पत्राचा ड्राफ्ट सरकवत नंदिनी म्हणाली. 
त्यांनी पत्रावर नजर फिरवली. 'हिचं काम एकदम नेटकं.' देशमुखांच्या मनात आले. 'पत्राची भाषा देखील अगदी माझीच, जणू माझ्या मनात काय आहे हे हिला कळतं'  स्वत:च्याच विचाराने ते चपापले. 'छे काहीच्याबाही विचार करतो आहोत आपण'
"तुमच्या फ्लॅटचे काय झाले" स्वत:वर संयम ठेवत, त्यांनी अगदी सहज वाटावे अशा आवाजात विचारले.
"मी दोन बँकांमध्ये अर्ज केले होते, पण दोघांनीही एकच कारण देत अर्ज नाकारले. दोन महिन्यांनी या असं म्हणत आहेत.  या नोकरीत एक वर्ष पूर्ण झाल्यावर."
"हं. तुम्ही अकाऊंट्समध्ये धारपांना भेटा. मी बोलतो त्यांच्याशी. तुमचे काम होईल."
"थॅंक यू सर. थॅंक्स अ लॉट." नंदिनीचा चेहेरा आनंदाने फुलला.
"आणि हे लेटर फायनल करा आणि सहीसाठी पाठवा"

नंदिनी बाहेर गेली आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या स्टाफपैकी, प्रत्येकाच्या काय काय अडचणी आहेत ते आठवायला सुरुवात केली.  संध्याकाळपर्यंत, सरांचा मूड आज भलताच छान आहे, सरांना लॉटरी लागली की काय, इथपासून ते, आपले सर इतर मालकांसारखे नाहीत. ते भलतेच सहृदयी, जॉली इत्यादि इत्यादि आहेत, याच्या चर्चा अधूनमधून रंगल्या.

======
क्रमश:
======

======

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

ड्रोन

================
#विज्ञान_लघुकथा क्रमांक ३
================
(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)


====
स्टेटमेंट १ - सारांश
====
XXXX च्या सर्विस अँड सपोर्ट सेक्शन मध्ये मी, अॅंथनी गोमेज , गेले तीन वर्षे काम करत आहे.  माझ्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीला YYYY पोलिस स्टेशनकडून, आमच्या कस्टमर सर्विसला, सर्विस रिक्वेस्ट कॉल आला. त्याच दिवशी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी, NR15 (सिरियल क्रमांक - MUNXXDD6489) च्या ट्रबलशूटिंगसाठीचा क्रिटिकल कॉल असाईन झाल्याचा मेसेज मला मिळाला. तेंव्हा आधीचा कॉल आटपून मी ऑफिसला परतत होतो. पण क्रिटिकल कॉल असल्यामुळे, मी ऑफिसला न जाता, डायरेक्ट  YYYY पोलिस स्टेशनला गेलो.  तिथे असलेल्या, NR15 ला कोणतेही फिजिकल डॅमेज नव्हते, पण त्याची बॅटरी डाऊन झाल्याचे इंडिकेटर दाखवत होता.  सिरियल क्रमांक पाहून मी त्याची वॉरंटी चेक केली आणि मगच त्याचे बॅकपॅनल उघडले. त्यानंतर माझा स्वत:चा आयडेंटिटी कोड टाकून, सेल्फटेस्ट रन केली.  सेल्फटेस्टच्या रिपोर्टनुसार, प्रायमरी बॅटरी पूर्णपणे डेड होती. त्यामुळे 'स्पेअर बॅटरीची रिक्वेस्ट द्यावी लागेल आणि तशी रिक्वेस्ट फक्त त्या NR15 चा ओनरच देऊ शकतो' असे मी तिथे सांगितले. तसा फील्ड रिपोर्टही, मी तात्काळ ऑनलाइन भरला,  त्यावर तिथल्या, स्टेशन इनचार्जचे ऑथेंटिकेशन लोड केले आणि मी तिथून निघालो. कामाचा लोड खूप जास्त असल्याने,   त्यानंतर काय झाले याची चौकशी मी केली नव्हती.

====



====
स्टेटमेंट २ - सारांश
====
मी, सुधाकर अवसरीकर,  साधारण पाच वर्षांपूर्वी XXXX मध्ये एरिया मॅनेजर म्हणून रुजू झालो.  पूर्ण MG विभाग माझ्या अखत्यारीत येतो.   २७ फेब्रुवारीला, संध्याकाळी पाचच्या सुमारास,  YYYY पोलिस ठाण्याच्या इनचार्जकडून, माझ्या मोबाईलवर कॉल आला. एका ड्रोनची लॉस्ट अँड फाऊंडची केस होती. त्यांनी फील्ड रिपोर्टचा उल्लेख केला म्हणून मी लगेच तो तपासून बघितला. मी त्यांना म्हटले की मी उद्या स्पेअर बॅटरी पाठवितो. दरम्यानच्या काळात ओनरशी बोलून, फॉरमॅलिटीज पूर्ण करता येतील, असा माझा होरा होता.  पण त्यांना काही तपासासाठी, तो ड्रोन तात्काळ सुरू करून हवा होता.  'तुम्ही स्वत: बॅटरी घेऊन या' असे त्यांनी मला सांगितले. आमच्याकडच्या एका वरिष्ठ सर्विस टेक्निशियनला, मी एका नव्या ड्रोनची बॅटरी काढायला सांगितली आणि ती बॅटरी घेऊन आम्ही दोघे YYYY ठाण्यात पोहोचलो.

त्या ड्रोनची बॅटरी बदलली आणि चाचणी घेतली. तो व्यवस्थित चालू होता. त्या ड्रोनचा, गेल्या पाच दिवसातला सविस्तर रूट लॉग, त्यांना हवा होता. सहसा असा लॉग आम्ही देत नाही, कारण त्यात मॅप, ऑडिओ, विडियो असा बराच डाटा असतो. त्यात प्रायव्हसी इश्यू येतात.  पण त्यांच्या एकंदर बोलण्यावरून  प्रकरण गंभीर आहे, हे माझ्या लक्षात आले होते, त्यामुळे त्यांच्याकडून लेखी विनंती घेतली आणि तिथल्याच संगणकावर लॉगिन करून, त्यांना हवा असलेला लॉग मी काढून दिला.  आणखी काही मदत लागली तर तुम्हाला यावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. मी हो म्हटले. सर्विस रिपोर्टची फॉरमॅलिटी पूर्ण केली आणि आम्ही दोघेजण तिथून निघालो. 

====



====
स्टेटमेंट ३ - सारांश
====
माझे पूर्ण नाव विराज धर्मापूरकर असे आहे.   पोलिसांनी ताब्यात घेतलेला NR15 (सिरियल क्रमांक - MUNXXDD6489) हा ड्रोन, माझ्या मालकीचा असून, गेल्या महिन्याच्या, म्हणजे फेब्रुवारीच्या  ११ तारखेला,  XXXX च्या ऑनलाइन पोर्टल वर ऑर्डर देऊन मी, तो विकत घेतला होता. मी 'मेड टू ऑर्डर' नावाचे फूडजॉइन्ट चालवितो, रात्री दहा ते सकाळी सहा या वेळात. या व्यवसायाच्या निमित्ताने मी फूड डिलिव्हरीसाठी ड्रोन्सचा वापर करतो.  त्याचे लायसन्स माझ्याकडे आहे. ऑर्डरचे प्रमाण वाढले असल्याने, मी हा जास्तीचा ड्रोन गेल्या महिन्यात मागविला होता. तो व्यवस्थित काम देत होता. पण या महिन्याच्या १८ तारखेला तो हरवला आणि मग  त्याची फिर्याद मी YYYY पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तात्काळ नोंदविली होती. फिर्याद क्रमांक XXXX-NNN हा आहे. 

२७ तारखेला YYYY पोलिस स्टेशनमधून त्याची वॉरंटी चेक झाल्याचा आणि नंतर त्याची प्रायमरी बॅटरी बदलल्याचा, मेसेज मला दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ तारखेला मिळाला.

नंतर मला मिळालेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीला पोलिसांना, बॅंडस्टँडच्या जवळपास तो ड्रोन सापडला, तेंव्हा ड्रोनची बॅटरी पूर्णपणे उतरलेली  होती. तपासाचा भाग म्हणून आम्ही XXXX ला सर्विस कॉल दिला, असे  YYYY च्या स्टेशन इनचार्जने मला सांगितले.  २९ तारखेला पोलिसांनी, तो ड्रोन माझ्या ताब्यात दिला, तेंव्हा त्यासोबत २७ तारखेचा, सर्विस इंजीनियरचा रिपोर्टही होता. त्या रिपोर्टमध्ये नवीन बॅटरी इंस्टॉल केल्याचा, पूर्ण चेकअप केल्याचा आणि इतर कोणताही दोष नसल्याचा उल्लेख आहे.  तो ड्रोन ताब्यात घेताना, मी त्याचा सिरियल क्रमांक तपासला होता आणि परवलीचा प्रश्न इनपुट करून, तो माझाच ड्रोन  आहे याची खात्री मी केली होती. घरी परतल्यावर मी त्याची टेस्टही घेतली आणि त्याची अचूकता पूर्वीसारखीच आहे असे मला आढळले.  त्यानंतर गेल्या सात दिवसात त्या ड्रोनचा व्यावसायिक वापर केलेला नाही.

२० तारखेला,  'MMMM' मंदिरातल्या सीसीटीव्ही फूटेज मध्ये, काही एक वस्तू टाकताना दिसणारा एक ड्रोन, हा माझ्या मालकीचा आहे असे सांगत, पोलिसांनी आज मला ताब्यात घेतले आहे. माझे सर्व ड्रोन्स देखील त्यांनी जप्त केले आहेत,  पण मी देवाला स्मरून सांगतो की २० तारखेला त्या मंदिरात घडलेल्या प्रकाराशी वा त्यानंतर झालेल्या दंगलीशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही.  १८ ला सकाळी हरविल्यापासून ते २९ तारखेपर्यंत हा ड्रोन  माझ्या ताब्यातच नव्हता आणि मी  कधीही, त्या मंदिरात जाण्याची वा तिथे कोणतीही वस्तू ठेवण्याची, टाकण्याची, डिलिव्हरी करण्याची, कोणतीही कमांड कुठल्याच ड्रोनला दिलेली नाही वा लोड केलेली नाही.  गेल्या सात दिवसात ड्रोन का वापरला नाही हा प्रश्न मला वारंवार विचारण्यात आला आहे त्याचे एकमेव उत्तर 'आवश्यकता भासली नाही' इतकेच आहे.

====



====
स्टेटमेंट ४ - सारांश
====
मी,  संग्राम बिभीषण टेकाडे, YYYY चा इनचार्ज पूर्ण शुद्धीत आणि स्वत:च्या अक्कलहुशारीने हे स्टेटमेंट देतो आहे.  २० फेब्रुवारीला    'MMMM' मंदिरात निषिद्ध वस्तू फेकण्याचा जो प्रकार घडला, त्याचे सीसीटीव्ही फूटेज, मागणी करूनही तात्काळ मिळू शकले नव्हते. दुसर्‍या दिवशी  दंगल उसळली आणि त्यामुळे फूटेज मिळायला आणखी चार दिवस लागले. फूटेजमध्ये ती निषिद्ध वस्तू एका ड्रोनचा वापर करून टाकण्यात आली असे उघड झाले. १८ तारखेला एक ड्रोन हरविल्याची तक्रार नोंदली गेली होती, ती माझ्या व्यवस्थित लक्षात होती, त्यामुळे त्या ड्रोनचे चित्र दाखवत, २४ फेब्रुवारीपासून, संपूर्ण परिसरात त्या दृष्टीने शोध घेतला असता, कचरा वेचणार्‍या एका स्त्रीला, तो ड्रोन सापडल्याचे उघड झाले.  त्यानंतर तो ड्रोन जप्त करून, XXXX कडून त्याचा रूटलॉग मिळविला असता, शेवटची डिलिव्हरी १९ तारखेला संध्याकाळी  केल्याचे उघड झाले आहे.   जर ड्रोन १८ तारखेलाच हरविला होता तर १९ ला डिलिव्हरी कशी याचे समाधानकारक उत्तर, धर्मापूरकर  देऊ शकलेले नाहीत.  जर व्यवसायाचा भाग म्हणून ड्रोन घेतला होता तर २९ तारखेपासून आजपर्यंत त्या ड्रोनचा वापर का केला नाही, याचे उत्तरही त्यांनी दिलेले नाही. घटना घडली, त्या २० फेब्रुवारीपासूनचा कोणताही तपशील त्या रूटलॉगमध्ये नोंदलेला नव्हता.  सबब केवळ अधिक चौकशीसाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतले होते.  त्यांचे १ फेब्रुवारीपासून ते कालपर्यंतचे सर्व फोन रेकॉर्ड आम्ही मिळवले आहेत. त्या कॉलचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. 

१९ तारखेला शेवटचे लोकेशन IIII या कुख्यात एरियातले आहे असे मला आत्ताच कळले, पण रूटलॉग मध्ये ते नोंदलेले नव्हते नाहीतर मी त्या दृष्टीने तपास केला असता. त्यामुळे ड्रोनचे हॅकिंग झाल्याचा संशय, मला आला नव्हता आणि मी त्या दृष्टीने चौकशी केलेली नाही. तशी शक्यता एक्स्पर्टने वर्तविल्याचे मला नुकतेच समजले,  पण तरीही, माझे स्टेटमेंट घेण्याचे  कारण काय याचे उत्तर, विचारल्यानंतरही मला देण्यात आलेले नाही.

======

बुधवार, १० जानेवारी, २०१८

गाईड

================
#विज्ञान_लघुकथा क्रमांक २
================

रोजच्या प्रमाणे ठीक सहा वाजता अंगकला जाग आली आणि आपले शरीर नेहेमीप्रमाणेच शक्तीने ओतप्रोत भरून गेले आहे असे त्याला वाटले.
'गुडमॉर्निंग कॅप्सुलचा हा फायदा अतिशय उत्तम आहे' त्याच्या मनात आले.  'झोपेतून उठल्यावर येणारी सुस्ती नाही, आळसावलेले शरीर नाही, त्या चहाकॉफी सारखे कोणतेही साईड इफेक्टस देखील नाहीत. '

'आता फक्त आजचा दिवस, नंतर मंगळाला कायमचा बायबाय.' पृथ्वीवर परतण्याच्या कल्पनेने त्याचे मन अधीर झाले. न राहवून त्याने एका जुन्या गाण्यावर  शीळ घालायला सुरुवात केली.

'Excitement Detected. Suggesting to follow procedure number 20.3."

हेल्थ मॉनिटरींग सिस्टीमची यंत्रवाणी घुमली आणि अंगक भानावर आला. नियमांच्या बाबतीत  *.Corp अगदी काटेकोर होती. नियमबाह्य वर्तनामुळे, कॉंट्रॅक्टचा एक दिवस वाढण्याची  शिक्षा, त्याने सुरुवातीच्या काळात अनेकदा भोगली होती.  तेंव्हा त्या शिक्षेची गंभीरता त्याच्या लक्षात आली नव्हती, पण आता वीस वर्षांपेक्षाही अधिक काळ, तेच ते गाईडचे एकसूरी काम करून, त्याचे मन अगदी विटले होते.

दररोज तेच ते Ancient Civilization Museum मधले जुने अवशेष दाखविणे,  Planet Tour मध्ये तीच ती स्थळे दाखविणे,  Haunted Tunnels चा उगाचाच आभास निर्माण केलेल्या, त्या लाव्हा ट्यूब्स मधून लोकांना फिरवून आणणे,  पर्यटकांच्या त्याच त्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्याकडून चांगला फीडबॅक मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे आणि त्याहून कहर म्हणजे  Replicator चा वापर करून मूळ artefactच्या   हुबेहूब बनविलेल्या प्रतिमा, Collector's Items  म्हणून विकणे, सगळ्याचाच त्याला अक्षरश: उबग आला होता.  पण कॉंट्रॅक्टची पूर्तता केल्यावाचून इथून सुटका होणार नव्हती. 

'या नोकरीची ऑफर स्वीकारली तेंव्हा किती किती उत्साहात होतो आपण'  त्याच्या मनात आले. 'टूरवर येणार्‍यांना गाईड म्हणून यंत्रमानव का नको असतो कुणास ठाऊक ? '  त्याने दोन टूरिस्टना, आडूनआडून त्यासंदर्भात विचारले होते, पण दोघांनीही त्याच्याकडे असे दुर्लक्ष केले की, त्याला आणखी काही विचारायचे धैर्यच झाले नाही. 'न जाणो त्यांनी निगेटीव्ह फीडबॅक दिला तर  ?'

सुरूवातीला सहजपणे स्वीकारलेले नियमदेखील, त्याला आताशा फार जाचक वाटू लागले होते.  इथला आणखी एक दिवसही वाढू नये, यासाठी गेले वर्षभर तो सर्वतोपरी काळजी घेत होता.  चार महिन्यांपूर्वी मिळालेली, डबल क्रेडिट्सची ऑफर देखील त्याने नाकारली होती. काय वाटेल ते झाले तरी आता पृथ्वीवर परतायचेच असे त्याने मनाशी ठाम ठरविले होते.  तसेही त्याच्या खात्यामध्ये प्रचंड क्रेडिट्स जमा झाले होते, पृथ्वीवर त्याला हवे तिथे, अक्षरश: कोणतेही काम न करता, तो वीस एक वर्षे सहज राहू शकला असता. पृथ्वी सोडली तेंव्हा कोणतेही पाश नव्हतेच, पण आता नवीन नाती जोडण्यासाठी पुरेशी जमवाजमव झाली होती.

टूर वेळेवर आली. तेच ते उत्साहाने फसफसलेले पर्यटक. स्पेससूटला न सरावलेले पर्यटक, दीर्घ प्रवासाने काहीसे कावलेले पर्यटक. पण आज त्याने सर्वांना विशेष वागणूक दिली.  सर्व पर्यटनस्थळे मनापासून दाखविली. न कंटाळता त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.  दिवस कसा संपला आज त्याचे त्यालाच कळले नाही.  Performance Analyser ने  'Nearly Perfect' चे रेटिंग दिलेले त्याने पाहिले आणि तो स्वत:वरच खुश झाला.

वेगाने तो स्वत:च्या सेलमध्ये परतला, स्पेससूट उतरवून,  आज बर्‍याच दिवसांनी त्याने चवीचवीने जेवणाचा आस्वाद घेतला.   'चला शेवटचा दिवसही उत्तम पार पडला. उद्या Back to Earth.' अतिशय आनंदीत मनाने त्याने गुडमॉर्निंग कॅप्सुलची बाटली उघडली. कॅप्सुल संपलेल्या होत्या. त्याने मेडिसिन डिस्पेंसरवर नवीन बाटलीसाठी कमांड दिली.  ट्रे मध्ये आलेल्या बाटलीतली कॅप्सुल गिळताना हिचा आकार थोडा मोठा आहे असे त्याला वाटले, म्हणून त्याने बाटलीवरचे नाव निरखून पाहिले. पण नाव तेच होते. त्याच्या डोळ्यावर काहीशी गुंगी दाटून आली होती. त्याने स्वत:ला बेडवर झोकून दिले.

--

'G1.8 ची ओल्ड मेमरी आज रात्री रिस्टोअर होईल आणि G1.9 उद्यापासून कामावर रुजू होईल.'  सेक्रेटरीकडून आलेला मेसेज वाचून जुग्गानी खुश झाला. 

'डॅडसारखी दूरदृष्टी आपल्याकडे पण हवी'  त्याला वाटले.  'डॅडने याच्या क्लोनिंगचे, मेमरी रिस्टोअरचे कॉंट्रॅक्ट केले नसते तर, आता दुसरा अंगक कुठून आणणार होतो आपण ? ' 

"पुढच्या हप्त्यापासून  'मार्स विथ हयूमन टच' चे रेट, टेन परसेंट वाढव आणि त्या सिल्व्हाला विचार, याच्या क्लोनिंगचे राइट्स विकणार का"  त्याने मेसेजला रिप्लाय केला. 

====

भीती

=============
#विज्ञान_लघुकथा - १
=============

पृथ्वीवरच्या ट्रेनिंग सेशनसाठी स्वस्तिकने होकार कळवला आणि त्याचे मन एका अनामिक दडपणाने भरून गेले. आठव्या वर्षी 'ताणशमका'ची  लस टोचून घेतल्यापासून, एकदाही त्याला असे दडपण जाणवले नव्हते. तसाही डिफॉल्ट बॉडीसूट न घालता, सलग सातआठ दिवस राहण्याचा अनुभवही त्याला होता, युरोपावरच्या 'पृथ्वी  प्रतिरूप कोशा'मध्ये, त्याने तो अनुभव अनेकदा घेतला होता, आणि पृथ्वीवर जाऊन, तिथल्या मानव अभयारण्यात तब्बल एक महिना काढायचा म्हणजे थोडा वेगळा प्रकार असणार आहे याचा त्याला अंदाज आला होता.

ExpoPlanetary Habitation Program ला त्याने प्रवेश घेतला, तेंव्हाच हे ट्रेनिंग या कोर्सचा भाग आहे याची कल्पना त्याला देण्यात आली होती. त्यामुळे पृथ्वीवर प्रत्यक्ष जाण्याची वेळ येईल, तेंव्हा आपल्याला असे काहीतरी वाटेल, असे त्याला अजिबात वाटले नव्हते. शिवाय अभयारण्यातल्या अनुभवाचे सर्व Brain Feed, त्याने स्वत:च्या बाह्यमेंदूत साठवले होते. त्यामुळे असे का वाटावे याचे कारण काही त्याला उमगेना. न राहवून तो Personal Health Pod मध्ये शिरला.  PHP च्या स्क्रीनवर 'अज्ञाताची भीती' असे कारण झळकले आणि त्याचे दडपण वाढले.

शेवटचा पर्याय म्हणून, त्याने Brain Feed Update ची विनंती पाठविली. Update पूर्ण झाली आणि घाईघाईत त्याने Health Pod वरचे Rescanning चे बटन दाबले. PHP च्या स्क्रीनवरचे शब्द बदलले,  त्या दडपणाचे संभाव्य कारण तिथे झळकले.
"यंत्रविरहित वातावरणात, अनोळखी मानवसमूहासोबत जगण्याची भीती"

====

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

कालकुपी - ५ / ५

भविष्यात कालकुपी सापडूनही, तिचा योग्य उपयोग होऊ शकेल याची जराही शाश्वती नसताना मानवाने आज हा खटाटोप करावा का ?  मूळात आपल्याला सापडलेले सर्व ज्ञान, भविष्यातील संस्कृतीस सहज मिळावे आणि त्यांची वेगाने प्रगती व्हावी असे आपल्याला का वाटते ?  किंवा का वाटावे ? अशा प्रकारे भविष्यातील त्या संस्कृतीच्या प्रगतीचे Fast Tracking करून, त्यांना तंत्रज्ञानाचा Crash Course देऊन, एका अर्थाने आपण, त्या भविष्यातील संस्कृतीचा वेगाने नाश होण्याची बीजे तर रोवत नाही ना ?  कुठलीही संस्कृती टिकण्याचा, विकसित होण्याचा निसर्गाने नेमून दिलेला मार्ग टाळून,  आपण त्यांना जो शॉर्टकट देऊ पाहात आहोत, तो खरंच योग्य ठरेल ना ? ---- मागील भागावरून पुढे ----

आपले संपूर्ण आणि सर्व प्रकारचे ज्ञान साठविण्याच्या आणि हस्तांतरीत करण्याच्या काही अभिनव पद्धतींवर देखील संशोधन सुरू आहे. त्यात

१) कृत्रिम DNA चा वापर करून त्यांच्यामध्ये ज्ञान साठविणे आणि कालांतराने ते पुन्हा उपलब्ध करता येणे. https://en.wikipedia.org/wiki/DNA_digital_data_storage

२) वनस्पतींचा ज्ञानसंचयासाठी उपयोग करणे
https://en.wikipedia.org/wiki/Plant-based_digital_data_storage

३) मानवी मेंदूचा वापर करून कृत्रिम पद्धतीने त्यात ज्ञान साठविण्याच्या पद्धती विकसित करणे
http://www.sciencealert.com/scientists-build-an-artificial-neuron-that-fully-mimics-a-human-brain-cell

या आणि अशा प्रकारच्या प्रचंड गुंतागुंतीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये विलक्षण यश मिळाल्यास, निकटच्या भविष्यात,  कालकुपीची
निर्मिती, मुद्दामहून करण्याची कदाचित आवश्यकताच राहणार नाही.  कृत्रिम DNA चे मानवामध्ये, इतर प्राण्यांमध्ये रोपण करणे आणि पुनरुत्पादनाच्या माध्यमातून त्या DNA मधील ज्ञान, पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होत राहणे हा टप्पा देखील गाठला जाऊ शकतो. कदाचित एखाद्या वनस्पतीच्या बीजामध्ये रोपण केलेले ज्ञान सूर्यमालेत सर्वत्र 'रुजू' शकते.  मानवी मेंदूंचे नेटवर्क तयार करून,आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्या ज्ञानाची देवाण-घेवाण होऊ शकते किंवा आपत्कालीन परिस्थितीत, एका मेंदूतील ज्ञान, विशिष्ट ठिकाणी साठविण्याची व्यवस्था देखील निर्माण केली जाऊ शकते.

प्रचंड मोठा प्रवास  करून आपण उत्क्रांतीच्या या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे ज्ञानाची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची नवनवी आव्हाने आपल्याला खुणावत आहेत. अशा वेळेस एखाद्या आकस्मिक संकटामुळे, Extinction Event मुळे उत्क्रांतीच्या शिडीवर, पुन्हा पहिल्या पायरीपासून आरंभ करावा लागू नये ही इच्छा चुकीची नव्हे.  आपली संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान जपण्याचे, टिकवण्याचे प्रयत्न, प्रत्येक वेळेस नैतिकतेच्या तराजूत तोलले पाहिजेत असे नाही, हे काही प्रमाणात खरे आहे, पण त्याचवेळी 'आपण खरंच शून्यातून सुरुवात केली आहे का' याचा मागोवा घेणे देखील तितकेच आवश्यक आहे.

====

आत्तापर्यंतच्या लेखातून, कालकुपीच्या विविध पैलूंचा, त्यामधील संभाव्य वस्तूंचा आढावा घेताना, कुठेतरी एक धागा प्राचीन संस्कृतीच्या ज्या काही पाऊलखुणा जपल्या गेल्या आहेत, सापडल्या आहेत, तिथे जाऊन मिळतो असे म्हटले तर ते चूक नव्हे. प्राचीन संस्कृतींनी त्यांचा इतिहास दगडाच्या, काहीवेळा धातूच्या माध्यमातून अधिक जपलेला दिसतो.  अनेक प्राचीन संस्कृतीशी निगडीत कथांमध्ये उल्लेख असलेल्या 'चमत्कारांच्या',  वैज्ञानिक प्रगतीच्या, असंख्य खुणा दिसतात. पण त्या वैज्ञानिक प्रगतीचे, तंत्रज्ञानाचे आपल्याला अपेक्षित असलेले नमुने, लिखाण आढळत नाही याचे नक्की काय कारण असावे ?

आधीच्या लेखांकांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ते तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित पद्धतीने दडवून ठेवले असावे आणि अजूनही आपल्याला ते सापडलेलेच नाही ?
की अशा एखाद्या सांकेतिक भाषेत, कूटपद्धतीने लिहिले असावे की ते कुणाच्या हातात पडले तरी सहजतेने उमजू नये  ? 
की अशा तंत्रज्ञानाचे  हस्तांतरण योग्य नाही असे वाटल्यामुळे, प्राचीन संस्कृतींनी  त्याची जपणूक जाणीवपूर्वक केली नसावी ?
की परकीय आक्रमणे, युद्ध, नैसर्गिक संकटे झेलताना ते नष्ट झाले असावे ?
की ज्यांच्या हातात ते पडले त्यांनी  केवळ त्यांच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला असावा ?
की विविध शासनयंत्रणेतील किंवा  व्यापारीवृत्तीच्या ठराविक वर्गाच्या हातात त्याची सूत्रे असावीत ?
आधीच्या लेखांकात विचार केल्याप्रमाणे आपण आज जी कालकुपी जतन करू पाहात आहोत ती भविष्यात योग्य हातात पडून, आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रगतीचा पाया म्हणून, त्यावेळेच्या संस्कृतीच्या वर्धनासाठी, कल्याणासाठी तिचा उपयोग केला जाईल याची खात्री आज आपण कशी देणार ?  भविष्यात ज्या  व्यक्तीच्या,समूहाच्या हातात ती कालकुपी लागेल, ती व्यक्ती, तो समूह त्या संस्कृतीच्या भल्यासाठी त्या कालकुपीचा वापर करेल हेच कशावरून मानावे ?

असेही घडू शकते की, की अशी एखादी प्राचीन संस्कृती (म्हणजे आपण) होती हे उघडकीस येणे, त्या भविष्यकाळातील संस्कृतीतील, सत्तापदांवर बसलेल्या व्यक्तींना नकोसे वाटेल.

भविष्यात कालकुपी सापडूनही, तिचा योग्य उपयोग होऊ शकेल याची जराही शाश्वती नसताना मानवाने आज हा खटाटोप करावा का ?  मूळात आपल्याला सापडलेले सर्व ज्ञान, भविष्यातील संस्कृतीस सहज मिळावे आणि त्यांची वेगाने प्रगती व्हावी असे आपल्याला का वाटते ?  किंवा का वाटावे ? अशा प्रकारे भविष्यातील त्या संस्कृतीच्या प्रगतीचे Fast Tracking करून, त्यांना तंत्रज्ञानाचा Crash Course देऊन, एका अर्थाने आपण, त्या भविष्यातील संस्कृतीचा वेगाने नाश होण्याची बीजे तर रोवत नाही ना ?  कुठलीही संस्कृती टिकण्याचा, विकसित होण्याचा निसर्गाने नेमून दिलेला मार्ग टाळून,  आपण त्यांना जो शॉर्टकट देऊ पाहात आहोत तो खरंच योग्य ठरेल ना ?

थोडा नकारात्मक पद्धतीने विचार केला असता,  कालकुपीच्या निर्दिष्ट उद्देशांचे जसे लाभ आहेत, तसेच काही तोटेही उद्भवू शकतात हे सहज लक्षात येईल.

====

प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आणि कालकुपी यांचा संबंध जोडण्याचे काही प्रयत्न झाले असल्यास, ते पूर्णत: उघड झालेले नाहीत.  'प्राचीन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान सापडल्यामुळे आजच्या वैज्ञानिक प्रगतीला प्रचंड मोठा रेटा मिळाला; असे घडले असल्यास, त्याबद्दल फारसे काही लिहिले गेलेले नाही. याचा अर्थ तसे घडलेच नसावे असे नाही. तसे काही विशेष सापडले असल्यास, त्याला जगासमोर न येऊ देण्याइतपत शासन यंत्रणा नक्कीच प्रभावी होत्या आणि यापुढेही राहतील.  कुणीही कितीही काही म्हणो, ज्ञान सर्वांसाठी खुले असण्याचा दावा करो, 'इदम्‌ अथर्वशीर्षम्‌ अशिष्याय न देयम्‌' चे विविध प्रयोग, विविध क्षेत्रात, विविध स्तरावर, विविध हेतू मनात ठेवून,  विविध प्रकारांनी होत राहिले आहेत आणि भविष्यातही होत राहतील. 

प्राचीन संस्कृतीने पृथ्वीवर कालकुपीच्या माध्यमातून काही 'तंत्रखुणा' ठेवल्या असल्यास, त्या उत्खननात उघड होऊ शकतात, पण त्यासाठी त्या विवक्षित ठिकाणी उत्खनन शक्य व्हायला हवे. त्याबाबतीत जे सापडेल, जसे सापडेल ते स्वीकारायची मनाची तयारी हवी, भले मग आपल्या सध्याच्या समजूतींना, धारणांना, गृहीतकांना त्या खुणांनी मोठा धक्का दिला तरीही.  पृथ्वीवर न उकललेल्या गूढांची संख्या खूप मोठी आहेच, अगदी Nazca Lines पासून ते पिरमिड्स पर्यंत, कित्येक मंदिरांपासून, पूज्य (Sacred) मानल्या गेलेल्या स्थानांपासून ते प्रकाशात आलेल्या लेण्यांपर्यंत, उध्वस्त किल्ल्यांच्या,इमारतींच्या 'झपाटलेला' असे मानल्या गेलेल्या अवशेषांपासून ते अत्यंत दुर्गम ठिकाणी सापडलेल्या गुंफांपर्यंत आणि निश्चित उपयोग न समजलेल्या अनेक चमत्कारिक वस्तूंपासून ते आपण आपल्या सध्याच्या समजुतींनुसार लेबल लावून मोकळे झालेल्या अनेक artefact पर्यंत. कदाचित त्यातील काही पूर्वीच्या संस्कृतीच्या तंत्रखुणा असू शकतील, काही कालकुपींचे स्थान निदर्शक असू शकतील. आवश्यकता आहे ते ठराविक झापडे झुगारून देण्याची.

आणि प्राचीन कालकुपीच्या खुणा पृथ्वीवरच सापडतील, असे मानण्याचे कारण केवळ इतकेच आहे का, की  बहुमान्य असलेला मानवी संस्कृतीचा, पृथ्वीवरील जीवनाचा इतिहास आपल्याला तसे सांगतो आहे (किंबहुना आपण तशी ठाम धारणा करून घेतली आहे) की 'याआधी कोणतीही संस्कृती आपल्या सध्याच्या (तंत्रज्ञानातील) प्रगतीच्या जवळपासही पोहोचलेली नाही' हा विचार आपण मनोमन स्वीकारला आहे ?

फार दूरचा विचारही न करता, सूर्यमालेतील एखाद्या ग्रहावर (किंवा उपग्रहावर) काही काळासाठी एखादी संस्कृती विकसित होऊन कालांतराने नष्ट झाली नसेल, असे ठामपणे मानण्याचे कोणतेही कारण नाही. चंद्रावर,मंगळावर प्राचीन संस्कृतीच्या खाणाखुणा सापडल्या असतील, तर त्या सर्व पृथ्वीवासीयांपर्यंत पोहोचल्या असत्या हा भाबडा आशावाद आहे. अशा गोष्टी उघडकीस न येऊ देण्याची अशी अनेक कारणे असू शकतात, ज्यांची कदाचित आपण कल्पनाही करू शकत नाही.

माकडापासून निपजलेला मानव ही सर्वसाधारण उत्क्रांतीची प्रक्रिया नसून, या शारीरिक, बौद्धिक प्रगतीमागे, जैवतंत्रज्ञानात अत्यंत प्रगत असलेल्या पृथ्वीबाह्य संस्कृतीने केलेला हस्तक्षेप, त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग कारणीभूत आहेत असे मानणारा एक वर्ग आहे. आणि हा तर्क समूळ नाकारण्याचे कारण नाही. मानवी मेंदूतील गुंतागुंत, मर्कटवर्गातील प्राण्यापेक्षा त्याच्या शरीरात असलेले बदल, त्याला असलेले बुद्धीचे, विविध कलांचे वरदान, पण त्याचवेळी इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय कमकुवत असलेले शरीर, Junk DNA सारखी न उलगडलेली तथ्ये, जगभरातील विविध मानवसमूहांमध्ये प्रचलित असलेल्या  अतिप्राचीन कथा, त्या कथांमधील काही बाबींमध्ये असलेले विलक्षण साधर्म्य या सर्व गोष्टी, एकाप्रकारे नैसर्गिक आणि सर्वसाधारण उत्क्रांतीपेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टीकडे, कदाचित विशेष प्रयोगातून घेतलेल्या कृत्रिम झेपेकडे अधिक अंगुलीनिर्देश करतात असे वाटते.

====

ज्ञान कुठल्या माध्यमातून हस्तांतरीत होईल याचे आपले सध्याचे आडाखेच योग्य असतील असे नाही. कुणी सांगावे पृथ्वीवर येणार्‍या विविध प्रारणांच्या माध्यमातून, विविध प्रकारचे ज्ञान पृथ्वीवर येतही असेल. एखाद्या कलावंताला अचानक येणारी स्फूर्ती आणि त्यातून होणारी विलक्षण कलानिर्मितो किंवा एखाद्या वैज्ञानिकाच्या डोक्यात अचानक येणारी कल्पना, त्या कल्पनेने त्याचे झपाटून जाणे आणि नवीन संशोधनाचा पाया घातला जाणे या आणि अशा घटनांमागे, कोण जाणे, दूरवर कुठेतरी, कुणीतरी निर्माण केलेली कालकुपीसारखी एखादी अतिप्रगत ज्ञानाचे जतन करणारी, प्रसारण करणारी, संवर्धन करणारी यंत्रणा देखील असू शकेल.

====

====
समाप्त
====

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

कालकुपी - ४ / ५

---- मागील भागावरून पुढे ----


====
कालकुपीच्या 'पुरण्याच्या' स्थानानुसार, कालकुपी तयार करण्यासाठी, वापरल्या जाणार्‍या पदार्थांमध्ये बदल करावा लागणे आणि कालकुपीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणधर्मांमध्ये फरक पडणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तरीही कालकुपीच्या रचनेसाठी आणि कालकुपीची आवरणे ज्या पदार्थापासून बनलेली असतील, त्यासाठी काही आदर्श गुणधर्म सांगता येतील. हे सर्व साध्य होतीलच असे नाही, मात्र त्या दिशेने प्रयत्न होऊ शकतात.

१) शक्यतो कालकुपी एकापेक्षा अधिक आवरणे असलेली असावी.
२) कालकुपी पूर्णत: हवाबंद (Airtight) असावी (निर्वात नव्हे).  पण कालकुपीच्या आतील हवा, निष्क्रिय वायूचा (Noble Gases/Inert Gases) वापर करून बनलेली असावी.
३) बाह्यावरण उष्णताविरोधक, उष्णतेचे कुसंवाहक असावे. विद्युतविरोधी असावे. (Non-Conducting Material).
४) कालकुपीने बाह्यतापमानातील प्रचंड फरक झेलणे आवश्यक आहे, त्यामुळे तापमानातील टोकाचा फरक झेलू शकेल, अशा पदार्थाने कालकुपी बनली असणे आवश्यक आहे, अगदी वाहत्या लाव्हापाठोपाठ, थंड पाण्याला तोंड देऊ शकेल, इतकी ती सक्षम असावी.
५) शक्यतो तिचा पाण्याशी संबंध येणार नाही याची काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे, पण जरी असा संबंध आला तरी, कालकुपीच्या बाह्य आवरणाचे oxidation होता कामा नये.
६) कालकुपीकडे पाण्याचा, हवेचा वा अन्य कोणताही मोठा दाब सहन करण्याची क्षमता हवी. कालकुपीची आवरणे (किमान बाह्यावरण) पुरेशा कठीण पदार्थापासून बनलेले असावीत,  जेणेकरून मोठे आघात ती सहन करू शकेल.
७) कालकुपी पुरेशी अवजड असणे आवश्यक आहे, ज्यायोगे ती सहजतेने कुठेही (चोरून) नेता येणार नाही किंवा कुठल्याही प्रवाहास ती काही प्रमाणात तरी अवरोध करेल.
८) कालकुपीचे कोणतेही आवरण (किमान बाह्यावरण) अशा पदार्थापासून बनलेले असावे, ज्याचे विघटन सहसा होत नाही किंवा विलक्षण सावकाश होते
९) कालकुपीच्या बाह्यावरण, शक्य तितका अधिक किरणोत्सर्ग झेलण्यास समर्थ असावे.

या आदर्श गुणधर्मांना विचारात घेता,  अशा प्रकारची एकापेक्षा अधिक आवरणे असलेली कालकुपी तयार करण्यासाठी, कोणकोणते पदार्थ उपयोगी पडतील, याबाबत काही पर्याय सुचविण्यात आले आहेत.

वाहत्या लाव्हाचे तापमान १८००॰C च्या पलीकडे सहसा जात नाही, त्यामुळे सर्व आवरणे ज्या कुठल्या पदार्थांनी बनलेली असतील, त्या पदार्थाने यापेक्षा थोड्या अधिक  तापमानाला सहज तोंड देणे अपेक्षित आहे.

यासाठी सुचविण्यात आलेला एक पर्याय सिरॅमिक्सचा आहे. सिरॅमिक्स तसा आपल्या रोजच्या वापरातला पदार्थ आहे, मात्र सिरॅमिक्ससंबंधीच्या विविध संशोधनातून, अतिउच्च तापमानालाही, oxidation न होता तोंड देणारी, ठिसुळपणा हा दोष टाळून, वाढत्या तापमानाबरोबर अधिक कठीण होणारी, एकंदरच बर्‍याचशा रासायनिक प्रक्रियांना तोंड देऊ शकणारी काही सिरॅमिक्स आणि त्याची मिश्रणे तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. पुढील लिंकमध्ये अशा सिरॅमिक्सच्या गुणधर्मांचा ऊहापोह आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Ultra-high-temperature_ceramics

दुसरा पर्याय अर्थातच मिश्रधातूचा (alloys) आहे. अतिउच्च तापमान सहन करू शकणारे, अतिशय कठीण असणारे, बर्‍याचशा रासायनिक अभिक्रिया टाळण्यात यशस्वी ठरणारे असे अनेक मिश्रधातू, औद्योगिक कारणांसाठी शोधण्यात आले आहेत. पुढील लिंकमध्ये त्यासंबंधी काही उल्लेख आहेत.
http://www.nealloys.com/high-temp-alloys.php

याव्यतिरिक्त भविष्यात, आणखी दोन पर्याय बहुदा पुढे येतील. त्यातील एक आहे कार्बन नॅनोट्यूब्सचा. कार्बन नॅनोट्यूब्सचे असंख्य उपयुक्त गुणधर्म आहेत, त्यातील एक आहे अत्युकृष्ट उष्णतावाहकता आणि विद्युतवाहकता. पण याच्या अगदी विरुद्ध असलेला गुणधर्म, म्हणजे उष्णतावरोध आणि विद्युतावरोध, हे साध्य करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या कार्बन नॅनोट्यूब्सचा वापर करता येईल, असे अधिक संशोधनातून लक्षात आले आहे. असाच भविष्यातील दुसरा पर्याय ठरू शकेल, Gorilla Glass चा. मोबाईलच्या स्क्रीनचे संरक्षण करणारी अत्यंत कणखर काच म्हणून ही काच आता आपल्या परिचयाची झाली आहे, पण तिचा उपयोग इथेच थांबणार नाही आहे.  वाहनांमध्ये विंडशील्ड आणि इतर खिडक्यांसाठी सुद्धा, या काचेचा वापर झालेला निकटच्या काळात दिसेल.

कालकुपीस एकापेक्षा अधिक आवरणे असल्याचे किमान दोन लाभ आहेत. पहिला लाभ म्हणजे बाह्यावरणास हानी पोहोचली तरीही आतील आवरणे कालकुपीचे संरक्षण करण्यास उपयोगी पडू शकतात. ही आवरणे भिन्न पदार्थांनी बनलेली असल्यास, बाह्यावरणाची ज्या कारणाने हानी झाली आहे, तेच कारण आतल्या आवरणाची हानी करण्यास कारणीभूत होईलच, असे नाही. दुसरा लाभ असा आहे की दोन आवरणांच्या मध्ये, निष्क्रिय वायूचा (Noble Gases/Inert Gases) थर  किंवा निर्वात पोकळी ठेवणे शक्य झाल्यास, बाहेरील तापमानाचे वहन आतपर्यंत होणार नाही.
सध्याच्या एकंदर परिस्थितीनुसार, कालकुपीच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून, नियंत्रणापलीकडे जाऊ शकेल असा धोका अर्थातच अणुयुद्धाचा वा तत्सम आण्विक घटनेचा आहे.  त्यामुळे, दीर्घकाळाचे उद्दीष्ट ठेवू पाहणारी कालकुपी, एखाद्या अणुस्फोटाला आणि त्यातून निर्माण होणार्‍या आघाताला, आघातलहरीला तोंड देऊ शकेल अशा बंकरमध्ये ठेवणे, कदाचित कालकुपीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय निर्णायक ठरू शकते.

====

कालकुपीच्या तालन यंत्रणेसाठी गुरुत्वाकर्षणाचा वापर हा उत्तम पर्याय असला, तरी (पृथ्वीच्या वा अन्य अवकाशीय वस्तूंच्या) गुरुत्वाकर्षणात काही टोकाचे बदल झाल्यास, या यंत्रणेस त्याचा फटका बसू शकतो. तालन यंत्रणेचा उद्देश भविष्यातील, ठराविक वेळीच, ती कालकुपी उघडता यावी असा असल्यामुळे, 'अणुघड्याळाचा (Atomic Clock) वापर करून, एखादी जास्तीची तालन यंत्रणा बसवता येईल का'  हा विचारही होऊ शकतो. अर्थात या अणुघड्याळाचे कालकुपीवर दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेतली जाणे ही स्वाभाविक आहे.

====

लेखाच्या सुरूवातीस गृहीत धरलेले कालकुपीचे उद्दीष्ट हे पन्नास हजार ते एक लाख वर्षे इतके आहे. या दीर्घ कालावधीचा विचार करता, कालकुपीच्या आत कोणकोणत्या गोष्टी असाव्यात आणि त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या असाव्यात हे कळीचे मुद्दे आहेत. सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था योजल्यानंतर, आत असणार्‍या वस्तु कालातीत नसतील, उद्दीष्ट असलेल्या भविष्यकाळात, त्यांची ओळख होऊ शकत नसेल, तर कालकुपी निरर्थक ठरू शकते. दीर्घकाळाचा विचार करता, तिथे सेंद्रिय पदार्थापासून बनलेल्या कोणत्याही वस्तू ठेवणे अयोग्य ठरेल. तसेच तिथे ठेवण्यात येणार्‍या प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकरण झाले असणे आवश्यक आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे साहाय्य घेऊन निर्माण केलेली, कालकुपी उघडणार्‍यांना एखादी कळ दाबून अत्यंत सहजतेने वापरता येईल किंवा कालकुपी उघडल्यावर जी आपोआप सुरू होईल, अशी व्यवस्था कालकुपीत असल्यास, जगातील अधिकाधिक ज्ञान कालकुपीमध्ये समाविष्ट करता येऊ शकते आणि यामध्ये श्राव्य आणि दृश्य अशा दोन्ही माध्यमांचा वापर होऊ शकतो. कारण अशा रचनेत, कुठल्यातरी प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आणि डिजिटल स्टोरेज अंतर्भूत असेल, हे गृहीतक आहे. परंतु कुठल्याही डिजिटल स्टोरेजचे पुनर्श्रवण, पुनर्प्रेक्षण वा पुनर्वापर एखाद्या बॅटरीशिवाय, उर्जास्त्रोताशिवाय शक्य नाही. कुठल्याही प्रकारचे चार्जिंग नसताना, पन्नास हजार ते एक लाख वर्षे इतक्या टिकू शकतील, अशा उत्तम दर्जाच्या, कुठल्याही प्रकारचे उत्सर्जन न करणार्‍या, स्फोट होण्याचा धोका नसणार्‍या बॅटरी आपल्याला निर्माण करता येतील का ? सध्याच्या तंत्रज्ञानानुसार याचे उत्तर 'बहुदा नाही' असेच येईल.  अर्थात पुनर्श्रवण, पुनर्प्रेक्षण वा पुनर्वापर यासाठी आवश्यक असणारी, ऊर्जा मिळवण्यासाठी यांत्रिकी उपकरणे वा अन्य मार्गांचा विचार करावा लागू शकतो. 

दुसरा मुद्दा असा आहे की असे कोणते डिजिटल स्टोरेज आहे जे इतक्या दीर्घ कालावधीसाठी टिकून राहील ? १००० वर्षे टिकतील असा दावा करणार्‍या M-Disk इथे पुरेशा नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे लक्षात येणारा पर्याय फ्लॅश ड्राइव्हचा. फ्लॅश मेमरीचे आयुष्य किती वेळा ती वाचली आणि लिहिली जाते यावर अवलंबून असते. त्यामुळे तर्कदृष्ट्या, ५०,००० वर्षे अजिबात न वापरलेली फ्लॅश मेमरी, वापराची वेळ येईल तेंव्हा खरंतर व्यवस्थित चालली पाहिजे. पण वापरात नसलेले कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स इतका दीर्घ काळ टिकून राहून अपेक्षित असलेली कार्यक्षमता दाखवेल का ?  ठामपणे सांगणे कठीण आहे.  अतिदीर्घकाळ टिकण्याचे उद्दीष्ट ठेवून बनविलेला Lageos उपग्रह हा तसे म्हटले तर एक 'निष्क्रिय' उपग्रह आहे. (अधिक माहिती : https://lageos.cddis.eosdis.nasa.gov/index.html) आणि त्याच्याकडून दीर्घकाळ टिकलेल्या कोणत्याही डिजिटल स्वरूपातील माहितीचे हस्तांतरण अपेक्षित नाही हे इथे लक्षात घ्यायला हवे.

थोडक्यात, कालकुपीमध्ये डिजिटल स्टोरेज ठेवले तरी त्याच्यावर विसंबता येणार नाही.  कोणत्याही स्वरूपाच्या कागदाच्या माध्यमातून, ज्ञान साठविता येणार नाही हे अगदी उघड आहे, कारण कोणताही कागद इतका दीर्घकाळ टिकू शकणार नाही. अर्थात अधिकाधिक ज्ञान कोरून ठेवण्याचे माध्यम म्हणून शक्य तितके कणखर शिलालेख (उदा. ग्रॅनाईटपासून तयार केलेले) आणि दीर्घकाळ टिकणारे, न गंजणारे, अतिशय  कठीण धातूचे पट (उदा. उत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टील, टिटॅनियमचे मिश्रधातू वा तत्सम इतर धातू) या किंवा अशा प्रकारच्या माध्यमातून ज्ञान व्यक्त करणे उपयुक्त ठरावे. संभाव्य झीज लक्षात घेऊन, शिलालेख वा धातूपट पुरेसे जाड असावेत आणि त्यावर कोरलेली अक्षरे/चित्रे ही देखील पुरेशी 'खोल' असतील याची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ही अक्षरे/चित्रे पुसटण्याचा, नष्ट होण्याचा धोका कमी होईल.  अत्यंत कठीण काच किंवा हिरा यांचा वापर करणे शक्य असल्यास, त्यांचाही मर्यादित माहिती ठेवण्यासाठी विचार होऊ शकतो. काही विशिष्ट प्रक्रिया करून निर्मिलेले कापड, निर्वात वायूंच्या वातावरणात टिकू शकत असल्यास, कापड हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो, मात्र कुठल्याही कापडावर, कोणतीही शाई / रंग इतका दीर्घकाळ टिकेल का हा प्रश्न उद्भवतो. दीर्घकाळ टिकू शकेल अशा दुसर्‍या प्रकारचा, धाग्याच्या माध्यमातून तिथे केलेले विणकाम/रेखाटन देखील कदाचित अधिक वाजवी पर्याय ठरू शकतो.

हे ज्ञान जगात सध्या अस्तित्वात असणार्‍या कोणत्याही भाषेत ठेवणे, संभवत: निरुपयोगी ठरेल असा एक मतप्रवाह आहे.  कारण कोणतीही भाषा इतका दीर्घकाळ टिकू शकेल, त्याच स्वरूपात राहील, त्याच लिपीत लिहिली जाईल याची खात्री देणे शक्य नाही. संगणकाचे साहाय्य घेऊन देखील, प्राचीन काळातील न उलगडलेल्या लिपींबाबत, भाषांबाबत, (त्यांचा अर्थ लावताना,) आपण ज्या प्रकारे अडचणी झेलत आहोत, त्यावरून आपली कोणतीही लिपी वा भाषा कालकुपीच्या माध्यमातून हस्तांतरीत करणे किती अवघड ठरू शकेल, याचा अंदाज बांधता येईल. कदाचित एखादी चित्रलिपी अधिक उपयुक्त ठरेल.  त्यातूनही  सध्याची एखादी भाषा वापरणेच आवश्यक ठरल्यास, ती भाषा, तिची लिपी, वाचणार्‍यापर्यंत सहज पोहोचू शकेल, संभाव्य वाचक, ती भाषा, ती लिपी समजावून घेऊ शकेल, अशा प्रकारच्या मार्गदर्शक साधनाचा तिथे वापर होणे आवश्यक आहे आणि तिथे ठेवण्यापूर्वी त्याच्या विविध चाचण्या ती लिपी, भाषा न जाणणार्‍या विविध व्यक्तीसमूहांमध्ये घेतली जाणे हे तर्कदृष्ट्या सुसंगत आहे. 

====

कालकुपीने नक्की कोणत्या माहितीचे हस्तांतरण करावे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याबाबतीत प्रचंड मतभेद होऊ शकतात.

डिजिटल स्वरूपात ठेवण्यात येणार्‍या माहितीबाबत, किमान जागा हा वादाचा विषय ठरत नसल्याने, तिथे प्रचंड माहिती साठविली जाऊ शकते. ही माहिती जर अपेक्षित भविष्यात वापरली जाणार असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की वापरणारी संस्कृती तंत्रज्ञानात पुढारलेली आहे. अशा वेळेस पूर्ण विश्वकोश, (वि)ज्ञानकोश, तंत्रज्ञानकोश, विविध भाषांची, लिपींची ओळख  शब्दकोश आणि विविध संस्कृतींची माहिती इथे समाविष्ट केली जाऊ शकते. मात्र तरीही जे तंत्रज्ञान विघातक ठरू शकते, त्याचे हस्तांतरण व्हावे की नाही, ही निर्विवाद खल करण्याची गोष्ट आहे. विघातक तंत्रज्ञान (उदा अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान) कुठल्याही परिस्थितीत साठविले जाऊ नये, असे स्वाभाविक वाटले, तरीही काही अपवादात्मक आणि टोकाच्या शक्यता असे ज्ञान देखील (कदाचित सांकेतिक स्वरूपात) समाविष्ट केले जावे, याकडे निर्देश करतात.  (उदा. परग्रहवासीयांच्या एका आक्रमणात, बहुसंख्य मानव प्रजाती नष्ट झाली आणि अंशत: वाचलेल्या लोकांना परग्रहवासीयांच्या पुढील आक्रमणाचा प्रतिकार करणे आवश्यक आहे)

जी माहिती डिजिटल स्वरूपात नाही, तिथे जागेची मर्यादा असेल, त्यामुळे कोणत्या माहितीस प्राधान्य द्यायचे हा मुद्दा अतिमहत्त्वाचा (आणि मतभेदाचा).  इथे मानवाच्या मूलभूत गरजांना, सर्वाधिक प्राधान्य देऊन त्याच्याशी संबंधी सर्व गोष्टींचे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची माहिती असावी असे मत मांडले जाते आणि ते बर्‍याच प्रमाणात योग्य वाटते. भविष्यातील नवीन संस्कृतीचा प्रवास शून्यापासून सुरू होणार असेल, तर त्यांना सर्वात उपयोगी पडणार्‍या गोष्टी याच असतील. पण तो प्रवास शून्यापासून सुरू होत नसेल तर त्या संस्कृतीस उपयुक्त ठरणारे ज्ञान, हे विज्ञानाच्या पायाभूत संकल्पनांपासून, सिद्धांतांपासून ते जीवन सुकर करणार्‍या तंत्रज्ञानातील अत्यंत आवश्यक अशा गोष्टींपर्यंत, चित्रमय स्वरूपात असल्यास कदाचित अधिक उपयुक्त ठरू शकेल. अर्थात जेंव्हा आपले विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधी कोणत्याही गोष्टी, सर्वस्वी अनोळखी, अज्ञात अशा संस्कृतीपर्यंत पोहोचवायच्या असतील, तेंव्हा केवळ चित्रबद्ध करून हे ज्ञान आपल्याला पोहोचविता येईल का ? याचे उत्तर 'बहुदा नाही' असेच येईल. सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असणारी कोणती भाषा आणि कोणती लिपी सर्वाधिक उपयोगी ठरेल या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. जर सध्याची कोणतीही भाषा वापरण्यात बर्‍याच त्रुटी जाणवत असतील, तर कदाचित संगणकाचे साहाय्य घेऊन आपल्याला,  अशा एका लिपीची, भाषेची निर्मिती करावी लागेल, ज्या लिपीच्या, भाषेच्या योगे  आपल्या तंत्रज्ञानातील प्रत्येक प्रक्रिया आणि त्या प्रक्रियांच्या प्रत्येक स्तरावर, वापरलेली प्रत्येक वस्तू/साहित्य/मूलभूत घटक व्यक्त करता येतील.  अशा भाषेची, लिपीची आणि यांचा वापर करून शब्दबद्ध, चित्रबद्ध केलेल्या ज्ञानाच्या, विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतराची चाचणी, एखाद्या आदिवासी/वनवासी जमातीत घेतली जाऊ शकते.

==========
थोडेसे अवांतर
==========
अधिकाधिक माहिती 'कोरण्यासाठी' अक्षरांचा / चित्राक्षरांचा / चित्रांचा आकार शक्य तितका लहान ठेवणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तो किती लहान असावा हा जरा अवघड प्रश्न आहे. तसेच श्राव्य माध्यमात आवाजाची पातळी किती असावी हा देखील काहीसा फसवा प्रश्न आहे.

अतिदीर्घकाळानंतर अस्तित्वात असणार्‍या प्रजातीच्या / संस्कृतीच्या पंचेंद्रियांच्या जाणीवा आणि क्षमता आपल्यासारख्या असतीलच हे ठामपणे सांगणे अशक्य आहे.  उदाहरणार्थ आपल्याला जो आवाज सहज ऐकू येतो किंवा जी अक्षरे सहज दिसतात, तसे त्यांच्याबाबतीत नसेल तर ? याच्या उलटही असू शकते. उदाहरणार्थ जितका आवाज आपण ऐकण्यास योग्य मानतो आणि सहज सहन करू शकतो, तसे त्यांच्याबाबतीत नसल्यास आपला सर्वसाधारण आवाज त्यांना अत्यंत उपद्रवकारक ठरू शकतो. आणखी थोडा टोकाचा विचार केल्यास,  त्यांना दिसत असलेल्या प्रकाशाची  वर्णपंक्ति (Spectrum) आणि त्यांना ऐकू येत असलेल्या ध्वनीची पट्टी (Band) आपल्यासारखी नसेलच तर ?  अर्थात असे अनेक टोकाचे विचार होऊ शकतात,  मात्र कालकुपीच्या आकारासंबंधी आणि आपल्या कल्पनाशक्तीला किती उधळू द्यावे :-) याबाबतीत काही मर्यादा पाळणे आवश्यक असल्याने, तूर्तास या गोष्टींना, कालकुपीच्या संदर्भातील विचाराच्या कक्षेच्या बाहेर ठेवणे तर्कसंगत ठरेल.


====
क्रमश:
====

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

कालकुपी - ३ / ५


---- मागील भागावरून पुढे ----

==
लेखांक २ मध्ये घनदाट अरण्ये, खाणी, सागरतळ,  पर्वतांचा अंतर्भाग, दर्‍या, लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहा इत्यादि ठिकाणांचा कालकुपी लपविण्याची संभाव्य स्थाने म्हणून उल्लेख केला होता. यातील प्रत्येक ठिकाणाचे फायदे तोटे आहेत.

घनदाट अरण्यात, निबिड जंगलात कालकुपी सुरक्षित राहील हे काही प्रमाणात खरे आहे, पण ज्या प्रमाणात निर्वनीकरण सुरू आहे, ते पाहता काही शतकातच ती कालकुपी, शहरीकरणाच्या एखाद्या प्रकल्पात उघडकीस येऊ शकते.  अ‍ॅमेझॉनच्या जंगलाचा साधारण १३% भाग (सुमारे ७ लाख वर्ग किमी) गेल्या ५० वर्षात जंगलतोडीमुळे नष्ट झाला आहे. सरासरी १ लक्ष ३७ हजार वर्ग किमी इतके पृथ्वीवरचे जंगल दरवर्षी नष्ट होत आहे.

उपयोग संपलेल्या खाणी बंद करण्याचे देखील एक शास्त्र आहे आणि अशा खाणींचा, अन्य कामांसाठी पुनर्वापर करण्याची काही उदाहरणे आहेत. संग्रहालये, करमणुकीची ठिकाणे,, उद्याने, कृषिक्षेत्र अशा विविध प्रकारांनी, बंद करण्यात आलेल्या खाणींचा उपयोग केल्याची उदाहरणे आहेत.  त्यातील सर्वात लक्षणीय आहे INCO's Creighton mine, Sudbury, Ontario इथे उभारण्यात आलेली न्यूट्रिनो वेधशाळा. खाणींमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास आणि खनिजे, पाणी, दूषित हवा इत्यादींपासून अशी खाण सुरक्षित करणे शक्य असल्यास, तिचा कालकुपी पुरण्यासाठी/सुरक्षितपणे ठेवण्यासाठी वापर हौऊ शकतो.

सागरतळातील कालकुपीचा सर्वात मोठा फायदा, तिथे पोहोचणे अतिशय अवघड असेल हा आहे, मात्र आज असलेला हा फायदा भविष्यातील तोटा ठरू शकतो. भविष्यातील संस्कृतीकडे सागरतळापर्यंत पोहोचण्याची क्षमता किती आहे यावर कालकुपीच्या उद्दिष्टाचे यशापयश अवलंबून आहे. शिवाय पाण्यापासून संभवणारे सर्व धोके आणि तिथला पाण्याचा प्रचंड दाब या गोष्टी कालकुपीच्या टिकाऊपणासाठी विलक्षण घातक ठरू शकतात.

पर्वतांचा अंतर्भाग ही दीर्घकालीन अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित जागा असू शकते, मात्र भविष्यात कदाचित अशा पर्वतातून, रस्त्यांसाठी बोगदे, घाटरस्ते बनविले जातील, कदाचित दगडांसाठी, मातीसाठी तिथे खनन होईल आणि मग या कालकुपीचे अस्तित्व वेळेआधी उघडकीस येईल, ही शक्यता नाकारता येत नाही.

सर्वसाधारण स्थितीत मानवाचा कमीतकमी उपद्रव या दृष्टिकोनातून, खोल दर्‍या हा कालकुपींसाठी सर्वाधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो, मात्र दर्‍यांमध्ये सर्वसाधारणत: पावसाचे प्रमाण बरेच अधिक असते, तसेच प्रलय वा तत्सम नैसर्गिक आपत्तींमध्ये, अशा कालकुपीची मोठी हानी होण्याची शक्यता बरीच वाढते. याव्यतिरिक्त कालकुपी जितकी अधिक खोलवर पुरली जाईल, तितकी तिची भविष्यात सापडण्याची शक्यता (भूस्तरातील उलथापालथीची अपवादात्मक परिस्थिती वगळल्यास) कमी होत जाते असे म्हणता येईल.

लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहांचा वापर, भुयारांचे तयार जाळे  या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे, शिवाय अतिदूरच्या भविष्यात पृथ्वीवरील परिस्थिती प्रमाणाबाहेर बिघडल्यास, तेंव्हा अस्तित्वात असलेली संस्कृती या लाव्हागुहांचा आश्रयस्थान म्हणून वापर करेल ही शक्यता, उद्दिष्टाच्या सफलतेसाठी चांगली आहे. मात्र या लाव्हाट्यूब्सना कारणीभूत ठरलेला ज्वालामुखी मृत असणे किंवा तो प्रचंड कालावधीसाठी निद्रिस्त राहील याचे ठाम ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे.

वाळवंटात वाळूचे स्थलांतरण होण्याची प्रक्रिया वाळूच्या वादळांमुळे अनेकदा घडते, त्यामुळे वाळवंटात कालकुपी पुरायची झाल्यास अधिक खोलवर जाणे आवश्यक ठरते.  तसेच तापमानातील रोजचे तीव्र बदल हाताळू शकेल अशी व्यवस्था इथे अपरिहार्य आहे. पाण्यापासून निर्माण होणारे धोके इथे सर्वात कमी संभवतात.

उत्तर किंवा  दक्षिण ध्रुवाजवळ, बर्फात खोलवर कालकुपी पुरून ठेवणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे.  मात्र अतिदीर्घकाळाचा विचार करता, चुंबकीय ध्रुवांमधील बदलाचा (Geomagnetic Reversal), नैसर्गिक अक्षीय ध्रुवांवर, पृथ्वीवरील वातावरणावर, खंडांच्या रचनेवर, स्थानावर  नक्की कसा परिणाम होतो यासंदर्भात मतमतांतरे आहेत. त्यामुळे तिथे पुरलेल्या कालकुपीला अनेक अनपेक्षित संकटे झेलावी लागू शकतात.

====

वरील सर्व ठिकाणांचे फायदेतोटे आहेत, मात्र तरीही कुठलीही जागा निवडताना
भूकंपप्रवण क्षेत्र टाळले जाईल,
ती जागा शक्य तितकी कोरडी असेल,
ज्वालामुखीपासून खूप दूर असेल,
तिथे मानवी उपद्रव होण्याची शक्यता सर्वात कमी असेल,
संभाव्य नैसर्गिक आपत्तींमध्ये, ती जागा सहजतेने उघडी पडणार नाही,
तिथे तापमानातील अतितीव्र बदल झेलावे लागणार नाहीत
इत्यादि गोष्टी निश्चितपणे बघितल्या जातील.  या अनुषंगाने पृथ्वीबाह्य ठिकाणांचा विचारही करण्यात आला आहे. त्याचे सध्या स्थूलमानाने चार गट आहेत.


१) पृथ्वीभोवती अवकाशस्थानकात, उपग्रहांमध्ये, Probeच्या माध्यमातून, अशी कालकुपी पृथ्वीभोवती, चंद्राभोवती  किंवा दुसर्‍या एखाद्या ग्रहाभोवती, उपग्रहाभोवती फिरती ठेवणे आणि ठराविक दीर्घ कालावधीनंतर ती पृथ्वीवर खाली उतरेल अशी व्यवस्था करणे.

KEO नावाचा एक प्रकल्प २००३ मध्ये कार्यान्वित होणार होता, ज्यामध्ये एक कालकुपी एका प्रोबच्या माध्यमातून पृथ्वीभोवती फिरती ठेवण्यात येणार होती आणि ५०,००० वर्षांनी त्या प्रोबने पृथ्वीवरच्या वातावरणात प्रवेश करावा, यासाठी त्यात यंत्रणा असणार होती. मात्र काही ना काही कारणामुळे हा प्रकल्प सतत पुढे ढकलला गेला आहे आणि आता २०१९ मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल असे सांगण्यात येत आहे.  (KEO हे लघुरूप नसून सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या काही भाषांमधील सर्वाधिक वापरले जाणारे ध्वनी असे यामागील तर्कशास्त्र आहे !).   LAGEOS या मे १९७६ मध्ये सोडण्यात आलेल्या  उपग्रहामध्ये एक छोटी कालकुपी आहे. हा उपग्रह साधारण ८४ लक्ष वर्षांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल असे अनुमान आहे.
http://www.keo.org
https://lageos.cddis.eosdis.nasa.gov/


२) चंद्रावर किंवा दुसर्‍या एखाद्या ग्रहावर, उपग्रहावर किंवा लघुग्रहावर सुरक्षित जागी (उदाहरणार्थ विवरे, लाव्हाट्यूब्स), कालकुपी ठेवण्याची / पुरली जाईल अशी व्यवस्था करणे. 

अपोलो ११ अंतराळयानाच्या लँडरमधील वेगळ्या करण्यात आलेल्या एका भागामध्ये (Lunar Module) एक छोटी कालकुपीसम ( plaque) वस्तू ठेवण्यात आली आहे. पण ही अर्थातच 'पुरलेल्या' अवस्थेत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Apollo_11


३) एखाद्या अवकाशयानाच्या माध्यमातून कालकुपी अवकाशात धाडणे. 

पायोनियर १० आणि पायोनियर ११ या दोन्ही अंतराळयानात कालकुपीसम वस्तू (plaque) मधून काही माहिती अवकाशात पाठविण्यात आली आहे.   दोन्ही व्हॉयेजर अंतराळयांनामध्ये सर्व प्रकारच्या माहितीने खच्चून भरलेली  गोल्डन रेकॉर्ड पाठविण्यात आली आहे.  अर्थात ही चारही अंतराळयाने अनंताच्या प्रवासास निघाली आहेत आणि ही माहिती पृथ्वीवर परत कशी येईल, कधी येईल किंवा भविष्यातील पृथ्वीवरची कोणतीही संस्कृती या गोष्टी परत कशी मिळवेल हा प्रश्न अनुत्तरित आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Pioneer_10
https://en.wikipedia.org/wiki/Pioneer_11
https://en.wikipedia.org/wiki/Voyager_1
https://en.wikipedia.org/wiki/Voyager_2


४) दीर्घमुदतीच्या (आणि सूर्यमालेतील ज्याची कक्षा बर्‍यापैकी निश्चित आहे अशा) एखाद्या धूमकेतुवर कालकुपी ठेवणे.

67P/Churyumov–Gerasimenko या धूमकेतुवर ESA ने पाठविलेल्या Rosetta या अवकाशयानासोबत Philae हा लँडर होता. या लँडरसोबत Rosetta disc या नावाने ओळखली जाणारी, निकेलच्या एका मिश्रधातूपासून बनविलेली एक तबकडी पाठविण्यात आली आहे. या तबकडीमध्ये विविध भाषांमधील संदेश व प्रचंड माहिती आहे. साधारण साडेसहा वर्षांनी हा धूमकेतू सूर्याची फेरी करतो आणि ती तबकडी किमान २००० वर्षे टिकेल असा अंदाज आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Rosetta_Project


कालकुपीसाठी जे धोके पृथ्वीवर संभवतात, त्यातील बरेचसे धोके अंतराळातही संभवू शकतात. शिवाय अंतराळात Collision आणि अवकाशीय प्रारणांचा तीव्र मारा हे धोके जरा जास्तच तीव्र आहेत. एखाद्या ग्रहावरच्या/उपग्रहावरच्या वातावरणाशी, कालकुपीच्या अस्तित्वासाठी  विपरीत ठरू शकतील अशा घटनांशी आपण पूर्णत:  परिचित नाही. जितका पृथ्वीचा अभ्यास आपण केला आहे, त्याच्या एक शतांशही, आपला दुसर्‍या कोणत्याही ग्रहाचा, उपग्रहाचा अभ्यास नाही. त्यामुळे कुठल्याही ग्रहावर/उपग्रहावर/धूमकेतूवर कालकुपी ठेवणे/पुरणे, उद्दीष्ट साध्य होईपर्यंत ती कालकुपी तिथे टिकून राहणे आणि भविष्यातील ज्या संस्कृतीसाठी ती कालकुपी आपण ठेवत आहोत, तिच्याकडे अवकाशप्रवासाची क्षमता असणे, त्यांना कालकुपी दुसर्‍या ग्रहावर शोधण्याची बुद्धी होणे, त्यांना ती कालकुपी तिथे सापडणे या सर्व टोकाच्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. याव्यतिरिक्त पृथ्वीवर येणार्‍या खर्चाच्या, कितीतरी अधिकपट खर्च  अंतराळातील कालकुपीसाठी येईल हे उघड आहे. त्यातल्या त्यात पृथ्वीवर, स्वत:हून सुरक्षितपणे परत येणारी अवकाशस्थ कालकुपी अधिक उपयोगाची ठरेल असे म्हणता येईल.  एका अटळ परिस्थितीमध्ये. अंतराळातील कालकुपीचा एक निर्विवाद फायदा होऊ शकतो. ही परिस्थिती आहे पृथ्वीचा संभाव्य नाश वा अन्य कोणत्याही कारणाने, दूरच्या भविष्यात तत्कालीन मानवाला पृथ्वी सोडावी लागणे. अशा वेळेसे संस्कृतीचे, ज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे कालकुपीतील भांडार, पृथ्वीत्याग करणार्‍या मानवासाठीच कदाचित उपयुक्त ठरावे.

वर उल्लेखलेले विविध पर्याय वाचल्यावर असे म्हणता येईल की एकाच ठिकाणी कालकुपी पुरण्यापेक्षा / ठेवण्यापेक्षा, त्या कालकुपीच्या अनेक आवृत्ती बनवून, तिचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, जितके विविध स्थानांचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात ,त्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात आला, तर कालकुपी सापडण्याची आणि तिचे उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता बरीच वाढू शकते. पण त्यासाठी कालकुपीचा प्रकल्प, देशस्तरावर न राबविता, मानवजातीचा प्रकल्प म्हणून, संयुक्तपणे पूर्ण जगभर आणि अंतराळातील सर्व साध्य ठिकाणी राबविणे बहुदा अधिक योग्य ठरेल.

====
क्रमश:
====

=========

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

कालकुपी - २ / ५


विविध देशांनी, संस्थांनी काही दशकांचे, काही शतकांचे उद्दीष्ट ठेवून पुरलेल्या कालकुपींची संख्या मोठी आहे.  भारतातील ज्ञात कालकुपी याच गटात येतात.  किमान एका सहस्रकाचे उद्दीष्ट ठेवून जमिनीत पुरलेल्या कालकुपींमध्ये, ज्या मोजक्या कालकुपी आहेत, त्यातील काही विशेष उल्लेखनीय आहेत; मात्र यातील कोणत्याही कालकुपीचा उल्लेख या लेखात करावा की नाही या बाबतीत मी थोडा संभ्रमात होतो. वास्तविक त्यांच्याबद्दल मर्यादित माहिती आंतरजालावर या आधीच उपलब्ध आहे आणि अशी माहिती उपलब्ध केली आहे, त्याअर्थी तसे करणे आवश्यक वाटले असावे किंवा असुरक्षित वाटले नसावे.

दीर्घकालीन कालकुपी, तिच्या उद्दिष्टात यशस्वी होण्यासाठीची काही गृहीतके,  पहिल्या लेखांकात नमूद केली आहेत. ऋणात्मक दृष्टिने पाहिल्यास, एका प्रकारे ही गृहीतके, कालकुपीच्या संभाव्य अपयशाची कारणे देखील ठरू शकतात. त्या अपयशाच्या कारणांमध्ये, आणखी एक महत्त्वाचे कारण जोडले जाऊ शकते आणि ते आहे प्रसिद्धी. किंबहुना प्रसिद्धीचा सोस किंवा हव्यास.

अल्पकालीन कालकुपीची नोंद असणे, तिचा ठावठिकाणा माहीत असणे, ती उघडण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची तालन यंत्रणा (Locking Mechanism) असल्यास त्या यंत्रणेची 'किल्ली' जपून ठेवलेली असणे ही अत्यंत योग्य आणि स्वाभाविक गोष्ट आहे, मात्र दीर्घकालीन कालकुपीच्या बाबतीत,  तिच्या ठावठिकाणाची प्रसिद्धी ही अत्यंत घातक गोष्ट ठरू शकते आणि त्याचे महत्त्वाचे कारण आहे तिच्या 'चोरीची शक्यता'. 

कालकुपी जसजशी जुनी होत जाईल, तसतशी तिने सामावून घेतलेल्या गोष्टींचे बाजारातील मूल्य वाढत जाते आणि याचे कारण त्या गोष्टींच्या उपयुक्ततेपेक्षा, त्यांची Antiques किंवा संग्रहणीय म्हणून  प्राप्त होणार्‍या लौकिकात, गौरवात आहे. अशा गोष्टींचा बाजार प्रचंड मोठा आहेच, पण तिथे नीती-अनीतीचा विधिनिषेध न बाळगणार्‍या आणि पडद्याआड राहून, या बाजारातील प्रचंड उलाढाल हाताळणार्‍या टोळ्यांची सत्ता आहे हे अधिक भीषण वास्तव आहे. 

केवळ काही दशके जुन्या झालेल्या वस्तुबाबत आपल्यापैकी बरेच जण भावुक होत असतील, कित्येकांच्या संग्रहात अशा वस्तु जाणीवपूर्वक जपलेल्या असतील, मग काही शतके जुन्या झालेल्या वस्तूंबाबत, विशेषत: त्याचे बाजारमूल्य प्रचंड असल्यास काय घडू शकेल हे मुद्दामहून सांगण्याची आवश्यकता नाही.  अशावेळेस त्याचा ठावठिकाणा घोषित करणे, म्हणजे सुरक्षेसाठीच्या प्रणाली आणि त्या प्रणालींवरचा खर्च, प्रमाणाबाहेर वाढण्याला निमंत्रण ठरावे. याबाबतीत एक मुद्दा असा मांडला जातो की जिथे अतिप्रचंड सुरक्षाव्यवस्था अपरिहार्य आहे, उदाहरणार्थ संग्रहालये किंवा राजकीय इमारती किंवा तत्सम दुसर्‍या इमारती, अशाच ठिकाणी या कालकुपी पुराव्यात. अल्पकालीन कालकुपींसाठी ही अत्यंत योग्य गोष्ट ठरावी, मात्र तरीही ती चोख व्यवस्था आहे असे म्हणता येणार नाही. भुयार खणून बँक लुटल्याची, एटीएम लुटल्याची घटना जर घडू शकत असेल, तर काही शतके जुन्या असलेल्या कालकुपीसाठी ही घटना घडणे असंभाव्य नाही. मग दीर्घकालीन कालकुपींच्या संदर्भात, त्या सुरक्षाव्यवस्थेच्या निरंतरतेची ग्वाही कशी द्यावी ? जगातील कोणत्याही भूभागावरील राज्यव्यवस्था किंवा शासनव्यवस्था  एकाच ठिकाणाहून किंवा एकाच नियमावलीच्या आधाराने किंवा एकाच तत्वाने चालल्याची सर्व उदाहरणे (अतिप्राचीन / पौराणिक उदाहरणे वगळल्यास) जास्तीत जास्त दोन-तीन शतकांपुरती मर्यादेत आहेत आणि जी काही अशी उदाहरणे आहेत, तिथे अनिश्चिततेचे सावट सतत राहिलेले आहे.

याच संदर्भात मांडला गेलेला दुसरा मुद्दा हा, त्यांच्या अचूक ठावठिकाणा सांगणार्‍या माहितीला गुप्त ठेवावे किंवा मर्यादित व्यक्तींना त्या माहितीचा स्त्रोत उपलब्ध असावा आणि ही माहिती प्रचंड सुरक्षेत ठेवून, ती कधी उघड होईल याची मुदत ठरवून ठेवावी असा आहे. 'Classified Documents' असा शिक्का मारल्या जाणार्‍या कागदपत्रांबाबत, अशाच प्रकारचे धोरण अनेक देश वापरतात. त्यामुळे तसे बघायला गेले तर हा एक चांगला उपाय आहे. मात्र शासनव्यवस्थेतील अनिश्चितता आणि संभाव्य भ्रष्टाचार, अशा कागदपत्रांच्या गोपनीयतेच्या संदर्भात मोठा अडथळा ठरू शकतो.

याव्यतिरिक्त सुचविलेला गेलेला आणखी एक उपउपाय, ही माहिती सांकेतिक भाषेत लिहिलेली असावी आणि तिचे 'असांकेतिकीकरण' करण्याची किंवा तिचा उलगडा करण्याची व्यवस्था, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कालबद्ध करण्यात यावी असा आहे. हा प्रकार म्हणजे 'पुरलेल्या खजिन्याचा' ठावठिकाणा सांगणारी माहिती एका 'तिजोरीत' बंद असावी आणि त्या 'तिजोरीची किल्ली' कुठे ठेवली हे सांगणारी व्यवस्था ठराविक काळासाठी गुप्त राहील अशी काळजी घेण्यासारखे आहे. अर्थातच एकावर एक अशा प्रकारची सुरक्षाव्यवस्थेची आवरणे रचण्यासारखा हा उपाय आहे. दीर्घकालीन उद्दीष्ट लक्षात घेतल्यास, यातील एक जरी स्तर लोप पावला तर या 'खजिन्याचा शोध' ही एक मोहीम होऊन बसेल. मूळात दीर्घकालीन उद्दीष्ट लक्षात घेता, पहिल्या लेखांकातील गृहीतके अपयशी ठरण्याचे कोणतेही कारण या सुरक्षाव्यवस्थेच्या विरोधात जाऊ शकते.

थोडक्यात, लेखांक १ मधील मुद्दा क्रमांक २, अर्थात कालकुपी सापडण्याचा मुद्दा  आणि कालकुपीची गुप्तता यातील सुवर्णमध्य, कालकुपीच्या उद्दिष्टांना सफल करण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. हा सुवर्णमध्य सध्याच्या इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने साधणे, ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी  फारशी उपयुक्त गोष्ट ठरेलच असे ठामपणे सांगणे अवघड आहे. तंत्रज्ञानातील बदलांचा, तंत्रज्ञान लोप पावण्याचा वेग दीर्घकालीन उद्दिष्टासाठी  मोठा अडथळा ठरु शकतो. सध्याच्या तंत्रज्ञानात वापरण्यात येणार्‍या गोष्टी देखील 'सर्व संकटांना' तोंड देऊन टिकून राहतीलच असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही.  त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार्‍या आणि शक्य तितक्या नैसर्गिक आपत्तींना झेलूनही, प्रचंड काळ टिकून राहू शकतील, याची शक्यता अधिक असणार्‍या गोष्टीच कालकुपींच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी वापराव्यात, हा मतप्रवाह तसा योग्य वाटतो. स्वाभाविकच अशा गोष्टींमध्ये पहिला संभाव्य उमेदवार आहे 'दगड' आणि दुसरा अतिकठीण, प्रचंड तापमानाला तोंड देऊ शकेल, न गंजेल, न क्षरेल असे मिश्रधातू. अतिशय टिकाऊ दगड वापरुन बनविलेल्या इमारती, वस्तु शतकानुशतकेच नव्हे तर काही सहस्रके टिकल्याची काही उदाहरणे इतिहासात आहेत.


कालकुपी दगड आणि / किंवा कणखर मिश्रधातू वापरुन तयार करावी आणि ती 'लपविण्याची' जागा

देखील तशाच प्रकारे दगड व दीर्घायुष्य असलेला मिश्रधातू वापरुन सुरक्षित केलेली असावी हा पर्याय तुलनेने अधिक योग्य वाटतो. कालकुपी लपविण्याची जागा ही मानवनिर्मित असावी की निसर्गनिर्मित, हा दोन्ही बाजूंना फायदे तोटे असणारा मुद्दा आहे. त्यामुळे दोन्हींचा संयोग साधून निर्माण केलेली जागा, अधिक उपयुक्त ठरावी हे मत देखील योग्य वाटते. तिचे ठिकाण सर्व संभाव्य नैसर्गिक आपत्तींपासून शक्य तितके सुरक्षित राहील असे असलेच पाहिजे, त्याचबरोबर ते अवेळी होणार्‍या सर्व प्रकारच्या मानवी वा अन्य हस्तक्षेपांपासून, आक्रमणांपासून सुरक्षित असले पाहिजे.  या जागेची आणि कालकुपीची तालन यंत्रणा (Locking Mechanism) देखील शक्यतो नैसर्गिक तत्वे (उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण) वापर करून बनविलेली असावीत. काही इंग्लिश चित्रपटांमधून अशा प्रकारच्या तालन यंत्रणेची चमत्कृती वापरलेली दिसते.  Indiana Jones चे चित्रपट आणि Lara Croft चे  चित्रपट विशेष उल्लेखनीय.

ही जागा कुठे असावी याबाबत देखील विविध मतप्रवाह आहेत, घनदाट अरण्यात, खाणींमध्ये खोलवर, समुद्राच्या तळाशी,  पर्वतांच्या अंतर्भागात, खोल दरीत, ज्वालामुखीच्या उद्रेकात वाहिलेल्या लाव्हामुळे बनलेल्या लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहांमध्ये आदि पर्याय विक्षिप्त वाटत असले तरी ते अगदीच अव्यवहार्य नाहीत. त्यातील प्रत्येकाचे फायदे-तोटे आहेत. मात्र कालकुपी अवकाशात किंवा एखाद्या अवकाशीय वस्तूवर ठेवण्याचा मार्ग, निर्विवाद अभिनव आहे.

कालकुपीच्या संभाव्य जागा आणि कालकुपीची रचना यासंदर्भात थोडा अधिक ऊहापोह  पुढील भागात.

====
क्रमश:
====

======