विविध देशांनी, संस्थांनी काही दशकांचे, काही शतकांचे उद्दीष्ट ठेवून पुरलेल्या कालकुपींची संख्या मोठी आहे. भारतातील ज्ञात कालकुपी याच गटात येतात. किमान एका सहस्रकाचे उद्दीष्ट ठेवून जमिनीत पुरलेल्या कालकुपींमध्ये, ज्या मोजक्या कालकुपी आहेत, त्यातील काही विशेष उल्लेखनीय आहेत; मात्र यातील कोणत्याही कालकुपीचा उल्लेख या लेखात करावा की नाही या बाबतीत मी थोडा संभ्रमात होतो. वास्तविक त्यांच्याबद्दल मर्यादित माहिती आंतरजालावर या आधीच उपलब्ध आहे आणि अशी माहिती उपलब्ध केली आहे, त्याअर्थी तसे करणे आवश्यक वाटले असावे किंवा असुरक्षित वाटले नसावे.
दीर्घकालीन कालकुपी, तिच्या उद्दिष्टात यशस्वी होण्यासाठीची काही गृहीतके, पहिल्या लेखांकात नमूद केली आहेत. ऋणात्मक दृष्टिने पाहिल्यास, एका प्रकारे ही गृहीतके, कालकुपीच्या संभाव्य अपयशाची कारणे देखील ठरू शकतात. त्या अपयशाच्या कारणांमध्ये, आणखी एक महत्त्वाचे कारण जोडले जाऊ शकते आणि ते आहे प्रसिद्धी. किंबहुना प्रसिद्धीचा सोस किंवा हव्यास.
अल्पकालीन कालकुपीची नोंद असणे, तिचा ठावठिकाणा माहीत असणे, ती उघडण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची तालन यंत्रणा (Locking Mechanism) असल्यास त्या यंत्रणेची 'किल्ली' जपून ठेवलेली असणे ही अत्यंत योग्य आणि स्वाभाविक गोष्ट आहे, मात्र दीर्घकालीन कालकुपीच्या बाबतीत, तिच्या ठावठिकाणाची प्रसिद्धी ही अत्यंत घातक गोष्ट ठरू शकते आणि त्याचे महत्त्वाचे कारण आहे तिच्या 'चोरीची शक्यता'.
कालकुपी जसजशी जुनी होत जाईल, तसतशी तिने सामावून घेतलेल्या गोष्टींचे बाजारातील मूल्य वाढत जाते आणि याचे कारण त्या गोष्टींच्या उपयुक्ततेपेक्षा, त्यांची Antiques किंवा संग्रहणीय म्हणून प्राप्त होणार्या लौकिकात, गौरवात आहे. अशा गोष्टींचा बाजार प्रचंड मोठा आहेच, पण तिथे नीती-अनीतीचा विधिनिषेध न बाळगणार्या आणि पडद्याआड राहून, या बाजारातील प्रचंड उलाढाल हाताळणार्या टोळ्यांची सत्ता आहे हे अधिक भीषण वास्तव आहे.
केवळ काही दशके जुन्या झालेल्या वस्तुबाबत आपल्यापैकी बरेच जण भावुक होत असतील, कित्येकांच्या संग्रहात अशा वस्तु जाणीवपूर्वक जपलेल्या असतील, मग काही शतके जुन्या झालेल्या वस्तूंबाबत, विशेषत: त्याचे बाजारमूल्य प्रचंड असल्यास काय घडू शकेल हे मुद्दामहून सांगण्याची आवश्यकता नाही. अशावेळेस त्याचा ठावठिकाणा घोषित करणे, म्हणजे सुरक्षेसाठीच्या प्रणाली आणि त्या प्रणालींवरचा खर्च, प्रमाणाबाहेर वाढण्याला निमंत्रण ठरावे. याबाबतीत एक मुद्दा असा मांडला जातो की जिथे अतिप्रचंड सुरक्षाव्यवस्था अपरिहार्य आहे, उदाहरणार्थ संग्रहालये किंवा राजकीय इमारती किंवा तत्सम दुसर्या इमारती, अशाच ठिकाणी या कालकुपी पुराव्यात. अल्पकालीन कालकुपींसाठी ही अत्यंत योग्य गोष्ट ठरावी, मात्र तरीही ती चोख व्यवस्था आहे असे म्हणता येणार नाही. भुयार खणून बँक लुटल्याची, एटीएम लुटल्याची घटना जर घडू शकत असेल, तर काही शतके जुन्या असलेल्या कालकुपीसाठी ही घटना घडणे असंभाव्य नाही. मग दीर्घकालीन कालकुपींच्या संदर्भात, त्या सुरक्षाव्यवस्थेच्या निरंतरतेची ग्वाही कशी द्यावी ? जगातील कोणत्याही भूभागावरील राज्यव्यवस्था किंवा शासनव्यवस्था एकाच ठिकाणाहून किंवा एकाच नियमावलीच्या आधाराने किंवा एकाच तत्वाने चालल्याची सर्व उदाहरणे (अतिप्राचीन / पौराणिक उदाहरणे वगळल्यास) जास्तीत जास्त दोन-तीन शतकांपुरती मर्यादेत आहेत आणि जी काही अशी उदाहरणे आहेत, तिथे अनिश्चिततेचे सावट सतत राहिलेले आहे.
याच संदर्भात मांडला गेलेला दुसरा मुद्दा हा, त्यांच्या अचूक ठावठिकाणा सांगणार्या माहितीला गुप्त ठेवावे किंवा मर्यादित व्यक्तींना त्या माहितीचा स्त्रोत उपलब्ध असावा आणि ही माहिती प्रचंड सुरक्षेत ठेवून, ती कधी उघड होईल याची मुदत ठरवून ठेवावी असा आहे. 'Classified Documents' असा शिक्का मारल्या जाणार्या कागदपत्रांबाबत, अशाच प्रकारचे धोरण अनेक देश वापरतात. त्यामुळे तसे बघायला गेले तर हा एक चांगला उपाय आहे. मात्र शासनव्यवस्थेतील अनिश्चितता आणि संभाव्य भ्रष्टाचार, अशा कागदपत्रांच्या गोपनीयतेच्या संदर्भात मोठा अडथळा ठरू शकतो.
याव्यतिरिक्त सुचविलेला गेलेला आणखी एक उपउपाय, ही माहिती सांकेतिक भाषेत लिहिलेली असावी आणि तिचे 'असांकेतिकीकरण' करण्याची किंवा तिचा उलगडा करण्याची व्यवस्था, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कालबद्ध करण्यात यावी असा आहे. हा प्रकार म्हणजे 'पुरलेल्या खजिन्याचा' ठावठिकाणा सांगणारी माहिती एका 'तिजोरीत' बंद असावी आणि त्या 'तिजोरीची किल्ली' कुठे ठेवली हे सांगणारी व्यवस्था ठराविक काळासाठी गुप्त राहील अशी काळजी घेण्यासारखे आहे. अर्थातच एकावर एक अशा प्रकारची सुरक्षाव्यवस्थेची आवरणे रचण्यासारखा हा उपाय आहे. दीर्घकालीन उद्दीष्ट लक्षात घेतल्यास, यातील एक जरी स्तर लोप पावला तर या 'खजिन्याचा शोध' ही एक मोहीम होऊन बसेल. मूळात दीर्घकालीन उद्दीष्ट लक्षात घेता, पहिल्या लेखांकातील गृहीतके अपयशी ठरण्याचे कोणतेही कारण या सुरक्षाव्यवस्थेच्या विरोधात जाऊ शकते.
थोडक्यात, लेखांक १ मधील मुद्दा क्रमांक २, अर्थात कालकुपी सापडण्याचा मुद्दा आणि कालकुपीची गुप्तता यातील सुवर्णमध्य, कालकुपीच्या उद्दिष्टांना सफल करण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. हा सुवर्णमध्य सध्याच्या इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने साधणे, ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी फारशी उपयुक्त गोष्ट ठरेलच असे ठामपणे सांगणे अवघड आहे. तंत्रज्ञानातील बदलांचा, तंत्रज्ञान लोप पावण्याचा वेग दीर्घकालीन उद्दिष्टासाठी मोठा अडथळा ठरु शकतो. सध्याच्या तंत्रज्ञानात वापरण्यात येणार्या गोष्टी देखील 'सर्व संकटांना' तोंड देऊन टिकून राहतीलच असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही. त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार्या आणि शक्य तितक्या नैसर्गिक आपत्तींना झेलूनही, प्रचंड काळ टिकून राहू शकतील, याची शक्यता अधिक असणार्या गोष्टीच कालकुपींच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी वापराव्यात, हा मतप्रवाह तसा योग्य वाटतो. स्वाभाविकच अशा गोष्टींमध्ये पहिला संभाव्य उमेदवार आहे 'दगड' आणि दुसरा अतिकठीण, प्रचंड तापमानाला तोंड देऊ शकेल, न गंजेल, न क्षरेल असे मिश्रधातू. अतिशय टिकाऊ दगड वापरुन बनविलेल्या इमारती, वस्तु शतकानुशतकेच नव्हे तर काही सहस्रके टिकल्याची काही उदाहरणे इतिहासात आहेत.देखील तशाच प्रकारे दगड व दीर्घायुष्य असलेला मिश्रधातू वापरुन सुरक्षित केलेली असावी हा पर्याय तुलनेने अधिक योग्य वाटतो. काल
कुपी लपविण्याची जागा ही मानवनि
र्मित असावी की निसर्गनिर्मित, हा दोन्ही बाजूंना फायदे तोटे असणारा मुद्दा आहे. त्यामुळे दोन्हींचा संयोग साधून निर्माण केलेली जागा, अधिक उपयुक्त ठरावी हे मत देखील योग्य वाटते. तिचे ठिकाण सर्व संभाव्य नैसर्गिक आपत्तींपासून शक्य तितके सुरक्षित राहील असे असलेच पाहिजे, त्याचबरोबर ते अवेळी होणार्या सर्व प्रकारच्या मानवी वा अन्य हस्तक्षेपांपासून, आक्रमणांपासून सुरक्षित असले पाहिजे. या जागेची आणि कालकुपीची तालन यंत्रणा (Locking Mechanism) देखील शक्यतो नैसर्गिक तत्वे (उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण) वापर करून बनविलेली असावीत. काही इंग्लिश चित्रपटांमधून अशा प्रकारच्या तालन यंत्रणेची चमत्कृती वापरलेली दिसते. Indiana Jones चे चित्रपट आणि Lara Croft चे चित्रपट विशेष उल्लेखनीय. ही जागा कुठे असावी याबाबत देखील विविध मतप्रवाह आहेत, घनदाट अरण्यात, खाणींमध्ये खोलवर, समुद्राच्या तळाशी, पर्वतांच्या अंतर्भागात, खोल दरीत, ज्वालामुखीच्या उद्रेकात वाहिलेल्या लाव्हामुळे बनलेल्या लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहांमध्ये आदि पर्याय विक्षिप्त वाटत असले तरी ते अगदीच अव्यवहार्य नाहीत. त्यातील प्रत्येकाचे फायदे-तोटे आहेत. मात्र कालकुपी अवकाशात किंवा एखाद्या अवकाशीय वस्तूवर ठेवण्याचा मार्ग, निर्विवाद अभिनव आहे.
कालकुपीच्या संभाव्य जागा आणि कालकुपीची रचना यासंदर्भात थोडा अधिक ऊहापोह पुढील भागात.
====
क्रमश:
====
======
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा