---- मागील भागावरून पुढे ----
==
लेखांक २ मध्ये घनदाट अरण्ये, खाणी, सागरतळ, पर्वतांचा अंतर्भाग, दर्या, लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहा इत्यादि ठिकाणांचा कालकुपी लपविण्याची संभाव्य स्थाने म्हणून उल्लेख केला होता. यातील प्रत्येक ठिकाणाचे फायदे तोटे आहेत.
घनदाट अरण्यात, निबिड जंगलात कालकुपी सुरक्षित राहील हे काही प्रमाणात खरे आहे, पण ज्या प्रमाणात निर्वनीकरण सुरू आहे, ते पाहता काही शतकातच ती कालकुपी, शहरीकरणाच्या एखाद्या प्रकल्पात उघडकीस येऊ शकते. अॅमेझॉनच्या जंगलाचा साधारण १३% भाग (सुमारे ७ लाख वर्ग किमी) गेल्या ५० वर्षात जंगलतोडीमुळे नष्ट झाला आहे. सरासरी १ लक्ष ३७ हजार वर्ग किमी इतके पृथ्वीवरचे जंगल दरवर्षी नष्ट होत आहे.
उपयोग संपलेल्या खाणी बंद करण्याचे देखील एक शास्त्र आहे आणि अशा खाणींचा, अन्य कामांसाठी पुनर्वापर करण्याची काही उदाहरणे आहेत. संग्रहालये, करमणुकीची ठिकाणे,, उद्याने, कृषिक्षेत्र अशा विविध प्रकारांनी, बंद करण्यात आलेल्या खाणींचा उपयोग केल्याची उदाहरणे आहेत. त्यातील सर्वात लक्षणीय आहे INCO's Creighton mine, Sudbury, Ontario इथे उभारण्यात आलेली न्यूट्रिनो वेधशाळा. खाणींमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास आणि खनिजे, पाणी, दूषित हवा इत्यादींपासून अशी खाण सुरक्षित करणे शक्य असल्यास, तिचा कालकुपी पुरण्यासाठी/सुरक्षितपणे ठेवण्यासाठी वापर हौऊ शकतो.
सागरतळातील कालकुपीचा सर्वात मोठा फायदा, तिथे पोहोचणे अतिशय अवघड असेल हा आहे, मात्र आज असलेला हा फायदा भविष्यातील तोटा ठरू शकतो. भविष्यातील संस्कृतीकडे सागरतळापर्यंत पोहोचण्याची क्षमता किती आहे यावर कालकुपीच्या उद्दिष्टाचे यशापयश अवलंबून आहे. शिवाय पाण्यापासून संभवणारे सर्व धोके आणि तिथला पाण्याचा प्रचंड दाब या गोष्टी कालकुपीच्या टिकाऊपणासाठी विलक्षण घातक ठरू शकतात.
पर्वतांचा अंतर्भाग ही दीर्घकालीन अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित जागा असू शकते, मात्र भविष्यात कदाचित अशा पर्वतातून, रस्त्यांसाठी बोगदे, घाटरस्ते बनविले जातील, कदाचित दगडांसाठी, मातीसाठी तिथे खनन होईल आणि मग या कालकुपीचे अस्तित्व वेळेआधी उघडकीस येईल, ही शक्यता नाकारता येत नाही.
सर्वसाधारण स्थितीत मानवाचा कमीतकमी उपद्रव या दृष्टिकोनातून, खोल दर्या हा कालकुपींसाठी सर्वाधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो, मात्र दर्यांमध्ये सर्वसाधारणत: पावसाचे प्रमाण बरेच अधिक असते, तसेच प्रलय वा तत्सम नैसर्गिक आपत्तींमध्ये, अशा कालकुपीची मोठी हानी होण्याची शक्यता बरीच वाढते. याव्यतिरिक्त कालकुपी जितकी अधिक खोलवर पुरली जाईल, तितकी तिची भविष्यात सापडण्याची शक्यता (भूस्तरातील उलथापालथीची अपवादात्मक परिस्थिती वगळल्यास) कमी होत जाते असे म्हणता येईल.
लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहांचा वापर, भुयारांचे तयार जाळे या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे, शिवाय अतिदूरच्या भविष्यात पृथ्वीवरील परिस्थिती प्रमाणाबाहेर बिघडल्यास, तेंव्हा अस्तित्वात असलेली संस्कृती या लाव्हागुहांचा आश्रयस्थान म्हणून वापर करेल ही शक्यता, उद्दिष्टाच्या सफलतेसाठी चांगली आहे. मात्र या लाव्हाट्यूब्सना कारणीभूत ठरलेला ज्वालामुखी मृत असणे किंवा तो प्रचंड कालावधीसाठी निद्रिस्त राहील याचे ठाम ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे.
वाळवंटात वाळूचे स्थलांतरण होण्याची प्रक्रिया वाळूच्या वादळांमुळे अनेकदा घडते, त्यामुळे वाळवंटात कालकुपी पुरायची झाल्यास अधिक खोलवर जाणे आवश्यक ठरते. तसेच तापमानातील रोजचे तीव्र बदल हाताळू शकेल अशी व्यवस्था इथे अपरिहार्य आहे. पाण्यापासून निर्माण होणारे धोके इथे सर्वात कमी संभवतात.
उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाजवळ, बर्फात खोलवर कालकुपी पुरून ठेवणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे. मात्र अतिदीर्घकाळाचा विचार करता, चुंबकीय ध्रुवांमधील बदलाचा (Geomagnetic Reversal), नैसर्गिक अक्षीय ध्रुवांवर, पृथ्वीवरील वातावरणावर, खंडांच्या रचनेवर, स्थानावर नक्की कसा परिणाम होतो यासंदर्भात मतमतांतरे आहेत. त्यामुळे तिथे पुरलेल्या कालकुपीला अनेक अनपेक्षित संकटे झेलावी लागू शकतात.
====
वरील सर्व ठिकाणांचे फायदेतोटे आहेत, मात्र तरीही कुठलीही जागा निवडताना
भूकंपप्रवण क्षेत्र टाळले जाईल,
ती जागा शक्य तितकी कोरडी असेल,
ज्वालामुखीपासून खूप दूर असेल,
तिथे मानवी उपद्रव होण्याची शक्यता सर्वात कमी असेल,
संभाव्य नैसर्गिक आपत्तींमध्ये, ती जागा सहजतेने उघडी पडणार नाही,
तिथे तापमानातील अतितीव्र बदल झेलावे लागणार नाहीत
इत्यादि गोष्टी निश्चितपणे बघितल्या जातील. या अनुषंगाने पृथ्वीबाह्य ठिकाणांचा विचारही करण्यात आला आहे. त्याचे सध्या स्थूलमानाने चार गट आहेत.
१) पृथ्वीभोवती अवकाशस्थानकात, उपग्रहांमध्ये, Probeच्या माध्यमातून, अशी कालकुपी पृथ्वीभोवती, चंद्राभोवती किंवा दुसर्या एखाद्या ग्रहाभोवती, उपग्रहाभोवती फिरती ठेवणे आणि ठराविक दीर्घ कालावधीनंतर ती पृथ्वीवर खाली उतरेल अशी व्यवस्था करणे.
KEO नावाचा एक प्रकल्प २००३ मध्ये कार्यान्वित होणार होता, ज्यामध्ये एक कालकुपी एका प्रोबच्या माध्यमातून पृथ्वीभोवती फिरती ठेवण्यात येणार होती आणि ५०,००० वर्षांनी त्या प्रोबने पृथ्वीवरच्या वातावरणात प्रवेश करावा, यासाठी त्यात यंत्रणा असणार होती. मात्र काही ना काही कारणामुळे हा प्रकल्प सतत पुढे ढकलला गेला आहे आणि आता २०१९ मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल असे सांगण्यात येत आहे. (KEO हे लघुरूप नसून सर्वाधिक वापरल्या जाणार्या काही भाषांमधील सर्वाधिक वापरले जाणारे ध्वनी असे यामागील तर्कशास्त्र आहे !). LAGEOS या मे १९७६ मध्ये सोडण्यात आलेल्या उपग्रहामध्ये एक छोटी कालकुपी आहे. हा उपग्रह साधारण ८४ लक्ष वर्षांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल असे अनुमान आहे.
http://www.keo.org
https://lageos.cddis.eosdis.nasa.gov/
२) चंद्रावर किंवा दुसर्या एखाद्या ग्रहावर, उपग्रहावर किंवा लघुग्रहावर सुरक्षित जागी (उदाहरणार्थ विवरे, लाव्हाट्यूब्स), कालकुपी ठेवण्याची / पुरली जाईल अशी व्यवस्था करणे.
अपोलो ११ अंतराळयानाच्या लँडरमधील वेगळ्या करण्यात आलेल्या एका भागामध्ये (Lunar Module) एक छोटी कालकुपीसम ( plaque) वस्तू ठेवण्यात आली आहे. पण ही अर्थातच 'पुरलेल्या' अवस्थेत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Apollo_11
३) एखाद्या अवकाशयानाच्या माध्यमातून कालकुपी अवकाशात धाडणे.
पायोनियर १० आणि पायोनियर ११ या दोन्ही अंतराळयानात कालकुपीसम वस्तू (plaque) मधून काही माहिती अवकाशात पाठविण्यात आली आहे. दोन्ही व्हॉयेजर अंतराळयांनामध्ये सर्व प्रकारच्या माहितीने खच्चून भरलेली गोल्डन रेकॉर्ड पाठविण्यात आली आहे. अर्थात ही चारही अंतराळयाने अनंताच्या प्रवासास निघाली आहेत आणि ही माहिती पृथ्वीवर परत कशी येईल, कधी येईल किंवा भविष्यातील पृथ्वीवरची कोणतीही संस्कृती या गोष्टी परत कशी मिळवेल हा प्रश्न अनुत्तरित आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Pioneer_10
https://en.wikipedia.org/wiki/Pioneer_11
https://en.wikipedia.org/wiki/Voyager_1
https://en.wikipedia.org/wiki/Voyager_2
४) दीर्घमुदतीच्या (आणि सूर्यमालेतील ज्याची कक्षा बर्यापैकी निश्चित आहे अशा) एखाद्या धूमकेतुवर कालकुपी ठेवणे.
67P/Churyumov–Gerasimenko या धूमकेतुवर ESA ने पाठविलेल्या Rosetta या अवकाशयानासोबत Philae हा लँडर होता. या लँडरसोबत Rosetta disc या नावाने ओळखली जाणारी, निकेलच्या एका मिश्रधातूपासून बनविलेली एक तबकडी पाठविण्यात आली आहे. या तबकडीमध्ये विविध भाषांमधील संदेश व प्रचंड माहिती आहे. साधारण साडेसहा वर्षांनी हा धूमकेतू सूर्याची फेरी करतो आणि ती तबकडी किमान २००० वर्षे टिकेल असा अंदाज आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Rosetta_Project
कालकुपीसाठी जे धोके पृथ्वीवर संभवतात, त्यातील बरेचसे धोके अंतराळातही संभवू शकतात. शिवाय अंतराळात Collision आणि अवकाशीय प्रारणांचा तीव्र मारा हे धोके जरा जास्तच तीव्र आहेत. एखाद्या ग्रहावरच्या/उपग्रहावरच्या वातावरणाशी, कालकुपीच्या अस्तित्वासाठी विपरीत ठरू शकतील अशा घटनांशी आपण पूर्णत: परिचित नाही. जितका पृथ्वीचा अभ्यास आपण केला आहे, त्याच्या एक शतांशही, आपला दुसर्या कोणत्याही ग्रहाचा, उपग्रहाचा अभ्यास नाही. त्यामुळे कुठल्याही ग्रहावर/उपग्रहावर/धूमकेतूवर कालकुपी ठेवणे/पुरणे, उद्दीष्ट साध्य होईपर्यंत ती कालकुपी तिथे टिकून राहणे आणि भविष्यातील ज्या संस्कृतीसाठी ती कालकुपी आपण ठेवत आहोत, तिच्याकडे अवकाशप्रवासाची क्षमता असणे, त्यांना कालकुपी दुसर्या ग्रहावर शोधण्याची बुद्धी होणे, त्यांना ती कालकुपी तिथे सापडणे या सर्व टोकाच्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. याव्यतिरिक्त पृथ्वीवर येणार्या खर्चाच्या, कितीतरी अधिकपट खर्च अंतराळातील कालकुपीसाठी येईल हे उघड आहे. त्यातल्या त्यात पृथ्वीवर, स्वत:हून सुरक्षितपणे परत येणारी अवकाशस्थ कालकुपी अधिक उपयोगाची ठरेल असे म्हणता येईल. एका अटळ परिस्थितीमध्ये. अंतराळातील कालकुपीचा एक निर्विवाद फायदा होऊ शकतो. ही परिस्थिती आहे पृथ्वीचा संभाव्य नाश वा अन्य कोणत्याही कारणाने, दूरच्या भविष्यात तत्कालीन मानवाला पृथ्वी सोडावी लागणे. अशा वेळेसे संस्कृतीचे, ज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे कालकुपीतील भांडार, पृथ्वीत्याग करणार्या मानवासाठीच कदाचित उपयुक्त ठरावे.
वर उल्लेखलेले विविध पर्याय वाचल्यावर असे म्हणता येईल की एकाच ठिकाणी कालकुपी पुरण्यापेक्षा / ठेवण्यापेक्षा, त्या कालकुपीच्या अनेक आवृत्ती बनवून, तिचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, जितके विविध स्थानांचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात ,त्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात आला, तर कालकुपी सापडण्याची आणि तिचे उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता बरीच वाढू शकते. पण त्यासाठी कालकुपीचा प्रकल्प, देशस्तरावर न राबविता, मानवजातीचा प्रकल्प म्हणून, संयुक्तपणे पूर्ण जगभर आणि अंतराळातील सर्व साध्य ठिकाणी राबविणे बहुदा अधिक योग्य ठरेल.
====
क्रमश:
====
=========
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा