गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

कालकुपी - १ / ५


समजा आजपासून पन्नास हजार वर्षांनी किंवा अगदी एक लाख वर्षांनंतर, पृथ्वीवर जी कोणती संस्कृती असेल, त्या संस्कृतीस आपली, आपल्या आजच्या संस्कृतीची, ज्ञानाची, क्षमतांची ओळख आपल्याला करून द्यायची आहे तर काय मार्ग अवलंबता येईल ?

मानवातर्फे सध्याचा वापरात असलेला मार्ग हा कालकुपीचा आहे.

कालकुपी (Time Capsule) म्हणजे दूरच्या भविष्यकाळातील संस्कृतीस, आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, म्हणून वेळोवेळी जाणीवपूर्वक जमिनीत पुरून ठेवण्यात आलेले आणि अतिशय भक्कम असलेले 'पेटारे'. 'पेटार्‍यांचा' आकार कोणता हा प्रश्न इथे तुलनेने कमी महत्त्वाचा आहे.  या पेटार्‍यांमध्ये पत्रे, पुस्तके, यंत्रे, उपकरणे आणि इतरही अनेक मानवी संस्कृतीच्या, ज्ञानाच्या, विज्ञानाच्या खुणा ठेवल्या जाऊ शकतात. बरेचसे देश आज हा मार्ग अवलंबतात. आपल्या देशाने देखील एकापेक्षा अधिक वेळा हा पर्याय, अवलंबला आहे याची नोंद आहेच, शिवाय काही वेळा गुप्तपणे  अशी वदंता आहे. काही वेळा ही गोष्ट उघडपणे केली जाते, काही वेळा अत्यंत गुप्तपणे.  काही वेळा ती सरकारी असेल, काही वेळा खाजगी. काही वेळा ती अति मोठ्या प्रमाणावर आणि अतिदीर्घकालासाठी केली गेली असेल, तर काही वेळा अत्यंत मर्यादित उद्देशाने आणि केवळ काही दशकांचे उद्दीष्ट ठेवून.  काही वेळा ती एखाद्या मोठ्या प्रदेशाच्या संस्कृतीजतनाचे लक्ष्य ठेवून केली जाते, तर काही वेळा एखाद्या संस्थेच्या इतिहासाचे जतन करण्यासाठी.

आणि ही गोष्ट केवळ आजचा 'प्रगत' मानव करतो आहे असे नव्हे, अनेक प्रकारचे शिलालेख, स्मारके, मंदिरे कुठल्याही प्रकारच्या दगडांच्या माध्यमातून जपला गेलेला  इतिहास व संस्कृतीच्या खुणा या एकाप्रकारे हेच उद्दीष्ट साध्य करत आल्या आहेत. अगदी पिरमिड्सच्या बाबतीत ही शक्यता वर्तविली गेली आहे (स्फिंक्सच्या कानामागे काही एक गुप्त कळ असून ती योग्य वेळी उघडली जाईल वा उघडता येईल) किंवा पद्मनाभस्वामी मंदिरातील न उघडलेला कक्ष देखील अशा प्रकारचा असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे ....

त्याही पलीकडे जाऊन Voyager मध्ये परग्रहवासींना 'मिळाव्यात' म्हणून पाठविल्या गेलेल्या मानवी संस्कृतीच्या, अस्तित्वाच्या खुणा, कदाचित अतिदूरच्या भविष्यात, पृथ्वीवरच्या तत्कालीन संस्कृतीसच सापडतील आणि त्यांच्यासाठी प्राचीन इतिहासाची साधने बनतील, ही शक्यता संभवते असे काही जणांचे मत आहे.







====
कालकुपी अतिदीर्घकाळासाठी पुरली जात असेल तर मानव बरीच गृहीतके धरून हा खटाटोप करतो आहे असे म्हणावे का ?

१) कुठल्याही संभाव्य संकटाला तोंड देऊ शकेल असा कालकुपीचा टिकाऊपणा

पृथ्वीवर सर्वसाधारण/नैमित्तिक प्रलयापासून ते अतिभयंकर Extinction Event पर्यंतचे कोणतेही संकट ओढवू शकते. कालकुपी ज्या कोणत्या पदार्थापासून तयार केली असेल, तो पदार्थ, कालकुपीचा आकार, त्यात साठविलेली सर्व सामुग्री, त्या सामुग्रीच्या मूळ रूपासह, गुणधर्मांसह, क्षमतांसह  कुठल्याही संकटात टिकून राहायला हवी. कालकुपी जेंव्हा अतिदूरच्या भविष्यकाळात उघडली जाईल तेंव्हा पृथ्वीवर जे काही वातावरण असेल, त्या वातावरणात देखील, कालाकुपीमधील  ती सामुग्री टिकून राहिली पाहिजे.


२) जिथे कालकुपी पुरली जात आहे ती जागा अतिदूरच्या भविष्यातील संस्कृतीला सापडू शकेल

पृथ्वीवरची जमीन-पाण्याची विभागणी, खंडांची रचना ही दीर्घकाळाचा विचार करता बदलत असते. भूस्तराची पातळी बदलत असते. आज जी जागा एखाद्या पर्वतशिखरावर आहे, ती अतिदीर्घकाळानंतर महासागराचा भाग होऊ शकते. अशा वेळेस ती कालकुपी त्या नवीन संस्कृतीस सापडेलच हे फार मोठे गृहीतक आहे.


३) कालकुपीतील सामुग्रीचा अर्थ नवीन संस्कृती लावू शकेल.

काही हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या भाषेचा, चित्रलिपीचा अर्थ न लावू शकण्याची अनेक उदाहरणे आजच्या वर्तमानात आहेत. हरप्पा, मोहंजोदारो ही दोन ठळक उदाहरणे आपल्या अधिक परिचयाची, पण अन्य अनेक उदाहरणे आहेत. आणि हा प्रश्न केवळ भाषा आणि लिपीपुरता मर्यादित नाही. भविष्यात ती भाषा आणि लिपी  जरी उलगडली तरी त्या गोष्टीमागचे संकेत, कारणे आपल्या आजच्या संस्कृतीला समजतीलच असे नाही. उदाहरणार्थ पिरमिड्समध्ये प्रचंड संपत्ती आणि गुलामांसह,  इजिप्तच्या राजांना पुरण्यामागे काय कारण असावे याबाबतीत आपण केवळ विविध तर्क केले आहेत, आणि हे तर्क आजच्या आपल्या आकलनाच्या अनुषंगाने आहेत. कदाचित मूळ उद्देश फार फार वेगळा, आपल्या कल्पनेच्या पलीकडला असू शकेल.  हाच विचार पुढे नेला, तर आपली भाषा, लिपी, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याचा काहीतरी भलताच अर्थ भविष्यकालीन संस्कृती लावू शकते ही शक्यता संभवते. नाही का  ?
काही वर्षांपूर्वी या संकल्पनेशी संबंधित एक विज्ञान कथा वाचली होती.  एका महाप्रलयानंतर निर्माण झालेल्या, नवीन संस्कृतीस एक तापमापक सापडतो आणि त्या तापमापकाच्या आतील पार्‍याचे (तापमानानुसार) होणारे चलनवलन पाहून, त्यावरचे आकडे पाहून त्याचा अर्थ न उमजलेली त्यावेळची संस्कृती त्या तापमापकालाच  निसर्ग देवतेची मागे राहिलेली खूण मानू लागते. ....


४) कालकुपी उघडता येणे किंवा कालकुपी उघडली जावी अशी परिस्थिती असणे

स्फिंक्स आणि पद्मनाभ मंदिर यांचे उदाहरण वर दिले आहे. जी कशी असेल हेच माहीत नाही वा त्यासंबंधीचे कल्पना, संकल्पनांचे अंदाज थिटे पडू शकतील, अशा संस्कृतीपर्यंत कालकुपी कशी उघडावी याचे ज्ञान पोहोचविणे हीच कदाचित प्रचंड मोठी समस्या ठरू शकते. शिवाय आजच्या कालकुपीचे, तिच्या बंद स्वरूपातल्या रूपासह,  त्या काळातील धर्म वा तत्सम संकलपनांमुळे दैवतीकरण (Sacred/Holy) होणे ही गोष्ट अशक्यप्राय नाही. अशी कोणतीही गोष्ट, कालकुपीच्या मूळ उद्दिष्टालाच, हरताळ फासणारी ठरू शकते. 


५) कालकुपीचे महत्त्व न उमजल्यामुळे वा नसल्यामुळे नाश वा दुर्लक्ष

घटकाभर असे समजा की पृथ्वीवर अतिप्राचीन काळी, एक अत्यंत प्रगत संस्कृती अस्तित्वात होती.  त्या संस्कृतीने, अतिदीर्घ काळाचा विचार करून, 'टिकू शकेल' या निकषावर, एका मोठ्या दगडी वास्तूची निर्मिती केली आणि त्या वास्तूचा त्यांची कालकुपी म्हणून उपयोग केला.  कालौघात त्या वास्तूवर, लाव्हाची, मातीची वा अन्य पदार्थांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुटे चढून, तिथे एक डोंगर, पर्वत निर्माण झाला. मात्र असे अनेक डोंगर, पर्वत आपल्या आजूबाजूला असल्यामुळे, त्या डोंगराचे वेगळे महत्त्वच आपल्या लक्षात आले नाही आहे. आपल्या दृष्टीने तो केवळ एक डोंगर आहे आणि आपल्या आजच्या तंत्रज्ञानाकडे त्या डोंगराच्या आत काही दडलेले आहे हे समजण्याची क्षमताच नाही. अशा वेळेस त्या कालकुपीचा उद्देश पूर्णपणे असफल झाला आहे असेच म्हणायला हवे.  हीच गोष्ट आपल्या कालकुपीच्या बाबतीतही भविष्यात घडणे, असंभव नाही.

दुसरी शक्यता कालकुपी नाश होण्यासंदर्भात आहे. आज आपल्याला एखादी भली मोठी शिळा सापडली तर कदाचित त्या शिळेचा तसाच उपयोग एखाद्या आपल्याला योग्य वाटेल अशा बांधकामात होऊ शकतो किंवा एखाद्या डोंगरात सुरुंगाचे स्फोट घडविताना, अजाणतेपणे त्या शिळेचा नाश देखील होऊ शकतो. आपली आजची कालकुपी,केवळ भविष्यकालीन संस्कृतीच्या अज्ञानामुळे, त्यांच्या एखाद्या प्रक्रियेसाठी कच्चा माल ठरू शकणे, अशक्यप्राय नाही.
आणखी एक शक्यता स्वारस्यासंबंधी आहे. ज्या कुठल्या संस्कृतीला अशी कालकुपी सापडेल, तिला आपला इतिहास उलगडण्यात स्वारस्य असेल असे आपण गृहीत धरत आहोत. इतिहासाकडे वळून बघण्याची त्यांना इच्छाच नसेल तर ? किंवा ते तंत्रज्ञानाच्या अशा पातळीवर (आपल्यापेक्षा खूप खालच्या स्तरावर किंवा अतिवरच्या स्तरावर) असतील, की जिथे आपली कालकुपी संपूर्णत: अप्रासंगिक ठरत असेल तर ?

====
क्रमश:
====

२ टिप्पण्या: