सोमवार, २९ जानेवारी, २०१८

शिक्षा -- भाग २ / ४


(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)

---- मागील भागावरून पुढे ----

====

स्वस्तिकने त्याच्या मनगटावर बांधलेल्या प्रवासीमित्र या नावाने ओळखल्या जाणार्‍या उपकरणामध्ये पाहिले, अवकाशवेश परिधान करण्याची सूचना झळकत होती आणि त्याच्यासाठी निर्धारीत केलेल्या कॅप्सुलचा मार्ग तिथे दाखवला होता. त्याच्यासोबत अनेकांनी, आपापल्या कॅप्सुलच्या दिशेने चालायला सुरुवात केली. EHP अर्थात ExpoPlanetary Habitation Program च्या, या  महत्त्वाच्या टप्प्यासंबंधीच्या  विचारांनी त्याचे मन भरून गेले होते. तशी त्याने पूर्वतयारी अतिशय मन लावून केली होती, पण राहूनराहून त्याच्या मनात, यानात भेटलेल्या त्या वृद्ध माणसाने दिलेला सल्ला डोकावत होता. 

'तुझे अवधान केवळ आणि केवळ प्रशिक्षणावर राहिले पाहिजे, हे त्याचे सांगणे मला समजले, पण मोहाचे प्रसंग टाळ असे का म्हणाला असेल तो  ? '  स्वस्तिकचे विचारचक्र अतिशय वेगाने धावत होते. 'मानवी इतिहास शिकताना, प्राचीन काळातील मानवाच्या गुणदोषांसंबंधी माहिती मी मिळवली आहे. ते दोष माझ्यात नाहीत, म्हणजे अजूनपर्यंत त्यांचा प्रत्यय आलेला नाही.  नेमून दिलेल्या कामात दुर्लक्ष होऊ नये, यासाठी यांत्रिकपणे काम कसे करावे हे देखील, युरोपावरील या आधीच्या प्रशिक्षणादरम्यान  मी शिकलो आहे, तरीही असे घडू शकते, असे तो का म्हणाला असेल ?  याचा संबंध पृथ्वीच्या त्या चंद्राशी तर नाही ना ? काही वेळापूर्वी आपल्याला एकाग्रता ठेवणे थोडे अवघड गेले होते. युरोपावर असे कधीच झाले नव्हते. मग इथेच का होते आहे ?'

"मी सोमजा. तुम्ही ?"  स्वस्तिकच्या बाजूने जाणार्‍या आणि स्वस्तिकच्या वयाच्या एका तरुणीने प्रश्न विचारला आणि स्वस्तिकची तंद्री तुटली.  त्याने मान वर करून बघितले.

'हिचा डिफॉल्ट बॉडीसूट आपल्यापेक्षा वेगळा आहे' स्वस्तिकच्या मनात आले. 'कुठली असेल ही ?'

"मी स्वस्तिक, युरोपावासी" त्याने स्वत:ची ओळख करून दिली. "तुम्ही.... "

"तुमचा अंदाज बरोबर आहे. माझा जन्म युरोपावरचा नाही. चंद्रावरचा आहे, तिथे दहा पृथ्वीवर्षे होते मी, नंतर मला युरोपावर पाठविण्यात आले. त्यामुळे जन्मापासूनच बॉडीसूट न घालता, राहायची सवय आहे मला." स्वस्तिकचे वाक्य अर्ध्यावरच तोडत सोमजा म्हणाली. "युरोपावर केवळ तिथल्या  प्रशिक्षणादरम्यान बॉडीसूट वापरला, पण तो न वापरता मला अधिक आरामदायी वाटते. माझी त्वचा, तुमच्यापेक्षा बरीच वेगळी आहे, त्यामुळे मला बॉडीसूट वापरावा लागत नाही"  ती स्मित करत म्हणाली. 

"युरोपावरील प्रशिक्षण ? "  प्रशिक्षणवर्गाच्या स्मृतिकोषातील सर्व चेहरे स्वस्तिकने झरझर स्कॅन केले. "पण मी सर्वांना ओळखतो.  तुम्हाला याआधी कधी भेटल्याचे आठवत नाही मला."

"कारण तुमचा आणि माझा उद्देश वेगळा आहे. मी EHP ला प्रवेश घेतलेला नाही. माझे काम प्रशिक्षणात आवश्यकतेनुसार बदल करण्याचे आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मानव वसाहतींवर जाऊन मला राहावे लागते. पृथ्वीवरच्या मानव अभयारण्यातील प्रशिक्षणसुद्धा त्याचाच भाग आहे."

"तरीच." असे म्हणत स्वस्तिक त्याच्या कॅप्सुलच्या जवळ जाऊन उभा राहिला. त्या कॅप्सुलला लटकावलेल्या अवकाशवेशात त्याने स्वत:ला गुरफटवून घेतले. सोमजाचा निरोप घ्यावा म्हणून त्याने समोर बघितले तर ती तिथे नव्हती. त्याने कॅप्सुल उघडून त्यात प्रवेश केला आणि कॅप्सुलचे झाकण आपोआप बंद झाले आणि मॉनिटर  सुरू झाला. त्यावर दिसणारा तो करड्या रंगाचा पृथ्वीचा गोल पाहून पृथ्वीवरच्या प्रशिक्षणाचे विचार त्याच्या मनात पुन्हा घोळू लागले. पृथ्वीच्या वातावरणात यानाने प्रवेश केल्याचे मॉनिटरवर दिसले आणि स्वस्तिकने डोळे मिटून घेतले. त्याच्या मनात त्याने शिकलेला पृथ्वीचा इतिहास झरझर सरकून गेला.

--

'साधारण बत्तीसशे पृथ्वीवर्षांपूर्वी, हॉकिंग दुर्बिणीने शोधलेला एक छोटा धूमकेतू, परत जाताना युरेनसच्या बर्‍याच जवळून गेला आणि त्याची कक्षा बदलली. त्याच्या पुढच्या भेटीत तो पृथ्वीवर आदळणार हे नंतरच्या गणितातून निश्चित झाले. ही धडक विनाशकारी असणार होती, त्यामुळे पृथ्वीवरचे सर्व मोठे देश एकत्र आले आणि त्यांनी संयुक्तपणे काही निर्णय घेतले. मानववंश आणि पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचविण्यासाठी, मानवाच्या हातात १७० वर्षे होती. या दीर्घ कालावधीचा उपयोग करून मंगळ, गुरूचा उपग्रह युरोपा, एन्सीलेडस आणि यथावकाश प्लूटोवर वसाहती निर्माण करण्याचा निर्णय झाला. प्रत्येक ठिकाणच्या समस्या वेगळ्या होत्या, आणि त्यामुळे त्यांची उत्तरेही वेगळी होती.  पण चंद्रावर मानवी तळ उभारल्याचा अनुभव गाठीशी होता आणि या संयुक्त वसाहतीकरणाच्या प्रकल्पासाठी सर्व देशांच्या सरकारांनी कंबर कसली. खाजगी स्तरावर देखील प्रचंड पैसा ओतण्यात आला. वैज्ञानिकांना, तंत्रज्ञांना कधी नव्हे तो संपूर्णपणे मुक्तहस्त मिळाला. या सर्वांचा पुरेपूर उपयोग करत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांनी प्रचंड मोठी झेप घेतली.

हे प्रकल्प संयुक्त स्तरावर राबविले जात असल्याने ज्ञानाची देवाणघेवाण मोठ्या प्रमाणावर झाली. अतिप्रचंड आकाराची अवकाशयाने बांधण्यात आली आणि ठरविलेल्या कालावधीच्या तब्बल दहा वर्षे, आधीच मोठ्या प्रमाणावर, विविध मानवी समुदायांचे आणि वनस्पतीसृष्टीसकट मर्यादित आणि उपयुक्त प्राणीसृष्टीचे संक्रमण या नव्या वसाहतींमध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात आले. यात काही खाजगी प्रकल्पदेखील होते, पण त्यांना आक्षेप घेण्यासारखी, आडकाठी करण्यासारखी परिस्थितीच नव्हती. अर्थात पृथ्वीवरच्या सर्व मानवांना दुसर्‍या ग्रहांवर हलविणे शक्यच नव्हते. म्हणून पृथ्वीच्या अंतर्भागात देखील बाकीच्या मानवांसाठी तात्पुरत्या वसाहती  निर्माण करण्यात आल्या. पृथ्वीवरचे शक्य तेवढे ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान जतन करण्यासाठी प्रत्येक मानव वसाहतीमध्ये विविध प्रकारचे उपाय योजले गेले. पण इतर मानवी वसाहतींमधील साधनसुविधा चंद्राच्या तुलनेने बर्‍याच मर्यादित होत्या. त्यामुळे सूर्यमालेतील, सर्व मानव वसाहतींना नियंत्रित करण्यासाठी चंद्र राजधानीचे ठिकाण बनले.

धूमकेतूची धडक अपेक्षेप्रमाणेच अत्यंत विनाशकारी ठरली. ज्वालामुखींचे अतिप्रचंड उद्रेक, भूकंपाचे थैमान यांनी पृथ्वी पार करपून गेली. पाठोपाठ येणार्‍या सुनामींमुळे काही काळासाठी संपूर्ण भूभाग जलमय झाला. पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढून, पृथ्वीचा दिवस तेवीस तासांवर आला. पृथ्वीभोवती फिरणारे उपग्रह, अंतराळस्थानके आणि दुर्बिणी एकामागोमाग पृथ्वीवर कोसळल्या आणि नष्ट झाल्या.  जीवसृष्टीची अपरिमित हानी झाली. काही महिन्यांनी पाणी ओसरले पण अजूनही पृथ्वीवरचे वातावरणातील विषारी वायूंचे प्रमाण वाढले होते. वातावरणात प्रचंड धुळ होती. पृथ्वीवर पोहोचणारा सूर्यप्रकाश काहीसा अंधुक झाला होता.  पाणी आणि जमीन याची रचना, विभागणी बदलली होती. कालांतराने पृथ्वीवरील किरणोत्सर्गाचे प्रमाण देखील हळूहळू वाढत गेले. पृथ्वीशी इतर वसाहतींचा संपर्क राहावा यासाठी ज्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या, त्या कुठल्याही प्रकारे उपयोगी ठरू शकल्या नाहीत

त्यानंतर काही दशकांच्या अंतराने, चंद्रावरून पृथ्वीवर मानवविरहित याने पाठविण्यास सुरुवात झाली, पण प्रत्येकवेळी, पृथ्वी मानवाला राहण्यायोग्य राहिली नसल्याची माहितीच, त्यांच्याकडुन  मिळत राहिली. पृथ्वीच्या अंतर्भागात वसविण्यात आलेल्या शहरांविषयी तर कोणतीही माहिती मिळत नव्हती. कालांतराने निरीक्षकांची एक टीम चंद्रावरून पृथ्वीवर पाठविण्यात आली. पण ती टीम परत आली नाही. त्यामुळे पृथ्वीवर पुन्हा जाण्याच्या प्रयत्नांना खीळ बसली. मर्यादित साधनसामुग्रीमुळे, मग पृथ्वीवर परत जाण्याचे प्रयत्न खंडीत करण्यात आले.  त्याऐवजी इतर ग्रहांवरील मानवी वसाहती अधिक सक्षम करण्याचा, नवीन वसाहती उभारण्याचा पर्याय निवडण्यात आला. पृथ्वीशी पुन्हा संपर्क करण्याचे सर्व प्रयत्न, अधूनमधून होत राहिले पण एकाही प्रयत्नाला यश लाभले नाही.

तब्बल अठ्ठावीसशे पृथ्वी मानवासाठी अप्राप्य राहिली.  दरम्यान विविध ग्रहांवर वसवण्यात आलेल्या मानवी वसाहती बहरल्या, अधिक सक्षम झाल्या. त्यानंतर पृथ्वीसाठी एक मानवी अभियान पुन्हा राबविण्यात आले,  त्या टीम मधले केवळ दोघेच परत आले. त्यांनी दिलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती.  पृथ्वीच्या अंतर्भागात वसविलेल्या वसाहती अजूनही अस्तित्वात होत्या, पण त्यांचे रूप पूर्णपणे बदलले होते.  तिथे राहणार्‍या मानवांमध्ये शारीरिक, मानसिक स्तरावर मोठा बदल घडून आला होता. आता त्यांना मानव म्हणावे अशी त्यांची स्थितीच नव्हती. आणि एका अर्थाने आता पृथ्वीवर त्यांचेच राज्य होते.  पृथ्वीवर पुन्हा येऊ पाहणारा मानव त्यांच्यासाठी शत्रू होता. लौकिक अर्थाने पृथ्वी वसाहतीयोग्य राहिली नव्हती. 

तिथे निर्माण झालेल्या या नवीन प्रजातीपासून, सर्व प्रकारच्या प्रदूषणापासून, किरणोत्सर्गापासून सुरक्षित राहील, अशा प्रकारे पृथ्वीवर पुन्हा वस्ती करायची, तर एका सुरक्षितअशा पायाभूत संरचनेची निर्मिती करणे आवश्यक होते. या संरचनेचा आराखडा ज्यांनी तयार केला त्यांनी मानवी इतिहासातील काही उल्लेखांचा आधार घेत, या प्रकल्पाला 'मानव अभयारण्य' असे म्हटले होते आणि मग तेच नाव पुढे रूढ झाले.

वेगवेगळ्या मानवी वसाहतींमध्ये, मात्र संपर्क टिकून होता, तरीही त्यांच्या शारीरिक रचनेत, मानसिक स्थितीत, विचारसरणीत काही भेद निर्माण होऊ लागले होते. या भेदांचे पर्यवसान भिन्न प्रजातींमध्ये होऊ नये, म्हणून एक समन्वय समिती बनविण्यात आली होती. ही समन्वय समिती कोणत्याही मानवास एकाच ग्रहावर दीर्घकाळ राहू देत नसे. कालांतराने या समितीच्या हाती विविध अधिकार एकवटत गेले. हळूहळू ती समन्वय समिती, अधिकाधिक शक्तिशाली होत गेली आणि सर्व मानवी वसाहतींवर नियंत्रण ठेवणारे एक न्यायमंडळ अस्तित्वात आले. '

--

मॉनिटरवर तीव्र बीपबीप आवाज आला आणि स्वस्तिक इतिहासातून वर्तमानात आला. त्याने डोळे उघडले तेंव्हा,  स्पेसपॅडवर लॅंडींग दहा मिनिटांपूर्वी यशस्वी झाल्याची सूचना मॉनिटरवर झळकत होती.  त्याचा हात लागताच, कॅप्सुलचे दार आपोआप उघडले आणि स्वस्तिक बाहेर आला. सोमजा त्याच्या कॅप्सुलजवळ उभी होती. 

तिने त्याच्याकडे बघून किंचित स्मित केले. "तुमच्यासाठी थांबले होते. ट्रेनिंगसाठी जाणारे आपण दोघेच आहोत. बाकीचे लॅंडींग झाल्यावर लगेच पुढे गेले."

स्वस्तिकने मनगटावरच्या प्रवासीमित्राकडे नजर टाकली. त्यावर पृथ्वीवर नेणार्‍या लिफ्टची दिशा दाखवली होती. सोमजानेदेखील तसेच केले. काहीही न बोलता, दोघेही दाखविलेल्या मार्गाने चालू लागले. 

लिफ्टमध्ये बरेच लोक होते, पण दोन जागा रिकाम्या होत्या.  ते त्या रिकाम्या आसनावर बसताच, जणू त्यांच्यासाठी थांबल्याप्रमाणे, लिफ्टचे दार बंद झाले आणि अत्यंत वेगाने लिफ्ट खाली जाऊ लागली. स्वस्तिकला एक विलक्षण दडपण जाणवले. त्याने सोमजाकडे पाहिले, ती शांतपणे बाहेर बघत उभी होती. त्यानेही  लिफ्टच्या काचेतून बाहेर पाहिले, सर्व दिशांना खालीवर करणार्‍या असंख्य लिफ्ट दिसत होत्या.  ते दृश्य पाहून त्याला पुन्हा तीच भीती जाणवली, गर्दीची. 

अचानक त्यांच्या लिफ्टने दिशा बदलली आणि एखाद्या हायपरबोलाप्रमाणे ती लिफ्ट वेगाने घसरत जाऊ लागली. आजूबाजूचा परिसर अतिशय रुक्ष होता, भाजून निघाल्यासारखा. त्याने पृथ्वी प्रतिरूप कोशात पाहिलेल्या, अनुभवलेल्या परिसरापेक्षाही अधिक भीषण. जागोजागी मोठमोठी विवरे होती. जीवसृष्टीची एकही खूण कुठेही दिसत नव्हती. इतक्यात त्याला समोरच्या बाजूस दूरवर एका पारदर्शक घुमट दिसला.  

'हेच पृथ्वीवरचे मानव अभयारण्य' त्याच्या मनाने साक्ष दिली.

 जसजसा तो घुमट जवळ येऊ लागला, तसतशी त्याची रचना किती गुंतागुंतीची आहे आणि त्याचा आकार किती अवाढव्य आहे याचा अंदाज स्वस्तिकला येऊ लागला. यासंदर्भात  युरोपावर, त्याला विस्तृत माहिती मिळाली नव्हती.  अनेक हायपरबोलाच्या आकाराचे मार्ग त्या घुमटात सर्व बाजूंनी प्रवेश करत होते.  त्या घुमटाच्या मध्यातून एक तळाशी रुंद असणारा, चकाकता मनोरा, निमुळता होत,  आकाशात उंचच उंच गेला होता. आकाशाकडे गेलेले टोक नीटसे दिसतही नव्हते.   

थोड्याच वेळात त्यांची लिफ्ट त्या घुमटाच्या आत शिरली आणि हलकासा गचका देत थांबली. 

"पृथ्वीवर आपले स्वागत आहे. यात्रेकरूंनी अवकाशवेश काढून आसनावरच्या कपाटात ठेवावेत.' अशी उद्घोषणा झाल्यावर, नकोसे झाल्याप्रमाणे, त्या लिफ्टमधील सर्वांनी, आपापले अवकाशवेश काढून, त्या सूचनेचे पालन केले.

--

आजूबाजूला पसरलेल्या कमी अधिक उंचीच्या इमारती, त्यांना प्रत्येक मजल्यावर जोडणारे रस्ते, सर्वत्र वावरणारे यंत्रमानव, आपापल्या कामात गुंतलेले. एका इमारतीतून दुसरीकडे जाताना दिसणारी छोटी वाहने. लिफ्टमधून बाहेर येताना स्वस्तिकला दिसलेले दृश्य त्याच्यासाठी अनपेक्षित होते.

'हे काही यंत्रविरहित वातावरण नव्हे. यंत्रांचा आणि यंत्रमानवांचा इतका वापर तर युरोपावर पण होत नाही.' लिफ्टमधून बाहेर आल्यावर स्वस्तिकच्या मनातला पहिला विचार होता.  लिफ्टमधले बाकीचे लोक वेगवेगळ्या दिशांना पांगले.  इतक्यात सोमजा त्याच्या बाजूला येऊन थांबली आणि तिला पाहताच आधीपासूनच, समोर उभ्या असलेल्या एका व्यक्तीने  हात उंचावून तिला इशारा केला.

"चला, आपल्याला यांच्यासोबतच जायचे आहे." जवळ येऊन थांबलेल्या एका प्रौढ माणसाकडे पाहून सोमजा स्वस्तिकला म्हणाली. स्वस्तिकने त्या माणसाला न्याहाळले, पृथ्वीवर पोहोचल्यावर कुणाला भेटायचे आहे याच्या सूचना, त्याला युरोपावरुन निघण्यापूर्वीच मिळाल्या होत्या आणि या माणसाचा चेहेरा त्याच्याकडच्या चित्राशी मिळता जुळता होता. त्याच्या मनगटावरील प्रवासीमित्र देखील, हा तोच माणूस असल्याची साक्ष देत होता.

तो माणूस जवळ येऊन उभा राहिला आणि स्वस्तिककडे पाहून त्याने औपचारिक स्मित केले. 'मी महेश्वर. तुमचा इथला मार्गदर्शक.' तो अतिशय मृदु आवाजात म्हणाला.  तो कदाचित सोमजाच्या ओळखीचा असावा, तिचे त्याच्याबरोबरचे वागणे अधिक सहज होते.

"उद्यापासून तुमचे प्रशिक्षण सुरू होईल. तुमची आजची राहण्याची व्यवस्था इथेच केली आहे" असे म्हणत त्याने थोड्या दूरवर दिसणार्‍या एका बैठ्या घराकडे बोट दाखवले आणि त्या दिशेने चालण्यास सुरुवात केली. स्वस्तिक आणि सोमजा त्याच्या मागोमाग चालू लागले.

त्या घरात प्रवेश केल्यावर, स्वस्तिक थबकला. बाहेरच्या यांत्रिक वातावरणाशी अत्यंत विसंगत अशी आतली रचना होती. चहुबाजूंना पसरलेले, एका व्यक्तीला निजता येईल इतपत छोटे छोटे कक्ष आणि मध्ये एक मोठा हॉल. त्यातील काही कक्षांची दारे बंद होती, काहींची उघडी.  मधोमध असलेल्या त्या हॉलमध्ये, साधारण एकाच वयोगटातील स्त्री पुरुष छोटे छोटे गट बनवून जमिनीवरच बसलेले होते. कदाचित त्यांची एकमेकांशी आधीच ओळख झाली असावी. त्या सर्वांचे लक्ष वेधले जाईल इतक्या मोठ्या आवाजात, महेश्वरने, स्वस्तिक आणि सोमजाची ओळख करून दिली.  सगळे उठून त्यांच्याभोवती जमा झाले.

'इतक्या सर्व अनोळखी लोकांबरोबर पुढचा अख्खा महिना काढायचा आहे' स्वस्तिकच्या मनात आले.  'आपले प्रशिक्षण, खरंतर खडतर परीक्षेचा काळ आत्ताच सुरू झाला आहे.' असे त्याला वाटले.

======
क्रमश:
======

======

गुरुवार, २५ जानेवारी, २०१८

शिक्षा -- भाग १ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)
====




"नमस्कार. एक तासानंतर आपले यान, अंतराळनगर क्रमांक सत्तावीस वर उतरेल. ज्या यात्रेकरूंना इथे उतरायचे आहे, त्यांना विनंती आहे की त्यांनी, त्यांच्या मजल्यावरील कक्ष क्रमांक चार मध्ये जावे. पुढील सूचना तुम्हाला तिथे दिल्या जातील." उद्घोषणा होताच स्वस्तिकच्या शेजारी बसलेल्या त्या वृद्ध माणसाने स्वस्तिकचा हात आपल्या हातात घेतला. 

"तुझ्यासोबत वेळ छान गेला मित्रा. आता आपली भेट पुन्हा होणार नाही, पण तू पृथ्वीवर गेल्यावर, माझा सल्ला तुला उपयुक्त ठरला आहे असे तुला वाटले तर तुझ्या फीडबॅकमध्ये त्याचा उल्लेख कर, म्हणजे पुढे त्याचा समावेश अनुभवग्रंथात होईल आणि पुढे  देखील तो दुसर्‍या कुणाला देखील उपयोगी पडेल"  तो वृद्ध खणखणीत आवाजात म्हणाला.

"नक्कीच. असे प्रत्यक्ष अनुभव प्रत्यक्ष ऐकणे ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरंतर तुमच्या अनुभवाचा फायदा, अजूनही अनेकांना थेट होऊ शकतो. तुमच्यासोबत इतका वेळ घालवल्यानंतर मला असे मनापासून वाटते, की अजून काही वर्षे सक्रिय आयुष्य नक्की जगू शकता तुम्ही. तुम्हाला समर्पण करण्याचा आदेश कसा मिळाला, याचेच मला अजूनही आश्चर्य वाटतंय." स्वस्तिकच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले आणि त्याला स्वत:चेच आश्चर्य वाटले.  'मी पूर्वी असे कुणाशी बोललो नव्हतो' त्याच्या मनात आले.

"पाच वर्षांपूर्वीच्या देह तपासणीनंतर, मी माझ्या मनाची तयारी केली होती. त्यामुळे मला आणखी पाच वर्षे मिळाली हेच विशेष आहे. अतिशय समृद्ध आयुष्य जगलो मी.  तसेही न्यायमंडळाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन, फारसे काही साध्य होत नाही. आणि माझा मेंदू अनुभवजालात जोडला जाणार आहे, तेंव्हा आणखी किमान साठ वर्षे तरी माझा मेंदू अस्तित्वात राहणार आहे. त्याचे समाधान आहे"

त्या वृद्धाच्या चेहेर्‍यावरचे हास्य स्वस्तिकला अस्वस्थ करत होते. से हास्य त्याने यापूर्वी कधीच पाहिले नव्हते. स्वस्तिकचा निरोप घेऊन समोरच्या दारातून तो वृद्ध बाहेर पडला तरी त्या वृद्धाचा विचार त्याच्या मनातून जाईना.

 स्वस्तिकच्या मनात अचानक एक वेगळीच भावना दाटून आली होती, त्याने पूर्वी कधीही न अनुभवलेली.  'समर्पणाच्या अनेक घटना पूर्वीदेखील आपण बघितल्या आहेत, पण तेंव्हा आपण अस्वस्थ झालो नव्हतो. ' त्याच्या मनात आलेल्या विचाराला त्याच्या बाह्यमेंदूने परस्पर उत्तर दिले.  'सहानुभूती म्हणतात या भावनेला'

'यापूर्वी आपण असे कधीच वागलो नाही.  त्याच्या पुन्हा मनात आले.

त्याला आठवले  'तो पृथ्वीचा चंद्र जवळ येऊ लागला आणि आपल्यात काहीतरी बदल होऊ लागला.' 
त्याच्या मनातील विचार थांबतच नव्हते. 'तो चंद्र ओलांडल्यापासूनच , माझा मेंदू काही नवीन भावना अनुभवतो आहे. मन एकाग्र करायला कठीण जात आहे'
'पण हे असे चालायचे नाही, एकाग्रता कमी पडता कामा नये. हे प्रशिक्षण व्यवस्थित पार पडायलाच हवे. इतके कष्ट केलेत या प्रशिक्षणासाठी, ते वाया जाता कामा नयेत. ' त्याने स्वत:लाच बजावले.

त्याने त्याच्या बाह्यमेंदूत साठविलेले नियमपुस्तक पुन्हा एकदा पहिल्यापासून वाचायला सुरुवात केली. नियम क्रमांक सहा हजार पाचशे बावन्न, त्याला पुन्हा एकदा खटकला. हस्तक्षेपाचे नियम जरा जास्तच जाचक आहेत असे त्याला पुन्हा एकदा वाटले. त्याने त्या मागची कारणे वाचायला सुरुवात केली.
इतक्यात पुन्हा एकदा नवीन उद्घोषणा त्या यानात घुमली.  'आपण आता अंतराळनगर सत्तावीसवरून प्रस्थान करत आहोत. अठरा मिनिटात आपण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करू. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, पृथ्वीवरील प्रदूषण स्तर पिङ्गल एक आहे. पृथ्वीवरील किरणोत्सर्गाचा स्तर रक्तिम दोन आहे.
तेंव्हा ज्या यात्रेकरूंना पृथ्वीवर उतरायचे आहे, त्यांनी अवकाशवेश परिधान करणे बंधनकारक आहे. अधिक सुरक्षित प्रवास अनुभवण्यासाठी तुम्ही तुमच्या कॅप्सुलमध्ये प्रवेश करू शकता. तुम्हाला सूचित करण्यात येते की स्वत:चा अवकाशवेश  अभयारण्यात पोहोचेपर्यंत काढू नये. नियमबाह्य वर्तनामुळे वा सूचना न पाळल्यास होणार्‍या हानीची जबाबदारी संपूर्णपणे वैयक्तिक राहील. अशा हानीची जबाबदारी आणि भरपाई तिकिटासोबत करण्यात आलेला तुमचा यात्राविमा करणार नाही याची नोंद घ्यावी. आपले पृथ्वीवरचे वास्तव्य सुखाचे होवो."

स्वस्तिक ज्या क्षणाची काहीशा अनिच्छेने वाट पहात होता, तो क्षण आता काही मिनिटांवर येऊन ठेपला होता.


======
क्रमश:
======

======

मंगळवार, २३ जानेवारी, २०१८

फितूर -- भाग ४ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)

---- मागील भागावरून पुढे ----

====

सोमवारपासून विसुने त्याच्या स्टाफला कामाला लावले.  आणि त्याचे फळ त्याला दोन दिवसातच मिळाले. मंगळवारपासूनच DEPLशी संबंधित, प्रत्येक व्यक्तीची सविस्तर माहिती असलेल्या डॉक्युमेंट्सचा, स्प्रेडशीट्सचा त्याच्या ईमेलमध्ये पूर आला. नंतरचे दोन दिवस त्याच्यासाठी अत्यंत व्यग्रतेत गेले. प्रत्येक व्यक्तीची माहिती वाचणे, मनात साठवणे, त्याची टिपणे काढणे यात त्याचा पूर्ण दिवस जात होता. या केसने त्याच्या मनाचा ताबा घेतला होता. गुरुवारी दुपारपर्यंत सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग देखील दोनदा बघून झाले होते. एकाही व्यक्तीविरोधात त्याला काहीही ठोस सापडले नव्हते. 

'आता शनिवारी देशमुखशी बोलून थोडी मुदत वाढवून घ्यावी लागणार बहुतेक' हा विचार विसुच्या मनात यायला आणि त्याचा मोबाईल वाजायला एकच गाठ पडली. 
"बोल देशमुख. ठरल्याप्रमाणे तुला फोन करणारच होतो शनिवारी."  -- विसु
"नाही ते आहे माझ्या लक्षात. पण अडचण थोडी वाढली आहे." देशमुखांच्या स्वरात चिंता ओसंडून वाहात होती.
"काय झालं अचानक ?"
"तू वेगळ्या लॅपटॉपबाबत सुचविलं होतंस ना ?  मी रविवारीच नवीन लॅपटॉप घेतला,  DDDD च्या शोरूममधून. त्यात जी काही सॉफ्टवेअर त्याच्या सोबत आली तेवढीच. त्यापेक्षा दुसरे कोणतेही सॉफ्टवेअर मी त्या नवीन लॅपटॉपवर लोड केलेले नाही. अगदी सीसीटीव्हीचे सॉफ्टवेअर सुद्धा नाही आणि सोमवार पासून तोच लॅपटॉप मी वापरतो आहे.  दुसर्‍या कुणालाही लॅपटॉपला हात लावून दिला नाही. मंगळवारी दुपारनंतर एक टेण्डर फायनल करून मी पाठवलं. अगदी शेवटच्या दिवशी. त्यानंतर संध्याकाळी, अगदी शेवटच्या क्षणी  न्यू एराचे टेण्डर देखील त्यांना मिळालं. आत्ता थोड्या वेळापूर्वी सुकाळेचा फोन आला होता. हे टेण्डरदेखील न्यू एराला मिळणार आहे म्हणून." एका दमात देशमुखांनी सगळा घटनाक्रम सांगितला.

"आपण सोडवू हा गुंता लवकरच. मला तुझी चिंता समजतेय रे. पण आता एक नक्की झालं, की तुझ्या कंपनीमधला कुणीतरी फितूर आहे आणि तुझ्या टेण्डरमधले आकडे, न्यू एराला पोहोचत आहेत." विसुने देशमुखांना धीर देण्याचा प्रयत्न केला. पण देशमुख ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.

"नाही रे तसं नाही. म्हणजे यावेळेला, मी दुसर्‍या कुणालाही टेण्डर तयार करताना सामीलच केलं नव्हतं. अगदी नंदिनीदेखील नाही. सुरुवातीच्या काळात, जसा मी एकट्यानेच टेण्डर भरत असे, तसेच केले. यावेळी मी कंपनीचे वायफाय देखील वापरले नव्हते. माझ्या मोबाईलचे इंटरनेट शेअर करून वापरले."   -- देशमुख

देशमुख हवालदिल झाल्याचे विसुला जाणवले. त्यांना शांत करणे आवश्यक होते.

हा प्रकारही काहीतरी वेगळा आहे, हे विसुच्या लक्षात आले होते. ऑफिसमधल्या कुणावरही संशय घेण्यासारखी परिस्थिती नाही, हे देशमुखांना आत्ता सांगण्यात अर्थच नव्हता. कदाचित आपल्यालाच सर्व गोष्टी नव्याने तपासायला लागतील असे विसुच्या मनात आले.

"देशमुख, मला दोन-तीन दिवस दे. रविवारी आपण दोघेच तुझ्या ऑफिसमध्ये भेटू. मला पुन्हा एकदा सर्व तपासणी करायची आहे."  विसुने त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.

"तू म्हणालास त्या प्रमाणे, माझा पहिला लॅपटॉपसुद्धा विराजने चेक केला, त्यात एक मॅलवेअर सापडले, पण ते एका जुन्या कॉम्प्रेस फाईलमध्ये होते आणि अॅक्टिव्ह नव्हते असे त्याचे म्हणणे आहे. बाकी तसं काही विशेष नाही सापडलं त्याला. " देशमुखांनी अधिक स्पष्टीकरण दिले.
"हे बघ. हा काहीतरी अधिक गुंतागुंतीचा प्रकार आहे हे माझ्याही लक्षात आलंय. पण मला थोडा वेळ हवाय. मी तुझ्या ऑफिसमधला फितूर शोधून देईन हा माझा शब्द आहे."  -- विसु
"तुझ्याच भरवशावर आहे रे आता. पण हे असेच चालू राहिले तर माझ्या बिझनेसला मोठा फटका बसेल भविष्यात. इथे अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाही. त्यामुळे हा क्लायन्ट गमाविणे, मला सध्या तरी परवडण्यासारखे नाही आहे." -- देशमुख
"तू माझ्यावर विश्वास ठेव."  -- विसु

देशमुखांनी कॉल कट केला, पण तोपर्यंत पलीकडची अस्वस्थता विसुच्या मनात झिरपली होती.

--

पुन्हा पहिल्यापासून सर्व फाईल्स वाचाव्यात की जे वाचले आहे, जे डोक्यात आहे त्यावर चिंतन करत बसावे या द्विधा मनस्थितीत असताना, विसुचे हात मात्र त्याच्या मेंदूतल्या विचारप्रक्रियेशी, काहीही देणेघेणे नसल्याप्रमाणे समोरच्या लॅपटॉपवर चालत होते आणि स्क्रीनवरचा ब्राऊजर निरर्थक सर्फिंग करण्यात मग्न झाला होता. अचानक ब्राऊजरमध्ये एक जाहिरात फ्लॅश झाली आणि विसुच्या डोक्यातील विचारचक्र थांबले. त्याने झपाट्याने, त्या उत्पादनांविषयी सर्व माहिती शोधायला, वाचायला सुरुवात केली आणि त्याच्यापुढे माहितीचा एक प्रचंड मोठा खजिना, उघडा झाला. 

"विसुभाऊ, आऊट ऑफ द बॉक्स विचार करण्याची सवय, तुमच्या वाढत्या वयासोबत लोप पावते आहे" विसु स्वत:शीच पुटपुटला आणि काहीशा उत्कंठीत मनाने त्याने देशमुखांचा मोबाईल क्रमांक टॅप केला. 

पलीकडून हॅलो यायच्या आतच , "येत्या रविवारी, आपण तुझ्या ऑफिसमध्ये भेटतो आहोत. फक्त आपण दोघेच.  असे सांगत आणि पलीकडे देशमुखांना गोंधळात पाडत विसुने तो कॉल कट केला.

--

रविवारी देशमुखांच्या ऑफिसात नवरेने विसुचे स्वागत केले. "सर, कधीची वाट पाहत आहेत तुमची."
"अरे हो. माझे बोलणे झाले आहे त्यांच्याशी. ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. " विसुने अकारण स्पष्टीकरण दिले.
"साहेब, तुम्हाला कॉफी आणू का ?"
"नाही, काही नको आणि तू इथे बाहेरच थांब. आम्ही बोलाविल्याशिवाय केबिनमध्ये यायचं नाही."

विसु केबिनमध्ये शिरला, तेंव्हा देशमुख, त्यांच्या केबिनच्या खिडकीतून बाहेर कुठेतरी शून्यात बघत बसले होते. विसुची चाहूल लागताच त्यांच्या मनातील खळबळ, त्यांच्या चेहेर्‍यावर उमटली.

"आज बहुतेक तुझ्या ऑफिसमधला फितूर सापडेल." विसुने देशमुखांना दिलासा दिला. "मी आता इथे काही तपासण्या करणार आहे. त्या पूर्ण होईस्तोवर शक्यतो आपण नको बोलूया."
देशमुखांनी मान डोलावली. विसुने एकदा त्या काचेच्या खिडकीतून बाहेर पाहिले आणि स्वतला काहीतरी समजावत असल्याप्रमाणे मान हलवली.

त्यानंतर विसुने त्याच्या बॅगेतून वेगवेगळी उपकरणे काढली आणि त्यातील एक उपकरण त्याने केबिनच्या मध्यभागी ठेवून सुरू केले. त्या उपकरणातून 'बीप,बीप' असा आवाज येऊ लागला तेंव्हा कुतुहलाने देशमुख त्यांच्या खुर्चीतूनच वाकून बघू लागले. विसुने त्यांना हातानेच खिडकीजवळच्या सोफ्यावर बसण्याची खूण केली.  त्याने केलेल्या इशार्‍याप्रमाणे देशमुख उठले आणि सोफ्यावर जाऊन बसले. त्या उपकरणाला एक छोटा स्क्रीन होता आणि त्याच्यावर एक सिग्नल वरखाली होत होता. 

विसुने ते उपकरण हातात घेऊन केबिनच्या चहूकडे फिरवण्यास सुरुवात केली. मध्येच त्या उपकरणातून येणार्‍या बीपची फ्रिक्वेन्सी बदलत होती, मध्येच आवाजही  कमी-अधिक होत होता. जवळजवळ अर्धा तास विसुने चौफेर तपासणी केली. त्या केबिनचे कानाकोपरे, जमीन, छत, केबीनला असणारी एकमेव खिडकी, आग प्रातिबंधक यंत्रणेचे, छतावर असणारे स्प्रिंकलर्स,  खिडकीसमोरच्या भिंतीवर, समकेंद्री वर्तुळे असलेल्या चित्राची फ्रेम, त्या खोलीतील सर्व खुर्च्या, टेबल आणि इतर फर्निचर, फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे, यंत्रे, अक्षरश: प्रत्येक गोष्ट विसु, प्रथम त्या उपकरणाने आणि नंतर इतर उपकरणे वापरुन, वारंवार तपासत होता. त्याच्या तपासणीतून स्वत: देशमुख देखील सुटले नाहीत. त्या अर्ध्या तासाच्या कसून तपासणीनंतर त्याने देशमुखांना केबिनबाहेर चलण्याची खूण केली.

त्याच्यामागोमाग देशमुखदेखील केबिनबाहेर आले आणि दोघेही एकत्रच तिथल्या सर्व्हर रूममध्ये शिरले. 

--

"मला दोन फितूर सापडले आहेत." विसुने तोंड उघडले आणि देशमुखांच्या चेहेर्‍यावरचा ताण कमी झाला.
"दोन फितूर ?   काही इन्स्ट्रुमेंट हॅक झाली आहेत का ? म्हणजे मला असं वाटलं तुझ्या तपासण्या पाहून." -- देशमुख
"तसं नाही"  विसुच्या स्वरात आणि चेहेर्‍यावर अनपेक्षित धक्का सहन करून, शांत झाल्याच्या खुणा होत्या.  "पण तरीही तुझी अख्खी केबिनच फितूर आहे"

"काय बोलतो आहेस तू  ? " देशमुखांच्या तोंडातून पुटपुटल्यासारखे  शब्द घरंगळले. "केबिन फितूर आहे ? म्हणजे ? आणि दुसरा फितूर कोण आहे मग ?"
"दुसरा फितूर तू स्वत: आहेस. " विसु ठामपणे आणि एकेक शब्द सुटा उच्चारत म्हणाला.  "पण तुझ्याच नकळत"

--

तो काय म्हणाला हे देशमुखांच्या मेंदूपर्यंत पोहोचायला काही वेळ लागला. तितक्या वेळात बधीरता, अविश्वास, आश्चर्य, राग या आणि अशा अनेक भावना देशमुखांच्या चेहेर्‍यावर झळकून गेल्या.  हा धक्का पचविणे देशमुखांना प्रचंड जड जात होते.
"तुला काय म्हणायचाय , माझे नुकसान मी स्वत:च करून घेतोय ? "  -- देशमुखांच्या स्वरात चीड होती.
"एका अर्थाने होय. पण तुझ्या स्वत:च्या नकळत."  - विसु शांतपणे म्हणाला.
"तू नीट सांगशील. माझं डोकं जड झालाय." -- देशमुख
"तू पाच मिनिटे शांत बस. टेन्शन घेऊ नकोस. मी तुला सविस्तर सांगतो" - विसु

पाच मिनिटांनी विसुने बोलायला सुरुवात केली.

"देशमुख, यावेळेस प्रथमच मी माझ्या सगळ्या स्टाफला, एकाच केसवर कामाला लावले आणि माझा जवळचा मित्र म्हटल्यावर त्या सर्वांनीही प्रचंड मेहनत केली. अक्षरश: आम्ही कधी न वापरलेले, वेगवेगळे सोर्स वापरुन, तुझ्या कंपनीशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची तपशीलवार माहिती मिळवली आहे त्यांनी. तुझ्या ऑफिसमधली, तुझ्या कंपनीशी संबंधित प्रत्येक व्यक्ती, माझ्या स्टाफमधल्या कुणा ना कुणाशी फेसबूक, व्हाट्सअॅप किंवा अन्य एखाद्या माध्यमातून याक्षणी जोडलेली आहे. पण इतके सर्व करूनसुद्धा, आज दुपारपर्यंत मला काहीही ठोस सापडले नव्हते. मग तुझ्या आजच्या फोनने ठिणगी पडली आणि त्याचवेळी मला नशिबाने देखील साथ दिली. अचानक मला या केसला उपयुक्त ठरेल, अशी बरीच माहिती इंटरनेटवर सापडली आणि मग मी थोड्या वेगळ्या प्रकाराने या केसचा विचार केला. त्यानंतरच्या दोन दिवसात, तू मगाशी बघितलीस ती सर्व उपकरणे जमवली मी. मी आज जे पहिले उपकरण वापरले ना, त्याला 'बग डिटेक्टर' म्हणतात. लपविलेले कॅमेरे, मायक्रोफोन, आरएफआयडी आणि तत्सम इतर  हेरगिरी करणारी विविध उपकरणे शोधण्यासाठी त्याचा वापर होतो.  या अशा हेरगिरी करणार्‍या सामुग्रीला एकत्रितपणे 'बग्ज' असे म्हटले जातं, म्हणून बग डिटेक्टर. तुझ्या केबिनमध्ये जागोजागी असे 'बग्ज' असतील असे मला वाटत होते, पण तसे नाही. ज्या कुणी हे केले आहे, त्याने अतिशय हुशारीने आणि सावधपणे हे केलंय आणि मुख्य म्हणजे त्यासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान सर्वसाधारण नाही.  म्हणजे जिथे 'बग्ज' असू शकतील, असे शोधणार्‍याला वाटेल, तिथे ते नाहीतच. तिथल्या खुर्चीत नाहीत, सोफ्यात नाहीत, इलेक्ट्रॉनिक उपकरणात नाहीत, फोनमध्ये नाहीत, वरती स्प्रिंकलरमध्ये पण नाहीत. ते खिडकीसमोरच्या भिंतीवर एक चित्र आहे ना, समकेंद्रित वर्तुळाचे, ते कुठून विकत घेतलेस तू ?"

"तेऽ, ती फ्रेम मला भेट म्हणून मिळाली होती, एका व्हेंडरकडून. चारपाच महिन्यांपूर्वी असेल."  देशमुखांनी आठवून सांगितले. "एकाग्रतेसाठी त्याचा वापर होतो असे म्हणाला होता तो. म्हणून मी ती फ्रेम त्या भिंतीवर लावली. तिथे प्रकाश चांगला येतो समोरच्या बाजूस असलेल्या खिडकीतून आणि मग त्यात वेगवेगळ्या रंगाची वर्तुळे आहेत, ती सर्व उठून दिसतात"

"ते चित्र साधेसुधे नाही. अत्यंत प्रगत तंत्रज्ञान वापरुन बनलेला एक छोटा ट्रान्समिटर आहे तो, पण कुठल्याही उर्जेविना काम करणारा.  त्याच्या आत एक विशेष प्रकारचा पडदा आहे. तुझ्या केबिनमध्ये होणार्‍या प्रत्येक आवाजाने, तो पडदा कंप पावतो.  पडद्याचा हा कंप, अदृश्य अशा लेसर किरणांच्या माध्यमातून टिपता येतो आणि मग त्याचे पुन्हा ध्वनिलहरींमध्ये रूपांतर करता येते. समोरच्या इमारतीतून, अशा प्रकारच्या मानवी डोळ्यांना अदृष्य असणार्‍या लेसर शलाका, त्या चित्रावर फेकणे अवघड नाही. त्यात त्या काचेच्या खिडकीमुळे त्यांचे काम सोपे झाले आहे. त्या पुन्हा प्राप्त केलेल्या ध्वनिलहरींवर. नंतर वेगवेगळे साऊंड फिल्टर्स वापरले, तर तुझ्या केबिनमध्ये बोलला जाणारा शब्द न शब्द, समोरच्या इमारतीत ऐकला जाऊ शकतो, रेकॉर्ड केला जाऊ शकतो. आणि माझा असा अंदाज आहे, ती फ्रेम हेतूपुरस्सर तुला भेट देण्यात आली आहे"  विसुचे बोलणे देशमुखांच्या कानात शिरले आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. त्यांच्या डोळ्यात अविश्वास ओतप्रोत भरला होता. 

"'laser listeners' म्हणून सर्च इंजिनमध्ये शोधलेस तर तू स्वत:देखील माहिती मिळवू शकशील"  देशमुखांच्या डोळ्यातला अविश्वास पाहून विसुने अधिक माहिती पुरवली.

"पण यावेळचे टेण्डर तर, मी स्वत:च भरले होते, आणि त्यावर काही चर्चाही नव्हती  केली. " देशमुखांचे मन अजूनही या प्रकारावर विश्वास ठेवायला तयार नव्हते.

"'तू स्वत: दुसरा फितूर आहेस', असे मी का म्हटले, ते नाही विचारलेस ? " -- विसु
"का ? " -- देशमुखांच्या नकळत, त्यांच्या तोंडातून प्रश्न विचारला गेला.

"मला ए
क सांग, तू चश्मा वापरत होतास ना पूर्वी ?"
"हो. पण गेल्या वेळेस नंबर वाढला होता, त्यावेळेस त्या चष्म्याच्या दुकानातील माणसाने, अत्यंत आधुनिक कॉन्टॅक्ट लेन्सेस आल्याचे सांगितले. त्याने या लेन्सेसचे फायदे सांगितले, मला ते आवडले.  या लेन्सेस  काढाव्या लागत नाहीत, स्वच्छ कराव्या देखील लागत नाहीत आणि दीर्घकाळ टिकतात. म्हणून मग या कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरण्यास सुरुवात केली." देशमुखांनी डोळ्याचा खालचा भाग बोटाने खेचून विसुला त्या लेन्सेस दाखविण्याचा प्रयत्न केला.  "जराही खुपत नाहीत रे. चष्म्यापेक्षा बर्‍याचच महाग पडल्या, पण मला अधिक स्वच्छ दिसताय तेंव्हापासून."
"गेल्या वेळेस म्हणजे कधी ?" -- विसु
"साधारण चार महिन्यांपूर्वी" -- देशमुख

"तरीच.  तुझ्या डोळ्यांना खुपल्या नसतील, पण तुझ्या व्यवसायाला चांगल्याच खुपल्या आहेत या कॉन्टॅक्ट लेन्सेस. तुझ्या डाव्या डोळ्यातील लेन्सच्या, एका कोपर्‍यात अत्यंत शक्तीशाली कॅमेरा आहे आणि माझा अंदाज चुकत नसेल, तर त्या लेन्सच्या भोवती एक वायरलेस ट्रान्समिटर आहे. त्या ट्रान्समिटरचा वापर करून, तू बघत असलेले प्रत्येक दृश्य, कुठेतरी पाठवले जात आहे, कदाचित तुझ्याच वायफायचा किंवा मोबाईलवरच्या इंटरनेटचा वापर होत असावा.  मगाशी मी तुझ्याजवळ, जेंव्हा तो 'बग डिटेक्टर' आणला होता, तेंव्हा त्याने सर्वात अधिक सिग्नल आणि दीर्घ बीप दोनदा दिला, एकदा तुझ्या डाव्या डोळ्याजवळ आणल्यावर आणि दुसरा तुझ्या हातातील अंगठीच्या जवळ आणल्यावर"  त्या अंगठीत देखील काहीतरी विशेष असावे असे वाटते आहे. ती पण नुकतीच विकत घेतली आहेस का ?"  - विसुने शक्य तितक्या सोप्या भाषेत, देशमुखांना परिस्थितीची कल्पना दिली.

"नाही ती जुनी आहे, पण घट्ट होत होती,म्हणून साधारण दोन महिन्यांपूर्वी, तिचा घेर वाढवायला आणि पॉलिश करायला दिली होती." देशमुखांच्या शब्दाशब्दात विमनस्कता डोकावत होती.
"तुला पद्धतशीरपणे, पुरता घेरलाय त्या न्यू एरावाल्याने. मेहुल नाव आहे ना त्याचं"  -- विसु

थोडा वेळ देशमुख काहीच बोलले नाहीत.  मग पडलेल्या खांद्याना सावरत, खोल गेलेल्या आवाजात त्यांनी कबुली दिली.  "हो मेहुलच नाव आहे त्याचं. पण आता काय करू म्हणतोस ?"
"ती फ्रेम तिथून काढून टाक, तुझी अंगठी काढून ठेव आणि त्या कॉन्टॅक्ट लेन्सेस एखाद्या डबीत  जपून ठेव."
"फेकून देतो ते सगळं" उद्वेगाने देशमुख उत्तरले.

"देशमुख, आपण सायबर क्राइम कडे तक्रार करणार आहोत" विसु थोड्या अधिकारवाणीने म्हणाला "ते सर्व जपुन ठेव. तक्रार करताना या गोष्टी आणि त्यांची बिलं लागतील. आणि तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण थोडे स्पष्ट बोलतो. हे सर्व तंत्रज्ञान अतिशय आधुनिक स्वरूपाचे आहे, तू काय किंवा तो न्यू एरावाला मेहुल काय, ही हेरगिरीची साधने तुमच्यासाठी, असल्या क्षुल्लक चोरीसाठी बनलेली नाहीत. माझा अंदाज चुकत नसेल तर तुला आणि कदाचित मेहुलला देखील केवळ एक गिनीपिग म्हणून वापरले गेले आहे, या तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यासाठी. त्या मेहुलला या गोष्टी कुठून मिळाल्या हे समजायला हवे. कदाचित यामागे एखादे प्रचंड मोठे कारस्थान असावे, कदाचित एखादी देशविघातक संघटना. तेंव्हा पोलिसांना या पूर्ण घटनेची सविस्तर माहिती देणे, हे अत्यंत आवश्यक आहे. माझी गरज भासेल तिथे प्रत्येक ठिकाणी मी असेनच.  आणि त्या सुकाळेला वाचविण्याचा प्रयत्न करू नकोस. तो सुकाळे बाराच्या भावात गेला तरी चालेल"

"यस सर" देशमुखांच्या आवाजात थोडा उत्साह आला होता. "तू म्हणशील तसेच करू"

--

त्या नंतरचे चार-पाच दिवस, विसु आणि देशमुखांचे पूर्ण ऑफिस यांच्यासाठी अतिशय धामधुमीचे गेले. त्यांनी पोलिसांना आणि पोलिसांनी त्यांना, पूर्ण सहकार्य केले आणि गुरुवारी संध्याकाळी मेहुलला अटक झाल्याची बातमी विसुला मिळाली.

तरीही शुक्रवारी संध्याकाळी, पुन्हा देशमुखांचा फोन पाहिल्यावर, विसुच्या मनावर काहीसा ताण आला.  काहीशा अस्वस्थ मनाने त्याने तो कॉल स्वीकारला.

"यावेळेचे कॉंट्रॅक्ट आपल्याला मिळाले." देशमुखांच्या आवाजात आनंद मावत नव्हता.
"आपल्याला ?"  -- विसु
"होय आपल्यालाच. यापुढे प्रत्येक वर्षी DEPL च्या नेट प्रॉफिटमधले, दहा टक्के तुला मिळतील. थोड्या वेळात तसे अधिकृत पत्र मिळेल तुला. आणि येत्या रविवारी सकाळी  घरगुतीमध्ये जातोय आपण, बूक केलंय मी पार्टीसाठी. तुझ्या आणि माझ्या दोघांच्या ऑफिस स्टाफला एकत्र एन्जॉय करूं दे आपल्याबरोबर."

देशमुखांच्या आवाजातला उत्साह आणि केस सुटल्याचे समाधान, या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून असेल कदाचित, पण कितीतरी दिवसांनी विसुच्या तोंडातून शीळ वाजली.

======
समाप्त
======

======

रविवार, २१ जानेवारी, २०१८

फितूर -- भाग ३ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)

---- मागील भागावरून पुढे ----

====
दुसर्‍या दिवशी विसु ठीक अकरा वाजता देशमुखांच्या केबिनमध्ये पोहोचला. 
"विशालचा निरोप आला आहे. तो रहदारीमध्ये अडकला आहे." देशमुख थोडे अस्वस्थ झाले आहेत असे विसुला वाटले.
"हरकत नाही, तोपर्यंत मला तुझी सीसीटीव्ही प्रणाली (सिस्टिम) दाखवतोस ?" -- विसु
"चल दाखवितो तुला."  असे म्हणत देशमुखांनी ऑफिसमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे दाखवायला सुरुवात केली.

पूर्ण ऑफिस फिरून ते पुन्हा देशमुखांच्या केबिनशी आले. विशाल केबिन मध्ये त्यांची वाट पाहत बसला होता.
"म्हणजे एकंदर बावीस कॅमेरे आहेत तर. " केबिनमध्ये शिरताना विसुने विचारले.
"बावीस नाही, एकतीस. " नऊ कॅमेरे लपविलेले आहेत. मी आणि सर सोडून कुणालाही माहीत नाहीत ते. नकाशा आहे सरांकडे"  विशाल हलक्या स्वरात बोलला.
"मला एक सांग, तुझ्या केबिनमध्ये एकही सीसीटीव्ही कॅमेरा नाही ?" विसुने देशमुखांना विचारले.
"नाही. सगळ्या कॉन्फिडेन्शियल मीटिंग्स इथेच होतात, त्यामुळे इथे एकही कॅमेरा बसवलेला नाही." विशालने परस्पर उत्तर दिले.
"छान. वाटलं होतं त्यापेक्षा चांगलं आहे हे." विसुच्या चेहेर्‍यावर हलके स्मित आले  "आणि इथले रेकॉर्डिंग कुठे होतं ?"
"इथे मागच्या बाजूसच आमचे ऑफिस आहे, तिथे डेडीकटेड सर्व्हर आहे आमचा त्यासाठी. तो वापरुन आम्ही सेवा पुरवतो.  इथून फायबर ऑप्टिक केबल टाकली आहे तिथपर्यंत." विशालने माहिती पुरवली.
"अरे वा. छान छान. आणि मग सरांना रेकॉर्डिंग बघायचे असेल तर ?"  विसुने प्रश्न विचारला
"त्यांच्या लॅपटॉपवर स्पेशल सॉफ्टवेअर इंस्टॉल केलं आहे त्यासाठी.  मोबाईलवर अॅप सुद्धा आहे शिवाय. " आपण काय बोलतो आहोत हे समोरच्याला समजते आहे, हे लक्षात आल्यामुळे विशालच्या आवाजात थोडा अधिक उत्साह आला होता.
"एक काम करशील ? सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवसांचे पूर्ण रेकॉर्डिंग देशील करून या एक्स्टर्नल हार्डडिस्कवर. आठ टेराबाईटची आहे. पुरेल ना ?" विसुने त्याच्या बॅगेतून एक पुडके काढत विशालला विचारले.
"ओ होऽ, भारी. आठ टेराबाईट !  नक्की पुरेल. पण कदाचित वेळ लागेल दोन-तीन तास." असे म्हणत विशालने देशमुखांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले.
"मला विचारण्याची आवश्यकता नाही. त्यांना जी हवी ती मदत द्यायची" देशमुखांनी विशालला बजावले.

विशालच्या ताब्यात त्यांचा लॅपटॉप देऊन देशमुख आणि विसु केबिनच्या एका बाजूला खिडकीपाशी आले. विसुने काहीशा अविश्वासाने, विशालकडे इशारा करत देशमुखांकडे पाहून भुवया उडविल्या.
"अरे नाही. माझ्या कॉलेजमधल्या एका मित्राचा मुलगा आहे. त्या कंपनीत मीच चिकटविला त्याला, त्यांना सीसीटीव्हीचे कंत्राट दिले तेंव्हा." विसूच्या संशयाला उत्तर देत देशमुख हलकेच पुटपुटले.
"तुझा लॅपटॉप त्याच्या हातात देतोस, तेंव्हा तू असतोस आजूबाजूला की ...."  -- विसु
"बर्‍याचदा मी असतोच. पण मी नसलो तरी नंदिनी असते. तशी काळजी घेतो मी."
"हंऽऽ. "

"सर, डाऊनलोड करायला लावले आहे. वेगळा फोल्डर बनवला आहे.  मी तीन तासांनी येऊ का ? म्हणजे मला दुसरे एक काम आहे, तेवढ्या वेळात ते होऊन जाईल."  -- विशाल
"ठीक आहे. तू जा. आणि परत येण्याची काही गरज पडेल असे वाटत नाही. त्यातूनही काही वाटले तर मी तुझ्या मोबाईलवर कॉल करेन." देशमुखांनी परवानगी दिली आणि विशाल तिथून निघून गेला.

"तुझ्या ऑफिसमध्ये वायफाय असेलच. त्याचा अॅक्सेस कुणाकुणाला आहे ? " विसुने विचारले.
"आयटी डिपार्टमेंटमधला विराज, मी, नंदिनी आणि धारप, त्यातही त्याचा पासवर्ड फक्त माझ्याकडे आणि विराजकडे असतो. विराज आयटीमध्ये सगळ्यात वरिष्ठ आहे आणि बर्‍याच वर्षापासून DEPL सोबत आहे. सर्वांच्या लॅपटॉप आणि मोबाईलवर वायफाय सेटअप करण्याचे काम तोच करतो."  -- देशमुख
"मी त्यांच्याशी बोलून येतो. " -  विसु

--

तब्बल दोन तासानंतर विसु परत आला, तेंव्हा देशमुख लॅपटॉपशी बसून कुणाशी तरी बोलत होते. त्यांनी विसुला बसण्याची खूण केली आणि बोलणे आटोपते घेतले.
"हेमांगीशी बोलत होतो. तुला माहीतच आहे ती अमेरिकेत असते. "  विसुने विचारले नसतानाही देशमुखांनी स्पष्टीकरण दिले.
"स्काइप का ?"
"नाही दुसरेच सॉफ्टवेअर आहे 'टॉक एनीव्हेअर - एनीटाईम' नावाचे. पूर्णपणे मोफत.   -- देशमुख
"तो लॅपटॉप जरा शटडाऊन करशील ?"
"का रे ?"
"कर तर"
देशमुखांनी निमूटपणे लॅपटॉप शटडाऊन केला.  "हं बोल आता"



"मी याविषयी देखील बोललो तुझ्या आयटी टीमशी आत्ता. मोफत मिळणारी बरीचशी सॉफ्टवेअर जाहिरातींवर चालतात, काही सॉफ्टवेअर तुमची वैयक्तिक माहिती चोरतात, काही तुमच्या हार्डड्राईव्हची जागा, क्वचित सीपीयूचा वेळ देखील वापरतात, त्यांच्या इतर कामासाठी. तुला कदाचित माहीत नसेल, पण यांच्या इंस्टॉलेशनच्या वेळी ज्या 'अटी आणि शर्ती' दाखवतात त्यांच्यावर तुमच्याकडून शिक्कामोर्तब करून घेतात ना, तिथे बर्‍याच खाचाखोचा, लबाड्या असतात. त्या तर आपण कधीच वाचत नाही. 'अॅक्सेप्ट' वर क्लिक करून मोकळे होतो. काही सॉफ्टवेअर सुरूवातीला एकदम सोज्वळ असतात, आणि नंतरच्या अपडेट्समध्ये त्यांचे खरे रंग दाखवतात. शक्यतो वापरूच नयेत अशी फुकट सॉफ्टवेअर.
"बापरे !"
"आता याच सॉफ्टवेअरचे बघ. तू याचा वापर करून ऑडिओ-व्हिडिओ कॉल केलास, म्हणजेच तू या सॉफ्टवेअरला तुझ्या वेबकॅमचा, मायक्रोफोनचा, इंटरनेटचा वापर करण्याचा अधिकार दिला आहेस.  कदाचित तुझा लॅपटॉप चालू होतानाच त्याच्या 'सिस्टीम ट्रे' मध्ये, म्हणजे तळात उजवीकडे, त्या सॉफ्टवेअरचा एक भाग, ज्याला सर्वसाधारणत:  मेमरी रेसिडेंट असे म्हणतात, तो लोड होत असेल. आता स्टार्टअपलाच लोड झालेला, या सॉफ्टवेअरचा हा भाग, तुझ्या नकळत तुझ्या वेबकॅमचा,मायक्रोफोनचा, इंटरनेटचा वापर करत असेल तर ? "   -- विसु
देशमुख हतबुद्ध होऊन ऐकत होते.

"विचार कर, कदाचित तुझ्या नकळत तू जे बोलतो आहेस, तू ज्या प्रतिक्रिया देतो आहेस त्याचा ऑडिओ-व्हिडिओ डेटा, तुझ्या हार्डड्राइवमधील एखादी फाईल तुझ्या नकळत कुठे पाठवली जात असेल तर ?"

"म्हणजे तू असे सुचवितो आहेस का की हा लॅपटॉपच फितूर आहे ?" देशमुखांचा चेहेरा पार पडला होता.
"शक्यता नाकारता येत नाही"  विसु शांतपणे म्हणाला. "मी विराजशी याविषयी विस्तृतपणे बोललो. त्याला तसे बर्‍यापैकी ज्ञान आहे याविषयी. पण तो म्हणाला की तुझ्या लॅपटॉपवर त्यांनी कुठलेही सॉफ्टवेअर इंस्टॉल केलेले नाही. ते फारसा हात नाही लावत तुझ्या लॅपटॉपला. "
"हो. हा लॅपटॉप मी एका मोठ्या दुकानातून विकत घेतला होता. त्यांचा एक सपोर्ट इंजिनीअर आला होता घरी, त्याने सुचविले होते हे सॉफ्टवेअर. मी हो म्हटले, म्हणून त्यानेच इंस्टॉल करून दिले."   -- देशमुख
"मी विराजशी बोललो आहे. कित्येक अॅंटीव्हायरस सॉफ्टवेअर, याबाबतीत मोलाची मदत देतात, ऑपरेटिंग सिस्टिममध्ये देखील बर्‍याच सोयी असतात. पण आपण त्यांच्या सुविधा वापरतच नाही. पर्सनल फायरवॉल आणि इतर काही सॉफ्टवेअरसुद्धा उपयुक्त असतात. आधीच इंस्टॉल असलेल्या सॉफ्टवेअरमधील  सुरक्षेच्या दृष्टिकोनातून असलेल्या त्रुटी सुद्धा तपासू शकतात. इतरही बर्‍याच गोष्टी आहेत. आपण या विषयी बोलत बसलो, तुला प्रत्यक्ष दाखवत बसलो तर एक दिवस सुद्धा पुरायचा नाही."

"मग आता काय करू म्हणतोस ?" खोल आवाजात देशमुख म्हणाले.
"तुला दोन तीन गोष्टी सुचवतो.  शक्य असल्यास तुझ्या घरगुती गोष्टींसाठी वेगळा लॅपटॉप वापर. ते शक्य नसेल तर किमान दोन वेगळे यूजर अकाऊंट, लॉगिन तरी वापर आणि यातले एकही यूजर अकाऊंट, लॅपटॉपचे अॅडमिन नसेल तर बरे. अॅडमिन साठी वेगळे यूजर अकाऊंट ठेव. अगदी आवश्यक असेल तेंव्हाच त्याचा वापर करायचा.  दुसरे म्हणजे सोमवारी विराजच्या ताब्यात तुझा लॅपटॉप दे. त्याला पूर्णपणे तपासू दे तो. तो सगळी सॉफ्टवेअर, अॅप्स, त्याना दिलेल्या, परस्पर घेतलेल्या परवानग्या वगैरे सर्व तपासेल, आवश्यक तिथे बदल करेल.  त्याच्यावर विश्वास ठेवता येईल, पण त्यातून तुला वाटत असल्यास, अन्य एखाद्या तज्ज्ञाकडून तपासून घेतलास तरी चालेल. मात्र ते काम करत असतील, तेंव्हा तू बाजूला हजार रहा. त्यांच्यावर पूर्णपणे विसंबू नकोस."
"होय रे बाबा. तू म्हणशील तसं" -- देशमुख
"तो सीसीटीव्हीचा डेटा डाऊनलोड झाला असेल तर ती हार्डडिस्क दे. घरी जाऊन निवांतपणे बघेन. आणि त्या विशालचा मोबाईल क्रमांक देऊन ठेव. एखादवेळेस गरज लागली तर."
"SMS करतो तो नंबर.मला माहीत आहे, तुझे आभार मानलेले तुला आवडणार नाहीत. तरी पण खूप खूप धन्यवाद. ही तुझी हार्डडिस्क" देशमुख भारावल्या सुरात म्हणाले.
"आता पुढच्या आठवड्यात तुझ्या सगळ्या स्टाफच्या आणि इतर काही जणांच्या 'कुंडल्या' तपासणार आहे. इतरही काही गोष्टी तपासायच्या आहेत. पुढच्या शनिवारी तुझ्याशी बोलतो."  देशमुखांच्या हातातून हार्डडिस्क घेऊन स्वत:च्या बॅगेत भरता भरता विसु म्हणाला. "येऊ आता ?"
"होय गुरुजी" - देशमुखांच्या मनावरचा ताण थोडा कमी झाला होता. "बाकी तू कुठे शिकलास हे सर्व ?"
"शिकायला लागतं बाबा. तंत्रज्ञानात पारंगत असणं, अद्ययावत होत राहणं आवश्यक आहे माझ्या व्यवसायात"  विसु खुर्चीतून उठता उठता हसून म्हणाला.

======
क्रमश:
======

======

शनिवार, २० जानेवारी, २०१८

फितूर -- भाग २ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)

---- मागील भागावरून पुढे ----
====

दुसर्‍या दिवशी ऑफिसात आल्याआल्या देशमुखांनी विसुला फोन लावला. विसु म्हणजे विश्वनाथ सुधाकर सरपोतदार, त्यांचा शाळेपासूनचा मित्र. पुढे कॉलेजला गेल्यावर वाटा वेगळ्या झाल्या.  पण कुठल्याही अपेक्षेविना, ज्या काही मोजक्या, जुन्या मित्रांशी मैत्री टिकून होती, त्यांच्यापैकी तो एक होता. अतिशय बुद्धिमान. नंतर त्याने स्वत:ची डिटेक्टिव एजन्सी काढली तरीही त्यांना परस्परांची व्यावसायिक गरज कधीच भासली नव्हती. वर्षातून किमान दोनदा भेटणे आणि अधूनमधून केवळ आणि केवळ गप्पा मारण्यासाठी येणारा फोन, इतक्यावरच त्यांच्या मैत्रीचे झाड टिकले होते आणि बहरलेही होते.

"विसु, तू मला कधी भेटू शकतोस ?"
"काय रे काही विशेष ?" विसु त्याच्या नेहेमीच्याच जाड्याभरड्या आवाजात म्हणाला.
"हं. म्हटलं तर आहे. DEPLशी संबंधित आहे.  आज रात्री घरी येतोस ? नऊ-दहापर्यंत आलास तरी चालेल. "  देशमुखांनी अप्रत्यक्षपणे माझ्या ऑफिसमध्ये बोलण्यासारखा विषय नाही असे सुचविले.
"हंऽऽ.असं कर ना, तूच माझ्या ऑफिसला ये ना संध्याकाळी. त्यानिमित्ताने तुझे पाय माझ्या ऑफिसला लागतील. सविस्तर बोलू, मग 'घरगुती'ला जेवू , त्यांनी बफे डिनर देखील चालू केलंय. मी एकदा जाऊन आलोय. झकास आहे. " 
"Ok. Done" तिकडे विसुने फोन कट केला आणि देशमुखांनी मोबाईलमध्ये रिमाईंडर लावून टाकला.

----

संध्याकाळी ठीक सहा वाजता रिमाईंडरने त्याचे काम चोख बजावले. नंदिनीला सांगून ते निघाले आणि सोळाव्या मिनिटाला ते 'गुप्त' च्या दारात होते. दारात कुणीच नव्हते. त्यांनी बेल वाजविल्यावर  "आपका शुभनाम ?" अशी पृच्छा झाली. त्यांनी आवाजाच्या दिशेने पाहिले. एक सीसीटीव्ही कॅमेरा त्यांच्या दिशेने वळत होता. पण त्यांनी नाव सांगायच्या आतच दार उघडले, विसु स्वत: दारात होता.

"स्टाफला बर्‍याचदा सहापर्यंत सोडतो मी, मग ही सिस्टिम, ऑफिसचा ताबा घेते." देशमुखांनी काही विचारायच्या आतच विसुने स्पष्टीकरण दिले.
"छान आहे. कुठून घेतलीस ?"
"मी स्वत:च तयार केली आहे. पेटंटसाठी अर्ज केला आहे.  आणि हे एकच यंत्र नाही, दुसरीदेखील आहेत. नवीन येणार्‍याला पूर्ण स्कॅन केल्याशिवाय आत येता येणार नाही याची सोय केली आहे मी." विसुच्या आवाजात सहजता आणि चेहेर्‍यावर अभिमान होता.
"पूर्ण स्कॅन म्हणजे ?"
"कळेल तुला हळूहळू" विसु पुटपुटला.

विसुच्या केबिनमध्ये स्थिरावताना, कुठून सुरुवात करावी आणि काय काय सांगावे याचे विचार ते मनात घोळवत होते.
"अगदी सविस्तर सांग. सुरुवातीपासून. आणि अगदी क्षुल्लक गोष्ट असेल तरीही काहीही लपवू नकोस" जणू त्यांचा चेहेरा वाचल्यासारखे, विसुने शांतपणे सांगितले.

नंतरचा अर्धा तास देशमुख एकटेच बोलत होते आणि कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त न करता विसु शांतपणे सर्व ऐकत होता.

देशमुखांचे बोलणे संपले आणि विसुने पाण्याचा ग्लास पुढे केला. देशमुखांनी रिकामा ग्लास खाली ठेवला आणि विसुने पहिला प्रश्न विचारला.
"तुझा कुणाकुणावर संशय आहे ?"
"ते ठरविता येत नाही आहे. म्हटलं तर अनेकांना संधी होती आणि आहे, पण त्यातील एकावरही संशय घ्यावा अशी त्यांची वागणूक नाही."  देशमुखांच्या मनातील संभ्रम त्यांच्या देहबोलीत डोकावत होता.

"मी उद्या तुझ्या कंपनीत येतो. चालेल ? मला प्रत्येकाला भेटायचे आहे, तुझे पूर्ण ऑफिस पाहायचे आहे" -- विसु
"परवा येतोस ? म्हणजे मी तशी तयारी करून ठेवतो. सगळे मोकळे राहतील असे बघेन."
"नाही नाही, तसं नाही.  मी डिटेक्टिव्ह आहे हे त्यांना सांगायचे नाही. माझी ओळख तुझा मित्र म्हणूनच करून दे. असं सांग की मलादेखील  स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यामुळे मला या व्यवसायासंबंधी अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत."
"तू म्हणशील तसं, अकरापर्यंत येशील ना ?"
"सकाळी दहा वाजता. आजचं डिनर माझ्यातर्फे, उद्या तुझा पाहुणचार. विसु हसून म्हणाला "चल निघू, नंतर 'घरगुती'चा लग्नाचा हॉल होतो"  आणि दोघे बाहेर पडले.
निघताना विसुने दार ओढून घेतले आणि स्पीकरच्या समोर उभा राहून 'सावधान' असे तीनदा म्हणाला.
"ही लॉकिंग सिस्टीम खास बनवून घेतली आहे. छोटा माईक दडवलाय तिथे. मागे एकदा चोरीचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर."  देशमुखांचा प्रश्नार्थक चेहेरा पाहून विसुने स्पष्टीकरण दिले. "आता ऑफिस उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी फक्त माझा आवाज ओळखते ती"  "

'झकास घरगुती चव आणि आजच्या पिढीला आवडणारी बफे सिस्टीम याचा असा मेळ क्वचितच कुठे असेल.' बाहेर पडताना देशमुखांच्या मनात जेवण  रेंगाळत होते.

"उद्या दहा वाजता." असे म्हणत विसुने त्यांचा निरोप घेतला.
घरी निघण्यापूर्वी देशमुखांनी, नंदिनीला SMS करून, 'माझा एक मित्र उद्या सकाळी येणार आहे, त्यामुळे सकाळी नऊला ऑफिसमध्ये हजर रहा.' असे कळविले.

----

दुसर्‍या दिवशी ते ठीक नऊला ऑफिसला पोहोचले, नंदिनी, त्यांच्याकडचा जुना शिपाई नवरे आणि अकाऊंट्स मधले दोन क्लार्क साडेआठलाच ऑफिसला पोहोचल्याचे, त्यांना वॉचमनने सांगितले. त्यांना नंदिनीचे कौतुक वाटले.

ठरल्याप्रमाणे, विसु ठीक दहा वाजता ऑफिसला पोहोचला. त्यानंतर पाचसहा तासात तो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये फिरला असावा, त्याने प्रत्येकाशी यशस्वी संवाद साधला असावा याची पावती देशमुखांना दुपारी चहाच्यावेळी मिळाली. त्याच्याभोवती कोंडाळे जमले होते. धारपांसारखा मितभाषी मनुष्यदेखील, विसुशी हसतखेळत बोलत होता.

संध्याकाळी  देशमुखांच्या केबिनमध्ये विसु शिरला तेंव्हा बहुतेक स्टाफ निघाला होता. नंदिनीची आवराआवर सुरू होती. त्याला पाहून नंदिनीच्या चेहर्‍यावर सहजपणे स्मित उमटले आणि विसु त्याचे काम चोख करणार याची खात्री देशमुखांना पटली.
"तुम्ही निघालात तरी चालेल आता. नवरेंना सांगा थांबायला" देशमुख नंदिनीला म्हणाले आणि तिने पुन्हा एकदा हसून त्यांचा निरोप घेतला.
"बोल आता. "
"इथे चालेल ना ? " -- विसु
"आता मी बोलाविल्याशिवाय, कुणीही नाही येणार इथे" -- देशमुख
"तुझा स्टाफ झकास आहे. नशीबवान आहेस लेका." -- विसु
देशमुखांच्या चेहेर्‍यावर स्मित पसरले. दोन दिवसापूर्वीच्या अडचणी जाणून घेण्याच्या सेशनचे परिणाम अजून टिकून होते.
"काय वाटतंय तुला, यांच्यापैकी कुणी फितूर असेल का ? विशेषत: नंदिनी ?" देशमुखांनी मूळ विषयाला थेट हात घातला.
"शंभर टक्के नाही सांगू शकणार मी. पण माझ्या आजवरच्या अनुभवावरुन सांगतो, यांच्यापैकी कुणीही असण्याशी शक्यता फार कमी आहे."  -- विसु
"तू हे जे म्हणतो आहेस, ते केवळ आजच्या बोलण्यावरून असेल तर...." -- देशमुख

"नाही नाही, तसं नाही. माझ्या व्यवसायाच्या निमित्ताने मी अनेक कोर्स केले आहेत, विविध गोष्टींची माहिती मिळवली आहे, अभ्यास केला आहे. त्यातील एक कोर्स मनोव्यापारांशी निगडीत होता. माणसांची चटकन पारख करता येणे, माझ्या व्यवसायात खूप महत्त्वाचे. मानसिक जडणघडणीत मूळ स्वभाव, संस्कार, आवडीनिवडी, असुरक्षितता आणि त्यातून निपजणार्‍या विकृती, जबाबदारी समजण्याची, पाळण्याची वृत्ती अशा अनेक बाबी यांचा अभ्यास होतो. माझ्या सध्याच्या निदानाप्रमाणे, तुझ्या ऑफिस स्टाफपैकी, कुणीही आर्थिक लाभ मिळवण्यासाठी  फितूर होतील, दगाबाजी करतील असे वाटत नाही. मूलत: त्यातील कुणीही या प्रवृत्तीचा नाही. म्हणून तर मी तुला तू नशीबवान आहेस असे म्हटले. आणि नंदिनीतर रत्न आहे. अतिशय बुद्धिमान आहे ती, पण तरीही अहंकारी नाही. सगळ्या स्टाफचे तिच्याविषयी चांगले मत आहे.  तिच्याशी मी सर्वात जास्त वेळ बोललो. ती अगदी टोकाच्या अडचणीत असेल, तरीही असे काही करेल असे वाटत नाही. "

"मग आता टेण्डरची ही घटना केवळ योगायोग मानायचा का ?" ---  देशमुख
"नाही नाही तसं नाही.  स्टाफमधला कुणी दोषी नसेलच असे मी म्हटलेले नाही. पण आर्थिक लाभ मिळवण्यासाठी कुणीही हे करणार नाही, इतकंच म्हटले आहे. त्याच्यापैकी कुणाला ब्लॅकमेल केले जाऊ शकते, ही शक्यता आहे. त्यांच्याकडून ही गोष्ट नकळतपणे देखील कुणी करून घेऊ शकतो. तंत्रज्ञान खूप प्रगत झाले आहे आता. तू माझ्या ऑफिसमध्ये त्याची चुणूक पाहिली आहेस. तू माझ्या ऑफिसमध्ये पहिला अर्धा तास जे काही बोललास, ते सारे मी रेकॉर्ड केले आहे, तसे नेहेमीच करतो. कारण केसचा विचार करताना त्याचा मला उपयोग होतो. माझ्या ऑफिसमध्ये तू खुर्चीवर बसल्यापासून, तो रेकॉर्डर ऑटोमॅटिकली सुरू झाला;  ते तू उठेपर्यंत तो सुरू होता"   -- विसु

"बापरे,  पण हे कायद्याने चालतं ? म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास आहे पण इतरांच्या बाबतीत ?" -- देशमुख
"एकतर मी माझ्या ऑफिसमध्ये ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची रीतसर परवानगी घेतली आहे. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे मी माझ्या व्यावसायिक नीतीमूल्यांशी प्रामाणिक आहे, त्या रेकॉर्डिंगचा माझ्याकडून दुरुपयोग होणे नाही. आणि ही बाब मी तुला सांगितली, पण ही काही प्रत्येकाला सांगण्याची गोष्ट नव्हे."  -- विसु

"मग आता काय करायचं ?"  तंत्रज्ञानाचा वापर म्हटल्यावर देशमुखांच्या डोक्यात मोहोळ उठलं होतं.  त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या आयटी डिपार्टमेंटमधले चारही चेहरे तरळून गेले.
"तुझ्या आयटी डिपार्टमेंटमधल्या प्रत्येकाशी मी  बोललो आहे. तसे बिलंदर वाटत नाहीत ते."  देशमुखांचे मन वाचल्यासारखा विसु बोलला.  "पण तरीही पुन्हा एकदा काही गोष्टी बघायला हव्या. आपण असे करूया, उद्या मी पुन्हा येतो इथे, मला काही गोष्टी तपासून बघायच्या आहेत. इथल्या सीसीटीव्हीची व्यवस्था तू बाहेरच्या एजन्सीला दिली आहेस असं कळलं. त्यांचा इथे येणारा सपोर्ट इंजिनीयर विशाल धुरंधर, त्यालाही भेटायला हवे. 

"पण उद्या शनिवार आहे ना, त्याचा ऑफ असतो. पण ठीक आहे, मी बोलावून घेतो त्याला उद्या सकाळी. अकरापर्यंत येईल तो इथे."  --- देशमुख
"ठीक आहे, मग मी देखील अकरा वाजेपर्यंत पोहोचतो." असं म्हणून विसु निघाला.

======
क्रमश:
======

======

शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

फितूर -- भाग १ / ४

(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)
====

"सर, सुकाळेंचा फोन आहे, तुमचा मोबाईल रिचेबल नाही आहे, म्हणतायत" नंदिनीचा, त्यांच्या सेक्रेटरीचा फोन आला आणि देशमुखांच्या कपाळावरची एक आठी वाढली. त्यांनी मोबाईल चेक केला, मोबाईल तर चालू होता.

"त्यांना सांगा, मी त्यांना कॉल करतो."  असे म्हणत त्यांनी रिसिव्हर ठेवून दिला आणि दुसर्‍या हाताने सुकाळेंचा नंबर टॅप केला. नंबर एंगेज्ड होता. 
सुकाळे त्यांच्यासाठी अतिशय कामाचा माणूस . आपल्या पदाचा, पोझिशनचा पुरेपूर फायदा उठवत त्याने बक्कळ माया जमा केली होती. त्यात देशमुखांकडून दर महिन्याला जाणार्‍या पाकीटाचा देखील भाग होता.

त्यांना अचानक कुठल्यातरी चित्रपटातला संवाद आठवला  'हां साहब, हम गलत काम करते है, पर हमारे भी कुछ उसूल होते है'.  'कुठल्या चित्रपटातला बरं होता तो ?' त्यांना आठवेना. 'छे ! या बिझनेसने पार वाट लावली आपली' त्यांच्या मनात आले. त्यांना त्यांच्या कंपनीची, DEPL ची सुरुवातीची वर्षे आठवली. 'दर वीकएंडला सगळ्या चिंता, कामं बाजूला सारून, सगळं काही विसरून किमान एक पिक्चर पाहणे, कधीतरी नाटक पाहणं, आऊटिंगला जाणे आणि ताजेतवाने होऊन, सोमवारी पुन्हा स्वत:ला कामात बुडवून घेणे. काय दिवस होते ते. पण छाया गेली आणि आपण कामाचा व्याप वाढवला, महत्वाकांक्षा पोसली आणि कंपनीने कात टाकली. एका छोट्या रोपट्याचा बघता बघता वृक्ष झाला. पण आज हे पाहायला छाया नाही.' त्यांचे मन भरून आले. 'जशी कंपनी मोठी झाली तशी स्पर्धादेखील वाढली आणि तिच्याबरोबर टिकून राहायचे असेल तर, अटळ म्हणून काही नको त्या गोष्टीदेखील आपण स्वीकारल्या. सुकाळे त्यातलाच एक'

मोबाईल वाजला आणि देशमुखांचे विचारचक्र थांबले. सुकाळेचाच फोन होता.

"साहेब, बातमी चांगली नाही, कॉंट्रॅक्ट दुसर्‍याला जातंय."
"काय सुकाळे ? हे कॉंट्रॅक्ट माझ्यासाठी किती महत्त्वाचे होते तुम्हाला माहीत नाही का ?"
"होय साहेब, मी व्यवस्थित सेटिंग लावली होती यावेळी, कुठे माशी शिंकली काय माहीत ?" सुकाळेच्या आवाजात संभ्रम होता.
"या महिन्यात दुसर्‍यांदा घडतंय सुकाळे. जरा मनावर घ्या, मग तुमच्या वर्ल्डटूरची जबाबदारी माझी." 
"काय साहेब, गेली दहा वर्षे तुमच्याशी इमान ठेवलाय. आणि तुम्ही...." सुकाळेचा आवाज किंचित चढला.
"तुमच्यावर संशय नाही घेत आहे मी" देशमुखांनी त्याला चुचकारले  "पण कॉंट्रॅक्ट कुणाला मिळणार आहे ?"
"यावेळी पण न्यू एराला.  थोड्या वेळात डिटेल्स हातात येतील माझ्या, विज्यासोबत रात्री तुमच्या घरी पाठवितो."
"ठीक आहे."  असं म्हणत देशमुखांनी फोन कट केला.

'हा काय प्रकार आहे छडा लावलाच पाहिजे.' त्यांच्या मनात आले.

न्यू एरा एकेकाळची त्यांची प्रतिस्पर्धी कंपनी,पण काळासोबत ती बदलली नाही आणि मागे पडली. त्यात सुकाळेसारखा हुकूमाचा पत्ता, देशमुखांच्या हातात लागला आणि मग न्यू एराचे नाव आणि कर्तृत्व विस्मृतीत गेले. भलेमोठे कर्ज मागे ठेवून वर्षापूर्वी डाह्याभाई गेला आणि मग त्याच्या अमेरिकेतून परत आलेल्या मुलाच्या हातात न्यू एराची सूत्रे गेली. दोन महिन्यांपूर्वी कुणी त्यांना सांगितले असते, की येत्या काळात न्यू एरा तुम्हाला टक्कर देणार तर देशमुख खदखदून हसले असते. पण आता हसण्यासारखी वेळ राहिली नव्हती. त्यांच्या हातातून गेलेले, खरंतर न्यू एराने हिसकावून घेतलेले हे दुसरे कॉंट्रॅक्ट.

'काल आलेल्या या पोराने नक्की कुठे सेटिंग लावले आहे शोधून काढायलाच हवे.' त्यांच्या मनात पुन्हा विचार आला.
'हे असेच चालू राहिले तर, आपणही न्यू एराच्या वाटेने जाऊ' नुसत्या कल्पनेने देखील त्यांचे मन थरथरले.

----

सुकाळे शब्दाला जागला. देशमुख बंगल्यावर परतले आणि फ्रेश होत नाही आहेत तोच विज्या आल्याचे सखारामने त्यांना सांगितले.

"काय विज्या कसा आहेस ?" त्यांनी सगळी उत्सुकता लपवत त्याला विचारले.
"तुमची कृपा आहे साहेब. सुकाळेसाहेबांनी हे पाकीट दिलंय" विज्याचे दात फाकले आणि शब्द घरंगळले
देशमुखांनी ते पाकीट हातात घेतले आणि ड्रॉवरमधून काढून लगोलग दुसरी दोन पाकीटे विज्याच्या हातात कोंबली.
'हे तुझ्यासाठी आणि हे दुसरे सुकाळेसाहेबांना द्यायचे. काय ?" देशमुखांनी विज्याला बजावले.
विज्याचा चेहेरा उजळला. 'हो साहेब. थॅंक्यू साहेब.  येऊ का ?' विज्याच्या तोंडातुन लाचारी टपकली.
देशमुखांनी होकारार्थी मान हलवली.

सायकलवर टांग टाकून विज्या पसार झाला आणि अस्वस्थ मनाने त्यांनी पाकीट उघडले. आतल्या कागदांवर त्यांची सराईत नजर झटझट फिरली आणि त्यांच्या मनाच्या घालमेलीने टोक गाठले. तिरमिरीतच त्यांनी सुकाळेला फोन लावला.

"सुकाळे हे नक्की काय चाललाय ?"
"होय साहेब. मलाही तोच प्रश्न पडलाय. असं वाटतंय की जणू तुमच्या टेण्डरचे आकडे त्यांना आधीपासूनच माहीत होते."
"काय बोलताय ? तुमच्या व्यतिरिक्त कोण आहे तुमच्याकडे, जो हे करू शकेल ?"  त्यांनी सुकाळेला आणि स्वत:ला एकाच वेळी प्रश्न केला.
"नाही साहेब. तसं माझ्या शिवाय इथे कुणी असल्या भानगडीत पडणारे नाहीत. तुम्ही देखील ओळखता ना सगळ्यांना. तरीही मी चौकशी करतो. "  -- सुकाळे
"बरं, पाकीट मिळाले ना ? यावेळेस वाढवलेत."
"हो हो. विज्या काल तडक इकडेच आला. खुश होता त्याचे वेगळे दिलेत म्हणून. "
"हे घडले हे शेवटचे. येत्या महिन्यात हा प्रकार पुन्हा घडता कामा नये. आणखी काळजी घ्या"
"हो साहेब." सुकाळेने फोन कट केला. पण तो ही अस्वस्थ झाला होता. 'आपल्या इथे, आपल्यापेक्षा चतुर दुसरा कुणी असेल, तर आपलाही पत्ता कट होऊ शकतो.' त्याच्या मनात येऊ पाहात असलेला विचार त्याने निग्रहाने मागे सारला. 

--

दोन दिवसांनी दुपारी सुकाळेचा कॉल पाहिल्यावर देशमुखांनी घाईघाईने नंदिनीला बाहेर जायला सांगितले आणि फोन उचलला.
"साहेब, टेण्डर लीक झालंय असं नक्की नाही म्हणता येणार, आणि झालंच असेल तर आमच्याकडून नाही." सुकाळे काहीसा उत्तेजीत झाल्याचे देशमुखांना जाणवले.
"कशावरून ?"
"साहेब यावेळेस तुमचे टेण्डर दुपारी आले होते आणि  न्यू एराचे  त्याच दिवशी सकाळी. तुमच्या आधी."
"म्हणजे तुम्ही असं सुचवताय का की आमच्याच कंपनीतला कुणीतरी ...."
"शक्यता आहे साहेब." देशमुखांना अर्ध्यावर तोडत सुकाळे म्हणाला.

देशमुखांनी फोन कट केला आणि त्यांना 'त्रिशूल' आठवला. आपला 'आर के गुप्ता' झाला आहे असे एक क्षणभर त्यांना वाटले.   'छे. काहीतरीच. मी असले प्रकार कधी केलेले नाहीत.' 

तरी त्रिशूलचा विचार त्यांच्या डोक्यातून जाईना. त्यांना आठवले, दोन महिन्यांपूर्वी नंदिनीने नवीन फ्लॅट बूक करण्यासाठी कंपनीकडून कर्ज मिळेल का असे  विचारले होते . त्यांनी इंटरकॉमवरची बटणे काहीशी जोरात दाबली.
पलीकडून नंदिनीचा मंजूळ आवाज आला "यस सर ?"
"आत या"
"सर, ते मगाचचे लेटर पूर्ण केलंय मी ." त्यांच्यासमोर एका पत्राचा ड्राफ्ट सरकवत नंदिनी म्हणाली. 
त्यांनी पत्रावर नजर फिरवली. 'हिचं काम एकदम नेटकं.' देशमुखांच्या मनात आले. 'पत्राची भाषा देखील अगदी माझीच, जणू माझ्या मनात काय आहे हे हिला कळतं'  स्वत:च्याच विचाराने ते चपापले. 'छे काहीच्याबाही विचार करतो आहोत आपण'
"तुमच्या फ्लॅटचे काय झाले" स्वत:वर संयम ठेवत, त्यांनी अगदी सहज वाटावे अशा आवाजात विचारले.
"मी दोन बँकांमध्ये अर्ज केले होते, पण दोघांनीही एकच कारण देत अर्ज नाकारले. दोन महिन्यांनी या असं म्हणत आहेत.  या नोकरीत एक वर्ष पूर्ण झाल्यावर."
"हं. तुम्ही अकाऊंट्समध्ये धारपांना भेटा. मी बोलतो त्यांच्याशी. तुमचे काम होईल."
"थॅंक यू सर. थॅंक्स अ लॉट." नंदिनीचा चेहेरा आनंदाने फुलला.
"आणि हे लेटर फायनल करा आणि सहीसाठी पाठवा"

नंदिनी बाहेर गेली आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमधल्या स्टाफपैकी, प्रत्येकाच्या काय काय अडचणी आहेत ते आठवायला सुरुवात केली.  संध्याकाळपर्यंत, सरांचा मूड आज भलताच छान आहे, सरांना लॉटरी लागली की काय, इथपासून ते, आपले सर इतर मालकांसारखे नाहीत. ते भलतेच सहृदयी, जॉली इत्यादि इत्यादि आहेत, याच्या चर्चा अधूनमधून रंगल्या.

======
क्रमश:
======

======

गुरुवार, ११ जानेवारी, २०१८

ड्रोन

================
#विज्ञान_लघुकथा क्रमांक ३
================
(अर्थातच सर्व नावे आणि कथाविषयासह पूर्णत: काल्पनिक)


====
स्टेटमेंट १ - सारांश
====
XXXX च्या सर्विस अँड सपोर्ट सेक्शन मध्ये मी, अॅंथनी गोमेज , गेले तीन वर्षे काम करत आहे.  माझ्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीला YYYY पोलिस स्टेशनकडून, आमच्या कस्टमर सर्विसला, सर्विस रिक्वेस्ट कॉल आला. त्याच दिवशी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी, NR15 (सिरियल क्रमांक - MUNXXDD6489) च्या ट्रबलशूटिंगसाठीचा क्रिटिकल कॉल असाईन झाल्याचा मेसेज मला मिळाला. तेंव्हा आधीचा कॉल आटपून मी ऑफिसला परतत होतो. पण क्रिटिकल कॉल असल्यामुळे, मी ऑफिसला न जाता, डायरेक्ट  YYYY पोलिस स्टेशनला गेलो.  तिथे असलेल्या, NR15 ला कोणतेही फिजिकल डॅमेज नव्हते, पण त्याची बॅटरी डाऊन झाल्याचे इंडिकेटर दाखवत होता.  सिरियल क्रमांक पाहून मी त्याची वॉरंटी चेक केली आणि मगच त्याचे बॅकपॅनल उघडले. त्यानंतर माझा स्वत:चा आयडेंटिटी कोड टाकून, सेल्फटेस्ट रन केली.  सेल्फटेस्टच्या रिपोर्टनुसार, प्रायमरी बॅटरी पूर्णपणे डेड होती. त्यामुळे 'स्पेअर बॅटरीची रिक्वेस्ट द्यावी लागेल आणि तशी रिक्वेस्ट फक्त त्या NR15 चा ओनरच देऊ शकतो' असे मी तिथे सांगितले. तसा फील्ड रिपोर्टही, मी तात्काळ ऑनलाइन भरला,  त्यावर तिथल्या, स्टेशन इनचार्जचे ऑथेंटिकेशन लोड केले आणि मी तिथून निघालो. कामाचा लोड खूप जास्त असल्याने,   त्यानंतर काय झाले याची चौकशी मी केली नव्हती.

====



====
स्टेटमेंट २ - सारांश
====
मी, सुधाकर अवसरीकर,  साधारण पाच वर्षांपूर्वी XXXX मध्ये एरिया मॅनेजर म्हणून रुजू झालो.  पूर्ण MG विभाग माझ्या अखत्यारीत येतो.   २७ फेब्रुवारीला, संध्याकाळी पाचच्या सुमारास,  YYYY पोलिस ठाण्याच्या इनचार्जकडून, माझ्या मोबाईलवर कॉल आला. एका ड्रोनची लॉस्ट अँड फाऊंडची केस होती. त्यांनी फील्ड रिपोर्टचा उल्लेख केला म्हणून मी लगेच तो तपासून बघितला. मी त्यांना म्हटले की मी उद्या स्पेअर बॅटरी पाठवितो. दरम्यानच्या काळात ओनरशी बोलून, फॉरमॅलिटीज पूर्ण करता येतील, असा माझा होरा होता.  पण त्यांना काही तपासासाठी, तो ड्रोन तात्काळ सुरू करून हवा होता.  'तुम्ही स्वत: बॅटरी घेऊन या' असे त्यांनी मला सांगितले. आमच्याकडच्या एका वरिष्ठ सर्विस टेक्निशियनला, मी एका नव्या ड्रोनची बॅटरी काढायला सांगितली आणि ती बॅटरी घेऊन आम्ही दोघे YYYY ठाण्यात पोहोचलो.

त्या ड्रोनची बॅटरी बदलली आणि चाचणी घेतली. तो व्यवस्थित चालू होता. त्या ड्रोनचा, गेल्या पाच दिवसातला सविस्तर रूट लॉग, त्यांना हवा होता. सहसा असा लॉग आम्ही देत नाही, कारण त्यात मॅप, ऑडिओ, विडियो असा बराच डाटा असतो. त्यात प्रायव्हसी इश्यू येतात.  पण त्यांच्या एकंदर बोलण्यावरून  प्रकरण गंभीर आहे, हे माझ्या लक्षात आले होते, त्यामुळे त्यांच्याकडून लेखी विनंती घेतली आणि तिथल्याच संगणकावर लॉगिन करून, त्यांना हवा असलेला लॉग मी काढून दिला.  आणखी काही मदत लागली तर तुम्हाला यावे लागेल असे त्यांनी मला सांगितले. मी हो म्हटले. सर्विस रिपोर्टची फॉरमॅलिटी पूर्ण केली आणि आम्ही दोघेजण तिथून निघालो. 

====



====
स्टेटमेंट ३ - सारांश
====
माझे पूर्ण नाव विराज धर्मापूरकर असे आहे.   पोलिसांनी ताब्यात घेतलेला NR15 (सिरियल क्रमांक - MUNXXDD6489) हा ड्रोन, माझ्या मालकीचा असून, गेल्या महिन्याच्या, म्हणजे फेब्रुवारीच्या  ११ तारखेला,  XXXX च्या ऑनलाइन पोर्टल वर ऑर्डर देऊन मी, तो विकत घेतला होता. मी 'मेड टू ऑर्डर' नावाचे फूडजॉइन्ट चालवितो, रात्री दहा ते सकाळी सहा या वेळात. या व्यवसायाच्या निमित्ताने मी फूड डिलिव्हरीसाठी ड्रोन्सचा वापर करतो.  त्याचे लायसन्स माझ्याकडे आहे. ऑर्डरचे प्रमाण वाढले असल्याने, मी हा जास्तीचा ड्रोन गेल्या महिन्यात मागविला होता. तो व्यवस्थित काम देत होता. पण या महिन्याच्या १८ तारखेला तो हरवला आणि मग  त्याची फिर्याद मी YYYY पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तात्काळ नोंदविली होती. फिर्याद क्रमांक XXXX-NNN हा आहे. 

२७ तारखेला YYYY पोलिस स्टेशनमधून त्याची वॉरंटी चेक झाल्याचा आणि नंतर त्याची प्रायमरी बॅटरी बदलल्याचा, मेसेज मला दुसर्‍या दिवशी म्हणजे २८ तारखेला मिळाला.

नंतर मला मिळालेल्या माहितीनुसार, २७ फेब्रुवारीला पोलिसांना, बॅंडस्टँडच्या जवळपास तो ड्रोन सापडला, तेंव्हा ड्रोनची बॅटरी पूर्णपणे उतरलेली  होती. तपासाचा भाग म्हणून आम्ही XXXX ला सर्विस कॉल दिला, असे  YYYY च्या स्टेशन इनचार्जने मला सांगितले.  २९ तारखेला पोलिसांनी, तो ड्रोन माझ्या ताब्यात दिला, तेंव्हा त्यासोबत २७ तारखेचा, सर्विस इंजीनियरचा रिपोर्टही होता. त्या रिपोर्टमध्ये नवीन बॅटरी इंस्टॉल केल्याचा, पूर्ण चेकअप केल्याचा आणि इतर कोणताही दोष नसल्याचा उल्लेख आहे.  तो ड्रोन ताब्यात घेताना, मी त्याचा सिरियल क्रमांक तपासला होता आणि परवलीचा प्रश्न इनपुट करून, तो माझाच ड्रोन  आहे याची खात्री मी केली होती. घरी परतल्यावर मी त्याची टेस्टही घेतली आणि त्याची अचूकता पूर्वीसारखीच आहे असे मला आढळले.  त्यानंतर गेल्या सात दिवसात त्या ड्रोनचा व्यावसायिक वापर केलेला नाही.

२० तारखेला,  'MMMM' मंदिरातल्या सीसीटीव्ही फूटेज मध्ये, काही एक वस्तू टाकताना दिसणारा एक ड्रोन, हा माझ्या मालकीचा आहे असे सांगत, पोलिसांनी आज मला ताब्यात घेतले आहे. माझे सर्व ड्रोन्स देखील त्यांनी जप्त केले आहेत,  पण मी देवाला स्मरून सांगतो की २० तारखेला त्या मंदिरात घडलेल्या प्रकाराशी वा त्यानंतर झालेल्या दंगलीशी माझा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे कोणताही संबंध नाही.  १८ ला सकाळी हरविल्यापासून ते २९ तारखेपर्यंत हा ड्रोन  माझ्या ताब्यातच नव्हता आणि मी  कधीही, त्या मंदिरात जाण्याची वा तिथे कोणतीही वस्तू ठेवण्याची, टाकण्याची, डिलिव्हरी करण्याची, कोणतीही कमांड कुठल्याच ड्रोनला दिलेली नाही वा लोड केलेली नाही.  गेल्या सात दिवसात ड्रोन का वापरला नाही हा प्रश्न मला वारंवार विचारण्यात आला आहे त्याचे एकमेव उत्तर 'आवश्यकता भासली नाही' इतकेच आहे.

====



====
स्टेटमेंट ४ - सारांश
====
मी,  संग्राम बिभीषण टेकाडे, YYYY चा इनचार्ज पूर्ण शुद्धीत आणि स्वत:च्या अक्कलहुशारीने हे स्टेटमेंट देतो आहे.  २० फेब्रुवारीला    'MMMM' मंदिरात निषिद्ध वस्तू फेकण्याचा जो प्रकार घडला, त्याचे सीसीटीव्ही फूटेज, मागणी करूनही तात्काळ मिळू शकले नव्हते. दुसर्‍या दिवशी  दंगल उसळली आणि त्यामुळे फूटेज मिळायला आणखी चार दिवस लागले. फूटेजमध्ये ती निषिद्ध वस्तू एका ड्रोनचा वापर करून टाकण्यात आली असे उघड झाले. १८ तारखेला एक ड्रोन हरविल्याची तक्रार नोंदली गेली होती, ती माझ्या व्यवस्थित लक्षात होती, त्यामुळे त्या ड्रोनचे चित्र दाखवत, २४ फेब्रुवारीपासून, संपूर्ण परिसरात त्या दृष्टीने शोध घेतला असता, कचरा वेचणार्‍या एका स्त्रीला, तो ड्रोन सापडल्याचे उघड झाले.  त्यानंतर तो ड्रोन जप्त करून, XXXX कडून त्याचा रूटलॉग मिळविला असता, शेवटची डिलिव्हरी १९ तारखेला संध्याकाळी  केल्याचे उघड झाले आहे.   जर ड्रोन १८ तारखेलाच हरविला होता तर १९ ला डिलिव्हरी कशी याचे समाधानकारक उत्तर, धर्मापूरकर  देऊ शकलेले नाहीत.  जर व्यवसायाचा भाग म्हणून ड्रोन घेतला होता तर २९ तारखेपासून आजपर्यंत त्या ड्रोनचा वापर का केला नाही, याचे उत्तरही त्यांनी दिलेले नाही. घटना घडली, त्या २० फेब्रुवारीपासूनचा कोणताही तपशील त्या रूटलॉगमध्ये नोंदलेला नव्हता.  सबब केवळ अधिक चौकशीसाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतले होते.  त्यांचे १ फेब्रुवारीपासून ते कालपर्यंतचे सर्व फोन रेकॉर्ड आम्ही मिळवले आहेत. त्या कॉलचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. 

१९ तारखेला शेवटचे लोकेशन IIII या कुख्यात एरियातले आहे असे मला आत्ताच कळले, पण रूटलॉग मध्ये ते नोंदलेले नव्हते नाहीतर मी त्या दृष्टीने तपास केला असता. त्यामुळे ड्रोनचे हॅकिंग झाल्याचा संशय, मला आला नव्हता आणि मी त्या दृष्टीने चौकशी केलेली नाही. तशी शक्यता एक्स्पर्टने वर्तविल्याचे मला नुकतेच समजले,  पण तरीही, माझे स्टेटमेंट घेण्याचे  कारण काय याचे उत्तर, विचारल्यानंतरही मला देण्यात आलेले नाही.

======

बुधवार, १० जानेवारी, २०१८

गाईड

================
#विज्ञान_लघुकथा क्रमांक २
================

रोजच्या प्रमाणे ठीक सहा वाजता अंगकला जाग आली आणि आपले शरीर नेहेमीप्रमाणेच शक्तीने ओतप्रोत भरून गेले आहे असे त्याला वाटले.
'गुडमॉर्निंग कॅप्सुलचा हा फायदा अतिशय उत्तम आहे' त्याच्या मनात आले.  'झोपेतून उठल्यावर येणारी सुस्ती नाही, आळसावलेले शरीर नाही, त्या चहाकॉफी सारखे कोणतेही साईड इफेक्टस देखील नाहीत. '

'आता फक्त आजचा दिवस, नंतर मंगळाला कायमचा बायबाय.' पृथ्वीवर परतण्याच्या कल्पनेने त्याचे मन अधीर झाले. न राहवून त्याने एका जुन्या गाण्यावर  शीळ घालायला सुरुवात केली.

'Excitement Detected. Suggesting to follow procedure number 20.3."

हेल्थ मॉनिटरींग सिस्टीमची यंत्रवाणी घुमली आणि अंगक भानावर आला. नियमांच्या बाबतीत  *.Corp अगदी काटेकोर होती. नियमबाह्य वर्तनामुळे, कॉंट्रॅक्टचा एक दिवस वाढण्याची  शिक्षा, त्याने सुरुवातीच्या काळात अनेकदा भोगली होती.  तेंव्हा त्या शिक्षेची गंभीरता त्याच्या लक्षात आली नव्हती, पण आता वीस वर्षांपेक्षाही अधिक काळ, तेच ते गाईडचे एकसूरी काम करून, त्याचे मन अगदी विटले होते.

दररोज तेच ते Ancient Civilization Museum मधले जुने अवशेष दाखविणे,  Planet Tour मध्ये तीच ती स्थळे दाखविणे,  Haunted Tunnels चा उगाचाच आभास निर्माण केलेल्या, त्या लाव्हा ट्यूब्स मधून लोकांना फिरवून आणणे,  पर्यटकांच्या त्याच त्या प्रश्नांना उत्तरे देणे, त्यांच्याकडून चांगला फीडबॅक मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणे आणि त्याहून कहर म्हणजे  Replicator चा वापर करून मूळ artefactच्या   हुबेहूब बनविलेल्या प्रतिमा, Collector's Items  म्हणून विकणे, सगळ्याचाच त्याला अक्षरश: उबग आला होता.  पण कॉंट्रॅक्टची पूर्तता केल्यावाचून इथून सुटका होणार नव्हती. 

'या नोकरीची ऑफर स्वीकारली तेंव्हा किती किती उत्साहात होतो आपण'  त्याच्या मनात आले. 'टूरवर येणार्‍यांना गाईड म्हणून यंत्रमानव का नको असतो कुणास ठाऊक ? '  त्याने दोन टूरिस्टना, आडूनआडून त्यासंदर्भात विचारले होते, पण दोघांनीही त्याच्याकडे असे दुर्लक्ष केले की, त्याला आणखी काही विचारायचे धैर्यच झाले नाही. 'न जाणो त्यांनी निगेटीव्ह फीडबॅक दिला तर  ?'

सुरूवातीला सहजपणे स्वीकारलेले नियमदेखील, त्याला आताशा फार जाचक वाटू लागले होते.  इथला आणखी एक दिवसही वाढू नये, यासाठी गेले वर्षभर तो सर्वतोपरी काळजी घेत होता.  चार महिन्यांपूर्वी मिळालेली, डबल क्रेडिट्सची ऑफर देखील त्याने नाकारली होती. काय वाटेल ते झाले तरी आता पृथ्वीवर परतायचेच असे त्याने मनाशी ठाम ठरविले होते.  तसेही त्याच्या खात्यामध्ये प्रचंड क्रेडिट्स जमा झाले होते, पृथ्वीवर त्याला हवे तिथे, अक्षरश: कोणतेही काम न करता, तो वीस एक वर्षे सहज राहू शकला असता. पृथ्वी सोडली तेंव्हा कोणतेही पाश नव्हतेच, पण आता नवीन नाती जोडण्यासाठी पुरेशी जमवाजमव झाली होती.

टूर वेळेवर आली. तेच ते उत्साहाने फसफसलेले पर्यटक. स्पेससूटला न सरावलेले पर्यटक, दीर्घ प्रवासाने काहीसे कावलेले पर्यटक. पण आज त्याने सर्वांना विशेष वागणूक दिली.  सर्व पर्यटनस्थळे मनापासून दाखविली. न कंटाळता त्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली.  दिवस कसा संपला आज त्याचे त्यालाच कळले नाही.  Performance Analyser ने  'Nearly Perfect' चे रेटिंग दिलेले त्याने पाहिले आणि तो स्वत:वरच खुश झाला.

वेगाने तो स्वत:च्या सेलमध्ये परतला, स्पेससूट उतरवून,  आज बर्‍याच दिवसांनी त्याने चवीचवीने जेवणाचा आस्वाद घेतला.   'चला शेवटचा दिवसही उत्तम पार पडला. उद्या Back to Earth.' अतिशय आनंदीत मनाने त्याने गुडमॉर्निंग कॅप्सुलची बाटली उघडली. कॅप्सुल संपलेल्या होत्या. त्याने मेडिसिन डिस्पेंसरवर नवीन बाटलीसाठी कमांड दिली.  ट्रे मध्ये आलेल्या बाटलीतली कॅप्सुल गिळताना हिचा आकार थोडा मोठा आहे असे त्याला वाटले, म्हणून त्याने बाटलीवरचे नाव निरखून पाहिले. पण नाव तेच होते. त्याच्या डोळ्यावर काहीशी गुंगी दाटून आली होती. त्याने स्वत:ला बेडवर झोकून दिले.

--

'G1.8 ची ओल्ड मेमरी आज रात्री रिस्टोअर होईल आणि G1.9 उद्यापासून कामावर रुजू होईल.'  सेक्रेटरीकडून आलेला मेसेज वाचून जुग्गानी खुश झाला. 

'डॅडसारखी दूरदृष्टी आपल्याकडे पण हवी'  त्याला वाटले.  'डॅडने याच्या क्लोनिंगचे, मेमरी रिस्टोअरचे कॉंट्रॅक्ट केले नसते तर, आता दुसरा अंगक कुठून आणणार होतो आपण ? ' 

"पुढच्या हप्त्यापासून  'मार्स विथ हयूमन टच' चे रेट, टेन परसेंट वाढव आणि त्या सिल्व्हाला विचार, याच्या क्लोनिंगचे राइट्स विकणार का"  त्याने मेसेजला रिप्लाय केला. 

====

भीती

=============
#विज्ञान_लघुकथा - १
=============

पृथ्वीवरच्या ट्रेनिंग सेशनसाठी स्वस्तिकने होकार कळवला आणि त्याचे मन एका अनामिक दडपणाने भरून गेले. आठव्या वर्षी 'ताणशमका'ची  लस टोचून घेतल्यापासून, एकदाही त्याला असे दडपण जाणवले नव्हते. तसाही डिफॉल्ट बॉडीसूट न घालता, सलग सातआठ दिवस राहण्याचा अनुभवही त्याला होता, युरोपावरच्या 'पृथ्वी  प्रतिरूप कोशा'मध्ये, त्याने तो अनुभव अनेकदा घेतला होता, आणि पृथ्वीवर जाऊन, तिथल्या मानव अभयारण्यात तब्बल एक महिना काढायचा म्हणजे थोडा वेगळा प्रकार असणार आहे याचा त्याला अंदाज आला होता.

ExpoPlanetary Habitation Program ला त्याने प्रवेश घेतला, तेंव्हाच हे ट्रेनिंग या कोर्सचा भाग आहे याची कल्पना त्याला देण्यात आली होती. त्यामुळे पृथ्वीवर प्रत्यक्ष जाण्याची वेळ येईल, तेंव्हा आपल्याला असे काहीतरी वाटेल, असे त्याला अजिबात वाटले नव्हते. शिवाय अभयारण्यातल्या अनुभवाचे सर्व Brain Feed, त्याने स्वत:च्या बाह्यमेंदूत साठवले होते. त्यामुळे असे का वाटावे याचे कारण काही त्याला उमगेना. न राहवून तो Personal Health Pod मध्ये शिरला.  PHP च्या स्क्रीनवर 'अज्ञाताची भीती' असे कारण झळकले आणि त्याचे दडपण वाढले.

शेवटचा पर्याय म्हणून, त्याने Brain Feed Update ची विनंती पाठविली. Update पूर्ण झाली आणि घाईघाईत त्याने Health Pod वरचे Rescanning चे बटन दाबले. PHP च्या स्क्रीनवरचे शब्द बदलले,  त्या दडपणाचे संभाव्य कारण तिथे झळकले.
"यंत्रविरहित वातावरणात, अनोळखी मानवसमूहासोबत जगण्याची भीती"

====