शनिवार, २२ एप्रिल, २०१७

समांतर विश्वे  - लेखांक ४ / ६


----
(मांडणी - ३) ==> या मांडणीनुसार आपले विश्व हे एकमेव विश्व नाही. आपले विश्व हे एका बाह्यविश्वाचा भाग आहे आणि त्या बाह्यविश्वात अगणित विश्वे आहेत.  यापैकी काही विश्वे ही आपल्या विश्वासारखीच आहेत आणि आपल्या विश्वासोबतच  अस्तित्वात आली आहेत. त्यातील काही विश्वे बर्‍याचशा समान गुणधर्माची आहेत.  समान गुणधर्माच्या विश्वांमध्ये घडणार्‍या अनेक घटना सारख्या असू शकतात , पण त्या समान असतीलच असे नाही.  याउलट आपल्या विश्वासोबतच जन्माला येऊनही,  घटनांच्या व रचनेच्या दृष्टिकोनातून, आपल्या विश्वाशी जराही साधर्म्य नसलेली विश्वेही त्या बाह्यविश्वात असू शकतील. 
----

विश्वाच्या उत्पत्तीचा एक सिद्धांत म्हणून, आपण Big Bang Theory कडे पाहतो. या सिद्धांतानुसार विश्वाची निर्मिती ही एका Singularity मधून झाली.

Singularity म्हणजे काय ?  तर असे स्थान (किंवा वस्तू), जिथे घनता, तापमान, (व गुरुत्वाकर्षण ) हे अनंत आहे, अगणित आहे.  आपल्याला ज्ञात असलेल्या भौतिकशास्त्राचे, सापेक्षतेचे, गणिताचे कोणतेही नियम तिथे लागू पडत नाहीत.  सध्याच्या मान्यतेनुसार कृष्णविवराच्या आत अशी Singularity असते.  

तर या Big Bang Theory मधून निर्माण झालेले जे विश्व आहे, ते आपल्या सध्याच्या क्षमतेनुसार आपल्याला त्रिमित दिसते. (सध्या काळ ही चौथी मिती असल्याची संकल्पना बाजूला ठेवा)  या तीन मितींच्या पलीकडे आणखी मिती असू शकतील, पण आपल्याला त्यांचे पूर्ण ज्ञान आणि भान अजूनतरी आलेले नाही. तीनापेक्षा अधिक मितींची कल्पना करताना आपण नेहेमीच या मिती आपल्या याच विश्वात आहेत, परंतु आपल्या सध्याच्या जाणिवांच्या बाहेर आहेत असे मानतो. पण कदाचित काही आणखी वेगळेच आणि विलक्षण असले तर ?

कल्पना करा की आपले विश्व हे केवळ आणि केवळ त्रिमितच आहे. पण तरीही यापेक्षा कितीतरी अधिक मिती अस्तित्वात आहेत , पण त्या आपल्या विश्वाच्या बाहेर ! .  

समजून घेण्यास सोपे जावे म्हणून आपण असे समजू की आपल्या विश्वाला एक गोलाकार (वर्तुळाकार नव्हे) किंवा अंडाकार असा  त्रिमित 'सीमापरीघ' आहे.  पण आपले विश्व एका बाह्यविश्वात 'तरंगत' आहे.  आपल्या विश्वात जसे अंतराळ आहे, तसेच एका वेगळ्या प्रकारच्या किंवा वेगळ्या मितीत असलेल्या दुसर्‍या  'अंतराळात'  आपले विश्व आहे. अशा प्रकारच्या विश्वाची कल्पना करताना आपल्याला तीनपेक्षा अधिक मिती डोळ्यापुढे आणाव्या लागतात आणि हे निश्चितच अवघड जाते. पण हे साध्य करण्याचा एक सोपा मार्ग आहे, तो आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरच्या मितीबाबत विचार करण्याचा.

कोणतीही रेषा ही एकमितीय मानली जाते. आता कल्पना करा एका कागदावर अनेक समांतर रेषा ओढलेल्या आहेत. आणि ही सर्व एकमितीय विश्वे आहेत. या प्रत्येक एकमितीय विश्वास, दुसरे एकमितीय विश्व अस्तित्वात असल्याची जाणीवच नाही, कारण ती समांतर आहेत. या दोन एकमितीय विश्वांना जोडण्यासाठी त्या समांतर (विश्वांना) रेषांना  छेदणारी रेषा काढावी लागते.  अर्थात त्या दोन एकमितीय विश्वांना जोडण्यासाठी जो मार्ग आहे, तो द्विमितीय विश्वातून प्रवास करतो.  गंमत अशी आहे की द्विमितीय विश्वातून प्रवास करणारी आणि दोन समांतर विश्वांना जोडणारी ही एकमितीय रेषा म्हणजे वास्तविक आणखी एक एकमितीय विश्व आहे,पण ते या समांतर विश्वांना असमांतर आहे, वेगळ्या पातळीत आहे.  समांतर रेषांना छेदणारी रेषा प्रत्यक्षात त्या रेषांवरील दोन बिंदूंना जोडते. बिंदू हा शून्यमितीय मानला जातो.  

हाच विचार द्विमितीय विश्वांबाबतही करता येईल. एखाद्या घनाकाराच्या (Cube) बाजू असलेली दोन समांतर प्रतले म्हणजे द्विमितीय विश्वे मानली तर त्या द्विमितीय विश्वात राहणार्‍या 'सजीवांना', परस्परांच्या विश्वाची जाणीव नसेल. एका प्रतलातून (द्विमितीय विश्वातून) दुसर्‍या समांतर प्रत
लात (द्विमितीय विश्वात) जाण्यासाठी या प्रतलांना छेदणारे आणि असमांतर असलेले तिसरे प्रतल आवश्यक आहे. तरच एका प्रतलात (द्विमितीय विश्वात) राहणार्‍या द्विमितीय सजीवाला, दुसर्‍या समांतर प्रतलात (द्विमितीय विश्वात) जाता येईल. (हा द्विमितीय सजीव  त्या (बाजूंना) प्रतलांना जोडणार्‍या रेषेवरून प्रवास करू शकत नाही, कारण ती रेषा एकमितीय आहे.)   असमांतर असणारे हे प्रतल जेंव्हा समांतर प्रतलांना छेदते तेंव्हा प्रत्यक्षात ते त्या समांतर विश्वांमधील दोन रेषांना (अर्थात एकमितीय प्रवेशद्वारांना) जोडते.  (सोबतचे चित्र पहा)

एकमितीय विश्वांना जोडणारे प्रवेशद्वार शून्यमितीय आहे, द्विमितीय विश्वांना जोडणारे प्रवेशद्वार हे एकमितीय आहे, हीच संगती आपल्या विश्वास लावल्यास आपण असे म्हणू शकतो, की आपल्याला समांतर असणारे दुसरे त्रिमितीय विश्व असणे शक्य आहे आणि या समांतर अशा त्रिमितीय विश्वाला आपल्याशी जोडण्यासाठी दुसरे असमांतर असणारे, आपल्या त्रिमितीय विश्वाला छेदणारे तिसरे त्रिमितीय विश्व असावे लागेल. आणि या छेदणार्‍या त्रिमितीय विश्वाचे प्रवेशद्वार हे एखादे प्रतल (द्विमितीय) असेल. ज्या क्षणाला आपल्याला असे प्रतल सापडेल किंवा कर्मधर्मसमयोगाने त्याच्याशी आपला संपर्क येईल तेंव्हा आपण त्या दुसर्‍या त्रिमितीय विश्वाशी संपर्क साधू शकू किंवा प्रवास करून तिथे जाऊ शकू.  

जसे द्विमितीय जगात राहणार्‍या एखाद्या सजीवाला, त्रिमितीय जगात राहणार्‍या आपली जाणीव होऊ शकणार नाही,  तद्वत आपल्याला आपल्यापेक्षा अधिक मितीत राहणार्‍या जीवाची जाणीव होऊ शकत नाही.  या विधानाचा व्यत्यासही सत्य असू शकतो. बाहेर असणार्‍या बहुमित अंतराळात राहणार्‍या  'सजीवाला', देखील आपले अस्तित्व माहीत असेलच असे नाही. त्याला आपली जाणीव होऊ शकेलच असे नाही, कारण कदाचित त्यांच्यासाठी आपले विश्व म्हणजे त्यांच्या विश्वातील केवळ एक भूमितीय संरचना असेल. आपल्या विश्वातील एखाद्या बिंदूची, एखाद्या रेषेची, एखाद्या प्रतलाची, आपल्याला जितकी जाणीव असते, तसेच काहीसे स्थान, आपल्या विश्वाचे या बाह्यविश्वात असेल का ? 

आता या पार्श्वभूमीवर, जेंव्हा आपण Big Bang Theory चा विचार करतो तेंव्हा आपण असे म्हणू शकतो की कदाचित त्या बहुमित (बाह्य)विश्वात एकाच वेळेस अनेक Big Bang घडली असतील , आणि त्यामुळे, आपल्यासारखीच असणारी, अनेक विश्वे एकाच वेळेस जन्मास आली असतील. 

एकाच वेळी अनेक Big Bang कसे घडू शकतील असा प्रश्न पडणार्‍यांनी खालील उदाहरण (रूपक) लक्षात घ्यावे. हे देखील अत्यंत समर्पक उदाहरण नव्हे, पण बाह्यविश्वातील उलथापालथीमुळे आपल्यासारखी अनेक विश्वे कशी निर्माण होऊ शकतील हे समजण्यासाठी ते पुरेसे आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवात, क्वचित काही समारंभात प्रेक्षकांना, निमंत्रितांना जमिनीवर बसण्यासाठी,  मोठे जाजम, सतरंजी किंवा ताडपत्री घालण्याचा ज्यांना पूर्वानुभव असेल,  त्यांना त्यावरची धूळ, कचरा झटकण्यासाठी सर्वसाधारणत: काय करतात हे नक्की माहीत असेल.  अशी जाजमे, ताडपत्र्या अतिशय वजनदार असतात त्यामुळे त्यांच्यावरची धूळ झटकण्यासाठी, चौघे जण , चार कोपर्‍यात उभे राहून त्या जाजमाची टोके पकडतात, आणि ते वरखाली जोरात हलवतात, उलटेपालटे करतात.  हे करत असताना ते जड जाजम एकाच वेळी, अनेक ठिकाणी, जमिनीला तात्पुरते टेकते आणि पुन्हा वर उचलले जाते. इथे एकाच वेळी जमिनीवरील अनेक बिंदूंचा, जाजमावरील अनेक बिंदूंना किंवा गाठींना होणारा स्पर्श हे Big Bang च्या आरंभाचे रूपक आहे असे जर मानले, तर ते जाजम हे बाह्यविश्व आहे.  जमिनीला असा स्पर्श घडल्यामुळे त्या जाजमावरच्या, त्या विवक्षित बिंदूचे / गाठींचे आरंभीचे व नंतरचे अस्तित्व व त्यांच्यात घडणारे बदल, म्हणजेच आपले व आपल्यासारखी अनेक विश्वे व त्यात घडणार्‍या घटना. जाजमावरील हे बिंदू एकमेकांच्या जवळ असतील किंवा एकमेकांपासून दूरही असतील, परंतु जसे जाजमावरील एका बिंदुला, दुसर्‍या बिंदूची जाणीव असणे शक्य नाही, तसेच अशा एका विश्वासाठी दुसरे विश्व संपूर्णपणे अनोळखी आहे. जाजमाच्या दृष्टीकोनात जाजमावरील त्या बिंदूंमध्ये / गाठींमध्ये होणारा बदल अत्यंत क्षुल्लक आहे. या बिंदूंना सामावून घेणार्‍या जाजमाचा, ते जाजम हलविणार्‍या व्यक्तींच्या अस्तित्वाचा थांग घेणे हे त्या बिंदूंच्या वा त्या बिंदूंसम असणार्‍या 'विश्वाच्या' क्षमतेच्या पलीकडे आहे.

पाणी उकळत असलेल्या एका पातेल्यात तळाशी निर्माण होऊन वर येऊन फुटणारे असंख्य छोटे बुडबुडे किंवा एका मोठ्या बलूनच्या पेटार्‍यात  बसून अनेक छोटे फुगे फुगवून, त्या बलूनमध्ये सोडून दिले तर जसे दिसेल, तशी काहीशी समांतर विश्वांची कल्पना या मांडणीत आहे.

या मांडणीनुसार आणि वरती नमूद केल्याप्रमाणे, बाह्यविश्वातील, आपले विश्व व आपल्यासारखी काही विश्वे ही एकाच वेळी अस्तित्वात आली आहेत किंवा असतील. त्यातील काही विश्वे, बर्‍याचशा समान गुणधर्माची असतील (आणि काही अतिभिन्नही असतील).  समान गुणधर्माच्या  विश्वांमध्ये घडणार्‍या घटना सारख्या असू शकतात ,पण त्या समान असतीलच असे नाही.  तिथे गणिताचे, विज्ञानातील नियम कदाचित आपल्यासारखेच असतील, पण विविध समीकरणांमध्ये जे स्थिरांक वापरले जातात ते अशा विश्वांमध्ये आपल्यापेक्षा भिन्न असू शकतील. तिथली मूलद्रव्ये वेगळी असू शकतील.  तसेच या विश्वांमध्ये असलेल्या मितीही आपल्यापेक्षा भिन्न प्रकारच्या असू शकतील. उदाहरणार्थ तिथले विश्व कदाचित आपल्यासारखेच त्रिमित असले, तरी त्या विश्वातील त्रिमित जग आणि आपले त्रिमित जग हे एकाच पातळीवर असतीलच असेही नाही.  स्वाभाविकच आपल्या विश्वातून, अशा दुसर्‍या विश्वात जाण्याचा मार्ग,  जोवर आपल्याला सापडत नाही, तोवर त्या विश्वांचे अस्तित्व, आपल्यासाठी 'समांतर' असणार आहे.

या प्रकारच्या समांतर विश्वांमध्ये अनेक प्रकारचे फरक असू शकतात. वर म्हटल्याप्रमाणे हे फरक मितींच्या संख्येत, रचनेत असू शकतीलच, पण अगदी त्रिमित संरचना असलेली दोन विश्वे असली तरी तिथले मूलकण व पर्यायाने मूलद्रव्ये वेगळी असू शकतात, आधीच्या मांडणीत म्हटल्याप्रमाणे त्या विश्वाच्या जन्मानंतरची स्थिती वेगळी असू शकते, शिवाय तिथे लागू होणारे वेगवेगळे स्थिरांक देखील आपल्या विश्वापेक्षा निराळे असू शकतात. अशा परिस्थितीत त्या विश्वाची वाढ आणि प्रगती अगदी भिन्न प्रकाराने होऊ शकते.

--
थोडेसे अवांतर  : 

त्रिमितीतील विश्वासाठी त्यापेक्षा अधिक मितीतील विश्व कसे असते हे डोळ्यासमोर आणण्यासाठी विचार करण्याची आणखी एक (सोपी) पद्धत :  कोणताही बिंदू हा शून्यमितीय मानला जातो. अनेक बिंदू एकापुढे एक ठेवले की रेषा तयार होते जी एकमितीय असते. अनेक रेषा एकास एक समांतर अशा परस्परास चिकटून ठेवल्या की एक प्रतल तयार होते जे द्विमितीय आहे. अनेक प्रतले एकावर एक रचून ठेवली की एक घनाकार तयार होतो जो त्रिमितीय आहे. मग त्रिमितीय विश्वे परस्परांशी संलग्न अशी रचली असतील तर ही रचना (किमान) चतुर्मितीय अवकाशात (बाहयविश्वात) असेल असे म्हणायला हरकत नाही. हे बाह्यविश्व किमान चतुर्मितीय असेल अशासाठी म्हटले आहे की शून्यमितीय बिंदू किंवा एकमितीय रेषा हा/ही त्रिमितीय विश्वातही असू शकते. अर्थात आपले त्रिमितीय विश्व चार पेक्षा अधिक मिती असणार्‍या बाह्यविश्वात असू शकते.

प्रत्यक्षात एका मितीतून दुसर्‍या मितीची कल्पना करण्यासाठी त्या मितीला वक्र अवकाशातून फिरवावे लागते असे मानणारे वैज्ञानिक अधिक आहेत. रेषेने तिच्या एका बिंदुभोवती स्वत:भोवती गिरकी घेतली तर वर्तुळ (द्विमितीय) तयार होईल. पण भोवतीचा अवकाश वक्र असेल तर लंबवर्तुळ. वर्तुळाने अवकाशात एका प्रतलाभोवती  गिरकी घेतली तर गोलाकार तयार होईल आणि वक्र अवकाशात लंबवर्तुळाने गिरकी घेतली तर अंडाकार.  विश्वाचा आकार अंडाकार असावा असे मानणार्‍यांचे तर्कशास्त्र अशा स्वरूपाचे आहे. मग अंडाकार वक्र अवकाशात भ्रमण करेल तर आपल्याला त्यातून चतुर्मितीय विश्वाचा आकार मिळेल का ! ?   .... 
--



----
(मांडणी - ४) ==> आपल्याला ज्ञात असलेल्या वा तत्वत: ज्ञात होऊ शकेल, अशा कोणत्याही वैज्ञानिक संकल्पनेच्या पलीकडे असलेली आणि आपल्याला बहुदा, सदैव अगम्य, असाध्य, अप्राप्य राहतील अशी विश्वे असू शकतील.
----

या मांडणीतही तिसर्‍या मांडणीप्रमाणेच वेगवेगळ्या विश्वांची संकल्पना आहे.  मात्र इथे एक मूलभूत फरक आहे.  विश्वाच्या (खरंतर विश्वांच्या) मांडणीच्या आपल्या संकल्पना या आपल्या ज्ञानाशी, विज्ञानाशी  व त्यांचे स्वरूप स्पष्ट करताना, पर्यायाने आपल्या गणिती, भौतिकी संकल्पनांशी निगडीत आहेत. वर दिलेल्या तीन मांडण्यांची, आपण ज्या ज्या प्रकारे  कल्पना करतो, त्या सर्व आपल्याला ज्ञात असलेल्या गणिताच्या, संरचनेच्या माध्यमातून व्यक्त करतो. पण या मांडणीत आपण जे गृहीतक धरतो आहोत, ते असे आहे की आपल्याला ज्ञात व अज्ञात अशी सर्व विश्वे, आपल्याला उमगू शकणार्‍या  गणिती व अन्य वैज्ञानिक संकल्पनांच्या चौकटीत बसतील किंवा जी चौकट आपल्याला उमगली आहे किंवा भविष्यात आपल्याला  उमगू शकते किंवा निदान त्यांची आपण कल्पना करू शकतो, अशाच चौकटीत ही सर्व विश्वे असतील.

पण या चौकटीच्या संपूर्णपणे पलीकडले, काही अस्तित्वात असेल ही शक्यता का नाकारावी ?  आपण ज्या गणिताची, रचनांची, संरचनांची कधीही कल्पनाही करू शकणार नाही, विज्ञानाचे जे नियम, आपल्या विश्वात कधीही लागू होऊच शकणार नाहीत, त्यावर आधारित एक वा अनेक रचना नसतील असे कसे म्हणावे ?  मानवाच्या वर्तमान व भविष्यातील, तर्कशुद्ध गणिती पद्धतीत बांधता येण्याच्या क्षमतेच्या सीमारेषेच्या पलीकडे असलेली,  आपल्याला सदासर्वकाळ अगम्य राहतील अशी, आपल्याशी  कोणत्याही प्रकारे साधर्म्य नसलेली विश्वे अस्तित्वात नसतीलच, असे आपण ठामपणे म्हणू शकू का ?  अशा प्रकारच्या  विश्वाच्या  गणिती आणि भौतिकी संकल्पना आपण कधीही कागदावर उतरवू शकणार नाही वा सिद्धही करू शकणार नाही. आपल्यासाठी हे विश्व इतके अप्राप्य असेल की या विश्वाशी संपर्क साधण्याचा देखील कोणताही संभाव्य मार्ग नसेल.

Mathematical Democracy या नावाने ओळखली जाणारी एक संकल्पना, आपल्या गणितातील मूलभूत संकल्पनांवरच, सिद्धांतांवरच प्रश्नचिन्ह उभे करते. आपली गणिती समीकरणे आणि सिद्धांत असेच का ? वेगळे का नाहीत ? खरंतर या प्रश्नाला आपल्याकडे समर्पक उत्तर नाही. आपल्याकडे हे असेच आहे असे हतबल उत्तर देऊन आपण सुटका करून घेऊ शकतो, पण तो 'का' मनात बोचत राहतो. त्याचे समाधान करणारे उत्तर आपल्या विश्वात सापडू शकत नाही आणि बहुदा सापडू शकणारही नाही.  ते सापडण्यासाठी आपल्याला संपूर्ण वेगळ्या गणिती आणि वैज्ञानिक संकल्पनांची आवश्यकता भासेल ज्यांची कदाचित आपण कल्पनाही करू शकणार नाही.

आपण आपल्या विश्वाचे वर्णन कशाच्या माध्यमातून करतो तर याचे खरेखुरे उत्तर आहे गणिती भाषेत, गणिती संरचनेतून.  कोणत्याही शास्त्राच्या तळाशी आपल्याला गणितच दिसेल. अगदी अचूकपणे सांगायचे झाले तर गणिताची वेगवेगळी रुपे दिसतील. काही वेळा हे गणित अतिशय  बाळबोध असेल तर काही वेळा अतिशय जटिल, किचकट. गणिताची ही विविध रुपे आपण सुसूत्रपणे एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला तर एक गणिती संरचना त्यातून निपजेल, जिच्यावर आपल्या सर्व शास्त्रांचा आणि पर्यायाने विश्वाच्या आकलनाचा पसारा उभा आहे. पण ही गणिती संरचना परिपूर्ण आहे का ? याचे उत्तर बहुदा नाही असे असावे. आपण कृष्णविवराची शक्यता या गणिती संरचनेत वर्तवू शकतो, मग कृष्णविवराच्या अंतर्भागात असलेल्या परिस्थितीला आपण आपल्या गणितातून व्यक्त करू शकू का ? याचे उत्तर नाही असे आहे.  आपण तत्वत: ही गोष्ट स्वीकारली आहे कि तीनापेक्षा अधिक मिती असू शकतील, मग या मितीतील अवकाश व तिथले नियम आपण आपल्या गणिती संरचनेत बसवू शकू का ?याचेही उत्तरही नाही असेच येईल. थोडक्यात आपल्या ज्ञात विश्वातही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या गणिती संरचनेतून व्यक्त करता येत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, आपली गणिती संरचना दुसर्‍या अधिक मोठ्या गणिती संरचनेची केवळ एक शाखा आहे. म्हणजेच  दुसर्‍या अशा अनेक गणिती संरचनेच्या शाखा असू शकतील की ज्या आपल्या गणिती संरचनेपेक्षा प्रचंड वेगळ्या असतील. स्वाभाविकच या संरचनेला पाया ठेवून निर्माण झालेली अनेक अगम्य विश्वे याआधीच अस्तित्वात आली असू शकतात. या विश्वांना आपल्या गणिती संरचनेत बसवता येणार नाही वा व्यक्त करता येणार नाही. खर्‍याखुर्‍या अर्थाने ही विश्वे आपल्याला सदैव समांतर राहतील.

=========

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा