अब्जावधी वर्षाच्या गणनेपलीकडे, या दोन्ही कालगणनांमध्ये नक्की कोणते साम्य आहे ? किंवा यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यास काही अर्थपूर्ण निष्कर्ष निघू शकतो का ?
कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न न करता, मला जाणवलेल्या गोष्टी मी या लेखांकात नमूद करत आहे. यासंदर्भात आपल्यापैकी कुणाला अधिक माहिती असल्यास अवश्य लिहावे.
--
आपले विश्व Big Bang (महास्फोटा) नंतर तयार झाले या आधुनिक सिद्धांताला लक्षात घेऊन, Big Bang म्हणजे ब्रह्मदेवाचा जन्म मानायचा की ब्रह्मदेवाने सृष्टीनिर्मितीस केलेला आरंभ मानायचा ?
ब्रह्मदेवाच्या जन्माच्या ज्या दोन कथा आहेत त्यातील एकात, ब्रह्मन व माया यांच्या संयोगातून जन्मलेले ब्रह्मांड व त्यातून जन्मलेल्या ब्रह्मदेवाचे वर्णन आहे. तर दुसर्या एका कथेत, विष्णुनाभीतून उत्पन्न झालेल्या कमळावर ब्रह्मदेव अवतीर्ण झाले असे वर्णन आहे.
पहिली कथा प्रथमदर्शनी काही अंशी, Big Bang शी मिळतीजुळती वाटते.
दुसर्या कथेतील विष्णुनाभीचा संदर्भ, आकाशगंगेच्या मध्यात असलेल्या, विशालकाय कृष्णविवराशी जोडून, काहीजणांनी आणखी एक मांडणी देखील केली आहे. दुसर्या कथेप्रमाणे विष्णुनाभीचा संबंध कृष्णविवराशी जोडल्यास, ब्रह्मदेवाचे आसनस्थान कृष्णविवराच्या जवळपास येते आणि याचाच दुसरा अर्थ, एका परीने असा होतो की प्रत्येक आकाशगंगेला स्वतंत्र 'विष्णु' आणि स्वतंत्र 'ब्रह्मदेव' आहे. ही मांडणी अर्थातच सहज पचनी पडणारी नाही. कारण इथे विश्व हा शब्द आकाशगंगेपुरता मर्यादित होतो.
ब्रह्मदेवाच्या वयाची ५० वर्षे उलटून गेली आहेत, ५१ व्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या, (पंचांगानुसार), अर्थात ब्रह्मदेवाचे सध्याचे वय किमान, १५,५५२ खर्व मानवी वर्षे अर्थात (किंवा 155.52 ट्रिलियन मानवी वर्षे) असले पाहिजे. हे विश्वाच्या अनुमानित १४ अब्ज वर्षांपेक्षा (अर्थात १.४ खर्व वर्षांपेक्षा) प्रचंड अधिक आहे. स्वाभाविकच Big Bang या नावाने संबोधली जाणारी घटना ब्रह्मदेवाच्या जन्माशी निगडीत नाही, असे म्हणता येईल.
मग Big Bang ही ब्रह्मदेवाच्या दिवसाची सुरुवात आहे का ? ब्रह्मदेवाच्या सध्याच्या दिवसात, ६ मन्वंतरे होऊन गेली आहेत. सातव्या वैवस्वत मन्वंतरातील २७ महायुगे उलटून, २८ व्या महायुगातील कलियुगाची ५११८ वर्षे संपली. हे गणित केल्यास :
उलटून गेलेली मन्वंतरे + संधि => ३०,८४,४८,००० x ६ = १,८५,०६,८८,००० मानवी वर्षे
उलटून गेलेली महायुगे => ४३,२०,००० x २७ = ११,६६,४०,००० मानवी वर्षे
२८ व्या महायुगात => १७,२८,००० + १२,९६,००० + ८,६४,००० + ५,११८ मानवी वर्षे = ३८,९३,११८ मानवी वर्षे
या तिन्हींची बेरीज केल्यानंतर उत्तर येते १,९७,१२,२१,११८ मानवी वर्षे . अर्थात ब्रह्मदेवाचा दिवस आरंभ होऊन, १ अब्ज ९७ कोटी १२ लक्ष २१ हजार ११८ मानवी वर्षे झाली आहेत. हा कालावधी विश्वाच्या आधुनिक गणितानुसार असलेल्या अनुमानित वयाशी जुळत नाही.
मग असे म्हणायचे का की मन्वंतरात होणारा बदल, केवळ प्रलयाशी, नव्या मनुशी (व कदाचित केवळ पृथ्वीशी) निगडीत आहे ? परंतु साधारण २अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर मानव अस्तित्वात असल्याचा, कोणताही पुरावा वैज्ञानिकांना अजूनपर्यंत सापडलेला नाही. सध्याच्या मान्यतेनुसार केवळ ६.६ कोटी वर्षांपूर्वी Impact Event मुळे डायनोसॉर नष्ट झाले आणि त्यानंतर साधारण ३० लक्ष वर्षांनी मर्कटसदृश प्राणी अस्तित्वात आला. पण हा कालावधी देखील सध्याच्या मन्वंतराच्या गणनेशी जुळत नाही. सध्याचे मन्वंतर सुरू होऊन १२,०५,३३,११८ अर्थात १२ कोटी ५ लक्ष ३३ हजार ११८ वर्षे उलटून गेली आहेत . म्हणजे जर या मन्वंतरापूर्वी प्रलय (संधिकाळात) झाला होता असे मानायचे असेल तर, या गणितानुसार हा प्रलय किमान १२ कोटी वर्षांपूर्वी झाला असला पाहिजे. आधुनिक (भूस्तर) विज्ञानाच्या गणितानुसार या काळात 'प्रलय' झालेला नाही.
--
ब्रह्मदेवाचा दिवस (केवळ दिवस, रात्र नव्हे) अर्थात कल्प याचे मान आहे ४.३२ अब्ज मानवी वर्षे. या संख्येशी साधारण जुळणारी मात्र एक गोष्ट आहे, ती आहे पृथ्वीचे अनुमानित वय. सध्याच्या मान्यतेनुसार पृथ्वीचे वय ४.५४±०.५ अब्ज वर्षे इतके आहे. सूर्यमालेचे अधिकतम अनुमानित वय देखील ४.५६७ अब्ज वर्षे इतके आहे. पण यातून काही विशेष साध्य होते आहे का ? ४.३२ अब्ज मानवी वर्षे जर ब्रह्मदेवाच्या दिवसाशी सुसंगत धरली तर, ब्रह्मदेवाची रात्र आता सुरू होणार (किंवा झाली) असे मानावे लागेल. याचाच दुसरा अर्थ सूर्यमालेचा/पृथ्वीचा विनाश खूप जवळ आला आहे असा होतो. ज्याची ठोस चिन्हे नाहीतच पण युगाच्या कालगणनेशी देखील ते जुळत नाही.
आपल्या कालगणनेतील, एका आकड्याच्या अंशत: जवळपास जाणारी दुसरी एक गोष्टही आहे. आपला सूर्य (त्याच्या ग्रहमालेसह) आकाशगंगेच्या केंद्राभोवती (Galactic Center) प्रदक्षिणा घालतो. आकाशगंगेचे हे केंद्र ,मूळ नक्षत्राजवळ आहे असे म्हटले जाते. (तसे असल्यास मूळ नक्षत्राचे नाव खूप अर्थवाही आहे असे म्हणावे लागेल.) सूर्याचे या केंद्रापासूनचे अंतर अंदाजे २५,००० ते २८,००० प्रकाशवर्षे इतके आहे. या केंद्राभोवती प्रदक्षिणा करण्यास २२.५ ते २५ कोटी वर्षे लागतात असे सध्याचे अनुमान आहे. हा आकडा एका मन्वंतराच्या मानाशी काहीसा जवळ आहे (१ मन्वंतर = तीस कोटी, सदुसष्ट लक्ष, वीस हजार मानवी वर्षे. ) , आकाशगंगेच्या केंद्राभोवती फिरताना सूर्य एकाच प्रतलात भ्रमण करत नाही. तो त्याच्या कक्षेत वरखाली करत, लंबवर्तुळाकार प्रदक्षिणा करतो. (जणू एखादा चेंडू जमिनीवर आपटून, पुन्हा वर उसळी मारत पुढे जात आहे आणि छताला आपटून पुन्हा जमिनीच्या दिशेने प्रवास करत आहे किंवा दुसर्या प्रकारे विचार करायचा तर Sine Wave आठवा) . केंद्राभोवतीच्या भ्रमण करताना, १० भ्रमणांमध्ये, सुमारे २७ वेळा तो वरखाली होतो,म्हणजेच एका प्रदक्षिणेत अंदाजे २.७ वेळा. या परिभ्रमणादरम्यान अथवा उभ्या आंदोलनादरम्यान काही वेळा तो अशा अवकाशीय वस्तूंजवळून जात असावा ज्यांच्यामुळे सूर्यमालेत हल्लकल्लोळ माजतो, पृथ्वीवर प्रलय येतो असा प्राथमिक अंदाज आहे. हे गणित जर मन्वंतराच्या कालावधीशी ताडून बघितले तर, साधारण १०.५ ते १३ कोटी वर्षांनंतर आणखी एक प्रलय होईल असे म्हणता येईल. सध्याच्या जैवशास्त्रीय अनुमानानुसार, इतका काळ पृथ्वीवर, सध्याच्या प्रजातींपैकी कोणतीही प्रजाती टिकणार नाही. सध्याच्या मानवजातेचे पृथ्वीवरचे अस्तित्व या आधीच संपलेले असेल. काही वैज्ञानिकांच्या मान्यतेनुसार ही सहावी Extinction Event असेल (त्यांच्या अभ्यासानुसार आधीच्या पाच Extinction Event ४४ कोटी वर्षात होऊन गेल्या आहेत, अर्थात त्या ही आपल्या गणनेशी जुळत नाहीत.) पृथ्वीवर अस्तित्वात असणार्या बहुतांश जुन्या संस्कृतींमध्ये, प्रलय ही संकल्पना कमीअधिक प्रमाणात आढळते. पण ही संकल्पना मूळातून नाकारणार्या काही वैज्ञानिकांकडून, एक प्रतिवाद असा केला जातो की पूर्ण पृथ्वीवर प्रलय आणण्याइतके पाणी पृथ्वीवर आहे का ? सध्याच्या गणनेनुसार पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी तब्बल ९८% पाणी समुद्रांमध्ये आहे, साधारण १.६% हिम स्वरूपात, ध्रुवांवर व काही पर्वतांवर, साधारण ०.३६% जमिनीच्या खाली आणि केवळ ०.०३६% नद्या व इतर जलाशयात आणि इतर बाष्पाच्या स्वरूपात. या माहितीच्या आधारे, काही वैज्ञानिकांचे असे म्हणणे आहे की पृथ्वीवरची २९% जमीन, प्रचंड मोठ्या प्रलयाने व्यापण्यासाठी उपलब्ध पाणीसाठाच मूळात पुरेसा नाही. पण इथे हे लक्षात घेतले पाहिजे की प्रलयपूर्व काळात ओढवलेल्या एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे, अशी एखादी जागतिक स्वरूपाची अशी रासायनिक प्रक्रिया घडू शकते, ज्यायोगे पृथ्वीवरच्या एकंदर पाणीसाठ्यात विलक्षण वाढ होईल. त्यानंतर संततवृष्टी वा अन्य काही कारणामुळे, विध्वंसक ठरेल अशा पद्धतीने, पृथ्वीवरची सर्व जमीन दीर्घ काळासाठी पाण्याखाली जाऊ शकते. दुसरी गोष्ट अशी की पुराणातील प्रलय हा जलप्रलय असल्यामुळे, आपण असे गृहीत धरून चाललो आहोत की पुढचा प्रलय हा देखील जलप्रलय असेल. पण पंचमहाभूतांपैकी एक वा अनेक 'भुते' कोपू शकतात ही शक्यता आहेच की. 'अग्निप्रलय' वा 'वायुप्रलय' हा देखील जलप्रलयाइतकाच विध्वंसकारक ठरू शकतो. Extinction Event घडू शकण्याची विविध कारणे आहेत.
--
ब्रह्मदेवाच्या दिवस रात्रीच्या संकल्पनेची पृथ्वीच्या दिवसरात्रीच्या संकल्पनेशी सांगड घालता येते का ? या प्रश्नाचे उत्तर उपलब्ध असल्यास माझ्या वाचण्यात आलेले नाही. पण त्याच्या दिवस आणि रात्र या प्रत्येक विभागास कल्प असे म्हणतात आणि त्याचे मान ४ अब्ज ३२ कोटी मानवी वर्षे इतके आहे हे विष्णुपुराणात दिले आहे. याचे संपूर्ण गणित लेखांक २ मध्ये दिले आहे.
पृथ्वीच्या दिवसरात्रीचे कारण तिचे परिवलन आहे,तोच निकष लावायचा म्हटला तर 'ब्रह्मलोक' स्वत:भोवती फिरतो का ? आणि दिवस रात्र होण्यासाठी त्याला कुणाकडून 'प्रकाश' मिळतो असे प्रश्न उभे राहतात. या प्रश्नांची ठोस उत्तरे माहीत नाहीत, परंतु चंद्र पृथ्वीभोवती फिरतो (चंद्रमंडल), पृथ्वी सूर्याभोवती फिरते (सूर्यमंडल), सूर्य आकाशगंगेच्या केंद्राभोवती प्रदक्षिणा करतो (परमेष्ठी मंडल), आणि आपली आकाशगंगा स्वायंभू मंडलात परिभ्रमण करते असा संदर्भ उपलब्ध आहे (मूळ श्लोक सापडले नाहीत) .
वर म्हटल्याप्रमाणे प्रलय संकल्पनेची उपलब्ध वैज्ञानिक ज्ञानाशी पुरेशी सांगड जमत नाही. मात्र प्रलयाचे तीन महत्त्वाचे प्रकार मानले जातात;
१) प्रलय हा प्रत्येक मन्वंतरानंतर होतो पण त्यात समस्त जीवसृष्टी नष्ट होत नाही, इथे नव्या मनुच्या हातून मर्यादित जीवसृष्टी वाचते (sampling) आणि त्या मनुच्या नावाने नवीन मन्वंतरास सुरुवात होते.
२) महाप्रलय हा प्रत्येक कल्पांतानंतर होतो (ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या शेवटी) ज्यात सर्व जीवसृष्टी (पृथ्वी व इतर सर्व ग्रह) नष्ट होते, महाप्रलयानंतर ब्रह्मदेव नव्याने सृष्टीनिर्माणास सुरुवात करतो.
३) प्राकृत किंवा आत्यंतिक प्रलय हा ब्रह्मदेवाचे आयुष्य संपल्यानंतर होतो आणि त्याचा कालावधी हा ब्रह्मदेवाच्या आयुष्याइतकाच मानला गेला आहे. ज्यानंतर 'नवीन' ब्रह्मदेव सृष्टीनिर्माणाची सूत्रे हातात घेतो. यात सर्व सृष्टीचा लोप कल्पिला आहे (Big Crunch ?)
प्रलय या संकल्पनेची व्याप्ती स्पष्ट होण्यासाठी ब्रह्मदेवाचे स्थान फार महत्त्वाचे ठरावे. जर आपण आकाशगंगेचे कृष्णविवर (म्हणजे त्याच्या निकट) ब्रह्मदेवाचे स्थान (परमेष्ठी मंडल) मानले तर, महाप्रलय म्हणजे आपल्या आकाशगंगेतील समस्त जीवसृष्टीचा नाश आणि प्राकृत प्रलय म्हणजे आकाशगंगेचा विनाश असा अर्थ होतो. पण जर ब्रह्मदेवाचे स्थान स्वायंभू मंडल मानले, तर प्रलयाची व्याप्ती आपली आकाशगंगा ज्या कुठल्या केंद्राभोवती परिभ्रमण करत आहे, त्या केंद्रांशी संबंधित सर्व अवकाशीय वस्तूंशी निगडीत होते.
ब्रह्मदेवाच्या कालगणनेप्रमाणेच विष्णूची, शिवाची (रुद्राची ?) आणि आदिमायेची कालगणना चढत्या स्वरूपात उपलब्ध आहे !
--
--
मूळ विषयापासून थोडेसे अवांतर :
मन्वंतर बदलते तेंव्हा जसा मनु बदलतो तसाच इंद्र आणि सप्तर्षी देखील बदलतात असा उल्लेख आहे. सध्या आपण ज्या तार्यांना सप्तर्षी (Big Dipper) म्हणून ओळखतो हे 'Ursa Major' या तारकासमूहातील ठळक तारे आहेत. एका समूहात आहेत असे वाटणारे हे तारे प्रत्यक्षात विविध अंतरावर आहेत आणि त्यांच्या भ्रमणाच्या गतीही वेगवेगळ्या दिशांना आहेत. विविध संस्कृत ग्रंथात सप्तर्षींच्या नावाची वेगवेगळी यादी आहेत. पहिल्या मन्वंतरात प्रचलित असलेली नावे अशी होती क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरिचि आणि सध्याच्या मन्वंतरातील सप्तर्षि आहेत अत्रि, कश्यप, गौतम, जमदग्नि, भारद्वाज, वसिष्ठ, विश्वामित्र.
एक चौकोन आणि त्याचे शेपूट असा सात तार्यांचा आकार आपण सप्तर्षी म्हणून ओळखतो. हे सात तारे आहेत :
Dubhe; Alpha of Ursae Majoris :: १२४ प्रकाशवर्षे, प्रत : १.८१),
Merak; Beta Ursae Mejoris :: ७९ प्रकाशवर्षे, प्रत : २.३४)
Phad, Gamma Ursae Majoris :: ८४ प्रकाशवर्षे, प्रत : २.४१),
Megrez, Delta Ursae Majoris :: ८१ प्रकाशवर्षे, प्रत : ३.३२),
Alioth, Epsilon of Ursa Major :: ८१ प्रकाशवर्षे, प्रत : १.७६),
Mizar; Zeta Ursae Majoris :: ७८ प्रकाशवर्षे, प्रत : २.२३) आणि
Alkaid; Eta Ursae Majori :: १०१ प्रकाशवर्षे, प्रत : १.८५)
अनेक ठिकाणी वर उल्लेख केलेल्या सात तार्यांना अनुक्रमे क्रतु, पुलह, पुलस्त्य, अत्री, अंगिरस, वसिष्ठ आणि मरिचि अशी नावे दिली आहेत आणि त्यासाठी वापरलेला संदर्भ विष्णुपुराणाचा आहे. पण विष्णुपुराण जर या मन्वंतरात लिहिले गेले आहे :-) असे स्वीकाराले, तर हे तारे पहिल्या मन्वंतरातील सप्तर्षींचे निदर्शक मानावेत की सध्याच्या मन्वंतरातील सप्तर्षींचे ? मूळात सप्तर्षीचे तारे कोणते हे ठरविण्याचा काही निकष आहे का ? इथे ठळक तारे हा निकष बहुदा नसावा. कारण पहिल्या व सातव्या अशा दोन्ही मन्वंतरात, अत्रींचा सप्तर्षींमध्ये समावेश आहे. पण त्यापेक्षा अधिक ठळक दिसणारे तारे या तारकासमूहात आहेत. उदा.
Psi of Ursae Majoris :: १४७ प्रकाशवर्षे , प्रत : ३
Mu of Ursae Majoris :: २४९ प्रकाशवर्षे , प्रत : ३.०६
Iota of Ursae Majoris :: ४८ प्रकाशवर्षे , प्रत : ३.१२
Theta of Ursae Majoris :: ४४ प्रकाशवर्षे , प्रत : ३.१७
----
दिव्यवर्षे या कल्पनेला मूळातून नाकारणारी आणि महायुगांच्या परंपरागत मांडणी छेद देणारी एक वेगळी मांडणी श्री युक्तेश्वर यांनी केली आहे. त्यांच्या 'The Holy Science' या पुस्तकात ती मांडणी आहे. (हे पुस्तक इंटरनेटवर उपलब्ध आहे.) त्यानुसार सूर्य, आकाशगंगेच्या केंद्राभोवती भ्रमण करत नसून, त्याच्या एका जोडीदाराभोवती भ्रमण करतो आणि या भ्रमणादरम्यान तो जेंव्हा आकाशगंगेच्या केंद्राजवळ जातो, तेंव्हा कृतयुग येते व आकाशगंगेच्या केंद्रापासून दूर जातो तेंव्हा कलियुग. इथे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी १२००० वर्षांची उतरती आणि पुन्हा १२००० वर्षांची चढती युगरचना करून, तिचा संबंध जोडीदाराभोवतीच्या परिभ्रमण काळाशी व अंतिमत: पृथ्वीच्या Axial Precession (विषुचलनाशी) जोडला आहे. व्यक्तिश: मला ही मांडणी कधीच पटली नाही. तिच्यात अनेक त्रुटी आहेत. तिचा एक प्रतिवाद या लिंकवर उपलब्ध आहे.
----
मग विश्वाच्या वयासंबंधी आपली परंपरागत धारणा, ही केवळ कविकल्पना मानायची का ? किंवा आधुनिक विज्ञानाने मोजलेले विश्वाचे वय तरी कितपत योग्य, अचूक आहे ? याविषयी आणखी थोडेसे पुढच्या भागात.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा