----
(मांडणी - २) ==> विश्वाचा आकार हा (निदान आपल्यासाठी) अमर्याद आहे. अशावेळेस संभाव्यता (Probability) पाहता, हे सहज शक्य आहे की पृथ्वीची प्रतिकृती वाटावी, असे अनेक ग्रह या विश्वात असतील. आणि त्यातील कित्येक ग्रहांवर घडलेल्या घटना, घडणार्या घटना या पृथ्वीवर घडणार्या घटनासदृश असतील; पण तरीही, संपूर्णपणे जशाच्या तशा नसतील. या ग्रहांशी आपला संपर्क होणे कदाचित (सैद्धांन्तिकदृष्ट्या) अशक्य असेल, कारण हे ग्रह विश्वाच्या, त्या भागात असू शकतील, जिथून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही किंवा कधीच पोहोचू शकणार नाही.
----
पूर्वीपासून, विश्वाच्या उत्पत्तीविषयी व सद्यस्थितीविषयी वैज्ञानिकांनी जितके अंदाज बांधले होते, त्यानुसार विश्वाचा प्रसरण पावण्याचा वेग हा एकतर स्थिर असायला हवा होता किंवा कमी होत जाणारा असायला (ऋणत्वरण - deceleration) हवा होता. पण अनेक वर्षांच्या निरीक्षणानंतर वैज्ञानिक सध्या असे
मानतात की विश्वाचा प्रसरण पावण्याचा वेग, सतत वाढत (त्वरण - acceleration) आहे . ह्या निरीक्षणामुळे एक गोष्ट निश्चित झाली आहे की, एक वेळ अशी येईल, जेंव्हा अतिदूरच्या आकाशगंगा व इतर अवकाशीय वस्तू, प्रकाशाच्या वेगाची मर्यादा (Relative Speed लक्षात घेऊन) ओलांडतील आणि त्यानंतर स्वाभाविकपणे, पृथ्वीवरच्या निरीक्षकास दिसेनाशा होतील, आणि त्याचे कारण हेच, की एकवेळ अशी येईल की या वस्तूंपासून निघणारा प्रकाश आपल्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाही. प्रकाशाच्या वेगाची मर्यादा ओलांडण्याची ही संभाव्य घटना, ज्या अंतरावर घडू शकेल त्या सीमेला 'Hubble Limit' असे म्हणतात. त्रिमित जगात ही मर्यादा, अर्थातच सर्व दिशांना असल्यामुळे, Hubble Limit हा वस्तुत: एक गोलाकार (वर्तुळाकार नव्हे) आहे. या (कल्पित) गोलाकारास Hubble Volume अशी संज्ञा आहे (Hubble Volume चे अनुमानित आकारमान १० चा ३१ वा घात घनप्रकाशवर्षे). दुसर्या शब्दात आपण याला वैश्विक क्षितिज म्हणू शकतो. ज्याप्रमाणे आपण क्षितिजाकडे जाण्याचा प्रयत्न केल्यावर ते पुढे जात राहते आणि अप्राप्य राहते, तसेच या Hubble Volume चे देखील होईल. पण जसे आपण क्षितिजाच्या दिशेने पुढे सरकल्यावर आधी दृष्टीपथात न येणार्या अनेक गोष्टी आपल्याला दिसू शकतात तसेच काहीसे अवकाशात देखील होईल का ? याचे उत्तर हो आहे पण, बहुदा एका ठराविक मर्यादेपलीकडे हे उत्तर नाही असे असेल. कारण इथे विश्व आणि पर्यायाने पूर्ण अवकाशच प्रसरण पावत आहे असे गृहीतक आहे.
त्यामुळे थोडक्यात सांगायचे तर, पृथ्वीची प्रतिकृती असणारे ग्रह आपल्यासाठी Hubble Volume च्या पलीकडल्या क्षेत्रात असू शकतील.
स्वाभाविकच जिथे प्रकाश पोहोचू शकत नाही, तिथे संपर्क होणे वा साधणे तर प्रचंड दुरापास्त असेल. काही वैज्ञानिक असे मानतात की Big Bang नंतर काही काळ, विश्वाचा प्रसरण पावण्याचा वेग हा प्रकाशाच्या वेगापेक्षाही अधिक होता. स्वाभाविकच, भविष्यात प्रकाशाच्या वेगाची मर्यादा ओलांडण्याबाबत जे विधान वर केले आहे, ते कदाचित आजही सत्य असू शकेल. आजही अनेक आकाशगंगा, तारे आणि त्यांच्या ग्रहमाला , Hubble Volume च्या पलीकडे असू शकतील. आपल्या क्षमतांच्या दृष्टिकोनातून, आपले विश्व अमर्याद आहे ही गोष्ट एकदा स्वीकारल्यावर, या विश्वात, आकाशगंगा समूहांचे, आकाशगंगांचे, त्यातील तार्यांचे, ग्रहमालांचे जे काही चित्र, जी रचना आपल्याला ज्ञात आहे, त्या चित्राची, त्या रचनेची, अमर्याद विश्वात जशीच्या तशी कुठेतरी पुनरावृत्ती होणार हे संभाव्यतेला धरून आहे. आपल्याला आजूबाजूला जशा आकाशगंगा दिसत आहेत, आपली आकाशगंगा जशी आहे, तशीच्या तशी आकाशगंगा, आपल्याला न दिसणार्या, थांग न लावता येणार्या विश्वाच्या कुठल्यातरी भागात असेलच. एखाद्या अमर्याद संचाबाबत वापरल्या जाणार्या संभाव्यतेच्या निकषानुसार, तिथे असणारी पृथ्वीची दुसरी आवृत्ती (Clone), त्या (Clone) पृथ्वीवरील घटनाक्रम, तिथले जग आणि अर्थातच त्या पृथ्वीला लाभलेले उर्वरित विश्व हे देखील हुबेहूब समान असू शकते. आणि ही शक्यता अस्वाभाविक, अवास्तव नाही. ही पुनरावृत्ती किती अंतरावर होईल याचे Max Tegmark ने नमूद केलेले मान होते दहाव्या घाताचा एकोणतीसावा घात केल्यावर जी संख्या येईल, तितका १० चा घात इतके मीटर. (अर्थात १० ^ (१०^२९) मीटर, इंग्लिश संख्या वापरुन सांगायचे झाले तर Ten to the power of Hundred Octillion). ही संख्या अर्थातच कुठल्यातरी अनुमानित गणितावरून काढली आहे हे उघड आहे, पण त्यातील हा मुद्दा महत्त्वाचा हा आहे की इतक्या विशाल अंतरामुळे आपल्यासाठी ते समांतर विश्व असाध्य असणार आहे. (याच तर्हेने Max Tegmark ने नमूद केलेली दुसरी दोन माने देखील अतिप्रचंड मोठ्या संख्यांची आहेत. पृथ्वीभोवती साधारण १०० प्रकाशवर्षे परिसरात जी संरचना दिसते, तशीच्या तशी संरचना पृथ्वीपासून १० ^ (१०^९१) मीटर इतक्या अतिविशाल अंतरावर पुन्हा असेल आणि पृथ्वीभोवतीच्या Hubble Volume चा पूर्ण परिसराची पुनरावृत्ती साधारण १० ^ (१०^११५) मीटर इतक्या परमविशाल अंतरावर होईल.)
असे मानले जाते की या प्रकारच्या समांतर विश्वात (Hubble Volume मध्ये) भौतिकी आणि गणिती नियम हे आपल्या विश्वाप्रमाणेच (Hubble Volume प्रमाणेच) असतील, पण त्या विश्वाची आरंभीची स्थिती आपल्यापेक्षा वेगळी असू शकते आणि त्यामुळे तिथे घडणार्या घटनांचा कालानुक्रम आपलापेक्षा वेगळा असू शकतो. म्हणजे अशा एखाद्या विश्वासाठी, आपला भूतकाळ हा त्याचा वर्तमानकाळ असू शकतो किंवा उलटही असू शकते, म्हणेजे आपला भविष्यकाळ हा त्यांच्यासाठी वर्तमानकाळ असू शकतो. तीन वेगवेगळी घड्याळे काही मिनिटांच्या फरकाने चालू असतील तर एका घड्याळाची तुलना दुसर्या घड्याळाशी करताना जसे वाटेल काहीसे तसे.
एक गोष्ट आणखी लक्षात घ्यायला हवी. विश्वाचे वय अंदाजे १३.८२ अब्ज वर्षे इतके आहे हे वैज्ञानिक कशावरून म्हणतात ? तर आज आपल्याला सर्वात दूरचा जाणवलेला 'प्रकाश' (वा प्रारणे) , सध्याच्या निरीक्षणानुसार आणि गणितानुसार, १३.८२ अब्ज प्रकाशवर्षे अंतरावर सापडला आहे. पण हे केवळ दृश्यमान विश्वाचे आकारमान झाले. संपूर्ण विश्व या मर्यादेपर्यंत सीमित असण्याचे काहीही कारण नाही. Hubble Volume च्या पलीकडे विश्व किती पसरलेले आहे याचे अनुमान बांधणे प्रचंड अवघड आहे.
सध्याच्या अनुमानाप्रमाणे, प्रत्येक तार्याभोवती किमान एक ग्रह फिरत असेल असे मानले जाते. पण आपल्याच सूर्यमालेचे उदाहरण जर लक्षात घेतले तर प्रत्येक तार्याभोवती फिरणार्या ग्रहांची सरासरी ही एकापेक्षा अधिक असेल हे उघड आहे. पृथ्वीवरून दूरच्या तार्यांचे निरीक्षण करताना ज्या पद्धती अवलंबल्या जातात त्यात अतिशय छोट्या आकाराच्या ग्रहांचा शोध लागण्याची शक्यता ही अत्यंत अल्प आहे. तरीही सांख्यिकी अंदाजानुसार, आपल्याला ज्ञात विश्वात अंदाजे १० चा २४ वा घात इतके ग्रह असावेत असे सध्याचे अनुमान आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपल्याला ज्ञात नसलेले किंवा कधीही 'दिसू' न शकणारे विश्व, अनेक पटींने मोठे असण्याची व स्वाभाविकच, या अज्ञात विश्वात असणार्या ग्रहांची संख्या ही आपल्या कुठल्याही अंदाजाच्या प्रचंड पलीकडे अर्थातच अगणित असू शकते.
--
आता दुसर्या प्रकारे विचार केला आणि हुबेहूब अवकाशीय संरचनेची शक्यता जरा बाजूला ठेवली, आणि केवळ आपल्याला ज्ञात असलेल्या विश्वाचा विचार केला, तरीही Earth Clone ही शक्यता विचारात घेण्यासारखी आहे. Identical Strangers असे ज्यांना सबोधले जाते, असे एकासारखे एक दिसणारे, परंतु परस्परांशी जराही संबंध नसलेले किंवा संबंध असूनही एकमेकांपासून दूर असणारे लोक जगात असतात. याचप्रमाणे जुळी पृथ्वी वाटावे असे अनेक ग्रह आपल्या ज्ञात विश्वातही असू शकतील. यातील काही ग्रहांवर, पृथ्वीच्या संपूर्ण आयुष्यात, जशा घटना घडल्या आहेत, तशाच घटना जशाच्या तशा घडलेल्या असू शकतात किंवा कदाचित त्यात लहानमोठे बदलही असू शकतात. थोडक्यात सांगायचे तर पृथ्वीच्या दृष्टिकोनातून, तिथे पृथ्वीपुरते, दुसरे समांतर विश्व असू शकते. Max Tegmark च्या गणितानुसार, केवळ आपल्या Hubble Volume मध्येच, तब्बल १०^२० (दहाचा वीसावा घात) इतके पृथ्वीसदृश ग्रह असू शकतात. इतक्या प्रचंड मोठ्या संख्येने असणार्या पृथ्वीसदृश ग्रहांमध्ये, काही ग्रह जुळी पृथ्वी म्हणता येईल असे असावेत हे संभाव्यतेच्या नियमाला धरूनच आहे.
मांडणी १ मध्ये, जसे एका विश्वास दुसरे विश्व अप्राप्य आहे, तसेच इथेही असू शकेल, पण तसे असेलच असे नाही. आपल्या ज्ञात वा अज्ञात विश्वात सर्व दृष्टिकोनातून, पृथ्वीची जुळी बहीण असल्यास, आपण तिथे कधीही पोहोचू शकणार नाही असे म्हटले जाते त्यामागचे मुख्य कारण दोन्हीतील संभाव्य अंतर व ते पार करण्याची क्षमता नसणे हे आहे. पण ही क्षमता आज आपल्याकडे नसली तरी कदाचित भविष्यात आपण ती प्राप्त करू शकतो. या प्रकारची समांतर विश्वे ही आपल्याला अर्थबोध होणार्या त्रिमित स्वरूपातच कल्पिली आहेत, फक्त ती अतिप्रचंड आणि आजच्या तंत्रज्ञानासाठी असाध्य अंतरावर आहेत इतकेच.
--
(तत्वत:) Worm Hole वा तत्सम शॉर्टकट न वापरताही आपण अशा प्रकारच्या समांतर विश्वात पोहोचू शकतो, पण त्यासाठी अनेक गृहीतके आहेत. :
* सर्वप्रथम आपल्याला कुठे जायचे आहे ते माहीत असायला हवे. StarTrek सारखे 'To explore strange new world.... to boldly go where no man has gone before' असे उद्दीष्ट केवळ नशीब चांगले असेल तरच उपयुक्त ठरेल. :-)
* आपल्याला प्रकाशवेगाच्या जवळपासच्या वेगाने जाणार्या, एखाद्या अंतराळयानातून प्रवास करणे शक्य व्हायला हवे आणि ते यान ज्याला Generation Ship (अनेक पिढ्यांचे आयुष्य त्या यानातच जाणे) म्हणतात, तशा प्रकारचे असायला हवे किंवा आपल्याला स्वत:ला गोठवून ठेवण्याचे आणि पूर्वस्थितीत आणण्याचे तंत्रज्ञान साध्य व्हायला हवे.
* या प्रचंड वेगामुळे जरी आपले वय वाढण्याचा वेग कमी झाला, तरी विश्वाचे वय आणि प्रसरण वाढतच राहणार आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला या महाप्रवासाची योजना आखता यायला हवी.
* या विश्वात Dark Energy सर्वत्र पसरली आहे हे गृहीतक पूर्णसत्य मानल्यास, या Dark Energy च्या संभाव्य अडथळ्यांमुळे वा अन्य कुठल्याही प्रकारच्या विरोधामुळे, आपला महाप्रवास, सर्वात कमी प्रभावित होईल असा मार्ग शोधता यायला हवा.
आणि या आणि अशा अनेक प्रकारच्या गृहीतकांसहित, ही शक्यता देखील प्रत्यक्षात उतरायला हवी की आपण जेंव्हा कधीकाळी या समांतर विश्वात पोहोचू, तेंव्हा ते समांतर विश्व अस्तित्वात असायला हवे. :-)
--
पण समजा, (म्हणजे केवळ एक शक्यता म्हणून) काही विलक्षण कारणामुळे, आपल्याला अज्ञात असलेल्या मार्गाचा उपयोग करून, एका 'पृथ्वी'वरून एक व्यक्ती जर दुसर्या 'पृथ्वी'वर प्रवेशती झाली तर काय होईल ? कदाचित असेही घडत असेल की अशी अनोखी घटना घडताना, दुसर्या 'पृथ्वी'वरची तीच व्यक्ती पहिल्या 'पृथ्वी'वर प्रवेश करत असेल. थोडक्यात इथे व्यक्तींची अदलाबदल होईल. आणि अशा वेळेस जर त्या व्यक्तीस लाभलेली परिस्थिती, तिचा स्वभाव, तिच्या नात्यातल्या, परिचयाच्या इतर व्यक्ती, घटना यांच्यात जाणवण्याजोगा फरक असेल तर ? (ही शक्यता मांडणी - १ मध्येही शक्य आहे. आपल्यासाठी अज्ञात, कदाचित अतर्क्य असणार्या मार्गाने MWI मध्येही दोन व्यक्तींची अदलाबदल होऊ शकते.)
एखादी व्यक्ती अचानक विपरीत वागू लागली, भलत्याच व्यक्तींचे, घटनांचे संदर्भ देऊ लागली तर आपण त्या व्यक्तीच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे लेबल लावून मोकळे होतो. पण समजा आपल्याला कितीही विक्षिप्त, विलक्षण वाटणार्या गोष्टी सांगणार्या व्यक्तीच्या नकळत तिची अशा प्रकारे अदलाबदल झाली असेल तर ?
या संकल्पनेवर आधारित फारसे चित्रपट मला तरी माहीत नाहीत. Another Earth या चित्रपटात, हा विषय मध्ये काहीशा संदिग्ध पद्धतीने हा विषय हाताळला आहे. काही विज्ञान कथा, कादंबर्या मात्र आहेत. प्रत्यक्ष आयुष्यातही अशा प्रकारच्या अदलाबदलीच्या घटनांचे काही आश्चर्यजनक दावे केले गेले आहेत. हे दावे सत्य मानणारे लोकही आहेत आणि त्यांची खिल्ली उडवणारेदेखील. बर्याचदा अशा प्रकारच्या दाव्यांमध्ये पुरेसा पुरावा उपलब्ध नसतो किंवा जर असा काही पुरावा असेल तर तो व्यवस्थित नष्ट केला जातो असे या दाव्यांवर विश्वास ठेवणार्या गटाचे म्हणणे आहे. आपल्याभोवती एक समजुतींचा, संकल्पनांचा सुरक्षित कोश विणून ठेवणे आणि त्या कवचात सुरक्षित राहून, त्या कवचाला ध्वस्त करेल अशी कोणतीही गोष्ट नाकारणे ही अनेकांची सहजप्रवृत्ती असते, तसेच दुसर्या बाजूने काहीही अकल्पित, प्रस्थापित विचारांना, समजांना धक्का लावणारे दिसले की त्याची पूर्ण शहानिशा न करता ते उचलून धरणे, त्याचा गाजावाजा करून भरमसाठ दावे करणे, त्याचा उपयोग आपल्या स्वार्थासाठी करणे ही देखील काही जणांची वृत्ती असते. एक गोष्ट मात्र खरी की,जेंव्हा अशा प्रकारच्या दाव्यांसाठी, शास्त्रोक्त पद्धतीने छाननी करून, त्याची चिरफाड करून त्यातील तथ्य लोकांसमोर मांडणारी आणि त्याचे पुरेसे आणि सुयोग्य documentation करून ठेवणारी जागतिक स्वरूपाची यंत्रणा जोवर निर्माण होत नाही, तोपर्यंत या प्रकारच्या संभ्रमाचे वलय घेऊन अशा अद्भुत कथा निर्माण होत राहणार आणि कालांतराने त्याच्या दंतकथा होणार.
थोडेसे अवांतर :
'या विश्वाच्या सीमेवर काय असेल ?' या प्रश्नाचे खरे उत्तर विश्वाची सीमा सापडणार नाही हेच असावे. पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीने एका वाहनातून उत्तरध्रुवापासून एका सरळ रेषेत प्रवास करण्यास सुरुवात केली तर एक वेळ अशी येईल की ती व्यक्ती पुन्हा उत्तर ध्रुवावरच पोहोचेल. विश्वाची सीमा शोधू पाहणार्या एखाद्या शोधक प्रवाशाच्या बाबतीत (त्याचे आयुष्य विश्वप्रवास करण्याइतके लांबविता येईल असे मानल्यास) असेच काही घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वक्र अवकाशात, त्याचा प्रवास पृथ्वीपासून पृथ्वीकडे होण्याची शक्यता अधिक. अर्थात अतिप्रचंड अंतरामुळे हा शोधक प्रवासी, सामान्य मानव नसेल ही गोष्ट वेगळी ! पण घटकाभर असे मानले की दीर्घकाळ, पृथ्वीवरून आपण काही प्रारणे एकाच दिशेने सोडत राहिलो तर कित्येक अब्जावधी वर्षांनंतर (तो पर्यंत पृथ्वी असल्यास) त्यातील काही प्रारणे पृथ्वीवर परत येतील ही शक्यता नाकारता येणार नाही.
--
=========


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा