शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

समांतर विश्वे  - लेखांक १ / ६




आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग अनेकदा येतात, जिथे उपलब्ध पर्यायांपैकी एका पर्यायाची आपल्याला निवड करायची असते. आणि बर्‍याचदा या निवडीवर, आपल्या आयुष्यातील  पुढची वाटचाल अवलंबून असते.  असे निर्णायक क्षण, प्रसंग कुठल्याही क्षेत्रात येऊ शकतात, शिक्षण, नोकरी, लग्न, एखादी चालून आलेली अनोखी संधी, कधीतरी एखादा प्रवास देखील.  क्वचित आपल्या उर्वरित आयुष्याची पूर्ण दिशा ठरविण्याचे सामर्थ्य, अशा निर्णयात असते.  असे क्षण आले की आपण त्यातील एक पर्याय निवडतो आणि आयुष्य पुढे सरकते.

'काही काळानंतर, अमुक एका वेळी जर तमुक निर्णय घेतला असता, तर काय झाले असते बरे ?' अशा प्रकारचा  विचार आपल्या मनात येतोच. वैयक्तिक आयुष्यातील एका वा अनेक निर्णयांची मिळालेली फळे, आपल्याला असा विचार करण्यास उद्युक्त करतात. पण थोडे अधिक खोलात गेलो तर असे लक्षात येईल की,  वैयक्तिक आयुष्यातच कशाला, राष्ट्राच्या, जगाच्या इतिहासात असे अनेक प्रसंग आहेत, जिथे घडून गेलेल्या निर्णायक घटनेऐवजी काही वेगळे घडले असते, तर आजचा काळ काही वेगळाच असता.



मी याआधी एका लेखात अशा निर्णायक घटनांचा उल्लेख केला होता. एखाद्या निबंधाचा विषय वाटावा, अशा जर-तर च्या स्वरूपातील या घटना, अतिशय मनोरंजक शक्यता निर्माण करतात.  कौरवांनी पांडवांना पाच गावे देऊ केली असती तर किंवा महाभारत युद्ध कोणत्याही कारणामुळे टळले असते तर ?   किंवा ज्ञानेश्वरांनी इतक्या लवकर समाधी घेतली नसती तर ?  पृथ्वीराज चौहानने पहिल्या युद्धात घोरीचा पूर्ण नि:पात केला असता तर ?  किंवा देवगिरीच्या यादवांचा पराभव झाला नसता तर ?  किंवा पानिपतच्या लढाईच्या वेळी सदाशिवरावभाऊंच्या ऐवजी सेनापतीपद रघुनाथराव पेशव्यांना दिले असते तर ? किंवा पानिपताच्या युद्धात विश्वासराव धारातीर्थी पडला नसता तर ?  किंवा १८५७ चे बंड यशस्वी झाले असते तर ?
अगदी वरवर जरी शोधल्या तरी, जर-तर च्या अशा अनेक शक्यता वैयक्तिक आयुष्यात सापडतीलच, पण इतिहासातही सापडतील. या शक्यतांमध्ये महाराष्ट्राचा, आपल्या देशाचा, जगाचा वर्तमानकाळ पूर्णपणे बदलून टाकण्याची क्षमता होती असे वाटले तर ते चुकीचे नव्हे.

कालप्रवासासंदर्भात लिहीलेल्या लेखमालेत, मी या प्रकारच्या समांतर विश्वांविषयी थोडेसे लिहिले होते. पण समांतर विश्वांची संकल्पना केवळ इतक्यापुरती सीमित नाही.  मी या संदर्भात जितके वाचले आहे, जितके उमगले आहे त्यानुसार, या लेखमालेत समांतर विश्वांसंबंधी थोडे अधिक विस्ताराने लिहिणार आहे.
या लेखमालेतील कोणतीही गोष्ट खटकल्यास, चुकीची वाटल्यास नि:संकोचपणे निदर्शनास आणावी.  तुमच्या कोणत्याही स्वरूपाच्या प्रतिक्रियांचे  स्वागत आहे.

--

'समांतर विश्वे' हा सध्यातरी अधिकतर, सैद्धांतिक भौतिकशास्त्राचा (Theorotical Physics) भाग आहे.  समांतर विश्वांच्या बाबतीत  'Thought Experiment' अर्थात वैचारिक प्रयोग ही संज्ञा वापरण्यात येते आणि त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट होते की, यासंदर्भातील मांडणींचा भर हा प्रत्यक्ष प्रयोगांपेक्षा, कागदावरच्या सिद्धांताशी वा यदाकदाचित शक्य असल्यास त्यासंदर्भातील केवळ आकडेमोडीशी अधिक आहे, प्रत्यक्ष प्रत्ययाशी नव्हे.  याबाबतीत काही प्रत्यक्ष प्रयोग सुरू आहेत, नाही असे नाही, पण तरीही बर्‍याच अंशी हा कल्पनांचा इमला असल्याने, त्याबाबतीत विलक्षण मतमतांतरे आहेत. 

समांतर विश्वांचा सिद्धांत, अनेक प्रकाराने मांडला गेला आहे आणि काही साम्य वगळले, तर यातील प्रमुख प्रकारांमध्ये टोकाचा फरक आहे.  Max Tegmark नावाच्या वैज्ञानिकाने सर्वप्रथम यांची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला त्यानुसार, स्थूलमानाने समांतर विश्वांची चार वेगवेगळ्या प्रकारात विभागणी होऊ शकते. या लेखांकात या चार प्रकारांची ओझरती ओळख देत आहे. पुढील लेखांकांमध्ये त्यासंदर्भात विस्ताराने काही गोष्टी येतील. 

समांतर विश्वाच्या संदर्भात, मनोरंजक लेखन (विज्ञानकथा,कादंबर्‍या व इतर)  व दृश्य माध्यमातून (चित्रपट व मालिका), सर्वात जास्त वापरली गेलेली, मांडणी,  Max Tegmark च्या वर्गवारीतील तिसर्‍या क्रमांकाची मांडणी आहे.  लोकप्रिय असल्याने या मांडणीला, मी इथे मांडणी-१ असे संबोधले आहे.  

(मांडणी - १) ==> प्रत्येक निर्णायक तिठ्यावर (किंवा चौरस्त्यावर, पाचरस्त्यावर,  ....), जितके पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील प्रत्येक पर्यायाचे, त्या तिठ्यापासून (चौरस्त्यापासून, पाचरस्त्यापासून, ....) एक स्वतंत्र विश्व निर्माण होते आणि ही सर्व विश्वे एकाच वेळी अस्तित्वात असतात, परंतु यातील प्रत्येक विश्वासाठी, इतर सर्व समांतर विश्वे ही प्रायत: अदृश्य असतात. एकाच स्तरावरच्या, एकाच घटनेमुळे निर्माण झालेल्या, अशा सर्व समांतर विश्वांसाठी, त्या निर्णायक क्षणापर्यंतचा (भूत)काळ हा समान असतो, मात्र त्यापुढील घटना व (भविष्य)काळ हा वेगवेगळा असतो.

वरील संकल्पनेचा, कळीचा घटक अर्थातच काळ आहे. इतर ज्या मांडणी आहेत, तिथेही काळ महत्त्वाचा आहेच , पण तो निर्णायक घटक नाही.

(मांडणी - २) ==> विश्वाचा आकार हा (निदान आपल्यासाठी) अमर्याद आहे.  अशावेळेस संभाव्यता (Probability) पाहता,  हे सहज शक्य आहे की पृथ्वीची प्रतिकृती (Clone) वाटावी, असे अनेक ग्रह या विश्वात असतील आणि त्यातील कित्येक ग्रहांवर घडलेल्या घटना, घडणार्‍या घटना या पृथ्वीवर घडणार्‍या घटनासदृश असतील; पण तरीही, संपूर्णपणे जशाच्या तशा नसतील.  या ग्रहांशी आपला संपर्क होणे हे (सैद्धांन्तिकदृष्ट्या) जवळजवळ अशक्य असेल, कारण हे ग्रह विश्वाच्या, त्या भागात असू शकतील, जिथून प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचू शकलेला नाही किंवा कधीच पोहोचू शकणार नाही.

(मांडणी - ३) ==> या मांडणीनुसार आपले विश्व हे एकमेव विश्व नाही. आपले विश्व हे एका बाह्यविश्वाचा भाग आहे आणि त्या बाह्यविश्वात अगणित विश्वे आहेत.  यापैकी काही विश्वे ही आपल्या विश्वासारखीच आहेत आणि आपल्या विश्वासोबतच  अस्तित्वात आली आहेत. त्यातील काही विश्वे बर्‍याचशा समान गुणधर्माची आहेत.  समान गुणधर्माच्या विश्वांमध्ये घडणार्‍या अनेक घटना सारख्या असू शकतात , पण त्या समान असतीलच असे नाही.  याउलट आपल्या विश्वासोबतच जन्माला येऊनही,  घटनांच्या व रचनेच्या दृष्टिकोनातून, आपल्या विश्वाशी जराही साधर्म्य नसलेली विश्वेही त्या बाह्यविश्वात असू शकतील. 

(मांडणी - ४) ==> आपल्याला ज्ञात असलेल्या वा तत्वत: ज्ञात होऊ शकेल, अशा कोणत्याही वैज्ञानिक संकल्पनेच्या पलीकडे असलेली आणि आपल्याला बहुदा, सदैव अगम्य, असाध्य, अप्राप्य राहतील अशी विश्वे असू शकतील.

====

आता या प्रत्येक मांडणीबाबत थोडे विस्ताराने : 
----------------------
----
(मांडणी - १) ==> प्रत्येक निर्णायक तिठ्यावर (किंवा चौरस्त्यावर, पाचरस्त्यावर,  ....), जितके पर्याय उपलब्ध आहेत, त्यातील प्रत्येक पर्यायाचे, त्या तिठ्यापासून (....) एक स्वतंत्र विश्व निर्माण होते आणि ही सर्व विश्वे एकाच वेळी अस्तित्वात असतात, परंतु अशा प्रत्येक विश्वासाठी इतर सर्व समांतर विश्वे ही प्रायत: अदृश्य असतात. अशा सर्व, एकाच स्तरावरच्या, समांतर विश्वांसाठी, त्या तिठ्यापर्यंतचा (भूत)काळ हा समान असतो, मात्र त्यापुढील घटना व (भविष्य)काळ हा वेगवेगळा असतो.
----

'हे अशक्य आहे. या प्रकाराने अनंत विश्वे निर्माण होतील.  ही एकाच वेळी कशी अस्तित्वात असू शकतील ?'  हा स्वाभाविकपणे मनात उद्भवणारा प्रश्न आहे आणि तो अयोग्य नाही.  पण या स्वरूपाच्या समांतर विश्वाची संकल्पना, ही सर्वात लोकप्रिय संकल्पना आहे. TimeLine या नावाने अधिक प्रचलित असलेली ही संकल्पना, अनेक (विज्ञान)कथा, कादंबर्‍या, मालिका (आपल्याकडच्या नव्हे !), चित्रपट यामध्ये, अनेकदा वापरली आहे. Time Machine, Back to the future (३ भाग), TimeLine, StarTrek, Deja Vu, MIB-3 हे मला चटकन आठवणारे काही चित्रपट जिथे कालप्रवास, Timeline आणि Alternate history या सर्व संकल्पना एकात एक गुंफून वापरल्या आहेत. पण काटेकोरपणे बघायचे झाले तर इथे समांतर विश्वे अस्तित्वात आहेत, पण ती तशी दाखवलेली नाहीत. एकाचे वेळी दोन विश्वे अस्तित्वात आहेत आणि दोन्ही विश्वात घटना एकाचवेळी घडत आहेत असे प्रसंग या चित्रपटात जवळजवळ नाहीतच.   त्या तुलनेत, The One या चित्रपटात समांतर विश्वांची संकल्पना, त्यांचा परस्पराशी येणारा संबंध , अधिक वेगळ्या प्रकारे व्यक्त झाला आहे. 

अनेक वैज्ञानिक या संकल्पनेबाबत अनुकूल आहेत आणि त्यासाठी असलेले कारणही तसेच आहे.  समांतर विश्वांच्या सर्व मांडणीमध्ये ही एकमेव मांडणी अशी आहे जिथे रूढ अर्थाने, काही प्रयोग करणे शक्य आहे. आणि गंमत म्हणजे यातील प्रयोगांना यश मिळाल्याचे दावे अधूनमधून होत असतात. अर्थात अधिकृतपणे, हे सर्व प्रयोग सध्यातरी कणभौतिकी (Quantum Mechanics) स्तरावर आहेत आणि प्रत्यक्ष आयुष्यात त्याची थेट प्रचीती येणे, बहुदा (इतक्यात तरी) शक्य नाही.

Many Worlds interpretation (MWI) या नावाने संबोधली जाणारी हा मांडणी, असे मानते की भूतकाळात, जी प्रत्येक गोष्ट घडण्याची शक्यता होती, ती प्रत्येक गोष्ट घडली आहे आणि अशा प्रत्येक घटनेने एका स्वतंत्र विश्वाला जन्म दिला आहे. ही सर्व विश्वे एकाच वेळी अस्तित्वात आहेत, आणि आपल्याला जे दिसते आहे, आपण ज्या विश्वात वावरत आहोत, ते या अनंत विश्वातील एक विश्व आहे. इतर सर्व विश्वे आपल्यासाठी अदृश्य आहेत. आपण वावरत असलेले विश्व आपल्यासाठी वास्तव आहे आणि इतर सर्व विश्वे अवास्तव. याच न्यायाने, दुसर्‍या कोणत्याही विश्वात राहणार्‍या 'आपल्याच प्रतिरूपासाठी', त्याचे विश्व वास्तव आहे आणि त्याच्यासाठी आपले अस्तित्व, आपले विश्व अदृश्य आहे, आभासी आहे.

तुम्ही हा लेखांक आत्ता वाचत आहात, पण  MWI मांडणीतील, अन्य एखाद्या विश्वात तुम्ही केंव्हाच हा लेख वाचून संपवला आहे आणि त्यावर टिप्पणीही केली आहे. किंवा एखाद्या वेगळ्याच विश्वात हा लेखांक तुम्ही लिहिला आहे आणि पोस्टही केला आहे आणि या क्षणाला शांतपणे प्रतिक्रियांची वाट पाहात आहात किंवा दुसर्‍या कामात गढून गेला आहात.  या मांडणीतील विश्वे, अत्यंत विलक्षण वाटणार्‍या शक्यतांना जन्म देतात आणि या सर्व शक्यता एकाच वेळी अस्तित्वात असतात.

अनेकदा स्वत:तच रममाण होणार्‍या एखाद्या व्यक्तीसाठी, 'कुठल्या जगात वावरतो आहे काय माहीत' असा शब्दप्रयोग आपण वापरतो.  शब्दकोशातही  सर्वसाधारणत:  'World' या शब्दासाठी 'जग' आणि 'Universe' या शब्दासाठी 'विश्व' अशी ढोबळ विभागणी असते.  त्यामुळे खरंतर या मांडणीसाठी  'विश्व' हा शब्द न वापरता 'जग' हा शब्द वापरावा की काय असे माझ्या मनात घोळत होते. पण 'जग' हा शब्द, कुठेतरी पृथ्वीपुरता सीमित झाला आहे, असे आजकाल वाटू लागले आहे. तसेच या मांडणीची मर्यादा पृथ्वीपुरती आहे असे म्हणणे योग्य नाही, त्यामुळे  'विश्व' हा शब्दच अधिक उचित आहे.


====
क्रमश:
====

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा