=====================
युद्धार्थं : भाग ४
=====================
काही सहस्र वर्षांपूर्वी
....
निवातकवचांच्या नगरीत हल्लकल्लोळ माजला होता.
इतक्या कमी वेळात होत्याचे नव्हते होणे, हे युद्धात न उतरलेल्या, नगरातच निवास करणार्या अनेक ज्येष्ठ असुरांच्या पचनीच पडले नव्हते. आक्रंदणार्या स्त्रियांना, रडणार्या बालकांना धीर देण्याचे प्रयत्न, अनेकदा व्यर्थ ठरत होते. पुढची मार्गक्रमणा कशी करावी ह्या विषयीचा संभ्रम सार्वत्रिक होता. सर्वत्र एकच गोंधळाचे वातावरण होते.
काही काळाने सावरलेले अनेक ज्येष्ठ दानव आणि युद्धाच्या ज्वरातून बाहेर पडलेले, प्रत्यक्ष युद्धात सहभाग नसलेले अनेक शहाणे दानव एकत्र आले. त्यांच्यातून एक नवीन सामुदायिक नेतृत्व उदयास आले. तीन कोटींवरून त्यांची संख्या, अवघ्या काही लाखांवर आली होती. त्यातही वृद्धांचे प्रमाण अधिक असल्याने, काही काळानंतर ती संख्या आणखी घटण्याची शक्यता होती.
तरीही एक आशेचा किरण होता. प्रत्यक्ष युद्धात न उतरलेले, परंतु त्यांच्या नगरीसाठी, सुविधांसाठी , युद्धासाठी मागच्या फळीत काम करत असलेले बरेच अभियंते, वैज्ञानिक, तंत्रज्ञ व इतर क्षेत्रातील अनेक निवातकवच वाचले होते. त्यामुळे त्या विध्वंसानंतर, आवरण्याच्या आणि सावरण्याच्या प्रक्रियेचा आरंभ तात्काळ झाला.
आघात आणि आक्रोशाचा पहिला भर ओसरल्यानतर काही काळाने, त्यांच्या नवीन सामुदायिक नेतृत्वाने दीर्घकाळ विचारविनिमय केला. अनेक पर्यायांवर खल झाला. शेवटी बहुमताने असे ठरले की ह्या उद्ध्वस्त झालेल्या नगराचे पुनर्निर्माण करण्यापेक्षा, अधिक सुरक्षित अशी एखादी जागा शोधून तिथे नव्याने आपली संस्कृती वसवावी.
त्यांच्या नवीन नेतृत्वाच्या पुढे असणारी एक मोठी समस्या होती, लिंग गुणोत्तर (Gender Ratio). ते आता पूर्णपणे विस्कटले होते. त्या भीषण युद्धात, त्यांच्यातील पुरुष मोठ्या प्रमाणात मारले गेले होते आणि मागे राहिलेल्या स्त्रियांची संख्या प्रचंड अधिक होती. ह्या समस्येवरचा उपाय, शक्य तितक्या लवकर शोधणे अत्यंत आवश्यक होते.
आत्तापर्यंत त्यांनी जी सामाजिक व्यवस्था, अर्थव्यवस्था निर्माण केली होती, जोपासली होती; ती पूर्णपणे उन्मळून पडली होती. निदान सुरुवातीच्या काळात तरी, त्यांना एका संपूर्ण नव्या संरचनेची आवश्यकता होती. अशी संरचना जी सर्व प्रकारच्या आव्हानांना तोंड देऊ शकेलच, पण त्याचसोबत. त्यांच्या प्रजातीच्या अस्तित्वाला निर्माण झालेल्या आणि भविष्यात निर्माण होऊ शकतील, अशा सर्व संकटांचे निराकारणही करू शकेल.
एकूणच, अगदी सामाजिक स्तरापासूनच, त्यांना त्यांच्या संपूर्ण संस्कृतीचा पाया नव्याने रचावा लागणार होता. नंतर त्याच पायावर, त्यांना त्यांची वैज्ञानिक प्रगती सुद्धा साधणे आवश्यक होते.
स्वाभाविकच अनेक पर्यायी जागांचा शोध सुरू झाला, पण त्यावर नेतृत्वस्तरावरच एकमत होत नव्हते.
शेवटी नवीन नेतृत्वाने, त्यांच्यातील एका वैज्ञानिक गटावर अशी जागा शोधण्याचे दायित्व सोपविले. त्या गटाचा नेता होते'अमरारि'.
अमरारि आता अतिशय वृद्ध झाले होते, पण निवातकवचांचे सागरातले साम्राज्य विस्तारताना, आवश्यक ते सर्व तंत्रज्ञान विकसित करताना, त्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती.
ह्या युद्धापूर्वी, ते जेव्हां जेव्हां निवातकवचांचा इतिहास वाचत, तेव्हां प्रत्येक वेळी त्यांना खटकणारी एकच गोष्ट होती; ती म्हणजे निव्वळ अहंकारापायी ,जुन्या शत्रुत्वाचा दाखला देत, इंद्राशी कायमस्वरुपी घेतलेले शत्रुत्व. देवांच्या स्वामित्वाखाली असणारे ते नगर बळकाविण्याची आस आणि त्यावेळी तरुण असलेल्या अनेक असुरांची त्या वेळेची भूमिका, त्यांना तो इतिहास पुन्हा पुन्हा वाचूनही कधीच पटली नव्हती. पण त्यांच्यासारखा विचार करणार्या निवातकवचांची संख्या अत्यल्प होती
त्यात, देवांशी युद्धात जिंकलेले निवातकवच आणि त्यांचे नंतरच्या कित्येक पिढ्यांचे नेतृत्व आणि प्रजा, परंपरेने देवांवरील विजयाच्या उन्मादात जगत आले होते. त्यामुळेच कदाचित, त्यांनी त्या विषयावर कधीही ब्र सुद्धा काढला नव्हता. ह्या विषयात त्यांनी स्वत:च्या मनाला असा बांध घातला होता की त्यांच्या पूर्वायुष्यात सुद्धा कोणत्याही नेतृत्वाच्या, समूहाच्या कित्येक आततायी, आत्मघातकी निर्णयांच्या विरोधात जाण्याचे धैर्य, ते कधीच दाखवू शकले नव्हते. पण आता झालेला संहार आणि त्यातून उद्भवलेला त्याच्या संस्कृतीचा र्हास, त्यांच्या वृद्ध डोळ्यांना आणि त्यांच्या उद्विग्न मनाला टोकाचा खुपत होता.
एका अर्थाने, नियतीने त्यांच्यावर पुन्हा तेच दायित्व टाकले होते. पण आता परिस्थिती अशी होती, की एकेकाळी जे धैर्य ते दाखवू शकले नव्हते, ते धैर्यच आता निवातकवचांच्या भविष्याचा पाया ठरणार होते.
विध्वंसातून वाचलेल्या एका कक्षात, अमरारिंनी त्या वैज्ञानिकांच्या गटास चर्चेसाठी एकत्र आणले. त्या कक्षातील वातावरणात असह्य तणाव होता. अमरारिंना तो तणाव जाणवत होता. झुकलेले खांदे, गंभीर, तणावग्रस्त मुद्रा, भविष्याच्या चिंतेने होणार्या अस्वस्थ हालचाली, तर काही चेहर्यांवर निर्धार अशा खुणा कमीअधिक प्रमाणात, तिथे जमलेल्या सर्वांच्यात दिसत होत्या.
हिरवट-निळसर प्रकाशाने न्हालेल्या त्या प्राचीन कक्षात, एका मेजाभोवती तो गट बसला होता. अमरारि मुख्य आसनावर बसले होते. मेजावर मध्यभागी असलेला आणि त्यांच्याच एका शोधाचे फलित असलेला एक उर्जागोलक, त्या मेजावर पुरेसा प्रकाश पुरवत होता.
ही सभा त्यांच्या संस्कृतीच्या नव्या प्रवासाची पहिली पायरी ठरणार होती. त्यामुळेच कदाचित चर्चेला आरंभ करताना, त्यांनी ह्यापुढे कुठल्याही प्रकारचा अंतर्गत संघर्ष टाळण्याची भूमिका मांडली. त्यांच्या विचारांशी सर्व सहमत आहेत, ह्याचा प्रत्यय त्यांना इतरांच्या चेहर्यावरील भाव पाहून आला.
मग त्यांच्या आठवणीत खोलवर गेलेला आणि त्यांच्या मनात अनेक वर्षे सुप्त अवस्थेत राहिलेला प्रस्ताव त्यांनी मांडला :
"माझ्या मते, निदान निकटच्या भविष्यकाळात तरी, केवळ अंतर्गतच नव्हे, तर आपल्याला अन्य कुणाशीही कुठलाही संघर्ष करावा लागू नये, अशा पद्धतीने आपण योजना आखली पाहिजे ."
ते क्षणभर थांबले, तोवर अनेक माना डोलल्या होत्या. " त्यामुळे कुठल्याही देवांशी, इतर दानव संस्कृतींशी, असुरांशी, मानवाशी वा इतर दिव्य योनिजांशी, कोणताही संघर्ष टाळण्यासाठी, नव्या नगरीसाठी असे स्थान निवडावे की ज्याचा शोध कुणालाही लागू नये आणि कुणालाही आपल्या नगरीमुळे उपद्रवही होऊ नये. ह्या पृथग्वासाविषयी (self-isolation) मी नव्या नेतृत्वाशी ओझरते बोललो होतो, त्यांनी हा प्रस्ताव तुमच्यासमोर मांडण्याचे सुचवले, त्यामुळे तुम्हां सर्वांना मान्य असेल, तरच ही गोष्ट पुढे जाईल."
भीषण विध्वंसाच्या पार्श्र्वभूमीवर, त्या गटातील सर्वांचा ह्या प्रस्तावाला विरोध असण्याचे काही कारणच नव्हते. त्यामुळे तो प्रस्ताव तात्काळ मान्य झाला. मात्र चर्चेच्या ओघात अमरारिंच्या असे लक्षात आले की सुरुवात कुठून करावी, कशी करावी, नवीन नगर कुठे वसवावे ह्या विषयांवरून काही मतभेद आहेत.
ही चर्चा सुरू असतानाच, त्या गटातील एक तरुण स्त्री वैज्ञानिक अतिशय अस्वस्थ दिसत होती. तिचे हात नकळत एकमेकांत गुंतले होते आणि ते ती सारखे हलवत होती. तिला काहीतरी बोलायचे होते, पण इतके सर्व ज्येष्ठ आपापले विचार मांडत असताना, बोलावे की न बोलावे ह्या संभ्रमात असल्यासारख्या, तिच्या हालचाली होत होत्या. तिची अस्वस्थता ताडून अमरारि तिला म्हणाले "महाधी, तुला काही बोलायचे असल्यास, नि:संकोच बोल."
प्रत्यक्ष अमरारिंचे पाठबळ मिळाल्यावर ती काहीशी शांत झाली आणि ठामपणे तिने स्वत:ची मते मांडण्यास सुरुवात केली.:
"आपल्याला, आपल्या सध्याच्या नगरीपासून जवळचे स्थान शोधणे आवश्यक आहे. अन्यथा नवीन नगरीचे स्थान दूर असल्यास, उरलेल्या सर्व मणिमतीवासियांचे स्थलांतर करण्याचा अधिक भार आपल्यावर पडेल. सध्यातरी अशा प्रकारचे स्थलांतर, आपल्याकडे शेष असलेल्या वाहनांसाठी, यंत्रसामग्रीसाठी आणि इंधनासाठी अतिरिक्त भार ठरेल. शिवाय ह्या स्थलांतराची कोणतीही सूचना इंद्राला मिळाली वा नवीन वसतीस्थान इंद्राला समजले; तर आपल्या अस्तित्वावर पुन्हा एकदा नवीन संकट ओढवण्याची शक्यता आहे."
"तुझे म्हणणे योग्य आहे, पण असे स्थान आपल्या निकटच शोधणे; म्हणजे सुद्धा आणखी एका आक्रमणाची शक्यता वाढविणे नाही का ?" त्यांच्यातील अन्य एक ज्येष्ठ वैज्ञानिक 'विचक' म्हणाले.
कुठलाही प्रयोगातून निष्कर्ष काढताना प्रत्येक गोष्ट, पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या निकषांवर तपासून घेणे, ही विचक ह्यांची जुनी सवय होती. त्यामुळे अशा प्रकारच्या चर्चेतही त्यांची सवय डोकावणे, अस्वाभाविक नव्हते. अमरारिंना त्यांची ही सवय व्यवस्थित माहीत असल्याने, अमरारिंच्या मुखावर किंचित हास्य उमटले.
"अर्थातच." आता उत्तर देताना महाधीच्या चेहर्यावर आत्मविश्वास दिसत होता.
"म्हणूनच मी एक वेगळा उपाय सुचवत आहे. त्या इंद्रपुत्राने, त्याचे शेवटचे अस्त्र वापरल्यानंतर, आपल्या नगरीच्या पूर्वेला, समुद्रतळात एक अवाढव्य आणि खोल विवर निर्माण झाले आहे (६). तिथून सुरुवातीस बराच भू-रस बाहेर आला, पण तो आता थांबला आहे. त्या विवरात खोलवर आपण सहन करू शकणार नाही, असे तापमान असेल, त्यामुळे तिथे आपण राहू शकणार नाही."
"आपण जर त्या विवरात शिरून, एका ठराविक उंचीवर भुयारी मार्ग खणले, तर तिथे अनेक गुंफा आपण निर्माण करू शकतो. भविष्यकाळातही आवश्यकतेनुसार,आपण त्या भुयारी मार्गांची आणि गुंफांची संख्या आणि भुयारी मार्गांची लांबी वाढवत नेऊ शकतो. त्या भुयारांमधील तापमान नियंत्रित करणे आपल्याला शक्य आहे. शिवाय, त्या भुयारी मार्गांमधून बाहेर येण्यासाठी, अन्य ठिकाणी सुद्धा मार्ग निर्माण करता येतील. आवश्यकतेनुसार आपल्याला राहण्यासाठीच्या गुंफा आणि विविध कामांसाठीची भुयारे व गुंफा वेगवेगळ्या स्तरावर ठेवता येतीलच, पण त्यांची क्षमता आणि सुरक्षाव्यवस्था सुद्धा वेगवेगळी ठेवता येईल. जेणेकरून भविष्यकाळात एखाद्या गुंफेत वा भुयारीमार्गात काही दुर्घटना घडली, तरीही इतर भुयारांच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहणार नाही."
" त्यातून कालांतराने निकटच्या समुद्रतळावरही, आपण राहू शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली; तर आपण पुन्हा नव्याने विचार करू शकतो."
....
महाधी बोलायची थांबली आणि त्या कक्षात प्रगाढ शांतता पसरली. विवराच्या आतमध्ये, विवराशी काटकोनात असणारी भुयारे आणि त्यात असणाऱ्या गुंफा सुरक्षितता आणि गुप्ततेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार होत्या; हे सर्वांच्याच लक्षात आले. शिवाय आवश्यकतेनुसार त्यांची क्षमता वाढवत नेता येणार होती. शिवाय अशी भुयारे निर्माण करण्यासाठी, आवश्यक असणारे तंत्रज्ञान आणि यंत्रे त्यांच्याकडे आधीपासूनच होती. त्यामुळे निकटच्या काळात कुठे लपायचे, हा प्रश्नही तुलनेने सोपा झाला होता.
अमरारिंनी सर्व कक्षात त्यांची दृष्टी फिरवली. अनेक चेहर्यांवरचा ताण निवळला आहे, असे त्यांना जाणवले. "मला वाटते, सद्यपरिस्थितीत हा सर्वात सोपा आणि उत्तम उपाय आहे, कुणाला ह्या पेक्षा अधिक चांगला पर्याय सुचतो आहे का ? किंवा ह्या पर्यायात काही त्रुटी दिसत आहेत का ?"
"होय." पुन्हा एकदा विचक म्हणाले, त्यांच्या डोक्यातील शंकासुर त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. "आपण जितके खोलवर जाऊ, तितका आपल्या शरीरावरचा दाब वाढत जाणार आहे, शिवाय तिथल्या पाण्यात, आपल्या नगराभोवती असणार्या पाण्यापेक्षा अधिक क्षारद्रव्ये असतील, त्यांचा प्रभाव आपण कसा कमी करणार आहोत ? शिवाय नगर-उभारणीसाठी जी काही सामग्री लागेल, ती आपल्याला इतरत्र शोधून, तिथे वाहून न्यावी लागेल."
त्यांचे आक्षेप ऐकून अमरारिंच्या चेहेर्यावर थोडे गंभीर भाव आले आणि त्यांनी शांतपणे बोलण्यास सुरुवात केली :
"ह्या गोष्टीवर मी ह्या आधीही विचार केला होता आणि ह्या संदर्भात नवीन नेतृत्वाशी माझा सविस्तर संवाद झाला आहे. त्यांनी कुठलाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मला दिले आहे. पण आपणा सर्वांना आपापल्या क्षेत्रात दीर्घकाळाचा अनुभव आहे. त्यामुळे ह्या पुढचे माझे कथन तुम्ही सर्वांनी नीट लक्ष देऊन ऐकावे; त्यावर विचार करावा, असे माझे तुम्हा सर्वांना आवाहन आहे. आपण सर्वांनी एक गोष्ट ध्यानात ठेवायला हवी की सध्याचे शीर्षस्थ प्राधान्य तगण्याला आहे, पूर्वीच्याच पद्धतीने जगण्याला नाही. "
अमरारि अतिशय सावकाश आणि काही शब्दांवर विशेष आघात करत बोलत होते. "आपण तगून राहिलो तरच आपण पुन्हा वाढू. जशी आपली संख्या वाढेल, तसतसे आपले बळ वाढेल; आणि जसजसे बळ वाढेल, तसतशी आपली क्षमताही वाढेल. मग अनेक गोष्टी साध्य होऊ शकतील."
अमरारि एक क्षणभर बोलायचे थांबले आणि मग एक दीर्घ श्वास घेऊन त्यांनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली :
"एक गोष्ट आपण सर्वांनी स्वत:च्या मनात बिंबवणे आवश्यक आहे की आपले जीवन आता पूर्वीसारखे होणे, अत्यंत अवघड आहे. त्या अस्त्राच्या किरणोत्सर्गाचे परिणाम, आपल्या सर्वांच्या शरीरावर तर होणारच आहेत, पण ते आपल्या पुढील पिढ्यांमध्ये सुद्धा उतरतील. त्यामुळे काही पिढ्यांनंतर आपले शरीर पूर्वीसारखे राहणार नाही. तसेच आपली संरक्षित नगरी उद्ध्वस्त झाली आहे, आणि तशीच्या तशी पुन्हा उभारणे, आणखी काही शतके आपल्याला शक्य होणार नाही. हे सत्य आपण जितक्या लवकर स्वीकारू तितके बरे."
"समुद्रतळावर स्वतंत्र निवासस्थाने उभारून राहण्यापेक्षा, महाधीने सुचविलेला उपाय अधिक सुरक्षित आहे आणि सद्यपरिस्थितीत तो उत्तम मार्ग आहे. पण तरीही तो उपायही आपल्यात होणारे बदल टाळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मला वाटत नाही. प्रत्येक नव्या पिढीत, आपल्या शरीररचनेत सूक्ष्म बदल होत जाणार आहेत आणि आपल्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी ही उत्क्रांती स्वीकारणे, क्रमप्राप्त आहे."
"मी आधी सांगितले त्याप्रमाणे, मी नवीन नेतृत्वाला ह्या अटळ उत्क्रांती संदर्भातही पूर्ण कल्पना दिली आहे आणि त्यांनी ही गोष्ट स्वीकारली आहे. पण आपण आत्ता ही गोष्ट ह्या कक्षात उपस्थित असणार्यांपुरतीच ठेवणार आहोत. उर्वरित जनतेवर आणखी एक आघात होऊ नये असे नेतृत्वाला आणि मलाही वाटते. आपण सर्व अतिशय ज्ञानी आहात, तेव्हां मी जे सांगतो आहे, त्यावर खोलवर विचार केलात तर तुम्हा सर्वांना ही गोष्ट पटेल, अशी आशा आहे."
इतके बोलून अमरारि थांबले, तोपर्यंत अनेकांच्या माना होकारार्थी डोलल्या होत्या. काही जण अतिशय गंभीर झाले होते. पण परिस्थितीने ओढवलेली असहाय्यता, त्यांनी निरुपायाने का होईना, स्वीकारली होती; हे उशिरा आलेल्या त्यांच्या प्रतिक्रियांवरून अमरारिंच्या उमगले.
"तर मग आता महाधीच्या सूचनेनुसार, सविस्तर आराखडा आणि वेळापत्रक, शक्य तितक्या लवकर आपण आखणार आहोत." इतके बोलून अमरारिंनी ती सभा संपल्याचे घोषित केले.
आराखडा ठरवला तरी त्याचे कार्यान्वयन (Implementation) ही वेगळी गोष्ट आहे. प्रत्यक्ष कार्यवाही करताना कोणत्या कोणत्या समस्या येऊ शकतील, ह्या विचाराने अमरारिच्या चेहर्यावर पुन्हा तणाव आला.....
---------------------------------------
सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट
=======================
अवांतर :
(६) हे विवर एकाद्या समुदगर्तेसारखे (Trench) सारखे असावे, असा विचार मी केला होता. पण निदान ह्या कथेपुरता विवर हा शब्द वापरण्यास अधिक सोपा आहे.
शंकासुरांसाठी विशेष टीप :
ह्या कथेद्वारे, निवातकवचांचे उदात्तीकरण करण्याचा कोणताही हेतू नाही वा तसा प्रयत्नही मी करत नाही आहे. प्रचंड विध्वंसानंतर झालेली स्वाभाविक प्रतिक्रिया, ह्या दृष्टीने ह्या भागाकडे पाहावे.
आढ्याचे पाणी शेवटी वळचणीलाच जातेच.
========================
=====
क्रमश:
=====

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा