रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

समांतर विश्वे - लेखांक अवांतर


समांतर विश्वांच्या बाबतीत विश्वास-अविश्वासाच्या सीमारेषेवर असलेल्या काही कथा आहेत. या कथांची भाकडकथा म्हणून संभावना करणारे लोक आहेत, या कथांची चिरफाड करणारे लोक आहेत, तसेच कदाचित या कथांमध्ये कदाचित काही तथ्य देखील असू शकेल असे मानणारे लोकही आहेत. Close Encounter च्या काही कथांमध्ये ज्याप्रमाणे त्यात सहभागी असलेल्या काही व्यक्तींना खोटे बोलण्याचे कोणतेही कारण सकृतदर्शनी नसावे असे वाटते, त्याचप्रमाणे इथेही काही घटना प्रसिद्धी वा आर्थिक लाभाच्या आशेने प्रसृत झाल्या नसाव्यात असे मानायला जागा आहे.

----

जुलै १९५४ मधल्या एका दुपारी टोकियो विमानतळावर एका व्यक्तीने प्रवेश केला.  त्या व्यक्तीचा काहीसा बावरलेला चेहेरा पाहून, विमानतळावरील सुरक्षा अधिकार्‍याला संशय आला आणि या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान असे आढळून आले की या व्यक्तीचा पासपोर्ट Taured या देशाचा होता. प्रथमदर्शनी पासपोर्ट बनावट असावा असे त्यात काहीही नव्हते. पण महत्त्वाची गोष्ट ही होती की या नावाचा देश अस्तित्वातच नव्हता !

दुर्दैवाने या घटनेबाबत पुरावा म्हणता येईल असा अधिक तपशील, अधिकृतरित्या उपलब्ध नाही. इंटरनेटवर या घटनेची काहीशी अधिक विस्तृत गोष्ट उपलब्ध आहे, पण त्यातील तपशील हा एखाद्याच्या कल्पनाशक्तीतून नंतर भरला आहे की काय याची शंका येते.

विस्तृत कथा आणि उपयुक्त कमेन्ट्स.   :

https://www.reddit.com/r/UnresolvedMysteries/comments/1zsyz2/on_july_1954_a_man_arrives_at_tokyo_airport_in/?st=ixg6d3xq&sh=9ae950d3


पण अशा प्रकारची सांगण्यात येणारी ही एकमेव घटना नाही. पण यातील बर्‍याचे घटनांचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. स्वाभाविकच विविध लेबल लागलेल्या अवस्थेत या कथा इंटरनेटवर आढळतात. शक्य तिथे मी संबंधित लिंक्स दिल्या आहेत.


१) Green children of Woolpit ही १२व्या शतकातील दंतकथा देखील अशाच प्रकारच्या रहस्यात गुरफटलेली आहे. त्वचेचा रंग हिरवा असणारी दोन मुले इंग्लंडमधील Woolpit गावात एकाएकी अवतरली. बाकी त्यांच्या शरीरयष्टीत फार फरक नव्हता, पण भाषा अनोळखी होती, त्यांनी परिधान केलेली वेष वेगळे होते.  खाण्याच्या सवयी विलक्षण होत्या, पण हळूहळू ते आपले अन्न खायला शिकले आणि त्यांच्या त्वचेचा रंग आपल्यासारखा होत गेला.   कालांतराने आजारी पडून त्यांच्यातील मुलगा मरण पावला, मुलगी जगली, वाढली, तिने इंग्लिश आत्मसात केली आणि तिच्या मूळ प्रदेशाचे आणि ती इथे कशी आली याचे वर्णन केले.  ....

कथा आणि संभाव्य स्पष्टीकरण :   https://en.wikipedia.org/wiki/Green_children_of_Woolpit

--
२) १८५१ मध्ये Joseph Vorin (किंवा (Jophar Vorin) नामक, काहीसे वेगळ्या पद्धतीचे जर्मन बोलणार्‍या, एका व्यक्तीला जर्मन सुरक्षा अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. या व्यक्तीचा असा दावा होता की तो Sakria नावाच्या देशातील Laxaria नामक ठिकाणावरून आला आहे. अशा नावाचा देश कधीही अस्तित्वात नव्हता.

विस्तृत कथा  :  http://coolinterestingstuff.com/the-strange-mystery-of-jophar-vorin

--

३) James Richards असे टोपणनाव धारण करणार्‍या  व्यक्तीने तिचा अनुभव या संकेतस्थळावर शेअर केला आहे. खरेखोटे देव जाणे.

विस्तृत कथा  : http://thebeatlesneverbrokeup.com/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=53

दंभस्फोट :  https://medium.com/much-stranger-than-fiction/everyday-chemistry-the-story-behind-the-greatest-beatles-albums-that-never-existed-517fb5f415fd#.tg6miooxn

--

४) Carol Chase McElheney या स्त्री ने सांगितलेल्या अनुभवानुसार तिने Riverside, California या तिच्या गावात,  विचित्र प्रसंग अनुभवला आहे. एका प्रवासाच्या दरम्यान तिला, तिच्या गावाकडे जाणारा रस्ता दिसला आणि गावाची ओढ तिला गावात घेऊन गेली. पण तिला तिच्या गावात परिचयाचे असे विशेष काहीही सापडेना. तिला तिथे असलेल्या माणसांशी बोलावे असे वाटतच नव्हते.  जेंव्हा दफनभूमीत तिच्या आजोबा व आजीची थडगी देखील सापडली नाहीत तेंव्हा मात्र ती अत्यंत अस्वस्थ झाली आणि त्या गावातून शक्य तेवढ्या लवकर बाहेर निघण्याची इच्छा तिला झाली आणि तिने तसेच केले.  कालांतराने तिला पुन्हा त्या गावात जायची वेळ आली तेंव्हा सर्व परिस्थिती तिला  तिच्या परिचयाच्या सर्व खुणा सापडल्या, तेथील परिस्थिती पूर्ववत होती.

विस्तृत कथा : http://mysteriousuniverse.org/2013/08/stepping-into-a-parallel-dimension/

--

५) Lerina García या उच्चशिक्षित स्त्रीला आलेला अनुभव हा तिच्यासाठी प्रचंड त्रासदायक होता. एके दिवशी सकाळी उठल्यावर तिला जगातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत असे 'लक्षात'आले. तिच्या बेडवरील चादरी, तिने अंगात घातलेले कपडे हे सर्व तिला आठवत असणार्‍या गोष्टींशी जुळत नव्हते. तिच्या कामाच्या जागेत तिला काहीही परिचयाचे आढळत नाही. ज्या जोडीदारापासून तिच्या म्हणण्यानुसार ती ६ महिन्यांपूर्वी वेगळी झाली होती, तो जोडीदार काहीही न घडल्यासारखा तिच्या बरोबर राहत होता. पहिल्या जोडीदाराला सोडल्यानंतर, ती चार महिन्यांपासून ज्या दुसर्‍या जोडीदाराबरोबर राहत होती, त्याचा, त्याच्या नातेवाईकांचा मात्र कुठलाही थांग लागत नव्हता. या संदर्भात जेंव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेंव्हा neurological malfunction थोडक्यात मेंदूत बिघाड असे निदान करण्यात आले.

विस्तृत कथा :  http://topfoundfootagefilms.com/parallel-universe-found-lerina-garcia

--

६) Pedro Oliva Ramirez याने सांगितलेल्या त्याच्या अनुभवानुसार, स्पेनमधील Seville ते  Alcala de Guadaira या त्याला परिचित असलेल्या रस्त्यावर, त्याने चुकीचा फाटा निवडला आणि त्याची कार  सर्वस्वी अनोळखी अशा सहा पदरी रस्त्यावर पोहोचली. रस्त्याच्या आजूबाजूला असलेली बांधकामे, बाजूने जाणारी वाहने, सभोवतालचा भूभाग इतके वेगळे वाटत होते की त्याच्या मनात विलक्षण घुसमट दाटून आली. साधारण एक तासाच्या अस्वस्थ प्रवासानंतर, त्याला Alcabala कडे जाणारा फाटा दिसला. त्या फाट्याला लागताच, काही वेळातच तो Alcala de Guadaira मधील त्याच्या घरासमोर होता. थोडा वेळ भ्रमित अवस्थेत घालविल्यानंतर त्याने ज्या रस्त्याने तो आला होता तो रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला तो फाटा, रस्ता पुन्हा सापडला नाही.

--

७) १९७२ च्या मे महिन्यात एका रात्री, Utah मधील एका वाळवंटाजवळून जाणार्‍या, सुनसान डांबरी रस्त्यावर प्रवास करणार्‍या चार मुलींना असाच चमत्कारिक अनुभव आला. एका फाट्यावर त्यांनी चुकीचे वळण घेतले आणि पुढचा रस्ता हा संपूर्णपणे सिमेंटचा लागला. काही वेळ त्या रस्त्यावर कार चालविल्यानंतर आपण चुकीचा रस्ता निवडला असे वाटून त्यांनी यू-टर्न घेतला आणि त्यांना नंतर जे आढळले ते अत्यंत चमत्कारिक होते. त्या सुनसान रस्त्याची जागा आता पिकांनी डवरलेल्या शेतांमधून जाणार्‍या रस्त्याने घेतली होती.वाळवंटाचा मागमूसही नव्हता. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात योग्य मार्ग विचारावा म्हणून त्यांनी कार थांबवायचे ठरविले पण त्यांच्यातल्या एका मुलीने अचानक किंचाळायला सुरुवात केल्यामुळे त्यांनी विचार  बदलला. त्या मुलीच्या किंचाळण्याचे कारण होते त्यांच्या दिशेने येणारी चार विचित्र वाहने. अतिशय घाबरलेल्या स्थितीत त्यांनी त्या रस्त्यावर कार दामटवली. थोड्याच वेळात तो वाळवटातून जाणारा डांबरी रस्ता पुन्हा लागला. ओळखीच्या खुणा दिसायला लागल्या. पण एव्हाना त्या धांदलीत त्यांच्या गाडीचे तीन टायर पंक्चर झाले होते. रात्रभर त्या ठिकाणी थांबल्यानंतर दुसर्‍या दिवशी गस्त घालणार्‍या एका पोलिसाला अडवून त्यांनी सर्व कहाणी सांगितली.

विस्तृत कथा आणि दंभस्फोटाचा दावा :

https://thephillytalker.wordpress.com/2014/08/20/the-debunker-files-the-gadianton-canyon-incident/

==

अशा आणखीही अनेक कथा आहेत. सर्वच काही इथे देणे शक्य नाही. पण या सर्व कथा खर्‍या असोत वा रचलेल्या, त्या ज्या गोष्टीकडे निर्देश करतात, ती गोष्ट या लेखमालेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.  या सर्व घटनांमध्ये समान असलेला धागा आहे तो म्हणजे अदृश्य, अपरिचित असलेल्या व काही कारणाने  ठराविक काळासाठी आपल्या विश्वाशी जोडल्या गेलेल्या समांतर विश्वाचा किंवा एखाद्या अनोळखी मितीचा.  शक्य तिथे मी लिंक दिल्या आहेत. ज्यांना अधिक उत्सुकता आहे व जिथे लिंक्स नाहीत, तिथे ते नाव कॉपी-पेस्ट करून एखाद्या Search Engine मध्ये शोधावे. कुतूहल चाळवणारे आणि शमवणारे बरेच काही सापडेल.

असत्य कथा लिहून, प्रसारित करणार्‍या वा त्यायोगे प्रसिद्धी व अन्य लाभ मिळवणार्‍या लोकांची संख्या जशी कमी नाही, तशीच  दंभस्फोटाचे (debunk) दावे करणार्‍यांची देखील संख्या कमी नाही.  एखाद्या घटनेच्या दंभस्फोटाचा (debunk) पद्धतशीर पंचनामा करणे हा देखील काहीजणांसाठी,  कुठल्याही रहस्यमय घटना मूळातून नाकारण्याचा, घटनेतील सत्याला दडपून टाकण्याचा (cover-up), नियमित वाचकवर्ग आकृष्ट करण्याचा आणि त्यायोगे प्रसिद्धी व काही वेळा आर्थिक लाभ प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.  त्यामुळे कथा खर्‍या असतीलच असे नाही हे जितके सत्य तितकेच दंभस्फोटाचे दावे हे देखील अंतिम सत्य असेलच असे नाही.    :-)

आधुनिक काळातील या कथांकडे कदाचित आपण भाकडकथा म्हणून दुर्लक्ष करू, पण अतर्क्य, विचित्र अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येत असतात. आपल्या लिखाणातून, गप्पांच्या दरम्यान कित्येकांनी ते व्यक्तही केले असतील. काही जणांना ते अद्भुत वाटले असतील, तर काही जणांना बाता.  काही जणांनी मनोमन त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्नदेखील केला असेल.  बर्‍याचदा अशा कथांचे सुयोग्य documentation आणि त्याचा शास्त्रशुद्ध पाठपुरावा करण्याचा प्रयत्नच झाल्याचे वा तशा प्रकारचा शोध घेण्याचे प्रयत्न करणारी, एखादी संस्था, निदान भारतात तरी असल्याचे ऐकलेले नाही.  काही वेळेस या संदर्भातील चर्चा रंगली असता, केवळ गंमत म्हणून रचून कथा सांगणारे देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतात किंवा अनुभव सांगणार्‍याची टवाळी झाली तर अस्सल अनुभवांना देखील अविश्वसनीयतेचा ठपका लागतो आणि यदाकदाचित त्यात काही तथ्य असले तर ते हरवून जाते.

--

== थोडेसे अवांतरातील अवांतर ! ==

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये समांतर विश्वांसंबंधी अशा प्रकारच्या कथा नाहीत. काही दुसरे उल्लेख आहेत, त्यासंबंधी पुढच्या लेखांकात.  समांतर विश्वासंबंधी वाटेल पण तशी नसलेली प्रमुख कथा आहे विश्वामित्राने निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीची.

http://satsangdhara.net - श्रीमद् वाल्मीकि रामायणे, बालकाण्डे,  षष्टितमः सर्गः

ऋषिमध्ये स तेजस्वी प्रजापतिरिवापरः ॥ २० ॥
सृजन् दक्षिणमार्गस्थान् सप्तर्षीनपरान् पुनः ।
नक्षत्रवंशमपरमसृजत् क्रोधमूर्च्छितः ॥ २१ ॥

तत्पश्चात् तेजस्वी विश्वामित्रांनी ऋषिमण्डळींच्या देखत दुसर्‍या प्रजापति समान दक्षिण मार्गासाठी नविन सप्तर्षिंची सृष्टि केली तथा क्रोधाने युक्त होऊन त्यांनी नविन नक्षत्रेंही निर्माण केली. ॥ २०-२१ ॥

दक्षिणां दिशमास्थाय ऋषिमध्ये महायशाः ।
सृष्ट्वा नक्षत्रवंशं च क्रोधेन कलुषीकृतः ॥ २२ ॥
अन्यमिन्द्रं करिष्यामि लोको वा स्यादनिन्द्रकः ।
दैवतान्यपि स क्रोधात् स्रष्टुं समुपचक्रमे ॥ २३ ॥

ते महायशस्वी मुनि क्रोधाने आवेशित होऊन दक्षिण दिशेत नूतन नक्षत्रमालांची निर्मिती करून असा विचार करू लागले की, 'मी दुसर्‍या इंद्राची सृष्टि करीन अथवा माझ्याद्वारा रचित स्वर्गलोक इंद्राशिवायच असेल.' असा निश्चय करून त्यांनी क्रोधपूर्वक नूतन देवतांची सृष्टि करण्यास प्रारंभ केला. ॥ २२-२३ ॥

 हा उल्लेख अर्थातच वरील पैकी कोणत्याही मांडणीत अचूकपणे बसत नाही. तसेच ही केवळ रूपक कथा असून, अवकाशात घडलेल्या काही घडामोडीशी तिचा संबंध असावा असे एक मत आहे. (Crux - Southern Cross पहा). 

पण तरीही दक्षिण गोलार्धातून दिसणार्‍या नक्षत्राचा उल्लेख रामायणात यावा हे विशेष आहे.

--

======
समाप्त
======

मंगळवार, ३ ऑक्टोबर, २०१७

परकीय जीवसृष्टी - भाग (अवांतर)


चंद्र आणि मंगळ यावर झालेल्या अवकाश मोहिमांदरम्यान अनेक चित्रविचित्र आकार दिसल्यासंबंधी विविध तर्कवितर्क केले गेले आहेत. कित्येक तर्कवितर्कांना छायाचित्रे, चलतचित्रे आणि क्वचित अंतराळवीरांचे संभाषण, नियंत्रण कक्षाशी झालेले संभाषण, निवृत्त झाल्यावर काही अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष स्वरूपात दिलेली माहिती याचा संदर्भ देखील देण्यात आला आहे. 

त्यापैकी 'Face on Mars' हे सर्वात गाजले होते, मात्र अधिक resolution असलेल्या कॅमेर्‍यांनी, गेल्या काही काळात जी छायाचित्रे पाठविली त्यानंतर तो छायाप्रकाशाचा खेळ असल्याचे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे.  इतरही अनेक छायाचित्रांबाबतदेखील नासाचे म्हणणे हेच आहे की हे विविध आकार म्हणजे  मंगळावरील विशिष्ट आकार लाभलेले 'दगडधोंडेच' आहेत.

तरीही इतर  काही छायाचित्रांच्या links मी इथे देत आहे.   या सर्व links, नासाच्या संकेतस्थळावरील आहेत (Original domain or subdomain)

या छायाचित्रांचे resolution किती आहे याबद्दल पुरेशी कल्पना नाही.  त्यामुळे ही छायाचित्रे कितपत उपयुक्त आहे वा ती कितपत खरी वा खोटी, त्यात सत्याचा अंश किती, प्रसिद्धीचा सोस किती, त्यात मानवी मेंदूच्या Pattern Search / Pattern Recognition च्या नैसर्गिक कौशल्याचा भाग किती वगैरे कुठल्याही प्रश्नात न जाता वा कुठलाही निष्कर्ष न काढता, मी या links इथे पोस्ट केल्या आहेत.

==
प्रत्यक्ष चित्रे (size जास्त असल्याने ६ , ११ आणि १२ क्रमांकाचे मूळ छायाचित्र वगळता) आणि त्याचा आवश्यक तो zoom केलेला भाग सोबत दिला आहे.
==

----

१) https://mars.nasa.gov/mer/gallery/all/1/p/2139/1P318075869EDNAB66P2277L1M1.JPG

























----


----
२) https://mars.jpl.nasa.gov/msl-raw-images/msss/00703/mcam/0703MR0029770280402315E01_DXXX.jpg

























----

----
३) https://mars.jpl.nasa.gov/msl-raw-images/msss/01100/mcam/1100ML0048710180500502E01_DXXX.jpg



























----

----
४) https://mars.jpl.nasa.gov/msl-raw-images/msss/00978/mcam/0978MR0043250040502821E01_DXXX.jpg
























----

----
५) https://mars.jpl.nasa.gov/msl-raw-images/msss/00729/mcam/0729ML0031250020305133E01_DXXX.jpg






















----

----
६) https://photojournal.jpl.nasa.gov/catalog/PIA10210   (15 MB tiff डाऊनलोड करून zoom करून बघावे)




----

----
७) https://mars.nasa.gov/mer/gallery/all/1/p/126/1P139376892EFF2829P2538L5M1.JPG














----

----
८) https://mars.jpl.nasa.gov/mer/gallery/all/1/p/107/1P137691267EFF2222P2363R1M1.JPG

























----

----
९) https://mars.nasa.gov/msl/images/Mars-fossil-thigh-femur-bone-like-Curiosity-rover-mastcam-0719MR0030550060402769E01_DXXX-full.jpg
























----

----
१०) https://mars.jpl.nasa.gov/msl-raw-images/msss/00194/mcam/0194MR1022019000E1_DXXX.jpg




















----

----
११) https://www.nasa.gov/sites/default/files/pia17931-main_m34-sol528-wb.jpg  (18 MB)





----

----
१२) https://photojournal.jpl.nasa.gov/catalog/PIA10216  (133 MB tiff डाऊनलोड करून zoom करून बघावे)




----

----
१३) https://mars.nasa.gov/mer/gallery/all/2/p/513/2P171912249EFFAAL4P2425L7M1.JPG
























----

----
१४) https://mars.nasa.gov/mer/gallery/all/1/p/904/1P208441438EFF74ZTP2293R2M1.JPG





















----

----
१५) https://mars.jpl.nasa.gov/msl-raw-images/proj/msl/redops/ods/surface/sol/01083/opgs/edr/ncam/NLB_493646326EDR_F0491420NCAM00251M_.JPG











----

आणखी काही छायाचित्रे देखील आहेत, नासाच्या संकेतस्थळावरची मूळ लिंक मिळाली की इथे पोस्ट करेनच.

==

ह्या व्यतिरिक्त उडत्या तबकड्या (UFO) आणि तत्सम गोष्टींवर किंचितही विश्वास नसलेल्या व्यक्तींनी पुढील लिंक्सचे सुयोग्य स्पष्टीकरण देता येईल का ह्याचा अवश्य विचार करावा.

पहिली लिंक सीआयए ने आधी दडवून ठेवलेल्या (Classified) आणि नंतर प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तांताची आहे.  प्रसिद्ध करताना त्यातील काही मजकूर शाईने काळा करण्याची दक्षता घेतली आहे.  ह्या वृत्तांकनातील चौथे पान नीट वाचावे.  तिथे UFO च्या आकारमानाचा स्पष्ट उल्लेख आहे.

https://www.cia.gov/readingroom/docs/CIA-RDP81R00560R000100070007-8.pdf

UPDATE:  वर उल्लेख केलेली लिंक अधून्मधून गायब होते / करण्यात येते. त्यामुळे, ह्या PDF चे Screenshots इथे टाकत आहे.















ह्या अहवालातील चौथ्या पानावरचा (चौथा Screenshot) पुढील उल्लेख अत्यंत महत्त्वाचा. 

"A huge metallic disc-shaped object with a six-Foot base and four feet in height was FOUND in a crater at Baltichaur, five miles NE of Pokhara. Portion of a similar object were found at Talakot and Turepasal"

जर अशा प्रकारची UFO पोखराजवळ सापडली होती तर पुढे तिचे काय झाले !?

हा उल्लेख १९ फेब्रुवारी १९६८ चा असल्यामुळे साधारण त्याच सुमारास अशी UFO सापडली होती तर त्यावेळी केंद्रात असलेल्या सरकारला आणि पंतप्रधानांना ह्या गोष्टीची कल्पना नाही हे संभवत नाही ! 

-----

Printer Friendly Version : 

----

दुसरी लिंक यूट्यूबवर कुणीतरी अपलोड केलेल्या एका चित्रफीतीची आहे. ही चित्रफीत आत्तापर्यन्त किमान दोनदा काढून टाकण्यात आली होती, त्यामुळे ही लिंकदेखील किती काळ सक्रिय राहील ते सांगणे अवघड आहे.  मात्र अपलोड करणारी व्यक्ती वा समूह पुरेसा खमका आहे.

https://youtu.be/UbHDMnATrJM

====




बुधवार, २३ ऑगस्ट, २०१७

चाळीस वर्षांचा प्रवास

मिट्ट काळोख आणि एकाकी वाटचाल. कुठे जायचे आहे ते ठरलेले नाही. माझ्यावर आता तसे कुठलेच बंधन नाही. पण तरीही मी कुठलेही लक्ष्य ठरवलेले नाही. खरंतर मी आता लक्ष्य ठरवूच शकत नाही. कितीतरी काळापूर्वी पावलांना एक वेग आला आहे, त्याच वेगाने, किती दूरवर प्रवास केला, ते आता नीटसे लक्षात नाही. वाटेत आता कुणी सोबती मिळेल असे वाटतही नाही. डोळ्यांनी कधीच दगा दिला आहे. तरीही दूरवर कुठे प्रकाश असल्याचे जाणवते कधीकधी, पण तिथे मी पोहोचू शकेन याची शाश्वती नाही वाटत आता. एकेक अवयव, इंद्रिय क्रमाक्रमाने निकामी होत चालले आहे. स्मृती मात्र अजून शाबूत आहे. घरच्यांचा निरोप घेऊन चाळीस वर्षे होतील आता. पण मी त्यांना नियमित निरोप पाठवत राहिलो आहे, त्यांना ते मिळत आहेत की नाही कुणास ठाऊक. त्यांचे उत्तर येण्याचे देखील जवळजवळ थांबले आहे, पण मी त्याची खंत करत नाही. हा मार्ग निवडला, तेंव्हा जे जे ठरवले होते, ते सारे मी साध्य केले आहे, याचेच समाधान आहे. त्यानंतरही, मला स्वत:लाही अपेक्षित नसलेले देखील, बरेच काही मी केले आहे घरच्यांसाठी. इतक्या दूरवरून आणि अशा अर्धविकलांग स्थितीत, आणखी फारसे करण्यासारखे देखील काही नाही.  इतके नानाविविध अनुभव झेलले आहेत, या जीवनप्रवासात, की आता अनपेक्षित काही घडेल, याचे भय देखील राहिले नाही. आता पुढचा प्रवास निरपेक्ष आहे. जे जसे समोर येईल तसे अनुभवायचे आहे, शक्य होईल तोवर त्याची नोंद करणार आहे, ते अनुभव घरी पाठवणार आहे,  पुढे कुणालातरी त्याचा फायदा होईल या एकमेव हेतूने.


Voyager-1 या नासाच्या अंतराळयानास स्वत:चे मन असते, तर कदाचित आज त्या यांनाने असाच काहीसा विचार केला असता.


५ सप्टेंबर १९७७ रोजी Voyager-1 ने  Titan ३ या अग्निबाणाच्या (Rocket) साहाय्याने उड्डाण केले, त्याला आता काही दिवसात ४० वर्षे पूर्ण होतील. त्याच्या आधीच २० ऑगस्टला त्याच्या जुळ्या भावंडाने, Voyager - 2 ने,  देखील अंतराळात झेप घेतली होती. (Voyager 1 त्याच्या नियोजित मार्गामुळे ते गुरु, शनि यांना आधी भेट देणार होते, त्यामुळे Voyagers चे क्रमांक, असे उड्डाणांच्या दिनांकांच्या विपरीत आहेत)  दोघांचाही उद्देश आपल्या सूर्यमालेतील बहिर्ग्रहांचा अभ्यास, हाच होता.  Mariner 10 या अंतर्ग्रहांचा अभ्यास करणार्‍या यानाने, सर्वप्रथम वापरलेले Gravity assist चे तंत्र वापरुन या दोन्ही यानांनी, विशेषत:  Voyager 1 या यानाने घेतलेली झेप आणि ठरविलेले लक्ष्य ओलांडून, अवकाश संशोधनाचा आणि जिज्ञासाशमनाचा जो टप्पा गाठला तो, या क्षेत्रातील पुढच्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Voyager ज्या काळात प्रक्षेपित करण्यात आली, त्या काळाच्या मानाने विचार केला, तर ही दोन्ही याने, उपकरणे आणि सुविधा या दृष्टीने परिपूर्ण होती. पण तांत्रिक गोष्टींपलीकडे Voyager चा उपयोग एखाद्या कालकुपी सारखा  किंवा  दूरच्या एखाद्या प्रगत संस्कृतीसाठी, विझिटिंग कार्डसारखी करण्याची कल्पना खरंच अभिनव होती. मानवाची ओळख करून देणार्‍या जगातील ज्या विविध गोष्टी Voyager सोबत होत्या, त्यात एक सोन्याची रेकॉर्ड डिस्क देखील होती (अर्थातच प्लेबॅकच्या सोयीसह). या रेकॉर्डवर असणार्‍या ३१ ट्रॅकपैकी एक ट्रॅक, केसरबाई केरकर यांच्या भैरवी गायनाच्या तुकड्याचाआहे (यूट्यूबवर उपलब्ध आहे). आणखी एक, माझ्या विशेष परिचयाचा आणि मुद्दाम उल्लेख करावा असा, दुसरा ट्रॅक म्हणजे Back To The Future या चित्रपटात, निर्णायक प्रसंगात वापरलेले आणि अत्यंत गाजलेले, चक बेरीचे Johnny B. Goode हे गाणे.

Voyager 1 ही पृथ्वीपासून सर्वात दूर (जवळजवळ २१ अब्ज किमी), सूर्यमालेला ओलांडून, पलीकडे InterStellar Space (तारांगण) मध्ये  पोहोचलेली पहिली मानवनिर्मित वस्तू.  त्याच्यापासून निघालेले संदेश (प्रकाशाच्या वेगाने) मिळायला आता १९ तासांपेक्षाही जास्त वेळ लागत आहे. आज या यानांकडून मिळणार्‍या नवीन माहितीचा ओघ कमी झाला असला, तरी अवकाशसंशोधनातील एक महत्त्वाचा टप्पा  म्हणून, Voyager बद्दल आणि Voyager ने  प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चालना दिलेल्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासारखे बरेच काही आहे.

अंतराळातील संपर्क यंत्रणेच्या वेगाने झालेल्या प्रगतीला, अप्रत्यक्षपणे  Voyager याने कारणीभूत ठरली असे म्हटले तर ते चुकीचे ठरू नये. नासाच्या Deep Space Network (DSN) ची रचना आणि प्रत्यक्ष त्याच्या कामाची सुरुवात नासाच्या (अधिकृत) स्थापनेनंतर काही काळातच झाली होती. नासाच्या प्रत्येक अंतराळ मोहिमेसोबत DSN मध्ये आवश्यक तशी भर पडत गेली, त्याची क्षमता वाढत गेली.  मात्र पृथ्वीपासुन सतत अधिकाधिक दूर जाणार्‍या Voyagers शी संपर्कात राहण्यासाठी  मोठी झेप आवश्यक होती. इतक्या दूरपर्यंत पृथ्वीवरील संदेश पोहोचावा, यासाठी अधिक ऊर्जा धारण करू शकणारे व पर्यायाने अधिक वारंवारिता (frequency) असलेले संदेश पाठविणे आवश्यक होते. हे संदेश प्रक्षेपित करण्यासाठी स्वाभाविकच अधिक मोठ्या (डिश) अँटेनांची आणि एकंदरच त्यावेळेस वापरात असलेल्या setup मध्ये मोठे बदल आवश्यक होते.   या आधुनिकीकरणांतर्गत प्रथम कॅलिफोर्निया आणि त्याच्या मागोमाग स्पेन आणि ऑस्ट्रेलिया येथील ६४ मीटरच्या (आणि काही त्यापेक्षाही लहान असलेल्या) व्यासाच्या सर्व अँटेना, ७० मीटरच्या करण्यात आल्या.  तंत्रज्ञान आणि खर्च या दोन्ही दृष्टिकोनातून ही खूप मोठी उडी होती.

अँटेनांचा आकार एका मर्यादेपलीकडे वाढविता येणार नाही हे लक्षात घेऊन,  Voyager पासून पृथ्वीपर्यंत पोहचणारे अतिशय अस्पष्ट असणारे संदेश देखील पकडता यावेत, यासाठी विविध अँटेनांचा समूह (array) बनवून, त्यांनी पकडलेल्या संदेशांचे एकत्रीकरण करून, संदेशांची क्षमता वाढविण्यात नासा यशस्वी झाली. हे केल्यानंतरही, जेंव्हा अधिक क्षमतेची आवश्यकता भासली, तेंव्हा इतर देशांच्या अँटेनांचे देखील साहाय्य घेण्यात आले. यातून 'एकमेका साह्य करू' चे धोरण स्वाभाविकपणे वापरात आले आणि भाडेतत्वावर किंवा करारान्वये परस्परांचे नेटवर्क उपलब्ध होऊ लागल्याने, अँटेना उभारण्याच्या  एकूण खर्चात बचत तर झालीच, पण पृथ्वीच्या कोणत्याही भागातून अशा संदेशांचा मागोवा घेणे अधिक सोपे झाले. मंगलयानाच्या वेळेस या नेटवर्कचा आपल्यालाही लाभ झाला होता. आपल्या हरवलेल्या 'चांद्रयान १' चा orbiter याच नेटवर्कने मध्यंतरी 'शोधला' होता.

इतक्या दूरवरून येणारे संदेश ज्या चॅनलमध्ये प्रवास करतात, तिथे बर्‍याच मोठ्या प्रमाणात noise असतो. या noise ला दूर करण्याची जी अनेक तंत्रे वापरली जातात, त्यापैकी एक प्रमुख आहे Error Correcting Codes (ECC). कालौघात ECC च्या, ज्या अनेक पद्धती विकसित झाल्या त्यातील एक आहे Reed-Solomon coding. ही पद्धत Voyager मध्ये प्रथम वापरली गेली. कालांतराने CD, DVD आणि काही HardDisk वरील 'media defects' टाळून त्यातील data वाचण्यासाठी देखील हीच पद्धत उपयोगात आणली गेली.  (आपल्याकडे ऋचांना अपभ्रंशांचा दोष लागू नये म्हणून ज्याप्रमाणे पदपाठ, क्रमपाठ, जटापाठ, घनपाठ इत्यादि पद्धती (विकृती) निर्माण केल्या गेल्या, काहीशी तशाच प्रकारची पुनरुक्तीची संकल्पना विविध ECC मध्ये वापरलेली असते)

अंतराळ संशोधनाच्या निमित्ताने आखलेल्या अवकाश मोहिमा, मानवी आयुष्य समृद्ध, सोपे करण्यासाठी कशा उपयोगी पडू शकतात त्याचे Voyager हे एक ठळक उदाहरण आहे.

Voyager 1 ने गुरु, शनि , यूरेनस आणि नेपच्यून या चारही ग्रहांच्या बाबतेत अत्यंत थक्क करणारी माहिती आपल्यापर्यंत प्रथम पोहोचवली,पण Voyager 1 ने लावलेल्या त्याहूनही अधिक महत्त्वाच्या शोधांमुळे/निष्कर्षांमुळे   सूर्यमालेसंबंधींच्या आपल्या अनेक संकल्पनांना पार बदलून टाकले. सूर्याचे चुंबकीय क्षेत्र आणि पर्यायाने सूर्यमालेची व्याप्ती, आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक विस्तृत आहे हे Voyager 1 ने आपल्याला सांगितले. Termination Shock, Heliosheath, Heliopause, Heliotail आणि पर्यायाने InterStellar Space यांचे सीमाप्रदेश (सीमारेषा नव्हे) साधारण किती अंतरावर आहेत, याचा बर्‍यापैकी अंदाज आला. 

(आपल्या सूर्यापासून निघणार्‍या) सौरवातास (Solar Wind), आकाशगंगेतून झिरपलेल्या (आणि प्रामुख्याने) हायड्रोजन, हिलियम, धूळ आणि वैश्विक किरण  यांनी बनलेल्या Interstellar Medium (ISM) कडून सतत 'विरोध' होत असतो.  या संघर्षात सूर्यापासून निघणार्‍या सौरवाताचे प्रमाण हळूहळू घटत जाते  आणि  Heliosheath मध्ये ते अतिविरळ होते या समजुतीला Voyagers च्या निरीक्षणातून् काहीसा धक्का मिळाला.  Voyager 1 ने विविध अंतरावर नोंदलेले सौरवाताचे प्रमाण आणि Voyager 2  यांनी नोंदलेली निरीक्षणे यात फरक होता. यातून समोर आलेला निष्कर्ष अप्रत्यक्षपणे असे सुचवत होता की, तिथे असलेले चुंबकीय क्षेत्र आपल्याला परिचित असलेल्या चुंबकीय रेषांसारखे नसून, ते पसरलेल्या अतिविशाल चुंबकीय बुडबुड्यांसारखे असावे. या चुंबकीय बुडबुड्यांचे महत्त्व अशासाठी आहे की, सूर्यमालेबाहेरून येणार्‍या वैश्विक किरणांसाठी हे चुंबकीय बुडबुडे एखाद्या पिंजर्‍याप्रमाणे काम करतात आणि वैश्विक किरणांमधील तीव्र उर्जाभारीत कण, या 'पिंजर्‍यांमध्ये' अडकून पडतात. थोडक्यात हे चुंबकीय बुडबुडे आपल्या सूर्यमालेसाठी वैश्विक किरणांपासून सुरक्षाकवच म्हणून काम करत असावेत  असा सध्याचा निष्कर्ष आहे.  या शोधाचा उपयोग भविष्यात कदाचित दूरच्या अवकाशप्रवासात वैश्विक किरणविरोधी यंत्रणा उभारण्यासाठी होऊ शकेल.

'To boldly go where no man has gone before' ही स्टारट्रेकच्या 'शीर्षकसंवादातील' ओळ सार्थ करत,  Voyager 1 सध्या साधारण १७ कि.मी. / सेकंद या वेगाने अनोळखी लक्ष्याच्या दिशेने आणि एका अर्थाने अनंताच्या प्रवासास निघाले आहे. हा वेग विलक्षण आहे कारण Voyager च्या तब्बल ३१ वर्षे नंतर, Voyager 1 पेक्षा कितीतरी अधिक वेगाने अवकाशात प्रक्षेपित झालेले आणि अधिक प्रगत, सक्षम उपकरणांनी समृद्ध असलेले New Horizons, जेंव्हा आज Voyager 1 ज्या अंतरावर आहे तिथे पोहोचेल, तेंव्हा आजच्या अनुमानाप्रमाणे त्याचा वेग  केवळ १३ कि. मी. / सेकंद इतकाच असेल.   Internal Oort cloud चा टप्पा गाठायला त्याला अजून किमान ३०० वर्षे लागतील आणि एकंदर Oort cloud ओलांडायला साधारण ३०,००० वर्षे ! .  सध्याच्या अनुमानाप्रमाणे, Voyager 1 शी आपला संपर्क फारफार तर २०२५ पर्यंत टिकेल. थोडक्यात, तंत्रज्ञानात काहीतरी आमूलाग्र बदल झाल्याशिवाय,  Voyager 1 ने  Oort Cloud चा टप्पा गाठला आहे हे आपल्याला कळण्याची शक्यता जवळ जवळ नाही. शिवाय २०२५ पर्यंत Voyager 1 सोबतची सर्व उपकरणे बंद पडलेली असतील.

काही वर्षांपूर्वी मी एक विज्ञानकथा वाचली होती. कथेचे नाव आणि लेखक आठवत नाही, पण त्यात काही हजार वर्षांनंतरच्या भविष्यकाळातील चित्र रेखाटले होते.  कथा खूप वेगळी होती आणि त्यामुळे लक्षात राहिली.  एक अनोळखी यान आपल्या सूर्यमालेच्या परिसरात  येते आणि त्याच्याशी कुठलाही संपर्क होऊ न शकल्याने, त्या यानावर आक्रमण करून ते  नष्ट करण्याचा निर्णय, आंतरग्रहीय शासन यंत्रणा घेते. हा निर्णय अंमलात आणला जाणार, इतक्यात उपलब्ध झालेली छायाचित्रे आणि अतिप्राचीन नोंदींचा उपयोग करून, एक 'इतिहासकार'  हे सिद्ध करतो की हे परकीय यान नसून, मानवानेच प्रक्षेपित केलेले  सोडलेले Voyager 1 आहे. साहजिकच त्या यानास समारंभपूर्वक पृथ्वीवर परत आणण्याच्या निर्णय होतो आणि तो अंमलात देखील आणला जातो. पण घडते ते भलतेच. ते यान Voyager 1 नसून, त्याची प्रतिकृती असते.  एखाद्या Trojan Horse प्रमाणे ते यान काम करते, पृथ्वीवर अगम्य, असाध्य रोग पसरतो, जो अंतिमत: मानवाच्या अस्तित्वासाठी नवे आव्हान ठरतो.

ही कथा वाचल्यावर मनात असा विचार आला होता की आज आपले नोंदी ठेवण्याचे, इतिहास जपण्याचे, एखाद्या गोष्टीची पडताळणी करण्याचे शास्त्र पूर्वीपेक्षा विलक्षण प्रगत झाले आहे. अशा परिस्थितीत कित्येक हजारो वर्षांनी, अशी फसगत शक्य आहे का ? थोडेसे पटायला अवघड जाईल, पण असे होणे शक्य आहे. जसजसे नवीन तंत्रज्ञान येते, तसतसे जुने कालबाह्य होते आणि कालबाह्य होताना ते 'निरुपयोगी' तंत्रज्ञान अवगत असणारे, त्याच्याशी जुळवून घेऊ शकणारे  मनुष्यबळ, त्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारी उपकरणे  देखील नाहीशी होतात. नामशेष होऊ पाहणार्‍या,  1.2 MB चा फ्लॉपीड्राईव्ह किंवा Gramophone चे उदाहरण घेतले तरी हे पटेल. कदाचित थोडे विचित्र वाटेल, पण मध्यंतरी वाचलेल्या एका बातमीनुसार Voyager 1 शी संपर्क ठेवणार्‍या Software मध्ये काही बदल करण्यासाठी , COBOL आणि FORTRAN या भाषांमध्ये उत्तमपणे पारंगत असलेले Programmers हवे होते, तेंव्हा ते मिळवण्यासाठी नासाला जाहिरात दिल्यानंतरही, थोडे कठीण गेले होते.  आज ही परिस्थिती असेल तर हजारो वर्षांनी काय घडू शकेल याची कल्पना आपण करू शकतो.  Susan Finley नावाची एक वरिष्ठ कर्मचारी नासामध्ये जानेवारी १९५८ पासून कार्यरत आहे. Explorer 1 हा उपग्रह प्रक्षेपित झाला, तेंव्हापासून ते आजच्या New Horizon पर्यंत. तिच्याकडे त्या काळापासून असलेल्या आणि आता बहुदा कालबाह्य झालेल्या सर्वच्या सर्व कौशल्यांचे, अनुभवाचे  सुयोग्य Documentation आणि  हस्तांतरण झाले असेल असे मानणे थोडेसे धाडसाचे ठरेल.

तंत्रज्ञानाचा उगम, विकास, वापर व लोप ही वारंवार घडणारी प्रक्रिया आहे हे मान्य न करणारे, अनेकजण आजही आपल्याला आजूबाजूला दिसतात की.  :-)

मंगळवार, २ मे, २०१७

समांतर विश्वे - लेखांक ६ / ६


या लेखांकात मी केवळ समांतर विश्वांशी संबंधित काही गोष्टींना केवळ स्पर्श करत आहे. 

कालप्रवास
----------
जर समांतर विश्वे खरी आहेत असे मानायचे असेल तर कालप्रवास कसा शक्य होईल ? भविष्यकाळात आपण नक्की कुठल्या समांतर विश्वात जाऊ ? प्रश्न स्वाभाविक आहे, पण मूळात समांतर विश्वाच्या MWI मांडणीतच याचे  उत्तर आहे. MWI चे एकाचवेळी अस्तित्व केंव्हा शक्य होईल, जेंव्हा काळाचे त्या घटनेपुरते विविध मार्ग असतील तर. Timeline या शब्दाने व्यक्त होणारा काळ हा एखाद्या विविध शाखा-उपशाखा-उपोपशाखांनी.... बहरलेल्या वृक्षासारखा आहे, एका सरळ रेषेतील अक्षासारखा नाही. या मांडणीप्रमाणे भविष्यकाळाच्या दिशेने कालप्रवास झाल्यास, काळाच्या अनेक शाखांपैकी, एका शाखेवर प्रवास होईल आणि परत येणे शक्य झाल्यास, त्याच आरंभस्थानी पुन्हा परत येणे होऊ शकेल.  मात्र जर भूतकाळात प्रवास झाला आणि तिथे एखाद्या निर्णायक घटनेत बदल झाला तर आरंभस्थानी परतणे शक्य होईलच असे नाही. त्याऐवजी परत येताना, त्या आरंभबिंदूपासून निघणार्‍या दुसर्‍या एखाद्या शाखेत प्रवेश होईल.
--

वास्तव - अवास्तव
----------------
समांतर विश्वाशी संबंधित सर्व मांडणींमध्ये, मांडणी - १ ही मूळातूनच 'वास्तव म्हणजे नक्की काय ?' हा प्रश्न उपस्थित करते. जर एखाद्या घटनेमुळे एका व्यक्तीच्या आणि तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक गोष्टीच्या, व्यक्तीच्या अनेक प्रती निर्माण होत असतील, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील, प्रत्येक बहुपर्यायी निर्णयांचा विचार करता त्याच व्यक्तीच्या असंख्य प्रती एकाच वेळी अस्तित्वात आहेत हे उघड आहे. मग यातील कोणते विश्व खरे ?   'त्या व्यक्तीच्या, त्या त्या प्रतीपुरते तिला लाभलेले विश्व खरे; हे यथार्थ उत्तर आहे की सर्वच विश्वे खरी किंवा सर्वच विश्वे खोटी हे सुयोग्य उत्तर आहे ? 

आपल्या तत्वज्ञानातील, मायावादाशी काहीशी जवळीक साधणारी ही मांडणी आहे.  विविध मार्गाने, विविध स्तरावर,  'हे जग म्हणजे माया आहे' हे दर्शविणारे, समजवणारे, जे अनेक वैदिक, पौराणिक आणि अर्वाचीन संदर्भ आपल्या वाचनात येतात, कानावर पडतात, त्यातून निघणारा मथितार्थ हेच सांगतो की हे विश्व जसे दिसते आहे, भासते आहे,  तसे ते नाही आहे.

Matrix मधील 'Do not try and bend the spoon, that's impossible. Instead, only try to realize the truth...there is no spoon' हा संवाद त्याच दिशेने अंगुलिंनिर्देश करणारा आहे.  आपण ज्याला वास्तव मानतो ते वास्तव नव्हे.  एका विश्वात वास्तव असणारी, भासणारी गोष्ट, दुसर्‍या विश्वात अवास्तव असेल ही शक्यता अधिक आहे पण तरीही ती कदाचित तशीही नसली तर ?  प्रत्यक्ष स्थिती, वास्तव कदाचित काही भलतेच की, ज्याचा थांग लागणे, लावणे सोपे नाही असे असले तर ?   दिसते ते वास्तव नसावे, याच अर्थ Matrix मध्ये दाखविले आहे तसे असावे असेही नव्हे. एखाद्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभे केले की त्याचा अर्थ एखाद्या कलात्मक अविष्कारात कल्पिलेली गोष्ट सत्य असावी असे नव्हे.  काहीवेळा कल्पित प्रत्यक्षात उतरले आहे हे मान्य करूनही, स्वत:च्या सामर्थ्याला नाकारणारे असे काहीही मानवजात चटकन मान्य करत नाही.
--


धार्मिक ग्रंथातील उल्लेख :
----------------------
आपल्या धार्मिक ग्रंथांतून समांतर विश्वांसंबंधी जे मोजके उल्लेख आढळतात. त्यातील योगवासिष्ठातील उल्लेख सोडले तर बाकी सर्व उल्लेख त्रोटक आहेत. त्यांचे वर्णन आजच्या संकल्पनांशी हुबेहूब जुळणारे नाही, काही ठिकाणी मांडणी क्रमांक ३ शी त्यातील काही गोष्टी जुळतात, तर काही ठिकाणी मांडणी २ शी.

श्रीमद्‌भागवत पुराणातील पुढील उल्लेख पहा :

सहावा स्कंध, अध्याय सोळावा 
------------------------------------
क्षित्यादिभिरेष किलावृतः   (क्षिति आदिभि: एष किल आवृत्त:  )
सप्तभिर्दशगुणोत्तरैरण्डकोशः ।    (सप्तभि दश गुणोत्तरै: अण्डकोशः)
यत्र पतत्यणुकल्पः   (यत्र पतति अणुकल्पः)
सहाण्डकोटिकोटिभिस्तदनन्तः ॥ ३७ ॥  (सह अण्ड कोटिकोटिभि: तद अनन्तः)
पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक दहापट, सात आवरणांनी घेरलेला हा जो ब्रह्मांडकोष आहे, तो आपल्याप्रमाणेच दुसर्‍या कोटयवधी ब्रह्मांडांसह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो आणि असे असूनसुद्धा त्याला आपला अंत लागत नाही.   ||३७||


द्वितीय स्कंध, अध्याय दहावा 
-----------------------
पुरुषोऽण्डं विनिर्भिद्य यदाऽसौ स विनिर्गतः ।       (पुरुष: अण्डं विनिर्भिद्य यदा असौ स विनिर्गतः)
आत्मनोऽयनमन्विच्छन् अपः अस्राक्षीच्छुचिः शुचीः ॥ १० ॥ (आत्मनो अयनम अन्विच्छन् अपः अस्राक्षीत् शुचिः शुचीः)
तास्ववात्सीत् स्वसृष्टासु सहस्रं परिवत्सरान् ।  (तासु अवात्सीत् स्वसृष्टासु सहस्रं परिवत्सरान्)
तेन नारायणो नाम यदापः पुरुषोद्‍भवाः ॥ ११ ॥  (तेन नारायण: नाम यदापः पुरुषोद्‍भवाः)
जेव्हा हा निर्मल पुरुष अण्ड (ब्रह्मांड) फोडून बाहेर पडला, तो आपल्या स्थानाला इच्छिणारा निर्मळ उदकाला उत्पन्न करिता झाला. ॥१०॥
स्वतः उत्पन्न केलेल्या त्या उदकांत हजारो वर्षेपर्यंत वास करिता झाला. ज्या अर्थी (ते उदक) पुरुषापासून उत्पन्न झालेले त्या अर्थी नारायण नावाचा झाला. ॥११॥

अकरावा स्कंध, अध्याय सोळावा
---------------------------
सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया ।
 न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥ ३९ ॥   (न तथा मे विभूतीनां सृजत: अण्डानि कोटिशः )
कालसाह्याने परमाणूंची संख्या करिता येते, कोट्यवधि अंडी (ब्रह्मांडे) उत्पन्न करणार्‍या मला (देखील) (माझ्या) विभूतींची (वरील प्रकारची गणना करता येत नाही. )

----
ब्रह्मवैवर्त पुराणातही यासंदर्भात उल्लेख आहे असे वाचण्यात आले,पण तो श्लोक मिळू शकला नसल्याने त्यासंबंधी इथे उल्लेख केला नाही आहे.
----

योगवासिष्ठ
---------
योगवासिष्ठात समांतर विश्वांसंबंधीचे संदर्भ कथांच्या, आख्यानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकाराने येतात आणि काही प्रमाणात मायावादाला पुष्टी देतात. या उल्लेखांमध्ये आत्मा, पुनर्जन्म, स्वप्ने आदि इतर संकल्पनादेखील मिसळल्या गेल्या आहेत.  लिला आख्यान,  विश्वस्थिती प्रकरण , काकभुशुंडीचे आख्यान, विपश्चित कथा  ही त्यातील काही प्रमुख उदाहरणे.

----


फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून
-------------------------
समांतर विश्व कोणत्याही प्रकारचे असो, एक गोष्ट बर्‍यापैकी निश्चितपणे म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासूनच्या त्याच्या आयुष्यातील घटना, त्याच्या कोणत्याही समांतर आवृत्तीशी एका ठराविक काळापर्यंत तंतोतंत जुळतील आणि त्यानंतर मात्र त्या वेगळ्या होत जातील. वरवर हे विधान, नियतीने सर्व काही ठरवून ठेवले आहे आणि ते तसेच घडते या समजुतीला छेद देणारे आहे असे वाटेल, पण ते तसे नाही. ज्या जागी या समांतर आवृत्तींची आयुष्ये भिन्न होतील तो क्षण प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या स्वयंनिर्णयाचा क्षण असेल. त्या स्वयंनिर्णयाची जर चार उत्तरे संभव असतील तर त्या व्यक्तीच्या असलेल्या काही आवृत्ती त्यातील एक मार्ग निवडतील, काही दुसरा, काही तिसरा आणि काही चौथा. नियतीने एखाद्या घटनेचा एक आणि एकमेव मार्ग ठरवून ठेवलेला असतो, हे विधान सरसकट योग्य नसावे.  हे शक्य आहे की अनेक आवृत्तींसाठी, कदाचित आरंभबिंदू आणि अंतिमबिंदू एकच असेल, मात्र त्या दरम्यानचा मार्ग वेगवेगळा असू शकतो.

फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून जेंव्हा एखाद्या जन्मपत्रिकेत, एखाद्या घटनेचा विचार केला जातो, तेंव्हा त्या घटनेचे एकमेव उत्तर खरंच मिळते का  ?  किंवा खरंतर हा प्रश्न असा विचारायला हवा की एखाद्या घटनेचे (फलज्योतिषीय) भाकीत एकमेव असते का ?
उदाहरण म्हणून आपण मृत्यूचा विचार करू कारण लौकिकार्थाने, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात केवळ एकदाच घडणारी अशी ती घटना आहे.  पारंपारिक वा कृष्णमूर्ती या दोन्ही पद्धतीच्या अभ्यासकांनी प्रामाणिकपणे विचार करावा की एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेवरून, त्या व्यक्तीला,  मृत्यू कसा येईल, कधी येईल, कोणत्या परिस्थितीत येईल, कुणामुळे वा निश्चित कोणत्या कारणामुळे येईल, या सर्व प्रश्नांचे केवळ एक आणि एकमेव उत्तर, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत देणे आपल्याला शक्य आहे का ?  आणि समजा तसे उत्तर एखाद्या अभ्यासकाने दिले, तर प्रत्येक वेळी ते पूर्णांशाने बरोबर येते का किंवा ते तसे येईलच असे ठाम प्रतिपादन तो अभ्यासक करू शकेल का ?

माझा फलज्योतिषाच्या अभ्यासादरम्यान मला अनेकदा असे वाटले आहे की जन्मपत्रिकेवरून, प्रत्येक घटनेसंबंधीच्या भाकिताची एकापेक्षा अनेक उत्तरे येतात. किंबहुना जन्मपत्रिकेवरून कुठल्याही एका पैलूचा फलज्योतिषदृष्ट्या विचार करताना, त्या पैलूबाबत घडू शकतील, अशा घटनांच्या समुच्चयातील प्रत्येक घटनेची केवळ संभाव्यता दर्शविली जाते आणि बर्‍याचदा (पण नेहेमी नव्हे) त्यातील ज्या घटनेची संभाव्यता सर्वात जास्त असते, ती घटना  घडताना आढळते. या घटनासमुच्चयातील प्रत्येक घटनेची संभाव्यता कशी निश्चित  करावी, अर्थात फलित कसे वर्तवावे, याचे आडाखे आणि पद्धत ही ज्याची त्याची स्वतंत्र असते. (दुर्दैवाने :-)  कुठल्याही भाकीतात, फलज्योतिष्याच्या अनुभवाचे, ज्ञानाचे, विचारप्रक्रियेचे रंग मिसळतात ) ;  पण तरी कोणताही (फल)ज्योतिषी, जन्मपत्रिकेवरून वर्तविलेली माझी सर्वच्या सर्व भाकिते योग्य येतात असा दावा करेल आणि तसे सिद्ध करून दाखवू शकेल असे वाटत नाही.  कारण कुणाही  व्यक्तीच्या जन्मपत्रिकेबाबत, जेंव्हा एखादे भाकीत वर्तविले जाते, तेंव्हा त्यात हा विचार फार कमी वेळा केला जातो की स्वेच्छानिर्णयाचा अधिकार अंतिमत: त्याच व्यक्तीच्या हातात असतो. (कर्मण्येवाधिकारस्ते.... हा श्लोक एकाप्रकारे हेच सांगतो. नाही का ?)  त्या स्वेच्छानिर्णयाला प्रत्यक्षात आणण्याची क्षमता मात्र, प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. ही क्षमता कदाचित धार्मिक वा तत्सम उपायाने वाढतही असेल किंवा लाभदायक निर्णय घेण्याची संभाव्यता वाढविण्यासाठी असे काही उपाय साह्यभूतही ठरत असतील, पण अंतिमत:  ती व्यक्ती परिस्थितीला शरण जाईल की परिस्थितीवर मात करेल अथवा नक्की कोणती घटना प्रत्यक्ष घडेल,  हे त्या व्यक्तीच्या स्वेच्छानिर्णयाच्या शक्तीवर आणि जन्मपत्रिकेतील घटनासमुच्चयाच्या संभाव्यतांवर एकत्रितरित्या अवलंबून असते, असे म्हटले तर ते अधिक उचित ठरेल असे मला वाटते.

एखादा ज्ञानी ज्योतिषी, जेंव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास करून, एखादे तर्कशुद्ध भाकीत वर्तवितो आणि तरीही ते चुकते, या गोष्टीचा समांतर विश्वांच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर ही शक्यता निर्विवाद आहे की, ते भाकीत केवळ या विश्वापुरते चुकलेले असते; त्या घटनेमुळे जी समांतर विश्वे निर्माण झाली असतील, त्यातील एखाद्या समांतर विश्वात ते भाकीत सत्य ठरले असेलही.
----


स्वप्ने
------
योगवासिष्ठात एका ठिकाणी स्वप्नसृष्टीच्या अस्तित्वाला, एखाद्या समांतर विश्वाप्रमाणे अधोरेखित केले आहे. आजच्या काळातही, आपल्याला पडणारी स्वप्ने, ही समांतर विश्वाशी संपर्क साधला जाण्याचे क्षण असतात असे मानणारा एक वर्ग आहे.  पण त्यात काही तथ्य असावे असे आजच्या विज्ञानास वाटत नाही. स्वप्ने ही मज्जासंस्थेमधल्या अनियंत्रित संवादाचे, निरुद्धेश परिणाम आहेत असे आजचे विज्ञान मानते.  स्वप्नाचे परिणाम क्वचित शरीरावर राहतात यामागे काही वेगळे कारण असावे असे सांगितले जाते. स्वप्नांमध्ये दिसणारे जग हे आपल्या त्यासमयीच्या आकलनशक्तीसाठी सत्य असू शकते, पण म्हणून ते समांतर विश्व आहे असे मानण्याचे काही ठोस कारण आहे का ? असल्यास अजूनतरी ते सापडलेले नाही.
----

----
समांतर विश्वांच्या अस्तित्वाचा एकही पुरावा नसताना हे सिद्धांत का मांडले जातात आणि त्यावर इतका ऊहापोह का होतो हा स्वाभाविकपणे पडणारा प्रश्न.
आणि याचे मूळ बहुदा अनेक गोष्टींमध्ये असावे.
ते सृष्टीला जाणून घेण्याच्या, मानवाच्या अविरत अतृप्त असलेल्या जिज्ञासेत असावे,
आपल्यासारखे आणखी कुणी आहे का की आपण एकमेव आहोत हे जाणून घेण्याच्या निरंतर प्रयत्नात असावे,
कदाचित आपण राहतो ती पृथ्वी उद्या राहण्याजोगी न राहिल्यास पृथ्वीसदृश वसतिस्थान आपल्याला लाभू शकेल का या शोधात असावे आणि
मानवाला त्याच्या बुद्धीच्या असणार्‍या, वाटणार्‍या सुप्त अहंकारातही असावे.

पण या सर्वांपलीकडे मला सदैव असे वाटत आले आहे की, अगदी आदिम काळापासून, सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नांची दिशा, ही खरंतर विश्वाच्या निर्मात्याला शोधण्यासाठी आहे. अनेक वैज्ञानिक ही गोष्ट कधीही मान्य करणार नाहीत, अनेक नास्तिक या गोष्टीला थेट धुडकावून लावतील, पण एक गोष्ट कदाचित त्यांच्या मनातही कुठेतरी खोलवर डाचत असावी की  वैज्ञानिक प्रगतीचे नवनवीन टप्पे पार केल्यानंतरही, सृष्टीनिर्माता कोण आहे ? सृष्टीनिर्मितीमागचा हेतू काय ? हे प्रश्न विज्ञानासाठी सदैव अनुत्तरित राहिले आहेत. या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा जितका प्रयत्न झाला, तितका हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत गेलेला दिसतो.  सूक्ष्माचा शोध घेताना अणू स्तरावरून, अणुकणांच्या, मूलकणांच्या स्तरावर पोहोचलेल्या
प्रवासास, आता String Theory चे नवीन लक्ष्य खुणावत आहे; तर अगम्य असणार्‍या अवकाशातील अनेक घटकांचे, अवकाशीय वस्तूंचे ज्ञान मिळवण्याची क्षमता प्राप्त केल्यावरसुद्धा, मानवाला वाकुल्या दाखवत, अवकाशीय आव्हानांचे क्षितिज अधिकाधिक विस्तारतच आहे. दृश्यमान अवकाशाच्या सीमेपलीकडे काय आहे या प्रश्नाचा मागोवा घेण्याचे, यांत्रिक सामर्थ्य थिटे पडल्यावर, ही समस्या कागदावर सोडविण्याचा प्रयत्न व्हावा आणि त्या अनुषंगाने कल्पनांच्या विमानांची उड्डाणे व्हावीत, बुद्धीने गृहीतकांचा आसरा घ्यावा आणि जर तर ची समीकरणे मांडावीत, ही गोष्ट मानवी बुद्धीच्या मूलप्रवृत्तीला धरून आहे. अथक प्रयत्नानंतरही विहित चौकटीत प्रश्न सुटत नसला की त्या प्रश्नासाठी चौकट मोडायची तयारी दाखवावी लागते. ज्यांना अशी तयारी दाखवायची नसते ते एकतर पळवाटांचा आधार घेतात किंवा प्रयत्न थांबवतात.  ज्यांची चौकट मोडायची तयारी असते, पण चौकटीच्या पलीकडे कसे जायचे हे उमजत नाही, ते कल्पनेच्या भरार्‍या मारतात.  समांतर विश्वांचा सिद्धांत आणि त्यानुसार त्याची वेगवेगळ्या प्रकारे झालेली मांडणी, ही  कुंठित झालेल्या अशाच एका टप्प्यावरचा खटाटोप आहे. कदाचित या खटाटोपातून काहीतरी, कधीतरी खुणावेल आणि आव्हानांच्या, समस्यांच्या नवीन पोतड्या उघडतील किंवा कदाचित आईनस्टाईन प्रमाणे कुणी असामान्य प्रज्ञावंत आत्तापर्यंतच्या ज्ञानाला खुजे ठरविणारे, काहीतरी अनपेक्षित असे, जगासमोर मांडेल आणि हाच खेळ नव्याने पुढे चालू राहील. 


एखादी वैज्ञानिक समस्या जेंव्हा दीर्घकाळ सुटत नाही, तेंव्हा त्यातील मुख्य अडथळा, हा मानवी देहाच्या आणि त्याने जन्मास घातलेल्या यंत्रांच्या अपुर्‍या क्षमतांचा असण्याची दाट शक्यता असते. यंत्रांची क्षमता किती वाढवता येईल याला मर्यादा आहेत आणि भविष्यातही राहतील. त्या कधी आर्थिक असतील, कधी उर्जास्त्रोताच्या असतील, कधी आकारमानाच्या असतील तर कधी अभियांत्रिकी. पण आपल्या क्षमता मर्यादित आहेत ही गोष्ट नाकारण्याकडे आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती राहिली आहे. निरंतर आणि वेगाने झालेल्या प्रगतीमुळे, नवीन लक्ष्य दृष्टीपथात दिसू लागले की स्वत:च्या गृहीतकांविषयी, सिद्धांताविषयी विज्ञान अधिकाधिक कर्मठ होत जाते आणि प्रस्थापित चौकट मोडू पाहणारी कोणतीही नवीन गोष्ट नाकारण्याकडे त्याचा कल राहतो. शारीरिक वा यांत्रिक उत्क्रांतीपेक्षा मनाची उत्क्रांती अधिक वेगाने होऊ शकते. पण त्यासाठी रूढ चौकट विस्तारावी लागेल आणि ते शक्य होत नाही, हेच कदाचित गहन समस्या न सुटण्याचे कारण असावे.


शनिवार, २९ एप्रिल, २०१७

समांतर विश्वे - लेखांक ५ / ६

वरील चार मांडणींपैकी
पहिल्या मांडणीतील विश्वे काळाच्या शाखांनी विभाजित होतात,
दुसर्‍या मांडणीत अतिविशाल अंतरामुळे,
तिसर्‍या मांडणीत बाह्यविश्वात त्या समांतर विश्वांचे स्वतंत्र अस्तित्व आहे
तर चौथ्या मांडणीत संपूर्णपणे वेगळ्या गणिती संरचनेमुळे ती परस्परांना समांतरआहेत.

प्रत्येक प्रकारच्या समांतर विश्वांचे कारण वेगळे असल्यामुळे या विश्वांचा परस्परांशी कोणत्या प्रकारे संपर्क होऊ शकेल किंवा कोणत्या प्रकारे ती शोधली जाऊ शकतात, सिद्ध होऊ शकतात याबाबतच्या धारणादेखील वेगळ्या आहेत. कागदावर अत्यंत आकर्षक वाटणार्‍या या संकल्पनांची प्रत्यक्ष अस्तित्वात असण्याच्या शक्यतेस दुजोरा देणारे किती घटक सध्याच्या प्रस्थापित विज्ञानात आहेत ? 

कुठलीही 'अनोळखी' गोष्ट शोधण्याची विज्ञानाची क्षमता बर्‍याच काळापासून विद्युतचुंबकीय प्रारणांपुरतीच (ElectroMagnetic Radiation) मर्यादित होती. (यात दृश्य प्रकाश, क्ष किरणे, गॅमा किरणे आणि इतर सर्व प्रकारच्या लहरी येतात.)   नुकतेच  गुरुत्वाकर्षण लहरींचे अस्तित्व जेंव्हा सिद्ध झाले त्यावेळी (कदाचित) या क्षमतेच्या पलीकडचे ठरू शकेल, असे काही मानवाने साध्य केले आहे. डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि तत्सम काही अन्य गोष्टी आपल्यासाठी अजूनही गूढ आहेत.

----
पहिल्या मांडणीतील समांतर विश्वे ही काळाच्या शाखांनी विभाजित आहेत, याचाच दुसरा अर्थ असा होतो की या समांतर विश्वांना शोधण्यासाठी वा त्यांचा प्रत्यय येण्यासाठी वा त्यांचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी काळ म्हणजे नक्की काय आहे ? काळ स्वयंचलित असण्याचे कारण काय ? काळ अपरिवर्तनीय आहे की नाही ? काळ एकशाखीय आहे की बहुशाखीय ?    यासारख्या अनेक गोष्टींचा आपल्याला उलगडा करावा लागेल.

काळाची जाणीव, काळाचे ज्ञान आपल्याला ज्या प्रकारे होते किंवा ज्या प्रकारे आपण काळाचे विश्लेषण करतो तो प्रकार मानवी मेंदूतील Cerebral cortex या भागाशी निगडीत आहे असे सध्याचा अभ्यास सांगतो. या भागाला इजा पोहोचल्यास काळाचे भान हरविण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. थोडक्यात आपल्या काळासंबंधीच्या जाणीवा अधिक विकसित व्हायला हव्या असतील, काळाच्या प्रत्यक्ष स्वरूपाचे यथार्थ ज्ञान आपल्याला व्हायला हवे असेल तर त्याचा एक मार्ग आपल्या मेंदूतील या भागाच्या अधिक विकसित होण्याशी संबंधित आहे. आता त्यासाठी ध्यानधारणेचा, योगमार्गाचा पथ निवडायचा की Genetic Engineering चा हा वरवर पाहता ज्याचा त्याचा प्रश्न आहे, मात्र हा प्रश्न अखिल मानवजातीच्या स्तरावर सोडवायचा असेल (आणि तो तसा कधी ना कधी सोडवावा लागेल), तर विज्ञानाला घ्यावी लागणारी झेप ही बर्‍यापैकी मोठी असेल कारण आजही आपले मानवी मेंदूसंबंधीचे ज्ञान बर्‍यापैकी मर्यादित आहे. हे ज्ञान वाढविण्यासाठी अत्यंत सखोल (क्वचित वैज्ञानिक चौकटीबाहेरचा) अभ्यास करण्याची तयारी आपल्याला दाखवावी लागेल. इतर पशूंना, प्राण्यांना, पक्ष्यांना काळाचे भान कसे आहे याचा अभ्यासदेखील या दरम्यान होणे आवश्यक ठरावे. उदा एखादी दुर्घटना घडायच्या आधी  (किंवा काही ठराविक जागांवर) काही विशिष्ट प्राणीसमूह अस्वस्थ का होतात ? त्यांना याची जाणीव नक्की कशाप्रकारे होते ? हे प्रश्न आपल्याला मूळातून सोडवावे लागतील आणि मग त्याचा उपयोग कसा करून घेता येईल हे ठरवावे लागेल.

काळाच्या संदर्भात आत्तापर्यंत झालेले प्रत्यक्ष प्रयोग हे कणभौतिकी स्तरावरचे आहेत किंवा Thought experiement या प्रकारचे आहेत. या दोन्ही प्रकारच्या प्रयोगांची स्थूल जगाशी प्रत्यक्ष सांगड घालणे हे सोपे नाही, त्यामुळे सध्याच्या वैज्ञानिक चौकटीत झालेले काळाचे ज्ञान मिळवण्याचे हे प्रयोग, प्रचीतीच्या दृष्टिकोनातून असंभवनीयतेच्या सीमेवरचे आहेत. याचाच दुसरा अर्थ असा होतो की सध्याच्या संदर्भ चौकटीच्या बाहेर जाऊन आपण निरीक्षण करू शकलो तर कदाचित आपल्याला वेगळ्या प्रकाराने काळाचे ज्ञान होऊ शकेल.
----

----
दुसर्‍या मांडणीतील विश्वे प्रचंड मोठ्या (आणि सध्याच्या तंत्रज्ञानाच्या आवाक्याबाहेरच्या) अंतरामुळे विभाजित असल्यामुळे, या विश्वांचा खरेखोटेपणा सिद्ध करणे हे केवळ आणि केवळ त्या अंतरावरील अवकाशप्रवास आणि तिथून पुन्हा पृथ्वीशी संपर्क या माध्यमातूनच साध्य होऊ शकतो. अवकाश यानांचा वेग वाढविण्याचे प्रयत्न निरंतर सुरू आहेत आणि कदाचित आणखी काही दशकात आपली अंतराळयाने प्रकाशाच्या २० ते ३० टक्के इतक्या प्रचंड वेगाने अंतराळ प्रवास करू शकतील. मात्र या मांडणीत भाकीत केलेली अंतरे इतकी विशाल आहेत की भविष्यात आपण प्रकाशवेगाने जाण्याची क्षमता जरी प्राप्त केली तरी अब्जावधी (खरंतर त्यापेक्षाही कितीतरी पटीने अधिक) प्रकाशवर्षांची अंतरे पार करणे आणि तिथून पुन्हा पृथ्वीशी संपर्क करणे हे मानवी आयुष्याच्या (अमरत्व साध्य करता येणार नाही हे गृहीत धरून :-) ) मर्यादांच्या सदैव पलीकडे असणार आहे. थोडक्यात त्या अतिदूरच्या प्रदेशात जाऊन तिथून पुन्हा मानवी आयुर्मर्यादेच्या कक्षेत राहून पृथ्वीशी संपर्क करण्यासाठी आपल्याला Wormhole वा तत्सम तंत्रज्ञान साध्य करावेच लागेल. कणभौतिकी शाखेशी संबंधित प्रयोग पृथ्वीवर करून कदाचित आपल्या तंत्रज्ञानाला एक दिशा मिळू शकेल, मात्र स्थूल स्तरावर यासाठी लागणारी यंत्रणा उभारणे  वा या नव्या तंत्रज्ञानाशी संबंधित स्थूलस्तरावरचे प्रत्यक्ष प्रयोग करणे यासाठी आपल्याला पृथ्वीबाह्य, खरंतर सूर्यमालेच्याही बाहेरील प्रयोगशाळेची आवश्यकता भासेल असे वाटते. आणि त्याचे महत्त्वाचे कारण हेच असेल की अशा प्रयोगांसाठी आवश्यक असणारी ऊर्जा आपल्या सूर्यमालेत उपलब्ध करणे किंवा त्यासाठी पृथ्वीच्या आसपास प्रयोग करणे, पृथ्वीच्या सूरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अत्यंत त्रासदायक ठरू शकते.
----

----
तिसर्‍या मांडणीतील विश्वांची प्रचीती घेण्यासाठी आपल्याला पुढीलपैकी प्रत्येक गोष्ट साध्य करणे आवश्यक आहे :

१) त्रिमित मितींपलीकडच्या मितींचे प्रत्यक्ष ज्ञान होणे ,
२) आपल्या मितीतून त्या अनोळखी मितींमध्ये पोहोचणे,
३) तिथे आपले अस्तित्व टिकवून ठेवणे आणि
४) तिथून पुन्हा पृथ्वीशी संपर्क प्रस्थापित करणे

आज या संदर्भात आपण पहिल्या टप्प्यावर अडखळत आहोत. या अडखळत्या सुरुवातीची बीजे String Theory त आहेत.

न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे नियम वैश्विक स्तरावर लागू पडत नाहीत हे लक्षात आल्यावर आईनस्टाईनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताने अनेक प्रश्नांची, त्यातील त्रुटींची  उकल करण्याचा यशस्वी प्रयत्न केला, पण कालांतराने व्यापक सापेक्षता सिद्धांतातील संभाव्य त्रुटी उघड होऊ लागल्या. त्यातील एक मुख्य त्रुटी स्थूल स्तरावरचा व्यापक सापेक्षता सिद्धांत आणि  सूक्ष्म स्तरावरच्या कणभौतिकीचे प्रस्थापित सिद्धांत यांच्या एकत्रीकरणाशी, त्या दोन्ही सिद्धांताना एकाच छत्राखाली आणण्याच्या (Theory of Everything) प्रयत्नांशी संबंधित होती. आयुष्याच्या अंतिम टप्प्यात आईनस्टाईनने यासाठी बरेच प्रयत्न केले असे सांगण्यात येते, ज्यात आपल्या दुर्दैवाने त्याला यश लाभले नाही. या एकत्रीकरणाच्या पहिल्या टप्प्यावरचे  String Theory हे एक अडखळते पाऊल आहे. अडखळते अशासाठी की ते आजही केवळ गणिती स्तरावर आणि अर्थातच कागदावर आहे.  दुसर्‍या शब्दात सांगायचे तर सध्यातरी String Theory ही  परिकल्पना  (परीकल्पना नव्हे :-) )  किंवा गृहीतप्रमेय (Hypothesis) आहे,  सिद्धांत नव्हे.

आपण जेंव्हा कणभौतिकी किंवा पुंजभौतिकी असे म्हणतो, तेंव्हा त्यातून ध्वनित होणारी स्वाभाविक गोष्ट ही आहे की मूलकण हे कणस्वरूपात किंवा ऊर्जेच्या पुंज (सूक्ष्म गुच्छ) स्वरूपात आहेत. String Theory या धारणेस नाकारते.  String Theory च्या गृहीतकानुसार सर्व मूलकण  अतिसूक्ष्म आकाराचे आणि उर्जेपासून बनलेले धागे (रज्जु) आहेत. अतिसूक्ष्मस्तरावर विचार करता, बिंदूसम आणि शून्यमितीय म्हणता येतील अशा मूलकणांकडून, एकमितीय म्हणता येईल अशा रज्जुस्तरावर होणारे  हे सैद्धांतिक स्थित्यंतर आहे.  हे धागे किती सूक्ष्म आहेत याचा केवळ अंदाज म्हणून उदाहरण द्यायचे झाले तर असे म्हणता येईल की अणूचा आकार आपण सूर्यमालेच्या विस्ताराइतका मानला तर या धाग्याचा आकार हा पृथ्वीवरील एखाद्या झाडाप्रमाणे आहे. हे धागे सतत कंपन पावत असतात आणि त्यांच्या कंपनातील विविधतेमुळे, विविध प्रकारचे मूलकण तयार होतात अशी String Theory ची धारणा आहे.  String Theory च्या किमान तीन महत्त्वाच्या आवृत्ती आहेत (त्यातही अनेक पोटभेद आहेत ते वेगळेच) ;  Bosonic Superstring theory (२६ मिती), Superstring theory (१० मिती) आणि M-Theory (११ मिती).  हा विषय अत्यंत क्लिष्ट आहे, स्वतंत्र लेखमालेचा आहे, त्यामुळे जास्त खोलात न जाता Superstring theory मध्ये दहा मिती कशा कल्पिल्या आहेत त्या प्रत्येकी दोन-तीन वाक्यात जरी मांडले तरी याची प्रचीती घेणे किती अवघड आहे ते लक्षात येऊ शकेल.

आपल्या विश्वातील लांबी, रुंदी , उंची (किंवा खोली) आणि काळ या चार मितींपलीकडे इथे आणखी सहा मिती कल्पिल्या आहेत.

पंचमित विश्व ) या मितीमध्ये आपल्या 'चतुर्मितीय' विश्वाशी पहिली फारकत घेतली जाईल आणि ती कदाचित आपल्या विश्वातील विविध भौमितिय संरचनेशी संबंधित असेल. या मितीमध्ये आरंभीची स्थिती समान असूनही वेगळ्या भौमितिय संरचनांमुळे काही काळाने ही विश्वे वेगळ्या कालपथावर जातील.

षड्मित विश्व) या मितीमध्ये पंचमितीय विश्वे आपल्याला एका पंचमितीय प्रतलात अनुभवास येतील. त्यामुळे या मितीत जाणे साध्य झाल्यास कदाचित आपल्याला एका विश्वातून दुसर्‍या समांतर विश्वात जाणे सहज शक्य होईल.

सप्तमित विश्व) या मितीमध्ये असणार्‍या अनेक विश्वांची आरंभीची परिस्थिती वेगळी असेल आणि षड्मित विश्वाचे सर्व गुणधर्म देखील त्यात असतील. यांच्या आरंभापासूनच ही विश्वे आपल्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या घटनांनी आणि काळाने बद्ध असतील.

अष्टमित विश्व) या मितीमध्ये सप्तमितीतील अनेक विश्वे अष्टमितीमधल्या प्रतलात अस्तित्वात असतील. त्यामुळे येथे विविध सप्तमित विश्वात परस्पर संपर्क होऊ शकेल.

नवमित विश्व) या मितीमध्ये अष्टमित विश्वातील सर्व गुणधर्म असतीलच , शिवाय येथील भौतिक नियम सुद्धा आपल्या विश्वापेक्षा भिन्न असतील. वेगळी आरंभस्थिती, वेगळे स्थिरांक, वेगळे भौतिक नियम, वेगळ्या संरचना यामुळे इथे स्थळकाळाची सर्व 'combinations' घडू शकतील.

दशमित विश्व) नवमित प्रतलात असणारी ही विश्वे सर्व संभव घटकांच्या आधारांवर आपापले वेगळे अस्तित्व जपून असतील. आपल्या कल्पनेच्या पलीकडे असलेले हे जग असेल.

वर दिलेल्या यादीतील विश्वातील विविधता आणि गुंतागुंत लक्षात घेतली की सुरूवातीस दिलेल्या चार गोष्टींची प्रचीती घेण्यासाठी आपली बुद्धी,  आपल्याकडे असलेले ज्ञान, विज्ञान  आणि तंत्रज्ञान किती तोकडे आहे आणि आपल्याला किती मोठा पल्ला अजून गाठायचा आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता पडू नये.
----

----
शेवटच्या मांडणीतील विश्वे ही संपूर्णपणे वेगळ्या गणिती संरचनेवर आधारित असतील ही गोष्ट मान्य केल्यास आशा विश्वांची प्रचीती घेणे बहुदा आपल्याला कधीच शक्य होणार नाही हे स्विकारणे आपल्याला जड जाऊ नये. ही विश्वे आपल्यासाठी अप्राप्य आहेत आणि यदाकदाचित अप्राप्याचे केवळ निरीक्षण करण्याचा काही मार्ग असेलच, तर त्यासाठी मानवजातीत इतक्या टोकाची उत्क्रांती घडून यावी लागेल की त्यानंतर जी प्रजाती अस्तित्वात येईल तिला मानव म्हणणे शक्यच नसेल. आधीच्या एका लेखांकात म्हटल्याप्रमाणे आपले प्रत्येक विज्ञान हे गणितात व्यक्त होते आणि 'गणितवृक्षाच्या' अनंत शाखांपैकी एक शाखा आपल्या गणिती संरचनेची आहे.  या शाखेवर उभे राहून, दुसर्‍या शाखेवरचे विश्व कसे असेल किंवा दुसर्‍या शाखेतील गणित कसे असेल याचे निदान करण्याचा, कल्पना करण्याचा कोणताही मार्ग आपल्या गणितीय संरचनेतून निघू शकेल ही शक्यता शून्य आहे. 
----

शनिवार, २२ एप्रिल, २०१७

समांतर विश्वे  - लेखांक ४ / ६


----
(मांडणी - ३) ==> या मांडणीनुसार आपले विश्व हे एकमेव विश्व नाही. आपले विश्व हे एका बाह्यविश्वाचा भाग आहे आणि त्या बाह्यविश्वात अगणित विश्वे आहेत.  यापैकी काही विश्वे ही आपल्या विश्वासारखीच आहेत आणि आपल्या विश्वासोबतच  अस्तित्वात आली आहेत. त्यातील काही विश्वे बर्‍याचशा समान गुणधर्माची आहेत.  समान गुणधर्माच्या विश्वांमध्ये घडणार्‍या अनेक घटना सारख्या असू शकतात , पण त्या समान असतीलच असे नाही.  याउलट आपल्या विश्वासोबतच जन्माला येऊनही,  घटनांच्या व रचनेच्या दृष्टिकोनातून, आपल्या विश्वाशी जराही साधर्म्य नसलेली विश्वेही त्या बाह्यविश्वात असू शकतील. 
----

विश्वाच्या उत्पत्तीचा एक सिद्धांत म्हणून, आपण Big Bang Theory कडे पाहतो. या सिद्धांतानुसार विश्वाची निर्मिती ही एका Singularity मधून झाली.

Singularity म्हणजे काय ?  तर असे स्थान (किंवा वस्तू), जिथे घनता, तापमान, (व गुरुत्वाकर्षण ) हे अनंत आहे, अगणित आहे.  आपल्याला ज्ञात असलेल्या भौतिकशास्त्राचे, सापेक्षतेचे, गणिताचे कोणतेही नियम तिथे लागू पडत नाहीत.  सध्याच्या मान्यतेनुसार कृष्णविवराच्या आत अशी Singularity असते.  

तर या Big Bang Theory मधून निर्माण झालेले जे विश्व आहे, ते आपल्या सध्याच्या क्षमतेनुसार आपल्याला त्रिमित दिसते. (सध्या काळ ही चौथी मिती असल्याची संकल्पना बाजूला ठेवा)  या तीन मितींच्या पलीकडे आणखी मिती असू शकतील, पण आपल्याला त्यांचे पूर्ण ज्ञान आणि भान अजूनतरी आलेले नाही. तीनापेक्षा अधिक मितींची कल्पना करताना आपण नेहेमीच या मिती आपल्या याच विश्वात आहेत, परंतु आपल्या सध्याच्या जाणिवांच्या बाहेर आहेत असे मानतो. पण कदाचित काही आणखी वेगळेच आणि विलक्षण असले तर ?

कल्पना करा की आपले विश्व हे केवळ आणि केवळ त्रिमितच आहे. पण तरीही यापेक्षा कितीतरी अधिक मिती अस्तित्वात आहेत , पण त्या आपल्या विश्वाच्या बाहेर ! .  

समजून घेण्यास सोपे जावे म्हणून आपण असे समजू की आपल्या विश्वाला एक गोलाकार (वर्तुळाकार नव्हे) किंवा अंडाकार असा  त्रिमित 'सीमापरीघ' आहे.  पण आपले विश्व एका बाह्यविश्वात 'तरंगत' आहे.  आपल्या विश्वात जसे अंतराळ आहे, तसेच एका वेगळ्या प्रकारच्या किंवा वेगळ्या मितीत असलेल्या दुसर्‍या  'अंतराळात'  आपले विश्व आहे. अशा प्रकारच्या विश्वाची कल्पना करताना आपल्याला तीनपेक्षा अधिक मिती डोळ्यापुढे आणाव्या लागतात आणि हे निश्चितच अवघड जाते. पण हे साध्य करण्याचा एक सोपा मार्ग आहे, तो आपल्यापेक्षा खालच्या स्तरावरच्या मितीबाबत विचार करण्याचा.

कोणतीही रेषा ही एकमितीय मानली जाते. आता कल्पना करा एका कागदावर अनेक समांतर रेषा ओढलेल्या आहेत. आणि ही सर्व एकमितीय विश्वे आहेत. या प्रत्येक एकमितीय विश्वास, दुसरे एकमितीय विश्व अस्तित्वात असल्याची जाणीवच नाही, कारण ती समांतर आहेत. या दोन एकमितीय विश्वांना जोडण्यासाठी त्या समांतर (विश्वांना) रेषांना  छेदणारी रेषा काढावी लागते.  अर्थात त्या दोन एकमितीय विश्वांना जोडण्यासाठी जो मार्ग आहे, तो द्विमितीय विश्वातून प्रवास करतो.  गंमत अशी आहे की द्विमितीय विश्वातून प्रवास करणारी आणि दोन समांतर विश्वांना जोडणारी ही एकमितीय रेषा म्हणजे वास्तविक आणखी एक एकमितीय विश्व आहे,पण ते या समांतर विश्वांना असमांतर आहे, वेगळ्या पातळीत आहे.  समांतर रेषांना छेदणारी रेषा प्रत्यक्षात त्या रेषांवरील दोन बिंदूंना जोडते. बिंदू हा शून्यमितीय मानला जातो.  

हाच विचार द्विमितीय विश्वांबाबतही करता येईल. एखाद्या घनाकाराच्या (Cube) बाजू असलेली दोन समांतर प्रतले म्हणजे द्विमितीय विश्वे मानली तर त्या द्विमितीय विश्वात राहणार्‍या 'सजीवांना', परस्परांच्या विश्वाची जाणीव नसेल. एका प्रतलातून (द्विमितीय विश्वातून) दुसर्‍या समांतर प्रत
लात (द्विमितीय विश्वात) जाण्यासाठी या प्रतलांना छेदणारे आणि असमांतर असलेले तिसरे प्रतल आवश्यक आहे. तरच एका प्रतलात (द्विमितीय विश्वात) राहणार्‍या द्विमितीय सजीवाला, दुसर्‍या समांतर प्रतलात (द्विमितीय विश्वात) जाता येईल. (हा द्विमितीय सजीव  त्या (बाजूंना) प्रतलांना जोडणार्‍या रेषेवरून प्रवास करू शकत नाही, कारण ती रेषा एकमितीय आहे.)   असमांतर असणारे हे प्रतल जेंव्हा समांतर प्रतलांना छेदते तेंव्हा प्रत्यक्षात ते त्या समांतर विश्वांमधील दोन रेषांना (अर्थात एकमितीय प्रवेशद्वारांना) जोडते.  (सोबतचे चित्र पहा)

एकमितीय विश्वांना जोडणारे प्रवेशद्वार शून्यमितीय आहे, द्विमितीय विश्वांना जोडणारे प्रवेशद्वार हे एकमितीय आहे, हीच संगती आपल्या विश्वास लावल्यास आपण असे म्हणू शकतो, की आपल्याला समांतर असणारे दुसरे त्रिमितीय विश्व असणे शक्य आहे आणि या समांतर अशा त्रिमितीय विश्वाला आपल्याशी जोडण्यासाठी दुसरे असमांतर असणारे, आपल्या त्रिमितीय विश्वाला छेदणारे तिसरे त्रिमितीय विश्व असावे लागेल. आणि या छेदणार्‍या त्रिमितीय विश्वाचे प्रवेशद्वार हे एखादे प्रतल (द्विमितीय) असेल. ज्या क्षणाला आपल्याला असे प्रतल सापडेल किंवा कर्मधर्मसमयोगाने त्याच्याशी आपला संपर्क येईल तेंव्हा आपण त्या दुसर्‍या त्रिमितीय विश्वाशी संपर्क साधू शकू किंवा प्रवास करून तिथे जाऊ शकू.  

जसे द्विमितीय जगात राहणार्‍या एखाद्या सजीवाला, त्रिमितीय जगात राहणार्‍या आपली जाणीव होऊ शकणार नाही,  तद्वत आपल्याला आपल्यापेक्षा अधिक मितीत राहणार्‍या जीवाची जाणीव होऊ शकत नाही.  या विधानाचा व्यत्यासही सत्य असू शकतो. बाहेर असणार्‍या बहुमित अंतराळात राहणार्‍या  'सजीवाला', देखील आपले अस्तित्व माहीत असेलच असे नाही. त्याला आपली जाणीव होऊ शकेलच असे नाही, कारण कदाचित त्यांच्यासाठी आपले विश्व म्हणजे त्यांच्या विश्वातील केवळ एक भूमितीय संरचना असेल. आपल्या विश्वातील एखाद्या बिंदूची, एखाद्या रेषेची, एखाद्या प्रतलाची, आपल्याला जितकी जाणीव असते, तसेच काहीसे स्थान, आपल्या विश्वाचे या बाह्यविश्वात असेल का ? 

आता या पार्श्वभूमीवर, जेंव्हा आपण Big Bang Theory चा विचार करतो तेंव्हा आपण असे म्हणू शकतो की कदाचित त्या बहुमित (बाह्य)विश्वात एकाच वेळेस अनेक Big Bang घडली असतील , आणि त्यामुळे, आपल्यासारखीच असणारी, अनेक विश्वे एकाच वेळेस जन्मास आली असतील. 

एकाच वेळी अनेक Big Bang कसे घडू शकतील असा प्रश्न पडणार्‍यांनी खालील उदाहरण (रूपक) लक्षात घ्यावे. हे देखील अत्यंत समर्पक उदाहरण नव्हे, पण बाह्यविश्वातील उलथापालथीमुळे आपल्यासारखी अनेक विश्वे कशी निर्माण होऊ शकतील हे समजण्यासाठी ते पुरेसे आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवात, क्वचित काही समारंभात प्रेक्षकांना, निमंत्रितांना जमिनीवर बसण्यासाठी,  मोठे जाजम, सतरंजी किंवा ताडपत्री घालण्याचा ज्यांना पूर्वानुभव असेल,  त्यांना त्यावरची धूळ, कचरा झटकण्यासाठी सर्वसाधारणत: काय करतात हे नक्की माहीत असेल.  अशी जाजमे, ताडपत्र्या अतिशय वजनदार असतात त्यामुळे त्यांच्यावरची धूळ झटकण्यासाठी, चौघे जण , चार कोपर्‍यात उभे राहून त्या जाजमाची टोके पकडतात, आणि ते वरखाली जोरात हलवतात, उलटेपालटे करतात.  हे करत असताना ते जड जाजम एकाच वेळी, अनेक ठिकाणी, जमिनीला तात्पुरते टेकते आणि पुन्हा वर उचलले जाते. इथे एकाच वेळी जमिनीवरील अनेक बिंदूंचा, जाजमावरील अनेक बिंदूंना किंवा गाठींना होणारा स्पर्श हे Big Bang च्या आरंभाचे रूपक आहे असे जर मानले, तर ते जाजम हे बाह्यविश्व आहे.  जमिनीला असा स्पर्श घडल्यामुळे त्या जाजमावरच्या, त्या विवक्षित बिंदूचे / गाठींचे आरंभीचे व नंतरचे अस्तित्व व त्यांच्यात घडणारे बदल, म्हणजेच आपले व आपल्यासारखी अनेक विश्वे व त्यात घडणार्‍या घटना. जाजमावरील हे बिंदू एकमेकांच्या जवळ असतील किंवा एकमेकांपासून दूरही असतील, परंतु जसे जाजमावरील एका बिंदुला, दुसर्‍या बिंदूची जाणीव असणे शक्य नाही, तसेच अशा एका विश्वासाठी दुसरे विश्व संपूर्णपणे अनोळखी आहे. जाजमाच्या दृष्टीकोनात जाजमावरील त्या बिंदूंमध्ये / गाठींमध्ये होणारा बदल अत्यंत क्षुल्लक आहे. या बिंदूंना सामावून घेणार्‍या जाजमाचा, ते जाजम हलविणार्‍या व्यक्तींच्या अस्तित्वाचा थांग घेणे हे त्या बिंदूंच्या वा त्या बिंदूंसम असणार्‍या 'विश्वाच्या' क्षमतेच्या पलीकडे आहे.

पाणी उकळत असलेल्या एका पातेल्यात तळाशी निर्माण होऊन वर येऊन फुटणारे असंख्य छोटे बुडबुडे किंवा एका मोठ्या बलूनच्या पेटार्‍यात  बसून अनेक छोटे फुगे फुगवून, त्या बलूनमध्ये सोडून दिले तर जसे दिसेल, तशी काहीशी समांतर विश्वांची कल्पना या मांडणीत आहे.

या मांडणीनुसार आणि वरती नमूद केल्याप्रमाणे, बाह्यविश्वातील, आपले विश्व व आपल्यासारखी काही विश्वे ही एकाच वेळी अस्तित्वात आली आहेत किंवा असतील. त्यातील काही विश्वे, बर्‍याचशा समान गुणधर्माची असतील (आणि काही अतिभिन्नही असतील).  समान गुणधर्माच्या  विश्वांमध्ये घडणार्‍या घटना सारख्या असू शकतात ,पण त्या समान असतीलच असे नाही.  तिथे गणिताचे, विज्ञानातील नियम कदाचित आपल्यासारखेच असतील, पण विविध समीकरणांमध्ये जे स्थिरांक वापरले जातात ते अशा विश्वांमध्ये आपल्यापेक्षा भिन्न असू शकतील. तिथली मूलद्रव्ये वेगळी असू शकतील.  तसेच या विश्वांमध्ये असलेल्या मितीही आपल्यापेक्षा भिन्न प्रकारच्या असू शकतील. उदाहरणार्थ तिथले विश्व कदाचित आपल्यासारखेच त्रिमित असले, तरी त्या विश्वातील त्रिमित जग आणि आपले त्रिमित जग हे एकाच पातळीवर असतीलच असेही नाही.  स्वाभाविकच आपल्या विश्वातून, अशा दुसर्‍या विश्वात जाण्याचा मार्ग,  जोवर आपल्याला सापडत नाही, तोवर त्या विश्वांचे अस्तित्व, आपल्यासाठी 'समांतर' असणार आहे.

या प्रकारच्या समांतर विश्वांमध्ये अनेक प्रकारचे फरक असू शकतात. वर म्हटल्याप्रमाणे हे फरक मितींच्या संख्येत, रचनेत असू शकतीलच, पण अगदी त्रिमित संरचना असलेली दोन विश्वे असली तरी तिथले मूलकण व पर्यायाने मूलद्रव्ये वेगळी असू शकतात, आधीच्या मांडणीत म्हटल्याप्रमाणे त्या विश्वाच्या जन्मानंतरची स्थिती वेगळी असू शकते, शिवाय तिथे लागू होणारे वेगवेगळे स्थिरांक देखील आपल्या विश्वापेक्षा निराळे असू शकतात. अशा परिस्थितीत त्या विश्वाची वाढ आणि प्रगती अगदी भिन्न प्रकाराने होऊ शकते.

--
थोडेसे अवांतर  : 

त्रिमितीतील विश्वासाठी त्यापेक्षा अधिक मितीतील विश्व कसे असते हे डोळ्यासमोर आणण्यासाठी विचार करण्याची आणखी एक (सोपी) पद्धत :  कोणताही बिंदू हा शून्यमितीय मानला जातो. अनेक बिंदू एकापुढे एक ठेवले की रेषा तयार होते जी एकमितीय असते. अनेक रेषा एकास एक समांतर अशा परस्परास चिकटून ठेवल्या की एक प्रतल तयार होते जे द्विमितीय आहे. अनेक प्रतले एकावर एक रचून ठेवली की एक घनाकार तयार होतो जो त्रिमितीय आहे. मग त्रिमितीय विश्वे परस्परांशी संलग्न अशी रचली असतील तर ही रचना (किमान) चतुर्मितीय अवकाशात (बाहयविश्वात) असेल असे म्हणायला हरकत नाही. हे बाह्यविश्व किमान चतुर्मितीय असेल अशासाठी म्हटले आहे की शून्यमितीय बिंदू किंवा एकमितीय रेषा हा/ही त्रिमितीय विश्वातही असू शकते. अर्थात आपले त्रिमितीय विश्व चार पेक्षा अधिक मिती असणार्‍या बाह्यविश्वात असू शकते.

प्रत्यक्षात एका मितीतून दुसर्‍या मितीची कल्पना करण्यासाठी त्या मितीला वक्र अवकाशातून फिरवावे लागते असे मानणारे वैज्ञानिक अधिक आहेत. रेषेने तिच्या एका बिंदुभोवती स्वत:भोवती गिरकी घेतली तर वर्तुळ (द्विमितीय) तयार होईल. पण भोवतीचा अवकाश वक्र असेल तर लंबवर्तुळ. वर्तुळाने अवकाशात एका प्रतलाभोवती  गिरकी घेतली तर गोलाकार तयार होईल आणि वक्र अवकाशात लंबवर्तुळाने गिरकी घेतली तर अंडाकार.  विश्वाचा आकार अंडाकार असावा असे मानणार्‍यांचे तर्कशास्त्र अशा स्वरूपाचे आहे. मग अंडाकार वक्र अवकाशात भ्रमण करेल तर आपल्याला त्यातून चतुर्मितीय विश्वाचा आकार मिळेल का ! ?   .... 
--



----
(मांडणी - ४) ==> आपल्याला ज्ञात असलेल्या वा तत्वत: ज्ञात होऊ शकेल, अशा कोणत्याही वैज्ञानिक संकल्पनेच्या पलीकडे असलेली आणि आपल्याला बहुदा, सदैव अगम्य, असाध्य, अप्राप्य राहतील अशी विश्वे असू शकतील.
----

या मांडणीतही तिसर्‍या मांडणीप्रमाणेच वेगवेगळ्या विश्वांची संकल्पना आहे.  मात्र इथे एक मूलभूत फरक आहे.  विश्वाच्या (खरंतर विश्वांच्या) मांडणीच्या आपल्या संकल्पना या आपल्या ज्ञानाशी, विज्ञानाशी  व त्यांचे स्वरूप स्पष्ट करताना, पर्यायाने आपल्या गणिती, भौतिकी संकल्पनांशी निगडीत आहेत. वर दिलेल्या तीन मांडण्यांची, आपण ज्या ज्या प्रकारे  कल्पना करतो, त्या सर्व आपल्याला ज्ञात असलेल्या गणिताच्या, संरचनेच्या माध्यमातून व्यक्त करतो. पण या मांडणीत आपण जे गृहीतक धरतो आहोत, ते असे आहे की आपल्याला ज्ञात व अज्ञात अशी सर्व विश्वे, आपल्याला उमगू शकणार्‍या  गणिती व अन्य वैज्ञानिक संकल्पनांच्या चौकटीत बसतील किंवा जी चौकट आपल्याला उमगली आहे किंवा भविष्यात आपल्याला  उमगू शकते किंवा निदान त्यांची आपण कल्पना करू शकतो, अशाच चौकटीत ही सर्व विश्वे असतील.

पण या चौकटीच्या संपूर्णपणे पलीकडले, काही अस्तित्वात असेल ही शक्यता का नाकारावी ?  आपण ज्या गणिताची, रचनांची, संरचनांची कधीही कल्पनाही करू शकणार नाही, विज्ञानाचे जे नियम, आपल्या विश्वात कधीही लागू होऊच शकणार नाहीत, त्यावर आधारित एक वा अनेक रचना नसतील असे कसे म्हणावे ?  मानवाच्या वर्तमान व भविष्यातील, तर्कशुद्ध गणिती पद्धतीत बांधता येण्याच्या क्षमतेच्या सीमारेषेच्या पलीकडे असलेली,  आपल्याला सदासर्वकाळ अगम्य राहतील अशी, आपल्याशी  कोणत्याही प्रकारे साधर्म्य नसलेली विश्वे अस्तित्वात नसतीलच, असे आपण ठामपणे म्हणू शकू का ?  अशा प्रकारच्या  विश्वाच्या  गणिती आणि भौतिकी संकल्पना आपण कधीही कागदावर उतरवू शकणार नाही वा सिद्धही करू शकणार नाही. आपल्यासाठी हे विश्व इतके अप्राप्य असेल की या विश्वाशी संपर्क साधण्याचा देखील कोणताही संभाव्य मार्ग नसेल.

Mathematical Democracy या नावाने ओळखली जाणारी एक संकल्पना, आपल्या गणितातील मूलभूत संकल्पनांवरच, सिद्धांतांवरच प्रश्नचिन्ह उभे करते. आपली गणिती समीकरणे आणि सिद्धांत असेच का ? वेगळे का नाहीत ? खरंतर या प्रश्नाला आपल्याकडे समर्पक उत्तर नाही. आपल्याकडे हे असेच आहे असे हतबल उत्तर देऊन आपण सुटका करून घेऊ शकतो, पण तो 'का' मनात बोचत राहतो. त्याचे समाधान करणारे उत्तर आपल्या विश्वात सापडू शकत नाही आणि बहुदा सापडू शकणारही नाही.  ते सापडण्यासाठी आपल्याला संपूर्ण वेगळ्या गणिती आणि वैज्ञानिक संकल्पनांची आवश्यकता भासेल ज्यांची कदाचित आपण कल्पनाही करू शकणार नाही.

आपण आपल्या विश्वाचे वर्णन कशाच्या माध्यमातून करतो तर याचे खरेखुरे उत्तर आहे गणिती भाषेत, गणिती संरचनेतून.  कोणत्याही शास्त्राच्या तळाशी आपल्याला गणितच दिसेल. अगदी अचूकपणे सांगायचे झाले तर गणिताची वेगवेगळी रुपे दिसतील. काही वेळा हे गणित अतिशय  बाळबोध असेल तर काही वेळा अतिशय जटिल, किचकट. गणिताची ही विविध रुपे आपण सुसूत्रपणे एकत्र बांधण्याचा प्रयत्न केला तर एक गणिती संरचना त्यातून निपजेल, जिच्यावर आपल्या सर्व शास्त्रांचा आणि पर्यायाने विश्वाच्या आकलनाचा पसारा उभा आहे. पण ही गणिती संरचना परिपूर्ण आहे का ? याचे उत्तर बहुदा नाही असे असावे. आपण कृष्णविवराची शक्यता या गणिती संरचनेत वर्तवू शकतो, मग कृष्णविवराच्या अंतर्भागात असलेल्या परिस्थितीला आपण आपल्या गणितातून व्यक्त करू शकू का ? याचे उत्तर नाही असे आहे.  आपण तत्वत: ही गोष्ट स्वीकारली आहे कि तीनापेक्षा अधिक मिती असू शकतील, मग या मितीतील अवकाश व तिथले नियम आपण आपल्या गणिती संरचनेत बसवू शकू का ?याचेही उत्तरही नाही असेच येईल. थोडक्यात आपल्या ज्ञात विश्वातही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या गणिती संरचनेतून व्यक्त करता येत नाहीत. याचाच दुसरा अर्थ असा की, आपली गणिती संरचना दुसर्‍या अधिक मोठ्या गणिती संरचनेची केवळ एक शाखा आहे. म्हणजेच  दुसर्‍या अशा अनेक गणिती संरचनेच्या शाखा असू शकतील की ज्या आपल्या गणिती संरचनेपेक्षा प्रचंड वेगळ्या असतील. स्वाभाविकच या संरचनेला पाया ठेवून निर्माण झालेली अनेक अगम्य विश्वे याआधीच अस्तित्वात आली असू शकतात. या विश्वांना आपल्या गणिती संरचनेत बसवता येणार नाही वा व्यक्त करता येणार नाही. खर्‍याखुर्‍या अर्थाने ही विश्वे आपल्याला सदैव समांतर राहतील.

=========