मंगळवार, २ मे, २०१७

समांतर विश्वे - लेखांक ६ / ६


या लेखांकात मी केवळ समांतर विश्वांशी संबंधित काही गोष्टींना केवळ स्पर्श करत आहे. 

कालप्रवास
----------
जर समांतर विश्वे खरी आहेत असे मानायचे असेल तर कालप्रवास कसा शक्य होईल ? भविष्यकाळात आपण नक्की कुठल्या समांतर विश्वात जाऊ ? प्रश्न स्वाभाविक आहे, पण मूळात समांतर विश्वाच्या MWI मांडणीतच याचे  उत्तर आहे. MWI चे एकाचवेळी अस्तित्व केंव्हा शक्य होईल, जेंव्हा काळाचे त्या घटनेपुरते विविध मार्ग असतील तर. Timeline या शब्दाने व्यक्त होणारा काळ हा एखाद्या विविध शाखा-उपशाखा-उपोपशाखांनी.... बहरलेल्या वृक्षासारखा आहे, एका सरळ रेषेतील अक्षासारखा नाही. या मांडणीप्रमाणे भविष्यकाळाच्या दिशेने कालप्रवास झाल्यास, काळाच्या अनेक शाखांपैकी, एका शाखेवर प्रवास होईल आणि परत येणे शक्य झाल्यास, त्याच आरंभस्थानी पुन्हा परत येणे होऊ शकेल.  मात्र जर भूतकाळात प्रवास झाला आणि तिथे एखाद्या निर्णायक घटनेत बदल झाला तर आरंभस्थानी परतणे शक्य होईलच असे नाही. त्याऐवजी परत येताना, त्या आरंभबिंदूपासून निघणार्‍या दुसर्‍या एखाद्या शाखेत प्रवेश होईल.
--

वास्तव - अवास्तव
----------------
समांतर विश्वाशी संबंधित सर्व मांडणींमध्ये, मांडणी - १ ही मूळातूनच 'वास्तव म्हणजे नक्की काय ?' हा प्रश्न उपस्थित करते. जर एखाद्या घटनेमुळे एका व्यक्तीच्या आणि तिच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक गोष्टीच्या, व्यक्तीच्या अनेक प्रती निर्माण होत असतील, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील, प्रत्येक बहुपर्यायी निर्णयांचा विचार करता त्याच व्यक्तीच्या असंख्य प्रती एकाच वेळी अस्तित्वात आहेत हे उघड आहे. मग यातील कोणते विश्व खरे ?   'त्या व्यक्तीच्या, त्या त्या प्रतीपुरते तिला लाभलेले विश्व खरे; हे यथार्थ उत्तर आहे की सर्वच विश्वे खरी किंवा सर्वच विश्वे खोटी हे सुयोग्य उत्तर आहे ? 

आपल्या तत्वज्ञानातील, मायावादाशी काहीशी जवळीक साधणारी ही मांडणी आहे.  विविध मार्गाने, विविध स्तरावर,  'हे जग म्हणजे माया आहे' हे दर्शविणारे, समजवणारे, जे अनेक वैदिक, पौराणिक आणि अर्वाचीन संदर्भ आपल्या वाचनात येतात, कानावर पडतात, त्यातून निघणारा मथितार्थ हेच सांगतो की हे विश्व जसे दिसते आहे, भासते आहे,  तसे ते नाही आहे.

Matrix मधील 'Do not try and bend the spoon, that's impossible. Instead, only try to realize the truth...there is no spoon' हा संवाद त्याच दिशेने अंगुलिंनिर्देश करणारा आहे.  आपण ज्याला वास्तव मानतो ते वास्तव नव्हे.  एका विश्वात वास्तव असणारी, भासणारी गोष्ट, दुसर्‍या विश्वात अवास्तव असेल ही शक्यता अधिक आहे पण तरीही ती कदाचित तशीही नसली तर ?  प्रत्यक्ष स्थिती, वास्तव कदाचित काही भलतेच की, ज्याचा थांग लागणे, लावणे सोपे नाही असे असले तर ?   दिसते ते वास्तव नसावे, याच अर्थ Matrix मध्ये दाखविले आहे तसे असावे असेही नव्हे. एखाद्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह उभे केले की त्याचा अर्थ एखाद्या कलात्मक अविष्कारात कल्पिलेली गोष्ट सत्य असावी असे नव्हे.  काहीवेळा कल्पित प्रत्यक्षात उतरले आहे हे मान्य करूनही, स्वत:च्या सामर्थ्याला नाकारणारे असे काहीही मानवजात चटकन मान्य करत नाही.
--


धार्मिक ग्रंथातील उल्लेख :
----------------------
आपल्या धार्मिक ग्रंथांतून समांतर विश्वांसंबंधी जे मोजके उल्लेख आढळतात. त्यातील योगवासिष्ठातील उल्लेख सोडले तर बाकी सर्व उल्लेख त्रोटक आहेत. त्यांचे वर्णन आजच्या संकल्पनांशी हुबेहूब जुळणारे नाही, काही ठिकाणी मांडणी क्रमांक ३ शी त्यातील काही गोष्टी जुळतात, तर काही ठिकाणी मांडणी २ शी.

श्रीमद्‌भागवत पुराणातील पुढील उल्लेख पहा :

सहावा स्कंध, अध्याय सोळावा 
------------------------------------
क्षित्यादिभिरेष किलावृतः   (क्षिति आदिभि: एष किल आवृत्त:  )
सप्तभिर्दशगुणोत्तरैरण्डकोशः ।    (सप्तभि दश गुणोत्तरै: अण्डकोशः)
यत्र पतत्यणुकल्पः   (यत्र पतति अणुकल्पः)
सहाण्डकोटिकोटिभिस्तदनन्तः ॥ ३७ ॥  (सह अण्ड कोटिकोटिभि: तद अनन्तः)
पृथ्वी इत्यादी एकापेक्षा एक दहापट, सात आवरणांनी घेरलेला हा जो ब्रह्मांडकोष आहे, तो आपल्याप्रमाणेच दुसर्‍या कोटयवधी ब्रह्मांडांसह आपल्यामध्ये एका परमाणूप्रमाणे फिरत राहतो आणि असे असूनसुद्धा त्याला आपला अंत लागत नाही.   ||३७||


द्वितीय स्कंध, अध्याय दहावा 
-----------------------
पुरुषोऽण्डं विनिर्भिद्य यदाऽसौ स विनिर्गतः ।       (पुरुष: अण्डं विनिर्भिद्य यदा असौ स विनिर्गतः)
आत्मनोऽयनमन्विच्छन् अपः अस्राक्षीच्छुचिः शुचीः ॥ १० ॥ (आत्मनो अयनम अन्विच्छन् अपः अस्राक्षीत् शुचिः शुचीः)
तास्ववात्सीत् स्वसृष्टासु सहस्रं परिवत्सरान् ।  (तासु अवात्सीत् स्वसृष्टासु सहस्रं परिवत्सरान्)
तेन नारायणो नाम यदापः पुरुषोद्‍भवाः ॥ ११ ॥  (तेन नारायण: नाम यदापः पुरुषोद्‍भवाः)
जेव्हा हा निर्मल पुरुष अण्ड (ब्रह्मांड) फोडून बाहेर पडला, तो आपल्या स्थानाला इच्छिणारा निर्मळ उदकाला उत्पन्न करिता झाला. ॥१०॥
स्वतः उत्पन्न केलेल्या त्या उदकांत हजारो वर्षेपर्यंत वास करिता झाला. ज्या अर्थी (ते उदक) पुरुषापासून उत्पन्न झालेले त्या अर्थी नारायण नावाचा झाला. ॥११॥

अकरावा स्कंध, अध्याय सोळावा
---------------------------
सङ्ख्यानं परमाणूनां कालेन क्रियते मया ।
 न तथा मे विभूतीनां सृजतोऽण्डानि कोटिशः ॥ ३९ ॥   (न तथा मे विभूतीनां सृजत: अण्डानि कोटिशः )
कालसाह्याने परमाणूंची संख्या करिता येते, कोट्यवधि अंडी (ब्रह्मांडे) उत्पन्न करणार्‍या मला (देखील) (माझ्या) विभूतींची (वरील प्रकारची गणना करता येत नाही. )

----
ब्रह्मवैवर्त पुराणातही यासंदर्भात उल्लेख आहे असे वाचण्यात आले,पण तो श्लोक मिळू शकला नसल्याने त्यासंबंधी इथे उल्लेख केला नाही आहे.
----

योगवासिष्ठ
---------
योगवासिष्ठात समांतर विश्वांसंबंधीचे संदर्भ कथांच्या, आख्यानांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकाराने येतात आणि काही प्रमाणात मायावादाला पुष्टी देतात. या उल्लेखांमध्ये आत्मा, पुनर्जन्म, स्वप्ने आदि इतर संकल्पनादेखील मिसळल्या गेल्या आहेत.  लिला आख्यान,  विश्वस्थिती प्रकरण , काकभुशुंडीचे आख्यान, विपश्चित कथा  ही त्यातील काही प्रमुख उदाहरणे.

----


फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून
-------------------------
समांतर विश्व कोणत्याही प्रकारचे असो, एक गोष्ट बर्‍यापैकी निश्चितपणे म्हणता येईल की एखाद्या व्यक्तीच्या जन्मापासूनच्या त्याच्या आयुष्यातील घटना, त्याच्या कोणत्याही समांतर आवृत्तीशी एका ठराविक काळापर्यंत तंतोतंत जुळतील आणि त्यानंतर मात्र त्या वेगळ्या होत जातील. वरवर हे विधान, नियतीने सर्व काही ठरवून ठेवले आहे आणि ते तसेच घडते या समजुतीला छेद देणारे आहे असे वाटेल, पण ते तसे नाही. ज्या जागी या समांतर आवृत्तींची आयुष्ये भिन्न होतील तो क्षण प्रत्यक्षात त्या व्यक्तीच्या स्वयंनिर्णयाचा क्षण असेल. त्या स्वयंनिर्णयाची जर चार उत्तरे संभव असतील तर त्या व्यक्तीच्या असलेल्या काही आवृत्ती त्यातील एक मार्ग निवडतील, काही दुसरा, काही तिसरा आणि काही चौथा. नियतीने एखाद्या घटनेचा एक आणि एकमेव मार्ग ठरवून ठेवलेला असतो, हे विधान सरसकट योग्य नसावे.  हे शक्य आहे की अनेक आवृत्तींसाठी, कदाचित आरंभबिंदू आणि अंतिमबिंदू एकच असेल, मात्र त्या दरम्यानचा मार्ग वेगवेगळा असू शकतो.

फलज्योतिषाच्या दृष्टिकोनातून जेंव्हा एखाद्या जन्मपत्रिकेत, एखाद्या घटनेचा विचार केला जातो, तेंव्हा त्या घटनेचे एकमेव उत्तर खरंच मिळते का  ?  किंवा खरंतर हा प्रश्न असा विचारायला हवा की एखाद्या घटनेचे (फलज्योतिषीय) भाकीत एकमेव असते का ?
उदाहरण म्हणून आपण मृत्यूचा विचार करू कारण लौकिकार्थाने, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात केवळ एकदाच घडणारी अशी ती घटना आहे.  पारंपारिक वा कृष्णमूर्ती या दोन्ही पद्धतीच्या अभ्यासकांनी प्रामाणिकपणे विचार करावा की एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेवरून, त्या व्यक्तीला,  मृत्यू कसा येईल, कधी येईल, कोणत्या परिस्थितीत येईल, कुणामुळे वा निश्चित कोणत्या कारणामुळे येईल, या सर्व प्रश्नांचे केवळ एक आणि एकमेव उत्तर, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत देणे आपल्याला शक्य आहे का ?  आणि समजा तसे उत्तर एखाद्या अभ्यासकाने दिले, तर प्रत्येक वेळी ते पूर्णांशाने बरोबर येते का किंवा ते तसे येईलच असे ठाम प्रतिपादन तो अभ्यासक करू शकेल का ?

माझा फलज्योतिषाच्या अभ्यासादरम्यान मला अनेकदा असे वाटले आहे की जन्मपत्रिकेवरून, प्रत्येक घटनेसंबंधीच्या भाकिताची एकापेक्षा अनेक उत्तरे येतात. किंबहुना जन्मपत्रिकेवरून कुठल्याही एका पैलूचा फलज्योतिषदृष्ट्या विचार करताना, त्या पैलूबाबत घडू शकतील, अशा घटनांच्या समुच्चयातील प्रत्येक घटनेची केवळ संभाव्यता दर्शविली जाते आणि बर्‍याचदा (पण नेहेमी नव्हे) त्यातील ज्या घटनेची संभाव्यता सर्वात जास्त असते, ती घटना  घडताना आढळते. या घटनासमुच्चयातील प्रत्येक घटनेची संभाव्यता कशी निश्चित  करावी, अर्थात फलित कसे वर्तवावे, याचे आडाखे आणि पद्धत ही ज्याची त्याची स्वतंत्र असते. (दुर्दैवाने :-)  कुठल्याही भाकीतात, फलज्योतिष्याच्या अनुभवाचे, ज्ञानाचे, विचारप्रक्रियेचे रंग मिसळतात ) ;  पण तरी कोणताही (फल)ज्योतिषी, जन्मपत्रिकेवरून वर्तविलेली माझी सर्वच्या सर्व भाकिते योग्य येतात असा दावा करेल आणि तसे सिद्ध करून दाखवू शकेल असे वाटत नाही.  कारण कुणाही  व्यक्तीच्या जन्मपत्रिकेबाबत, जेंव्हा एखादे भाकीत वर्तविले जाते, तेंव्हा त्यात हा विचार फार कमी वेळा केला जातो की स्वेच्छानिर्णयाचा अधिकार अंतिमत: त्याच व्यक्तीच्या हातात असतो. (कर्मण्येवाधिकारस्ते.... हा श्लोक एकाप्रकारे हेच सांगतो. नाही का ?)  त्या स्वेच्छानिर्णयाला प्रत्यक्षात आणण्याची क्षमता मात्र, प्रत्येक व्यक्तीची वेगवेगळी असते. ही क्षमता कदाचित धार्मिक वा तत्सम उपायाने वाढतही असेल किंवा लाभदायक निर्णय घेण्याची संभाव्यता वाढविण्यासाठी असे काही उपाय साह्यभूतही ठरत असतील, पण अंतिमत:  ती व्यक्ती परिस्थितीला शरण जाईल की परिस्थितीवर मात करेल अथवा नक्की कोणती घटना प्रत्यक्ष घडेल,  हे त्या व्यक्तीच्या स्वेच्छानिर्णयाच्या शक्तीवर आणि जन्मपत्रिकेतील घटनासमुच्चयाच्या संभाव्यतांवर एकत्रितरित्या अवलंबून असते, असे म्हटले तर ते अधिक उचित ठरेल असे मला वाटते.

एखादा ज्ञानी ज्योतिषी, जेंव्हा एखाद्या व्यक्तीच्या जन्मपत्रिकेचा व्यवस्थित अभ्यास करून, एखादे तर्कशुद्ध भाकीत वर्तवितो आणि तरीही ते चुकते, या गोष्टीचा समांतर विश्वांच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर ही शक्यता निर्विवाद आहे की, ते भाकीत केवळ या विश्वापुरते चुकलेले असते; त्या घटनेमुळे जी समांतर विश्वे निर्माण झाली असतील, त्यातील एखाद्या समांतर विश्वात ते भाकीत सत्य ठरले असेलही.
----


स्वप्ने
------
योगवासिष्ठात एका ठिकाणी स्वप्नसृष्टीच्या अस्तित्वाला, एखाद्या समांतर विश्वाप्रमाणे अधोरेखित केले आहे. आजच्या काळातही, आपल्याला पडणारी स्वप्ने, ही समांतर विश्वाशी संपर्क साधला जाण्याचे क्षण असतात असे मानणारा एक वर्ग आहे.  पण त्यात काही तथ्य असावे असे आजच्या विज्ञानास वाटत नाही. स्वप्ने ही मज्जासंस्थेमधल्या अनियंत्रित संवादाचे, निरुद्धेश परिणाम आहेत असे आजचे विज्ञान मानते.  स्वप्नाचे परिणाम क्वचित शरीरावर राहतात यामागे काही वेगळे कारण असावे असे सांगितले जाते. स्वप्नांमध्ये दिसणारे जग हे आपल्या त्यासमयीच्या आकलनशक्तीसाठी सत्य असू शकते, पण म्हणून ते समांतर विश्व आहे असे मानण्याचे काही ठोस कारण आहे का ? असल्यास अजूनतरी ते सापडलेले नाही.
----

----
समांतर विश्वांच्या अस्तित्वाचा एकही पुरावा नसताना हे सिद्धांत का मांडले जातात आणि त्यावर इतका ऊहापोह का होतो हा स्वाभाविकपणे पडणारा प्रश्न.
आणि याचे मूळ बहुदा अनेक गोष्टींमध्ये असावे.
ते सृष्टीला जाणून घेण्याच्या, मानवाच्या अविरत अतृप्त असलेल्या जिज्ञासेत असावे,
आपल्यासारखे आणखी कुणी आहे का की आपण एकमेव आहोत हे जाणून घेण्याच्या निरंतर प्रयत्नात असावे,
कदाचित आपण राहतो ती पृथ्वी उद्या राहण्याजोगी न राहिल्यास पृथ्वीसदृश वसतिस्थान आपल्याला लाभू शकेल का या शोधात असावे आणि
मानवाला त्याच्या बुद्धीच्या असणार्‍या, वाटणार्‍या सुप्त अहंकारातही असावे.

पण या सर्वांपलीकडे मला सदैव असे वाटत आले आहे की, अगदी आदिम काळापासून, सृष्टीचे रहस्य जाणून घेण्याच्या प्रयत्नांची दिशा, ही खरंतर विश्वाच्या निर्मात्याला शोधण्यासाठी आहे. अनेक वैज्ञानिक ही गोष्ट कधीही मान्य करणार नाहीत, अनेक नास्तिक या गोष्टीला थेट धुडकावून लावतील, पण एक गोष्ट कदाचित त्यांच्या मनातही कुठेतरी खोलवर डाचत असावी की  वैज्ञानिक प्रगतीचे नवनवीन टप्पे पार केल्यानंतरही, सृष्टीनिर्माता कोण आहे ? सृष्टीनिर्मितीमागचा हेतू काय ? हे प्रश्न विज्ञानासाठी सदैव अनुत्तरित राहिले आहेत. या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा जितका प्रयत्न झाला, तितका हा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा होत गेलेला दिसतो.  सूक्ष्माचा शोध घेताना अणू स्तरावरून, अणुकणांच्या, मूलकणांच्या स्तरावर पोहोचलेल्या
प्रवासास, आता String Theory चे नवीन लक्ष्य खुणावत आहे; तर अगम्य असणार्‍या अवकाशातील अनेक घटकांचे, अवकाशीय वस्तूंचे ज्ञान मिळवण्याची क्षमता प्राप्त केल्यावरसुद्धा, मानवाला वाकुल्या दाखवत, अवकाशीय आव्हानांचे क्षितिज अधिकाधिक विस्तारतच आहे. दृश्यमान अवकाशाच्या सीमेपलीकडे काय आहे या प्रश्नाचा मागोवा घेण्याचे, यांत्रिक सामर्थ्य थिटे पडल्यावर, ही समस्या कागदावर सोडविण्याचा प्रयत्न व्हावा आणि त्या अनुषंगाने कल्पनांच्या विमानांची उड्डाणे व्हावीत, बुद्धीने गृहीतकांचा आसरा घ्यावा आणि जर तर ची समीकरणे मांडावीत, ही गोष्ट मानवी बुद्धीच्या मूलप्रवृत्तीला धरून आहे. अथक प्रयत्नानंतरही विहित चौकटीत प्रश्न सुटत नसला की त्या प्रश्नासाठी चौकट मोडायची तयारी दाखवावी लागते. ज्यांना अशी तयारी दाखवायची नसते ते एकतर पळवाटांचा आधार घेतात किंवा प्रयत्न थांबवतात.  ज्यांची चौकट मोडायची तयारी असते, पण चौकटीच्या पलीकडे कसे जायचे हे उमजत नाही, ते कल्पनेच्या भरार्‍या मारतात.  समांतर विश्वांचा सिद्धांत आणि त्यानुसार त्याची वेगवेगळ्या प्रकारे झालेली मांडणी, ही  कुंठित झालेल्या अशाच एका टप्प्यावरचा खटाटोप आहे. कदाचित या खटाटोपातून काहीतरी, कधीतरी खुणावेल आणि आव्हानांच्या, समस्यांच्या नवीन पोतड्या उघडतील किंवा कदाचित आईनस्टाईन प्रमाणे कुणी असामान्य प्रज्ञावंत आत्तापर्यंतच्या ज्ञानाला खुजे ठरविणारे, काहीतरी अनपेक्षित असे, जगासमोर मांडेल आणि हाच खेळ नव्याने पुढे चालू राहील. 


एखादी वैज्ञानिक समस्या जेंव्हा दीर्घकाळ सुटत नाही, तेंव्हा त्यातील मुख्य अडथळा, हा मानवी देहाच्या आणि त्याने जन्मास घातलेल्या यंत्रांच्या अपुर्‍या क्षमतांचा असण्याची दाट शक्यता असते. यंत्रांची क्षमता किती वाढवता येईल याला मर्यादा आहेत आणि भविष्यातही राहतील. त्या कधी आर्थिक असतील, कधी उर्जास्त्रोताच्या असतील, कधी आकारमानाच्या असतील तर कधी अभियांत्रिकी. पण आपल्या क्षमता मर्यादित आहेत ही गोष्ट नाकारण्याकडे आधुनिक विज्ञानाची प्रवृत्ती राहिली आहे. निरंतर आणि वेगाने झालेल्या प्रगतीमुळे, नवीन लक्ष्य दृष्टीपथात दिसू लागले की स्वत:च्या गृहीतकांविषयी, सिद्धांताविषयी विज्ञान अधिकाधिक कर्मठ होत जाते आणि प्रस्थापित चौकट मोडू पाहणारी कोणतीही नवीन गोष्ट नाकारण्याकडे त्याचा कल राहतो. शारीरिक वा यांत्रिक उत्क्रांतीपेक्षा मनाची उत्क्रांती अधिक वेगाने होऊ शकते. पण त्यासाठी रूढ चौकट विस्तारावी लागेल आणि ते शक्य होत नाही, हेच कदाचित गहन समस्या न सुटण्याचे कारण असावे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा