रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

कालकुपी - ५ / ५

भविष्यात कालकुपी सापडूनही, तिचा योग्य उपयोग होऊ शकेल याची जराही शाश्वती नसताना मानवाने आज हा खटाटोप करावा का ?  मूळात आपल्याला सापडलेले सर्व ज्ञान, भविष्यातील संस्कृतीस सहज मिळावे आणि त्यांची वेगाने प्रगती व्हावी असे आपल्याला का वाटते ?  किंवा का वाटावे ? अशा प्रकारे भविष्यातील त्या संस्कृतीच्या प्रगतीचे Fast Tracking करून, त्यांना तंत्रज्ञानाचा Crash Course देऊन, एका अर्थाने आपण, त्या भविष्यातील संस्कृतीचा वेगाने नाश होण्याची बीजे तर रोवत नाही ना ?  कुठलीही संस्कृती टिकण्याचा, विकसित होण्याचा निसर्गाने नेमून दिलेला मार्ग टाळून,  आपण त्यांना जो शॉर्टकट देऊ पाहात आहोत, तो खरंच योग्य ठरेल ना ? ---- मागील भागावरून पुढे ----

आपले संपूर्ण आणि सर्व प्रकारचे ज्ञान साठविण्याच्या आणि हस्तांतरीत करण्याच्या काही अभिनव पद्धतींवर देखील संशोधन सुरू आहे. त्यात

१) कृत्रिम DNA चा वापर करून त्यांच्यामध्ये ज्ञान साठविणे आणि कालांतराने ते पुन्हा उपलब्ध करता येणे. https://en.wikipedia.org/wiki/DNA_digital_data_storage

२) वनस्पतींचा ज्ञानसंचयासाठी उपयोग करणे
https://en.wikipedia.org/wiki/Plant-based_digital_data_storage

३) मानवी मेंदूचा वापर करून कृत्रिम पद्धतीने त्यात ज्ञान साठविण्याच्या पद्धती विकसित करणे
http://www.sciencealert.com/scientists-build-an-artificial-neuron-that-fully-mimics-a-human-brain-cell

या आणि अशा प्रकारच्या प्रचंड गुंतागुंतीच्या प्रकल्पांचा समावेश आहे. या प्रकल्पांमध्ये विलक्षण यश मिळाल्यास, निकटच्या भविष्यात,  कालकुपीची
निर्मिती, मुद्दामहून करण्याची कदाचित आवश्यकताच राहणार नाही.  कृत्रिम DNA चे मानवामध्ये, इतर प्राण्यांमध्ये रोपण करणे आणि पुनरुत्पादनाच्या माध्यमातून त्या DNA मधील ज्ञान, पुढच्या पिढीकडे हस्तांतरीत होत राहणे हा टप्पा देखील गाठला जाऊ शकतो. कदाचित एखाद्या वनस्पतीच्या बीजामध्ये रोपण केलेले ज्ञान सूर्यमालेत सर्वत्र 'रुजू' शकते.  मानवी मेंदूंचे नेटवर्क तयार करून,आवश्यकता असेल त्याप्रमाणे त्या ज्ञानाची देवाण-घेवाण होऊ शकते किंवा आपत्कालीन परिस्थितीत, एका मेंदूतील ज्ञान, विशिष्ट ठिकाणी साठविण्याची व्यवस्था देखील निर्माण केली जाऊ शकते.

प्रचंड मोठा प्रवास  करून आपण उत्क्रांतीच्या या टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे ज्ञानाची, विज्ञानाची, तंत्रज्ञानाची नवनवी आव्हाने आपल्याला खुणावत आहेत. अशा वेळेस एखाद्या आकस्मिक संकटामुळे, Extinction Event मुळे उत्क्रांतीच्या शिडीवर, पुन्हा पहिल्या पायरीपासून आरंभ करावा लागू नये ही इच्छा चुकीची नव्हे.  आपली संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान जपण्याचे, टिकवण्याचे प्रयत्न, प्रत्येक वेळेस नैतिकतेच्या तराजूत तोलले पाहिजेत असे नाही, हे काही प्रमाणात खरे आहे, पण त्याचवेळी 'आपण खरंच शून्यातून सुरुवात केली आहे का' याचा मागोवा घेणे देखील तितकेच आवश्यक आहे.

====

आत्तापर्यंतच्या लेखातून, कालकुपीच्या विविध पैलूंचा, त्यामधील संभाव्य वस्तूंचा आढावा घेताना, कुठेतरी एक धागा प्राचीन संस्कृतीच्या ज्या काही पाऊलखुणा जपल्या गेल्या आहेत, सापडल्या आहेत, तिथे जाऊन मिळतो असे म्हटले तर ते चूक नव्हे. प्राचीन संस्कृतींनी त्यांचा इतिहास दगडाच्या, काहीवेळा धातूच्या माध्यमातून अधिक जपलेला दिसतो.  अनेक प्राचीन संस्कृतीशी निगडीत कथांमध्ये उल्लेख असलेल्या 'चमत्कारांच्या',  वैज्ञानिक प्रगतीच्या, असंख्य खुणा दिसतात. पण त्या वैज्ञानिक प्रगतीचे, तंत्रज्ञानाचे आपल्याला अपेक्षित असलेले नमुने, लिखाण आढळत नाही याचे नक्की काय कारण असावे ?

आधीच्या लेखांकांमध्ये उल्लेख केल्याप्रमाणे ते तंत्रज्ञान अतिशय सुरक्षित पद्धतीने दडवून ठेवले असावे आणि अजूनही आपल्याला ते सापडलेलेच नाही ?
की अशा एखाद्या सांकेतिक भाषेत, कूटपद्धतीने लिहिले असावे की ते कुणाच्या हातात पडले तरी सहजतेने उमजू नये  ? 
की अशा तंत्रज्ञानाचे  हस्तांतरण योग्य नाही असे वाटल्यामुळे, प्राचीन संस्कृतींनी  त्याची जपणूक जाणीवपूर्वक केली नसावी ?
की परकीय आक्रमणे, युद्ध, नैसर्गिक संकटे झेलताना ते नष्ट झाले असावे ?
की ज्यांच्या हातात ते पडले त्यांनी  केवळ त्यांच्या स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला असावा ?
की विविध शासनयंत्रणेतील किंवा  व्यापारीवृत्तीच्या ठराविक वर्गाच्या हातात त्याची सूत्रे असावीत ?
आधीच्या लेखांकात विचार केल्याप्रमाणे आपण आज जी कालकुपी जतन करू पाहात आहोत ती भविष्यात योग्य हातात पडून, आपल्याला अपेक्षित असलेल्या प्रगतीचा पाया म्हणून, त्यावेळेच्या संस्कृतीच्या वर्धनासाठी, कल्याणासाठी तिचा उपयोग केला जाईल याची खात्री आज आपण कशी देणार ?  भविष्यात ज्या  व्यक्तीच्या,समूहाच्या हातात ती कालकुपी लागेल, ती व्यक्ती, तो समूह त्या संस्कृतीच्या भल्यासाठी त्या कालकुपीचा वापर करेल हेच कशावरून मानावे ?

असेही घडू शकते की, की अशी एखादी प्राचीन संस्कृती (म्हणजे आपण) होती हे उघडकीस येणे, त्या भविष्यकाळातील संस्कृतीतील, सत्तापदांवर बसलेल्या व्यक्तींना नकोसे वाटेल.

भविष्यात कालकुपी सापडूनही, तिचा योग्य उपयोग होऊ शकेल याची जराही शाश्वती नसताना मानवाने आज हा खटाटोप करावा का ?  मूळात आपल्याला सापडलेले सर्व ज्ञान, भविष्यातील संस्कृतीस सहज मिळावे आणि त्यांची वेगाने प्रगती व्हावी असे आपल्याला का वाटते ?  किंवा का वाटावे ? अशा प्रकारे भविष्यातील त्या संस्कृतीच्या प्रगतीचे Fast Tracking करून, त्यांना तंत्रज्ञानाचा Crash Course देऊन, एका अर्थाने आपण, त्या भविष्यातील संस्कृतीचा वेगाने नाश होण्याची बीजे तर रोवत नाही ना ?  कुठलीही संस्कृती टिकण्याचा, विकसित होण्याचा निसर्गाने नेमून दिलेला मार्ग टाळून,  आपण त्यांना जो शॉर्टकट देऊ पाहात आहोत तो खरंच योग्य ठरेल ना ?

थोडा नकारात्मक पद्धतीने विचार केला असता,  कालकुपीच्या निर्दिष्ट उद्देशांचे जसे लाभ आहेत, तसेच काही तोटेही उद्भवू शकतात हे सहज लक्षात येईल.

====

प्राचीन संस्कृतीच्या पाऊलखुणा आणि कालकुपी यांचा संबंध जोडण्याचे काही प्रयत्न झाले असल्यास, ते पूर्णत: उघड झालेले नाहीत.  'प्राचीन ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान सापडल्यामुळे आजच्या वैज्ञानिक प्रगतीला प्रचंड मोठा रेटा मिळाला; असे घडले असल्यास, त्याबद्दल फारसे काही लिहिले गेलेले नाही. याचा अर्थ तसे घडलेच नसावे असे नाही. तसे काही विशेष सापडले असल्यास, त्याला जगासमोर न येऊ देण्याइतपत शासन यंत्रणा नक्कीच प्रभावी होत्या आणि यापुढेही राहतील.  कुणीही कितीही काही म्हणो, ज्ञान सर्वांसाठी खुले असण्याचा दावा करो, 'इदम्‌ अथर्वशीर्षम्‌ अशिष्याय न देयम्‌' चे विविध प्रयोग, विविध क्षेत्रात, विविध स्तरावर, विविध हेतू मनात ठेवून,  विविध प्रकारांनी होत राहिले आहेत आणि भविष्यातही होत राहतील. 

प्राचीन संस्कृतीने पृथ्वीवर कालकुपीच्या माध्यमातून काही 'तंत्रखुणा' ठेवल्या असल्यास, त्या उत्खननात उघड होऊ शकतात, पण त्यासाठी त्या विवक्षित ठिकाणी उत्खनन शक्य व्हायला हवे. त्याबाबतीत जे सापडेल, जसे सापडेल ते स्वीकारायची मनाची तयारी हवी, भले मग आपल्या सध्याच्या समजूतींना, धारणांना, गृहीतकांना त्या खुणांनी मोठा धक्का दिला तरीही.  पृथ्वीवर न उकललेल्या गूढांची संख्या खूप मोठी आहेच, अगदी Nazca Lines पासून ते पिरमिड्स पर्यंत, कित्येक मंदिरांपासून, पूज्य (Sacred) मानल्या गेलेल्या स्थानांपासून ते प्रकाशात आलेल्या लेण्यांपर्यंत, उध्वस्त किल्ल्यांच्या,इमारतींच्या 'झपाटलेला' असे मानल्या गेलेल्या अवशेषांपासून ते अत्यंत दुर्गम ठिकाणी सापडलेल्या गुंफांपर्यंत आणि निश्चित उपयोग न समजलेल्या अनेक चमत्कारिक वस्तूंपासून ते आपण आपल्या सध्याच्या समजुतींनुसार लेबल लावून मोकळे झालेल्या अनेक artefact पर्यंत. कदाचित त्यातील काही पूर्वीच्या संस्कृतीच्या तंत्रखुणा असू शकतील, काही कालकुपींचे स्थान निदर्शक असू शकतील. आवश्यकता आहे ते ठराविक झापडे झुगारून देण्याची.

आणि प्राचीन कालकुपीच्या खुणा पृथ्वीवरच सापडतील, असे मानण्याचे कारण केवळ इतकेच आहे का, की  बहुमान्य असलेला मानवी संस्कृतीचा, पृथ्वीवरील जीवनाचा इतिहास आपल्याला तसे सांगतो आहे (किंबहुना आपण तशी ठाम धारणा करून घेतली आहे) की 'याआधी कोणतीही संस्कृती आपल्या सध्याच्या (तंत्रज्ञानातील) प्रगतीच्या जवळपासही पोहोचलेली नाही' हा विचार आपण मनोमन स्वीकारला आहे ?

फार दूरचा विचारही न करता, सूर्यमालेतील एखाद्या ग्रहावर (किंवा उपग्रहावर) काही काळासाठी एखादी संस्कृती विकसित होऊन कालांतराने नष्ट झाली नसेल, असे ठामपणे मानण्याचे कोणतेही कारण नाही. चंद्रावर,मंगळावर प्राचीन संस्कृतीच्या खाणाखुणा सापडल्या असतील, तर त्या सर्व पृथ्वीवासीयांपर्यंत पोहोचल्या असत्या हा भाबडा आशावाद आहे. अशा गोष्टी उघडकीस न येऊ देण्याची अशी अनेक कारणे असू शकतात, ज्यांची कदाचित आपण कल्पनाही करू शकत नाही.

माकडापासून निपजलेला मानव ही सर्वसाधारण उत्क्रांतीची प्रक्रिया नसून, या शारीरिक, बौद्धिक प्रगतीमागे, जैवतंत्रज्ञानात अत्यंत प्रगत असलेल्या पृथ्वीबाह्य संस्कृतीने केलेला हस्तक्षेप, त्यांनी जाणीवपूर्वक केलेले प्रयोग कारणीभूत आहेत असे मानणारा एक वर्ग आहे. आणि हा तर्क समूळ नाकारण्याचे कारण नाही. मानवी मेंदूतील गुंतागुंत, मर्कटवर्गातील प्राण्यापेक्षा त्याच्या शरीरात असलेले बदल, त्याला असलेले बुद्धीचे, विविध कलांचे वरदान, पण त्याचवेळी इतर प्राण्यांच्या तुलनेत अतिशय कमकुवत असलेले शरीर, Junk DNA सारखी न उलगडलेली तथ्ये, जगभरातील विविध मानवसमूहांमध्ये प्रचलित असलेल्या  अतिप्राचीन कथा, त्या कथांमधील काही बाबींमध्ये असलेले विलक्षण साधर्म्य या सर्व गोष्टी, एकाप्रकारे नैसर्गिक आणि सर्वसाधारण उत्क्रांतीपेक्षा काहीतरी वेगळ्या गोष्टीकडे, कदाचित विशेष प्रयोगातून घेतलेल्या कृत्रिम झेपेकडे अधिक अंगुलीनिर्देश करतात असे वाटते.

====

ज्ञान कुठल्या माध्यमातून हस्तांतरीत होईल याचे आपले सध्याचे आडाखेच योग्य असतील असे नाही. कुणी सांगावे पृथ्वीवर येणार्‍या विविध प्रारणांच्या माध्यमातून, विविध प्रकारचे ज्ञान पृथ्वीवर येतही असेल. एखाद्या कलावंताला अचानक येणारी स्फूर्ती आणि त्यातून होणारी विलक्षण कलानिर्मितो किंवा एखाद्या वैज्ञानिकाच्या डोक्यात अचानक येणारी कल्पना, त्या कल्पनेने त्याचे झपाटून जाणे आणि नवीन संशोधनाचा पाया घातला जाणे या आणि अशा घटनांमागे, कोण जाणे, दूरवर कुठेतरी, कुणीतरी निर्माण केलेली कालकुपीसारखी एखादी अतिप्रगत ज्ञानाचे जतन करणारी, प्रसारण करणारी, संवर्धन करणारी यंत्रणा देखील असू शकेल.

====

====
समाप्त
====

शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

कालकुपी - ४ / ५

---- मागील भागावरून पुढे ----


====
कालकुपीच्या 'पुरण्याच्या' स्थानानुसार, कालकुपी तयार करण्यासाठी, वापरल्या जाणार्‍या पदार्थांमध्ये बदल करावा लागणे आणि कालकुपीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणधर्मांमध्ये फरक पडणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तरीही कालकुपीच्या रचनेसाठी आणि कालकुपीची आवरणे ज्या पदार्थापासून बनलेली असतील, त्यासाठी काही आदर्श गुणधर्म सांगता येतील. हे सर्व साध्य होतीलच असे नाही, मात्र त्या दिशेने प्रयत्न होऊ शकतात.

१) शक्यतो कालकुपी एकापेक्षा अधिक आवरणे असलेली असावी.
२) कालकुपी पूर्णत: हवाबंद (Airtight) असावी (निर्वात नव्हे).  पण कालकुपीच्या आतील हवा, निष्क्रिय वायूचा (Noble Gases/Inert Gases) वापर करून बनलेली असावी.
३) बाह्यावरण उष्णताविरोधक, उष्णतेचे कुसंवाहक असावे. विद्युतविरोधी असावे. (Non-Conducting Material).
४) कालकुपीने बाह्यतापमानातील प्रचंड फरक झेलणे आवश्यक आहे, त्यामुळे तापमानातील टोकाचा फरक झेलू शकेल, अशा पदार्थाने कालकुपी बनली असणे आवश्यक आहे, अगदी वाहत्या लाव्हापाठोपाठ, थंड पाण्याला तोंड देऊ शकेल, इतकी ती सक्षम असावी.
५) शक्यतो तिचा पाण्याशी संबंध येणार नाही याची काळजी घेतली जाणे अपेक्षित आहे, पण जरी असा संबंध आला तरी, कालकुपीच्या बाह्य आवरणाचे oxidation होता कामा नये.
६) कालकुपीकडे पाण्याचा, हवेचा वा अन्य कोणताही मोठा दाब सहन करण्याची क्षमता हवी. कालकुपीची आवरणे (किमान बाह्यावरण) पुरेशा कठीण पदार्थापासून बनलेले असावीत,  जेणेकरून मोठे आघात ती सहन करू शकेल.
७) कालकुपी पुरेशी अवजड असणे आवश्यक आहे, ज्यायोगे ती सहजतेने कुठेही (चोरून) नेता येणार नाही किंवा कुठल्याही प्रवाहास ती काही प्रमाणात तरी अवरोध करेल.
८) कालकुपीचे कोणतेही आवरण (किमान बाह्यावरण) अशा पदार्थापासून बनलेले असावे, ज्याचे विघटन सहसा होत नाही किंवा विलक्षण सावकाश होते
९) कालकुपीच्या बाह्यावरण, शक्य तितका अधिक किरणोत्सर्ग झेलण्यास समर्थ असावे.

या आदर्श गुणधर्मांना विचारात घेता,  अशा प्रकारची एकापेक्षा अधिक आवरणे असलेली कालकुपी तयार करण्यासाठी, कोणकोणते पदार्थ उपयोगी पडतील, याबाबत काही पर्याय सुचविण्यात आले आहेत.

वाहत्या लाव्हाचे तापमान १८००॰C च्या पलीकडे सहसा जात नाही, त्यामुळे सर्व आवरणे ज्या कुठल्या पदार्थांनी बनलेली असतील, त्या पदार्थाने यापेक्षा थोड्या अधिक  तापमानाला सहज तोंड देणे अपेक्षित आहे.

यासाठी सुचविण्यात आलेला एक पर्याय सिरॅमिक्सचा आहे. सिरॅमिक्स तसा आपल्या रोजच्या वापरातला पदार्थ आहे, मात्र सिरॅमिक्ससंबंधीच्या विविध संशोधनातून, अतिउच्च तापमानालाही, oxidation न होता तोंड देणारी, ठिसुळपणा हा दोष टाळून, वाढत्या तापमानाबरोबर अधिक कठीण होणारी, एकंदरच बर्‍याचशा रासायनिक प्रक्रियांना तोंड देऊ शकणारी काही सिरॅमिक्स आणि त्याची मिश्रणे तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. पुढील लिंकमध्ये अशा सिरॅमिक्सच्या गुणधर्मांचा ऊहापोह आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Ultra-high-temperature_ceramics

दुसरा पर्याय अर्थातच मिश्रधातूचा (alloys) आहे. अतिउच्च तापमान सहन करू शकणारे, अतिशय कठीण असणारे, बर्‍याचशा रासायनिक अभिक्रिया टाळण्यात यशस्वी ठरणारे असे अनेक मिश्रधातू, औद्योगिक कारणांसाठी शोधण्यात आले आहेत. पुढील लिंकमध्ये त्यासंबंधी काही उल्लेख आहेत.
http://www.nealloys.com/high-temp-alloys.php

याव्यतिरिक्त भविष्यात, आणखी दोन पर्याय बहुदा पुढे येतील. त्यातील एक आहे कार्बन नॅनोट्यूब्सचा. कार्बन नॅनोट्यूब्सचे असंख्य उपयुक्त गुणधर्म आहेत, त्यातील एक आहे अत्युकृष्ट उष्णतावाहकता आणि विद्युतवाहकता. पण याच्या अगदी विरुद्ध असलेला गुणधर्म, म्हणजे उष्णतावरोध आणि विद्युतावरोध, हे साध्य करण्यासाठी विशिष्ट पद्धतीने तयार केलेल्या कार्बन नॅनोट्यूब्सचा वापर करता येईल, असे अधिक संशोधनातून लक्षात आले आहे. असाच भविष्यातील दुसरा पर्याय ठरू शकेल, Gorilla Glass चा. मोबाईलच्या स्क्रीनचे संरक्षण करणारी अत्यंत कणखर काच म्हणून ही काच आता आपल्या परिचयाची झाली आहे, पण तिचा उपयोग इथेच थांबणार नाही आहे.  वाहनांमध्ये विंडशील्ड आणि इतर खिडक्यांसाठी सुद्धा, या काचेचा वापर झालेला निकटच्या काळात दिसेल.

कालकुपीस एकापेक्षा अधिक आवरणे असल्याचे किमान दोन लाभ आहेत. पहिला लाभ म्हणजे बाह्यावरणास हानी पोहोचली तरीही आतील आवरणे कालकुपीचे संरक्षण करण्यास उपयोगी पडू शकतात. ही आवरणे भिन्न पदार्थांनी बनलेली असल्यास, बाह्यावरणाची ज्या कारणाने हानी झाली आहे, तेच कारण आतल्या आवरणाची हानी करण्यास कारणीभूत होईलच, असे नाही. दुसरा लाभ असा आहे की दोन आवरणांच्या मध्ये, निष्क्रिय वायूचा (Noble Gases/Inert Gases) थर  किंवा निर्वात पोकळी ठेवणे शक्य झाल्यास, बाहेरील तापमानाचे वहन आतपर्यंत होणार नाही.
सध्याच्या एकंदर परिस्थितीनुसार, कालकुपीच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून, नियंत्रणापलीकडे जाऊ शकेल असा धोका अर्थातच अणुयुद्धाचा वा तत्सम आण्विक घटनेचा आहे.  त्यामुळे, दीर्घकाळाचे उद्दीष्ट ठेवू पाहणारी कालकुपी, एखाद्या अणुस्फोटाला आणि त्यातून निर्माण होणार्‍या आघाताला, आघातलहरीला तोंड देऊ शकेल अशा बंकरमध्ये ठेवणे, कदाचित कालकुपीच्या दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय निर्णायक ठरू शकते.

====

कालकुपीच्या तालन यंत्रणेसाठी गुरुत्वाकर्षणाचा वापर हा उत्तम पर्याय असला, तरी (पृथ्वीच्या वा अन्य अवकाशीय वस्तूंच्या) गुरुत्वाकर्षणात काही टोकाचे बदल झाल्यास, या यंत्रणेस त्याचा फटका बसू शकतो. तालन यंत्रणेचा उद्देश भविष्यातील, ठराविक वेळीच, ती कालकुपी उघडता यावी असा असल्यामुळे, 'अणुघड्याळाचा (Atomic Clock) वापर करून, एखादी जास्तीची तालन यंत्रणा बसवता येईल का'  हा विचारही होऊ शकतो. अर्थात या अणुघड्याळाचे कालकुपीवर दुष्परिणाम होणार नाहीत याची काळजी घेतली जाणे ही स्वाभाविक आहे.

====

लेखाच्या सुरूवातीस गृहीत धरलेले कालकुपीचे उद्दीष्ट हे पन्नास हजार ते एक लाख वर्षे इतके आहे. या दीर्घ कालावधीचा विचार करता, कालकुपीच्या आत कोणकोणत्या गोष्टी असाव्यात आणि त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या असाव्यात हे कळीचे मुद्दे आहेत. सर्व प्रकारची सुरक्षा व्यवस्था योजल्यानंतर, आत असणार्‍या वस्तु कालातीत नसतील, उद्दीष्ट असलेल्या भविष्यकाळात, त्यांची ओळख होऊ शकत नसेल, तर कालकुपी निरर्थक ठरू शकते. दीर्घकाळाचा विचार करता, तिथे सेंद्रिय पदार्थापासून बनलेल्या कोणत्याही वस्तू ठेवणे अयोग्य ठरेल. तसेच तिथे ठेवण्यात येणार्‍या प्रत्येक वस्तूचे निर्जंतुकरण झाले असणे आवश्यक आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे साहाय्य घेऊन निर्माण केलेली, कालकुपी उघडणार्‍यांना एखादी कळ दाबून अत्यंत सहजतेने वापरता येईल किंवा कालकुपी उघडल्यावर जी आपोआप सुरू होईल, अशी व्यवस्था कालकुपीत असल्यास, जगातील अधिकाधिक ज्ञान कालकुपीमध्ये समाविष्ट करता येऊ शकते आणि यामध्ये श्राव्य आणि दृश्य अशा दोन्ही माध्यमांचा वापर होऊ शकतो. कारण अशा रचनेत, कुठल्यातरी प्रकारचे इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान आणि डिजिटल स्टोरेज अंतर्भूत असेल, हे गृहीतक आहे. परंतु कुठल्याही डिजिटल स्टोरेजचे पुनर्श्रवण, पुनर्प्रेक्षण वा पुनर्वापर एखाद्या बॅटरीशिवाय, उर्जास्त्रोताशिवाय शक्य नाही. कुठल्याही प्रकारचे चार्जिंग नसताना, पन्नास हजार ते एक लाख वर्षे इतक्या टिकू शकतील, अशा उत्तम दर्जाच्या, कुठल्याही प्रकारचे उत्सर्जन न करणार्‍या, स्फोट होण्याचा धोका नसणार्‍या बॅटरी आपल्याला निर्माण करता येतील का ? सध्याच्या तंत्रज्ञानानुसार याचे उत्तर 'बहुदा नाही' असेच येईल.  अर्थात पुनर्श्रवण, पुनर्प्रेक्षण वा पुनर्वापर यासाठी आवश्यक असणारी, ऊर्जा मिळवण्यासाठी यांत्रिकी उपकरणे वा अन्य मार्गांचा विचार करावा लागू शकतो. 

दुसरा मुद्दा असा आहे की असे कोणते डिजिटल स्टोरेज आहे जे इतक्या दीर्घ कालावधीसाठी टिकून राहील ? १००० वर्षे टिकतील असा दावा करणार्‍या M-Disk इथे पुरेशा नाहीत. त्यामुळे स्वाभाविकपणे लक्षात येणारा पर्याय फ्लॅश ड्राइव्हचा. फ्लॅश मेमरीचे आयुष्य किती वेळा ती वाचली आणि लिहिली जाते यावर अवलंबून असते. त्यामुळे तर्कदृष्ट्या, ५०,००० वर्षे अजिबात न वापरलेली फ्लॅश मेमरी, वापराची वेळ येईल तेंव्हा खरंतर व्यवस्थित चालली पाहिजे. पण वापरात नसलेले कोणतेही इलेक्ट्रॉनिक्स इतका दीर्घ काळ टिकून राहून अपेक्षित असलेली कार्यक्षमता दाखवेल का ?  ठामपणे सांगणे कठीण आहे.  अतिदीर्घकाळ टिकण्याचे उद्दीष्ट ठेवून बनविलेला Lageos उपग्रह हा तसे म्हटले तर एक 'निष्क्रिय' उपग्रह आहे. (अधिक माहिती : https://lageos.cddis.eosdis.nasa.gov/index.html) आणि त्याच्याकडून दीर्घकाळ टिकलेल्या कोणत्याही डिजिटल स्वरूपातील माहितीचे हस्तांतरण अपेक्षित नाही हे इथे लक्षात घ्यायला हवे.

थोडक्यात, कालकुपीमध्ये डिजिटल स्टोरेज ठेवले तरी त्याच्यावर विसंबता येणार नाही.  कोणत्याही स्वरूपाच्या कागदाच्या माध्यमातून, ज्ञान साठविता येणार नाही हे अगदी उघड आहे, कारण कोणताही कागद इतका दीर्घकाळ टिकू शकणार नाही. अर्थात अधिकाधिक ज्ञान कोरून ठेवण्याचे माध्यम म्हणून शक्य तितके कणखर शिलालेख (उदा. ग्रॅनाईटपासून तयार केलेले) आणि दीर्घकाळ टिकणारे, न गंजणारे, अतिशय  कठीण धातूचे पट (उदा. उत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टील, टिटॅनियमचे मिश्रधातू वा तत्सम इतर धातू) या किंवा अशा प्रकारच्या माध्यमातून ज्ञान व्यक्त करणे उपयुक्त ठरावे. संभाव्य झीज लक्षात घेऊन, शिलालेख वा धातूपट पुरेसे जाड असावेत आणि त्यावर कोरलेली अक्षरे/चित्रे ही देखील पुरेशी 'खोल' असतील याची काळजी घेणे आवश्यक आहे, जेणेकरून ही अक्षरे/चित्रे पुसटण्याचा, नष्ट होण्याचा धोका कमी होईल.  अत्यंत कठीण काच किंवा हिरा यांचा वापर करणे शक्य असल्यास, त्यांचाही मर्यादित माहिती ठेवण्यासाठी विचार होऊ शकतो. काही विशिष्ट प्रक्रिया करून निर्मिलेले कापड, निर्वात वायूंच्या वातावरणात टिकू शकत असल्यास, कापड हा देखील उत्तम पर्याय ठरू शकतो, मात्र कुठल्याही कापडावर, कोणतीही शाई / रंग इतका दीर्घकाळ टिकेल का हा प्रश्न उद्भवतो. दीर्घकाळ टिकू शकेल अशा दुसर्‍या प्रकारचा, धाग्याच्या माध्यमातून तिथे केलेले विणकाम/रेखाटन देखील कदाचित अधिक वाजवी पर्याय ठरू शकतो.

हे ज्ञान जगात सध्या अस्तित्वात असणार्‍या कोणत्याही भाषेत ठेवणे, संभवत: निरुपयोगी ठरेल असा एक मतप्रवाह आहे.  कारण कोणतीही भाषा इतका दीर्घकाळ टिकू शकेल, त्याच स्वरूपात राहील, त्याच लिपीत लिहिली जाईल याची खात्री देणे शक्य नाही. संगणकाचे साहाय्य घेऊन देखील, प्राचीन काळातील न उलगडलेल्या लिपींबाबत, भाषांबाबत, (त्यांचा अर्थ लावताना,) आपण ज्या प्रकारे अडचणी झेलत आहोत, त्यावरून आपली कोणतीही लिपी वा भाषा कालकुपीच्या माध्यमातून हस्तांतरीत करणे किती अवघड ठरू शकेल, याचा अंदाज बांधता येईल. कदाचित एखादी चित्रलिपी अधिक उपयुक्त ठरेल.  त्यातूनही  सध्याची एखादी भाषा वापरणेच आवश्यक ठरल्यास, ती भाषा, तिची लिपी, वाचणार्‍यापर्यंत सहज पोहोचू शकेल, संभाव्य वाचक, ती भाषा, ती लिपी समजावून घेऊ शकेल, अशा प्रकारच्या मार्गदर्शक साधनाचा तिथे वापर होणे आवश्यक आहे आणि तिथे ठेवण्यापूर्वी त्याच्या विविध चाचण्या ती लिपी, भाषा न जाणणार्‍या विविध व्यक्तीसमूहांमध्ये घेतली जाणे हे तर्कदृष्ट्या सुसंगत आहे. 

====

कालकुपीने नक्की कोणत्या माहितीचे हस्तांतरण करावे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि याबाबतीत प्रचंड मतभेद होऊ शकतात.

डिजिटल स्वरूपात ठेवण्यात येणार्‍या माहितीबाबत, किमान जागा हा वादाचा विषय ठरत नसल्याने, तिथे प्रचंड माहिती साठविली जाऊ शकते. ही माहिती जर अपेक्षित भविष्यात वापरली जाणार असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की वापरणारी संस्कृती तंत्रज्ञानात पुढारलेली आहे. अशा वेळेस पूर्ण विश्वकोश, (वि)ज्ञानकोश, तंत्रज्ञानकोश, विविध भाषांची, लिपींची ओळख  शब्दकोश आणि विविध संस्कृतींची माहिती इथे समाविष्ट केली जाऊ शकते. मात्र तरीही जे तंत्रज्ञान विघातक ठरू शकते, त्याचे हस्तांतरण व्हावे की नाही, ही निर्विवाद खल करण्याची गोष्ट आहे. विघातक तंत्रज्ञान (उदा अण्वस्त्रांचे तंत्रज्ञान) कुठल्याही परिस्थितीत साठविले जाऊ नये, असे स्वाभाविक वाटले, तरीही काही अपवादात्मक आणि टोकाच्या शक्यता असे ज्ञान देखील (कदाचित सांकेतिक स्वरूपात) समाविष्ट केले जावे, याकडे निर्देश करतात.  (उदा. परग्रहवासीयांच्या एका आक्रमणात, बहुसंख्य मानव प्रजाती नष्ट झाली आणि अंशत: वाचलेल्या लोकांना परग्रहवासीयांच्या पुढील आक्रमणाचा प्रतिकार करणे आवश्यक आहे)

जी माहिती डिजिटल स्वरूपात नाही, तिथे जागेची मर्यादा असेल, त्यामुळे कोणत्या माहितीस प्राधान्य द्यायचे हा मुद्दा अतिमहत्त्वाचा (आणि मतभेदाचा).  इथे मानवाच्या मूलभूत गरजांना, सर्वाधिक प्राधान्य देऊन त्याच्याशी संबंधी सर्व गोष्टींचे ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान याची माहिती असावी असे मत मांडले जाते आणि ते बर्‍याच प्रमाणात योग्य वाटते. भविष्यातील नवीन संस्कृतीचा प्रवास शून्यापासून सुरू होणार असेल, तर त्यांना सर्वात उपयोगी पडणार्‍या गोष्टी याच असतील. पण तो प्रवास शून्यापासून सुरू होत नसेल तर त्या संस्कृतीस उपयुक्त ठरणारे ज्ञान, हे विज्ञानाच्या पायाभूत संकल्पनांपासून, सिद्धांतांपासून ते जीवन सुकर करणार्‍या तंत्रज्ञानातील अत्यंत आवश्यक अशा गोष्टींपर्यंत, चित्रमय स्वरूपात असल्यास कदाचित अधिक उपयुक्त ठरू शकेल. अर्थात जेंव्हा आपले विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंबंधी कोणत्याही गोष्टी, सर्वस्वी अनोळखी, अज्ञात अशा संस्कृतीपर्यंत पोहोचवायच्या असतील, तेंव्हा केवळ चित्रबद्ध करून हे ज्ञान आपल्याला पोहोचविता येईल का ? याचे उत्तर 'बहुदा नाही' असेच येईल. सध्या पृथ्वीवर अस्तित्वात असणारी कोणती भाषा आणि कोणती लिपी सर्वाधिक उपयोगी ठरेल या प्रश्नाचे उत्तर सोपे नाही. जर सध्याची कोणतीही भाषा वापरण्यात बर्‍याच त्रुटी जाणवत असतील, तर कदाचित संगणकाचे साहाय्य घेऊन आपल्याला,  अशा एका लिपीची, भाषेची निर्मिती करावी लागेल, ज्या लिपीच्या, भाषेच्या योगे  आपल्या तंत्रज्ञानातील प्रत्येक प्रक्रिया आणि त्या प्रक्रियांच्या प्रत्येक स्तरावर, वापरलेली प्रत्येक वस्तू/साहित्य/मूलभूत घटक व्यक्त करता येतील.  अशा भाषेची, लिपीची आणि यांचा वापर करून शब्दबद्ध, चित्रबद्ध केलेल्या ज्ञानाच्या, विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या हस्तांतराची चाचणी, एखाद्या आदिवासी/वनवासी जमातीत घेतली जाऊ शकते.

==========
थोडेसे अवांतर
==========
अधिकाधिक माहिती 'कोरण्यासाठी' अक्षरांचा / चित्राक्षरांचा / चित्रांचा आकार शक्य तितका लहान ठेवणे ही स्वाभाविक गोष्ट आहे, पण तो किती लहान असावा हा जरा अवघड प्रश्न आहे. तसेच श्राव्य माध्यमात आवाजाची पातळी किती असावी हा देखील काहीसा फसवा प्रश्न आहे.

अतिदीर्घकाळानंतर अस्तित्वात असणार्‍या प्रजातीच्या / संस्कृतीच्या पंचेंद्रियांच्या जाणीवा आणि क्षमता आपल्यासारख्या असतीलच हे ठामपणे सांगणे अशक्य आहे.  उदाहरणार्थ आपल्याला जो आवाज सहज ऐकू येतो किंवा जी अक्षरे सहज दिसतात, तसे त्यांच्याबाबतीत नसेल तर ? याच्या उलटही असू शकते. उदाहरणार्थ जितका आवाज आपण ऐकण्यास योग्य मानतो आणि सहज सहन करू शकतो, तसे त्यांच्याबाबतीत नसल्यास आपला सर्वसाधारण आवाज त्यांना अत्यंत उपद्रवकारक ठरू शकतो. आणखी थोडा टोकाचा विचार केल्यास,  त्यांना दिसत असलेल्या प्रकाशाची  वर्णपंक्ति (Spectrum) आणि त्यांना ऐकू येत असलेल्या ध्वनीची पट्टी (Band) आपल्यासारखी नसेलच तर ?  अर्थात असे अनेक टोकाचे विचार होऊ शकतात,  मात्र कालकुपीच्या आकारासंबंधी आणि आपल्या कल्पनाशक्तीला किती उधळू द्यावे :-) याबाबतीत काही मर्यादा पाळणे आवश्यक असल्याने, तूर्तास या गोष्टींना, कालकुपीच्या संदर्भातील विचाराच्या कक्षेच्या बाहेर ठेवणे तर्कसंगत ठरेल.


====
क्रमश:
====

रविवार, २४ डिसेंबर, २०१७

कालकुपी - ३ / ५


---- मागील भागावरून पुढे ----

==
लेखांक २ मध्ये घनदाट अरण्ये, खाणी, सागरतळ,  पर्वतांचा अंतर्भाग, दर्‍या, लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहा इत्यादि ठिकाणांचा कालकुपी लपविण्याची संभाव्य स्थाने म्हणून उल्लेख केला होता. यातील प्रत्येक ठिकाणाचे फायदे तोटे आहेत.

घनदाट अरण्यात, निबिड जंगलात कालकुपी सुरक्षित राहील हे काही प्रमाणात खरे आहे, पण ज्या प्रमाणात निर्वनीकरण सुरू आहे, ते पाहता काही शतकातच ती कालकुपी, शहरीकरणाच्या एखाद्या प्रकल्पात उघडकीस येऊ शकते.  अ‍ॅमेझॉनच्या जंगलाचा साधारण १३% भाग (सुमारे ७ लाख वर्ग किमी) गेल्या ५० वर्षात जंगलतोडीमुळे नष्ट झाला आहे. सरासरी १ लक्ष ३७ हजार वर्ग किमी इतके पृथ्वीवरचे जंगल दरवर्षी नष्ट होत आहे.

उपयोग संपलेल्या खाणी बंद करण्याचे देखील एक शास्त्र आहे आणि अशा खाणींचा, अन्य कामांसाठी पुनर्वापर करण्याची काही उदाहरणे आहेत. संग्रहालये, करमणुकीची ठिकाणे,, उद्याने, कृषिक्षेत्र अशा विविध प्रकारांनी, बंद करण्यात आलेल्या खाणींचा उपयोग केल्याची उदाहरणे आहेत.  त्यातील सर्वात लक्षणीय आहे INCO's Creighton mine, Sudbury, Ontario इथे उभारण्यात आलेली न्यूट्रिनो वेधशाळा. खाणींमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यास आणि खनिजे, पाणी, दूषित हवा इत्यादींपासून अशी खाण सुरक्षित करणे शक्य असल्यास, तिचा कालकुपी पुरण्यासाठी/सुरक्षितपणे ठेवण्यासाठी वापर हौऊ शकतो.

सागरतळातील कालकुपीचा सर्वात मोठा फायदा, तिथे पोहोचणे अतिशय अवघड असेल हा आहे, मात्र आज असलेला हा फायदा भविष्यातील तोटा ठरू शकतो. भविष्यातील संस्कृतीकडे सागरतळापर्यंत पोहोचण्याची क्षमता किती आहे यावर कालकुपीच्या उद्दिष्टाचे यशापयश अवलंबून आहे. शिवाय पाण्यापासून संभवणारे सर्व धोके आणि तिथला पाण्याचा प्रचंड दाब या गोष्टी कालकुपीच्या टिकाऊपणासाठी विलक्षण घातक ठरू शकतात.

पर्वतांचा अंतर्भाग ही दीर्घकालीन अस्तित्वासाठी अत्यंत सुरक्षित जागा असू शकते, मात्र भविष्यात कदाचित अशा पर्वतातून, रस्त्यांसाठी बोगदे, घाटरस्ते बनविले जातील, कदाचित दगडांसाठी, मातीसाठी तिथे खनन होईल आणि मग या कालकुपीचे अस्तित्व वेळेआधी उघडकीस येईल, ही शक्यता नाकारता येत नाही.

सर्वसाधारण स्थितीत मानवाचा कमीतकमी उपद्रव या दृष्टिकोनातून, खोल दर्‍या हा कालकुपींसाठी सर्वाधिक सुरक्षित पर्याय ठरू शकतो, मात्र दर्‍यांमध्ये सर्वसाधारणत: पावसाचे प्रमाण बरेच अधिक असते, तसेच प्रलय वा तत्सम नैसर्गिक आपत्तींमध्ये, अशा कालकुपीची मोठी हानी होण्याची शक्यता बरीच वाढते. याव्यतिरिक्त कालकुपी जितकी अधिक खोलवर पुरली जाईल, तितकी तिची भविष्यात सापडण्याची शक्यता (भूस्तरातील उलथापालथीची अपवादात्मक परिस्थिती वगळल्यास) कमी होत जाते असे म्हणता येईल.

लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहांचा वापर, भुयारांचे तयार जाळे  या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आहे, शिवाय अतिदूरच्या भविष्यात पृथ्वीवरील परिस्थिती प्रमाणाबाहेर बिघडल्यास, तेंव्हा अस्तित्वात असलेली संस्कृती या लाव्हागुहांचा आश्रयस्थान म्हणून वापर करेल ही शक्यता, उद्दिष्टाच्या सफलतेसाठी चांगली आहे. मात्र या लाव्हाट्यूब्सना कारणीभूत ठरलेला ज्वालामुखी मृत असणे किंवा तो प्रचंड कालावधीसाठी निद्रिस्त राहील याचे ठाम ज्ञान आपल्याला असणे आवश्यक आहे.

वाळवंटात वाळूचे स्थलांतरण होण्याची प्रक्रिया वाळूच्या वादळांमुळे अनेकदा घडते, त्यामुळे वाळवंटात कालकुपी पुरायची झाल्यास अधिक खोलवर जाणे आवश्यक ठरते.  तसेच तापमानातील रोजचे तीव्र बदल हाताळू शकेल अशी व्यवस्था इथे अपरिहार्य आहे. पाण्यापासून निर्माण होणारे धोके इथे सर्वात कमी संभवतात.

उत्तर किंवा  दक्षिण ध्रुवाजवळ, बर्फात खोलवर कालकुपी पुरून ठेवणे हा देखील एक उत्तम पर्याय आहे.  मात्र अतिदीर्घकाळाचा विचार करता, चुंबकीय ध्रुवांमधील बदलाचा (Geomagnetic Reversal), नैसर्गिक अक्षीय ध्रुवांवर, पृथ्वीवरील वातावरणावर, खंडांच्या रचनेवर, स्थानावर  नक्की कसा परिणाम होतो यासंदर्भात मतमतांतरे आहेत. त्यामुळे तिथे पुरलेल्या कालकुपीला अनेक अनपेक्षित संकटे झेलावी लागू शकतात.

====

वरील सर्व ठिकाणांचे फायदेतोटे आहेत, मात्र तरीही कुठलीही जागा निवडताना
भूकंपप्रवण क्षेत्र टाळले जाईल,
ती जागा शक्य तितकी कोरडी असेल,
ज्वालामुखीपासून खूप दूर असेल,
तिथे मानवी उपद्रव होण्याची शक्यता सर्वात कमी असेल,
संभाव्य नैसर्गिक आपत्तींमध्ये, ती जागा सहजतेने उघडी पडणार नाही,
तिथे तापमानातील अतितीव्र बदल झेलावे लागणार नाहीत
इत्यादि गोष्टी निश्चितपणे बघितल्या जातील.  या अनुषंगाने पृथ्वीबाह्य ठिकाणांचा विचारही करण्यात आला आहे. त्याचे सध्या स्थूलमानाने चार गट आहेत.


१) पृथ्वीभोवती अवकाशस्थानकात, उपग्रहांमध्ये, Probeच्या माध्यमातून, अशी कालकुपी पृथ्वीभोवती, चंद्राभोवती  किंवा दुसर्‍या एखाद्या ग्रहाभोवती, उपग्रहाभोवती फिरती ठेवणे आणि ठराविक दीर्घ कालावधीनंतर ती पृथ्वीवर खाली उतरेल अशी व्यवस्था करणे.

KEO नावाचा एक प्रकल्प २००३ मध्ये कार्यान्वित होणार होता, ज्यामध्ये एक कालकुपी एका प्रोबच्या माध्यमातून पृथ्वीभोवती फिरती ठेवण्यात येणार होती आणि ५०,००० वर्षांनी त्या प्रोबने पृथ्वीवरच्या वातावरणात प्रवेश करावा, यासाठी त्यात यंत्रणा असणार होती. मात्र काही ना काही कारणामुळे हा प्रकल्प सतत पुढे ढकलला गेला आहे आणि आता २०१९ मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल असे सांगण्यात येत आहे.  (KEO हे लघुरूप नसून सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या काही भाषांमधील सर्वाधिक वापरले जाणारे ध्वनी असे यामागील तर्कशास्त्र आहे !).   LAGEOS या मे १९७६ मध्ये सोडण्यात आलेल्या  उपग्रहामध्ये एक छोटी कालकुपी आहे. हा उपग्रह साधारण ८४ लक्ष वर्षांनी पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल असे अनुमान आहे.
http://www.keo.org
https://lageos.cddis.eosdis.nasa.gov/


२) चंद्रावर किंवा दुसर्‍या एखाद्या ग्रहावर, उपग्रहावर किंवा लघुग्रहावर सुरक्षित जागी (उदाहरणार्थ विवरे, लाव्हाट्यूब्स), कालकुपी ठेवण्याची / पुरली जाईल अशी व्यवस्था करणे. 

अपोलो ११ अंतराळयानाच्या लँडरमधील वेगळ्या करण्यात आलेल्या एका भागामध्ये (Lunar Module) एक छोटी कालकुपीसम ( plaque) वस्तू ठेवण्यात आली आहे. पण ही अर्थातच 'पुरलेल्या' अवस्थेत नाही.
https://en.wikipedia.org/wiki/Apollo_11


३) एखाद्या अवकाशयानाच्या माध्यमातून कालकुपी अवकाशात धाडणे. 

पायोनियर १० आणि पायोनियर ११ या दोन्ही अंतराळयानात कालकुपीसम वस्तू (plaque) मधून काही माहिती अवकाशात पाठविण्यात आली आहे.   दोन्ही व्हॉयेजर अंतराळयांनामध्ये सर्व प्रकारच्या माहितीने खच्चून भरलेली  गोल्डन रेकॉर्ड पाठविण्यात आली आहे.  अर्थात ही चारही अंतराळयाने अनंताच्या प्रवासास निघाली आहेत आणि ही माहिती पृथ्वीवर परत कशी येईल, कधी येईल किंवा भविष्यातील पृथ्वीवरची कोणतीही संस्कृती या गोष्टी परत कशी मिळवेल हा प्रश्न अनुत्तरित आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Pioneer_10
https://en.wikipedia.org/wiki/Pioneer_11
https://en.wikipedia.org/wiki/Voyager_1
https://en.wikipedia.org/wiki/Voyager_2


४) दीर्घमुदतीच्या (आणि सूर्यमालेतील ज्याची कक्षा बर्‍यापैकी निश्चित आहे अशा) एखाद्या धूमकेतुवर कालकुपी ठेवणे.

67P/Churyumov–Gerasimenko या धूमकेतुवर ESA ने पाठविलेल्या Rosetta या अवकाशयानासोबत Philae हा लँडर होता. या लँडरसोबत Rosetta disc या नावाने ओळखली जाणारी, निकेलच्या एका मिश्रधातूपासून बनविलेली एक तबकडी पाठविण्यात आली आहे. या तबकडीमध्ये विविध भाषांमधील संदेश व प्रचंड माहिती आहे. साधारण साडेसहा वर्षांनी हा धूमकेतू सूर्याची फेरी करतो आणि ती तबकडी किमान २००० वर्षे टिकेल असा अंदाज आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Rosetta_Project


कालकुपीसाठी जे धोके पृथ्वीवर संभवतात, त्यातील बरेचसे धोके अंतराळातही संभवू शकतात. शिवाय अंतराळात Collision आणि अवकाशीय प्रारणांचा तीव्र मारा हे धोके जरा जास्तच तीव्र आहेत. एखाद्या ग्रहावरच्या/उपग्रहावरच्या वातावरणाशी, कालकुपीच्या अस्तित्वासाठी  विपरीत ठरू शकतील अशा घटनांशी आपण पूर्णत:  परिचित नाही. जितका पृथ्वीचा अभ्यास आपण केला आहे, त्याच्या एक शतांशही, आपला दुसर्‍या कोणत्याही ग्रहाचा, उपग्रहाचा अभ्यास नाही. त्यामुळे कुठल्याही ग्रहावर/उपग्रहावर/धूमकेतूवर कालकुपी ठेवणे/पुरणे, उद्दीष्ट साध्य होईपर्यंत ती कालकुपी तिथे टिकून राहणे आणि भविष्यातील ज्या संस्कृतीसाठी ती कालकुपी आपण ठेवत आहोत, तिच्याकडे अवकाशप्रवासाची क्षमता असणे, त्यांना कालकुपी दुसर्‍या ग्रहावर शोधण्याची बुद्धी होणे, त्यांना ती कालकुपी तिथे सापडणे या सर्व टोकाच्या योगायोगाच्या गोष्टी आहेत. याव्यतिरिक्त पृथ्वीवर येणार्‍या खर्चाच्या, कितीतरी अधिकपट खर्च  अंतराळातील कालकुपीसाठी येईल हे उघड आहे. त्यातल्या त्यात पृथ्वीवर, स्वत:हून सुरक्षितपणे परत येणारी अवकाशस्थ कालकुपी अधिक उपयोगाची ठरेल असे म्हणता येईल.  एका अटळ परिस्थितीमध्ये. अंतराळातील कालकुपीचा एक निर्विवाद फायदा होऊ शकतो. ही परिस्थिती आहे पृथ्वीचा संभाव्य नाश वा अन्य कोणत्याही कारणाने, दूरच्या भविष्यात तत्कालीन मानवाला पृथ्वी सोडावी लागणे. अशा वेळेसे संस्कृतीचे, ज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे कालकुपीतील भांडार, पृथ्वीत्याग करणार्‍या मानवासाठीच कदाचित उपयुक्त ठरावे.

वर उल्लेखलेले विविध पर्याय वाचल्यावर असे म्हणता येईल की एकाच ठिकाणी कालकुपी पुरण्यापेक्षा / ठेवण्यापेक्षा, त्या कालकुपीच्या अनेक आवृत्ती बनवून, तिचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी, जितके विविध स्थानांचे पर्याय उपलब्ध होऊ शकतात ,त्या सर्व पर्यायांचा वापर करण्यात आला, तर कालकुपी सापडण्याची आणि तिचे उद्दीष्ट साध्य होण्याची शक्यता बरीच वाढू शकते. पण त्यासाठी कालकुपीचा प्रकल्प, देशस्तरावर न राबविता, मानवजातीचा प्रकल्प म्हणून, संयुक्तपणे पूर्ण जगभर आणि अंतराळातील सर्व साध्य ठिकाणी राबविणे बहुदा अधिक योग्य ठरेल.

====
क्रमश:
====

=========

शुक्रवार, २२ डिसेंबर, २०१७

कालकुपी - २ / ५


विविध देशांनी, संस्थांनी काही दशकांचे, काही शतकांचे उद्दीष्ट ठेवून पुरलेल्या कालकुपींची संख्या मोठी आहे.  भारतातील ज्ञात कालकुपी याच गटात येतात.  किमान एका सहस्रकाचे उद्दीष्ट ठेवून जमिनीत पुरलेल्या कालकुपींमध्ये, ज्या मोजक्या कालकुपी आहेत, त्यातील काही विशेष उल्लेखनीय आहेत; मात्र यातील कोणत्याही कालकुपीचा उल्लेख या लेखात करावा की नाही या बाबतीत मी थोडा संभ्रमात होतो. वास्तविक त्यांच्याबद्दल मर्यादित माहिती आंतरजालावर या आधीच उपलब्ध आहे आणि अशी माहिती उपलब्ध केली आहे, त्याअर्थी तसे करणे आवश्यक वाटले असावे किंवा असुरक्षित वाटले नसावे.

दीर्घकालीन कालकुपी, तिच्या उद्दिष्टात यशस्वी होण्यासाठीची काही गृहीतके,  पहिल्या लेखांकात नमूद केली आहेत. ऋणात्मक दृष्टिने पाहिल्यास, एका प्रकारे ही गृहीतके, कालकुपीच्या संभाव्य अपयशाची कारणे देखील ठरू शकतात. त्या अपयशाच्या कारणांमध्ये, आणखी एक महत्त्वाचे कारण जोडले जाऊ शकते आणि ते आहे प्रसिद्धी. किंबहुना प्रसिद्धीचा सोस किंवा हव्यास.

अल्पकालीन कालकुपीची नोंद असणे, तिचा ठावठिकाणा माहीत असणे, ती उघडण्यासाठी कोणत्याही स्वरूपाची तालन यंत्रणा (Locking Mechanism) असल्यास त्या यंत्रणेची 'किल्ली' जपून ठेवलेली असणे ही अत्यंत योग्य आणि स्वाभाविक गोष्ट आहे, मात्र दीर्घकालीन कालकुपीच्या बाबतीत,  तिच्या ठावठिकाणाची प्रसिद्धी ही अत्यंत घातक गोष्ट ठरू शकते आणि त्याचे महत्त्वाचे कारण आहे तिच्या 'चोरीची शक्यता'. 

कालकुपी जसजशी जुनी होत जाईल, तसतशी तिने सामावून घेतलेल्या गोष्टींचे बाजारातील मूल्य वाढत जाते आणि याचे कारण त्या गोष्टींच्या उपयुक्ततेपेक्षा, त्यांची Antiques किंवा संग्रहणीय म्हणून  प्राप्त होणार्‍या लौकिकात, गौरवात आहे. अशा गोष्टींचा बाजार प्रचंड मोठा आहेच, पण तिथे नीती-अनीतीचा विधिनिषेध न बाळगणार्‍या आणि पडद्याआड राहून, या बाजारातील प्रचंड उलाढाल हाताळणार्‍या टोळ्यांची सत्ता आहे हे अधिक भीषण वास्तव आहे. 

केवळ काही दशके जुन्या झालेल्या वस्तुबाबत आपल्यापैकी बरेच जण भावुक होत असतील, कित्येकांच्या संग्रहात अशा वस्तु जाणीवपूर्वक जपलेल्या असतील, मग काही शतके जुन्या झालेल्या वस्तूंबाबत, विशेषत: त्याचे बाजारमूल्य प्रचंड असल्यास काय घडू शकेल हे मुद्दामहून सांगण्याची आवश्यकता नाही.  अशावेळेस त्याचा ठावठिकाणा घोषित करणे, म्हणजे सुरक्षेसाठीच्या प्रणाली आणि त्या प्रणालींवरचा खर्च, प्रमाणाबाहेर वाढण्याला निमंत्रण ठरावे. याबाबतीत एक मुद्दा असा मांडला जातो की जिथे अतिप्रचंड सुरक्षाव्यवस्था अपरिहार्य आहे, उदाहरणार्थ संग्रहालये किंवा राजकीय इमारती किंवा तत्सम दुसर्‍या इमारती, अशाच ठिकाणी या कालकुपी पुराव्यात. अल्पकालीन कालकुपींसाठी ही अत्यंत योग्य गोष्ट ठरावी, मात्र तरीही ती चोख व्यवस्था आहे असे म्हणता येणार नाही. भुयार खणून बँक लुटल्याची, एटीएम लुटल्याची घटना जर घडू शकत असेल, तर काही शतके जुन्या असलेल्या कालकुपीसाठी ही घटना घडणे असंभाव्य नाही. मग दीर्घकालीन कालकुपींच्या संदर्भात, त्या सुरक्षाव्यवस्थेच्या निरंतरतेची ग्वाही कशी द्यावी ? जगातील कोणत्याही भूभागावरील राज्यव्यवस्था किंवा शासनव्यवस्था  एकाच ठिकाणाहून किंवा एकाच नियमावलीच्या आधाराने किंवा एकाच तत्वाने चालल्याची सर्व उदाहरणे (अतिप्राचीन / पौराणिक उदाहरणे वगळल्यास) जास्तीत जास्त दोन-तीन शतकांपुरती मर्यादेत आहेत आणि जी काही अशी उदाहरणे आहेत, तिथे अनिश्चिततेचे सावट सतत राहिलेले आहे.

याच संदर्भात मांडला गेलेला दुसरा मुद्दा हा, त्यांच्या अचूक ठावठिकाणा सांगणार्‍या माहितीला गुप्त ठेवावे किंवा मर्यादित व्यक्तींना त्या माहितीचा स्त्रोत उपलब्ध असावा आणि ही माहिती प्रचंड सुरक्षेत ठेवून, ती कधी उघड होईल याची मुदत ठरवून ठेवावी असा आहे. 'Classified Documents' असा शिक्का मारल्या जाणार्‍या कागदपत्रांबाबत, अशाच प्रकारचे धोरण अनेक देश वापरतात. त्यामुळे तसे बघायला गेले तर हा एक चांगला उपाय आहे. मात्र शासनव्यवस्थेतील अनिश्चितता आणि संभाव्य भ्रष्टाचार, अशा कागदपत्रांच्या गोपनीयतेच्या संदर्भात मोठा अडथळा ठरू शकतो.

याव्यतिरिक्त सुचविलेला गेलेला आणखी एक उपउपाय, ही माहिती सांकेतिक भाषेत लिहिलेली असावी आणि तिचे 'असांकेतिकीकरण' करण्याची किंवा तिचा उलगडा करण्याची व्यवस्था, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कालबद्ध करण्यात यावी असा आहे. हा प्रकार म्हणजे 'पुरलेल्या खजिन्याचा' ठावठिकाणा सांगणारी माहिती एका 'तिजोरीत' बंद असावी आणि त्या 'तिजोरीची किल्ली' कुठे ठेवली हे सांगणारी व्यवस्था ठराविक काळासाठी गुप्त राहील अशी काळजी घेण्यासारखे आहे. अर्थातच एकावर एक अशा प्रकारची सुरक्षाव्यवस्थेची आवरणे रचण्यासारखा हा उपाय आहे. दीर्घकालीन उद्दीष्ट लक्षात घेतल्यास, यातील एक जरी स्तर लोप पावला तर या 'खजिन्याचा शोध' ही एक मोहीम होऊन बसेल. मूळात दीर्घकालीन उद्दीष्ट लक्षात घेता, पहिल्या लेखांकातील गृहीतके अपयशी ठरण्याचे कोणतेही कारण या सुरक्षाव्यवस्थेच्या विरोधात जाऊ शकते.

थोडक्यात, लेखांक १ मधील मुद्दा क्रमांक २, अर्थात कालकुपी सापडण्याचा मुद्दा  आणि कालकुपीची गुप्तता यातील सुवर्णमध्य, कालकुपीच्या उद्दिष्टांना सफल करण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. हा सुवर्णमध्य सध्याच्या इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने साधणे, ही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी  फारशी उपयुक्त गोष्ट ठरेलच असे ठामपणे सांगणे अवघड आहे. तंत्रज्ञानातील बदलांचा, तंत्रज्ञान लोप पावण्याचा वेग दीर्घकालीन उद्दिष्टासाठी  मोठा अडथळा ठरु शकतो. सध्याच्या तंत्रज्ञानात वापरण्यात येणार्‍या गोष्टी देखील 'सर्व संकटांना' तोंड देऊन टिकून राहतीलच असे खात्रीपूर्वक म्हणता येणार नाही.  त्यामुळे नैसर्गिकरित्या उपलब्ध होणार्‍या आणि शक्य तितक्या नैसर्गिक आपत्तींना झेलूनही, प्रचंड काळ टिकून राहू शकतील, याची शक्यता अधिक असणार्‍या गोष्टीच कालकुपींच्या सुरक्षाव्यवस्थेसाठी वापराव्यात, हा मतप्रवाह तसा योग्य वाटतो. स्वाभाविकच अशा गोष्टींमध्ये पहिला संभाव्य उमेदवार आहे 'दगड' आणि दुसरा अतिकठीण, प्रचंड तापमानाला तोंड देऊ शकेल, न गंजेल, न क्षरेल असे मिश्रधातू. अतिशय टिकाऊ दगड वापरुन बनविलेल्या इमारती, वस्तु शतकानुशतकेच नव्हे तर काही सहस्रके टिकल्याची काही उदाहरणे इतिहासात आहेत.


कालकुपी दगड आणि / किंवा कणखर मिश्रधातू वापरुन तयार करावी आणि ती 'लपविण्याची' जागा

देखील तशाच प्रकारे दगड व दीर्घायुष्य असलेला मिश्रधातू वापरुन सुरक्षित केलेली असावी हा पर्याय तुलनेने अधिक योग्य वाटतो. कालकुपी लपविण्याची जागा ही मानवनिर्मित असावी की निसर्गनिर्मित, हा दोन्ही बाजूंना फायदे तोटे असणारा मुद्दा आहे. त्यामुळे दोन्हींचा संयोग साधून निर्माण केलेली जागा, अधिक उपयुक्त ठरावी हे मत देखील योग्य वाटते. तिचे ठिकाण सर्व संभाव्य नैसर्गिक आपत्तींपासून शक्य तितके सुरक्षित राहील असे असलेच पाहिजे, त्याचबरोबर ते अवेळी होणार्‍या सर्व प्रकारच्या मानवी वा अन्य हस्तक्षेपांपासून, आक्रमणांपासून सुरक्षित असले पाहिजे.  या जागेची आणि कालकुपीची तालन यंत्रणा (Locking Mechanism) देखील शक्यतो नैसर्गिक तत्वे (उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण) वापर करून बनविलेली असावीत. काही इंग्लिश चित्रपटांमधून अशा प्रकारच्या तालन यंत्रणेची चमत्कृती वापरलेली दिसते.  Indiana Jones चे चित्रपट आणि Lara Croft चे  चित्रपट विशेष उल्लेखनीय.

ही जागा कुठे असावी याबाबत देखील विविध मतप्रवाह आहेत, घनदाट अरण्यात, खाणींमध्ये खोलवर, समुद्राच्या तळाशी,  पर्वतांच्या अंतर्भागात, खोल दरीत, ज्वालामुखीच्या उद्रेकात वाहिलेल्या लाव्हामुळे बनलेल्या लाव्हाट्यूब्स किंवा लाव्हागुहांमध्ये आदि पर्याय विक्षिप्त वाटत असले तरी ते अगदीच अव्यवहार्य नाहीत. त्यातील प्रत्येकाचे फायदे-तोटे आहेत. मात्र कालकुपी अवकाशात किंवा एखाद्या अवकाशीय वस्तूवर ठेवण्याचा मार्ग, निर्विवाद अभिनव आहे.

कालकुपीच्या संभाव्य जागा आणि कालकुपीची रचना यासंदर्भात थोडा अधिक ऊहापोह  पुढील भागात.

====
क्रमश:
====

======

गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७

कालकुपी - १ / ५


समजा आजपासून पन्नास हजार वर्षांनी किंवा अगदी एक लाख वर्षांनंतर, पृथ्वीवर जी कोणती संस्कृती असेल, त्या संस्कृतीस आपली, आपल्या आजच्या संस्कृतीची, ज्ञानाची, क्षमतांची ओळख आपल्याला करून द्यायची आहे तर काय मार्ग अवलंबता येईल ?

मानवातर्फे सध्याचा वापरात असलेला मार्ग हा कालकुपीचा आहे.

कालकुपी (Time Capsule) म्हणजे दूरच्या भविष्यकाळातील संस्कृतीस, आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी, म्हणून वेळोवेळी जाणीवपूर्वक जमिनीत पुरून ठेवण्यात आलेले आणि अतिशय भक्कम असलेले 'पेटारे'. 'पेटार्‍यांचा' आकार कोणता हा प्रश्न इथे तुलनेने कमी महत्त्वाचा आहे.  या पेटार्‍यांमध्ये पत्रे, पुस्तके, यंत्रे, उपकरणे आणि इतरही अनेक मानवी संस्कृतीच्या, ज्ञानाच्या, विज्ञानाच्या खुणा ठेवल्या जाऊ शकतात. बरेचसे देश आज हा मार्ग अवलंबतात. आपल्या देशाने देखील एकापेक्षा अधिक वेळा हा पर्याय, अवलंबला आहे याची नोंद आहेच, शिवाय काही वेळा गुप्तपणे  अशी वदंता आहे. काही वेळा ही गोष्ट उघडपणे केली जाते, काही वेळा अत्यंत गुप्तपणे.  काही वेळा ती सरकारी असेल, काही वेळा खाजगी. काही वेळा ती अति मोठ्या प्रमाणावर आणि अतिदीर्घकालासाठी केली गेली असेल, तर काही वेळा अत्यंत मर्यादित उद्देशाने आणि केवळ काही दशकांचे उद्दीष्ट ठेवून.  काही वेळा ती एखाद्या मोठ्या प्रदेशाच्या संस्कृतीजतनाचे लक्ष्य ठेवून केली जाते, तर काही वेळा एखाद्या संस्थेच्या इतिहासाचे जतन करण्यासाठी.

आणि ही गोष्ट केवळ आजचा 'प्रगत' मानव करतो आहे असे नव्हे, अनेक प्रकारचे शिलालेख, स्मारके, मंदिरे कुठल्याही प्रकारच्या दगडांच्या माध्यमातून जपला गेलेला  इतिहास व संस्कृतीच्या खुणा या एकाप्रकारे हेच उद्दीष्ट साध्य करत आल्या आहेत. अगदी पिरमिड्सच्या बाबतीत ही शक्यता वर्तविली गेली आहे (स्फिंक्सच्या कानामागे काही एक गुप्त कळ असून ती योग्य वेळी उघडली जाईल वा उघडता येईल) किंवा पद्मनाभस्वामी मंदिरातील न उघडलेला कक्ष देखील अशा प्रकारचा असण्याची शक्यता वर्तविली गेली आहे ....

त्याही पलीकडे जाऊन Voyager मध्ये परग्रहवासींना 'मिळाव्यात' म्हणून पाठविल्या गेलेल्या मानवी संस्कृतीच्या, अस्तित्वाच्या खुणा, कदाचित अतिदूरच्या भविष्यात, पृथ्वीवरच्या तत्कालीन संस्कृतीसच सापडतील आणि त्यांच्यासाठी प्राचीन इतिहासाची साधने बनतील, ही शक्यता संभवते असे काही जणांचे मत आहे.







====
कालकुपी अतिदीर्घकाळासाठी पुरली जात असेल तर मानव बरीच गृहीतके धरून हा खटाटोप करतो आहे असे म्हणावे का ?

१) कुठल्याही संभाव्य संकटाला तोंड देऊ शकेल असा कालकुपीचा टिकाऊपणा

पृथ्वीवर सर्वसाधारण/नैमित्तिक प्रलयापासून ते अतिभयंकर Extinction Event पर्यंतचे कोणतेही संकट ओढवू शकते. कालकुपी ज्या कोणत्या पदार्थापासून तयार केली असेल, तो पदार्थ, कालकुपीचा आकार, त्यात साठविलेली सर्व सामुग्री, त्या सामुग्रीच्या मूळ रूपासह, गुणधर्मांसह, क्षमतांसह  कुठल्याही संकटात टिकून राहायला हवी. कालकुपी जेंव्हा अतिदूरच्या भविष्यकाळात उघडली जाईल तेंव्हा पृथ्वीवर जे काही वातावरण असेल, त्या वातावरणात देखील, कालाकुपीमधील  ती सामुग्री टिकून राहिली पाहिजे.


२) जिथे कालकुपी पुरली जात आहे ती जागा अतिदूरच्या भविष्यातील संस्कृतीला सापडू शकेल

पृथ्वीवरची जमीन-पाण्याची विभागणी, खंडांची रचना ही दीर्घकाळाचा विचार करता बदलत असते. भूस्तराची पातळी बदलत असते. आज जी जागा एखाद्या पर्वतशिखरावर आहे, ती अतिदीर्घकाळानंतर महासागराचा भाग होऊ शकते. अशा वेळेस ती कालकुपी त्या नवीन संस्कृतीस सापडेलच हे फार मोठे गृहीतक आहे.


३) कालकुपीतील सामुग्रीचा अर्थ नवीन संस्कृती लावू शकेल.

काही हजार वर्षांपूर्वीच्या संस्कृतीच्या भाषेचा, चित्रलिपीचा अर्थ न लावू शकण्याची अनेक उदाहरणे आजच्या वर्तमानात आहेत. हरप्पा, मोहंजोदारो ही दोन ठळक उदाहरणे आपल्या अधिक परिचयाची, पण अन्य अनेक उदाहरणे आहेत. आणि हा प्रश्न केवळ भाषा आणि लिपीपुरता मर्यादित नाही. भविष्यात ती भाषा आणि लिपी  जरी उलगडली तरी त्या गोष्टीमागचे संकेत, कारणे आपल्या आजच्या संस्कृतीला समजतीलच असे नाही. उदाहरणार्थ पिरमिड्समध्ये प्रचंड संपत्ती आणि गुलामांसह,  इजिप्तच्या राजांना पुरण्यामागे काय कारण असावे याबाबतीत आपण केवळ विविध तर्क केले आहेत, आणि हे तर्क आजच्या आपल्या आकलनाच्या अनुषंगाने आहेत. कदाचित मूळ उद्देश फार फार वेगळा, आपल्या कल्पनेच्या पलीकडला असू शकेल.  हाच विचार पुढे नेला, तर आपली भाषा, लिपी, संस्कृती, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान याचा काहीतरी भलताच अर्थ भविष्यकालीन संस्कृती लावू शकते ही शक्यता संभवते. नाही का  ?
काही वर्षांपूर्वी या संकल्पनेशी संबंधित एक विज्ञान कथा वाचली होती.  एका महाप्रलयानंतर निर्माण झालेल्या, नवीन संस्कृतीस एक तापमापक सापडतो आणि त्या तापमापकाच्या आतील पार्‍याचे (तापमानानुसार) होणारे चलनवलन पाहून, त्यावरचे आकडे पाहून त्याचा अर्थ न उमजलेली त्यावेळची संस्कृती त्या तापमापकालाच  निसर्ग देवतेची मागे राहिलेली खूण मानू लागते. ....


४) कालकुपी उघडता येणे किंवा कालकुपी उघडली जावी अशी परिस्थिती असणे

स्फिंक्स आणि पद्मनाभ मंदिर यांचे उदाहरण वर दिले आहे. जी कशी असेल हेच माहीत नाही वा त्यासंबंधीचे कल्पना, संकल्पनांचे अंदाज थिटे पडू शकतील, अशा संस्कृतीपर्यंत कालकुपी कशी उघडावी याचे ज्ञान पोहोचविणे हीच कदाचित प्रचंड मोठी समस्या ठरू शकते. शिवाय आजच्या कालकुपीचे, तिच्या बंद स्वरूपातल्या रूपासह,  त्या काळातील धर्म वा तत्सम संकलपनांमुळे दैवतीकरण (Sacred/Holy) होणे ही गोष्ट अशक्यप्राय नाही. अशी कोणतीही गोष्ट, कालकुपीच्या मूळ उद्दिष्टालाच, हरताळ फासणारी ठरू शकते. 


५) कालकुपीचे महत्त्व न उमजल्यामुळे वा नसल्यामुळे नाश वा दुर्लक्ष

घटकाभर असे समजा की पृथ्वीवर अतिप्राचीन काळी, एक अत्यंत प्रगत संस्कृती अस्तित्वात होती.  त्या संस्कृतीने, अतिदीर्घ काळाचा विचार करून, 'टिकू शकेल' या निकषावर, एका मोठ्या दगडी वास्तूची निर्मिती केली आणि त्या वास्तूचा त्यांची कालकुपी म्हणून उपयोग केला.  कालौघात त्या वास्तूवर, लाव्हाची, मातीची वा अन्य पदार्थांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर पुटे चढून, तिथे एक डोंगर, पर्वत निर्माण झाला. मात्र असे अनेक डोंगर, पर्वत आपल्या आजूबाजूला असल्यामुळे, त्या डोंगराचे वेगळे महत्त्वच आपल्या लक्षात आले नाही आहे. आपल्या दृष्टीने तो केवळ एक डोंगर आहे आणि आपल्या आजच्या तंत्रज्ञानाकडे त्या डोंगराच्या आत काही दडलेले आहे हे समजण्याची क्षमताच नाही. अशा वेळेस त्या कालकुपीचा उद्देश पूर्णपणे असफल झाला आहे असेच म्हणायला हवे.  हीच गोष्ट आपल्या कालकुपीच्या बाबतीतही भविष्यात घडणे, असंभव नाही.

दुसरी शक्यता कालकुपी नाश होण्यासंदर्भात आहे. आज आपल्याला एखादी भली मोठी शिळा सापडली तर कदाचित त्या शिळेचा तसाच उपयोग एखाद्या आपल्याला योग्य वाटेल अशा बांधकामात होऊ शकतो किंवा एखाद्या डोंगरात सुरुंगाचे स्फोट घडविताना, अजाणतेपणे त्या शिळेचा नाश देखील होऊ शकतो. आपली आजची कालकुपी,केवळ भविष्यकालीन संस्कृतीच्या अज्ञानामुळे, त्यांच्या एखाद्या प्रक्रियेसाठी कच्चा माल ठरू शकणे, अशक्यप्राय नाही.
आणखी एक शक्यता स्वारस्यासंबंधी आहे. ज्या कुठल्या संस्कृतीला अशी कालकुपी सापडेल, तिला आपला इतिहास उलगडण्यात स्वारस्य असेल असे आपण गृहीत धरत आहोत. इतिहासाकडे वळून बघण्याची त्यांना इच्छाच नसेल तर ? किंवा ते तंत्रज्ञानाच्या अशा पातळीवर (आपल्यापेक्षा खूप खालच्या स्तरावर किंवा अतिवरच्या स्तरावर) असतील, की जिथे आपली कालकुपी संपूर्णत: अप्रासंगिक ठरत असेल तर ?

====
क्रमश:
====

सोमवार, ४ डिसेंबर, २०१७

गुरुत्वाकर्षण - लेखांक ४ / ९

.... मागील लेखांकावरून पुढे ....

Gravitons चा शोध लागलेला नसतानाही गुरुत्वाकर्षणाचे कणस्वरूप आहे असे मानून त्याचा शोध घेण्याचा आवश्यकता का वाटावी ?  किंबहुना गुरुत्वाकर्षण हे प्रचंड वस्तुमानामुळे निर्माण झालेल्या वक्र अवकाशाचा परिणाम किंवा क्षेत्र आहे असे मानल्यावर गुरुत्वाकर्षणाचे कणस्वरूप कल्पिण्याची गरज का भासावी ? 

ह्याचे मूळ,  चार मूलभूत बलांच्या एकत्रीकरणासाठी केल्या जाणार्‍या प्रयत्नात आहे. 

अणुकेंद्रीय तीव्र बल (Strong Interaction), विद्युतचुंबकीय बल (Electromagnetic force) आणि अशक्त बल (Weak Interaction) ह्या तीन मूलभूत बलांचे वहन करणारे म्हणून अनुक्रमे  ग्लुऑन, फोटॉन आणि W व Z बोसॉन  हे मूलकण  मानले जातात. ह्या चारही बलांचे एकत्रीकरण करण्याचे जे काही प्रयत्न झाले आहेत, त्या ठिकाणी, गुरुत्वाकर्षणाचे वहन करणार्‍या एखाद्या मूलकणाचे अस्तित्व असणे आवश्यक ठरते.  Graviton च्या अस्तित्वाचे गृहीतक आणि शोधाची निकड ह्या आवश्यकतेशी प्रथमत: निगडीत आहे.

--

वक्र अवकाशात सरळ रेषादेखील वक्र का असते ह्याविषयी कालप्रवासाविषयीच्या लेखमालेत लिहिले होते.  वक्र अवकाशातील (अथवा वक्र पृष्ठभागावरील),
 दोन बिंदूंमधील सर्वात कमी अंतर दाखविणार्‍या ह्या सरळ रेषांना वैज्ञानिक/गणिती भाषेत Geodesic असे म्हणतात. गुरुत्वाकर्षण बल हा वक्र अवकाशाचा परिणाम आहे ही आईनस्टाईनची मांडणी स्वीकारल्यानंतर, एखादी अवकाशीय वस्तू, दुसर्‍या प्रचंड मोठ्या अवकाशीय वस्तूकडे 'आकर्षित' होत नसून, ती केवळ तिला लाभलेल्या वेगामुळे Geodesic वरून प्रवास करते आणि Geodesic अंतिमत: त्या वस्तूच्या दिशेने जात असल्यामुळे, ती अवकाशीय वस्तू अंतिमत: दुसर्‍या मोठ्या अवकाशीय वस्तूच्या दिशेने जाते असे म्हणणे भाग आहे. हे झाडावरून पडणार्‍या सफरचंदालाही लागू आहे, सफरचंद झाडावरून पडते, तेंव्हा ते ज्या Geodesic वरुन प्रवास करते, ती आपल्या डोळ्यांसाठी (आपल्या संदर्भचौकटीसाठी) सरळसोट असते.

त्यामुळे दुसर्‍या शब्दात सांगायचे झाले तर, 'गुरुत्वाकर्षण हे लौकिकार्थाने आकर्षून घेणार्‍या अवकाशीय वस्तूचे बल नव्हे !' असे म्हणायला हवे. पण आपले गणित, गणिती सूत्रे आणि भौतिकी संकल्पना, ह्या गुरुत्वाकर्षण हे बल असल्याची पुष्टी करतात. त्या बलाचे मान (सापेक्ष का होईना) आपल्याला करता येते. मग जर गुरुत्वाकर्षण बल असेल, तर केवळ स्थूल स्तरावरच नव्हे तर सूक्ष्म स्तरावर देखील त्याचा अनुभव यायला हवा, तसे प्रयोगाने सिद्ध करता यायला हवे. मात्र तसे सिद्ध करणे आपल्याला शक्य झालेले नाही. ह्याचाच दुसरा अर्थ असा असू शकतो का सूक्ष्म स्तरावर असलेल्या मूलभूत बलांपैकी, कोणते तरी एक बल स्थूल स्तरावर गुरुत्वाकर्षण म्हणून प्रकट होते का ?

गुरुत्वाकर्षण म्हणजे अवकाशकालाच्या वक्रतेचा परिणाम असेल, तर गुरुत्वाकर्षणाच्या लहरी म्हणजे त्या वक्रतेत निर्माण होणारे तरंग आहेत. सतरंजी आणि लोखंडी गोळ्याचे उदाहरणच जर पुढे न्यायचे म्हटले, तर असे म्हणता येईल की समजा त्या लोखंडी गोळ्याचा कुठल्याशा आघातांने एकाएकी स्फोट झाला, तर सतरंजीवर, त्या स्फोटाची जी कंपने पसरतील, ती कंपने म्हणजे गुरुत्वाकर्षण लहरी. LIGO (आणि VIRGO) प्रकल्पातील निरीक्षणांनंतर, गुरुत्वाकर्षण लहरींचे अस्तित्व आपण (सप्रयोग) मान्य केले आहे. अतिप्रचंड वस्तुमान असलेल्या आणि अतिदूर अंतरावर असलेल्या अवकाशीय वस्तूंची टक्कर झाली असता, निघणार्‍या गुरुत्वाकर्षण लहरींचे मापन, आपल्या इथे पृथ्वीवर करणे शक्य होत आहे, त्या लहरी किती दूरवरून आल्या आहेत (किंवा  किती वर्षांपूर्वी झालेल्या स्फोटातून निर्माण झाल्या आहेत) ह्याचे निदान करणे आज मानवाला शक्य झाले आहे.  ह्या प्रयोगांच्या शोधाची दिशा भविष्यात, आपल्याला Graviton च्या शोधाकडे देखील कदाचित नेईल.  Graviton च्या स्वरूपाविषयी वैज्ञानिकांचे काही आडाखे आहेत. तरीही ह्या आडाख्यांचा उपयोग करून, Graviton चा शोध लावणारे Detectors इथे पृथ्वीवर निर्माण करता येतील का ह्याविषयी अनेक वैज्ञानिक साशंक आहेत. सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यामध्ये चंद्र आला (खग्रास सूर्यग्रहण) तरीही सूर्याचे गुरुत्वाकर्षण, पृथ्वीवर अबाधित रहात असेल, तर त्याचा स्वाभाविक अर्थ हा होतो का, की गुरुत्वाकर्षणाचे  वाहक कण (असलेच तर ते)  चंद्राच्या आरपार जातात ?   जे 'वाहक कण' चंद्राच्या (वा इतर अवकाशीय वस्तूंच्या) आरपार जातात त्यांचा शोध पृथ्वीवरच्या एखाद्या प्रयोगादरम्यान लागण्याची शक्यता कितपत आहे हा देखील ह्या कारणास्तव चर्चिला गेलेला एक प्रश्न आहे.

थोडक्यात Graviton अस्तित्वात असलेच तर ते Neutrino प्रमाणेच कोणत्याही घन वस्तूमधूनही आरपार जाऊ शकतात. Neutrino ना शोधण्याच्या / निरीक्षण करण्याच्या पद्धती (Neutrino Detector) अस्तित्वात आहेत, पण सद्यस्थितीत केवळ अधिक उर्जाभार असणारे Neutrino शोधण्यासाठी त्या उपयुक्त आहेत असे लक्षात आले आहे.  आपल्या देशातही अशाच प्रकारचा एक प्रकल्प मदुराईजवळ, भूगर्भात ४,३०० फूट खोल, निकटच्या काळात अस्तित्वात येईल.  पण Graviton ना शोधण्यासाठी, अशाच प्रकारच्या  पद्धती उपयुक्त ठरतील असे वैज्ञानिकांना वाटत नाही.

Graviton साठीची शोध मोहीम पृथ्वीवर राबविता येणे शक्य नसल्यास ती अंतराळात राबवावी, ही साहजिकपणे मनात येणारी कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि तंत्रज्ञान ह्या दोन्हीबाबत, आपण सध्या तरी अनभिज्ञ आहोत. त्यामुळे एखाद्या मानवनिर्मित रचनेतून केलेल्या प्रयोगापेक्षा, विश्वात ज्या गोष्टी नैसर्गिकरीत्या उपलब्ध आहेत आणि ज्यांचे अचूक मापन आपण भविष्यकाळात करू शकू अशा दृष्टिकोनातून, काही वैज्ञानिकांच्या एका गटाने सुचविलेला उपाय, काहीसा  'Out of the box' प्रकारचा आहे. अर्थात हा उपाय योजण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान सध्या आपल्याकडे नाही. मात्र तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा वेग लक्षात घेता, येत्या दहावीस वर्षात असे तंत्रज्ञान, निदान त्या दृष्टीने शोधाची सुस्पष्ट दिशातरी, नक्की सापडेल असे अनुमान आहे. हा उपाय म्हणजे एक प्रकारची अप्रत्यक्ष सिद्धता आहे. ह्यात Gravitons ना शोधण्याचा प्रयत्न न करता, त्यांचे परिणाम शोधण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे. तसेच ते परिणाम Gravitons मुळेच झाले आहेत हे सिद्ध करावे लागणार आहे. Gravitons ना आपण मूलकण मानले आहे, त्यामुळे त्याचे परिणाम हे  कणभौतिकी (पुंजभौतिकी) स्तरावर दृश्यमान झाले पाहिजेत. अर्थात आपल्या विश्वातील, ह्या परिणामांचे निरीक्षण करण्यासाठी आपल्याला, विश्वाच्या त्या स्थितीचे निरीक्षण केले पाहिजे, ज्या स्थितीत हे परिणाम सर्वाधिक मापनयोग्य असतील.

----


आपल्या विश्वाची निर्मिती परमस्फोटातून (Big Bang) झाली ह्या विचारधारेच्या मान्यतेनुसार (आणि अत्यंत गुंतागुंतीच्या गणितानुसार ) :
दहाचा उणे त्रेचाळीसावा घात (१०^-४३ : ह्याला Planck Epoch असे म्हणतात), इतक्या अतिसूक्ष्म कालावधीत विश्वप्रसरणाची प्रक्रिया आरंभ झाली आणि त्यानंतर 'काळ' अस्तित्वात आला ! ह्या काळात लेखांक-१ मध्ये नमूद केलेली  चार मूलभूत बले एकत्र अवस्थेत होती. 

नंतरचा टप्पा हा Planck Epoch चा शेवट (१०^-४३) ते  शून्यावस्थेपासून दहाचा उणे छत्तीसावा घात (१०^-३६) इतका अत्यल्प काळ. ह्या कालावधीस Grand unification epoch अशी संज्ञा आहे.  ह्या अत्यल्प काळाच्या सुरुवातीस (किंवा Planck Epoch च्या अंती) गुरुत्वाकर्षण इतर मूलभूत बलांपासून वेगळे होण्याची प्रक्रिया घडली.

Grand unification epoch चा शेवट आणि शून्यावस्ठेपासून दहाचा उणे बत्तिसावा घात (१०^-३२) ह्या सूक्ष्मकाळात विश्वाचे प्रसरण प्रकाशापेक्षाही कितीतरी अधिक पटीने झाले आणि अतिसूक्ष्म आकारापासून ते काही प्रकाशवर्षे इतक्या अंतरापर्यंत विश्व प्रसरण पावले.

----

ज्या काळात गुरुत्वाकर्षण इतर मूलभूत बलांपासून वेगळे होण्याची प्रक्रिया घडली, त्या काळात गुरुत्वाकर्षणाचे कणस्वरूप, अर्थातच Gravitons प्रचंड घनतेने अस्तित्वात असायला हवे आणि नंतरच्या काळात जसजसे विश्वाचे प्रसरण होत गेले, तसतसे विश्वाच्या आकाराच्या तुलनेत Gravitons चे प्रमाण विरळ होत गेले असले पाहिजे. ह्यातून निघणारा स्वाभाविक अर्थ हा की Gravitons ची घनता विरळ होण्याच्या काळात, Quntum Functuations अर्थात पुंजभौतिकी स्तरावरील उर्जेत होणारे चढउतार हे प्रचंड प्रमाणात असले पाहिजेत.  हे उर्जेतील चढउतार आपल्याला मोजता आले किंवा त्या चढउताराचे जे परिणाम आपल्यासाठी आजही दृश्य असू शकतात, त्या परिणामांचे  मापन, आपण करू शकलो, तर अप्रत्यक्षपणे Gravitons चे अस्तित्व सिद्ध झाले असे म्हणता येईल. हे परिणाम दिसू शकतात Cosmic Microwave Background मध्ये.  (पहा विश्वाचे वय - लेखांक १) . अर्थात इतक्या सूक्ष्म  स्तरावर आणि परमस्फोटानंतरच्या अत्यल्पकाळात, Cosmic Microwave Background मध्ये घडलेल्या बदलांचे मापन करण्याजोगी क्षमता आपण अद्याप प्राप्त केलेली नाही. अचूक कालमापनाच्या संदर्भाने विचार करता, लेसर किरणांच्या माध्यमातून, दहाचा उणे अठरावा घात (१०^-१८) सेकंद इतक्या सूक्ष्म स्तरावर, स्पंदने निर्माण करण्याची क्षमता आपण प्राप्त केली आहे, मात्र ह्या स्पंदनाला, एखाद्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या सहाय्याने अचूकपणे मोजणे ही गोष्ट वेगळी आहे. तिथे आपली उडी, दहाचा उणे अकरावा घात (१०^-११) सेकंद, इथपर्यंतच पोहोचू शकली आहे. अर्थात अतिसूक्ष्म काळाला मोजण्याची क्षमता प्राप्त करणे ही भविष्यात निश्चितपणे साध्य होईल अशी गोष्ट आहे (It is just a matter of time :-)).

=========
थोडेसे अवांतर
=========
Graviton अस्तित्वात असले पाहिजेत असे मानणारे वैज्ञानिक आहेत, तसेच ते अस्तित्वात नसावेत असे मानणारा वर्ग देखील आहे. कृष्णविवरांचे गुरुत्वाकर्षण अतिप्रचंड असते हे आपण जाणतो. ज्या कृष्णविवरातून प्रकाशदेखील (अर्थात फोटॉन) निसटू शकत नाही, त्या कृष्णविवरातून गुरुत्वाकर्षणाचे वहन करणारे Graviton कसे निसटू शकतील हा प्रश्न दखल घेण्याजोगा आहे.  पर्यायाने हा प्रश्न 'Graviton' निर्माण कसे होत असावेत ह्या मुद्द्यालाच थेट स्पर्श करतो.
====

----
क्रमश :
----
===

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०१७

गुरुत्वाकर्षण - लेखांक ३ / ९


न्यूटनच्या गतीच्या नियमांनी भौतिकशास्त्रात क्रांती घडवली आणि त्याच्या गुरुत्वाकर्षणासंबंधीच्या नियमाने, गुरुत्वाकर्षणाला समजून घेण्याचे एक माध्यम दिले हे खरे असले; तरीही आईनस्टाईनने त्याचे सापेक्षतेचे सिद्धांत मांडण्यापूर्वीच,  न्यूटनच्या नियमातील त्रुटी काही प्रमाणात उघड झाल्या होत्या.  गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, ते का असते, ह्याचे उत्तर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणासंबंधीच्या नियमातून मिळत नव्हते, ना ह्यासंबंधी कोणताही ऊहापोह न्यूटनने त्याच्या ग्रंथात केला होता. न्यूटनसाठी गुरुत्वाकर्षण हे केवळ एक बल आहे. ते कोणत्याही माध्यमातून, कसा प्रवास करते (तरंग किंवा कण स्वरूपात) ह्यासंबंधी विचार तेंव्हा केला गेला नव्हता.  अर्थातच अशा स्वरूपाच्या विचारसरणीमुळे, दीर्घ अंतरावरील वस्तूंमध्ये गुरुत्वाकर्षण कसे काम करते ह्या बाबतीत पुरेशी स्पष्टताही  नव्हती.

चंद्रप्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी १.३ सेकंद लागतात, ह्याचा अर्थ असा होतो की समजा चंद्र एकाएकी नष्ट झाला तरीही त्यानंतर १.३ सेकंद तो आपल्याला दिसत राहील. मात्र  न्यूटनच्या नियमांच्या चौकटीत विचार केला असता, अशा प्रकारच्या घटनेनंतर, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा, पृथ्वीवर होणारा परिणाम तात्काळ थांबायला हवा. ह्यातून असा निष्कर्ष निघू शकतो की गुरुत्वाकर्षण बल, प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाने कार्य करते. अर्थातच हा निष्कर्ष चुकीचा आहे, ही आपली आजची धारणा अधिक योग्य आहे.

न्यूटनच्या नियमातील आणखी एक विसंगती,  बुधाची कक्षा निश्चित करताना दृग्गोचर झाली होती.  प्रत्येक ग्रहाची (आणि उपग्रहाची) कक्षा, त्या ग्रहाच्या (वा उपग्रहाच्या) प्रत्येक परिभ्रमणादरम्यान सूक्ष्मरित्या बदलते (त्याच्या कक्षेचे प्रतल बदलते). ह्या बदलास Apsidal precession (कक्षीय पूरस्सरण ?) असे म्हणतात.  आपल्या सूर्यमालेतील, त्यावेळेस ज्ञात असलेल्या ग्रहांच्या कक्षा निश्चित करताना न्यूटनचे ह्या संदर्भातील प्रमेय उपयुक्त ठरत होते, अगदी त्या ग्रहांचे Apsidal Precession विचारात घेऊन सुद्धा.  मात्र चंद्र व बुधाची कक्षा निश्चित करताना न्यूटनच्या नियमातील काही त्रुटी उघड होत होत्या. चंद्र हा उपग्रह असल्याने त्याची कक्षानिश्चिती Three-body Problem ह्या गटात (चंद्र, पृथ्वी, सूर्य) मोडत होती; मात्र बुधाचे तसे नव्हते. बुधाच्या कक्षेचे Apsidal precession अपेक्षित असलेल्या वेगापेक्षा अधिक वेगाने होत होते.  वास्तविक न्यूटनचे नियम परिपूर्ण नसल्याचा हा एक पुरावा होता, पण न्यूटनच्या सिद्धांतांवर व नियमांच्या अचूकतेवर अतूट श्रद्धा असणार्‍या काही वैज्ञानिकांनी ह्या संदर्भात विविध तर्क लढविले. नियमाला असणार्‍या अपवादाला नियमात बसविण्यासाठी केले गेलेले हे तर्क आज अतिशय मनोरंजक वाटतात :

१)  शुक्राचे वस्तुमान आपल्या अपेक्षेपेक्षा कदाचित खूप अधिक असावे व त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम बुधावर होत असावा,
२) सूर्याभोवती बुधापेक्षाही कमी अंतरावरून फिरणारा Vulcan नावाचा ग्रह असावा
३) बुधाजवळदेखील उपग्रहांचा एखादा पट्टा असावा
४) बुधाला एखादा उपग्रह असावा वगैरे
५) बुधाजवळ एखादा धुलीकणांचा मेघ असावा 
वगैरे

मात्र ह्यातील एकही तर्क निरीक्षणांच्या माध्यमातून सत्य ठरू शकला नाही.  बुधाच्या परिभ्रमणाचे आणि कक्षानिश्चितीचे कोडे उलगडले ते आईनस्टाईनने त्याचा सापेक्षतेचा सिद्धांत मांडल्यावर. एखाद्या तार्‍याजवळचा प्रदेश त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे कसा वक्र होतो, ताणला जातो, हे व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या माध्यमातून मांडले गेल्यावर, सूर्याच्या सर्वात जवळ असणार्‍या बुधाच्या विचित्र कक्षेचे गणित स्पष्ट झाले. 

आईनस्टाईनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताने गुरुत्वाकर्षणाला (बलापलीकडेही) वेगळे अस्तित्व दिले. इथे गुरुत्वाकर्षण SpaceTime च्या वक्रतेचा परिणाम आहे.  आईनस्टाईनच्या सिद्धांतात व्यक्त झालेले  SpaceTime म्हणजे काय, ह्याविषयी कालप्रवासाविषयी लिहीलेल्या लेखमालेत स्पष्टीकरण दिले होते (कालप्रवास - लेखांक ५ / ७), तरीही विषयाला अनुसरून थोडक्यात  सांगायचे म्हणजे, न्यूटनच्या नियमचौकटीत Space (म्हणजे कोणताही त्रिमित अवकाश : लांबी, रुंदी आणि उंची {किंवा खोली} ) आणि Time (काळ) ह्या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे. आईनस्टाईनने ह्या दोघांनाही एकत्र करुन SpaceTime (अवकाशकाळ) नावाची एक नवीन entity त्याच्या सिद्धांतात वापरली. (त्रिमित) अवकाश व काळ ह्यांच्या एकत्रीकरणामुळे, त्रिमित 'अवकाशकाळास' वेगळ्या चौथ्या अक्षाची गरज राहिली नाही. कोणत्याही वस्तूचे अवकाशातील स्थान, ह्या अवकाशकाळाच्या संदर्भ चौकटीत व्यक्त करणे शक्य झाले.  अवकाशकाळाला वस्तुमानामुळे वक्रता येते  (सतरंजी आणि लोखंडी गोळ्याचे उदाहरण => कालप्रवास - लेखांक ५ / ७).  जितके वस्तुमान अधिक, तितकी अवकाशकाळाची वक्रता देखील अधिक.  अवकाशकाळाच्या ह्या वक्रतेमुळे, त्या वक्रतेच्या परिसरात आलेल्या कोणत्याही वस्तूला , वक्रतेला कारणीभूत होणार्‍या मोठ्या वस्तूकडे 'घरंगळणे' क्रमप्राप्त ठरते. ही घरंगळण्याची क्रिया, वास्तविक त्या वक्रतेचा अटळ परिणाम आहे. हा परिणाम म्हणजेच गुरुत्वाकर्षण, असा आईनस्टाईनने काढलेला निष्कर्ष आज बहुतांश वैज्ञानिकांना मान्य आहे.

सतरंजी आणि लोखंडी गोळ्याचे उदाहरण, अवकाशकाळाच्या वक्रतेला समजून घेण्यासाठी ठीक आहे, पण ते समर्पक उदाहरण नाही.  ताणलेल्या सतरंजीला मधोमध ठेवलेल्या लोखंडी गोळ्यामुळे येणारी वक्रता, ही (काटेकोर विचार केल्यास) द्विमित पृष्ठभागाला येणारी वक्रता आहे.  कोणत्याही मोठ्या वस्तुमानामुळे अवकाशात अवकाशकाळाला येणारी वक्रता ही त्रिमित आहे. ह्या फरकास दुर्लक्षित केले तरीही वक्रतेच्या ह्या संकल्पनेतून स्वाभाविकपणे उत्पन्न होणारा प्रश्न हा आहे की, कोणतेही वस्तुमान अवकाशकाळाला वक्रता का आणते ?  सतरंजीला लोखंडी गोळ्यामुळे वक्रता येते, कारण सतरंजी चारही बाजूने ताणलेली आहे आणि लोखंडी गोळा स्वत:च्या  वजनामुळे (गुरुत्वाकर्षणामुळे) सतरंजीवर अधोगामी बल वापरतो.  लोखंडी गोळ्यामुळे सतरंजीवर निर्माण होणारा खळगा, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे निर्माण होतो. गुरुत्वाकर्षणरहित अवस्थेत (उदाहरणार्थ स्पेस स्टेशन मध्ये) अशी सतरंजी ताणून धरली आणि तिच्या मधोमध लोखंडी गोळा ठेवला तर तो त्या 'सतरंजीला' वक्र करेल का ?  शून्य गुरुत्वाकर्षणात जिथे पाणीसुद्धा विपरीत वागते, तिथे लोखंडी गोळ्याचे काय वेगळे होणार ?

गुरुत्वाकर्षणाबाबत पुरेसे ज्ञान मिळवण्यासाठी ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणे क्रमप्राप्त ठरावे की चतुर्मित अवकाशाला त्रिमित वक्रता का येते ? चतुर्मित अवकाश  कशामुळे  (, कुणी आणि) कुठे ताणले आहे !? किंवा लोखंडी गोळा आणि सतरंजीच्या उदाहरणाच्या अनुषंगाने विचार केला तर कुठल्याही अवजड (अवकाशीय) वस्तूमुळे (वस्तुमानामुळे) सर्व दिशांना ताण पडण्याचे निश्चित कारण कोणते ?

एखादी गोष्ट वक्र आहे असे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर अशी काहीतरी वस्तू येते, जिच्यात काही कारणामुळे दृश्य असणारी वक्रता आहे.  सतरंजीला येणारी वक्रता आपल्यासाठी दृश्य आहे कारण सतरंजी ही एक वस्तू आहे (किंवा पदार्थ आहे) .  अवकाशकाळाला वक्रता येते, म्हणजे नक्की कशाला वक्रता येते हा स्वाभाविकपणे मनात येणार प्रश्न. मग संदर्भचौकटच वक्र आहे म्हणजे काय ? आपण X, Y, Z ह्या तीन अक्षांनी बनलेला 'भवताल' वक्र आहे हे आपल्या डोळ्यासमोर आणू शकतो का ? बहुदा नाही.  ह्या भवतालात असलेली एखादी वस्तू वक्र आहे अशी कल्पना आपण करू शकतो. X, Y, Z ह्या तीन अक्षांनी बनलेली संदर्भचौकट आपल्या जगात आपल्याला वक्र झालेली दिसते का ? ह्याचे उत्तरही आपण बहुदा 'नाही' असेच देऊ.


अवकाशकाळ वक्र होतो म्हटल्यावर अवकाशकाळाचा वस्त्र (Fabric) म्हणून विचार करणे किंवा अवकाशकाळ कशापासून बनलेला आहे किंवा कशाने भरलेला आहे ह्याविषयी चिंतन करणे, हा कदाचित मानवी मेंदूच्या मूलभूत विचारप्रक्रियेचा एक भाग आहे. प्रत्येक गोष्ट ही, काहीतरी 'पदार्थ' (matter) किंवा ऊर्जा (energy) वापरुन बनलेली आहे, हे स्वीकारल्याशिवाय, आपला मेंदू अनेकदा त्या गोष्टीसंबंधी, अधिक खोलवर विचार करू शकत नाही.  कशानेही अवगुंठित नसलेली पोकळी वक्र आहे, हे डोळ्यासमोर आणणे खरंच अवघड आहे.  कदाचित ह्यामुळेच अंतराळ (खरंतर अंतराळातील पोकळी)  'ईथर' ने भरलेले आहे असा अपसमज पूर्वी रूढ होता. 




(त्या 'ईथर' ची जागा आज एका वेगळ्या प्रकाराने, गणिताने दाखविल्या गेलेल्या,   Dark Matter आणि Dark Energy ने घेतली आहे का ?  :-)  ) .  


आईनस्टाईनच्या मर्यादित सापेक्षता सिद्धांतात (Special Relativity - 1905) गुरुत्वाकर्षणाचा विशेष विचार नव्हता. तदनंतरच्या सात वर्षात आईनस्टाईनने, गुरुत्वाकर्षणाबाबत अधिक सखोल चिंतन केले आणि त्यासंबंधीचे निष्कर्ष व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या (General Relativity -1915) माध्यमातून जगासमोर मांडले. मात्र त्यातही अवकाशकाळ म्हणजे नक्की काय आहे (किंवा कशाने 'बनलेले' आहे) ह्यावर विस्तृत स्पष्टीकरण नाही. कदाचित त्यामुळेच अवकाशकाळ वक्र होतो, म्हणजे नक्की काय वक्र होते ह्यासंबंधी अनेक तर्क आजपर्यंत मांडले गेले आहेत.

--
थोडक्यात जर त्रिमित अवकाशातील तीन अक्षांचा विचार केला तर आपण असे निश्चित म्हणू शकतो की SpaceTime Fabric ह्या शब्दामुळे ज्या प्रकारचा पदार्थ डोळ्यासमोर येतो, तसे काहीही अस्तित्वात नाही. मात्र तरीही वक्र होणे  (Distort or Warp) ही क्रिया प्रत्यक्षात आणण्यासाठी अवकाशकाळ कशाने तरी बनलेला आहे किंवा संदर्भचौकट म्हणून विचार केल्यास, ती संदर्भचौकट कशाने तरी 'भरलेली' आहे असा विचार करणे स्वाभाविक आहे. ह्या विचाराच्या अनुषंगाने  'SpaceTime Fabric' ला मुख्यत्वेकरून ज्या तीन रुपात पाहिले गेले आहे, ती आहेत :

१) गुरुत्वाकर्षणाचे कणस्वरूप (Gravitons - ह्याचा शोध अजून लागलेला नाही.)
२) Cosmic Strings (String Theory नुसार)
३) Quantum Foam (SpaceTime चे स्वरुप सपाट नसून, एखाद्या अतिसूक्ष्म बुडबुड्यांनी तयार झालेल्या फेसाप्रमाणे अनियमित आणि निरंतर बदलणारे आहे. ही Quantum Mechanics आणि व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या, एकीकरणाच्या प्रयत्नातून उद्भवलेली संकल्पना आहे. )

ह्यापेक्षा वेगळा एक चौथा विचारही मांडला गेला आहे. त्यानुसार SpaceTime हा उर्जेने व्यापलेला आहे. अवकाशात आढळणार्‍या विविध अवकाशीय वस्तू (आणि पदार्थ) म्हणजे ऊर्जेचेच प्रचंड प्रमाणावर होणारे केंद्रीकरण आहे. (e = mc^2 ==> m = e / (c^2) ! ).  हे  महामहाकेंद्रीकरण  जिथे होते, तिथे पदार्थ (matter) निर्माण होतो आणि त्या अतिकेंद्रित ऊर्जेचे  क्षेत्र (field) म्हणजे गुरुत्वाकर्षण !  ( :-)  केवळ कल्पना म्हणून स्टारट्रेक मधील 'Beam me up' आठवायला हरकत नाही ! :-)  )


==== थोडे अवांतर ====

अंतराळ काही एक पदार्थाने भरलेले आहे, हे शोधण्याची वा तत्संबंधी कल्पना करण्याची एकेकाळी गरज वाटली, ह्याचे मूळ कारण, एखाद्या गोष्टीच्या प्रवासास काही एक माध्यम असावेच लागते असा समज त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात रूढ होता. ध्वनीलहरी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाहीत, कारण ध्वनीलहरींना प्रवास करताना माध्यमाची आवश्यकता असते हे लक्षात आले होते. एखादी ध्वनीलहर एखाद्या माध्यमातून प्रवास करताना, एका रेणुकडुन शेजारच्या दुसर्‍या रेणुकडे ध्वनीऊर्जेचे 'हस्तांतरण' करत असते. त्यामुळेच कदाचित दूरच्या अवकाशस्थ वस्तूकडून येणारा प्रकाश, निर्वात अंतराळातून आपल्यापर्यंत कसा पोहोचतो ह्याचे स्पष्टीकरण देताना निर्वात पोकळी 'ईथर' ने भरलेली असते हे गृहीत धरण्याची आवश्यकता वाटली असावी. मात्र प्रकाश हा फोटॉन कणांनी बनलेला असतो आणि तो कण व तरंग ह्या दोन्ही स्वरूपात व्यक्त होऊ शकतो हे लक्षात आल्यावर 'ईथर'ची आवश्यकता राहिली नाही.  तेच चुंबकीय क्षेत्राच्या बाबतीतही सत्य आहे.

(Vacuum चा योग्य अर्थ कोणत्याही स्वरूपाचे पदार्थ नसलेली रिक्त पोकळी असा आहे. आपण सध्या वापरत असलेला 'निर्वात पोकळी' हा शब्द काही तितकासा चपखल नाही. ह्यासाठी मी 'शून्यस्थान' असा आणखी एक शब्द वाचला होता, तो 'निर्वात पोकळी' पेक्षा बरा आहे.)

====

----
क्रमश :
----

===

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

गुरुत्वाकर्षण - लेखांक : २ / ९


.... मागील लेखांकावरून पुढे ....

गुरुत्वाकर्षणाचा शोध न्यूटनने (१६४२-१७२६) लावला, ह्याचा अर्थ असा होतो की, गुरुत्वाकर्षणाचा सैद्धांतिक इतिहास न्यूटनपासून सुरू झाला.  न्यूटनने गुरुत्वाकर्षणाला नियमांच्या, सूत्रांच्या चौकटीत बसविले,  पण पृथ्वीच्या अंगी असलेल्या आकर्षणशक्तीचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख असलेला किंवा अगदी गुरुत्वाकर्षणाशी संबंधित काही प्रयोगांचा इतिहास अधिक प्राचीन आहे. रामायण, महाभारत ह्यातील विमानांचे वर्णन हे निर्विवाद आकाशगामी वाहनांचे आहे ह्याबाबत शंका नसल्यास, गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान असल्याशिवाय आकाशगमन शक्य होणार नाही हे मान्य करायला फारसे अवघड जाऊ नये.

गुरुत्वाकर्षणाचा ओझरता उल्लेख असलेले, प्राचीन ग्रंथातील हे  काही श्लोक :

----
------------------------------
महाभारत शांतिपर्व, मोक्षधर्म (भांडारकर संशोधित आवृत्ती)
------------------------------
पंचमहाभूतांचे वर्णन करताना, 'पृथ्वी' (तत्वाचे) विविध गुणधर्म नमूद करणारा श्लोक   (अध्याय - २४७,  भीष्म उवाच)
भूमे: स्थैर्यं पृथुत्वं च काठीन्यं प्रसवात्मता  ||
गन्धो गुरुत्वं शक्तिश्च संघात: स्थापना धृति:  || ३ ||
(पाठभेद  आहेत)

(हे युधिष्ठिरा, ) भूमीची  स्थिरता, मोठा आकार (विस्तार ?), काठीण्य, उत्पादनक्षमता, गंध, गुरुत्व (गुरुत्वाकर्षण बल ?) शक्ती, एकत्रीकरण (समन्वय ?),  आधार देण्याची शक्ती, धारणा (हे गुण आहेत).

पंचमहाभूतांचे गुणवर्णन करताना भूमीचे म्हणजे पृथ्वीतत्वाचे गुण सांगितले आहेत, पृथ्वीचे नव्हे, ह्या आक्षेपात तथ्य नाही असे नाही,  पण तिथे भूमी असा शब्द वापरला आहे आणि वर्णिलेले सर्व गुण पृथ्वीशी जुळतात.

गुरुत्व म्हणजे मोठेपणा असा आकाराशी संदर्भ असलेला अर्थ असावा असे एक मत आहे, आणि त्याला पुष्टी देणारा अर्थ महाभारतात अन्यत्र दिसतो.  मात्र इथे पृथुत्वं ह्या शब्दात मोठेपणा, विस्तार व्यक्त झाला आहे असे वाटते.

गुरुत्व म्हणजे वजन किंवा जडत्व असा अर्थ आहे असे एक मत वाचले होते, पण जल(तत्वाचे) गुणधर्म सांगताना हा गुण दिलेला नाही.

====

षडदर्शनापैकी एक, वैशेषिक दर्शन ह्याची रचना कणादमुनींनी (इ.स. पूर्व २०० च्या आधी)  केली असे मानले जाते ह्यातील काही सूत्रे गुरुत्वाकर्षणाकडे अंगुलीनिर्देश करतात असे म्हणता येईल.

----

गुरुत्वप्रयत्नसंयोगानामुत्क्षेपणम् । १.१.२९ ।      (गुरुत्व प्रयत्न संयोगानाम् उत्क्षेपणम्   ==>  उत्क्षेपणम्  = वरती फेकणे)
इथे गुरुत्व म्हणजे जड असा अर्थ घेतल्यास वरती फेकण्याची क्रिया पुरेशी स्पष्ट होत नाही.  त्यातच संयोगानाम् हे षष्ठी बहुवचन आहे, द्विवचन नव्हे.  त्यामुळे तिसरी गोष्ट / क्रिया अध्याहृत आहे असे म्हणता येईल का ?

----

संयोगाभावे गुरुत्वात् पतनम् । ५.१.७ ।       (संयोग अभावे गुरुत्वात् पतनम्  ==> पतनम्  = खाली पडणे)
ह्या सूत्राच्या आधीच्या सूत्रांमध्ये मुसळ वापरताना हाताचा वापर आणि मुसळाची गती ह्याचा उल्लेख आहे. त्या अनुषंगाने इथे 'संयोग अभावे' म्हणजे मुसळ हातातून सुटल्यावर असा अर्थ लागतो.
इथे 'गुरुत्वात्' ही पंचमी (अपादान) आहे असे लक्षात घेऊन  'गुरुत्वापासून' => 'गुरुत्वामुळे' असा त्याचा अर्थ घेता येईल. नाही का ?
नोदनविशेषाभावान्नोर्ध्वं न तिर्यग्गमनम् । ५.१.८ ।    (नोदन विशेष अभावात ऊर्ध्वं न तिर्यक गमनम्) =>  ==>  नोदन = उत्तेजना, प्रेरणा,  तिर्यक => आडवा
उत्तेजक शक्तीच्या (Impulse) अभावी, वर वा आडवा (horizontal) जाऊ शकत नाही.

----

इथे बाणाच्या गतीचा उल्लेख आहे.
नोदनादाद्यमिषोः कर्म तत्कर्मकारिताच्च संस्कारादुत्तरं तथोत्तरमुत्तरं च । ५.१.१७ ।    (नोदनात् आद्यम् इषो: कर्म्म तत् कर्म्म कारितात् च संस्कारात् उत्तरं तथा उत्तरं उत्तरं च     ==>  नोदन = उत्तेजना, प्रेरणा,  इषु = बाण)
संस्काराभावे गुरुत्वात् पतनम् । ५.१.१८ ।  (संस्कार अभावे गुरुत्वात् पतनम् )

बाणाची गती लोप पावल्यावर 'गुरुत्वा'मुळे तो खाली पडतो असा अर्थ निघतो. इथे गुरुत्वाचा अर्थ जड असा अभिप्रेत असेल असे वाटत नाही.

--

अपां संयोगाभावे गुरुत्वात् पतनम् । ५.२.३ ।    (अपां संयोग अभावे गुरुत्वात् पतनम्     ==>   अपां  = पाणी)

---
====

भास्कराचार्यांच्या (१११४-११८५)  सिद्धांतशिरोमणि ह्या ग्रंथातील ह्या श्लोकात पृथ्वीच्या अंगी असणार्‍या आकर्षण शक्तीचा स्पष्ट उल्लेख आहे.  मात्र हा उल्लेख त्या शक्तीसंदर्भात फार काही सांगत नाही. वस्तूंना आकर्षून घेणारी विचित्र शक्ती असा आधीच्या एका श्लोकात उल्लेख आहे.
गोलाध्याय - भुवनकोश

आकृष्टिशक्तिश्च मही तया यत् खस्थं गुरुस्वाभिमुखं स्वशक्त्या |  (आकृष्टिशक्ति: च मही तया यत् खस्थं गुरु स्व अभिमुखं  स्व शक्त्या)
आकृष्यते तत्पततीव भाति,समे समन्तात् क्व पतत्वियं खे  || ६ ||    (आकृष्यते तत् पतति इव भाति, समे समन्तात् क्व पतति: इयं खे)
पृथ्वीकडे आकर्षून घेणारी शक्ती आहे.  तिच्या आकाशात (की आधार नसलेली असा अर्थ सूचित करायचा आहे ?)  स्थित मोठ्या आकाराच्या वस्तु स्वत:कडे स्वशक्तीने आकर्षून घेते. (त्यामुळे) ती (वस्तु) पडते असे वाटते.  सभोवती समान (असताना) आकाशात (ती) कुठे पडेल ?

----
अर्थात हे निर्विवादपणे मान्य करावयास हवे की ह्यापैकी कोणत्याही उल्लेखात गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतास आवश्यक असलेले गणित नाही, सूत्रे नाहीत.  उपलब्ध माहितीनुसार, गुरुत्वाकर्षणासंबंधी गणिताचा, त्यासाठी आवश्यक असणार्‍या  नियमांच्या चौकटीचा संशोधक न्यूटनच आहे.
----

पाश्चिमात्य जगातील गुरुत्वाकर्षणाचा इतिहासही आपल्याकडे उपलब्ध असलेल्या इतिहासापेक्षा फार वेगळा नाही.  अॅरिस्टॉटलची अशी धारणा होती की वस्तू खाली पडणे ही पृथ्वीच्या केंद्राची (म्हणजे विश्वाच्या केंद्राची !) नैसर्गिक वृत्ती आहे.  जड वस्तू, हलक्या वस्तूपेक्षा लवकर खाली पडते ह्या अ‍ॅरिस्टॉटलच्या मांडणीला. गॅलिलिओने सप्रमाण चूक सिद्ध केले, तरीही गुरुत्वाकर्षणाचे ज्ञान ह्यापुढे फार जाऊ शकले नव्हते.  केप्लरच्या नियमात गुरुत्वाकर्षणाचा विचार एका प्रकारे झालाच आहे, मात्र तसा स्पष्ट उल्लेख बहुदा नसावा.

वर म्हटल्याप्रमाणे The Principia ह्या नावाने संबोधल्या जाणार्‍या न्यूटनच्या ग्रंथानंतरच, गुरुत्वाकर्षणासंबंधीच्या अनेक नियम, धारणा, गणिते ही रूढ झाली. दोनशेपेक्षा अधिक वर्षांनी आईनस्टाईनने त्या नियमांना नवीन परिमाण दिले. सापेक्षता सिद्धांताच्या माध्यमातून. 

=========
थोडेसे अवांतर :
=========
Gravity आणि गुरुत्व  ह्या शब्दांमध्ये ग (G), र (R), त(T) आणि व(V) ही व्यंजने समान असावीत हा 'केवळ योगायोग' आहे !  :-)

====
क्रमश:
====

शनिवार, २५ नोव्हेंबर, २०१७

गुरुत्वाकर्षण - लेखांक १ / ९

===========
गुरुत्वाकर्षण : १ / ९
===========

कुठल्याही पदार्थाच्या सर्वात अधिक परिचित असलेल्या आणि भौतिकशास्त्राशी संबंधित अशा गुणधर्मापैकी, ज्या गुणधर्माचे आपल्याला सर्वात कमी ज्ञान आहे, तो गुणधर्म बहुदा 'गुरुत्वाकर्षण' हाच असावा.

अभ्यासक्रमाचा भाग म्हणून, गुरुत्वाकर्षणाची पहिली ओळख बर्‍याचदा न्यूटनच्या डोक्यावर पडलेल्या सफरचंदापासून होते. ही गोष्ट किमान सव्वातीनशे वर्षे जुनी असावी. ही सव्वातीनशे वर्षे म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यात होणार्‍या प्रगतीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आणि क्रांतिकारी काळ. ह्या काळात विज्ञानातील विविध शाखांची आणि त्यात असणार्‍या विविध विषयांची झालेली प्रगती अक्षरश: थक्क करून टाकणारी आहे. त्या विषयांच्या तुलनेत गुरुत्वाकर्षण हा विषय म्हणजे हुशार मुलांच्या तुकडीतील, पुष्कळ अपेक्षा असूनही बर्‍यापैकी मागे राहिलेला आणि तरीही वर्गशिक्षकांना ज्याचा नीटसा थांग लागलेला नाही असा विद्यार्थी. गुरुत्वाकर्षण ह्या विषयात मानवाची फारशी प्रगती का झाली नाही ह्याचे सर्वात सोपे उत्तर हेच आहे की, मूळात आपल्याला गुरुत्वाकर्षण म्हणजे नक्की काय तेच नि:संदिग्धपणे उलगडलेले नाही.

कुणीतरी न्यूटनच्या कथेच्या संदर्भात,  'सफरचंदाऐवजी न्यूटनच्या डोक्यात नारळ का नाही पडला' अशी टिप्पणी केली होती. त्या टिप्पणीमागचा, गणिताचा कंटाळा आणि त्या उद्वेगाच्या आठवणीमुळे सुचलेला विनोद समजून घेतल्यानंतरही, त्या व्यक्तीला न्यूटनचे आपल्यावर किती उपकार आहेत ह्याची कल्पना नाही, असे मला मनोमन वाटले होते.  आजच्या आपल्या वैज्ञानिक प्रगतीच्या पायाभरणीत, ५ जुलै १६८७ रोजी अधिकृतरित्या प्रकाशित झालेल्या आणि Principia ह्या नावाने सर्वसाधारणपणे  संबोधल्या जाणार्‍या न्यूटनच्या ग्रंथाचा, त्याच्या संशोधनाचा फार मोठा वाटा आहे.

गुरुत्वाकर्षण हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे .  शून्य गुरुत्वाकर्षणात, आपल्या दैनंदिन आयुष्यातील, आपण स्वाभाविकपणे गृहीत धरलेल्या, अगदी साध्या साध्या गोष्टीही विलक्षण अवघड होतात. शाळेत असताना 'अमुक नसते तर', 'तमुक झाले तर' अशा कल्पनांचा विस्तार करणारे निबंध लिहावे लागत असत. 'गुरुत्वाकर्षण नसते तर' हा अशाच प्रकारच्या एका निबंधाचा (खरं तर प्रबंधाचा) विषय होऊ शकला असता, इतक्या आपल्या आयुष्यातील असंख्य गोष्टी,  गुरुत्वाकर्षणाशी ह्या ना त्या प्रकारे निगडीत आहेत.  एकेकाळी खगोलशास्त्रावरची माहिती, आज जितक्या प्रमाणात आणि जितक्या सहजपणे उपलब्ध आहे, तितक्या सुलभतेने आणि विपुल प्रमाणात उपलब्ध नव्हती, त्यावेळी वरळीला तारांगणातील घुमटावर, खगोलविषयक नवनवीन लघुपट बघणे हा माझा नेम होता. हा लघुपट बघणे, हे जरी प्रमुख निमित्त असले तरीही, तिथे असलेल्या वजनाच्या काट्यांवर, विविध ग्रहांवर आपले वजन किती होईल हे बघण्याचे, वयाशी विपरीत असे एक बालसुलभ आकर्षणही मला होते आणि ते वजन कसे ठरवतात ह्यामागचे गुरुत्वाकर्षणाचे गणित समजल्यानंतरही, ते आकर्षण काही काळ टिकून राहिले होते.

गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ह्याची  'गुरुत्वाकर्षण म्हणजे दोन वस्तूंमध्ये, त्यांच्या वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समप्रमाणात आणि त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असलेले आकर्षण' ही सूत्रबद्ध पुस्तकी व्याख्या आपल्याला पृथ्वीसापेक्ष गणिताचे एक साधन नक्की देते,पण तरीही गुरुत्वाकर्षण म्हणजे नेमके काय ह्याचे उत्तर ही व्याख्या देत नाही. 

पदार्थ कशापासून बनलेले असतात ह्याचा शोध मूलद्रव्य, अणू, अणुकेंद्रातील कण असा प्रवास करत सध्या मूलकणांशी येऊन थांबला आहे. तशाच प्रकारे, सध्याच्या मान्यतेनुसार, विश्वातील सर्व क्रिया, ज्या नैसर्गिक बलांच्या माध्यमातून व्यक्त करता येतात, तो प्रवासही काही दशकांपूर्वीच, चार मूलभूत बलांशी येऊन ठेपला आहे (आणि आजही तो जवळपास त्याच स्तरावर आहे !) .  ही चार मूलभूत बले आहेत :  अणुकेंद्रीय तीव्र बल (Strong Interaction अर्थात मूलकणांना एकत्र ठेवणारे बल), विद्युतचुंबकीय बल, अशक्त बल (Weak Interaction अर्थात किरणोत्सर्गास कारणीभूत ठरणारे बल) आणि गुरुत्वाकर्षण बल.  ह्या बलांची शक्तीची तुलना केली तर गुरुत्वाकर्षण बल हे सर्वात तळास राहते. गुरुत्वाकर्षणाच्या तुलनेत अशक्त बल साधारणत: दहाचा पंचविसावा घात इतके बलवान आहे, विद्युतचुंबकीय बल हे दहाचा छत्तिसावा घात तर तीव्र बल हे दहाचा अडतीसावा घात इतके प्रबळ आहे. ह्या प्रत्येक बलास स्वत:चे असे एक क्षेत्र असते आणि तीव्र आणि अशक्त बलाच्या बाबतीत ते स्वाभाविकच अतिसूक्ष्म अंतराचे आहे आणि इतर दोन बलांसाठी त्या तुलनेत प्रचंड विस्तृत.  ह्यापैकी कुठल्याही बलाचा प्रभाव जाणविण्यासाठी अंतिमत: मूलकणांचीच आवश्यकता भासते असे आजचे विज्ञान मानते, मात्र गुरुत्वाकर्षणाच्या संदर्भात Graviton नावाचा जो मूलकण कल्पिला गेला आहे, तो मूलकण अद्याप सापडलेला नाही. इतर अनेक मूलकणांप्रमाणे गुरुत्वाकर्षण हे कण व तरंग ह्या दोन्ही स्वरूपात अस्तित्वात आहे ह्या समजाला मर्यादित पुष्टी देणार्‍या, गुरुत्वाकर्षण लहरी 'सापडून' वर्षापेक्षाही अधिक काळ लोटला, तरीही  Graviton ह्या मूलकणाचे स्वतंत्र अस्तित्व न सापडल्याने किंवा हे अस्तित्व वैज्ञानिक कसोट्यांवर सिद्ध न करू शकल्याने गुरुत्वाकर्षणाच्या भोवती अजूनही काही प्रमाणात संदिग्धतेचे धुके आहे .

------
क्रमश :
------

===

रविवार, १५ ऑक्टोबर, २०१७

समांतर विश्वे - लेखांक अवांतर


समांतर विश्वांच्या बाबतीत विश्वास-अविश्वासाच्या सीमारेषेवर असलेल्या काही कथा आहेत. या कथांची भाकडकथा म्हणून संभावना करणारे लोक आहेत, या कथांची चिरफाड करणारे लोक आहेत, तसेच कदाचित या कथांमध्ये कदाचित काही तथ्य देखील असू शकेल असे मानणारे लोकही आहेत. Close Encounter च्या काही कथांमध्ये ज्याप्रमाणे त्यात सहभागी असलेल्या काही व्यक्तींना खोटे बोलण्याचे कोणतेही कारण सकृतदर्शनी नसावे असे वाटते, त्याचप्रमाणे इथेही काही घटना प्रसिद्धी वा आर्थिक लाभाच्या आशेने प्रसृत झाल्या नसाव्यात असे मानायला जागा आहे.

----

जुलै १९५४ मधल्या एका दुपारी टोकियो विमानतळावर एका व्यक्तीने प्रवेश केला.  त्या व्यक्तीचा काहीसा बावरलेला चेहेरा पाहून, विमानतळावरील सुरक्षा अधिकार्‍याला संशय आला आणि या व्यक्तीची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान असे आढळून आले की या व्यक्तीचा पासपोर्ट Taured या देशाचा होता. प्रथमदर्शनी पासपोर्ट बनावट असावा असे त्यात काहीही नव्हते. पण महत्त्वाची गोष्ट ही होती की या नावाचा देश अस्तित्वातच नव्हता !

दुर्दैवाने या घटनेबाबत पुरावा म्हणता येईल असा अधिक तपशील, अधिकृतरित्या उपलब्ध नाही. इंटरनेटवर या घटनेची काहीशी अधिक विस्तृत गोष्ट उपलब्ध आहे, पण त्यातील तपशील हा एखाद्याच्या कल्पनाशक्तीतून नंतर भरला आहे की काय याची शंका येते.

विस्तृत कथा आणि उपयुक्त कमेन्ट्स.   :

https://www.reddit.com/r/UnresolvedMysteries/comments/1zsyz2/on_july_1954_a_man_arrives_at_tokyo_airport_in/?st=ixg6d3xq&sh=9ae950d3


पण अशा प्रकारची सांगण्यात येणारी ही एकमेव घटना नाही. पण यातील बर्‍याचे घटनांचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. स्वाभाविकच विविध लेबल लागलेल्या अवस्थेत या कथा इंटरनेटवर आढळतात. शक्य तिथे मी संबंधित लिंक्स दिल्या आहेत.


१) Green children of Woolpit ही १२व्या शतकातील दंतकथा देखील अशाच प्रकारच्या रहस्यात गुरफटलेली आहे. त्वचेचा रंग हिरवा असणारी दोन मुले इंग्लंडमधील Woolpit गावात एकाएकी अवतरली. बाकी त्यांच्या शरीरयष्टीत फार फरक नव्हता, पण भाषा अनोळखी होती, त्यांनी परिधान केलेली वेष वेगळे होते.  खाण्याच्या सवयी विलक्षण होत्या, पण हळूहळू ते आपले अन्न खायला शिकले आणि त्यांच्या त्वचेचा रंग आपल्यासारखा होत गेला.   कालांतराने आजारी पडून त्यांच्यातील मुलगा मरण पावला, मुलगी जगली, वाढली, तिने इंग्लिश आत्मसात केली आणि तिच्या मूळ प्रदेशाचे आणि ती इथे कशी आली याचे वर्णन केले.  ....

कथा आणि संभाव्य स्पष्टीकरण :   https://en.wikipedia.org/wiki/Green_children_of_Woolpit

--
२) १८५१ मध्ये Joseph Vorin (किंवा (Jophar Vorin) नामक, काहीसे वेगळ्या पद्धतीचे जर्मन बोलणार्‍या, एका व्यक्तीला जर्मन सुरक्षा अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले होते. या व्यक्तीचा असा दावा होता की तो Sakria नावाच्या देशातील Laxaria नामक ठिकाणावरून आला आहे. अशा नावाचा देश कधीही अस्तित्वात नव्हता.

विस्तृत कथा  :  http://coolinterestingstuff.com/the-strange-mystery-of-jophar-vorin

--

३) James Richards असे टोपणनाव धारण करणार्‍या  व्यक्तीने तिचा अनुभव या संकेतस्थळावर शेअर केला आहे. खरेखोटे देव जाणे.

विस्तृत कथा  : http://thebeatlesneverbrokeup.com/index.php?option=com_content&view=article&id=1&Itemid=53

दंभस्फोट :  https://medium.com/much-stranger-than-fiction/everyday-chemistry-the-story-behind-the-greatest-beatles-albums-that-never-existed-517fb5f415fd#.tg6miooxn

--

४) Carol Chase McElheney या स्त्री ने सांगितलेल्या अनुभवानुसार तिने Riverside, California या तिच्या गावात,  विचित्र प्रसंग अनुभवला आहे. एका प्रवासाच्या दरम्यान तिला, तिच्या गावाकडे जाणारा रस्ता दिसला आणि गावाची ओढ तिला गावात घेऊन गेली. पण तिला तिच्या गावात परिचयाचे असे विशेष काहीही सापडेना. तिला तिथे असलेल्या माणसांशी बोलावे असे वाटतच नव्हते.  जेंव्हा दफनभूमीत तिच्या आजोबा व आजीची थडगी देखील सापडली नाहीत तेंव्हा मात्र ती अत्यंत अस्वस्थ झाली आणि त्या गावातून शक्य तेवढ्या लवकर बाहेर निघण्याची इच्छा तिला झाली आणि तिने तसेच केले.  कालांतराने तिला पुन्हा त्या गावात जायची वेळ आली तेंव्हा सर्व परिस्थिती तिला  तिच्या परिचयाच्या सर्व खुणा सापडल्या, तेथील परिस्थिती पूर्ववत होती.

विस्तृत कथा : http://mysteriousuniverse.org/2013/08/stepping-into-a-parallel-dimension/

--

५) Lerina García या उच्चशिक्षित स्त्रीला आलेला अनुभव हा तिच्यासाठी प्रचंड त्रासदायक होता. एके दिवशी सकाळी उठल्यावर तिला जगातील अनेक गोष्टी बदलल्या आहेत असे 'लक्षात'आले. तिच्या बेडवरील चादरी, तिने अंगात घातलेले कपडे हे सर्व तिला आठवत असणार्‍या गोष्टींशी जुळत नव्हते. तिच्या कामाच्या जागेत तिला काहीही परिचयाचे आढळत नाही. ज्या जोडीदारापासून तिच्या म्हणण्यानुसार ती ६ महिन्यांपूर्वी वेगळी झाली होती, तो जोडीदार काहीही न घडल्यासारखा तिच्या बरोबर राहत होता. पहिल्या जोडीदाराला सोडल्यानंतर, ती चार महिन्यांपासून ज्या दुसर्‍या जोडीदाराबरोबर राहत होती, त्याचा, त्याच्या नातेवाईकांचा मात्र कुठलाही थांग लागत नव्हता. या संदर्भात जेंव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी केली तेंव्हा neurological malfunction थोडक्यात मेंदूत बिघाड असे निदान करण्यात आले.

विस्तृत कथा :  http://topfoundfootagefilms.com/parallel-universe-found-lerina-garcia

--

६) Pedro Oliva Ramirez याने सांगितलेल्या त्याच्या अनुभवानुसार, स्पेनमधील Seville ते  Alcala de Guadaira या त्याला परिचित असलेल्या रस्त्यावर, त्याने चुकीचा फाटा निवडला आणि त्याची कार  सर्वस्वी अनोळखी अशा सहा पदरी रस्त्यावर पोहोचली. रस्त्याच्या आजूबाजूला असलेली बांधकामे, बाजूने जाणारी वाहने, सभोवतालचा भूभाग इतके वेगळे वाटत होते की त्याच्या मनात विलक्षण घुसमट दाटून आली. साधारण एक तासाच्या अस्वस्थ प्रवासानंतर, त्याला Alcabala कडे जाणारा फाटा दिसला. त्या फाट्याला लागताच, काही वेळातच तो Alcala de Guadaira मधील त्याच्या घरासमोर होता. थोडा वेळ भ्रमित अवस्थेत घालविल्यानंतर त्याने ज्या रस्त्याने तो आला होता तो रस्ता शोधण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला तो फाटा, रस्ता पुन्हा सापडला नाही.

--

७) १९७२ च्या मे महिन्यात एका रात्री, Utah मधील एका वाळवंटाजवळून जाणार्‍या, सुनसान डांबरी रस्त्यावर प्रवास करणार्‍या चार मुलींना असाच चमत्कारिक अनुभव आला. एका फाट्यावर त्यांनी चुकीचे वळण घेतले आणि पुढचा रस्ता हा संपूर्णपणे सिमेंटचा लागला. काही वेळ त्या रस्त्यावर कार चालविल्यानंतर आपण चुकीचा रस्ता निवडला असे वाटून त्यांनी यू-टर्न घेतला आणि त्यांना नंतर जे आढळले ते अत्यंत चमत्कारिक होते. त्या सुनसान रस्त्याची जागा आता पिकांनी डवरलेल्या शेतांमधून जाणार्‍या रस्त्याने घेतली होती.वाळवंटाचा मागमूसही नव्हता. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका दुकानात योग्य मार्ग विचारावा म्हणून त्यांनी कार थांबवायचे ठरविले पण त्यांच्यातल्या एका मुलीने अचानक किंचाळायला सुरुवात केल्यामुळे त्यांनी विचार  बदलला. त्या मुलीच्या किंचाळण्याचे कारण होते त्यांच्या दिशेने येणारी चार विचित्र वाहने. अतिशय घाबरलेल्या स्थितीत त्यांनी त्या रस्त्यावर कार दामटवली. थोड्याच वेळात तो वाळवटातून जाणारा डांबरी रस्ता पुन्हा लागला. ओळखीच्या खुणा दिसायला लागल्या. पण एव्हाना त्या धांदलीत त्यांच्या गाडीचे तीन टायर पंक्चर झाले होते. रात्रभर त्या ठिकाणी थांबल्यानंतर दुसर्‍या दिवशी गस्त घालणार्‍या एका पोलिसाला अडवून त्यांनी सर्व कहाणी सांगितली.

विस्तृत कथा आणि दंभस्फोटाचा दावा :

https://thephillytalker.wordpress.com/2014/08/20/the-debunker-files-the-gadianton-canyon-incident/

==

अशा आणखीही अनेक कथा आहेत. सर्वच काही इथे देणे शक्य नाही. पण या सर्व कथा खर्‍या असोत वा रचलेल्या, त्या ज्या गोष्टीकडे निर्देश करतात, ती गोष्ट या लेखमालेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे.  या सर्व घटनांमध्ये समान असलेला धागा आहे तो म्हणजे अदृश्य, अपरिचित असलेल्या व काही कारणाने  ठराविक काळासाठी आपल्या विश्वाशी जोडल्या गेलेल्या समांतर विश्वाचा किंवा एखाद्या अनोळखी मितीचा.  शक्य तिथे मी लिंक दिल्या आहेत. ज्यांना अधिक उत्सुकता आहे व जिथे लिंक्स नाहीत, तिथे ते नाव कॉपी-पेस्ट करून एखाद्या Search Engine मध्ये शोधावे. कुतूहल चाळवणारे आणि शमवणारे बरेच काही सापडेल.

असत्य कथा लिहून, प्रसारित करणार्‍या वा त्यायोगे प्रसिद्धी व अन्य लाभ मिळवणार्‍या लोकांची संख्या जशी कमी नाही, तशीच  दंभस्फोटाचे (debunk) दावे करणार्‍यांची देखील संख्या कमी नाही.  एखाद्या घटनेच्या दंभस्फोटाचा (debunk) पद्धतशीर पंचनामा करणे हा देखील काहीजणांसाठी,  कुठल्याही रहस्यमय घटना मूळातून नाकारण्याचा, घटनेतील सत्याला दडपून टाकण्याचा (cover-up), नियमित वाचकवर्ग आकृष्ट करण्याचा आणि त्यायोगे प्रसिद्धी व काही वेळा आर्थिक लाभ प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे.  त्यामुळे कथा खर्‍या असतीलच असे नाही हे जितके सत्य तितकेच दंभस्फोटाचे दावे हे देखील अंतिम सत्य असेलच असे नाही.    :-)

आधुनिक काळातील या कथांकडे कदाचित आपण भाकडकथा म्हणून दुर्लक्ष करू, पण अतर्क्य, विचित्र अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला येत असतात. आपल्या लिखाणातून, गप्पांच्या दरम्यान कित्येकांनी ते व्यक्तही केले असतील. काही जणांना ते अद्भुत वाटले असतील, तर काही जणांना बाता.  काही जणांनी मनोमन त्याचे विश्लेषण करण्याचा प्रयत्नदेखील केला असेल.  बर्‍याचदा अशा कथांचे सुयोग्य documentation आणि त्याचा शास्त्रशुद्ध पाठपुरावा करण्याचा प्रयत्नच झाल्याचे वा तशा प्रकारचा शोध घेण्याचे प्रयत्न करणारी, एखादी संस्था, निदान भारतात तरी असल्याचे ऐकलेले नाही.  काही वेळेस या संदर्भातील चर्चा रंगली असता, केवळ गंमत म्हणून रचून कथा सांगणारे देखील वाहत्या गंगेत हात धुवून घेतात किंवा अनुभव सांगणार्‍याची टवाळी झाली तर अस्सल अनुभवांना देखील अविश्वसनीयतेचा ठपका लागतो आणि यदाकदाचित त्यात काही तथ्य असले तर ते हरवून जाते.

--

== थोडेसे अवांतरातील अवांतर ! ==

आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये समांतर विश्वांसंबंधी अशा प्रकारच्या कथा नाहीत. काही दुसरे उल्लेख आहेत, त्यासंबंधी पुढच्या लेखांकात.  समांतर विश्वासंबंधी वाटेल पण तशी नसलेली प्रमुख कथा आहे विश्वामित्राने निर्माण केलेल्या प्रतिसृष्टीची.

http://satsangdhara.net - श्रीमद् वाल्मीकि रामायणे, बालकाण्डे,  षष्टितमः सर्गः

ऋषिमध्ये स तेजस्वी प्रजापतिरिवापरः ॥ २० ॥
सृजन् दक्षिणमार्गस्थान् सप्तर्षीनपरान् पुनः ।
नक्षत्रवंशमपरमसृजत् क्रोधमूर्च्छितः ॥ २१ ॥

तत्पश्चात् तेजस्वी विश्वामित्रांनी ऋषिमण्डळींच्या देखत दुसर्‍या प्रजापति समान दक्षिण मार्गासाठी नविन सप्तर्षिंची सृष्टि केली तथा क्रोधाने युक्त होऊन त्यांनी नविन नक्षत्रेंही निर्माण केली. ॥ २०-२१ ॥

दक्षिणां दिशमास्थाय ऋषिमध्ये महायशाः ।
सृष्ट्वा नक्षत्रवंशं च क्रोधेन कलुषीकृतः ॥ २२ ॥
अन्यमिन्द्रं करिष्यामि लोको वा स्यादनिन्द्रकः ।
दैवतान्यपि स क्रोधात् स्रष्टुं समुपचक्रमे ॥ २३ ॥

ते महायशस्वी मुनि क्रोधाने आवेशित होऊन दक्षिण दिशेत नूतन नक्षत्रमालांची निर्मिती करून असा विचार करू लागले की, 'मी दुसर्‍या इंद्राची सृष्टि करीन अथवा माझ्याद्वारा रचित स्वर्गलोक इंद्राशिवायच असेल.' असा निश्चय करून त्यांनी क्रोधपूर्वक नूतन देवतांची सृष्टि करण्यास प्रारंभ केला. ॥ २२-२३ ॥

 हा उल्लेख अर्थातच वरील पैकी कोणत्याही मांडणीत अचूकपणे बसत नाही. तसेच ही केवळ रूपक कथा असून, अवकाशात घडलेल्या काही घडामोडीशी तिचा संबंध असावा असे एक मत आहे. (Crux - Southern Cross पहा). 

पण तरीही दक्षिण गोलार्धातून दिसणार्‍या नक्षत्राचा उल्लेख रामायणात यावा हे विशेष आहे.

--

======
समाप्त
======