गुरुवार, ३ जानेवारी, २०१९

खगोलीय वस्तू‌ वर्गीकरण - ४


भूमी किंवा वातावरणाची रासायनिक संरचना ह्यानुसार होणारे उपगट पुढीलप्रमाणे :

१.रच.१)
Chthonian planet (अस्थिपंजर ग्रह)
ग्रहाच्या भोवती असलेले वातावरण त्याच्या साठी एखाद्या वस्त्राप्रमाणे असते. ते त्याच्या शरीराचे संरक्षण करते. पण एखादा ग्रह, त्याच्या तार्‍याच्या भोवती अगदी जवळून परिभ्रमण करत असेल आणि तो तारा बर्‍यापैकी मोठा असेल, तर ही शक्यता बरीच आहे की तो तारा त्या ग्रहाचे वस्त्रहरण तर करेलच, पण दीर्घकालांतराने, त्याच्या भूपृष्ठाच्या वरच्या स्तरास देखील, तो तारा टप्प्याटप्प्याने गिळंकृत करेल. आणि मग उरेल केवळ त्या ग्रहाचा गाभा (core). HD 209458 b ह्या ग्रहाचा प्रवास, अशा रितीने अस्थिपंजर होण्याकडे चालू आहे असे आजचे अनुमान आहे. 

१.रच.२)
Carbon planet (कर्बप्रधान ग्रह)
आपल्या दुर्दैवाने असा कोणताही ग्रह पृथ्वीच्या पुरेसा निकट नाही अन्यथा तिथे जाण्यासाठी येत्या शतकात, प्रगत देशांमध्ये आणि व्यावसायिक सम्राटांमध्ये  चढाओढ लागेल हे निश्चित. आणि त्याचे महत्त्वाचे कारण आहे, तिथे हिर्‍यानी बनलेले प्रचंड मोठे पर्वत आणि हायड्रोकार्बन संयुगांची सरोवरे एकाच वेळी असण्याची शक्यता. एखाद्या ग्रहाचा जन्म होताना त्याला जी साधनसामुग्री लाभेल, त्यानुसार त्याची जडणघडण होणार हे उघड आहे. समजा एखाद्या ग्रहाला लाभलेल्या साधनसामुग्रीत कार्बनचे प्रमाण अतिप्रचंड असेल आणि तिथे ऑक्सिजनची प्रचंड टंचाई असेल, तर अशा प्रकारचा ग्रह निर्माण होऊ शकतो की ज्याचा अंतर्भाग धातूंनी बनलेला आहे, त्याच्या भोवती कर्बप्रधान संयुगांचे आवरण आहे आणि वारंवार होणार्‍या ज्वालामुखींच्या उद्रेकातुन जिथे, अंतर्भागात निर्माण होणार्‍या हिर्‍यांच्या राशी पृष्ठभागावर भिरकावल्या जाऊन, कालांतराने त्या हिर्‍यांनी समृद्ध असलेल्या पर्वतराजी निर्माण होत आहेत किंवा अंतर्भागातील हायड्रोकार्बन संयुगे पृष्ठभागावर सरोवरांची निर्मिती होण्यास कारणीभूत होत आहेत.  55 Cancri e हा कदाचित अशा प्रकारचा ग्रह असावा असा अंदाज वर्तविला गेला आहे आणि हा ग्रह तुलनेने आपल्यापासुन जवळही आहे, केवळ ४१ प्रकाशवर्षे अंतरावर !

१.रच.३)
Coreless planet (गाभाहीन ग्रह)
प्राण्यांमध्ये जसा त्यांचा अस्थिपंजर त्यांच्या आकाराच्या, अस्तित्वाच्या मर्यादा आणि शारीरिक गुणधर्म ठरवतो, तद्वत एखाद्या ग्रहासाठी त्याचा धातूंनी बनलेला गाभा, त्याच्या गुणधर्मांची रूपरेषा ठरवतो. ग्रहाच्या core चा, त्या ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेशी अत्यंत जवळचा संबंध आहे. ग्रहाच्या चुंबकीय क्षेत्राचा पर्यायाने त्याच्यावर वातावरण टिकून राहण्याशी आणि त्या ग्रहाच्या आयुष्याची दोरी लांब व मजबूत असण्याशी संबंध आहे.  जेलीफिश, ऑक्टोपस ह्या सारख्या प्राण्यांना invertebrates अशी संज्ञा आहे आणि त्याचे महत्त्वाचे कारण आहे, मणक्याचा (आणि एकंदरच हाडांचा) अभाव. ह्या प्राण्यांप्रमाणे काही ग्रह देखील गाभाहीन असु शकतील असे आजचे अनुमान आहे, पण हे केवळ अनुमानच आहे कारण ग्रहाच्या अंतर्भागाचा अभ्यास पृथ्वीवरून करण्याइतका पल्ला अजूनतरी आपल्या तंत्रज्ञानाने गाठलेला नाही. ह्या प्रकारच्या ग्रहांची निर्मिती होताना तिथे ऑक्सिजनचे आणि कुठल्याही स्वरुपाच्या पाण्याचे प्रमाण अतिप्रचंड असण्याची आवश्यकता आहे, जेणेकरुन धातूंचे ऑक्सिडीकरण होऊन गाभ्याची निर्मिती होण्याऐवजी, त्या ग्रहाचा अंतर्भाग ऑक्सिडीकरण झालेल्या संयुगांनी तयार होईल. असे ग्रह आकाराने पुरेसे मोठे असले तरच निर्माण होणार्‍या प्रचंड दाबामुळे टिकू शकतील.

१.रच.४)
Desert planet (मरुमय ग्रह)
एखाद्या तारा जेंव्हा प्रमाणाबाहेर आकाराने वाढतो आणि प्रदीप्त होतो, तेंव्हा त्याच्या वाढलेल्या दीप्तीच्या आवाक्यात येणार्‍या सर्व ग्रहांना तो शब्दश: भाजून काढतो. आणि मग असा ग्रह Tidally Locked नसेल आणि तिथे पुरेशा प्रमाणात ग्रीनहाऊस वायूंची निर्मिती होऊ शकली नाही, तर अशा ग्रहावर पाण्यासारख्या द्रव पदार्थांचा वा त्यांच्या वाफेचा मागमूसही राहण्याची शक्यता लोप पावते. वातावरण हळूहळू लोप पावते आणि मागे उरते ते एक रखरखीत वाळवंट आणि त्याला सातत्याने भाजून काढणारी उष्णता. पृथ्वीच्या भविष्यात साधारण एक अब्ज वर्षानंतर (पुन्हा ?) हेच भोग आहेत असा आजचा अंदाज आहे.

१.रच.५)
Gas dwarf (वायूबटू)
दुसर्‍या लेखांकात समावेश केलेल्या वायूराक्षसांचा हा अत्यंत छोटा अवतार. इथेही प्रामुख्याने हायड्रोजन आणि हीलियम ह्यांचे आधिक्य अपेक्षित आहे,पण ह्यांचा आकार हा पृथ्वीच्या आकाराच्या १.७ पट ते ३.९ पट ह्या मर्यादेतच असणे अपेक्षित आहे.  बृहत्-पृथ्वी आणि हा उपगट ह्यांच्यातील प्रमुख फरक अर्थातच एकीकडे खडकाळ पृष्ठभाग आणि दुसरीकडे पृष्ठभागरहित वायूनी बनलेली संरचना हाच आहे. त्यामुळे घनताही बरीच कमी. Kepler-138d हा ह्या उपग़टात मोडणारा ग्रह असावा, असे अनुमान आहे.

१.रच.६)
Ice planet (बर्फाळ ग्रह)
एखादा पृथ्वीच्या आकाराचा वा त्याहून जरासा मोठा असलेला ग्रह, त्याच्या तार्‍यापासून बराच दूर असेल तर काय घडेल ? स्वाभाविकच त्याच्यावर असलेले द्रवपदार्थ (पाणी वा अन्य) तिथे पूर्णपणे गोठलेल्या अवस्थेत असतील आणि त्या ग्रहाला कोणत्याही प्रकारे उष्णता मिळण्याची शक्यता नसल्यास, तो ग्रह सदैव हिमाच्छादितच राहील. आणि जर त्या ग्रहाचे तापमान टोकाचे कमी असेल तर कदाचित तिथले वायूदेखील गोठलेल्या अवस्थेत राहतील. असा ग्रह हिमप्रधान असला तरी आपण सध्या वापरत असलेल्या मापनानुसार, तो महाकाय ह्या उपगटातला नाही. तो एक सर्वसाधारण आकाराचा ग्रह आहे, मात्र बर्फाळ.  OGLE-2005-BLG-390Lb हा ग्रह ह्या उपगटात समावेश करण्यासाठी योग्य आहे असे सध्याचे निदान आहे. 

१.रच.७)
Iron planet (लोहग्रह)
सर्वसाधारणत: कुठलाही ग्रह जन्मल्यावर, कालौघात त्याच्या रचनेचे, ढोबळमानाने तीन वेगवेगळे स्तर निर्माण होतात. सर्वात आतला भाग म्हणजे गाभा (Core); ज्याचे आंतरगाभा आणि बाह्यगाभा असे दोन उपभाग मानण्यात येतात. त्यानंतर येते प्रावरण (Mantle), ज्यातही आंतरप्रावरण आणि बाह्यप्रावरण असे दोन उपभाग मानले जातात आणि सर्वात वरचा भाग अर्थातच भूस्तर किंवा भूकवच (Crust). 

आपल्या पृथ्वीच्या बाबतील भूकवच हे बर्‍याचदा पूर्णपणे माती, खडक ह्यापासून बनलेले आहे, जिथे हे भूकवच अतिशय पातळ आहे तिथे ते पाणी वा बर्फ ह्यांनी लपेटले गेले आहे. बाह्यप्रावरण हे सिलिकेट्सप्रधान खडकांनी बनलेले आहे आणि ते घनावस्थेत आहे, तर आंतरप्रावरण हे एखाद्या चिकट पदार्थासारखे मर्यादित प्रमाणात प्रवाही आहे. पृथ्वीचा बाह्यगाभा हा वितळलेल्या आणि अतितप्त असणार्‍या, लोह आणि निकेल ह्यांच्या रसाचा आहे तर आंतरगाभा हा लोह व निकेल ह्यांच्या मिश्रधातूचा बनलेला आहे. 

पण थोड्या वेगळ्या संरचनेचा एखादा ग्रह असा असू शकतो , ज्याचा गाभा लोहप्रधान आहे पण ज्याचे प्रावरण अत्यंत पातळ आहे किंवा अस्तित्वातच नाही आणि ज्याच्याभोवती अत्यंत पातळ भूकवच आहे अशा  ग्रहांचा समावेश ह्या उपगटात होतो. आपला बुध ह्या उपगटाचे एक नमुनेदार उदाहरण असावे असे उपलब्ध माहितीवरून वाटते. 

१.रच.८)
Lava planet (शिलारसमय ग्रह किंवा ज्वालाग्रह)
आधीच्या एका लेखांकात, तप्तगुरुचा उल्लेख आला आहे, पण तो वायूराक्षस आहे. असा अतितप्त ग्रह मूळचा खडकाळ असल्यास आणि त्याच्या तार्‍याचे तापमान अतिप्रचंड असल्यास आणि तो ग्रह भूशास्त्रीयदृष्ट्या सक्रीय राहिला असल्यास, आपल्या तार्‍याच्या अतिसमीप असण्याचे भोग हे केवळ मरुमय होण्याशी थांबणार नाहीत. तप्त शिलारसाची (लाव्हाच्या) तळी तिथे सदैव खदखदत असतील. ज्वालामुखीचे उद्रेक तिथे नित्याचे असतील.   नरकाच्या वर्णनाचा,  आपल्या पुराणातील काही भाग, अशा ग्रहाला अचूक लागू पडेल. अर्थात असा ग्रह केवळ तार्‍याच्या जवळच सापडेल असे नव्हे, एखाद्या अवकाशीय टक्करीतून देखील एखाद्या ग्रहास ही अवस्था तात्पुरती लाभू शकते. COROT-7b हे अशा प्रकारच्या ग्रहाचे एक उदाहरण असावे असा अंदाज आहे.

१.रच.९)
Waterworld (Ocean Planet - जलमय ग्रह)
तार्‍याच्या निवासयोग्य पट्ट्यात (Habitable Zone) असणारा एखादा ग्रह खडकाळच असला पाहिजे असे काही नाही. त्या ग्रहावर प्रचंड प्रमाणावर पाणी असल्यास, त्या ग्रहावर भूपृष्ठाचे अस्तित्व देखील नजरेस न पडणे शक्य आहे. आणि तरीही असा ग्रह जीवसृष्टीने समृद्ध असू शकतो, किंबहुना तर्कदृष्ट्या अशा ग्रहावर वैज्ञानिक स्तरावर विकसित झालेली बुद्धिमान जीवसृष्टी असणे अशक्य नाही. विज्ञानकथांमधील संभाव्यतांना परीकल्पनांचे पंख लावण्यास उद्युक्त करणारी ही संकल्पना, मनोरंजनाच्या विविध माध्यमांनी, ह्यापूर्वी देखील कमीअधिक प्रमाणात हाताळली आहे आणि ह्यानंतरही ती हाताळली जाईल. वरती ह्या ग्रहाचे नाव जलमय ग्रह असे दिले असले, तरी हे महासागर केवळ पाण्याचेच असायला हवेत असे नाही आणि मानवाला अपेक्षित असलेल्या  निवासयोग्य पट्ट्यात असायला हवेत असेही नाही, त्यामुळे द्रवमय ग्रह हे नाव अधिक योग्य ठरेल. अशी प्रत्यक्ष उदाहरणे आज उपलब्ध नाहीत, पण ती सापडणे असंभवनीय नाही हे नक्की.

१.रच.१०)
Silicate planet (पृथ्वीसदृश ग्रह)
हा आपल्याला सर्वाधिक परिचयाचा आणि अपेक्षित असलेला उपगट, जिथे ग्रहाची संरचना पृथ्वीशी मिळतीजुळती असेल (इथे आकार तुलनेने कमी महत्त्वाचा) . ज्या ग्रहावर वेगवेगळे ऋतु संभवतात आणि ज्या ग्रहावर पाणी आहे, त्या ग्रहावर जलचक्र स्वाभाविकपणे अस्तित्वात येते.  अशा ग्रहाचे प्रावरण सिलिकेट्सयुक्त खडकांनी बनलेले असल्यास, ते खनिजवैविध्यतेला जन्म देते. खनिजवैविध्यता अप्रत्यक्षपणे, जैववैविध्यततेला जन्म देते. मानवाच्या वैज्ञानिक प्रगतीत, पृथ्वीवरील खनिजवैविध्यततेचा निर्विवाद वाटा आहे.  केवळ कल्पना करा की आज असलेली खनिजसमृद्धता पृथ्वीवर अस्तित्वातच नाही आणि केवळ मोजकी खनिजेच इथे उपलब्ध आहेत. म्हणजे मानवी जीवनाला प्रगती साधण्यासाठी किती अवघड वळणे घ्यावी लागली असती किंवा काही टप्प्यांवर प्रगती कशी कुंठित झाली असती ह्याचा साधारण अंदाज बांधता येईल. आज आपण सूर्यमालाबाह्य ग्रहांचा धांडोळा घेत असलो, तरी आपले मूळ लक्ष्य पृथ्वीसदृश ग्रह शोधण्याचेच आहे आणि सव्वा तीन हजारापेक्षाही अधिक ग्रह सापडल्यावरही हुबेहूब दुसरी सुरक्षित पृथ्वी सापडू नये, ह्यावरून तरी, ह्या उपगटाचे आपल्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात येईल.

====

वर उल्लेखलेले ग्रहाचे उपगट, हे एका प्रकाराने एखाद्या ग्रहाच्या वेगवेगळ्या दीर्घकालखंडातील वेगवेगळ्या अवस्था देखील असू शकतात. आपली पृथ्वी त्यातील बर्फाळ ग्रह, ज्वालाग्रह, मरुमय ग्रह आणि जलमय ग्रह ह्या अवस्थातून काही काळासाठी गेली असण्याची शक्यता आहे, आणि कदाचित पुढेही, आणखी काही अवस्थांतून जाईल. ग्रहांच्या गटाच्या, उपगटांच्या, आपल्या सध्याच्या संकल्पना, ह्या आपल्याला आत्तापर्यंत अनुभवास आलेल्या किंवा मानवी कल्पनांच्या परिघात संभवणार्‍या शक्यता आहेत. पण दूरच्या भविष्यात त्या कल्पनांच्या पलीकडले, अनुभवांच्या पलीकडले काहीतरी प्रत्यक्षात पाहायला, अनुभवायला मिळू शकते, सध्याच्या समजूतींचा डोलारा कोसळवणारे काहीतरी अचानक समोर येऊ शकते.  मग गटा-उपगटांच्या ह्या उतरंडीची पुनर्रचना होईल आणि  आत्तापेक्षा अधिक प्रगल्भ झालेल्या त्यावेळेच्या आपल्या जाणीवांची, कल्पनांची रुंद झालेली कवाडे, ही आपल्या ज्ञानास संपृक्त करण्याइतकी, पुरेशी रुंद झालेली नाहीत ही  भावना आपल्या मनात नव्याने उफाळून येईल. 

=======
क्रमश:
=======

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा