शनिवार, २६ जानेवारी, २०१९

टेलिपोर्टेशन संभाव्य की असंभाव्य - १



लहान असताना जेंव्हा जेंव्हा मी कुणा मोठ्या व्यक्तीकडुन पौराणिक कथा ऐकत असे, अमर चित्र कथा वा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या बालवाचनालयातून आणलेल्या इतर पुस्तकात, जेंव्हा त्या कथा वाचत असे, तेंव्हा त्यातील अद्भुत गोष्टींमध्ये, चमत्कारांमध्ये अनेक वेळेला अगदी सहजपणे येणारा चमत्कार होता, 'अदृश्य होणे'. ह्यालाच जोडून येणार एक दुसरा चमत्कार होता 'प्रगट होणे' आणि 'अंतर्धान पावणे'. नीट  विचार केला तर ह्या गोष्टी परस्परांशी निगडीत आहेतही आणि नाहीतही. बघणार्‍याच्या दृष्टीकोनातून देव अदृश्य झाला किंवा अंतर्धान पावला हा समान परिणाम आहे, तसेच देव दृश्य होणे वा प्रगट होणे ही  देखील परिणामांच्या दृष्टीने समानच गोष्ट आहे. 'विष्णु किंवा शंकर अंतर्धान पावल्यावर ते त्यांच्या निजधामास प्रगट झाले' अशा अर्थाचा स्पष्ट उल्लेख कुठे आला असल्यास माझ्या वाचनात नाही. तसेच प्रगट होणे म्हणजे नक्की काय होत असे ह्याचेही कुठे सविस्तर वर्णन असल्यास ते ही मी वाचलेले नाही. पण देव प्रगट होऊन, देवाकडून कुठल्याही वस्तूचे त्याच्या भक्ताकडे हस्तांतरण होत असेल, तर ते प्रगट होणे म्हणजे वर्णंनकर्त्याच्या दृष्टीने केवळ बघणे नव्हते, तिथे काहीतरी प्रत्यक्ष अस्तित्व होते किंवा काही एक नोंदण्याजोगी घटना घडली असे म्हणता येईल. जर हे सर्व उल्लेख खरे आहेत हे गृहित धरले आणि आजच्या विज्ञानाशी, त्या घटनांची तुलना केली तर, ते काहीतरी प्रत्यक्ष असल्याचे, घडत असल्याचे जाणवणारे असावे आणि आज साध्य झालेले, केवळ होलोग्राफिक चित्र नसावे, इतपत निष्कर्ष काढता येतो. 

कालांतराने दर रविवारी दूरदर्शनवर स्टारट्रेक ही मालिका सुरू झाली आणि प्रगट होणे आणि अंतर्धान पावणे ह्याचा वैज्ञानिक कल्पनाविष्कार पाहावयास मिळाला. त्यावेळेस हा शोध आज लागला नसेल तरीही लवकरच लागेल असेच वाटले होते. त्यातील गुंतागुंत समजण्याचे आणि हा शोध प्रत्यक्षात आणायचा झाल्यास किती प्रचंड तंत्रज्ञान लागेल हे समजण्याचे ते वय नव्हते. १९९८ पासून इंटरनेटशी संबंध आला आणि माहितीचा खजिना खुला झाला आणि विज्ञानकथेत दाखविल्या जाणार्‍या अद्भुत गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी किती सायास पडतात त्याची चरचरीत जाणीव झाली.

आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने एखादी व्यक्ती किंवा वस्तू केवळ दिसेनाशी होणे आणि टेलिपोर्टेशनमुळे दिसेनाशी होणे ह्यातील अदृश्य होणे हा भाग जरी समान असला तरीही ते साम्य तिथेच संपते. एखादी व्यक्ती वा वस्तू अदृश्य होणे, ह्यात ती व्यक्ती वा वस्तू तिथेच असणे, मात्र तिचे अस्तित्व आपल्या डोळ्यांना न जाणवणे इतकेच घडायला हवे. ती व्यक्ती  वा वस्तू जिथे असेल, तिथे कुणी जोरात काठी फिरवली तर त्या व्यक्तीला त्या काठीचा फटका बसायला हवा. जर काठी त्या व्यक्तीला न लागता परस्पर पार होत असेल, तर मग ते केवळ अदृश्य होणे राहात नाही. ती त्याच्या पुढची पायरी होते. तसेच अदृश्य झालेल्या व्यक्तीला वा वस्तूला पुन्हा पूर्वपदावर आणणे म्हणजे केवळ दृश्य करणे होय. जर आधीच्या विधानात लिहिल्याप्रमाणे जर ती अदृश्य होण्याच्या पुढची पायरी घडली असेल, तर त्या व्यक्तीला वा वस्तूला दृश्य करणे ही, सर्वसाधारण अदृश्याला, दृश्य करण्यापेक्षा अधिकच असामान्य गोष्ट आहे ह्यात शंका नाही. 'अधिकृतरित्या', अदृश्य होणे ही पायरी आज आपण गाठलेली नाही, पण काही शतकात तो टप्पा येईल. अदृश्य होण्यासाठी महत्त्वाची आवश्यकता त्या वस्तू वा व्यक्तीच्या पलिकडले 'आरपार दिसणे' किंवा 'आरपार दिसत असल्याचा आभास निर्माण करणे' ही आहे. तिथे त्या वस्तूचे कुठल्याही प्रकारे स्थानांतरण अपेक्षित नाही. 

वरील परिच्छेदातील ही 'पुढची पायरी' हा जो उल्लेख आहे, ती टेलिपोर्टेशनची प्राथमिक आवश्यकता आहे.

टेलिपोर्टेशन ह्या मुद्दामहून तयार केलेल्या शब्दात व्यक्ती वा वस्तूचे एका ठिकाणाहून दुसर्‍या (खरंतर दूरच्या दुसर्‍या ठिकाणी) स्थानांतरण अपेक्षित आहे आणि ते देखिल शक्य तितक्या कमी वेळात (खरंतर तत्क्षणी). टेलिपोर्टेशनमध्ये त्या दोन स्थानांच्या दरम्यान त्या व्यक्ती वा वस्तूचा प्रत्यक्ष प्रवास अपेक्षित नाही. अन्यथा ते जरी अत्यंत कमी वेळात होऊ शकले तरी ते अतिवेगवान  ट्रान्स्पोर्टेशन होईल. म्हणजे असे समजा की भविष्यात आपल्याला पृथ्वी आणि चंद्र  ह्यांच्या दरम्यान Wormhole च्या माध्यमातून व्यक्ती वा वस्तू ह्यांची वाहतूक करणे शक्य झाले आणि Wormhole च्या माध्यमातून, पृथ्वीपासून प्रत्यक्ष प्रवास करून एखादी व्यक्ती वा वस्तू दोन मिनिटात जरी चंद्रावर पोहोचली तरीहीते त्या व्यक्ती वा वस्तूचे अतिवेगवान परिवहन (Transportation) असेल. उपलब्ध ज्ञानाचा विचार केल्यास, सध्यातरी टेलिपोर्टेशनच्या माध्यमातून होणारे व्यक्ती वा वस्तूचे वहन, हे त्या व्यक्ती वा वस्तूचे एका ठिकाणी लहरीत रुपांतरण करून, त्या लहरी दुसर्‍या ठिकाणी पोहोचाव्यात आणि त्या लहरीपासुन ती व्यक्ती वा वस्तू पुन्हा जशीच्या तशी प्राप्त करता यावी असे अपेक्षित आहे. जेंव्हा आपण 'लहरीत रुपांतर' हा विचार करतो, तेंव्हाच आपण टेलिपोर्टेशनच्या अंतराच्या मर्यादांना स्वीकारतो. प्रकाशवेगापेक्षा अधिक वेगाने प्रवास शक्य नाही अशी सध्याच्या विज्ञानाची धारणा असल्याने, आपल्या विश्वाचा प्रचंड विस्तार लक्षात घेता, उपयोग ह्या दृष्टीने, एकापरीने आपण काही मर्यादा स्वीकारूनच टेलिपोर्टेशनचा अधिक विचार केला पाहिजे हे उघड आहे.

टेलिपोर्टेशनची खरी आवश्यकता का आणि कुठे आहे, असा विचार केला, तर आपली सध्याची सर्वाधिक गरज ही पृथ्वीपुरतीच आहे. पृथ्वीवरच्या एका शहरातील  एका उपनगरातील एका विवक्षित ठिकाणापासुन त्याच शहरातील काही कि.मी दूर असलेल्या दुसर्‍या उपनगरातील ठराविक ठिकाणी जर आपल्याला एखादी वस्तू वा व्यक्ती (प्रत्यक्ष प्रवास न करता)  'तात्काळ' पोहोचविता आली, तर आपल्याला तेच तंत्रज्ञान भविष्यात विस्तारता येऊ शकते आणि पृथ्वीच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत आपण 'तत्काळ' टेलिपोर्टेशन साध्य करू शकतो. 

टेलिपोर्टेशनची गरज का आहे तर अर्थातच वस्तू वा व्यक्तीच्या स्थानांतरणाला लागणारा वेळ वाचविणे. पृथ्वीवर एका ठिकाणी स्कॅन झालेला एखादा कागद आजही काही क्षणात पृथ्वीच्या दुसर्‍या टोकाला जसाच्या तसा उपलब्ध होऊ शकतो, पण हे टेलिपोर्टेशन नसून टेलिडूप्लिकेशन आहे. स्कॅन झालेला कागद मूळ ठिकाणी तसाच राहतो, तो तिथून नष्टही होत नाही किंवा अदृश्यही होत नाही आणि कितीही उत्कृष्ट सामुग्री वापरली, कितीही  आधुनिक तंत्रज्ञान वापरले तरीही, गंतव्य स्थानी, इष्ट स्थानी निर्माण होणारी गोष्ट ही जास्तीत जास्त त्या कागदाचा क्लोन असतो. थ्री डी प्रिंटऱची होत असलेली प्रगती लक्षात घेता,  जी गोष्ट कागदासारख्या द्विमित वस्तूच्या बाबतीत आज घडते आहे, तीच गोष्ट भविष्यात सर्वसाधारण वस्तूंच्या बाबतीतही घडू शकते. एका ठिकाणच्या वस्तूचा दुसर्‍या ठिकाणी काही क्षणात क्लोन तयार होणे ही निकटच्या काळात साध्य होऊ शकेल अशी गोष्ट आहे. 

त्यामुळे वस्तूपुरता विचार केला तर टेलिडूप्लिकेशन वा 'टेलिक्लोनिंग' भविष्यात आपल्याला साध्य करण्याजोगे आहे. व्यक्तीचे टेलिक्लोनिंग शक्य आहे का ? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील 'हो, पण थोड्या दूरच्या भविष्यात' असे एक वेळ आपण देऊ शकू.

आज आपण प्राण्यांचे क्लोनिंग करण्याची क्षमता साध्य केली असल्यामुळे, मानवाचे क्लोनिंग शक्य आहे, ह्याबद्दल दुमत नसावे. क्लोनिंगला लागणारा वेग सध्या आपल्या नियंत्रणात नाही, ह्याचा अर्थ तो नियंत्रणात येणारच नाही असे समजण्याचे कोणतेही कारण नाही. कोणत्याही प्रक्रियेचा (अगदी सजीवाशी संबंधित असली तरीही) वेग वाढविणे आणखी काही शतकातच बहुदा आपण साध्य करू. त्याचे काही दुष्परिणाम असतील का, हा जरा वेगळा मुद्दा आहे. पण त्यातील नैतिकतेच्या संकल्पना देखील काळानुरुप बदलत जातील हे नक्की. मात्र दिवसेंदिवस प्रवासासाठी लागणारा वेळ घटत चालला आहे हे लक्षात घेता, अशा प्रकारे सजीवाच्या तत्काळ टेलिक्लोनिंगची नक्की गरज का पडेल, हा निर्विवाद विचार करण्याचा मुद्दा आहे. सजीवाच्या टेलिक्लोनिंगची गरज कुठे भासू शकते, त्याच्या शक्यता धुंडाळण्याचा प्रयत्न केल्यास अधिकतर भावनिक शक्यता सापडतील  उदा. एखाद्या व्यक्तीला परदेशात त्याच्या कुटुंबासह रहायचे आहे, मात्र त्याच्या वृद्ध मातापित्याला मात्र भारतातच राहायचे, तेंव्हा त्यांचा भारतातील कायमस्वरूपी वा तात्पुरता आधार म्हणून किंवा दूरच्या शहरातील एखाद्या तातडीच्या कामाची तात्पुरती सोय म्हणून.  'तात्पुरता' हा शब्द वाचून काही जणांच्या मनात प्रश्न येईल की तात्पुरता का ? तर त्याचे उत्तरही मानवी भावनांमध्येच सापडण्याची शक्यता आहे, एखादा क्लोन आपल्याला 'replace' करतो आहे ह्या घटनेचे अनेक स्थूल आणि सूक्ष्म कंगोरे आहेत. शिवाय एकाच व्यक्तीच्या अशा अनेक आवृत्ती निर्माण झाल्यास त्या व्यक्तीसाठी, भविष्यात  दुसरे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात.  अशा तात्पुरत्या क्लोन्सची निर्मिती त्यामुळे कदाचित 'एक्सापयरी डेट' सह होईल. ह्या व्यतिरिक्त टेलिक्नोनिंगच्या आणखीदेखील काही शक्यता आहेत, उदाहरणार्थ जोखमीची कामे, जीवाला धोका होऊ शकेल अशी कार्ये इत्यादि. 

वस्तूंपुरता विचार केल्यास, टेलिक्लोनिंगच्या बाबतीत टेलिक्लोनिंग तंत्रज्ञानातच, मूळ वस्तूचा नाश होईल आणि त्या वस्तूची एकच प्रतिकृती शिल्लक राहील अशी व्यवस्था करणे शक्य आहे, कारण ह्यात सामुग्रीचा नाश आणि निर्मिती येते आणि मग खर्चाचा मुद्दा प्रभावी ठरतो. शिवाय हे व्यक्तीच्या बाबतीत तशाच प्रकारे करता येणार नाही. अर्थात व्यक्तीच्या बाबतीतही मूळ व्यक्ती कायमस्वरूपी मौजमजा करत राहील आणि त्याचा क्लोन त्याच्यासाठी काम करेल, पैसे कमावेल. आवश्यक तिथे क्लोनचे  क्लोनिंग होऊन, मूळ क्लोनची आवृत्ती नष्ट होईल आणि एकावेळी एकच क्लोन  अस्तित्वात राहील वगैरे विज्ञानकथात शोभतील अशा शक्यता प्रत्यक्षात येणे अशक्य नाही. तरीही ते दूरान्वयाने सुद्धा टेलिपोर्टेशन नसेल.
--

टेलिपोर्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या अनेक संभाव्य आणि आज असंभाव्य असलेल्या संकल्पनांचा छोटासा आढावा घेण्यामागचा उद्देश एकच होता की टेलिपोर्टेशनची व्याख्या त्या निमित्ताने अधिक स्पष्ट होते, सीमित होते आणि त्यामुळे टेलिपोर्टेशनशी थेट संबंधित असलेल्या अनेक मुद्द्यांचा विचार करणे अधिक सोपे होते.

============
क्रमश:
============

४ टिप्पण्या: