सोमवार, २९ ऑगस्ट, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (९ / ९)



Erich von daniken च्या 'ancient alien theory' ला विरोध करणारा एक मोठा वर्ग आहे.  या सिद्धांताला खरे ठरविण्याच्या प्रयत्नात, त्यावर स्वत:च्या विचारांचे कलम करण्याच्या प्रयत्नात, सिद्धांताच्या पाठीराख्यांनी  क्वचित कित्येक वेळा ओढून ताणून दिलेली स्पष्टीकरणे, प्रत्येक गूढ गोष्टीला या सिद्धांताशी जोडण्याचे प्रयत्न इत्यादि गोष्टींचा अतिरेक झाला आणि आणि या सिद्धांताची टवाळी उडविणारा वर्गही वाढला. तसेही बर्‍याचदा एखाद्या प्रस्थापित घटनेच्या वा समजुतीच्या वा सिद्धांताच्या पेक्षा काहीतरी दुसर्‍या टोकाची मांडणी वा अत्यंत विपरीत विचार मांडणार्‍या व्यक्ती विक्षिप्त मानल्या जातात आणि त्यांच्या मांडणीमधले काही योग्य मुद्दे देखील नाकारले जातात. तसेच अशा प्रकारची मांडणी करणार्‍या व्यक्ती देखील त्यांच्या स्वत:च्या विचारसरणीच्या प्रेमात पडून ती विचारसरणी प्रमाणाबाहेर ताणतात वा सर्वव्यापी करण्याचे प्रयत्न करतात. erich von daniken च्या बाबतीतही असेच काहीसे झाले असावे ही शक्यता आहे.

पण काही पूर्वग्रह असल्यास ते बाजूला ठेवून, daniken ची मांडणी वाचली तर,  daniken च्या सिद्धांतातील मूळ बीज अगदीच नाकारण्यासारखे नाही हे लक्षात येईल.  हे बीज विचारात घेतल्यावर जगातील विविध ठिकाणच्या देवांशी संबंधित काही गोष्टींची तर्कसंगत मांडणी करता येते हे खरे आहे. याच सिद्धांताच्या चौकटीत आपल्या पौराणिक गोष्टी बसविण्याचे काही प्रयत्न यापूर्वीही झाले आहेत आणि त्यातून काही उत्तरे मिळतातही, काही रूपककथांचा उलगडा होऊ शकतो,  पण तरीही सर्वच ठिकाणी ते लागू पडत नाही हे लक्षात घ्यायला हवे.

आपल्या वैदिक आणि विशेषत: पौराणिक ग्रंथामधून अनेक ठिकाणी प्रगत तंत्रज्ञानाचे उल्लेख आढळतात. पण यातील फार कमी उल्लेख, हे तांत्रिक किंवा तंत्रज्ञानाचे स्पष्टीकरण देणारे आहेत. इतर सर्व उल्लेख हे केवळ, तंत्रज्ञान कुणाकडून (तपस्या वा अन्य मार्गाने)  मिळवल्याचे किंवा त्याचा वापर झाल्याचे आहेत.  मौखिक परंपरा जपणार्‍या वेदकाळी, लेखनकला व लेखनाची सामुग्री या संदर्भात विपुलता असावी असे दिसत नाही. नियमित जीवनक्रमात, विलक्षण असेही काही दिसत नाही. त्यामुळे तंत्रज्ञान, विज्ञान यांचा उपयोग, वापर ही आजच्यासारखी सामान्य गोष्ट होती, असे म्हणण्यासारखे पुरावे नाहीत. पण विविध ऋचांमधून तंत्रज्ञानाशी संबंधित काही उल्लेख आहेत आणि त्यातील बहुसंख्य हे देवतांशी संबंधित आहेत किंवा मर्यादित व्यक्तींना हे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचे आहेत. काही अपवाद वगळता, देवतांचे उल्लेखही बहुदा आवाहनासाठी किंवा स्तुतीपर असेच येतात. या देवतांपैकी अनेक देवता या निसर्गदेवता आहेत, पण सर्वच नाहीत.

मुख्य म्हणजे  या देवतांना विश्वनिर्माते मानलेले नाही, तसे सूचित करणारे काही उल्लेख ऋग्वेदात आहेत. 

== source : satsangdhara.net ==
ऋग्वेद - मंडल १० सूक्त १२९ (नासदीय सूक्त)
कः अद्धा वेद कः इह प्र वोचत् कुतः आजाता कुतः इयं वि-सृष्टिः
अर्वाक् देवाः अस्य वि-सर्जनेन अथ कः वेद यतः आबभूव ॥ ६ ॥
हे सर्व जरी खरे, तरी ह्या सर्व गोष्टी वस्तुत: अनुभवाने कोणाला कळतात ? आणि ते आम्हांला इथे येऊन कोण सांगणार ? ही नाना प्रकारची विविध सृष्टि कोठून आली किंवा कशापासून कशा प्रकारे निर्माण झाली असेल ? देवांना हे ठाऊक आहे असें म्हणावे तर देव तर सृष्टीच्या नंतरचे, त्यांना काय माहीत ? मग आतां हे कसे झाले ते कोण सांगेल ? ६.
--
ऋग्वेद - मण्डल १ - सूक्त २०
अयं देवाय जन्मने स्तोमः विप्रेभिः आसया । अकारि रत्नऽधातमः ॥ १ ॥
जन्मास येण्याच्या यातायातीतून ज्या देवांची सुटका झाली नाही त्यांचे प्रित्यर्थ विद्वान उपासकांनी ही स्तुती स्वमुखाने गायली होती. ह्या स्तुतीच्या योगाने उत्कृष्ट वैभवांची प्राप्ती होण्याजोगी आहे. ॥ १ ॥
== ==

या देवता विश्वनिर्मात्या नाहीत, पण तरीही त्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केले आहे.  ज्या देवता निसर्गदेवता नाहीत, त्यांचीही श्रेष्ठता मान्य करण्यात आली आहे,त्यांना पूजनीय मानले आहे आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांची अनेक स्तोत्रे रचली आहेत. एकत्रितपणे या सर्व गोष्टींकडे पाहता त्यातून निघणारा अर्थ असा तर नाही ना की  या देवता अशा एका प्रजातीचा घटक आहेत, जी मानवापेक्षा कितीतरी पटीने अधिक श्रेष्ठ, सामर्थ्यशाली आहे ?  सामर्थ्यवान, श्रेष्ठ ते पूजनीय, वंदनीय, आदरणीय असावेत हे स्वाभाविक आहे.

--
देवांची संख्या ३३ कोटी इतकी मानली गेली आहे. ही संख्या एखाद्या 'लोका'ची वस्ती या दृष्टीकोनातून योग्य मानायला हरकत नाही.  या ३३ कोटी संख्येच्या संदर्भात अलीकडे एक स्पष्टीकरण असे देण्यात येते की  :
धाता, मित्र, अर्यमा, शक्र, वरुण, अंश, भग, विवस्वान, पूषा, सविता, त्वष्टा आणि विष्णू हे १२ आदित्य. (संदर्भ: महाभारत, आदि. ६५/१५-१६)  => (यात नामभेद आहेत)
धर, ध्रुव, सोम, अह:, अनिल, अनल, प्रत्यूष आणि प्रभाष हे ८ वसु. (संदर्भ: महाभारत, आदि. ६६/१८)  => (यात नामभेद आहेत)
हर, बहुरूप, त्रयम्बक, अपराजित, वृषाकपि, शंभू, कपर्दी, रैवत, मृगव्याध, शर्व आणि कपाली हे ११ रुद्र. (संदर्भ: हरिवंश, १/३/५१-५२)  => (यात नामभेद आहेत)
आणि याखेरीज २ अश्विनीकुमार (नासत्य आणि द्स्त्र )   (नामभेद  => किंवा दुसर्‍या एका संदर्भानुसार इंद्र आणि प्रजापती)
असे सारे मिळून ३३ प्रकारचे देव होतात आणि यालाच ३३ कोटी असे म्हटले आहे. 
पण हे जर हे जर खरे मानले तर  देव दानव युद्ध,  त्यात काही वेळा होणारा देवांचा पराभव आणि वीरगती, अमृतमंथन, देवांचे संजीवनी विद्या मिळवण्यासाठीचे प्रयत्न या कथा निरर्थक होतात.  वेदात नमूद केलेल्या काही देवता व कालांतराने (संस्कृतीसंगम वा अन्य कारणाने) रूढ झालेले इतर देवी, देवता यांना या ३३ कोटीच्या सिद्धांतात बसविणे अवघड ठरते.   साहजिकच हे ३३ कोटीचे स्पष्टीकरण काहीसे लटके पडते. 
--

आपल्या ग्रंथांमधून वापरलेली 'लोक' ही संज्ञा ग्रहांसाठी पर्यायवाची आहे असे म्हणता येणार नाही, कारण 'लोक' या संज्ञेचा उपयोग विविध तर्‍हांनी झाला आहे. सप्तलोक (भूलोक, भुवर्लोक .... ) किंवा सप्तपाताळे (पाताळलोक) यांची वर्णने वस्तुत:  'ग्रह' या संज्ञेत मोडणारी नाहीत.  भूलोक म्हणजे पृथ्वी, भुवर्लोक म्हणजे पृथ्वी व सूर्य यांमधील जग, स्वर्लोक म्हणजे सूर्य व ध्रुव यांमधील इंद्रादि देवतांचे जग वगैरे व्याख्या, या खूप ढोबळ आणि संदिग्ध आहेत.  पण त्याचवेळी ब्रह्मलोकाचा काही ठिकाणी येणारा उल्लेख हा काहीसा वेगळा आहे. तिथे काळाचे मान वेगळे असल्याचा आहे. राजा ककुदमी व त्याची कन्या रेवती (बलरामाची पत्नी) यांच्या कथेत (भागवतपुराण ९.३.२९ ते ९.३.३३)  Time dilation ची संकल्पना स्पष्टपणे आली आहे. जिथे काळ हा पृथ्वीच्या तुलनेत अतिशय संथ गतीने सरकतो अशा ठिकाणी (कृष्णविवराच्याजवळ तर नव्हे ??) ब्रह्मलोक असल्याचे ही कथा सांगते.  ब्रह्मलोकासंबंधी 'अपावृतं' असे विशेषण वापरले आहे ज्याचा वाच्यार्थ  'उघडा', 'अनाच्छादित' असा होतो, ज्याचा इथे उलगडा होत नाही (Event Horizon च्या बाहेर ? ).  ब्रह्मदेवाच्या आयुष्याची जी गणना आहे तिथेही अशाच प्रकारच्या Time dilation चा उल्लेख आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य त्याच्या कालगणनेनुसार १०० वर्षे  व आपल्या कालगणनेनुसार ३,१,१,०,४०,००,००,००,००० वर्षे.  ज्याला आरंभ आहे त्याला अंतही आहे हा नियम एका अर्थाने ब्रह्मदेवाच्या बाबतीतही लागू आहे. असे का ?  या गोष्टी लक्षात घेतल्या तर असे म्हणता येईल का, की हा अप्रत्यक्षपणे दुसर्‍या अत्यंत प्रगत जीवसृष्टीचा, वेगळ्या स्तरावरच्या, कदाचित वेगळ्या मितीतला जीवसृष्टीचा उल्लेख आहे ?  

'धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगेयुगे' च का,  या प्रश्नाचे निश्चित उत्तर हे Time dilation मध्ये तर नाही ना ?

इंद्रादी देव (demigods ?) मानवाच्या तुलनेत प्रचंड शक्तिमान आहेत, पण सर्वशक्तिमान नाहीत. ते दानवांकडून पराभूत झाल्याचे उल्लेख आहेत. त्यांनी मानवाचे, ऋषींचे सहाय्य घेतल्याच्या घटना आहेत. त्यांना रागलोभादी भावना आहेत. समुद्रमंथनाची व पर्यायाने अमृतामुळे, अमरत्व लाभण्याची गोष्ट असो किंवा कचाने शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या मिळवण्याची कथा असो, त्यांना अप्राप्य असे काही होते आणि ते मिळवण्यासाठी त्यांना काही वेगळे मार्ग अवलंबावे लागले आहेत.  पृथ्वीवरच्या काही घडामोडीत त्यांना विशेष स्वारस्य होते असे एकंदर दिसते.  विशेषत: पृथ्वीवर एक ठराविक व्यवस्था असावी याची अनेकदा त्यांनी काळजी घेतल्याचे जाणवते.

इंद्र हे एक पद असल्याचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष उल्लेख अनेक ठिकाणी आढळतात. कित्येक वेळा राक्षसांनी,  मानवांनी या पदाची अभिलाषा ठेवल्याचे, काहीवेळा ते बळकाविल्याचे उल्लेख आहेत.  हातात असलेल्या सत्तेचा अधिकाधिक उपयोग करून घेणे, स्वत:च्या पदाला धोका होऊ नये म्हणून वापरलेले विविध मार्ग, अतिलालसेपायी, उपभोगाच्या आहारी जाऊन काही अनुचित वर्तन करणे, त्यापायी शाप झेलावा लागणे इत्यादि इंद्राच्या गोष्टी या आपल्या मनात असलेल्या देवाच्या प्रतिमेशी जुळणार्‍या आहेत का ? की इंद्रपदावर आरुढ झालेल्या एखाद्या सत्ताधीशाशी त्या अधिक साधर्म्य दाखवितात ?
देव, दानव, असुर, दैत्य आदींची वंशावळ उलटक्रमाने पाहत गेलो तर ती शेवटी ब्रह्मदेवाशी जाऊन पोहोचते.  असुर, दानव, दैत्य यांचे या वंशावळीतील स्थान व पृथ्वीवरील वसतिस्थान यांचा काही प्रमाणात का होईना अंदाज बांधता येतो. हीच गोष्ट राक्षसांच्या बाबतीत ठामपणे सांगण्यासारखी परिस्थिती नाही, पण त्यांचेही वसतिस्थान पृथ्वीतलावरच असावे असे म्हणता येईल. पौराणिक ग्रंथातून आढळणार्‍या यक्ष, गंधर्व आदि जमातींबाबतही असे काही अंदाज बांधले जातात. महासागरात खोलवर वस्ती करणारे निवातकवच (Nivatakavacha) (निर्वातकवच नव्हे) हे  ancient alien सिद्धांताच्या पाठीराख्यांना बळ देणारे, न उलगडलेले कोडे आहे.  काही जणांनी देवांचे वसतिस्थान शोधताना,  देवांचा संबंध तिबेटशी जोडलेला आढळतो. पण स्वर्गाचे तत्कालीन वर्णन हे किमान आजच्या तिबेटशी जुळणारे नाही. (देवांचे स्थान चिन्यांच्या ताब्यात आहे आणि तरीही देव शांत आहेत, हे देवांच्या स्वभावाला अनुसरूनही नाही. :-)  )
 
ऋग्वेदात स्वर्गलोकाचे वा इतर 'लोकांचे' वर्णन असलेल्या ऋचा फार थोड्या आहेत.  पण पुढील वर्णन स्वर्गलोकाचे असावे असे वाटते
== source : satsangdhara.net ==
यत्र ज्योतिः अजस्रं यस्मिन् लोके स्वः हितं
तस्मिन् मां धेहि पवमान अमृते लोके अक्षिते इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ७ ॥
ज्या ठिकाणी प्रकाश अखंड आहे, ज्या ठिकाणी दिव्यतेज सांठविलेले आहे, त्या ठिकाणी, हे पावनप्रवाहा, त्या अक्षय अमरलोकीं, मला स्थापन कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ७

यत्र राजा वैवस्वतः यत्र अव रोधनं दिवः
यत्र अमूः यह्वतीः आपः तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ८ ॥
ज्या ठिकाणी विवस्वानाचा पुत्र यमराज वास्तव्य करतो, ज्या ठिकाणी द्युलोकाचें - दृष्टीच्या टप्प्यांत नसलेले - गुप्तस्थान आहे, ज्या ठिकाणी भर वेगानें धांवणार्‍या आपोदेवी राहतात, त्या ठिकाणी मला ठेवून अमर कर, आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ८

यत्र अनु कामं चरणं त्रि नाके त्रि दिवे दिवः
लोकाः यत्र ज्योतिष्मन्तः तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ९ ॥
द्युलोकाच्या ज्या तिसर्‍या उच्चलोकांत, ज्या तिसर्‍या दिव्यलोकांत, वाटेल तिकडे संचार करता येतो; ज्या ठिकाणी सर्व स्थळे तेजोमय आहेत, तेथे मला ठेऊन अमर कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ९

यत्र कामाः नि कामाः च यत्र ब्रध्नस्य विष्टपं
स्वधा च यत्र तृप्तिः च तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ १० ॥
ज्या ठिकाणी काम्यकर्म करणारे, आणि तसेच निष्कामकर्म आचरणारे लोक राहतात, जे सृष्टीच्या मूलस्तंभाचे स्थान आहे, ज्या ठिकाणी स्वधा (म्हणजे स्वयंसिद्ध अमृत) आहे, ज्या ठिकाणी तृप्ति आहे, अशा ठिकाणी मला ठेऊन अमर कर, आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. १०

यत्र आनन्दाः च मोदाः च मुदः प्र मुदः आसते
कामस्य यत्र आप्ताः कामाः तत्र मां अमृतं कृधि इन्द्राय इन्दो इति परि स्रव ॥ ११ ॥
ज्या ठिकाणी आनंद आहेत, ज्या ठिकाणी प्रत्यक्ष वासनेच्याही वासना सफल होतात त्या ठिकाणी मला ठेऊन अमर कर आणि हे आल्हादप्रदा सोमा, तूं इंद्राप्रीत्यर्थ आपल्या प्रवाहाने वहात रहा. ११
-- --

या संदर्भात अशीही भूमिका वाचनात आली  की, स्वर्गलोक हे त्रिमित जगातील प्रत्यक्ष स्थान नसून, अध्यात्मिकदृष्ट्या, धार्मिकदृष्ट्या अस्तित्वात असलेली स्थिती किंवा जागा आहे. आणि यासाठी करण्यात येणारे बरेचसे दावे हे 'सदेह स्वर्गात जाता येत नाही किंवा येणार नाही' या नियमावर आणि  मरणोपरांत, पापपुण्याधारित स्वर्गलोकाची (किंवा नरकाची) प्राप्ती या संकल्पनांवर आधारित आहेत. पण सदेह स्वर्गरोहणाची काही उदाहरणे आहेत. पुरुरवा हा इंद्राच्या दरबाराला वारंवार भेट देत असल्याचा उल्लेख आहे. महाभारताच्या शेवटी युधिष्ठिर सदेह स्वर्गात गेल्याची कथा आहे.  महाभारत युद्धापूर्वी अर्जुनाने इंद्राची राजधानी अमरावती इथे काही काळ घालविल्याचा उल्लेख आहे.  सत्यव्रत (त्रिशंकु) च्या कथेत सशरीर स्वर्गात पाठविण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख आहे, जो प्रयत्न इंद्राने हाणून पाडला. पण याच कथेत विश्वामित्राने प्रतिस्वर्गाची निर्मिती करून तेथे त्रिशंकुची व्यवस्था लावल्याचाही उल्लेख आहे.  अमरावती, इंद्राचा दरबार, अप्सरा, नंदनवन, कल्पवृक्ष इत्यादि गोष्टींचे जे उल्लेख पुराणात आहेत ते खरे मानले, तर ते प्रत्यक्ष स्थानाचे नसावेत असे कसे म्हणावे ? कदाचित ते स्थान वेगळ्या मितीत असू शकेल.

पुराणांची रचना तुलनेने अलीकडच्या काळातील (जास्तीत जास्त २५०० वर्षे) आहे असे जे ठोस विधान सरसकट केले जाते, त्याचा मला उमगणारा अर्थ हा, त्यांचे पुनर्लेखन त्या काळात झाले असा आहे. अर्थात या पुनर्लेखनाच्या वेळी काही गोष्टी त्यात नव्याने टाकल्या गेल्या असतील, काही कथांना, संदर्भांना नवीन पुटे चढविली गेली असतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. एकंदरच पुराणे ही, रूपककथा, दंतकथा, मूळ कथांमध्ये कल्पनाविलासामुळे पडलेली भर, क्वचित प्रक्षिप्त गोष्टी यांचे जंजाळ आहेत हे काही प्रमाणात मान्य करूनही, सर्व पुराणे तुलनेने अलीकडच्या काळात लिहिली गेली हाच दृष्टीकोन पुढे रेटायचा म्हटले, तर  महाभारतातील पुराणांचे, पुराणातील कथांचे जे विपुल उल्लेख आहेत ते ही सर्व प्रक्षिप्त आहेत असे म्हणावे लागेल ! महाभारत हा इतिहास मानला तर, महाभारतातील कथांचे उल्लेख मात्र fiction असे कसे मानता येईल ?

भविष्यकाळाचे अनेकदा यथार्थ ज्ञान असणे, आकाशवाणी होणे, प्रगट होणे, अंतर्धान पावणे, आकाशगमन, अस्त्रे व त्यांचे उपयोग, ती योग्य व्यक्तींच्या हाती पडावीत, त्यांचा वापर विनाकारण होऊ नये, यासाठी देवता (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे)  घेत असलेली काळजी इत्यादि गोष्टी विज्ञानाशी, अतिप्रगत तंत्रज्ञानाशी निगडीत नाहीत असे म्हणणे, म्हणजे एक प्रकारची डोळेझाक आहे.  रामायण, महाभारतातील युद्धे ही त्या काळातील प्रगतीशी सुसंगत असताना, जिथे जिथे अस्त्रांचा वापर झाला आहे, तिथे तिथे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे देवतांचा संबंध आला आहे. अस्त्रांचे ज्ञान, तंत्रज्ञान हे तत्कालीन मानवासाठी केवळ वापरापुरते मर्यादित आहे, संशोधनाशी, मूळातून विकसित होण्याशी नाही. त्या अस्त्रांची तुलना आजच्या काळातील अस्त्रांशी करणे हे त्यामुळेच तितकेसे योग्य नव्हे. सरळसोट अर्थ घेतला तर त्यावेळची अस्त्रे ही मंत्रांशी निगडीत आहेत किंवा मंत्रांच्या सहाय्याने ती activate करता येत असत ,  ती 'fire' झाल्यानंतरही परत घेता येत असत ,  विचलित (redirect) करून त्यांचे लक्ष्य ऐनवेळी बदलता येत असे  (ब्रह्मशिरास्त्र उत्तरेच्या गर्भावर !).  या व अशा अनेक गोष्टींचा आजच्या युद्धविषयक तंत्रज्ञानाशी पूर्णत: मेळ जमत नाही. त्यावेळेचे तंत्रज्ञान हे आजच्या तंत्रज्ञानाशी जुळणारे असलेच पाहिजे हा आग्रह कशाला हवा ?  तंत्रज्ञानाचा उगम, विकास, वापर व लोप ही वारंवार घडणारी प्रक्रिया आहे ही गोष्ट पुरातन स्थापत्याच्या (पिरॅमिड व इतरही अनेक) ज्या खुणा आज उरल्या आहेत त्यातून स्पष्ट होते.

वर्षानुवर्षांच्या परकीय आक्रमणांमुळे,  परकीय जीवसृष्टीबाबत ठाम निष्कर्ष काढता येतील अशा आपल्या देशातील (विशेषत: उत्तर भारतातील) अनेक खुणा नष्ट झाल्या आहेत, नष्ट केल्या गेल्या आहेत, पळविल्या गेल्या आहेत.  ज्या काही खुणा वाचल्या आहेत त्यासंदर्भात अत्यंत खोलवर संशोधन करण्यासंदर्भात, एक अनास्था वरपासून खालपर्यंत पूर्णत: झिरपली आहे असे वाटते. अशावेळेस उपलब्ध ग्रंथसंपत्ती, स्थापत्याच्या खुणा हे कदाचित एक चांगले साधन ठरू शकते. त्या दृष्टीने वेचक, वेधक प्रयत्न करण्याऐवजी, अशा प्रयत्नांना  प्रोत्साहन, बळ देण्याऐवजी,  या खुणा, ग्रंथातील उल्लेख नाकारण्याचे, त्याचा विपरीत अर्थ लावण्याच्या मताचे बर्‍यापैकी प्राबल्य अनेकदा दिसून आले आहे.  या ग्रंथांना सरसकट 'fiction' ठरविण्याचे, उद्योग करणारी मंडळी नक्की त्यातून काय साधतात हे त्यांनाच माहीत.

आक्रमणांच्या झळांनी भाजून निघालेल्या भारतात, पुरातन काळातील प्रगत तंत्रज्ञानाच्या व पर्यायाने परग्रहवासीयांच्या काही खुणा मंदिरे, लेणी, गुहा इत्यादि
ठिकाणी, विशेषत: जिथे दगडी बांधकाम आहे, तिथे काही प्रमाणात टिकून राहिल्या आहेत. वेरूळ लेणी, विशेषत: कैलासनाथ मंदिर हे राष्ट्रकूट काळातील राज्यकर्त्यांनी बनविले यावर विश्वास ठेवणे खरेच अवघड वाटते. या लेण्यांचा आकार लक्षात घेता ३० लाख घनमीटर (साधारण ८० लक्ष टन) इतका दगड त्या पर्वतातून कोरून काढावा लागला असेल असा अंदाज वर्तविण्यात येतो. हा कोरून काढलेला दगड आजूबाजूला कुठेच दिसत नाही हेच मुळी विस्मयकारक आहे. आज उपलब्ध तंत्रज्ञानाने सुद्धा इतका दगड खोदायला आणि मग शिल्पे कोरायला लागणारा काळही, लेण्यांच्या बांधकामाचा जो काळ (१८ वर्षे) पूर्वी सांगितला जात असे  त्याच्याशी पूर्ण विसंगत आहे. (८० लाख टन / १८ वर्षे => प्रतिवर्षी साधारण साडेचार लाख टन  ==>  प्रतिदिवशी १२०० टन !) .  त्यातून हा दगड विलक्षण कठीण आहे.  निर्मितीसाठीच नव्हे तर उध्वस्त करून पाहणार्‍यासाठीही.   कदाचित याच कारणास्तव धर्मांध, इस्लामी क्रूरकर्मा औरंगजेबाला ही लेणी उध्वस्त करण्याचा प्रयत्न तीन वर्षांनंतर सोडून द्यावा लागला असावा !

एक पूर्ण पहाड खोदून, कोरून  बनविलेल्या कैलासनाथ मंदिरात तर अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.  असा दावा केला गेला आहे की जगातील हे असे एकमेव मंदिर आहे जिथे एक पूर्ण पहाड खोदत, कोरत वरून खाली येत मंदिराची निर्मिती झाली आहे. आजच्या अनुमानाप्रमाणे, गणिताप्रमाणे , या मंदिराच्या निर्मितीला लागलेला वेळ हा शंभर वर्षांपेक्षाही अधिक असायला हवा, तसेच अनुमानाप्रमाणे या कामासाठी आवश्यक असलेल्या शिल्पकारांची, मजुरांची
संख्या ही कित्येक हजारात जाते, पण उपलब्ध ऐतिहासिक माहितीनुसार हे मंदिर केवळ १८ वर्षात बांधून पुरे झाले. ही गोष्ट जर खरी मानली, तर त्यासाठी वापरलेले तंत्रज्ञान आपल्या परिचयाचे नाही असेच म्हणायला हवे. आजच्यासारखी स्फोटके व यंत्रे त्या काळात असल्याची माहिती आपल्याकडे नाही.  या मंदिराची निर्मिती करताना साधारण ४ लाख टन इतका दगड खोडून काढावा लागला असेल असा अंदाज आहे. हा राडारोडा कुठे टाकला असावा ? त्याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की पहाड वरून खोदत जायचे तर त्याचे नियोजन कसे केले असावे ? वेरूळ लेणी ज्या जागी आहेत, ते लक्षात घेता, अशा ठिकाणी दीर्घकाळ, हजारो लोकांच्या राहण्याची, जेवणाची सोय करणे ही सामान्य गोष्ट आहे का ?

पुरातन काळातील प्रगत तंत्रज्ञानाच्या व कदाचित परग्रहवासीयांच्या भारतातील वावराच्या , त्यांनी दिलेल्या किंवा  लोकांनी पाहिलेल्या तंत्रज्ञानाच्या काही मोजक्या संभाव्य खुणा

शक्य ती छायाचित्रे सोबत upload केली आहेत.

१) छत्तीसगढच्या चारामा तालुक्यात सापडलेली काही भित्तिचित्रे ही स्पष्टपणे परग्रहवासीयांशी निगडीत आहेत असे म्हणता येईल.
२) प्रसिद्ध वेरूळ लेण्यांमधील एक शिल्प हे आश्चर्यकारक रित्या jetpack शी साधर्म्य दाखविते.
३) वेरूळ लेण्यांतून खाली जाणारी अनेक भुयारे आहेत, आणि यातील कित्येक ही, लहान मुलेही जाऊ शकणार नाहीत इतकी छोटी आहेत. कित्येक ठिकाणी जमीनीवरही अत्यंत खोल असलेली छिद्रे आहेत. ही भुयारे मानवासाठी बनविलेली नसावीत आणि जमीनीवरची छिद्रे ही जमिनीखाली असलेल्या 'hideout' साठी वातायने आहेत  असे काही  ancient alien सिद्धांताच्या समर्थकांचे म्हणणे आहे.  ही भुयारे कुठे जातात, या संदर्भात यंत्रमानव, drone वापरुन पुरेसे संशोधन झालेले नाही.
४) कैलासनाथ मंदिर आकाशातून पाहिले असता, आकाशातून दिसणार्‍या फुलीसदृश आकारामुळे  स्पष्टपणे ओळखू येते. हा आकार जाणीवपूर्वक बनविला आहे असे ancient alien सिद्धांताच्या समर्थकांचे म्हणणे आहे.
५) महाबलीपुरम येथील 'Krishna's Butter Ball' या नावाने सध्या ओळखला जाणारा २५० टन वजनाचा दगड. हा दगड एका उतारावर साधारण २ चौ.फू. इतक्या छोट्याशा जागेत टेकून उभा आहे आणि असे सांगितले जाते की १९०८ मध्ये मद्रासच्या तत्कालीन गव्हर्नरने,  या दगडाला,   सात हत्ती
वापरुन, त्याच्या जागेवरून, उतारावरून खाली आणण्याचे प्रयत्न केले होते व ते प्रयत्न संपूर्णपणे विफल झाले.  कदाचित आजच्या तंत्रज्ञानालाही इतक्या वजनाचा एक दगड अशा उतारावर दीर्घकाळ स्थिर ठेवणे खूप अवघड जाईल. तर मग हे शेकडो वर्षांपूर्वी कसे साध्य केले असेल ?  आजचे प्रगत तंत्रज्ञान वापरुन निदान हा दगड तळास जोडलेला आहे का किंवा तो ज्या उंचवट्यावर (टेकाडावर) उभा आहे तिथे खाली काही आहे का हे शोधणे अवघड ठरू नये. या टेकाडाविषयी असे सुद्धा सांगितले जाते की त्याची उंची दरवर्षी कमी होत आहे.
६) महाबलीपुरम येथील 'गणेशरथ' या नावाने सध्या ओळखले जाणारे मंदिर हे साधारण ६० वर्षांपूर्वी 'विमान' या नावाने ओळखले जात होते (एकंदरच दक्षिणेतील अनेक मंदिरांना 'विमान' अशी संज्ञा आहे) . असे सांगितले जाते की तिथे असलेली गणेशाची मूर्ती ही साधारण ५० वर्षांपूर्वी तिथे स्थापन करण्यात आली. त्यापूर्वी तिथे शिवलिंगासमान काही शिल्प होते असे म्हणतात. या रथाच्या अगदी शिखरावर एक मस्तक कोरलेले आहे, ज्या
च्या डोक्यावरचा मुकुट
हा काहीसा वेगळा असून त्याच्या दोन्ही बाजूला 'शिंगे' आहेत. या मुकूटाला खाली हेल्मेटसारखा पट्टा आहे. या मस्तकाच्या थोडे खाली, अजून एक तसेच
छोटे मस्तक असून त्याच्या खाली एखाद्या रॉकेटप्रमाणे एक आकृती आहे. हे कशाचे निदर्शक आहे ?   याच रथाच्या खालच्या भागात चार वेगवेगळ्या प्रकारचे चेहरे कोरलेले आहेत जे विविध मानववंशाचे असावेत असे म्हणता येईल. अशा प्रकारचे 'रथशिल्प' उभारण्याचे काय प्रयोजन असावे ?

रहस्यांचा उलगडा न होऊ शकल्याने किंवा त्यासंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण मिळू न शकल्याने, त्याला तात्काळ ancient alien सिद्धांताशी जोडणे योग्य नव्हे हे खरे, पण जेंव्हा अशा अनेक गोष्टी एकाच सिद्धांताशी मिळत्याजुळत्या दिसू लागतात, तेंव्हा अतार्किक स्पष्टीकरणे देण्यापेक्षा कदाचित त्या दृष्टीकोनातून विचार केला, प्रयत्न केले तर काही रहस्ये उलगडू शकतीलही.  आजही  कदाचित घनदाट जंगलात, रानावनात,  दुर्गम पर्वतरांगांमध्ये, आवश्यक तिथे उत्खनन केल्यास,  स्थानिकांचे सहकार्य मिळवत नियोजनबद्ध शोध घेतला तर काही विलक्षण गोष्टी अजूनही सापडू शकतील.

----
थोडेसे अवांतर :
ककुद्मीच्या कथेचे मूळ श्लोक
===============
श्रीमद् भागवत पुराण
नवमः स्कंधः
तृतीयोऽध्यायः
==== source http://satsangdhara.net/bhp/bhp09-03.htm ====
....
तस्य पुत्रशतं जज्ञे ककुद्मि ज्येष्ठमुत्तमम् ।
ककुद्मी रेवतीं कन्यां स्वां आदाय विभुं गतः ॥ २९ ॥
पुत्र्या वरं परिप्रष्टुं ब्रह्मलोकं अपावृतम् ।
आवर्तमाने गान्धर्वे स्थितोऽलब्धक्षणः क्षणम् ॥ ३० ॥
त्याला शंभर श्रेष्ठ पुत्र होते. त्यांपैकी सर्वांत थोरला ककुद्मी होता. ककुद्मी आपली कन्या घेऊन तिच्यासाठी वर विचारण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेवाकडे रजतमरहित ब्रह्मलोकात गेला. ब्रह्मलोकामध्ये गाणे चालू असल्याने विचारण्यासाठी संधी न मिळाल्याने तो काही वेळ तेथेच थांबला. (२९-३०)

तदन्त आद्यमानम्य स्वाभिप्रायं न्यवेदयत् ।
तत् श्रुत्वा भगवान् ब्रह्मा प्रहस्य तमुवाच ह ॥ ३१ ॥
त्यानंतर ब्रह्मदेवांना नमस्कार करून त्याने आपल्या येण्याचा उद्देश सांगितला. त्याचे म्हणणे ऐकून भगवान ब्रह्मदेव त्याला हसून म्हणाले, (३१)

अहो राजन् निरुद्धास्ते कालेन हृदि ये कृताः ।
तत्पुत्रपौत्र नप्तॄणां गोत्राणि च न श्रृण्महे ॥ ३२ ॥
राजा ! तू आपल्या मनात ज्या लोकांविषयी विचार केला होतास, ते सर्वजण केव्हाच काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आता त्यांचे मुलगे, नातू, पणतू इतकेच काय गोत्रांची नावेसुद्धा शिल्लक राहिली नाहीत. (३२)

कालोऽभियातस्त्रिणव चतुर्युगविकल्पितः ।
तद्‍गच्छ देवदेवांशो बलदेवो महाबलः ॥ ३३ ॥
मध्यंतरीच्या काळात सत्तावीस युगांचा काळ निघून गेला आहे. म्हणून तू परत जा. यावेळी भगवान नारायणांचे अंशावतार महाबली बलराम पृथ्वीवर विद्यमान आहेत. (३३)
----

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (८ / ९)


परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील अस्तित्वाविषयी, UFO आणि तत्सम गोष्टींविषयीचे काही दावे पूर्वीच्या एका लेखांकात येऊन गेले आहेत. या व्यतिरिक्त, पृथ्वीवर परग्रहवासीयांच्या खुणा सापडण्याविषयीही अनेक दावे केले गेले आहेत.  अर्वाचीन काळातील त्याची सुरुवात झाली होती, प्रामुख्याने तंत्रज्ञानातील प्रगतीने वेग पकडल्यावर. पण तरीही दुसर्‍या महायुद्धाच्या काळात परग्रहवासीयांच्या कथांची बीजे रोवली गेली असे म्हटले तर ते चुकीचे नव्हे. पण यामागे खरंच परग्रहवासी होते की आणखी काही कारण होते ?

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात साम्राज्यवादाच्या, वर्चस्वाच्या भावनेतून शस्त्रस्पर्धेला जे उधाण आले होते, त्यातून नवीन, आव्हानात्मक तंत्रज्ञानाला साध्य करण्याच्या एका अनिवार ओढीने अनेक देश ग्रस्त झाले होते.  त्या काळात हिटलरच्या मनात तांत्रिकदृष्ट्याही अव्वल ठरण्याच्या स्वप्नाने घर केले नसते तरच
नवल.  विविध सांकेतिक नावांखाली नानाविविध प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयत्न, इतर अनेक देशांप्रमाणे जर्मनीतही तेंव्हा सुरू होते.  या संदर्भात अनेक खळबळजनक दावे करण्यात आले आहेत. त्यात क्षेपणास्त्र, उडत्या तबकड्या, कालप्रवास, Teleportation, अंटार्टिकातील तळ  आणि बर्‍याच प्रयोगांबद्दल, बरेच काही बोलले जाते.  पण त्यात सर्वात उल्लेखनीय आहेत, ते गुरुत्वाकर्षणाच्या नियमांना पराभूत करणारे प्रयोग. 



दूरवरच्या अवकाशप्रवासांना अंतराव्यतिरिक्त अडसर ठरणार्‍या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यातील एक प्रमुख आहे इंधन.  पण या अडचणीवर मात करण्याचे प्रयत्न, अवकाशयुग सुरू होण्यापूर्वीच झाले होते !  दुसर्‍या महायुद्धाच्या काळात.

आजही कुठल्याही अवकाशमोहिमेला येणार्‍या खर्चात बर्‍यापैकी मोठा वाटा असतो इंधनाचा.  यातील बरेचसे इंधन हे पृथ्वीची सोबत सोडतानाच खर्च होते आणि त्याचे कारण आहे गुरुत्वाकर्षण. स्वाभाविकच जर गुरुत्वाकर्षणावर मात करणारे तंत्रज्ञान शोधता आले तर अवकाशमोहिमाच नव्हे, तर पृथ्वीवरील हवाई वाहतुकीत (नागरी वा लष्करी) आमुलाग्र बदल घडू शकतील.  तरीही थेट प्रतिगुरुत्वाकर्षणाचे  (anti gravity) अवघड लक्ष्य का निवडले असावे ?
याचे सांगितले जाणारे कारण आहे, १९३७ साली जर्मनीमधल्या एका गावात बिघाड होऊन आदळलेले एक परग्रहवासीयाचे अंतराळयान व त्या यानात जिवंत अवस्थेत सापडलेला एक परग्रहवासी.  आता या घटनेबाबत विश्वासार्ह मानता येईल असा कोणताही पुरावा नाही. पण जी काही थोडीफार माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ही बातमी वेगाने हिटलरपर्यंत पोहोचली आणि तात्काळ जर्मनीच्या सैन्यदलाने, त्या यानाचे विखुरलेले भाग ताब्यात घेऊन दोन वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. या दोन्ही ठिकाणी त्या अवशेषांवर काम करणार्‍या वैज्ञानिकांची, तज्ज्ञांची मुख्य जबाबदारी होती, ती त्या अवशेषामागच्या तंत्रज्ञानाचे 'Reverse Engineering' करण्याची. यापैकी एका गटात  Walter Horten आणि Reimar Horten हे वैमानिक बंधु होते. अधिकृतरित्या या बंधुंचे  aeronautics वा तत्सम संबंधित शास्त्राचे कोणतेही तंत्रशिक्षण झालेले नव्हते. पण याच बंधुंच्या नावे, त्याच दशकातल्या प्रगत अशा, Horten Ho 229, या स्टेल्थ तंत्रज्ञान असलेल्या, बॉम्बचा मारा करू शकणार्‍या विमानांची संरचना करण्याचे व त्यांची चाचणी घेण्याचे श्रेय जाते. अर्थात हे सिद्ध करणे अशक्य आहे की हे यश, त्या  अंतराळयानाची 'Reverse Engineering' केल्याची परिणती होती. 

गुरुत्वाकर्षणावर मात करण्याची योजना अधिकृतरीत्या पूर्णत्वास गेली नाही, मात्र प्रायोगिकदृष्ट्या तिने काही प्रमाणात निश्चित यश मिळविले होते.  अशाच प्रकारे प्रगत रॉकेटसंबंधी संशोधन करणार्‍या चमूमध्ये होता अभियंता  Werner von Braun ज्याने हिटलरसाठी, सुप्रसिद्ध (की कुप्रसिद्ध) V-2 रॉकेट्सची निर्मिती केली. दुसर्‍या महायुद्धानंतर हे सर्व तंत्रज्ञान आणि त्यावर काम करणारे शास्त्रज्ञ, अभियंते देखील आयते अमेरिकेच्या हातात सापडले.  दुसर्‍या महायुद्धानंतर, जर्मनीतील शास्त्रज्ञांची जी फळी अमेरिकेला 'सामील' झाली, त्यात Werner von Braun याचाही समावेश होता.  अमेरिकेसाठी नंतर याने  Saturn V रॉकेटची निर्मिती केली जे पुढे जाऊन  Apollo प्रकल्पात व  Skylab ला अवकाशात पाठविण्यासाठी वापरले गेले.
हिटलरने अंटार्टिका येथे, गुप्त संशोधनासाठी तळ वसविला होता यासंबंधीचेही, तिथल्या संशोधनासंबंधीचे जे अनेक अचाट दावे करण्यात आले होते, त्यातील
काही wikileaks ने उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे नाकारले होते. तरीही असा कोणताही तळ बांधलाच गेला नाही असे मानण्याइतका, संशय पुरता विरलेला नाही, याचे कारण आहे  Google Earth वर (-66° 55' 32.17", +99° 83' 82.94") अंटार्टिकासंबंधी नकाशे zoom करून बघितल्यावर सापडलेले काहीतरी अनोखे चित्र.  जे सोबत दिले आहे.  या प्रवेशद्वाराची अंदाजे उंची ३० मीटर इतकी आहे व रुंदी ९० मीटर.  शब्दश: 'मरणाच्या थंडीत' इतक्या विशाल प्रवेशद्वाराची गरज का पडावी ?  


Reverse Engineering  हीच पद्धत वापरुन, Roswell च्या घटनेचाही (आणि कदाचित त्याआधी घडलेल्या काही घटनांचाही), अमेरिकेने अशाच प्रकारे करून उपयोग करून घेतला, हा समज गेली अनेक वर्षे टिकला आहे आणि त्याला कारणीभूत आहे, अमेरिकेने एकंदरच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात  वेगाने मारलेली भरारी आणि  सध्या Area 51 या नावाने सुप्रसिद्ध असलेली व ज्याबाबतीत टोकाची गुप्तता, सुरक्षितता बाळगली जाते, अशी Nevada
मध्ये असलेली, संशोधन व चाचणी प्रयोगशाळा. अमेरिकन वायुदलाच्या अधिपत्याखाली असलेले हे क्षेत्र, जवळजवळ १५० चौ किमी इतक्या विस्तीर्ण भूभागावर पसरलेले आहे. Area 51 बाबत अमेरिकन सरकार फार काही बोलायला तयार नसते. अनेक वर्षे Area 51 चे अस्तित्वच नाकारल्यानंतर , एका न्यायालयीन याचिकेमुळे,  जुलै/ऑगस्ट २०१३ मध्ये त्याचे अस्तित्व CIA तर्फे मान्य करण्यात आले.  अधिकृतरित्या तिथे केवळ वायुदलाशी निगडीत अशा गोष्टी होतात, पण या विभागावरून वा विभागाच्या आसपास फिरकायला नागरीच नव्हे तर सामान्य स्तरावरच्या लष्करी विमानांनाही बंदी आहे. या टोकाच्या गुप्ततेमुळे जागृत झालेले कुतूहल इतके तीव्र आहे, की त्यातून अनेक कथा निपजतात. तिथे परग्रहवासी आहेत, ते नियमित येतात, तिथे परग्रहवासीयांशी संकर करण्याचे प्रयोग चालतात,   तिथे Teleportation, Weather Weapon चे प्रयोग होतात, कालप्रवासाशी निगडीत संशोधन तिथे चालते असे अनेक खळबळजनक दावे  चक्क छायाचित्रे, video वापरुन केले गेले आहेत. (त्या क्षेत्रात कुठल्याही स्वरूपाच्या photography ला मनाई आहे तरीही). अनेक देशांच्या मानवनिर्मित उपग्रहांनी घेतलेली छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर, काहींनी त्या छायाचित्रांचे विश्लेषण करण्यात प्रचंड वेळ, शक्ती आणि पाने (अगदी वेब ची असली तरी :-) ) खर्ची घातली आहेत आणि  Area 51 चे सात मजले जमिनीखाली आहेत, तसेच जमिनीखाली रेल्वेचे जाळे आहे असेही दावे केले आहेत. या संदर्भात काही अत्यंत विश्लेषक स्वरूपाच्या आणि काही अंशी तथ्य असू शकेल अशा माहितीसोबतच,  प्रचंड मनोरंजक साहित्यही इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

परग्रहवासीयांच्या पृथ्वीवरील वावराविषयी पुरावा म्हणून दाखविली जाणारी आणखी एक गोष्ट आहे Crop Circles. भरघोस पीक असलेल्या विस्तीर्ण
शेतांमध्ये, मोठ्या क्षेत्रातील पीके अत्यंत थोड्या वेळात  (बहुदा रात्रीच्या वेळी)  वाकवून,  विविध संमितीय आणि क्वचित असंमितीय रचनेचे आकाशातून सुंदर दिसणारे आकार तयार होतात आणि ते तिथे कसे आले याबद्दल सुयोग्य स्पष्टीकरण सापडत नाही, तेंव्हा ही Crop Circles म्हणजे परग्रहवासीयांनी त्यांचे अस्तित्व जाणवून देण्यासाठी वा संवादाचे एक साधन म्हणून केलेला प्रयत्न आहे असे मानण्याकडे अनेक जणांचा कल बनतो. ही Crop Circles मानवी प्रयत्नाने बनविता येतात असे काही जणांनी प्रात्यक्षिकासह दाखवून दिले आहे. पण प्रामुख्याने अमेरिका व युरोप खंडात, आणि मर्यादित प्रमाणात जगभर आढळणार्‍या सर्वच अशा प्रकारच्या  Crop Circles ना मानवनिर्मित म्हणायला जीभ
धजावणार नाही, इतके कित्येकांचे आकार विशाल, सुंदर, अचूक आणि अत्यंत गुंतागुंतीचे आहेत. या बाबतीत मतमतांतरे आहेत आणि या Crop Circles चा अभ्यास करणार्‍या एका गटाचे म्हणणे असे आहे की यातील साधारण ८०% ही निश्चितपणे मानवनिर्मित आहेत. उरलेली जी आहेत त्यांच्या मागे बहुदा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात क्वचित  होणारे आकस्मिक बदल असावेत.  दुसर्‍या गटातील अभ्यासकांनी असे मत नोंदविले आहे की त्यांचे विशाल आकार लक्षात घेता, सुबकता लक्षात घेता, अत्यंत कमी वेळात अशी Crop Circles कुठल्याही उपकरणाशिवाय बनविणे शक्य नाही. कारण काही ठिकाणी शेतांवर नजर ठेवलेली असूनही काही सेकंदात असे आकार निर्माण झाल्याची विपुल उदाहरणे आहेत. त्यांचे असे म्हणणे आहे की ही  Crop Circles तयार करण्यामागे आपल्याला अज्ञात अशी एखादी शक्ती आहे आणि जिथे जिथे  Crop Circles तयार झाली शेतातील तेवढ्या भागाची सुपीकता त्यांना वाढलेली आढळली. कित्येक वेळा Crop Circles तयार झालेल्या भागातील कॅमेरे, इतर उपकरणे नादुरुस्त झाल्याचीही त्यांना आढळली आहेत. 


Bermuda Triangle हे परग्रहवासीयांच्या अस्तित्वाशी जोडले गेलेले आणखी एक मोठे आणि सुप्रसिद्ध प्रकरण. दुसर्‍या महायुद्धानंतरच्या काळात विमानांच्या व नौकांच्या गायब होण्याची अनेक प्रकरणे, जेंव्हा एका विशिष्ट त्रिकोणीय सागरी क्षेत्राशी जोडली जायला लागली, तेंव्हा Bermuda Triangle चा जन्म झाला.  या विषयावर प्रचंड काथ्याकूट झाले आहे आणि इंटरनेटवरही या संबंधीच्या घटनांची यादी, दावे, प्रतिदावे, स्पष्टीकरणे अशी प्रचंड माहिती उपलब्ध आहे. पण विशेष म्हणजे, दुसर्‍याच काय पण पहिल्या महायुद्धापूर्वीही, नौका गायब होण्याच्या घटना या त्रिकोणाशी संबंधित आहेत  असे निदर्शनास आले आहे.  या क्षेत्राशी शेवटची घटना ही २० सप्टेंबर २०१५ रोजी घडली आहे आणि यावेळेस नौकेच्या कॅप्टनचा शेवटचा संदेश होता की 'नौकेचे मुख्य इंजिन बंद पडले आहे आणि नौका १५ अंशाने कलली आहे.  त्यामुळे नौकेत शिरलेले पाणी आता आटोक्यात आणण्यात आले आहे.'  त्यानंतर कोणताही संदेश आला नाही आणि शेवटी नौका गायब झाल्याचे जाहीर करण्यात आले.   यावेळेस अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यामुळे जो खोलवर शोध घेण्यात आला त्यातून ,  SS El Faro ही ७९० फूटी मालवाहू नौका Joaquin नावाच्या चक्रीवादळात सापडून बुडाल्याचे व साधारण १५,००० फूट खोल अंतरावर ती एकसंध अवस्थेत समुद्रतळावर असल्याचे सांगण्यात आले.  उपग्रहाच्या छायाचित्रांनीही याला दुजोरा दिला, मात्र अजूनही
काही तांत्रिक कारणांमुळे तिचा  Voyage Data Recorder हस्तगत करण्यात यश आलेले नाही आणि नौकेतील एकाही व्यक्तीच्या मृतदेहाचा अद्याप तपास लागू शकलेला नाही. Bermuda Triangle प्रमाणेच विमाने, नौका गायब होण्याच्या घटनांशी संबंध असलेले आणि त्यामुळे गूढतेचे वलय लाभलेले आणखीही काही विभाग असे आहेत असे काही UFO वाद्यांचे म्हणणे आहे. हे विभाग आहेत Bass Strait Triangle, Bennington Triangle, Bridgewater Triangle, Broad Haven Triangle, Devil's Sea, Pag Triangle. याशिवाय   Vile vortex हा अशा बारा जागांचा संच आहे (ज्यात Bermuda Triangle आणि   Devil's Sea ही येतात)  ज्या विभागात गूढ, पूर्णत: उकल  न होऊ शकणार्‍या घटना अधूनमधून घडतात,  ज्यांचा संबंध परग्रहवासीयांशी जोडला जातो.

या व्यतिरिक्त आपल्याला अचंबित करू शकतील अशा पुरातन पण प्रगत संस्कृतींच्या अस्तित्वाच्या अनेक खाणाखुणा आज सापडतात. प्राचीन काळी प्रगत तंत्रज्ञान होते हे न मानणार्‍या, न स्विकारणार्‍या वैज्ञानिकांची संख्या बर्‍यापैकी मोठी आहे. मग त्या गोष्टींना कसे साध्य केले असावे याची बर्‍याचदा थातुरमातुर, हास्यास्पद स्पष्टीकरणे दिली जातात. अशा अचंबित करू शकणार्‍या खुणांमध्ये पिरॅमिड्सचा प्रथम क्रमांक आहे. पिरॅमिड्स म्हटले की आपल्या डोळ्यासमोर इजिप्त आणि त्यातही विशेषत: Giza चा पिरॅमिड येतो. पण इजिप्तमधील सर्वात जुना पिरॅमिड हा Saqqara पिरॅमिड असून त्याचा काळ हा इ.स. पूर्व २६७० असा सांगितला जातो. Giza त्याच्या नंतरच्या शतकातला आहे. सर्वात अलिकडचा पिरॅमिड हा (आता) सुदान मध्ये असलेला Nuri पिरॅमिड (इ.स.पूर्व ६६४) हा आहे. सुरुवातीच्या पिरॅमिड्सची भव्यता आणि काटेकोर परिमाणे, बांधणी अलीकडच्या पिरॅमिडमध्ये नाही. पण केवळ पिरॅमिड हा आश्चर्याचा भाग नाही.  त्याव्यतिरिक्त Tutankhamun, Akhenaten ते अगदी उलट्या दिशेने Tuthmosis I पर्यंत आणि अठराव्या राजघराण्यातील काही इतर व्यक्ती यांच्या डोक्याचा आकार व काही इतर शारीरिक वैशिष्ट्ये, सख्ख्या भावंडातील लग्नाच्या प्रथा या प्रथमदर्शनी, स्वाभाविक अर्थाने पूर्णत: मानवी वाटत नाहीत.  अर्थात अधिकृतरीत्या, सापडलेल्या सर्व ममींचा जनुकीय अभ्यास करणार्‍या वैज्ञानिकांच्या , वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते त्यांच्या DNA मध्ये अमानवी असे काहीही सापडलेले नाही. 

इजिप्त व्यतिरिक्त जगात इतर ठिकाणीही पिरॅमिड्स सापडले आहेत आणि ते ही तसेच विशाल आकाराचे आहेत. मेक्सिकोमध्ये असलेल्या अनेक पिरॅमिड्सपैकी एक असलेला , Great Pyramid of Cholula, हा  ४४.५ लक्ष क्युबिक मीटर इतके आकारमान असलेला, आकारमानाने जगातील सर्वात मोठा असा पिरॅमिड आहे. चीनमध्येही पिरॅमिडसदृश, तितकीशी सुबक नसलेली बांधकामे आहेत.  Mausoleum of the First Qin Emperor हा त्यातील सर्वात प्रसिद्ध. Nubian pyramids या नावाने ओळखला जाणारा पिरॅमिड्सचा समूह सुदानमध्ये आहे. Pyramids of Argolis या नावाने परिचित असलेले काहीसे ओबडधोबड आकाराचे पिरॅमिड्स ग्रीसमध्ये आहेत. इटलीमध्ये, इराकमध्ये, पेरु देशातही पिरॅमिड्स सापडले आहेत. इतकेच कशाला पण ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेला काहीसे  दूर, अटलांटिक समुद्रात असलेल्या Samoa बेटावरही  पिरॅमिड सापडला आहे.   हे सर्व पिरॅमिड्स थडगी म्हणून वापरण्याची प्रथा सर्वत्र पसरावी, ही त्या काळातील मर्यादित दळणवळणाची साधने लक्षात घेता,  ही काहीशी विचित्र गोष्ट आहे.
पण पिरमिड्स व्यतिरिक्तही, अनेक गोष्टी कुणी, कधी व कशासाठी अशा प्रश्नचक्रात गुरफटलेल्या आहेत. आणि स्वाभाविकपणे परग्रहवासीयांशी जोडल्या गेल्या आहेत.  त्यातील काही आहेत :

१) Nazaca Lines : पेरु देशातील Nazaca पठारावर सर्वत्र पसरलेली, किमान २००० वर्षे जुनी असलेली विविध आणि विशाल आकाराची आकृतीचित्रे. या आकृत्या केवळ विमानातून (अर्थात आकाशातून) पाहिल्या तरच लक्षात येतात.
२) Band of Holes : Nazaca पठाराच्या एका भागात असलेला हा साधारण ५००० ते ६००० खड्ड्यांचा पट्टा. न वापरलेल्या थडग्यांचे खड्डे असे वर्गीकरण झालेला हा पट्टा देखील विमानातून पाहिल्यावर लक्षात आला.
३) Easter Island Statues (Moai) : द. अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यापासून दूर, पॅसिफिक महासागरात, काहीशा एकाकी असलेल्या ईस्टर बेटे या बेटसमूहावर असलेले विचित्र आकाराचे, कित्येक टन वजनाचे, दूरवर नजर लावून बसलेले पुतळे.
४) Guatemala Stone Head : Guatemala देशातील जंगलात सापडलेले अत्यंत सुबक आणि विशाल आकाराचे मानवी दगडी डोके. सध्या हे उध्वस्त अवस्थेत आहे.
५) Dolmen of Menga : थडगी म्हणून वापरण्यात आलेले प्रचंड मोठे दगडी बांधकाम. वापरण्यात आलेले दगड १०० ते २०० टन वजनाचे. काळ अंदाजे इ.स.पूर्व २५००.




यातील बर्‍याचशा गोष्टींचे विशाल आकार, दूरवरून, क्वचित आकाशातूनच दिसू शकतील अशी त्यांची रचना, प्रमाणबद्धता,  पूर्णत: न उलगडलेला हेतु यामुळे त्यांच्याभोवती एक गूढतेचे वलय आहे. त्यामुळेच कदाचित त्यांच्यासोबत परग्रहवासीयांचे नाव जोडले जाते. 


काही गोष्टी निसर्गनिर्मित आहेत असे मानले जाते, पण त्यांचा आकार काही वेगळेच सांगतो. त्यातील प्रमुख आहेत :

१) Badlands Guardian, Alberta, Canada : पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या उंचसखलपणामुळे, चिकणमातीने बनलेल्या तिथल्या जमिनीच्या विशिष्ट ठिकाणी झालेल्या झीजेमुळे भूपृष्ठाला एका मानवी मस्तकाचा अत्यंत ठाशीव आकार आला आहे, जो केवळ आकाशातून लक्षात येतो.
२) Baigong Pipes : Baigong पर्वताच्या पायथ्याशी एका गुहेत पाईपाप्रमाणे असलेले नळकांड्याचे एक जाळे एका खार्‍या पाण्याच्या सरोवरापर्यंत गेलेले आहे. यातील कित्येक पाईप सारख्या आकाराचे आहेत तर एक पाईप चक्क १६ इंच इतका जाड. या पर्वताचा आकारही पिरॅमिडशी काहीसा जुळता.
३) Klerksdorp sphere : द. आफ्रिकेतील एका खाणीत सापडलेले असंख्य गोल किंवा चपट्या गोल आकाराचे हे मोठ्या सुपारी एवढे हे गोटे, त्यांच्या उगमाविषयी योग्य कारणमीमांसा होऊ न शकल्याने गूढतेचे वलय बाळगून आहेत. 


याशिवाय ज्यांचे मूळ, पृथ्वी असावे असे 'वाटत नाही', अशा काही गोष्टीही लोकांच्या हाती सापडल्या आहेत. त्यातील काही विशेष उल्लेखनीय गोष्टी आहेत :


१) Betz Mystery Sphere : हा खराखुरा कोड्यात पाडणारा, स्वयंप्रेरणेने हालचाल करणारा  गोलक. याचा उलगडा वैज्ञानिक परीक्षणानंतरही होऊ शकलेला नाही.
२) Quimbaya artifacts (Ancient Aeroplane models) : हजार वर्षापेक्षाही अधिक जुन्या विमानाच्या आकाराच्या प्रतिकृती. यातील बर्‍याचशा सोन्याने बनलेल्या आहेत.
३) Antikythera mechanism : वैज्ञानिकांनाही सर्वाधिक चकित करून गेलेली वस्तू. साधारण इ.स. पूर्व २२५ च्या आसपास निर्माण करण्यात आलेला आणि बहुदा खगोलीय गणितासाठी उपयोगात येत असावा असा analogue computer .
४) Dorchester Pot : एखाद्या सामान्य फुलदाणीसारखी वस्तु जी एक दगड फोडल्यावर, दगडाच्या आत सापडली. दगड तयार होण्यासाठी लाखो वर्षे लागू शकतात हे लक्षात घेतल्यावर यासंबंधीचे कुतूहल लक्षात येते.


५) Ubaid Lizard Men : इराकमधील उत्खननात सापडलेली अंदाजे ७००० वर्षे जुनी मानवी शरीर आणि सरड्याचे तोंड असलेल्या, हातात दूधपिते अपत्य असलेल्या स्त्रीच्या अनेक प्रतिकृती

६) The Tomb of K'inich Janaab' Pakal : या 'थडग्यात'सापडलेल्या अनेक चित्रविचित्र गोष्टींमध्ये सर्वात उल्लेखनीय आहे, ते शवपेटीचे झाकण ज्यावर  एखाद्या यानात बसून ते यान नियंत्रित करणार्‍या 'व्यक्तीची'आकृती आहे. 



वर दिलेल्या यादीतील प्रत्येक गोष्टीवर एक स्वतंत्र पोस्ट होऊ शकेल इतकी माहिती उपलब्ध आहे. मी जाणीवपूर्वक रोमन लिपीत, त्यांची यादी दिली आहे, जेणेकरून ज्यांना अधिक जिज्ञासा आहे ते सवडीनुसार search engine मध्ये copy-paste करून शोधू शकतील. 

विशाल आकाराची, प्रचंड वजनाची दगडी बांधकामे करण्याचा 'शौक' हा प्राचीन काळात जगभर सर्वत्र आढळतो, जणू इतक्या वजनाचे दगड उचलणे ही त्या काळातील लोकांसाठी अगदी सहज गोष्ट होती. अनेक ठिकाणी या दगडांचे बांधकामही इतके सुबक आणि परस्परांशी अत्यंत सहज जोडकाम केलेले आहे की दगड वितळवून जोडले आहेत कि काय अशी शंका यावी. पण तरीही तशा कोणत्याही खुणा दगडांवर नाहीत. हे तंत्रज्ञान आजही उपलब्ध नाही असे म्हणू शकू, अशी खरंतर परिस्थिती आहे. शिवाय अशी अनेक बांधकामे थडगी म्हणून वापरलेली दिसत असली, तरी त्यांचा मूळ उद्देश तोच होता असे सिद्ध करणे अशक्य आहे. अशीच शंका सापडलेल्या काही गोष्टींबाबत घेतली जाते. ज्या काळात तंत्रज्ञान, विज्ञान आजच्याएवढे प्रगत नव्हते, त्या काळातील अशा गोष्टी  सापडू लागल्या,  की ज्या आजच्या तंत्रज्ञानाशी साम्य दाखवतात तर, आपल्या मूळ गृहितकांवर प्रश्न उभे राहतात.   एकंदरच या सर्व गोष्टींबाबत प्रश्न अधिक आहेत आणि समर्पक उत्तरे कमी आणि त्यामुळेच कदाचित त्यांच्याभोवती एक गूढतेचे धुके आहे, जे स्वाभाविकपणे त्यांना परकीय जीवसृष्टीशी जोडते.

मंगळवार, २ ऑगस्ट, २०१६

परकीय जीवसृष्टी - भाग (७ / ९)


गुरु या वायूरूपी महाकाय ग्रहाचा पृथ्वीवरील जीवन संरक्षित ठेवण्यात, त्याला वाढू देण्यात मोलाचा वाटा आहे.  पण प्रत्यक्ष गुरुवर जीवसृष्टी असू शकेल का याचे उत्तर सध्यातरी 'बहुदा नाही' असेच आहे. सध्या NASA चे Juno हे अंतराळयान 'गुरुकुलात' आहे आणि गुरुची व गुरुच्या अनेक उपग्रहांच्या रहस्यांची ते उकल करेल अशी आशा आहे.  सध्या उपलब्ध असलेल्या माहितीनुसार गुरूला स्वत:चा पृष्ठभाग नाही. मुख्यत्वेकरून हायड्रोजन आणि हिलियम यांनी बनलेल्या हा ग्रहाबद्दल काही वैज्ञानिक असे मानतात की पुरेसे वस्तुमान 'जमवू' न शकल्यामुळे तो तारा होऊ शकला नाही. १९९५ मध्ये गुरुचा अभ्यास करण्यासाठी सोडलेल्या Galileo यानाचे आयुष्य जेंव्हा संपले, तेंव्हा  पृथ्वीवरून यानात गेलेल्या जीवाणूंमुळे, गुरुच्या उपग्रहावर जीवन रुजू नये यासाठी, Galileo यान गुरुच्या उपग्रहांऐवजी, गुरुवरती 'आदळावे' असे ठरले. तेंव्हा त्या यानात असलेल्या प्लूटोनियमच्या उर्जास्त्रोतामुळे, गुरुवर अणुस्फोटाची साखळी प्रक्रिया सुरू होऊन तो तारा बनण्याच्या दिशेने वाटचाल करेल अशी भीती वैज्ञानिकांच्या एका गटाला वाटत होती.  अर्थात तसे काही घडण्याची शक्यता नव्हती आणि तसे काही झालेही नाही. पण हे सर्व सांगण्यामागचा हेतु हा की तब्बल ६७ उपग्रहांसह, अत्यंत विरळ अशा कड्यासह, सूर्यमालेत स्वत:चे अस्तित्व पदोपदी जाणवू देणारा, लेकुरवाळा गुरु हे विविधतेने नटलेल्या, एका स्वतंत्र(उप) ग्रहमालेचे विश्व आहे. याखेरीज अनेक लघुग्रह सूर्याभोवती फिरत असले तरी त्यांच्यावरील गुरुच्या प्रभावामुळे ते गुरुच्या 'गोटात' आहेत असे म्हणायला हरकत नाही.  या कारणामुळे गुरुकुलात जीवसृष्टीचे अस्तित्व नक्की सापडेल असा ठाम विश्वास असणारे अनेक वैज्ञानिक आहेत आणि तत्संबंधी विविध प्रकल्प कार्यरत आहेत, योजलेले आहेत.

गुरूला 'पृष्ठभाग' नाही असा सध्याचा अंदाज आहे. मात्र सूर्यापासून (Solar Wind) संरक्षण करणारे गुरूचे चुंबकीय क्षेत्र अत्यंत बलवान आणि विशाल आहे. इतके की ते त्याच्या उपग्रहांनाही सुरक्षाकवच पुरवते. हायड्रोजन हा मुख्य घटक असणार्‍या गुरुच्या वातावरणात अत्यल्प प्रमाणात का होईना मिथेन, अमोनिया, वाफेच्या स्वरूपातील पाणी यांचे अस्तित्व आहे. जीवन असण्यासाठी हे घटक पुरेसे असले, तरी गुरुच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे, तिथल्या वातावरणाच्या प्रचंड दाबामुळे तिथे जीवसृष्टी असलीच तर ती आपल्या अपेक्षांच्या, पृथ्वीवरील जीवसृष्टीच्या आसपास जाणारी नसेल हे स्वाभाविक आहे. शिवाय गुरुवर, किमान गेली साडेतीनशे वर्षे, टिकून असलेले 'Great Red Spot' या नावाने प्रसिद्ध असलेले, महाप्रचंड वादळ हे वातावरणाच्या वरच्या थरातील उष्णता वाढविण्याचे काम करते असे लक्षात आले आहे. केवळ उडणारे, तरंगणारे जीव आणि त्यांचा जीवनक्रम यांची कल्पना करणे अगदी सोपे नाही.  आणि अजूनपर्यंत अशा जीवसृष्टीच्या कोणत्याही खुणा तेथे सापडलेल्या नाहीत.   दुसर्‍या बाजूने विचार केला तर वातावरणाच्या सर्वात खालच्या थराला. जिथे गुरुची Core (आत्यंतिक अंतर्भाग) असेल असे मानले तर तिथे असणारे वातावरणाचा, गुरुत्वाकर्षणाचा  दाब यामुळे तापमान इतके जास्त असेल की तिथे कदाचित हायड्रोजन हा द्रवरूपात असण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी जीवसृष्टीची कल्पना करणे अशक्य आहे.

अनेक वैज्ञानिकांना, गुरुच्या काही उपग्रहांवर मात्र जीवसृष्टीचे अस्तित्व असण्याची बरीच शक्यता वाटते.

Io हा गुरुकुलातील (खरंतर सूर्यकुलातील) सर्वात जागृत उपग्रह.  Galileo ने जानेवारी १६१० मध्ये शोधलेल्या गुरुच्या चार उपग्रहांपैकी, गुरूला सर्वात जवळ असणार्‍या या उपग्रहावर, मोठ्या संख्येमध्ये असलेले जागृत ज्वालामुखी, Io च्या वातावरणात सतत गंधक व गंधकाची संयुगे फेकत असतात. गुरुच्या अतितीव्र गुरुत्वाकर्षणाच्या मुळे, तसेच इतर मुख्य उपग्रहांच्या विविध दिशातील गुरुत्वीय आकर्षणामुळे,  त्याच्या पृष्ठभागाचे जवळजवळ १०० मी इतके आकुंचन, प्रसरण (Tidal Heating) चालू असते.. पृष्ठभागाचे तापमान -१३०° सेल्सियस  आणि ज्वालामुखींचे तापमान साधारण ३०००° सेल्सियस अशा दुहेरी तापमानाच्या क्षेत्रात विभागाला गेलेल्या Io च्या वातावरणात जवळजवळ ९०% सल्फर डायऑक्साइड आहे.  याव्यतिरिक्त पृष्ठभागावर गोठलेल्या स्वरूपातील सल्फर डायऑक्साइडचा थर आहे.  Io चा अंतर्भाग हा द्रवरूपातील लोहाने बनलेला आहे.  त्यामुळे   Io हा गुरुच्या अतितीव्र चुंबकीय क्षेत्रात एखाद्या जनित्रा (Generator) प्रमाणे काम करतो. स्वत:भोवती अंदाजे, ४ लाख Volt इतका विद्युत दाब निर्माण करण्याची क्षमता असलेल्या Io कडून गुरुच्या दिशेने ३० लाख amperes इतक्या क्षमतेचा विद्युत प्रवाह निरंतर वाहत असतो असे सध्याचे निरीक्षण आहे.  

ज्वालामुखीमधून सतत उत्सर्जित होणार्‍या गंधक व इतर पदार्थांच्या मुळे बनलेल्या एका ढगाने Io वेढलेला आहे.  इतक्या प्रतिकूल वातावरणात तिथे सध्या जीवसृष्टी असण्याची शक्यता वाटत नाही. यदाकदाचित, तिथे कोणत्याही स्वरूपाची जीवसृष्टी निर्माण झाली असेल तर ति Io च्या निर्मितींनंतरच्या सुरुवातीच्या एखाद्या अवस्थेत झाली असावी, जेंव्हा तिथे बहुदा पाण्याचे अस्तित्व होते. कालांतराने या जीवसृष्टीने पर्यावरणातील बदलाशी जुळवून घेत पृष्ठभागाखाली राहणे पसंत केले असेल, तरीही या घडीला तिचे अस्तित्व टिकून राहिले असेल असे वाटत नाही.

आपल्या चंद्रापेक्षा आकाराने थोडा छोटा असलेल्या, Europa या गुरुच्या उपग्रहावर जीवसुष्टी असू शकेल, याबाबत वैज्ञानिक बरेच आशावादी आहेत. सध्या उपलब्ध माहितीनुसार लोह व निकेल यांनी बनलेला Europa चा अंतर्भाग,  मुख्यत्वेकरून 'silicates' (वाळू, सीमेंट इत्यादी)  च्या दगडांनी लपेटला गेला आहे, आणि त्याच्या पृष्ठभाग हा पाण्याच्या बर्फाने आच्छादित आहे. विवरे विशेष नाहीत, किंवा असलीच तर ती बर्फाच्या थराने झाकली गेली आहेत.  गुरुच्या तीव्र गुरुत्वाकर्षणाचे व इतर मोठ्या उपग्रहांचे परस्परविरोधी  आकुंचन, प्रसरणाचे परिणाम,  Io च्या तुलनेत खूप कमी प्रमाणात,  Europa वर पण होतात.  यामुळे जे उष्णता निर्माण होते तिच्यामुळे, Europa पृष्ठभागाखाली साधारण १०० किमी खोलवर मोठे जलाशय असू शकतात याबद्दल वैज्ञानिकांमध्ये बर्‍यापैकी मतैक्य आहे. या जलाशयांमध्ये जीवसृष्टीला पोषक वातावरण असेल ही शक्यता बरीच मोठीआहे. शिवाय Europa च्या विरळ वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाणही लक्षणीय आहे. अर्थात खूप खोलवर असलेल्या संभाव्य जलाशयातील, जीवसृष्टीला वातावरणातील ऑक्सिजनचा कितपत उपयोग होऊ शकेल याबद्दल साशंकता आहे. NASA आणि ESA यांचा संयुक्त सहभाग असलेला Europa Clipper हा  प्रकल्प पूर्णत्वास गेला, तर Europa वरच्या जीवसृष्टीबाबत काही ठोस माहिती आपल्या हातात येईल.

Ganymede हा सूर्यकुलातील सर्वात मोठा उपग्रह. उपग्रह असूनही बुधापेक्षाही मोठा.   इथेही  Silicates व  पाण्याचा बर्फ या जीवसृष्टीच्या दृष्टीने उपयुक्त असलेल्या गोष्टी.  द्रवरूपातील लोहाचा अंतर्भागामुळे, Ganymede ला स्वत:चे चुंबकीय क्षेत्र आहे जे गुरुपासून होणार्‍या किरणोत्सर्गापासून त्याचे संरक्षण करते. अत्यंत विरळ वातावरणाचा, प्रमुख घटक ऑक्सिजन आहे ही आणखी एक जमेची बाजू. इथेही पृष्ठभागाखाली जलाशय असावेत ही गोष्ट जवळजवळ नक्की आहे.  गुरुशी  tidally locked असल्याने गुरुला Ganymede ची सतत एकच बाजू दिसते आणि पृष्ठभागावर बर्फासोबत कार्बन डायऑक्साइड आणि गंधकाच्या काही संयुगांचेही अस्तित्व जाणवले आहे,  ही आपल्याला परिचित जीवसृष्टीच्या अस्तित्वाच्या दृष्टीकोनातून डावी बाजू.   ESA चे JUICE हे अंतराळयान २०२२ मध्ये, गुरुच्या तीन प्रमुख उपग्रहांना भेट देऊन शेवटी २०३२ मध्ये Ganymede भोवती घिरट्या घालेल, तेंव्हा जीवसृष्टीच्या संदर्भात अधिक ठोस आणि निर्णायक माहिती कळू शकेल.

Callisto हा गुरुच्या मुख्य चार उपग्रहांपैकी सर्वात दूर असलेला आणि गुरुच्या किरणोत्सर्गाची सर्वात कमी मात्रा झेलणारा उपग्रह. हा देखील गुरुशी  tidally locked आहे. विरळ असलेल्या वातावरणातील प्रमुख घटक कार्बन डायऑक्साइड असून काही प्रमाणात ऑक्सिजनही उपलब्ध आहे. इथेही पाण्याचा बर्फ आणि त्या पृष्ठभागाखाली जलाशय असण्याची शक्यता नाकारता येत नाही. Callisto वर कोणतीही भूस्तरीय सक्रियता आढळलेली नाही. मात्र पृष्ठभागावर अमोनियाचे आढळलेले अस्तित्व , इथे काहीशी वेगळ्या स्वरूपाची जीवसृष्टी असू शकेल अशी शक्यता सांगते. इथे जीवसृष्टी असो वा नसो, पण किरणोत्सर्गाचे कमी असलेला प्रमाण, गुरुपासूनचे त्याचे अंतर आणि पाण्याचे संभाव्य अस्तित्व या गोष्टी लक्षात घेऊन काही वैज्ञानिकांच्या मते Callisto  भविष्यातील अंतराळतळ करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे.

गुरुपासून नेपच्यून पर्यंत चारही ग्रह, 'वायूरूपी महाकाय' या गटात मोडणारे ग्रह आहेत. चौघांच्याही भोवती कडी आहेत. तरीही शनीमहाराजांचे प्रकरण इतरांपेक्षा वेगळे आहे. त्यांची बरीचशी कडी अधिक दृश्य स्वरूपाची तर आहेतच, पण ती ज्या कणांपासून बनलेली आहेत त्यात पाण्याच्या बर्फाचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही कडी इतकी विशाल आहेत की त्यांना स्वत:चे अत्यंत विरळ असे वातावरण आहे आणि त्या वातावरणात अतिनील (Ultraviolet) किरणांमुळे मुक्त झालेल्या ऑक्सिजनचे प्रमाण खूप अधिक आहे.  या कड्यांमध्ये अक्षरश: शेकड्यांनी अत्यंत छोट्या आकाराचे उपग्रह, ज्यांना उपग्रह न मानता 'moonlets' असे संबोधले जाते, ते ही शनीभोवती घिरट्या घालत असतात. moonlets व्यतिरिक्त,  सध्याच्या माहितीनुसार शनीला ६२ उपग्रह आहेत. 

या उपग्रहांपैकी सर्वात प्रसिद्ध आहे  Titan. शनीभोवती फिरणार्‍या सर्व गोष्टींचे एकत्रित वस्तुमान लक्षात घेतले तर साधारण ९०% वस्तुमान एकट्या Titan चे आहे.  हा उपग्रहही बुधापेक्षा मोठा आहे. त्याच्या संरचनेत पाण्याचा बर्फ आणि दगड यांचे आधिक्य
आहे. पण त्यापलीकडे मानवी जीवनास अनुकूल असे तिथे काहीही नाही. त्याच्या वातावरणात जवळजवळ ९८% नायट्रोजन आहे. आणि साधारण दीड टक्का मिथेन. पण विशेष गोष्ट ही आहे की पृथ्वीवर जसे जलचक्र आहे, तसे Titan वर मिथेनचक्र आहे, मिथेनचे (आणि इथेन व इतर हायड्रोकार्बनचे) समुद्र,नद्या, तळी आहेत, मिथेनपासून बनलेले ढग, मिथेनचा पाऊस आहे.  Titan सदैव नारिंगी रंगाच्या धुक्याने वेढलेला असतो. त्याच्या कक्षेचा बराचसा भाग हा शनीमहाराजांच्या, चुंबकीय क्षेत्राच्या छत्रछायेत येतो. त्यामुळे सौरवार्‍यांमुळे (Solar Wind) बसणार्‍या सूर्याच्या फटकार्‍यांपासून त्याचे संरक्षण होते.  Huygens probe जेंव्हा Titan वर उतरला होता, तेंव्हा पर्वत, टेकड्या, दगडगोटयांनी भरलेला पृष्ठभाग याची अनेक छायाचित्रे मिळाली, जी पृथ्वीवरच्या तशाच भूभागांची आठवण करून देतात. इथे जीवसृष्टी सापडण्याची आणि  ती मिथेनचक्रावर आधारित असण्याची खूप शक्यता आहे. Huygens probe मध्ये अशा प्रकारची जीवसृष्टी शोधणारी पुरेशी उपकरणे नव्हती असे सांगितले जाते.  पण दूरस्थ निरीक्षणातून तिथे  amino acids चे अस्तित्व तिथे जाणवलेले आहे.  Titan च्या पृष्ठभागाखाली खूप खोलवर द्रवस्वरूपात अमोनियामिश्रित पाणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जलाशयांमध्ये सुद्धा जीवसृष्टी असण्याची शक्यता वर्तविण्यात येते. Titan मध्ये स्वारस्य असण्याचे दूरच्या भविष्यातील आणखी एक कारण आहे.  सध्याच्या अंदाजानुसार, पृथ्वीवर असणार्‍या ज्ञात खनिज तेलाच्या एकूण साठ्याच्या जवळजवळ ३०० पट इतके साठे, Titan वरच्या सध्या माहीत असलेल्या, हायड्रोकार्बनच्या समुद्र,नद्या आणि तळ्यांमध्ये आहेत !

Enceladus हा शुद्ध बर्फाने आच्छादलेला उपग्रह वैज्ञानिकांसाठी आकर्षण ठरला नसता तरच नवल. Enceladus च्या वातावरणात  Cassini ने ज्या अनेक 'डुबक्या' मारल्या त्यातील एक 'डुबकी' दक्षिण ध्रुवाच्या पृष्ठभागापासून केवळ ५० किमी इतक्या अंतरावर होती.  त्याच्या दक्षिण ध्रुवावर  असलेल्या विवरांमधून वाफेचे फवारे अत्यंत वेगाने तिथल्या आकाशात फेकले जातात. या फवार्‍यांपैकी काही फवार्‍यांमध्ये (पृथ्वीवरील समुद्राप्रमाणेच) सोडीयम, पोटॅशियम, हायड्रोजन आणि सिलिकेट्स स्फटीकांचे अस्तित्व आढळले आहे.  सर्वसाधारणत: सिलिकेट्सचे स्फटिक उकळत्या पाण्यात तयार होतात.   फवार्‍यांममधली  वाफ बाहेर पडल्यावर बर्फात रूपांतरित होऊन खाली पडते किंवा अवकाशात निसटून जाते. याच दक्षिण ध्रुवाजवळ बर्फाच्या जाड थराखाली साधारण १० किमी खोलीचा समुद्र असल्याचे निरीक्षण Cassini यानाने नोंदविले आणि या उपग्रहावर जीवसृष्टी असण्याच्या वैज्ञानिकांच्या आशा प्रचंड पल्लवित झाल्या.  त्यातूनही समजा तिथे जीवसृष्टीचे अस्तित्व नसलेच तर,  दूरच्या भविष्यात, सूर्यमालेतील, सूर्यमालेबाहेरील प्रवास जेंव्हा एक नियमित आणि स्वाभाविक गोष्ट होईल तेंव्हा पाण्याचे हे मोठे साठे जर टिकून राहिले असले तर, पाणपोई सारखे उपयोगात येतील का ? 


Rhea या शनीच्या उपग्रहाबाबत विशेष गोष्ट ही की त्याच्या वातावरणात अत्यंत विरळ वातावरणात ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड ५:२ या प्रमाणात आहेत. यातील ऑक्सिजनचा उगम त्याच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या बर्फातून होते आहे असे लक्षात आले आहे, पण कार्बन डायऑक्साइडचा स्त्रोत काय आहे हे समजलेले नाही. कार्बन डायऑक्साइडच्या उगमामागे जर कोणतेही सेंद्रिय पदार्थ असतील तर  Rhea देखील जीवसृष्टीसाठी एक संभाव्य स्थान ठरते.

Tethys, Dione, Mimas आणि Iapetus या शनीच्या उपग्रहांवरही पाण्याच्या बर्फाचे मुबलक साठे आणि विरळ वातावरणात असलेले ऑक्सिजनचे लक्षणीय प्रमाण हे समान सूत्र आहे.

थोडक्यात शनिमहाराजांची लेकरे मानवासाठी, जीवसृष्टीसाठी उपयुक्त आहेत. पण प्रत्यक्ष शनीवरची स्थिती मात्र खूप वेगळी आहे. ९६% हायड्रोजन आणि ३% हेलियम असलेले वातावरण, वायुरूपी असल्याने पृष्ठभाग नाही, गुरुप्रमाणेच मोठी वादळे असलेल्या या ग्रहांवर वरपासून खालपर्यंत 'ढगांचे' चार थर आहेत. सगळ्यात वरती अमोनियाचा बर्फ, नंतर खालच्या थरात पाण्याचा बर्फ, त्यानंतरच्या खालच्या थरात अमोनियम हायड्रोसल्फाईड या आपल्यासाठी विषारी असणार्‍या संयुगाचे ढग आणि त्याच्या खालच्या थरात अमोनियामिश्रित पाण्याचे ढग. अशा परस्पराविरोधी असणार्‍या वातावरणात कुठलीही जीवसृष्टी जगू शकत असेल, वाढू शकत असेल तर तो एक चमत्कारच ठरेल.

शनीच्या कड्यांइतकीच एक चमत्कृतीपूर्ण गोष्ट आहे तो त्याच्या उत्तर ध्रुवावर कायमस्वरूपी असलेला षट्कोनी आकाराचा ढगांचा समुदाय. १३,८०० किमी इतकी भुजा असलेला हा षट्कोन स्वत:भोवती साधारण साडेदहा तासात एक गिरकी पूर्ण करतो. निसर्गातील वर्तुळाकार, लंबवर्तुळाकार अशा परिचित आकारांशी फटकून असलेल्या या षटकोनी वादळामागे कोणतेही गूढ नाही असे काही वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यांनी त्यांनी या संदर्भात केलेल्या प्रयोगानुसार, एका वेगाने फिरणार्‍या नळकांड्याच्या मध्यातून, जर वेगवान द्रवाचा फवारा उडवला तर त्याच्या वेगानुसार विविध आकाराचे बहुभुजाकृती तयार होतात. वेग जास्त असेल तरी कमी भुजा, कमी असेल तर जास्त भुजा.  हे जरी खरे मानले तरी शनीच्या उत्तरध्रुवावरच असा कोणता वेगवान प्रवाह खालून वर येत आहे, जो सातत्याने हा आकार टिकवून आहे, हा प्रश्न उरतोच.


Titan Saturn System Mission (TSSM) या नावाने NASA आणि ESA यांची संयुक्त मोहीम २०२० किंवा त्याच्या नंतरच्या एक दोन वर्षांमध्ये प्रस्तावित आहे. या मोहिमेत शनिकुलातील जीवसृष्टीबाबत काही ठोस सापडेल अशी आशा आहे.

सूर्याभोवती लोळत प्रदक्षिणा घालणारा यूरेनस आणि आणि सूर्यमालेतील शेवटचा ग्रह ठरलेला नेपच्यून यांच्या अभ्यासाभोवती केंद्रीत असलेली अवकाशयाने अजूनपर्यंत मानवाने धाडलेली नाहीत. काही FlyBy आणि दूरस्थ निरीक्षणे यातून  या दोन ग्रहांवरील जीवसृष्टीबाबत पुरेसे आश्वासक असे अजूनपर्यंत काही आढळून आलेले नाही.  पण तरीही नेपच्यूनचा उपग्रह असलेल्या, भूस्तरीयदृष्ट्या सक्रिय असणार्‍या Triton च्या बाबतीत, काही वैज्ञानिकांनी जीवसृष्टीची संभाव्यता वर्तवली आहे. गोठलेल्या नायट्रोजन बर्फाचा पृष्ठभाग असलेल्या Triton वर नायट्रोजन वायूचे फवारे उडताना आढळले आहेत. त्याच्या पृष्ठभागाखाली पाण्याच्या बर्फाचा जाड थर आहे. त्याच्या अत्यंत विरळ वातावरणात प्रामुख्याने नायट्रोजन असला तरी पृष्ठभागाजवळ काही प्रमाणात मिथेन आढळतो. हा मिथेन जीवसृष्टीचा निदर्शक असू शकतो.

एकेकाळी ग्रहमंडलात सामील असलेला प्लूटो,  आता बटुग्रह मानला जातो. एकेकाळी अतिशय कमी माहिती असलेल्या प्लुटोबद्दल,   New Horizons या अंतराळयानाने केलेल्या निरीक्षणातून, अभ्यासातून आता खूप माहिती मिळाली आहे.  इतक्या दूरवरून डेटा येत असल्याने, माहितीच्या प्रक्षेपणाचा वेग हा 1 ते 2 kb/s इतका अल्प आहे.  New Horizons चे पुढचे लक्ष्य हे  2014 MU69 चा flyby हे आहे जे १ जानेवारी २०१९ रोजी  गाठले जाईल. तोपर्यंत प्लूटोची आणखी बरीच माहिती कळेल व तिथल्या जीवसृष्टीबाबत काही तर्क करणे संभव होईल.  पण सध्याच्या माहितीनुसार, प्लुटो आणि  Triton  मध्ये काही प्रमाणात साम्य आहे. त्याचा पृष्ठभाग हा मुख्यत्वेकरून नायट्रोजनच्या बर्फामुळे बनला आहे. अत्यंत विरळ अशा त्याच्या वातावरणातही मुख्यत्वे नायट्रोजन व अल्प प्रमाणात मिथेन आणि कार्बन मोनॉक्साइड आहे. पृष्ठभागावरचे तापमान -२२९° सेल्सियस इतके आहे. पण प्लुटोची कक्षा ही अत्यंत लंबवर्तुळाकार असल्याने,  तो सूर्याला जेंव्हा जवळ असतो तेंव्हा २९.६६ AU इतक्या अंतरावर नेपच्युनच्या कक्षेच्याही आत असतो (सप्टेंबर १९८९) आणि तो जेंव्हा सूर्यापासून सर्वात दूर असतो तेंव्हा ४९.३२ AU (फेब्रुवारी २११४) इतका दूर (नेपच्युनच्या कक्षेच्या कितीतरी बाहेर) असतो.  अशा प्रकारच्या कक्षेमुळे आज घेतलेली निरीक्षणे आणि मोजलेले घटक सूर्यापासून खूप दूर गेल्यावर तसेच राहतीलच असे नाही.  त्यामुळे तिथल्या जीवसृष्टीबाबत वैज्ञानिक सध्यातरी, कोणतीही गोष्ट ठामपणे  सांगत नाहीत.

प्लूटोपलीकडील इतर बटुग्रह (Dwarf Planets) किंवा इतर  Minor Planets, Kuiper belt objects किंवा तत्सम अतिदूर objects बाबत,   वा  धूमकेतू, आकाशगंगेत सापडलेल्या दुसर्‍या ग्रहमालेतील ग्रह, यांचे दूरस्थ निरीक्षणावरून केलेले तर्क हे जीवसृष्टीचा कुठलाही ठोस पुरावा म्हणून पुरेसे सक्षम नाहीत.  

उदाहरणार्थ  Kepler अंतराळस्थ दूरदर्शकाने  शोधलेला,  Kepler-186f हा पृथ्वीसदृश, पृथ्वीपेक्षा साधारण १०% मोठा असलेला, खडकाळ पृष्ठभाग असलेला ग्रह आहे असा सध्याचा अंदाज आहे. तो त्याच्या Kepler-186 या तार्‍याभोवती पृथ्वीसारख्याच सुरक्षित कक्षेतून (त्याच्या तार्‍याच्या तुलनेत) फिरतो. पण हा तारा पृथ्वीपासून ५६० प्रकाशवर्षे अंतरावर आहे.  थोडक्यात आपल्याकडे प्रकाशवेगाने जाणारे अंतराळयान असेल तरी तिथे पोहोचेपर्यंत ५६० वर्षे लागतील. New Horizons या प्लुटोला भेट देणार्‍या अंतराळयानाला प्लुटोपर्यंतचे, साधारण ४.८२ अब्ज किमी (अर्थात 0.000509474 प्रकाशवर्षे)  इतके अंतर कापायला साधारण साडेनऊ वर्षे  लागली. त्यामुळे आपल्या सध्याच्या क्षमतेनुसार, Kepler-186f पर्यंत पोहोचायला, आपल्याला अंदाजे  १ कोटी वर्षापेक्षाही अधिक काळ लागेल.  इतकेच कशाला आपल्याला सर्वात जवळ असणार्‍या Alpha Centauri च्या ग्रहमालेत, पृथ्वीसदृश, आपल्याला राहण्यासाठी योग्य असा एखादा ग्रह जरी सापडला, तरी तिथे पोहोचायला आजच्या क्षमतेनुसार, आपल्याला साधारण १ लाख वर्षे लागतील.   अशा स्थितीत आज घेतलेली निरीक्षणे आणि केलेले तर्क हे सर्वस्वी निरुपयोगी ठरू शकतात.

त्यामुळे जोपर्यंत आपण दूरस्थ तार्‍यांपर्यंत जाण्यासाठी, अतिवेगवान अंतराळयाने निर्माण करू शकत नाही किंवा तिथे जाण्यासाठी काही विलक्षण तंत्र शोधू शकत नाही, तोपर्यंत तिथे प्रत्यक्ष जाऊन जीवसृष्टीचा वेध घेणे वा या वेध घेण्यामागचा अंतिम मुख्य उद्देश (परस्परसंबंध, सहकार्य किंवा वसाहतीकरण, पृथ्वीला पर्याय इत्यादी) साध्य करणे हे प्रायत: अशक्य आहे.  

सूर्यमालेबाहेर दुसर्‍या ग्रहमालेत 'पोहोचणे' हे आपल्या अंतराळयानांसाठी सध्यातरी, जवळजवळ अप्राप्य असताना, आपल्याला जी जीवसृष्टी सापडेल त्यांचा आपल्याशी  संवाद होऊ शकेल की नाही, ते आपल्याशी कसे वागतील याचा सुतराम अंदाज नसताना,  इतक्या मोठ्यामोठ्या प्रकल्पातून, प्रचंड गुंतवणूक करून आपल्या व दुसर्‍या ग्रहमालांचा व तेथील  परकीय जीवसृष्टीचा शोध का सुरू आहे असा प्रश्न ज्यांना साहजिकपणे पडतो त्यांनी पुढील मुद्दे विचारात घ्यावेत.

१) 'तहान लागली की विहीर खणणे हे अयोग्य आहे' हे वाक्य निदान इथे तरी शंभर टक्के सत्य आहे. पृथ्वी सोडावी लागणे ही मानवासाठी दूरच्या भविष्यातील अटळ घटना असणार आहे. त्यामुळे आपल्या प्रजातीच्या अतिदीर्घकालीन अस्तित्वासाठी सर्व पर्यांयांचा शोध आणि त्यासंबंधीची सर्वतोपरी सिद्धता या दृष्टीने कार्यरत राहणे अत्यंत आवश्यक आहे.
२) कुठल्याही अंतराळमोहिमा, त्यासंबधीचे इतर प्रकल्प यातून प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे, मानवाला इथे पृथ्वीवर उपयुक्त ठरेल, अशा स्वरूपाचे तंत्रज्ञान विकसित झाल्याची, नवीन शोध लागल्याची उदाहरणे विपुल आहेत. तेंव्हा अंतराळमोहिमांचा अगदी सामान्य माणसालाही उपयोग होतो असे मानायला हरकत नसावी.    

https://www.nasa.gov/sites/default/files/files/Benefits-Stemming-from-Space-Exploration-2013-TAGGED.pdf

http://www.nasa.gov/50th/50th_magazine/benefits.html

३) आपल्यापेक्षाही प्रगत जीवसृष्टी ही आपल्या आकाशगंगेत असू शकते हे मान्य केल्यावर, आपण परकीय जीवसृष्टीचा शोध थांबवला म्हणून तो इतर प्रगत जीवसृष्टी थांबवतील असे नाही. याचाच दुसरा अर्थ आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो नाही, तरी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात, आणि त्यांचे इरादे कसे असतील याविषयी काहीही सांगता येत नाही.  अशा वेळेस आपण वैज्ञानिकदृष्ट्या, तांत्रिकदृष्ट्या, माहितीच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी, सर्व प्रकारच्या परिस्थितींना तोंड देण्यासाठी  'तयार' असणे आवश्यक आहे.
४) आज आपल्याकडे एखादे तंत्रज्ञान नाही, याचा अर्थ ते शक्य नाही, असाध्य आहे असे नव्हे. आजवर झालेली आपली वैज्ञानिक प्रगती हेच सांगते की बुद्धिमत्तेला दिलेली सातत्यपूर्ण प्रयोगांची , निरंतर सायासाची जोड हेच यशाचे सूत्र राहिले आहे.

थोडेसे अवांतर  : 
2014 MU69 याचा अर्थ ही 'object' २०१४ मध्ये शोधली गेली. 
M याचा अर्थ ही जूनच्या दुसर्‍या पंधरवड्यात शोधली गेली.  इथे  गणित असे आहे  =>  A,B जानेवारी,  C,D फेब्रुवारी  ....  L,M जून    [I वगळायचा] ) .
आणि जूनच्या दुसर्‍या पंधरवड्यात शोधलेली ती  1745 वी 'object' आहे.    
(25 x 69) + U => 1725 + 20  (A पासून U पर्यंत   I वगळून आकडे मोजणे)  => 1745