शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०२५

युद्धार्थं : भाग ९





=====================

युद्धार्थं : भाग ९  

=====================

नव्या उत्क्रांतीला सामोरे गेलेल्या निवातकवचांच्या इतिहासात एक विशेष महत्वाची घटना आता घडणार होती. 

आजवर त्यांनी कधीही तीव्र अंतर्गत संघर्ष अनुभवला नव्हता. युद्धानंतरच्या पाच सहस्रकात, कुठल्याच गोष्टींवर मतभेद होत नव्हते, असे नव्हे; पण युद्धानंतर ठरविलेल्या मूळ उद्दिष्टांपासून ढळण्याचे प्रसंग कधीच आले नव्हते. आणि त्यांच्या परंपरागत धारणांना आव्हान देण्याचे धैर्यही कुणी दाखविले नव्हते.  

पण ह्या वेळेस परिस्थिती वेगळी होती. त्याला कारणीभूत ठरला होते, समुद्रतळावर शेती करणार्‍या विद्रोही गटातील काही तरुणांनी पुढे टाकलेले एक पाऊल. निव्वळ कुतुहलापोटी समुद्रात विविध ठिकाणी भ्रमण करून आलेल्या त्या गटाकडे सांगण्यासारखे बरेच काही होते. त्यांच्यातील काहींनी टेलीपथीद्वारे (दूरमनोसंप्रेषणाद्वारे) ह्या गोष्टी शक्य तितक्या प्रजेपर्यंत पोहोचवल्या. त्याचे परिणाम प्रपाती झाले; परिणामांची जणू एक साखळी असावी तसे ते परिणाम पसरत गेले. कळलेल्या गोष्टी तपासून बघण्यासाठी, निवातकवचांच्या अनेक समूहांनी तेच धाडस केले. 

कालांतराने, ह्याचे पर्यवसान नेतृत्वमंडळाच्या विरोधातील क्षोभात होणार, ह्याची कुणकुण लागल्यामुळे नेतृत्वमंडळाला निरुपायाने हस्तक्षेप करणे भाग पडले. उत्तेजित झालेल्या अनेक विद्रोही आणि इतर निवातकवचांच्या समूहांना त्यांनी प्रत्यक्ष भेटण्यास प्राधान्य दिले. त्यांची मते जाणून घेण्यास आरंभ केला.  बहुतेक समूहांचे आक्षेप पृथग्वासाविषयी (self-isolation) होते. 

नेतृत्वमंडळाला ज्या विविध प्रतिक्रियांना वा कमीअधिक ताठर असणार्‍या ज्या भूमिकांना सामोरे जावे लागले; त्याचा सारांश साधारण असा होता : 

'आपण आता स्वयंपूर्ण झालो आहोत. समुद्रतळावर झालेल्या भूकंपापासूनही, आपण आपल्याला सुरक्षित ठेवू शकलो आहोत. आवश्यकता भासली तेव्हां, विशालकाय आणि घातक जलचरांचा विनाश सुद्धा आपण केल्याची उदाहरणे आहेत. आता आपली संख्यासुद्धा अनेक पटींनी वाढली आहे. मणिमतीच्या वेळी आपले तंत्रज्ञान आत्तापेक्षा अधिक प्रगत होते हे खरे. पण आताही आपण मनापासून ठरविले, योग्य नियोजन केले तर मणिमती-काळापेक्षाही अधिक प्रगत आपण होऊ शकतो आणि ते ही अवघ्या काही दशकांमध्ये. पण आपण स्वत:ला जखडून घेतले आहे. त्यामुळे त्या युद्धानंतर, आपण जी बंधने स्वत:वर लादून घेतली आहेत, ती आता हळूहळू दूर सारायला हवी'

जो समूह प्रत्यक्ष भ्रमण करून आला होता, त्यांचा अनुभव अधिक बोलका होता. प्रत्येकाने काय काय बघितले आणि त्याला काय उमगले, ह्याची वर्णने जरी वेगळी असली; तरीही त्यातून निर्माण होणारे चित्र पुरेसे स्पष्ट होते. 

समुद्रतळावर दृष्टीस पडलेल्या काही मोठ्या नौका, क्वचित कुठे आढळलेले विघटित झालेल्या शवांचे वेगाने विघटित होत चाललेले अवशेष, अनेक विचित्र आणि अनोळखी वस्तू, धातू, शस्त्रे आणि इतरही अनेक गोष्टींचा उल्लेख काही जणांनी केला. त्यांना दिसलेल्या नौका प्राचीन होत्या की अर्वाचीन, हे ठरवणे त्यांना कठीण जात होते. काहीं नौकांवर शैवाल व प्रवाळांचे थर होते, तर काहींवर धातूची चमक अजूनही टिकून होती.  (१४)

विघटित होत आलेली हाडे आणि इतर अवशेष सर्वत्र पसरलेले होते, पण एका ठिकाणी अंशत: जतन झालेला एक सांगाडा त्यांना दिसला. त्या सांगाड्यावरून त्यांनी अनुमान बांधले की हा निवातकवचांच्यापेक्षा बर्‍यापैकी मोठा असलेल्या एखाद्या प्राण्याचा असावा. तो त्यांच्या इतिहासात नोंदलेल्या मानवाचा असावा, असे त्यांच्यातील एकाच्या मनात आले आणि तिथे असलेल्या सर्वांना प्रथमच भीती जाणवली. त्या सांगाड्याच्या सभोवती, त्यांना काही पदार्थाचे तुकडे आढळले होते.  ते कसले आहेत ते त्यांना समजले नाही. हातात घेतल्यावर त्या पदार्थाचे आपोआप आणखी तुकडे होत होते.  (१५)

त्यांनी तिथल्या अनेक वस्तू उचलून त्यांच्या नगरीत आणल्या आणि अनेकांना दाखविल्या.  

त्या विद्रोही वृत्तीच्या समूहातील एक उपसमूह, त्यांच्यातील संशोधकांचा होता. नेतृत्व मंडळातील काही निवातकवचांकडून, त्या समूहाला नवीन संशोधनासाठी सदैव प्रोत्साहन आणि सहाय्य मिळत असे. भविष्यात निर्वाणीचा क्षण आला तर आपल्याकडे नवीन नगरीपासून वेगाने दूर जाण्याची व्यवस्था असावी, हा त्यांचा आग्रह होता; ज्याच्याशी नेतृत्व मंडळातील संशोधक वृत्तीचे काही सदस्य सहमत होते. त्याचा लाभ उठवत, त्यांनी एका नवीन विवरात एक विशेष वाहन गुप्तपणे विकसित केले होते. 

ते वाहन त्यांनी एका मिश्रधातूपासून (१६) निर्माण केले होते. बाहेरचा जलावरणाचा भार कितीही असला तरीही वाहनाच्या आत निवातकवच सहन करू शकतील; असाच भार राहील अशी त्याची रचना होती. बाहेरचा प्रकाश कितीही अंधूक झाला किंवा एखाद्या जैवदीप्ती असलेल्या जलचराने तीव्र प्रकाशझोत जरी सोडला तरीही, आत सदैव ठराविक तीव्रतेचाच प्रकाश राहील, ह्यासाठी त्यांनी आवश्यक ती योजना केली होती. त्यासाठी त्यांनी त्या वाहनात जैवतंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केला होता. वाहनाच्या आतल्या भिंतीवर त्यांनी भुयारात वापरलेले तंत्रज्ञान अधिक सुधारित स्वरुपात वापरले होते. तिथे जैवदीप्ती असणार्‍या सूक्ष्म जलचरांचे एक आवरण होते.  त्या वाहनाच्या आतमध्ये बारा निवातकवच सहज बसू शकतील, इतके ते मोठे होते. वाहनाच्या अंतर्भागात, वाहनाच्या नियंत्रणासाठी आणि सुरक्षेसाठी विविध यंत्रणा होत्या. 

तसेच वाहनाच्या बाह्यभागावर वाहनाच्या सुरक्षेसाठी विशेष सुविधा योजल्या होत्या. वाहनाच्या बाहेर असणारे छोटे अडथळे दूर करण्यासाठी, वाहनाचा तळ वगळता,  उर्वरित नऊ दिशांना नऊ लांबलचक यांत्रिक हात बसविले होते. एखाद्या जलचराचा आभास निर्माण व्हावा यास्तव त्या यांत्रिक हातांना शुंडांचा आकार देण्यात आला होता. अर्थातच ते हातही वाहनाच्या आतून नियंत्रित करता येत असत.  शिवाय वाहनाच्या बाह्यभागात, आणि वाहनाच्या शुंडांवर, बाहेर असणारा भार, प्रकाश, कंपने आदिंचे मापन करण्यासाठीची वेगवेगळी यंत्रे होती. ती यंत्रे अंतर्भागातील यंत्रणांशी जोडलेली होती. त्यामुळे बाहेरच्या परिस्थितीविषयी, वाहनाच्या आत पूर्ण माहिती उपलब्ध होत होती.  

वाहनाला प्रवास व इतर सर्व गोष्टींसाठी आवश्यक ती ऊर्जा पुरविण्यासाठी, त्यांनी त्यांच्या भुयारांतील ऊर्जागोलकांच्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक क्षमता असलेल्या आणि दीर्घकाळ ऊर्जा पुरवू शकेल, अशा ऊर्जागोलकांचे दोन समुच्चय वाहनाच्या तळात बसविले होते. त्यातील एक समुच्चय काही कारणाने काम करेनासा झाला, तर दुसरा समुच्चय आपोआप ऊर्जा पुरवू लागेल अशी व्यवस्था केली होती. ऊर्जा पुरविणार्‍या त्या यंत्रणेवर अत्यंत कठीण धातूचे आवरण होते, जेणेकरून त्याची कुठल्याही जलचराकडून काहीही क्षती होऊ नये.  

समुद्रातील कोणत्याही जलचरास, एक विशाल जलचर वाटावा; असेच त्या वाहनाचे स्वरुप होते. त्याच सोबत त्या वाहनात कुठल्याही मोठ्या जलचरांना घाबरविण्यासाठी, दूर ठेवण्यासाठी विशिष्ट ध्वनीलहरी सोडण्याची व्यवस्था केली होती.  त्यामुळे त्यांच्या मते ते वाहन कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी योग्य होते आणि अत्यंत सुरक्षित होते. 

त्यांच्या नगरीत आणल्या गेलेल्या त्या चित्रविचित्र वस्तु पाहून त्यांना राहवेना. त्या वाहनाचा उपयोग करून ते पूर्वीही दोनदा समुद्रतळापासून बरेच वरपर्यंत जाऊन आले होते. पण तो अनुभव मर्यादित काळासाठी होता. पण तरीही त्या अनुभवांचा उपयोग, त्यांना त्यांच्या वाहनात अधिक सुधारणा करण्यासाठी झाला होता. आता त्यांना दीर्घ काळासाठी ते वाहन वापरावयाचे होते; जेणेकरून ते त्या समुद्रात अधिक उंचीवर जाऊन येऊ शकतील. 

नेतृत्वमंडळातील त्यांच्या पाठिराख्यांशी बोलून ते पुन्हा एकदा त्या वाहनातून प्रवासासाठी निघाले. ह्या वेळेचा प्रवास दीर्घ कालावधीसाठी असणार होता आणि त्यांना समुद्रात जितके उंच जाणे शक्य होईल तितके जायचे होते. अत्यंत सावकाश गतीने वर जाणारे ते वाहन समुद्राच्या पृष्ठभागावर जाऊन पोहोचले आणि तिथे तरंगू लागले.  

इतिहासात नोंदविलेल्या, पण त्यांना केवळ अद्‌भूत कथा वाटणार्‍या अनेक गोष्टी त्यांनी प्रथमच पाहिल्या. ह्या पूर्वी त्यांना ज्या गोष्टी केवळ कल्पना वाटत, त्या त्यांना त्यांच्या वाहनातून आता बघता आल्या.  

त्यांना एक अवाढव्य निळसर घुमट दिसला, त्या घुमटाखाली पोहणारे व माशांपेक्षा बरेच वेगळे असणारे काही प्राणी त्यांना दिसले. त्या घुमटावर काही ठिकाणी पांढर्‍या रंगाचे डागही त्यांना दिसले. तो घुमट आणि ते डाग कुठल्याशा प्रकाशाने उजळल्या सारखे दिसत होते. 

समुद्रतळासारखा असमतल वाटणारा, पण पाणी नसलेला एक तळही त्यांना दिसला. त्या तळावर प्रत्यक्ष जाणे शक्य नव्हते, अन्यथा त्यांच्यातील कित्येकांना तिथे जाऊन काय काय आहे ते बघावे असे तीव्रतेने वाटले होते.    पूर्वीच्या प्रवासात त्यांनी समुद्रतळावर काही अवाढव्य आकाराचे उंचवटे बघितले होते. त्यांना पर्वत म्हणतात असे त्यांचा इतिहास सांगत होता. असेच पर्वत त्यांनी त्या पाणी नसलेल्या तळावरही बघितले. तिथेही काही छोट्या आणि मोठ्या जलचरांच्या आकाराचे विचित्र प्राणी होते. त्यांच्या इतिहासात नोंद असलेला मानव मात्र त्यांना त्या तळावर कुठेही दिसला नाही. 

मग त्यांना, प्रखर प्रकाश असलेला एक मोठा ऊर्जागोलक त्यांना दिसला. त्या उर्जागोलकाचा प्रकाश इतका अधिक होता की त्यांच्या वाहनातूनही त्या गोलकाकडे बघणे, त्यांना अशक्य झाले होते. कदाचित त्या प्रखर प्रकाशामुळेच, त्यांच्या वाहनातील यंत्रणेने, वाहनाच्या बाह्य आवरणाचे तापमान वेगाने वाढत असल्याचा आणि त्यामुळे वाहनाची हानी होत असल्याचा संकेत दिला. त्यांना त्यांचा प्रवास तात्काळ आटोपता घ्यावा लागला.  

त्यांच्या ह्या दुसर्‍या प्रवासाचे अनुभव त्यांच्या अपेक्षेपेक्षा फारच वेगळे होते. समुद्र संपून जिथे पाणीच नसते, अशा ठिकाणी असलेल्या जीवनाचा एक दृष्टीपात (Glimpse / झलक), त्यांच्या मनात विचारांचा भूकंप घडवून गेला होता. 

हे सर्व अनुभवल्यानंतर त्यांनी केलेली मागणी अधिक थेट होती. संशोधनाचा वेग वाढविण्यासोबतच, आपण अधिक सक्षम होण्यासाठी काय काय करायला हवे, ह्यासंबंधीची त्यांची मते निर्विवाद विचारात घेण्यासारखी होती. 

----

नेतृत्वमंडळातही ह्यावरून तीन गट पडले.

ज्येष्ठांच्या एका स्थितीप्रिय गटाचे म्हणणे होते की ज्या कारणाने आपण आजच्या स्थितीला आलो, त्यामध्ये पृथग्वासाचा (self-isolation) मोठा सहभाग आहे. मणिमतीच्या स्तरावर आपण प्रत्यक्ष पोहोचत नाही तोवर आपली विचारसरणी आपण बदलू नये आणि इतर प्रजातींची प्रगती जाणून घेण्याचे उद्दिष्ट ठेवून संशोधन करू नये. त्यापेक्षा आपण पुन्हा मणिमतीसारखी एखादी नगरी उभारू शकू का ह्या संदर्भात संशोधन करावे. त्यात शारीरिकदृष्ट्या आता आपण पूर्वीइतके बलवान राहिलेलो नाही. त्यामुळे आपल्या अस्तित्वावर पुन्हा संकट निर्माण होईल, असे काहीही आपण करता कामा नये. त्यांच्यातून दोन-तीन सूर असेही उमटले की पृथग्वासाचा नियम मोडल्यामुळे खरंतर त्या विद्रोहींना शिक्षा व्हायला हवी. त्याकडे इतरांनी दुर्लक्ष केले.

ज्येष्ठांच्या दुसर्‍या एका गटाचे मत थोडे वेगळे होते. ह्या गटात अनेक संशोधक वृत्तीचे निवातकवच होते. ह्या गटाला त्यांची प्रगती मणिमतीच्या स्तरावर पोहोचेपर्यंत थांबण्याचा पर्याय मान्य होता; पण त्यांचा आग्रह होता की संशोधनाचा वेग आत्तापासूनच मोठ्या प्रमाणात वाढवावा आणि मणिमतीसारखी नगरी उभारणे आणि इतर प्रजातींशी संपर्क साधणे ही दोन्ही उद्दिष्टे ठेवून संशोधन करावे. एकदा आपण मणिमतीस्तरावर पोहोचलो की मग मात्र शीघ्रगतीने समुद्राच्या वर असलेल्या जीवनाविषयी अधिक माहिती मिळवण्यास आरंभ करावा. गेल्या पाच सहस्रकात आपण बदललो आहोत; तर तिथेही परिवर्तन झाले असेल. तिथल्या जीवनाविषयी आपल्याला जितकी अधिक माहिती मिळेल, तितकी आपल्या सुरक्षेच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरेल. त्यासाठी आपल्याला अधिक सिद्धता करून निरीक्षण मोहिमा आखाव्यात, पण इतर प्रजातींच्या जीवनात कुठल्याही स्वरुपाचा हस्तक्षेप करू नये. 

नेतृत्वमंडळात एक गट विचारी तरुणांचा होता. त्यांना त्या विद्रोही तरुणांची मानसिकता बहुदा अधिक उमगली होती. मणिमतीच्या स्तरावर येईपर्यंत आपण आणखी थांबायचे ठरविले, तरीही विद्रोहाच्या लाटा उठत राहणारच.  आणि त्यातील एखादा समूहाने,  काहीतरी वेडगळ साहस केले तर अंतिमत: त्याचे बरेवाईट परिणाम आपल्या सर्वांना भोगायला लागतील; असे त्यांना वाटत होते. पृथग्वासामुळे (self-isolation) प्रमाणाबाहेर मोठे झालेले एक न्यून असे होते की देवांच्या, मानवाच्या वा इतर प्रजातींच्या सध्याच्या स्थितीसंदर्भात वा त्यांच्या प्रगती विषयी, आज त्यांच्याकडे कोणतीही माहिती नव्हती. 

त्यांच्या प्राचीन इतिहासात नोंदविल्याप्रमाणे, त्यांचे अस्तित्व उघड झाले, तर येऊ शकणारे संभाव्य संकट त्यांना समजत नव्हते असे नव्हे; पण अशा एखाद्या संभाव्य संकटाविषयी,  आपण काहीही माहिती न मिळविणे सुद्धा तितकेच चुकीचे ठरेल असे त्यांचे मत होते. त्यामुळे अधिक न थांबता, सध्या ज्या काही साधन सुविधा आपल्याकडे आहेत त्या वापराव्यात आणि तात्काळ माहिती प्राप्त करण्यास आरंभ करावा, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावेळी अन्य प्रजातींशी आवर्जून संपर्क साधू नये हे त्यांना मान्य होते, पण माहिती मिळविण्यासाठी त्या प्रजातींशी संपर्क साधणे आवश्यक असेल, तर तो अवश्य साधावा आणि जी जी शक्य आहे ती सर्व माहिती मिळवावी असे त्यांना वाटत होते. 

त्यांच्या मते ह्यामुळे विद्रोही तरुणांच्या समूहाला सुद्धा आटोक्यात ठेवता येईल आणि त्याचवेळी त्यांच्या कुतुहलाला एक वाट करून देता येईल. शिवाय संभाव्य संकटे ओळखू शकलो तर आपण कोणती सिद्धता ठेवायला हवी किंवा कुठल्या प्रकारचे संशोधन आपण केले पाहिजे; ह्याचे नियोजन आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे करता येईल अशी त्यांची धारणा होती. 

बराच ऊहापोह झाल्यावर, गेल्या पाच सहस्रकात ज्यावर कधीही विचारही झाला नव्हता, असा एक विलक्षण निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. .... 

--------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(१४) समुद्रात बुडालेल्या आणि समुद्रतळापर्यंत पोहोचलेल्या नौकाचे अवशेष तुलनेने दीर्घकाळ टिकतात; कारण प्राणवायूच्या अत्यल्प प्रमाणामुळे त्यांच्यावर गंज चढणे वा त्यांचे विघटन होणे, ऑक्सिकरण (Oxidation / रसभस्मीकरण) होणे मंदावते. तसेच जिथे तापमान अत्यंत कमी असेल तिथे सूक्ष्मजीवांची क्रियाशीलता कमी होते, त्यामुळे लाकूड/धातूचे अवशेष तुलनेने जास्त काळ टिकतात. टायटॅनिकचे अवशेष साधारण ३८०० मीटर खोलवर १०० वर्षांहून अधिक काळ टिकले आहेत. 

(१५) सर्वसाधारणत: समुद्रतळाशी पोहोचलेले कोणतेही मानवी शरीर, शरीरांतर्गत असलेल्या काही जीवाणूंच्या प्रक्रियांमुळे, तिथल्या जलचरांकडून होणार्‍या आक्रमणांमुळे, सागरतळावरील प्रवाहांमुळे, तिथे होत असलेल्या अनेक रासायनिक प्रक्रियांमुळे वेगाने (काही दिवस ते काही आठवडे) विघटित होते. कुठल्याही प्राण्याचे सांगाडेसुद्धा काही महिन्यात विस्कळीत होतात. त्या मानाने वेगळी झालेली हाडे, त्यातील कॅल्शियम फॉस्फेटमुळे तुलनेने अधिक टिकाऊ असतात. ती काही दशके तरी टिकू शकतात; पण समुद्रातील आम्लता (pH), सततचे घर्षण व रासायनिक विघटनामुळे, ती हळूहळू विरघळत असल्याप्रमाणे क्षतिग्रस्त होत जातात.  

(१६) समुद्रतळाशी किंवा समुद्रात खोलवर जाणार्‍या, मानवनिर्मित वस्तूंसाठी सर्वसाधारणत: ज्यांची भार सहन करण्याची क्षमता अधिक आहे असेच पदार्थ वापरले जातात. धातूंच्या बाबतीत, हा शोध सर्वसाधारणत: टायटॅनियम सारख्या कठीण पण वजनाने हलक्या असलेल्या धातूचा वापर करून निर्माण केलेल्या, अतिकठीण मिश्रधातूंवर येऊन थांबतो. मानवनिर्मित पाणबुड्यांमध्येही प्रामुख्याने टायटॅनियमचे मिश्रधातूच वापरले जातात;  कारण ते गंजरोधक व हलके असतात आणि उच्च दाब सहन करू शकतात.

समुद्रतळाशी टायटॅनियम संयुगांच्या स्वरुपात आढळतो; मात्र मानवासाठी समुद्रतळावरील खनिजांपासून त्याचे उत्पादन करणे हे सध्या तरी महाकठीण आणि खर्चिक आहे. इथे निवातकवचांच्या वाहनाचा मिश्रधातू टायटॅनियमपासून निर्माण केला गेला होता असे ठोसपणे सुचविलेले नाही. तो मिश्रधातू म्हणजे, निवातकवचांनी विकसित केलेल्या धातू व जैव तंत्रज्ञानाचा एकत्रित अविष्कार सुद्धा असू शकतो. 

========================

=====

क्रमश: 

=====


 

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

युद्धार्थं : भाग ८


 



=====================

युद्धार्थं : भाग ८    

=====================

मणिमतीच्या विनाशाला कारणीभूत ठरलेल्या त्या भयंकर युद्धाला जवळजवळ पाच सहस्र वर्षे होऊन गेली होती. निवातकवचांच्या कित्येक पिढ्या उलटून गेल्या होत्या. 

त्यांनी त्यांच्या इतिहासात ते युद्ध आणि त्यातून मिळालेला धडा, पिढ्यांपिढ्या आणि जाणीवपूर्वक त्यांच्या दीर्घ स्मृतींमध्ये जपला होता. प्रत्येक पिढीला त्या युद्धाची भीषणता आणि त्यामागची कारणे उमगणे आवश्यक होते, त्यांच्या स्वत:च्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी, विलुप्ततेच्या काठावर पोहोचून परत येण्यासाठी करावा लागलेला संघर्ष सुद्धा, प्रत्येक नवीन पिढीपर्यंत पोहोचणे आवश्यकच होते. पण तरीही त्यांच्या मनावर उमटलेले ते आघात आता बरेच पुसट होऊ लागले होते. 

त्यांचा नोंदवलेला इतिहास त्यांना असे सांगत होता की आरंभीच्या काळात त्यांनी समुद्रतळाखाली जाण्याचा जो निर्णय घेतला, तो त्यावेळेच्या परिस्थितीनुसार योग्यच होता. पण विवरे आणि भुयारांमध्ये जगणे, त्यांच्या अपेक्षेपेक्षा त्यांना बरेच कठीण गेले होते. त्यांच्या मूळ आराखड्यानुसार निर्मिलेल्या अनेक संरचनांमधील त्रुटी त्यांना कालांतराने जाणवू लागल्या होत्या. कित्येक ठिकाणी नियमित स्वरूपातील देखभाल सुद्धा पुरेशी ठरत नव्हती, हे त्यांना लवकर उमगले.  

----

तिथे राहण्यास आल्यापासून साधारण चार शतके झाली असतील;  तेव्हांच भिंतींना सूक्ष्म तडे जाऊ लागले होते. त्या वेळी नव्याने दिलेले लेपनाचे असंख्य थरही पुरेसे ठरत नव्हते. मग त्यांनी विपरीत परिस्थितीतही टिकाव धरू शकणार्‍या सूक्ष्मजंतूंचा (extremophile microbes) वापर करून, अशी खनिज संयुगे विकसित केली, ज्यांच्यायोगे  भिंतींना जाणारे तडे आपोआप भरले जातील. (८)

पण जसजशी त्यांची संख्या वाढत गेली, तसतशी त्यांना नवनवीन विवरांची, भुयारांची आवश्यकता जाणवू लागली.  आरंभीच्या काळात जाणवलेले कालबंधन नसल्यामुळे, नवीन विवरे, भुयारे, गुंफा अधिक सुधारित संरचना योजून, अधिक वेळ घेऊन निर्माण केल्या गेल्या होत्या. स्वाभाविकच त्या मूळ गुंफांपेक्षा अधिक चांगल्या होत्या, सुविधांनी परिपूर्ण होत्या. जुन्या गुंफांत राहणार्‍या बहुसंख्य  निवातकवचांनी नव्या गुंफांत स्थलांतर केले. त्यापूर्वी जुन्या गुंफांतील भिंतींवर त्यांनी त्यांचा इतिहास चित्रित करून ठेवला; जेणेकरून दीर्घ कालावधीनंतर त्या जुन्या गुंफा, निवातकवचांच्या प्राचीन इतिहासाचा एक दृश्य ठेवा ठरावा.  

उष्णता नियमनासाठी वापरलेल्या सहकेंद्रित आवरणे असलेल्या नलिकांवर आता आणखी आवरणे चढली होती. तसेच तिथे आवश्यकतेनुसार उघडझाप करणार्‍या झडपा (adaptive valve) बसविण्यात आल्या होत्या. केवळ समुद्रतळाशी सुप्त अवस्थेत असलेल्या ज्वालामुखींवर आणि पर्यायाने त्याच्या निकट असलेल्या स्थानांवर अवलंबित्व राहू नये, म्हणून त्यांनी भूकंपनांचा आणि सम्पीडविद्युत्‌रत्नाचा (Piezoelectric crystal) वापर करून स्पन्दविद्युत (Piezoelectric Energy ) निर्माण करण्याची क्षमता प्राप्त केली होती. ही ऊर्जा अल्प प्रमाणात निर्माण होत असल्याने ती पूरक स्वरूपात वापरली जात असे, मुख्य स्रोत म्हणून नव्हे. (९)

आरंभीस त्यांनी त्यासाठी मूळ आराखड्याचाच, त्याच्या अनेक स्तरीय रचनेचाच वापर केला होता. नवीन विवरे खोदताना, प्रत्येक वेळेस सुप्त ज्वालामुखीचे उगम शोधून, तिथे उष्णता कशी उपलब्ध होऊ शकेल ह्याचा विचार करूनच मग त्या आराखड्यातील अनेक स्तरीय कक्षांची, गुंफांची रचना केली जात असे. मात्र नंतरच्या पिढ्यांमधील अनेकांनी मूळ जागेपासून दूर जाण्यापेक्षा, अधिक खोलवर पण सुरक्षित ठिकाणी भुयारे खणण्याला प्राधान्य दिले होते. समुद्रतळाच्या खाली आता भुयारांचे, उपविवरांचे प्रचंड जाळे होते आणि ते दूरपर्यंत पसरले होते. 

ह्या दीर्घकाळात आरंभीचा काळ केवळ तगण्याचा होता. पण काही पिढ्यांनंतर, त्यांची प्रगती वेगाने झाली होती. अर्थात ह्या स्थितीला पोहोचण्यासाठी त्यांनी बराच मोठा त्याग करावा लागला होता. त्यांची शारीरिक संरचना , शारीरिक क्षमता, बौद्धिक क्षमता, वर्षानुवर्षे रुजलेल्या सवयीं, अन्न आणि अन्नभक्षण ह्या सर्वांमध्ये आमूलाग्र परिवर्तन होत गेले. 

----

मणिमतीच्या विनाशानंतर विस्कटलेल्या लिंग गुणोत्तरामुळे त्यांची सामाजिक रचना पूर्णपणे अस्ताव्यस्त झाली होती; आणि ती एका पुरातन संघर्षाला आणि मोठ्या असंतोषाला कारणीभूत ठरण्याची शक्यता होती. पण ह्या संदर्भात, त्यांच्या नेतृत्वमंडळाने अत्यंत चतुराईने, किरणोत्सर्गाच्या आपत्तीचा वापर करून घेतला. नेतृत्वमंडळाच्या हे लक्षात आले होते की शरीरात भिनलेला आणि पर्यावरणात असलेला किरणोत्सर्ग, असंतोष आणि संघर्ष टाळण्यासाठी, लैंगिक असमतोलाच्या समस्येसाठी इष्टापत्ती ठरू शकतो.  तेव्हां त्यांनी जाणीवपूर्वक उर्वरित प्रजेची अशी धारणा होऊ दिली की आपल्या दीर्घकालीन अस्तित्वासाठी लैंगिक प्रजननापेक्षा, जैवतंत्रज्ञानाचा उपयोग करूनच आपले अस्तित्व टिकवावे आणि वाढवावे लागणार आहे. अन्यथा पुढील पिढ्यांवर किरणोत्सर्गाचे परिणाम अत्यंत तीव्र असतील. ह्या मुळे प्रजनासाठी अनेक स्त्रियांमध्ये योग्य जोडीदार मिळविण्यासाठी जी स्पर्धा सुरू होऊ पाहत होती, ती अकस्मात कमी झाली आणि अनियंत्रित लैंगिक प्रजननाला एका प्रकारे आळा बसला. 

जेव्हां ही धारणा प्रजेत रुजली, पसरली आणि ती स्वीकारली गेली, तेव्हां त्यांनी त्यांच्या जैवतंत्रज्ञानातील ज्ञानाचा पूर्ण उपयोग करून घेतला. शिवाय त्या क्षेत्रात नवीन संशोधनाला सुद्धा विशेष उत्तेजन दिले, चालना दिली. किरणोत्सर्गामुळे झालेल्या उत्परिवर्तनांचा अभ्यास करून नियंत्रित जैवतंत्रज्ञान विकसित केले गेले. त्यांनी त्या वेळी जे कठोर निर्णय तातडीने घेतले आणि राबवले, त्यामुळे त्यांना त्यंच्या संख्येतील लैंगिक असमतोलाला अल्पावधीतच आटोक्यात आणणे शक्य झाले. 

----

पण तरीही मोठ्या प्रमाणात झालेला किरणोत्सर्ग संसर्ग आणि नंतर लगेचच समुद्रतळाखाली खोलवर, अत्यंत भिन्न पर्यावरणात वास्तव्य करावे लागल्यामुळे अमरारिंनी जे जैवशास्त्रीय भाकित केले होते, ते टळले नाहीच. निवातकवचांच्या शारीरिक संरचनेत प्रत्येक पिढीत सूक्ष्म परिवर्तन होतच गेले. काही अंशी त्यात जैव तंत्रज्ञानाशी संबंधित प्रयोगांचाही हातभार लागला होता. नंतरच्या पिढ्यांमध्ये, विशेषत: जे अधिक खोलवर राहत होते, त्यांच्यात त्या परिवर्तनाचे परिणाम तुलनेने लवकर आणि अधिकाधिक दृग्गोच्चर होऊ लागले.  आणखी अनेक गोष्टी त्यांच्या त्या अतिवेगाने होणार्‍या उत्क्रांतीला कारणीभूत ठरल्या.

त्यातील एक प्रमुख होती अन्न व अन्नभक्षणाच्या सवयी. 

समुद्रतळाच्या अन्नसाखळीवर आधारित अशी मणिमतीमधील त्यांची शेते आणि अन्नप्रक्रिया केंद्रे उद्ध्वस्त झाली होती. पण तरीही संचयित केलेले, प्रक्रिया केलेले काही अन्न शिल्लक होते. त्यांची संख्या प्रचंड प्रमाणात घटली होती; त्यामुळे त्या संचयित अन्नावर त्यांना काही महिने काढणे शक्य झाले होते, पण त्यावर प्रचंड नियंत्रण असल्यामुळे त्यांना काही प्रमाणात अन्नाचे दुर्भिक्ष जाणवले होते. नंतर शैवालकक्षांचा व त्यात उत्पादित होणार्‍या  अन्नाचा नियमित वापर होऊ लागल्यानंतर, अन्नाचे दुर्भिक्ष कमी होत गेले. पण काही पिढ्यांनंतर तो पर्याय सुद्धा अपुरा पडू लागला होता. मूळात समुद्रतळात खोलवर वास्तव्य केल्यामुळे, त्यांच्या अन्नभक्षणाच्या सवयीत जे आमूलाग्र बदल होत गेले, ते आधीच्या काही पिढ्यांनी स्वीकारले होते. 

पण कालांतराने नवीन पिढ्यांतील विद्रोही वृत्तीच्या काही निवातकवचांनी, पूर्वीप्रमाणे समुदतळावर जाऊन जलचरांची शेती करण्यास आरंभ केला. त्याचे परिणाम विलक्षण वेगाने झाले. त्यांच्यात शारीरिक रचनेत इतरांपेक्षा अधिक वेगाने परिवर्तन झाले.  तिथे उपलब्ध असणार्‍या खनिजांचा, वायुंचा सुयोग्य वापर करत, त्यांनी  तिथल्या वातावरणाला, पर्यावरणाला,  पूरक असणारी आणि तिथे साचणारे उत्सर्जित पदार्थ, त्याज्य पदार्थ, तिथे असणारे सूक्ष्मजंतू , तिथे उपलब्ध असलेले काही अपृष्ठवंशी प्राणी (invertebrates), तिथे वावरणारे, राहणारे काही मासे आणि इतर काही छोटे व नियंत्रित करता येतील असे मोठे जलचर, ह्या सर्वांची जीवनचक्रे एकत्र गुंफत, त्यांच्या वाढत्या संख्येला  दीर्घकाळ नियमित स्वरुपात आणि पुरेसे अन्न प्राप्त होईल; अशी एक नवीन आणि गुंतागुंतीची नवीन अन्नसाखळी त्यांनी निर्माण केली होती, त्यांच्यापुरता त्यांनी अन्नाचा प्रश्न सोडविला होता.

पण ह्या अन्नभक्षणाच्या पद्धतींने सुद्धा, त्यांच्या शारीरिक संरचनेत होणार्‍या विलक्षण परिवर्तनात, मोठ्या प्रमाणात हातभार लावला होता. 

एकंदर सर्वच निवातकवचांच्या शरीरांतर्गत असणार्‍या बहुसंख्य इंद्रियांनी त्या पर्यावरणातील  गंधकाच्या, मिथेनच्या आणि अन्य काही घटकांच्या वाढलेल्या परिणामांशी जुळवून घेतले होते. पण ह्या नवीन जलचरांच्या शेतीमुळे, त्या जलचरांच्या शरीरात असणारा आणि रासायनिक संश्लेषणास हातभार लावणारा एक उपयुक्त जीवाणू , त्या निवातकवचांच्या पचनसंस्थेत नांदू लागला.

----

त्या खोल विवरात त्यांच्या शरीरावर पडणारा दाब प्रचंड अधिक होता (१०),  शिवाय त्यांच्या नगरीतील प्रकाश मणिमतीच्या तुलनेत अंधुकच होता. आरंभीच्या काळात त्यांना, त्यांच्याकडे असलेली युद्ध-कवचे वापरूनच सतत वावरावे लागे. एका अर्थाने ते कवच त्यांच्या शरीराचा भाग होऊन गेले होते.  

तिथल्या अतिअंधूक प्रकाशामुळे, त्यांच्या डोळ्यांचा आकार हळूहळू वाढत गेला. डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी, डोळ्यातच एक पटलही काही पिढ्यांनंतर विकसित झाले. 

तिथल्या दाबापासून संरक्षण व्हावे त्यांना हालचाल करणे सोपे व्हावे आणि चयापचयासाठी कमीत कमी ऊर्जा वापरली जावी, म्हणून कदाचित त्यांच्या शरीरातील सापळ्याची, हाडांची घनता वाढली पण तरीही अनेक हाडांची संरचना अधिकाधिक लवचिक होत गेली, कूर्चांचे प्रमाणही वाढले.  (११)

मणिमतीत सुद्धा पाण्यात विरघळलेला प्राणवायू (Oxygen) मूळातच कमी होता, पण तिथे त्यांच्या कानामागील कल्ल्यांमधून, त्यांना जो प्राणवायू मिळत होता, तो त्यांची प्राणवायूची गरज भागवत होता. पण आता समुद्रात अधिक खोल गेल्यावर, जेव्हां प्राणवायूचे प्रमाण आणखी कमी झाले आणि संपूर्णपणे निर्माण केलेल्या प्राणवायूवर त्यांना विसंबून राहावे लागले, तेव्हां त्यांच्या शरीरात हळूहळू बदल होऊ लागले. समुद्रतळावर जाण्यची वेळ फारशी येत नसल्याने, ज्यांच्या कानामागच्या कल्ल्यांचा वापर होत नसे, त्यांच्या पुढच्या पिढींमध्ये त्या कल्ल्यांचा हळूहळू लोप होत गेला. पण त्या व्यतिरिक्त एक अनपेक्षित आणि निर्णायक परिवर्तन त्यांच्या नंतरच्या पिढ्यांत होत गेले. ते होते अवायूश्वसन (Anaerobic Respiration) (१२). 

पूर्वीसुद्धा क्वचितप्रसंगी ते अवायूश्वसन (Anaerobic Respiration) करत असावेत, कारण त्यांच्या दीर्घस्मृतीत, तसे तुरळक उल्लेख होते. त्यावेळी त्या क्षमतेचा विशेष वापर करण्याची वेळ येत नसावी. पण आता ती क्षमता अधिक कार्यक्षम होऊ लागली होती.  कल्ल्यांचा लोप होऊ लागल्यावर, त्यांच्या शरीरात सुप्तावस्थेत असणारी काही जनुके (genes) सक्रिय होऊ लागली. त्यानंतर त्यांच्या अंतर्श्वसनयंत्रणेत आणि श्वसनासंबंधीच्या त्यांच्या बाह्य इंद्रियातही पुन्हा एकदा विलक्षण परिवर्तन होत गेले. त्यांच्या नाकाचे कार्य गौण होऊ लागले होते आणि नाकाचा आकार लहान होत गेला. काही पिढ्यांनंतर तर त्यांच्यातील कित्येकांच्या नाकाच्या जागी केवळ दोन छिद्रे उरली होती. 

शरीरात भिनलेला आणि आरंभीच्या काळात सहावा लागणारा किरणोत्सर्ग आणि नंतर पर्यावरणात झालेल्या प्रचंड परिवर्तनाचा अटळ परिपाक, अनुवंशिक उत्परिवर्तनात (Genetic mutations) होणे अस्वाभाविक नव्हते. कित्येक पिढ्यानंतर त्यांच्या अनेक गुणसूत्रात आणि शारीरिक आणि आंतरिक संरचनेत, जे स्थायी स्वरुपाचे परिवर्तन झाले, ते त्या परिस्थितीत अटळच होते. 

त्यांच्या रक्ताचा रंग आणि रक्तातील घटकही पालटत गेले. सुरुवातीस त्यांच्या रक्ताच्या रंगात फिकटशी जांभळी छटा आली (१३) . विरघळलेला प्राणवायू वाहून नेण्याची त्या रक्ताची क्षमता प्रचंड वाढली होती. 

त्यांच्या त्वचेचा रंग सुद्धा बदलत गेला आणि त्यात निळसर-काळसर झाक वाढू लागली. त्यांच्या शरीरावर, शरीराला घट्ट चिकटून असणारे जे कवच सदैव असायचे, त्यामुळे कवचातील प्रथिनांचे व खनिजांचे संश्लेषण त्यांच्या त्वचेच्या पेशींमध्येच होऊ लागले. आणखी काही शतकांनी ते कवच जणू त्यांच्या शरीराचा अविभाज्य भागच झाले होते. काही पिढ्यांनंतरची संततीच्या त्वचेवर जन्मत:च कठीण थर दिसू लागले. कदाचित त्यामागे जैवतंत्रज्ञानाचा हात असावा, पण त्याची माहिती गुप्त ठेवली गेली होती. 

त्यांच्या शरीरावरील केस हळूहळू नाहीसे होत गेले. आता त्यांच्या त्वचेला एखाद्या धातूसारखा गुळगुळीतपणा आला होता. 

त्यांच्या डोक्याचा, चेहर्‍याचा आकार बदलला. जबड्याची, दातांची रचना बदलली. सर्वांचीच शारीरिक उंची कमी होत गेली होती, पण जे कधीही विवर सोडून बाहेर पडले नाहीत, त्यांची शारीरिक उंची तर अधिकच वेगाने कमी होत गेली. 

मर्यादित टेलीपथी (दूरमनोसंप्रेषण) ची क्षमता त्यांच्यात पूर्वीपासून सुप्त स्वरूपात असावी. पण त्यांच्या नव्या नगरीत संपर्क साधण्याची प्रभावी यंत्रणा नसल्याने आणि त्यांच्या मेंदूत, चेतासंस्थेत जे परिवर्तन होत गेले त्यानंतर, ती शक्ती आता अधिक वेगाने आणि तीव्र पद्धतीने विकसित होऊ लागली होती. ह्याच काळात त्यांच्या मेंदूतील संवेदन व संप्रेषणाशी निगडित भाग अधिक विकसित झाला आणि मेंदूचा आकारही काही प्रमाणात वाढू लागला. वाढत्या मेंदूला सामावून घेण्यासाठी, स्वाभाविकच त्यांचे डोकेही बरेच मोठे होऊ लागले. 

काही निवातकवचांची टेलीपथी तर इतकी विकसित झाली होती की त्यांना संवाद साधण्यासाठी बोलावे लागत नसे. त्यांच्या मनातील विचार ते थेट दुसर्‍याच्या मनात प्रक्षेपित करू शकत होते. 

ह्याच सुमारास एक विलक्षण गोष्ट घडली. त्यांच्यातील एक विद्रोही तरुणांचा गट, कुतुहलापोटी समुद्रात विविध ठिकाणी आणि विविध स्तरांवर भ्रमण करून आणि काही काळ व्यतित करून परत आला. त्यानंतर, गेल्या पाच सहस्रकांमध्ये न घडलेली गोष्ट घडली....  

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

(८)  Self Healing Concrete आणि Biomineralization किंवा Microbial mineralization ह्या विषयी इंटरनेटवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. ज्यांना स्वारस्य आहे; ते ती शोधू शकतात. 

(९) Piezoelectric crystal चा वापर करून सर्वसाधारणत: अल्पप्रमाणात ऊर्जानिर्मिती होऊ शकते. अशा 'रत्नाचा' प्रकार कोणता आहे, त्यावर किती दाब पडत आहे, त्यावर निर्माण करता येणार्‍या ऊर्जेचे मान ठरत असले, तरीही सर्वसाधारणत: त्या ऊर्जेचे मान माईक्रोज्यूल्स मध्ये मोजता येईल इतकेच असते. अर्थात अधिक मोठ्या स्तरावर ऊर्जानिर्मिती करण्यासाठी, त्या 'रत्नांचे' सतत आकुंचन, प्रसरण आवश्यक आहे. शिवाय अशा 'रत्नांचा' एक विशेष विन्यास (e.g. 3D arrays / Stacked structures) निर्माण करावा लागेल आणि निर्माण झालेली ऊर्जा साठवून ठेवण्यासाठी तितक्याच उत्तम प्रकारची साधने (e.g. Supercapacitors) लागतील. अधिक माहिती इंटरनेटवर. 

(१०)  सर्वसाधारणत: (अर्थातच पृथ्वीवर) समुद्रसपाटीवर वातावरणाचा भार (दाब --> एकक bar) एक असे धरले, तर जसजसे आपण समुद्रात खोल जातो, तसतसा साधारण प्रत्येक १०.३  मीटरनंतर  हा भार १ एककाने वाढतो, असे निरीक्षण आहे. अर्थात अन्य काही घटक ह्या गणितावर परिणाम करतात (उदा. तापमान, क्षारता, स्थानिक गुरुत्वाकर्षण आदि). 

अधिक कुतुहल असणार्‍यांसाठी :  

१ bar (बार) = १,०१,३२५ Pa (पास्कल) = ७६० mm Hg (पारा) = १४.६९६ psi (Pounds per Square Inch). 

१  पास्कल = १ N/m^2  (न्यूटन प्रति चौ.मी.) 

उपलब्ध माहितीनुसार, समुद्रातील दाब पुढीलप्रमाणे आहे :  

भरतखंडालगत ३०० ते ४०० बार, 

अमेरिकेजवळ कित्येकदा ६०० बार पर्यंत, 

Mariana Trench च्या मुखाजवळ साधारण ६०० बार,  

'Challenger Deep' ह्या नावाने ओळखल्या जणार्‍या Mariana Trench मधील सर्वात खोल ठिकाणी १०८६ बार, 

Tonga Trench मधील सर्वात खोल ठिकाणी तो १०८० बार इतका आहे,

Philippine Trench मध्ये १०५४ बार

Kuril–Kamchatka Trench : १०५० बार

Kermadec Trench : १००५ बार आदि. 

'Challenger Deep' पर्यंत काही जण विशेष 'जलयाना'त बसून जाऊन आले आहेत; मात्र Scuba Diving चा विक्रम केवळ ३३२.३५ मीटर्सचा, (अर्थात दाब साधारण ३० बार) चा आहे.  कोणतेही साधन न वापरता, श्वसननियंत्रणाचे विशेष कौशल्य वापरून २५३ मीटर्स, (साधारण २४.५६ बार) इतक्या खोल समुद्रात जाऊन आल्याचे केवळ एक उदाहरण आहे; आणि त्यांचे दुष्परिणाम काय झाले त्यांची माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. 

ह्यावरून निवातकवचांच्या नव्या नगरीत किती दाब सहन करावा लागत असावा ह्याची साधारण कल्पना येऊ शकते. थोडक्यात, विवरात राहणाऱ्या निवातकवचांवर पृथ्वीवरील सर्वात खोल समुद्राइतका भार सातत्याने पडत होता. 

(११) समुद्रात खोलवर राहणार्‍या जीवांमध्ये घडणारे परिवर्तन (अर्थात Deep-sea adaptations ) ही एक सर्वसामान्य गोष्ट आहे. ह्या मध्ये जैवप्रकाश, मोठे डोळे, लवचिक शरीर, शरीरातील सापळ्यात होणारे परिवर्तन, तात्पुरते छद्मरुप (Camouflage) आदि अनेक गोष्टींचा समावेश होतो. तिथला दाब, तापमान, प्रकाशाचा अभाव आदि गोष्टींमुळे हे घडते; असे सध्याचे विज्ञान सांगते. समुद्रतळापेक्षाही अधिक खोल जागी गेल्यावर जी उत्क्रांती झाली त्यात ह्या पैकी काही गोष्टी निवातकवचांमध्ये घडल्या असे इथे दाखविले आहे. 

(१२) अवायूश्वसन (Anaerobic Respiration) : प्राणवायू विरहित श्वसनास ‘अवायु-श्वसन’ असे म्हणतात. श्वसनासाठी जेव्हां उपलब्ध प्राणवायू पुरेसा पडत नाही, तेव्हां चयापचय क्रियेसाठी अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे चयापचय क्रियेसाठी आवश्यक असणारी ऊर्जा मिळवण्याचे काम काही पेशी करतात. ह्या प्रक्रियेत पेशीतल्या साखरेचे (ग्लुकोजचे) विघटन करून ही ऊर्जा मिळवली जाते. ह्याविषयी इंटरनेटवर भरपूर माहिती उपलब्ध आहे. ही प्रक्रिया सामान्यतः सूक्ष्मजीवांमध्ये आढळते, पण विपरीत परिस्थितीमुळे कदाचित, पण मोठ्या जीवांमध्ये दुर्मिळ असणारी ही क्षमता निवातकवचांनी आत्मसात केली.  

(१३) Hemocyanin (Coppe based) नावाचे एक प्रथिन अपृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये आढळते. ह्याच्यामुळे रक्ताला काहीशी जांभळी छटा येते. ह्या प्रथिनाची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता हिमोग्लोबिनपेक्षा कमी आहे, पण Hemocyanin रक्तातील विशिष्ट पेशींमध्ये असण्याची गरज नसल्याने, अर्थात ते रक्तद्रवात थेट सामावू शकत असल्याने, अतिशीत तापमानात आणि जिथे प्राणवायू मर्यादित प्रमाणात उपलब्ध होऊ शकतो, अशा ठिकाणी ते हिमोग्लोबिनपेक्षा अधिक उपयुक्त ठरते. त्याचे काही लाभ असले तरीही एकंदर त्याचे तोटे अधिक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा प्रण्यांच्या हालचाली तुलनेने संथ असतात. 

========================

=====

क्रमश: 

=====

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०२५

युद्धार्थं : भाग ७



=====================

युद्धार्थं : भाग ७ 

=====================

कित्येक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर विवराच्या भिंतींमध्ये अनेक स्तरांवर खोदलेल्या भुयारांची आणि त्यात निर्माण केलेल्या गुंफांची नगरी अखेर पूर्णत्वास आली होती.

अमरारिंना आणि महाधीला अपेक्षित होते; त्या प्रमाणेच ही नगरी पूर्ण होताना अनंत अडचणी आल्या होत्या. उध्वस्त मणिमतीमध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणावर साधनसामग्री उपलब्ध होती. तिथल्या ज्या ज्या गोष्टींचा पुनर्वापर शक्य होता, त्या त्या गोष्टी वापरात आणल्या गेल्या होत्या. पण तरीही साधनसामग्रीच्या पलीकडे अनेक आव्हाने होती आणि परिस्थितीचा तसेच काळाचा रेटा हा निर्णायक घटक ठरत होता. 

नवीन नगरीसाठी वेळापत्रक आखताना, अमरारिंनी  नेतृत्वमंडळाच्या सूचनेचे पालन करण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तरीही अपेक्षित असलेल्या कालावधीच्या जवळजवळ दीडपट वेळ लागला होता.  ह्या विलंबाचे एक प्रमुख कारण होते की विचकांनी त्यांचे काम चोख बजावले होते !  कित्येक भावी संकटे निव्वळ त्यांच्या डोक्यातील शंकासुरामुळे वेळीच उघडकीस आली होती आणि वेळीच त्यावरील उपाययोजना करणे शक्य झाले होते.

मोठ्या यंत्रांच्या सहाय्यामुळे कामाचा वेग अनेक पटींनी वाढला. भुयारे आता अधिक वेगाने खोदली जाऊ लागली; तसेच मोठ्या गुंफाची निर्मिती सुद्धा सोपी झाली होती. त्या भुयारांच्या व गुंफांच्या भिंतींमधून विविध आकाराच्या नलिका फिरवताना, भुयारांच्या, गुंफांच्या भिंतींना काही ठिकाणी तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावर वेळीच उपाययोजना केली गेली होती. पण तरीही भुयारांच्या आणि गुंफांच्या भिंतींना विशिष्ट प्रकारचे लेपन करण्याची आवश्यकता होती, जेणेकरून त्या भिंती त्यांच्यावर पडणारा भार सहन करू शकतील. तसेच आत राहणार्‍या निवातकवचांच्या शरीरावर पडणारा दाब त्यांना सहन करता यावा, ह्यासाठी विचकांच्या सततच्या आग्रहामुळे काही काही भुयारांमध्ये नि गुंफांमध्ये ह्या लेपनाचे कित्येक थर द्यावे लागले होते.

जलशुद्धीकरण प्रक्रियेचे काम तुलनेने थोडे सोपे होते; कारण त्या यंत्रणेचा कित्येक शतकांचा अनुभव निवातकवचांकडे होता. तरीही इथेही त्यांना त्यांच्या मूळ संरचनेत विविध सुधारणा कराव्या लागल्या. कारण इथे प्रश्न केवळ क्षारांचे प्रमाण तुलनेने अधिक असण्याचा नव्हता; तर तिथल्या पाण्यात विरघळलेला कर्बवायूचे (Carbon Dioxide) आणि मिथेनचे प्रमाण सुद्धा, समुद्रतळाच्या तुलनेत अधिक होते. स्वाभाविकच  विवरातील पाण्याची घनता ही क्षारता व विरघळलेल्या वायूंमुळे, समुद्रतळाच्या पाण्यापेक्षा किंचित अधिक होती.

विवराच्या तळाशी सुप्त अवस्थेत असणारा शिलारस, त्यांची उष्णतेची नड भागविण्यासाठी अत्यंत चतुराईने वापरला होता. एका मोठ्या चक्राकार नलिकेतून कमी उत्कलन बिंदू असलेला एक विशिष्ट द्रव भरला होता. हा द्रव जेव्हां विवराच्या तळाशी जात असे; तेव्हां त्याचे वायूत रुपांतर होत असे. त्या नलिकेच्या वरच्या भागात, त्या वायूला वेगाने थंड केले जात असे. ह्या उष्णता विनिमयातून (Heat Exchange)  जी उष्णता प्राप्त होत असे; ती इतकी अधिक असायची की तिचा वापर भुयारांमध्ये आणि गुंफांमध्ये करण्यापूर्वी त्यांना ती विविध मार्गांनी नियंत्रित करावी लागत असे. पण ह्या नियंत्रणामुळे बरीच उष्णता वाया जात होती. त्यामुळे उष्णता नियंत्रण कक्षातील तापमान बरेच अधिक असे. विचकांना ही गोष्ट खटकली नसती तरच नवल ! 

त्यांनी तिथल्या वैज्ञानिकांना त्यावर उपाय शोधायला आणि त्यानुसार यंत्रणेला नवीन रुप देण्यास सांगितले होते. त्यानुसार अमरारिंशी चर्चा करून, त्या वैज्ञानिकांनी त्या नलिकेला तीन सहकेंद्रित आवरणे दिली होती. सर्वांत आतील नलिकेत कमी उत्कलन बिंदू असलेला द्रव भरला जात असे. तो तळाशी पोहोचल्यावर वायूत रूपांतरित होई, आणि वरच्या थरात उष्णतेचे उत्सर्जन करून पुन्हा द्रवरूप धारण करी. मधल्या आणि बाह्य थरांत टप्प्याटप्प्याने उष्णता शोषली जात असे, त्यामुळे उष्णतेचा प्रवाह अधिक नियंत्रित झाला आणि वाया जाणाऱ्या उष्णतेचे मान लक्षणीयरीत्या कमी झाले. पण ह्यामुळे प्रत्यक्ष यंत्रणा कार्यांवित होण्याचा काळ बराच वाढला होता. 

समुद्रतळाशी प्रकाश जितक्या दूरपर्यंत प्रवास करत होता, त्या तुलनेत त्या विवरात प्रकाश दूरपर्यंत जात नव्हता; त्याचे महत्वाचे कारण होते त्या विवरातील पाण्यात असणार्‍या सूक्ष्म कणांचे व वायूंचे प्रमाण. त्यामुळे खरंतर त्यांना त्यांच्या ऊर्जागोलकांची सुधारित आवृत्ती निर्माण करणे आवश्यक होते; पण मूलभूत संशोधनापेक्षा वेळ वाचविणे, ह्या गोष्टीला प्राधान्य देऊन त्यांनी त्यांच्या आराखड्यापेक्षा अधिक ऊर्जागोलकांची तिथे व्यवस्था केली होती. पण तरीही  तिथला प्रकाश मणिमतीपेक्षा अंधुकच होता. विचकांच्या निरीक्षणाच्या वेळी त्यांनी ह्या गोष्टीवर नेमके बोट ठेवले. 

त्यावर उपाय म्हणून प्रथम, 'जीवदीप्ति (Bioluminescence) असलेल्या काही जलचरांचा वापर करावा का' ह्या विषयावर सांगोपांग चर्चा झाली होती, पण त्या चर्चेअंती हा उपाय सध्या व्यवहार्य नाही; असा अभिप्राय अनेकांनी नोंदविल्यामुळे, भविष्यात करावयाची उपाययोजना म्हणून तो उपाय राखून ठेवण्यात आला . तत्पश्चात सर्व भुयारे आणि गुंफांच्या भिंतीवर स्फुरदीप्ती (Phosphorescence) असलेल्या एका विशिष्ट पदार्थाचा आणखी एक लेप देण्यात आला. हा लेप ऊर्जागोलकांतून निघणारा प्रकाश शोषून घेत असे आणि नंतर बराच काळ मंद प्रकाश उत्सर्जित करत असे. त्यामुळे ऊर्जागोलकांना सतत पूर्ण क्षमतेने चालविण्याची आवश्यकता उरली नाही आणि तिथली   दीप्ती सुद्धा थोडीशी वाढली. 

शैवालकक्षातून अन्न आणि प्राणवायू ह्या दोन्हींची दीर्घकाळ पूर्तता होईल आणि जैवकचरा पुरेपुर वापरात येईल, अशा रितीने त्यांची रचना आणि निर्मिती करण्यात आली होती. हा कक्ष इतका परिपूर्ण झाला होता की निवातकवचांच्या पुढच्या काही पिढ्यांसाठी सुद्धा पुरेशा अन्नाची साठवणूक करून ठेवण्याची क्षमता त्या स्तरात होती. शिवाय शैवालकक्ष व साठवणुक कक्ष ह्या दोन्ही ठिकाणी, आवश्यकतेनुसार विस्तार करण्यासाठीही व्यवस्था करण्यात आली होती. 

सर्व यंत्रणांची निर्मिती करताना एक दक्षता आवर्जून घेतली गेली होती; ती म्हणजे पर्यायी यंत्रणा (Backup). त्यामुळे एखादी यंत्रणा कोणत्याही कारणाने बिघडली, तर तशाच दुसऱ्या पर्यायी यंत्रणेचा तात्काळ वापर करता येईल; अशाच प्रकारची रचना सर्वत्र करण्यात आली होती.  

अमरारि सर्व परिस्थितीवर, सर्व कार्यांवर, त्यांच्या प्रगतीवर सातत्याने लक्ष ठेवून होते; जिथे आवश्यक असेल तिथे ते सक्रिय सहभाग घेत. अखेर विचकांकडून ती नगरी पूर्ण झाल्याचा निरोप मिळाला, तेव्हां विचकांना सोबत घेऊनच त्यांनी मणिमती गाठली आणि नेतृत्वमंडळाला नगरी पाहण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

विपरित परिस्थितीतही टिकाव धरण्याच्या, निवातकवचांच्या अस्तित्वाच्या, पुढचा अध्यायाचा प्रारंभ आता दूर नव्हता. 

---------------------------------------

सहलेखक : विकास द. बापट आणि बिंग को-पायलट

=======================

अवांतर : 

इथे वापरलेली अनेक तंत्रे ही आपल्याला ज्ञात विज्ञानाशी सुसंगत आहेत. 

विवराच्या तळाशी असलेल्या शिलारसातून उष्णता मिळविण्याची पद्धत ही heat‑pipe या तंत्राशी साधर्म्य दाखवते. उपग्रह किंवा अवकाशयान यांना थंड ठेवण्यासाठी अशा नलिका वापरल्या जातात असे उल्लेख वाचले होते. त्यात कमी उत्कलन बिंदू असलेला द्रव भरलेला असतो. उष्णतेच्या संपर्कात आल्यावर तो वायूत रूपांतरित होतो, वरच्या थंड भागात पोहोचल्यावर पुन्हा द्रवरूप धारण करतो, आणि अशा रीतीने उष्णता एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वाहून नेतो. उष्णतेचा अपव्यय कमी करण्यासाठी देखील ह्याचा उपयोग होऊ शकेल असे इथे दाखविले आहे.

पाण्याची घनता ही केवळ क्षारतेवर अवलंबून नसते. तापमान, दाब आणि त्यात विरघळलेले वायू यांचाही त्यावर परिणाम होतो. विवरातील पाण्यात कार्बन डायऑक्साइड आणि मिथेनचे प्रमाण जास्त असल्याने त्या पाण्याची घनता  समुद्रतळाच्या पाण्यापेक्षा किंचित अधिक होते आणि अशा पाण्यात प्रकाशाचा प्रसारही मर्यादित होतो. कारण पाण्यातील सूक्ष्म कण आणि वायू प्रकाश शोषून घेतात किंवा त्याचे scattering करतात. म्हणूनच विवरात ऊर्जागोलक असूनही प्रकाश मणिमतीपेक्षा अंधुक होता.

जीवदीप्ती म्हणजे काही जीव स्वतः प्रकाश निर्माण करतात, जसे की समुद्रातील जेलीफिश किंवा खोल समुद्रातील मासे. पण त्यांना नियंत्रित करणे, वाढवणे आणि दीर्घकाळ टिकवणे कठीण होते. म्हणून तातडीच्या उपायासाठी त्यांनी स्फुरदीप्तीचा मार्ग निवडला, असे दाखविले आहे. हा पदार्थ बाह्य प्रकाश शोषून घेतो आणि नंतर मंद प्रकाश सोडतो. त्यामुळे नगरीत एक सौम्य, स्थायी स्वरुपाचा प्रकाश निर्माण करता आला.

पृथ्वीवरही शैवालांचा वापर प्राणवायू निर्मितीसाठी आणि जैवकचऱ्याच्या पुनर्वापरासाठी केला जातो. इथे नगरीच्या दीर्घकालीन स्वयंपूर्णतेसाठी अन्न, प्राणवायू आणि कचऱ्यावरची पुनर्प्रक्रिया या तिन्ही गोष्टी एकाच प्रणालीत गुंफल्या आहेत.

अभियांत्रिकीतील एक मूलभूत नियम म्हणजे redundancy—म्हणजेच कोणतीही यंत्रणा बिघडली तर तिचा पर्याय तत्काळ उपलब्ध असणे. अवकाश मोहिमा, पाणबुड्या किंवा अणुऊर्जा प्रकल्प यांमध्ये हा नियम काटेकोरपणे पाळला जातो. इथेही तीच संकल्पना वापरली गेली आहे. 

========================

=====

क्रमश: 

=====