वस्तुमान त्याच्या भोवतीच्या अवकाशाकालास त्याच्या परिमाणाच्या समप्रमाणात वक्र करते, ही गोष्ट आईनस्टाईनने त्याच्या व्यापक सापेक्षता सिद्धांतात मांडली. इथे अवकाश आणि काळ ह्यांच्या एकत्रीकरणामागचा मूळ उद्देश, हा बहुदा काळाच्या निरीक्षकसापेक्षतेचे कोडे सोडविण्याचा एक मार्ग हाच असावा. व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या मांडणीला, एक शतक होऊनही, काळाच्या निरीक्षकसापेक्षतेची, दुसरी सुसंगत मांडणी होऊ शकलेली नाही. अवकाश व काळाचे एकत्रीकरण ही योग्य कल्पना आहे की नाही, ह्याचे ठाम उत्तर आपल्याला भविष्यात मिळेल, पण आत्तापर्यंतच्या विविध प्रयोगांचे निष्कर्ष, किमान त्यासंबंधाने निर्मिलेल्या गणिती चौकटीला, सूत्रांना आणि तत्संबंधित नियमांला पुष्टी देत आहेत.
अवकाशकाल वक्र होतो म्हणजे नेमके काय वक्र होते ह्याचे उत्तर सध्या आपल्याकडे नाहीच. पण केवळ अवकाश वक्र होते आणि काळातील फरक हा त्या वक्र अवकाशाचा परिणाम आहे, असे जरी म्हटले तरी, अवकाश वक्र होते म्हणजे वस्तुमानाच्या सर्व बाजूला असणारी पोकळी वक्र होते, हा विचारही पचायला अवघड आहेच. शिवाय त्यातून दुसरा प्रश्न निर्माण होतो की, वस्तुमान त्याच्या सभोवतीच्या अवकाशाला वक्र का करते ? ; आणि ह्याचे समाधानकारक उत्तर आजपावेतो सापडलेले नाही.
गुरुत्वाकर्षणा संबंधीच्या लेखमालेत मी वक्र विश्वाबद्दल थोडेसे लिहिले होते. ताणून उंचावर धरलेली सतरंजी आणि त्यात ठेवलेला लोखंडाचा गोळा हे काही चपखल उदाहरण नव्हे. सतरंजीची वक्रता ही द्विमित पृष्ठभागाची वक्रता आहे आणि त्याचे कारण सतरंजीला खाली आकर्षून घेणारे गुरुत्वाकर्षण आहे. मात्र अवकाशातील वक्रता ही त्रिमित 'पोकळीची' (अवकाशाची) वक्रता आहे आणि त्यासाठी कारणीभूत ठरणारे घटकही निश्चितपणे आपल्याला (आज तरी) माहीत नाहीत. शिवाय त्रिमित अवकाशाला आलेल्या वक्रतेमुळे काळ संथावत असेल आणि सापेक्षता सिद्धांत त्याचे सूत्र देत असेल तर, सापेक्षता सिद्धांत गुरुत्वाकर्षण आणि काळ ह्यांचा संबंध दाखवितो इतकेच म्हणता येते. पण सापेक्षता सिद्धांत 'काळ' म्हणजे नक्की काय ते सांगत नाही. (अगदी 'A Brief History of Time' देखील काळाची नि:संदिग्ध व्याख्या देत नाही ! ) त्यामुळे अवकाश व काळ ह्यांचे एकत्रीकरण ही अजूनपर्यंत सिद्ध न होऊ शकलेले, एक गृहीतक आहे असे म्हटले तर ते अगदीच चुकीचे नव्हे. सूत्रात्मक सिद्धता / गणिती सिद्धता इतकेच सुचवितात की वक्र अवकाशाचा, तिथल्या काळावर परिणाम होतो.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवकाश व काळाची एकत्र गुंफण असलेल्या घटकाचा पूर्ण विश्वात विचार करायचा असल्यास, विश्व प्रसरण पावत आहे ही सध्याची धारणा लक्षात घेता, केवळ अवकाश (Space) नव्हे तर काळही (Time) विस्तारत आहे ही गोष्ट स्वीकारावी लागेल. इथे काळ प्रसरण पावत आहे, म्हणजे नक्की काय होत आहे ह्याचे तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता येईल का ?
'वस्तुमानामुळे वक्रता लाभते' ही संकल्पना अवकाश आणि काळ ह्यांना एखाद्या वस्तू (Matter) प्रमाणे पाहते का ?
--
आपल्याला काळाचे परिणाम जाणवतात. कार्यकारणभावाचा (Causality), काळ हाच प्रमुख आधार आहे. होऊन गेलेल्या गोष्टी, 'आत्ता'च्या गोष्टी ह्याबद्दल काळाचा वापर करून आपण ठोस विधाने करू शकतो, पण पुढे होऊ घातलेल्या गोष्टींबद्दल तितक्या ठोसपणे विधान करणे आपल्याला शक्य नसते. आणि असे असूनही पुढे होऊ घातलेल्या गोष्टींबाबत अंधुकपणे का होईना, पण नियमितपणे (प्रत्येक वेळी असे नव्हे) जाणीव होणारी माणसे आहेत, कित्येक प्राणी, पक्षी आहेत. त्यांना ही जाणीव होते, म्हणजे त्यांच्या मनाला ही जाणीव होते. हे कसे घडते ? काळाच्या अक्षावरील ठराविक घटना त्यांच्यापर्यंत कशा पोहोचतात ? त्यांच्या मेंदूला ही 'जाणीव' होण्यासाठी नक्की कोणती प्रक्रिया पार पडते ?
असे तर नाही ना की 'वाहणारा' काळ, हा आपल्याला ज्ञात असलेल्या भौतिकशास्त्राच्या चौकटीबाहेरचा काही घटक आहे ? काळ हा निव्वळ भ्रम आहे असे मानणारा देखील एक वैज्ञानिक गट आहे. पण त्यामागची तर्कप्रणाली पुरेशी सक्षम नाही. काळाच्या जाणीवेला भ्रम म्हटले की त्याचे परिणाम प्रपाती (Cascading) असतात. ते परिणाम दुसर्या अनेक गोष्टींना भ्रम ठरवू शकतात. आणि मग काळ भ्रम आहे, हे वैज्ञानिक निकषांवर टिकणारे प्रमेय राहात नाही.
काळ म्हणजे केवळ भ्रम आहे असे मानणार्या ठराविक वैज्ञानिकांपैकी कुणीही, आपल्या व्यवस्थांवर, शरीरावर होत असलेल्या काळाच्या परिणामांचे सयुक्तिक उत्तर दिले असल्यास, ते माझ्या वाचनात आलेले नाही. आणि आजूबाजूला दिसते ते सर्व 'माया' आहे, हे उत्तर अगदी 'Matrix' च्या विज्ञानकथेत लपेटून दिले तरी ते अंतिमत: तत्वज्ञानातील गुंतागुंतीच्या प्रश्नांच्या दिशेने जाते, विज्ञाननिष्ठ उकलीच्या दिशेने नव्हे.
====
सर्वमान्य होईल, सर्व स्तरांवर, सर्व परिस्थितींमध्ये लागू करता येईल अशी काळाची व्याख्या करण्यात आलेले अपयश हे कदाचित काळाच्या बाबतीतल्या गुंतागुंतीचे एक प्रमुख असावे.
काळाची वाचलेली एक व्याख्या पुढीलप्रमाणे होती :
"Time is the indefinite continued progress of existence and events that occur in apparently irreversible succession, from the past through the present to the future. "
म्हणजेच
"काळ म्हणजे, अस्तित्व आणि घटनांची, भूतकाळ ते वर्तमानकाळ ते भविष्यकाळ अशी क्रमिक आणि अपरिवर्तनीय वाटचाल. "
वरवर चपखल वाटणारी ही व्याख्या प्रामुख्याने दोन नवे प्रश्न निर्माण करते.
१) अस्तित्व म्हणजे काय ?
२) काळाची व्याख्या करताना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ही काळाचीच रुपे वापरणे योग्य आहे का ?
२) काळाची व्याख्या करताना भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ही काळाचीच रुपे वापरणे योग्य आहे का ?
काळाची व्याख्या करतानाची प्रमुख अडचण, काळ ही वस्तू नाही हीच असावी. मनाची व्याख्या करतांना, विविध मनोभावनांची व्याख्या करताना हीच अडचण जाणवते. सुदैवाने मन, मनोभावना भौतिकशास्त्राचा, सूत्रांचा भाग नाहीत आणि त्यामुळे तशी व्याख्या करता आली नाही तरी विज्ञानाच्या दृष्टिकोनातून फारसे काही बिघडत नाही. काळाचे तसे नाही आणि न्यूटन, आईनस्टाईन आणि इतर असंख्य प्रज्ञावंतांनी काळाची, त्याच्या परिणामांची अनुभवास येणारी सूत्रे शोधल्यामुळे काळाची विज्ञानाच्या चौकटीत बसेल अशी व्याख्या करणे अनिवार्य झालेले आहे.
========
क्रमश:
========
क्रमश:
========
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा