रविवार, २ जून, २०१९

काळ - भाग - ७


काळाची व्याख्या निश्चित करताना काळाचे विविध गुणधर्म विचारात घेणे अत्यंत आवश्यक आहेच, पण त्याचसोबत काळाशी निगडीत असलेल्या इतर घटकांच्या व्याख्या निश्चित करणेही आवश्यक आहे. पण हे वाटते तेवढे सोपे नाही.

काळाचे स्वरूप निश्चित करणारा सर्वात प्रमुख घटक आहे घटनांचा क्रम. हा क्रम कार्यकारणभावातून उपजत असो वा नसो, काळाच्या सलगतेची, दिशेची 
निश्चित स्वरूपाची मांडणी करणारा हा घटक आहे असे आपण मानतो. पण खरेच तसे आहे का ?

घटनाक्रम हा सर्व निरीक्षकांसाठी सदैव समान असतो का ?  ह्याचे उत्तर हो असे असायला हवे, पण निदान आपल्या विश्वात, आपल्यासाठी तरी ते तसे नाही. घटनेचे, काळाचे आपल्याला होणारे ज्ञान हे प्रामुख्याने रेडियो लहरींच्या माध्यमातून होते आणि प्रकाश हा त्यापैकी सर्वाधिक महत्त्वाचा घटक, त्यामागोमाग बहुदा ध्वनीचा क्रमांक असावा. प्रकाशाच्या (किंवा तत्सम रेडियोलहरींच्या) वेगामुळे, घटनाक्रम ठरविण्याचा आपला मार्ग, आपल्याला वा आपल्या यंत्रांना ज्या क्रमाने घटना 'दिसतात' त्याच्याशी निगडीत आहे. जवळच्या अंतरांवर घडलेल्या दोन घटनांचा क्रम ठरविताना ही गोष्ट पुरेशी आहे, पण विश्वातील अतिदीर्घ अंतरावर घडणार्‍या घटनांच्या दृष्टीने हा सुयोग्य मार्ग नाही. कित्येक हजारो प्रकाशवर्षे दूर असणार्‍या तार्‍याचा झालेला स्फोट आपल्याला आज 'दिसतो', पण प्रकाशाच्या (किंवा इतर रेडियो लहरींच्या) आपल्या सध्याच्या ज्ञानानुसार आपण त्या घटनेची निश्चिती, भूतकाळातील घटनांच्या अनुषंगाने करतो. म्हणजेच आपल्या दृष्टीने घटनाक्रमाची निश्चिती करण्यासाठी आपण पृथ्वी हा संदर्भबिंदू म्हणून वापरतो. पण दूरच्या भविष्यकाळात कधी ना कधी, मानव प्रजाती आकाशगंगेत अनेक ठिकाणी आपले अस्तित्व निर्माण करेल, त्यावेळी प्रचंड मोठ्या अंतरावर घडलेल्या घटनांची निश्चिती करण्याची वेळ येईल आणि त्यासाठी पृथ्वी हा संदर्भबिंदू म्हणून वापरणे शक्य नसेल. तिथे घटनाक्रम निश्चित करताना Time Dilation च्या विविध स्वरूपांना तोंड द्यावे लागेल. कदाचित प्रकाशवेग हा संपूर्ण विश्वात समान नाही, ह्याचे ज्ञान तोपर्यंत मानवाला प्राप्त झाले असल्यास, त्यातून ह्याहीपेक्षा अधिक गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता आहे.

काळाचा संदर्भबिंदू पृथ्वी वा अन्य कोणताही राहिला, तरी तो संदर्भबिंदू सुचवत असलेली एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे 'काळाच्या वाहण्याचा' (किंवा काळ वाहण्याचे प्रमाण जाणविण्याचा) एक प्रमाण दर आपण निश्चित केला असेल.  आज आपण किलोग्राम किंवा मीटर हे एकके वापरतो तेंव्हा वजन आणि लांबी ह्यांची प्रमाण एकके आपण निश्चित केलेली असतात आणि त्या एककांच्या संदर्भाने आपण इतर वजने वा लांबी ह्यांचे मापन करतो. गुरुत्वाकर्षणाबाबतही अशाच प्रकारे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला एक एकक मानून इतर अवकाशीय वस्तूंचे गुरुत्वाकर्षण निश्चित केले जाते. तद्वत भविष्यकाळात जेंव्हा, विश्वातील दोन स्थानी असलेल्या काळाच्या वाहण्याची आणि पर्यायाने तिथल्या वेळेची तुलना करण्याची वेळ येईल तेंव्हा काळाबाबत देखील एक एकक निश्चित करणे आपल्याला अनिवार्य ठरेल ह्यात काही शंका नाही.  आणि त्यावेळी 'काळ वाहतो' हे सोयीसाठी का होईना, पण आपण स्वीकारलेले असेल.

----

दुसरी गोष्ट म्हणजे, काळाचा कार्यकारणभाव स्वीकारणे ह्याचा स्वाभाविक अर्थ असा की भूतकाळातील घटना वर्तमानास आणि वर्तमानकाळातील घटना भविष्यकाळास जन्म देतात हे आपण स्वीकारले आहे. पण असे नसेल तर ?  म्हणजे कृष्णजन्म होणार होता म्हणून त्या जन्मा आधीच्या अघटित, विपरीत घटना घडल्या की कृष्णजन्माआधीची घटनांची पार्श्वभूमी,  कृष्णजन्म होण्यासाठी अनुकूल ठरली हे कसे ठरवायचे ?  श्रीकृष्णाचा जन्म विशिष्ट स्थानी, विशिष्ट वेळी, विशिष्ट उद्देशांसाठी होण्यासाठी, 'देवकीचा आठवा पुत्र तुझा वध करेल' ही आकाशवाणी कारणीभूत ठरली की कृष्णजन्म ठराविक प्रकारे आणि ठराविक उद्दिष्टासाठी होणारच होता हे अटळ सत्य त्या आकाशवाणीने केवळ वर्तविले, हे ठरविणे तशी अवघड गोष्ट आहे. आणि ही अशा प्रकारची एकमेव गोष्ट नव्हे. घटनाक्रमाबद्दल संदिग्धता निर्माण करणार्‍या अशा इतरही काही गोष्टी, आपल्या पौराणिक आणि अर्वाचीन इतिहासात आहेत. ह्याला परिस्थितीचे अचूक आकलन समजायचे की काळाचा गुंता हे ज्याने त्याने स्वत:ला समजावायची गोष्ट आहे.

पुंजभौतिकी स्तरावर अशाच प्रकारचा एक प्रयोग काही वर्षांपूर्वी करण्यात आला आणि त्या प्रयोगाचे निष्कर्ष धक्कादायक आहेत. एकापरीने, वर्तमानकाळ हा भूतकाळावर विसंबून असतो की भविष्यकाळ वर्तमानाला ठराविक दिशा देतो, ह्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत. ज्यांना अधिक जिज्ञासा आहे, त्यांनी 

पुढील लेख अवश्य वाचावा.

https://www.nature.com/articles/nphys3343

किंवा

https://www.researchgate.net/publication/6501301_Experimental_Realization_of_Wheeler's_Delayed-Choice_Gedanken_Experiment

Retrocausuality ही सध्याच्या विज्ञानाला पचायला अत्यंत अवघड गोष्ट आहे. कणभौतिकीस्तरावर ही गोष्ट निकटच्या काळात स्वीकारली गेली तरीही स्थूलस्तरावरही असे घडत असेल, हे विज्ञान कधीतरी मान्य करेल अशी चिन्हे आज नाहीत.  पण तरीही भविष्यकाळात घडावयाच्या गोष्टी वर्तमानात घडत असलेल्या गोष्टींना दिशा देतात,  हे कधी निर्विवादपणे सिद्ध झाले तर, दैववाद स्वीकारण्याच्या दिशेने ते विज्ञानाचे पहिले पाऊल असेल. दैववाद (Fatalism) ही तत्वज्ञानाच्या प्रांगणात नांदणारी, घटनांच्या स्पष्टीकरणाची शरणागती आहे, 'बाबू मोशाय, हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है, कौन कब कहां उठेगा, ये तो कोई नहीं जानता.' ह्या सुप्रसिद्ध संवादाला अधिक विस्तारून मांडणारी.  अर्थातच विज्ञानाच्या सध्याच्या चौकटीत न बसणारी ही मांडणी असल्यामुळे तिचा स्वीकार सहज होणे नाही. त्या तुलनेत घटनाक्रमाचा कार्यकारणभाव अधिक सक्षमतेने मांडणारी आणि काही प्रमाणात का होईना विज्ञानाच्या चौकटीत बसू शकेल असे वाटणारी मांडणी आहे समांतर विश्वांची. ह्या विषयावर पूर्वी मी स्वतंत्र लेखमाला लिहिली होती. पण काळाच्या स्वरूपाच्या दृष्टीकोनातून, समांतर विश्वांच्या अनेक मांडणीपैकी एका मांडणीचा (त्या लेखामालेतील मांडणी क्रमांक १) पुन्हा नव्याने विचार होऊ शकतो. दैववाद मर्यादित प्रमाणात जरी नाकारायचा असेल, तर स्वेच्छेला (Free Will) ला स्वीकारणे अपरिहार्य आहे.

समांतर विश्वांच्या मांडणी क्रमांक १ नुसार विचार केल्यास, काळाचे स्वरूप हे विश्वात सर्वत्र पसरलेल्या एखाद्या अवाढव्य जाळ्यासारखे आहे आणि विश्वाच्या बाबतीतील सर्व संभाव्य घटनांची पखरण त्या जाळ्यात झालेली आहे अशी कल्पना करता येते. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या दृष्टीने विचार केला, तर ह्यातील प्रत्येक घटना त्या व्यक्तीस प्राप्य नाही. त्या व्यक्तीच्या निर्णयांनुसार (ते निर्णय स्वेच्छेने होतात की दैवगतीच्या पगड्याखाली की दोहोंच्या एकत्रीकरणातून हा वेगळा विषय आहे), आयुष्याच्या विविध टप्प्यावर विविध घटना त्या व्यक्तीच्या वाट्यास येतात आणि त्यानुसार तिच्यासाठी काळाचा एक मार्ग तयार होतो असे म्हणता येते. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ ह्या सर्व घटना एकाच वेळी अस्तित्वात असतात असे मानणारा जो वर्ग आहे, त्याच्या मताशी काळाचे जाळे (किंवा कालजाल) ही संकल्पना अधिक मिळतीजुळती आहे. फरक इतकाच की इथे काळाचा अक्ष एकमेव आहे असा आग्रह नाही, स्थानपरत्वे ते वेगवेगळे असू शकतील किंवा काळाच्या अक्षामुळे तयार होणारी प्रतले अनंत आहेत असे मानावे लागेल . मूळातच समांतर विश्वे ही संकल्पना, आपल्याला उमगणार्‍या वास्तवाच्या अस्तित्वाला, हादरा देणारी संकल्पना आहे, त्यात काळाचे स्वरूप एखाद्या जाळ्यासारखे कल्पिणे आणि विविध संभाव्यतांना जन्म देणारे, काळाचे अनंत अक्ष असू शकतील हा विचारही अतिशय जटिल, गुंतागुंतीच्या शक्यतांची एक पोतडी उघडतो.

========
क्रमश:
========

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा